नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .
सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला . तोल गेला की कपाळमोक्ष निश्चित ! अशा ज्या पारंपारिक मार्गाने केवळ एक टक्का परिक्रमावासी व नागा साधू जातात ,त्या मार्गाची ही एक डोळस अंतर्यात्रा ...
परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय , स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .
कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .
आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !
नर्मदे काठी बसून घराचे , प्रपंचाचे , कामाचे स्मरण करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहूनच , घरामध्ये बसूनच , सर्व कामे करता करताच अंतःकरणापासून नर्मदेच्या काठाचे चिंतन करणे कधीही श्रेष्ठ !
चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा
mazinarmadaparikrama.blogspot.com
प्रतिक्रिया
1 Mar 2024 - 11:12 pm | चित्रगुप्त
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे. लवकर लवकर येवोत. नर्मदे हर.
2 Mar 2024 - 1:56 am | शाम भागवत
फोटो मस्तच.
पुढील भागाची वाट पाहातो आहे.
जरा मोठे असले तरी चालतील.
_/\_
2 Mar 2024 - 1:56 am | शाम भागवत
फोटो मस्तच.
पुढील भागाची वाट पाहातो आहे.
जरा मोठे असले तरी चालतील.
_/\_
2 Mar 2024 - 1:56 am | शाम भागवत
फोटो मस्तच.
पुढील भागाची वाट पाहातो आहे.
जरा मोठे असले तरी चालतील.
_/\_
2 Mar 2024 - 11:36 am | सौंदाळा
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा.
थोडे मोठे भाग करा.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच.
पुभाप्र.
2 Mar 2024 - 11:59 am | vikrammadhav
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा.
थोडे मोठे भाग करा.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच.
पुभाप्र.+१००८
2 Mar 2024 - 2:35 pm | मुक्त विहारि
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
2 Mar 2024 - 2:48 pm | कंजूस
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं.
नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.
2 Mar 2024 - 3:04 pm | मुक्त विहारि
इथे लेखक किंवा लेखिका, वाचकांचे शंका निरसन करु शकतात...
3 Mar 2024 - 5:34 am | चित्रगुप्त
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे.
दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.
3 Mar 2024 - 9:47 pm | कर्नलतपस्वी
२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.
4 Mar 2024 - 11:49 am | मनो
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!
6 Mar 2024 - 6:40 am | शाम भागवत
बापरे.
काय चिकाटी आहे तुमची.
_/\_
माझा आज १८ वा भाग संपला.
6 Mar 2024 - 7:49 am | मनो
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.
6 Mar 2024 - 10:59 am | शाम भागवत
खरंय.
7 Mar 2024 - 6:38 pm | चांदणे संदीप
+११११११११११
सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =))
सं - दी - प
31 Mar 2024 - 12:43 am | Narmade Har
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !
13 Apr 2024 - 1:01 pm | शाम भागवत
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही.
असो.
पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते.
काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल
अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏
6 Mar 2024 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी.
श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर,
वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान.
-दिलीप बिरुटे
8 Mar 2024 - 12:01 am | सुक्या
अगदी सहज सुन्दर लेखन. वाचतोय. आतपर्यंत २८ भाग झालेत वाचुन ..
13 Mar 2024 - 12:58 pm | अहिरावण
सुंदर लेखन ७५ भाग वाचून झाले.
26 Mar 2024 - 8:19 pm | अहिरावण
पुढील ४ भाग वाचले
28 Apr 2024 - 8:13 pm | अहिरावण
९० पूर्ण
28 Apr 2024 - 10:03 pm | रामचंद्र
अरे वा, माहितीबद्दल धन्यवाद.
11 May 2024 - 2:12 pm | अहिरावण
९८ पूर्ण
---
आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला.
---
शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ?
तो मनुष्य सांगू लागला .
सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो .
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे .
ते का ?
मी उपजत चौकसपणातून विचारले .
कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे .
काय ?महंतांचा खून ?
होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा .
पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो .
आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते .
आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते !
मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते .
ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली .
माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस .
परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले .
पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !
11 May 2024 - 2:41 pm | अहिरावण
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला?
प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)
14 May 2024 - 9:45 pm | Narmade Har
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते .
कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ?
कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही .
गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे .
जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम !
वेळेचा अपव्य करू नये .
नर्मदे हर !
15 May 2024 - 10:27 am | अहिरावण
नर्मदे हर !!
13 Mar 2024 - 1:03 pm | अहिरावण
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते.
गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता.
कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना.
इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही.
या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले.
लेखकाला साष्टांग दंडवत.
13 Mar 2024 - 1:48 pm | Narmade Har
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर !
mazinarmadaparikrama.blogspot.com
13 Mar 2024 - 11:22 pm | रामचंद्र
मानस परिक्रमा पूर्ण होण्यासाठी उर्वरित भाग कृपया लवकरात लवकर टाका, ही विनंती.
18 Mar 2024 - 9:27 pm | धर्मराजमुटके
आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले.
खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता.
तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला.
बर्याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला.
मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे.
बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी.
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ?
२. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ?
३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात)
४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ?
५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ?
४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.
18 Mar 2024 - 10:16 pm | धर्मराजमुटके
योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.
19 Mar 2024 - 11:16 am | अहिरावण
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे.
माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल.
अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल.
टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.
19 Mar 2024 - 11:58 am | शाम भागवत
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.
19 Mar 2024 - 12:40 pm | अहिरावण
ज्ञानाला असे बंदीस्त करण्यामुळेच भारताची दशा झाली आहे तरी अजून सुधारत नाहीत लोक !!
20 Mar 2024 - 1:08 pm | शाम भागवत
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत.
:)
20 Mar 2024 - 5:02 pm | अहिरावण
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !
21 Mar 2024 - 8:32 pm | Narmade Har
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ?
हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते .
२. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ?
वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .
३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात)
नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे .
४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ?
२०० % होय
५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ?
होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते
22 Mar 2024 - 4:15 pm | धर्मराजमुटके
धन्यवाद !
23 Mar 2024 - 5:19 pm | अहिरावण
अतिशय नेमकी माहिती. अनेकांच्या मनातील प्रश्नांना सुयोग्य उत्तरे मिळाले असतील.
19 Mar 2024 - 10:44 am | MipaPremiYogesh
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.
20 Mar 2024 - 2:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे.
पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे.
असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल.
https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4
20 Mar 2024 - 4:45 pm | Bhakti
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!
किती किती विलक्षण अनुभव आहेत.
नर्मदे हर!
5 Apr 2024 - 2:17 am | Narmade Har
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे.
का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !
5 Apr 2024 - 12:41 pm | अहिरावण
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य :
>>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही .
कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.
14 Apr 2024 - 12:46 pm | चौथा कोनाडा
लेख आवडला !
फोटो छानच !
नर्मदे हर !
16 Apr 2024 - 11:51 pm | सुक्या
वाचतो आहे.
सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!
18 Apr 2024 - 12:53 pm | Narmade Har
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे !
मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . .
नर्मदे हर !
19 Apr 2024 - 11:58 am | सुक्या
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल.
तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .
19 Apr 2024 - 5:37 pm | Narmade Har
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे .
बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !
14 May 2024 - 8:12 pm | Narmade Har
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !
14 May 2024 - 8:13 pm | Narmade Har
https://mazinarmadaparikrama.blogspot.com