सारं लुगड्यात गमावलं...!

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
3 Jul 2011 - 5:55 am

सारं लुगड्यात गमावलं...
हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे. परंतु होतं काय की गाणं गाणारा काय शब्द वापरतो, कसे उच्चार करतो अन् कोठे पॉज घेत गाण्याचा आशय ‘विषया’कडे नेतो हीच खरी ऐकणाऱ्यांची मौज होय.
गायक सहजच म्हणून जातो- ‘पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं!’ येथे ‘नाद’ आहे तो ‘बाई’ या शब्दाचा. म्हणजे स्त्रीचा. ती अशी तशी स्त्री नसून ‘बाई’ आहे हे ध्यानात ठेवावं लागतं. आणि लुगड्यात ’सारं’काही गमावणे ही खरी चपखल कोटी. मग ‘काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं.’ या मुखड्याचा खोचक आणि बोचक अर्थ उमजतो.
पुढील तीन कडव्यात तर मोक्कार मनोरंजन केलेलं आहे...
१) ‘दिलं उधार काही रोखं, गेलं लुगड्यात बिघडून डोकं, गेली सटकून गिऱ्हाईक लोकं, कुणी दहाचं देईना एक’ म्हणजेच लुगड्याच्या धंद्यात त्या इसमाचं डोकं पार भंजाळून गेलंय.. इतकं की कोणत्या स्त्रियांनी उधार नेलंय, कोणी एकही दमडी दिली नाही, कोणती स्त्री लुगडं घेऊन सटकलीय याचं भान त्याला राहिलेलं नाहीये. ‘दारावर चकरा मारुन नकरा तुम्हांला दमावलं’ म्हणजे उधारी मागायला जाऊनही नकारच मिळत गेले. उधारी मागून मागून दम लागला तरीही त्याने आपला धंदा चालूच ठेवला. कारण ‘बाईच्या नादानं’ त्याला काहीच सुचत नव्हतं.
२) ‘जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतर रहालं, तुमचं तुमीच केल्यात हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं,’ या लुगड्याच्या धंद्यात तो सर्व काही गमावून बसला. त्याचे हाल हाल झाले. पूर्वी त्याचा (धोतराचा) व्यवसाय जोरात असे, कसा तर- ’आल्या-गेल्यांना, भल्याभल्यांना तुम्हीच नामावलं’ तरीही यातून तो काहीही शिकला नाही. ‘बाईच्या नादानं.’ सारा तोटा सहन करीत बसला.
३) ‘असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट, कुठं घालाया मिळंना बोटं, त्याला खरंच म्हणावं शेठ,’ ही ओळ म्हणणाऱ्या गायकाचं कसब पणाला लागतं. या कडव्यातील प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा केल्यास कोणता अर्थ निघेल, कोणता काढायचा, ऐकणाऱ्यांना कशा गुदगुल्या करता येतील याचा विंचार गायकाने करायचा असतो. पूर्वी त्या इसमाचा धोतराचा धंदा फारच जोरात चालायचा. मोठ्या थाटात तो धोतर विकत असे. त्याच्याकडे इतकी गर्दी होई की कुठेही बोट शिरायला जागा उरत नसे, तो धोतराच्या धंद्यातला शेठ गणला जात होता. पुढच्या ओळीत वेगळाच अर्थ दडवून ठेवलेला आहे...‘झुन्जारानं लै आवडीनं गिऱ्हाईक जमावलं,’ झुंजारपणे वागून त्यानं हे गिऱ्हाईक गोळा केलं होतं..‘पण बाईच्या नादानं..’ इथे या कडव्यासाठी गायक मंडळी हमखास शब्द तोडीत ‘आवडी’ नावाच्या स्त्रीला मध्ये घेऊन भन्नाट अर्थ सांगून जायचे. त्यामुळे अख्ख्या कडव्याचा पुनर्विचार करावा लागे...!
या गाण्याचा ग्रामीण ठेका, ताल, व शब्द असे गारुड करून जात की एखाद्या इरसाल मित्राला सहजच म्हणावेसे वाटे- ‘काय राव तुम्ही..’
*************************

कलासंगीतकविताभाषाविनोदवाङ्मयइतिहासजीवनमानमौजमजाविचारमाध्यमवेधमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मी या गाण्याचा अर्थ वेगळाच समजले होते.

पाषाणभेद's picture

3 Jul 2011 - 8:09 am | पाषाणभेद

पुर्ण गाणे दिलेत तर संदर्भ समजतील.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

3 Jul 2011 - 8:26 am | डॉ.श्रीराम दिवटे

वरील लेखात पूर्ण गाणे आलेले आहेच.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

3 Jul 2011 - 8:36 am | डॉ.श्रीराम दिवटे

क्रमाने ते गाणे असे आहे...

काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं.

दिलं उधार काही रोखं, गेलं लुगड्यात बिघडून डोकं,
गेली सटकून गिऱ्हाईक लोकं, कुणी दहाचं देईना एक
दारावर चकरा मारुन नकरा तुम्हांला दमावलं.. पण बाईच्या नादानं...

जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतर रहालं,
तुमचं तुमीच केल्यात हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं
आल्या-गेल्यांना, भल्याभल्यांना तुम्हीच नामावलं.. पण बाईच्या नादानं...

‘असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट,
कुठं घालाया मिळंना बोटं, त्याला खरंच म्हणावं शेठ
झुन्जारानं लै आवडीनं गिऱ्हाईक जमावलं.. पण बाईच्या नादानं...

हे एक वादग्रस्त गाणे आहे.सांगली जिल्ह्यात झालेल्या आनंद शिंदेच्या कार्यक्रमात खुप दंगा झाला होता व बहुधा त्यात आनंद शिंदेना धक्काबु़क्की देखिल झाली होती.
ह्या वादग्रस्त गाण्यातुन स्व.मा. मु.वसंतदादा पाटिल व शालिनीताई पाटिल ह्याची मानहानी होते म्हणुन दादांच्या कार्यकर्त्यानी राडा केला होता. नंतर आनंद शिंदेनी माफी मागुन हे प्रकरण मिटवले.

"काय राव तुम्ही डॉक्टरकीत कमावल अन चावट लिहण्याच्या नादान लेखकीत गमावल"
अस काहीस गाण हव होत ना?
( ह. घ्या )

हहाहाहा लै भारी.

झुन्जार इथे गीतकाराचे "नाव" आहे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

3 Jul 2011 - 5:44 pm | डॉ.श्रीराम दिवटे

नवीन माहितीत भर पडली. धन्यवाद!

कार्यक्रमात शेतकर्‍यांना धोतरे वाटली गेली तेव्हा समारंभातील पाहुण्यांनी शेतकर्‍यांच्या पत्नीला लुगडे का दिले गेले नाही असा प्रश्न केला होता .त्यावर लुगडी घरपोच केली जातील अशा आश्वासनानंतर पाहुण्यांनी ती योग्य त्या घरीच जाऊ द्या असा टोमणा मारला होता. त्याबाबत काही लिखाण असेल असे वाटून धागा उघडला पण विषय वेगळाच असल्याने धागा उसवला.

यकु's picture

3 Jul 2011 - 9:13 pm | यकु

कोण होते बुवा हे पाहूणे..?
यांचे वंशज मिपावर आहेत काय.. ;-)

धन्या's picture

3 Jul 2011 - 11:08 pm | धन्या

आपला चांगला चालणारा, जम बसलेला धंदा सोडून उगाच कुणाच्यातरी सांगण्यावरून भलत्याच धंदयात पडू नये असा मोलाचा संदेश देणार्‍या गीताचं रसग्रहण वाचून अंमळ हळवा झालो...

पण प्रांजळ मत सांगायचं झालं तर रसग्रहण म्हणावं तसं जमलेलं नाही. आनंद शिंदेंच्या गीतांचं रसग्रहण कसं करावं याचं एक उदाहरण तुझी घागर नळाला लाव... ईथे आहे.

आदरणीय लोकगायक प्रल्हाद शिंदेंच्या मुलांनी गायलेली बहुतेक गीते अशीच द्वयर्थी आहेत. प्रल्हाद शिंदेंनीही लोकगीते गायली आहेत पण ती बर्‍यापैकी सोज्वळ आहेत. पण दुनिया प्रल्हादजींना ओळखते ते विठ्ठलाची गीते गाणारा गुणी कलाकार म्हणून. अगदी आजही सत्यनारायणाच्या पूजेला त्यांची "श्रीहरी जगत पिता" ही रेकॉर्ड वाजली नाही असं होत नाही. जो उत्कट आनंद अभिजन वर्गाला पं. भीमसेन जोशींच्या "विठ्ठलाऽऽऽ" मधून मिळतो, तसाच उत्कट आनंद सर्वसामान्यांना प्रल्हादजींच्या विठ्ठलाच्या गीतांमधून मिळतो.

गीत - दत्ता पाटील संगीत - मधुकर पाठक स्वर - प्रल्हाद शिंदे हा त्रिवेणी संगम आपल्याला भक्तीरसात भिजवून टाकतो...

म्हणूनच प्रल्हादजींच्या पुढच्या पीढीच्या गायकीबद्दल गंमतीने ग्रामिण भागात असं म्हटलं जातं की "बापाने धोतरात कमावलं पण पोरांनी लुगडयात गमावलं"