सफर लडाखची भाग २- द्रास आणि रक्षाबंधन
१७ ऑगस्टच्या सकाळी लेह ला निलेश च्या घरी उतरलो. निलेश नुब्रा व्हॅली मधल्या प्रतापपूरला गेला होता. तो दुपारी आला. पहिला दिवस पूर्णपणे झोपण्यात आणि निलेश शी गप्पा मारण्यात मजेत गेला. समुद्रसपाटीपासून जवळजवळ साडेअकरा हजार फूट उंचीवर असल्यामुळे लेह च्या हवेत प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन ची कमतरता आहे. जसजसं उंच जाऊ तसतसं हवेतलं प्राणवायूचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्यामुळे अश्या ठिकाणी नवख्या व्यक्तीला मळमळ, चक्कर येणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे निदान २४ तास तरी पूर्णपणे आराम आवश्यकच असतो. आपल्या शरीराला तिथल्या हवेशी जुळवून घ्यायला हा एवढा वेळ द्यावा लागतो.