मराठी गझल

...... कशाला ?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
23 Mar 2018 - 8:26 am

पुन्हापुन्हा मी क्षणोक्षणी सावरू कशाला
उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला

पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला

तिला जरासा हवा अबोला रुसावयाला
जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला

असे कसे बोलणे सखीचे मला कळेना
जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला

अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो
जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला

मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की
तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला

जगावयाला हवे कशाला नवे बहाणे
सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला

mango curryमराठी गझलगझल

यारहो ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
15 Mar 2018 - 9:35 am

दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो
जीव माझा आरशावर भाळलेला यारहो

बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी
संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो

पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे?
कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो

ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो

कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो
प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो

एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ
बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो !

हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले
मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो

मराठी गझलगझल

आठवणींचा कप्पा म्हणजे...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
15 Mar 2018 - 3:35 am

पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!

काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!

मराठी गझलशांतरसकवितागझल

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
7 Feb 2018 - 2:33 am

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा
कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा!

कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली
तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा!

कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला
फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Jan 2018 - 2:00 pm

(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)

सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!

आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!

वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!

भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
16 Jan 2018 - 4:05 pm

आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल !

ताईने दिलेली ओळ होती...

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

*********************

नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला
चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला

तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे
बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला

रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो
चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला

थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे
भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला

मराठी गझलगझल

तुझ्या नाजूक ओठांनी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Jan 2018 - 9:55 pm

अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी
तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी!

फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना
तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

gajhalgazalमराठी गझलशृंगारकविताप्रेमकाव्यगझल

एक कागद

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 11:38 pm

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

भावकवितामराठी गझलमार्गदर्शनमुक्त कविताकरुणकवितासमाजजीवनमान

मनातल्या मनात मी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
6 Nov 2017 - 11:14 pm

मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे
अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे!

तुटून तारका क्षणात आसमंत लांघते
उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे!

गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
4 Oct 2017 - 3:36 pm

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे!

बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे!

उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे!

नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!

मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल