विदूषक
काय माझ्या रेखिले आहे कपाळी
व्हायचे वटवृक्ष की साधी लव्हाळी
मागते आहेस का आषाढ श्रावण
वाट चुकला मेघ आहे मी उन्हाळी
स्पर्श,स्वप्ने,पाकळ्या,गझला नि माझ्या
काळजामध्ये किती जपशील जाळी
लागतो द्यावा सुखाला रोज पत्ता
दुःख येते प्रत्यही शोधीत आळी
आसवांवर तेवते आयुष्य माझे
वेदनांची साजरी करतो दिवाळी
फुंकरी घालू नका जखमांवरी या
मी विदूषक द्या मला निर्व्याज टाळी
-- उपटसुंभ