ती उत्तर मागत नाही...
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा
मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा!
मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी
ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा
मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा!
मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी
ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
नको तेच ते तू दुबारा करु
हवा देउनी मज निखारा करु!
भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या
पुन्हा पावसाला इशारा करु!
नको मोकळे केस झटकून तू
इथे चांदण्याचा पसारा करु!
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!
भावनांना नेहमी का आवरावे
आणि अर्ध्यातून सारे का हरावे
धार का लागे तिच्या दो लोचनांना
काय त्याला हे कळावे बारकावे
चूक होते त्यात काही गैर नाही
मान्य ती त्याने करावी मोठ्या मनाने
एकदा त्याने तरी माघार घ्यावी
नेहमी मागे तिनेची का सरावे
डाव आहे दोन वेड्या पाखरांचा
दोन वेड्या पाखरांनी सावरावे
एक रडता एक का हसतो कधी हो
रुद्ध झाल्या पाखराला हासवावे
हासता हातात घ्यावा हात त्याने
ना पुन: होणार आता आर्जवावे
पेर्णा सांगायलाच हवी का ?
ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी
खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!?
नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू...
मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी!
कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी !
हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी
पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी!
काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले
लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी !
—आडमापीगीत
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!?
पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!
कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!
काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!
—सत्यजित
सर एक श्रावणाची बरसून काय गेली
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!
कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!
कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
—सत्यजित