रात्र…
दामूचं कायतरी बिनसलंय हे तिनं तो संध्याकाळी घरी आला तेंव्हाच ओळखलं होतं. एक दोनदा तिनं तसं विचारायचा प्रयत्नही केला पण दामूने दाद दिली नाही. जेवताना दामूचं लक्ष नव्हतं. आज कित्येक दिवसांनी तो पोरांवर डाफरला ही नव्हता. रात्री विचारू असं म्हणून ती शांतपणे तिची कामं करत होती. अर्थात रात्री दामू तिला विचारायला वेळ कधीच देत नव्हता. अश्या कितीतरी गोष्टही तिने रात्री बोलू,विचारू म्हणून मनातच दाबून ठेवल्या होत्या. रात्री दामू आपला 'कार्यभाग' साधेपर्यंत ती मनातल्या मनातच त्याच्याशी कितीतरी बोलून जायची. तोंड उघडलं तर आवाजाने पोरं उठतील अशी भीती तिला वाटायची.