प्रकाशवाट
एका मग्न तळ्याला होता आठवणींचा गहिरा डोह
भौवतालच्या पर्वत रंगांना आकाश शिवण्याचा होता मोह
ह्या पर्वत रांगांच्या दरीत होते साठवणींचे कवडसे
कुठे होते तापवणारे ऊन तर, कुठे झोंबणारे गार वारे
कुठे तरी लपून बसल्या होत्या काळ्याकुट्ट रहस्यांच्या गुहा
तर कुठे होता पठारावर फिरणारा उनाड मनमोकळा स्वछंदी वारा
त्या तळ्याच्या काठून एक पायवाट भविष्यात जाणारी
तर एक होती विसाव्याची जागा क्षणभर विश्रांती देणारी
विसावा घ्यावा म्हणून जरासा त्या ठिकाणी थांबलो
न राहवून गहिऱ्या डोहाच्या पाण्यात जरा डोकावलो