मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे.
१. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल :
पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.