बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.