द स्केअरक्रो - भाग ‍५

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
27 Jun 2015 - 9:31 am

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

द स्केअरक्रो - भाग ‍५ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली )

कार्व्हर त्याच्या आॅफिसमध्ये बसला होता. आॅफिसचा दरवाजा बंद होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता आणि अगदी एकटक समोरच्या कॅमे-यांच्या फीडकडे बघत होता. प्रत्येक कॅमेरा एका माॅनिटरला संलग्न होता आणि प्रत्येक माॅनिटर ३६ वेगवेगळ्या कोनांतून दृश्य दाखवू शकत होता. कार्व्हर एकाच वेळी सगळ्या कॅमे-यांचं फीड पाहू शकत असे. अगदी कुणाच्या डोक्यातही येणार नाहीत असे अँगल्स.

त्याचं बोट समोरच्या काँप्युटरच्या पॅडवर होतं. ते सरकवत त्याने एक कॅमेरा फीड त्याच्या अगदी समोर असलेल्या स्क्रीनवर आणला. जिनिव्हा काऊंटरच्या मागे बसली होती आणि एक कादंबरी वाचत होती. त्याने कॅमेरा तिच्या अजून जवळ नेला, पुस्तकाचं नाव बघण्यासाठी. ते त्याला नीट कळलं नाही पण त्याने लेखिकेचं नाव पाहिलं: जॅनेट इव्हानोविच. जिनिव्हाने या लेखिकेच्या अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत हे कार्व्हरला माहीत होतं. अनेकदा तिला या कादंबऱ्या वाचताना स्वतःशीच हसतानाही त्याने पाहिलं होतं.

ही माहिती उपयुक्त होती. आता तो एखाद्या पुस्तकांच्या दुकानात जाईल आणि या लेखिकेचं एखादं पुस्तक विकत घेईल. नंतर जेव्हा तो रिसेप्शनजवळ असेल तेव्हा ती त्याच्या बॅगमध्ये हे पुस्तक पाहील. मग त्यांच्यात संभाषण सुरु होईल आणि मग कदाचित पुढे....

त्याने दुसरा एक कॅमेरा जिनिव्हावर केंद्रीत केला. तिची पर्स तिने जमिनीवर, खुर्चीच्या शेजारी ठेवली होती आणि पर्सची झिप उघडी होती. कार्व्हरने कॅमेरा तिच्या पर्सवर नेला. त्याला सिगरेटस्, च्युईंग गम, चाव्या, काडेपेटी आणि त्याचबरोबर एक सॅनिटरी नॅपकिन्सचा बाॅक्स दिसला.
अच्छा! म्हणूनच आज सकाळी ती सगळ्यांशी तुटकपणे वागत होती. तो आत आल्यावर तिने त्याला जेमतेम हॅलो म्हटलं होतं.

कार्व्हरने त्याच्या घड्याळाकडे बघितलं. जिनिव्हाच्या दुपारच्या ब्रेकची वेळ होत आली होती. आता योलांडा शॅवेझ दरवाज्यातून आत आली असती आणि तिने जिनिव्हाला पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला असता. कॅमेरे वापरून तिच्या मागे जायचं कार्व्हरने ठरवलं होतं. ती बाहेर सिगरेट ओढायला गेली असती किंवा वाॅशरुममध्ये किंवा अजून कुठे, काही फरक पडत नव्हता. त्याला तिच्या मागे जाता आलं असतंच. त्याने सगळीकडे कॅमेरे बसवलेले होते. ती जे काही करेल ते त्याला दिसणार होतं.

योलांडा ज्या क्षणी दरवाज्यातून आत आली त्याच क्षणी कार्व्हरच्या आॅफिसचं दार कोणीतरी ठोठावलं. त्याने ताबडतोब काँप्युटर की बोर्डवरची एस्केप की दाबली. ताबडतोब समोरचे तीनही स्क्रीन्स तीन वेगवेगळ्या टाॅवर्सबद्दल माहिती दाखवायला लागले. कोणीही जेव्हा इथपर्यंत यायचं तेव्हा एक बझर वाजायचा. तो त्याला आत्ता ऐकू आला नव्हता. पण कार्व्हरला त्याबद्दल खात्री नव्हती. बझर वाजला असणार. पण तो जिनिव्हामध्ये एवढा गुंग झाला होता की त्याला तो ऐकू गेला नसेल.

" येस, कम इन! "

दरवाजा उघडला. समोर फ्रेडी स्टोन उभा होता. एकटाच. कार्व्हर स्वतःवरच वैतागला. त्याने उगाचच कॅमेरा फीड बंद केलं होतं आणि आता जिनिव्हाला शोधणं थोडं कठीण होतं.

" काय झालं फ्रेडी? " त्याने विचारलं.
" मी तुम्हाला सुट्टीबद्दल विचारायला आलोय. " स्टोन मोठ्याने म्हणाला. त्याने आत येऊन दरवाजा बंद केला, जवळच असलेली एक खुर्ची ओढली आणि कार्व्हरची परवानगी न घेता तो त्यावर बसला.

" #### गेली सुट्टी! " तो म्हणाला, " जर तिथे बसणारं कुणी आपल्या बोलण्याकडे लक्ष ठेवून असलं तर? म्हणून मी ते मोठ्याने बोललो. मला आयर्न मेडन्सबद्दल बोलायचंय. वीकेण्डला मला आपली पुढची पोरगी मिळाली आहे. "

फ्रेडी स्टोन कार्व्हरपेक्षा वीस वर्षांनी लहान होता. कार्व्हरने त्याला वेगळ्याच नावाखाली एका आयर्न मेडन्स चॅटरुममध्ये हेरला होता. त्याने स्टोनचा पाठलाग करायचा प्रयत्न केला होता पण स्टोन त्याच्या हातावर तुरी देऊन डिजिटल धुक्यात गडप झाला होता. कार्व्हरची उत्सुकता यामुळे वाढली आणि त्याने www.motherinirons.com नावाची एक कॅच साईट तयार केली. काही काळाने स्टोन त्याच्यावर आला. यावेळी कार्व्हरने त्याच्याशी संपर्क साधला आणि दोघेही भेटले. स्टोन एवढा तरुण आहे हे समजल्यावर कार्व्हरला धक्काच बसला होता पण तरीही त्याने स्टोनला आपल्या हाताखाली नोकरी दिली, त्याची संपूर्ण ओळख बदलली,अगदी त्याच्या चेहऱ्यासकट आणि त्याला ' शिकवायला ' सुरुवात केली.

आता चार वर्षांनी स्टोन कार्व्हरच्या जवळ आला होता पण कार्व्हरला ते सहन होत नव्हतं. कधीकधी तर त्याला स्टोनचा भयंकर राग येत असे. स्टोनला समोरच्याला गृहीत धरायची अत्यंत वाईट सवय लागली होती. आत्ताही पाहिजे तेव्हा कार्व्हरला भेटायला येणं आणि त्याची परवानगी न घेता बसणं हा त्या वाईट सवयीचाच एक भाग होता.

" अच्छा! " कार्व्हरने आवाजात जाणीवपूर्वक अविश्वास आणला होता.
" तू वचन दिलं होतंस की यापुढची पोरगी मी निवडणार, आठवतंय का तुला? " स्टोनने प्रत्युत्तर दिलं.

ही गोष्ट खरी होती. कार्व्हर तसं बोलला होता. पण त्या क्षणी तो बेसावध होता. त्या वेळी ते दोघेही सांता मोनिकाच्या समुद्रकिनाऱ्याजवळून जाणाऱ्या फ्री वे 10 वरून निघाले होते. गाडीच्या खिडक्या उघड्या होत्या आणि समुद्रावरून येणारा थंडगार वारा त्यांच्या चेह-यांजवळ रुंजी घालत होता. त्या वेळी कार्व्हर एका उन्मादपूर्ण मन:स्थितीत होता आणि त्याने मूर्खासारखं स्टोनला हे वचन दिलं होतं.

पण आता हे बदलायला पाहिजे. त्याला जिनिव्हाची आठवण आली. या मूर्खाशी वाद घालण्याऐवजी त्याने तिच्या पाठोपाठ जायला हवं होतं. कदाचित तिला कपडे बदलतानाही त्याला पाहाता आलं असतं.

" या गाण्याचा कधी कंटाळा येत नाही तुला? " स्टोनने विचारलं.
" काय? " कार्व्हरच्या लक्षात आलं की जिनिव्हाचा विचार मनात आल्याबरोबर त्याने नकळत गुणगुणायला सुरुवात केली होती. तो जरा ओशाळला.
" कोण सापडलीय तुला? " त्याने केवळ विषय बदलण्यासाठी म्हणून विचारलं.

स्टोन तोंडभर हसला आणि त्याने मान डोलावली, जणू आपल्या सुदैवावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता.

" या पोरीची स्वतःची पोर्न साईट आहे. मी तुला लिंक पाठवतो. तू बघ वेस. तुला आवडेल. मी तिचे टॅक्स रिटर्न्स पण पाहिले. गेल्या वर्षी तिने दोन लाख ऐंशी हजार कमावले. काय करुन माहित आहे? तिचे पोर्न व्हिडिओ बघायला पंचवीस डाॅलर्स फी आहे. त्यातून. "
" कुठे सापडली ती तुला? "
"ड्यूवी अँड बाख, अकाउंटंटस्. तिचं आॅडिट कॅलिफोर्निया टॅक्स फ्रँचाईज बोर्डने केलंय आणि त्यांनीच ते हाताळलं आहे. तिच्या विम्याची कागदपत्रं पण आहेत इथे. मग मी तिची वेबसाईट बघितली. Mandyforyou.com. लांबसडक पाय आणि भरगच्च. अगदी आपल्याला हवी तशी. "

कार्व्हरच्या तोंडून त्याच्या नकळत शीळ निघाली. पण तो आता परत ही चूक करणार नव्हता.

" कॅलिफोर्नियात कुठे ? " त्याने विचारलं.

" मॅनहॅटन बीच. "

स्टोनचं डोकं समोरच्या टेबलाच्या काचेवर आपटण्याची कार्व्हरला तीव्र इच्छा झाली. त्याने महत्प्रयासाने स्वतःवर ताबा ठेवला.

" तुला माहित आहे का मॅनहॅटन बीच नक्की कुठे आहे ते ?"

" तोच ना लो जोला आणि सॅन डिएगोच्या जवळ असलेला? "

कार्व्हरने नकारार्थी मान डोलावली.

" ला जोला, लो जोला नाही. आणि मॅनहॅटन बीच त्याच्या जवळपास कुठेही नाहीये. तो लॉस एंजेलिसच्या जवळ आहे आणि सांता मोनिकापासूनही बऱ्यापैकी जवळ आहे. विसर या पोरीला. आपण तिथे जाणार नाही आहोत. एकाच जागेवर पुनःपुन्हा काम करत नाही आपण. नियम विसरलास तू ? "

" पण डब ! ती परफेक्ट आहे यार! मी तिच्या फाईल्स पण काढल्या आहेत. एल.ए. केवढं मोठं शहर आहे. सांता मोनिकामधल्या कुणालाही काय फरक पडतो मॅनहॅटन बीचवर काही झालं तर ?"

कार्व्हरने आपला हात टेबलावर जोरात आपटला, " इनफ! त्या फाईल्स परत आहेत तिथे ठेवून दे. किमान तीन वर्षे आपण एल. ए. ला जाणार नाही आहोत. तुला कोणी सापडली आणि हे तुझ्यासाठी किती सुरक्षित आहे त्याने मला काहीही फरक पडत नाही. नियम म्हणजे नियम. आणि अजून एक. माझं नाव वेस्ली आहे. वेस नाही आणि डब तर नाहीच नाही. "

स्टोनचा चेहरा कुणीतरी चारचौघात कानाखाली मारल्यासारखा एवढासा झाला. त्याची नजर खाली गेली.

" मी काय म्हणतो, " त्याची दया येऊन कार्व्हर म्हणाला, " मी स्वतः शोधतो कुणीतरी तुझ्यासाठी. आपल्यासाठी. तुला नक्की मजा येईल. मी तसा शब्द देतो तुला. "

" पण यावेळी माझी पाळी होती. "

" तुला संधी मिळाली होती पण तू ती वाया घालवलीस, " कार्व्हर म्हणाला, " आता परत माझी पाळी. आता तू जा आणि थोडं काम कर. पाच टॉवर्सचा स्टेटस रिपोर्ट हवा आहे मला. तो दिल्याशिवाय इथून घरी जाता येणार नाहीये तुला. "

" ठीक आहे. " स्टोन प्रचंड वैतागला होता.

" चीअर अप फ्रेडी ! या आठवड्याच्या शेवटी आपण परत शिकारीवर निघू ! "

स्टोन उभा राहिला आणि दरवाज्याच्या दिशेने वळला. कार्व्हर त्याच्याकडे पाहताना विचार करत होता. याचे किती दिवस अजून राहिलेले आहेत? कधीतरी आपल्याला याला इथून घालवावाच लागेल. तोही कायमचा. एखादा भागीदार असणं कधीही चांगलं पण साले सगळे जवळ यायचा प्रयत्न करतात. तुम्हाला गृहीत धरतात. सलगी दाखवतात. लायकी नसताना तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारतात. आणि शेवटी तुमच्या बरोबरीला येण्याची हिंमत करतात. शक्य नाही. अत्यंत धोकादायक असतं असं कोणालाही जवळ येऊ देणं. बॉस एकच असला पाहिजे. तो स्वतः.

" दरवाजा बंद कर " कार्व्हर म्हणाला.

स्टोनने आज्ञाधारकपणे दरवाजा बंद केला. कार्व्हर परत कॅमे-यांकडे वळला. त्याने रिसेप्शन एरियावरचा कॅमेरा पाहिला. अजूनही योलांडाच तिथे बसली होती. जिनिव्हा दिसत नव्हती. कार्व्हरने कॅमेरे बदलत तिला शोधायला सुरुवात केली.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

एस's picture

27 Jun 2015 - 11:12 am | एस

रंजक. थोडीफार लिंक लागू लागलीये आता.

हा अनुवाद असेल हे कुठेही जाणवत नाही.

आतिवास's picture

27 Jun 2015 - 11:23 am | आतिवास

वाचते आहे.

आनंद's picture

27 Jun 2015 - 11:31 am | आनंद

मस्त! कथा पकड घेतिय,
मुळ पुस्तकाची लिंक सापड्लीय. आणि त्या वरुन लक्षात येत आहे कि अनुवाद मस्त जमलाय.

असंका's picture

27 Jun 2015 - 5:55 pm | असंका

_/\_

मला नाही सापडली...मी शेवटी दुकानातून विकत आणलं! १५% सूट...पिवळ्या पड्लेल्या पुस्तकाला...
थॅंक्स टू बोका ए आझम...

एक एकटा एकटाच's picture

27 Jun 2015 - 12:15 pm | एक एकटा एकटाच

फ़क्त एक विनंती.
ह्या पुढचे भाग थोडेसे लवकर लवकर टाका प्लीज.

एक्साईटमेंट कायम रहाते.

पुढिल लिखाणास शुभेच्छा

अजया's picture

27 Jun 2015 - 8:57 pm | अजया

+१०००
मजा येतेय वाचायला.काहीतरी जबरदस्त कथानक वाटतंय.पुभालटा.

छान अनुवाद.कथानक उत्कंठावर्धक.पु.भा.प्र.

पैसा's picture

27 Jun 2015 - 10:57 pm | पैसा

थोडाफार अंदाज यायला लागलाय. पण थोडाच! मस्त!

शाम भागवत's picture

27 Dec 2015 - 12:07 pm | शाम भागवत