द स्केअरक्रो भाग ११ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )
एली तुरुंगाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जाताना तर माझी मनःस्थिती पूर्णपणे नैराश्यमय होती. मी यांत्रिकपणे तिथले सगळे सोपस्कार पार पाडले आणि वकील आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी एक वेगळा प्रवेश होता, तिथून आत गेलो. स्किफिनोने मला दिलेलं पत्र तिथल्या कॅप्टनला दाखवलं. त्याला बहुधा त्यात काही वावगं वाटलं नाही आणि त्याने मला एका खोलीत बसायला सांगितलं. जवळजवळ अर्ध्या तासाने दरवाजा उघडून तो कॅप्टनच आत आला. ब्रायन ओग्लेव्हीचा पत्ता नव्हता.
“मि. मॅकअॅव्हॉय,” माझं नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारत त्याने मला जवळ बोलावलं, “मला नाही वाटत आज तुमची आणि मि.ओग्लेव्ही यांची भेट होऊ शकेल.”
मला एक क्षणभर वाटलं की स्किफिनोने दिलेलं पत्र त्याला किंवा आतमध्ये जे कोण अजून लोक आहेत त्यांना खोटं वाटलं की काय. बहुतेक मी रिपोर्टर आहे, खाजगी गुप्तहेर नाही, हे त्यांना समजलं असावं.
“काय झालंय? मि.स्किफिनोंनी तुम्हाला हे पत्र फॅक्स केलं असेलच. तेच पत्र माझ्याकडे आहे. तुमची प्रत्येक अट आम्ही पाळलेली आहे.”
“त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणतच नाही आहोत मि. मॅकअॅव्हॉय. पण या माणसाला तुम्हाला आज भेटता येणार नाही. तुम्ही त्याला उद्या सकाळी भेटू शकता. “
आज सकाळपासून जे दुर्दैव माझ्या मागे हात धुवून लागलं होतं त्याचा हा सर्वोच्च बिंदू होता.
“ हे पहा, मी लास वेगासपासून चार तास गाडी चालवत फक्त या माणसाला भेटायला आलोय, आणि आता तुम्ही मला सांगताय की पुन्हा चार तास गाडी चालवत वेगासला परत जा आणि उद्या सकाळी परत इथे चार तास गाडी चालवत या. हे काय चाललंय?”
“एक मिनिट, मि. मॅकअॅव्हॉय! मी कुठे तुम्हाला म्हणालो की वेगासला परत जा? एली छोटं शहर असेल पण इथे एक चांगलं हॉटेल आहे – हॉटेल नेवाडा. ठीकठाक जागा आहे. त्यांच्याकडे कॅसिनो आहे, चांगला बार आहे आणि जेवण पण ठीक आहे तिथलं. तुम्ही आज रात्री तिथे राहा, उद्या सकाळी इथे या आणि ब्रायन ओग्लेव्हीला भेटा. मी स्वतः त्याला घेऊन येईन. मग तर झालं?”
माझा संताप वांझोटा होता हे माझ्या लक्षात आलं. काहीही पर्याय नव्हता माझ्याकडे.
“सकाळी नऊ वाजता,” मी म्हणालो, “आणि तुम्ही असाल इथे?”
“अर्थात. मी शब्द देतोय तुम्हाला. मी स्वतः ब्रायन ओग्लेव्हीला घेऊन येईन इथे.”
“ठीक आहे. पण आज मी त्याला का भेटू शकत नाही हे मला कळेल का?”
“नाही. अंतर्गत सुरक्षेचा मामला आहे.”
माझा वैताग आता स्फोट होण्याच्या अगदी जवळ पोचला होता.
“ठीक आहे कॅप्टन. उद्या सकाळी नऊ वाजता भेटू.”
“जरूर मि. मॅकअॅव्हॉय!”
मी माझ्या गाडीच्या जीपीएसमध्ये हॉटेल नेवाडाचा पत्ता घातला आणि तिथे अर्ध्या तासात पोचलो. पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क केली आणि आत जाण्याआधी खिसे चाचपले. माझ्याकडे दोनशे अठ्ठेचाळीस डॉलर्स होते. त्यातले पंच्याहत्तर मला पेट्रोलसाठी लागले असते – वेगास एअरपोर्टवर जाण्यासाठी. घरी जाईपर्यंत मी जेवणावर पैसे काटकसरीने वापरले असते पण एल.ए.मध्ये मला एअरपोर्टपासून माझ्या घरी जायला अजून चाळीस डॉलर्स लागले असते. म्हणजे ह्या हॉटेलच्या खोलीसाठी माझ्याकडे शंभर डॉलर्सचं बजेट होतं. हॉटेलच्या जीर्ण इमारतीकडे पाहिल्यावर हा प्रश्न पडणार नाही हे माझ्या लक्षात आलं. मी माझी बॅग घेतली, गाडी बंद केली आणि आत गेलो.
मला मिळालेली खोली पंचेचाळीस डॉलर्सवाली सिंगल रूम होती आणि चौथ्या मजल्यावर होती. छोटी असली तरी खोली नीटनेटकी आणि स्वच्छ होती. पलंगसुद्धा व्यवस्थित होता. मी पोचलो तेव्हा दुपारचे चार वाजले होते. अजून बारमध्ये जाऊन बसायला वेळ होता. मी माझा फोन बाहेर काढला आणि पहिल्यांदा अँजेलाला फोन केला. तिच्या डेस्क फोनवर आणि मग तिच्या मोबाईलवर. दोघांवरही काहीही उत्तर मिळालं नाही. मी दोघांवरही निरोप ठेवले. मग थोडा विचार केला आणि माझा अहंकार गिळून प्रेन्डोला फोन केला. त्याने फोन उचलल्यावर सर्वप्रथम मी त्याची आधी त्याच्याशी उद्धटपणे बोलल्याबद्दल माफी मागितली आणि शांतपणे त्याला काय घडलंय ते सांगितलं. तो तुटकपणे बोलत होता आणि त्याला चार वाजताच्या मीटिंगसाठी जायचं होतं. मी त्यावर त्याला म्हणालो की मला जर इंटरनेट वापरायला मिळालं तर मी त्याला या बदललेल्या स्टोरीची बजेट लाईन मेल करीन.
“काही घाई नाहीये जॅक,” तो म्हणाला.
“प्रेन्डो, आपल्याला शुक्रवारी ही स्टोरी ब्रेक करायलाच पाहिजे, नाहीतर प्रत्येकाला हे कळेल.”
“मी सकाळच्या मीटिंगमध्ये याच्याबद्दल बोललो. सगळ्यांचं असं मत आहे की आपण या स्टोरीबद्दल सावधगिरीने पावलं उचलली पाहिजेत. आमच्याकडे दुसरे पर्याय नाहीयेत. तू नेवाडाच्या वाळवंटात कुठल्यातरी मृगजळामागे धावतो आहेस, अँजेलाकडून अजूनही काहीही कळलेलं नाही आणि स्पष्ट सांगायचं तर मला – आम्हाला काळजी वाटायला लागलेली आहे. त्यामुळे तू बजेट लाईन पाठवायची घाई करू नकोस. लवकरात लवकर इथे ये आणि मग आपण बसून बोलू आणि या स्टोरीचं काय करायचं ते ठरवू.”
मला खरंतर राग आला होता पण त्याचं बोलणं ऐकल्यावर मलाही काळजी वाटायला लागली.
“तुला अँजेलाने आख्ख्या दिवसात एकदाही निरोप पाठवलेला नाही?”
“नाही ना. मी एका जनरल रिपोर्टरला तिच्या घरीही पाठवलं होतं ती तिथे आहे का ते बघायला. पण तिच्या घराला कुलूप आहे. ती कुठे आहे तेच आम्हाला कोणालाही माहित नाहीये.”
“हे असं याआधीही केलंय का तिने?”
“दोन-तीन वेळा तिने अगदी दिवसाच्या शेवटी आजारी असल्याचा निरोप पाठवला होता. पण तिच्याकडून फोन किंवा निरोप आलेले होते. ‘पण या वेळी काहीच नाही. ना फोन, न निरोप.”
“ठीक आहे. जर तिच्याबद्दल काही समजलं किंवा तिने फोन केला तर मलासुद्धा कळव.”
“जरूर.”
“ओके प्रेन्डो. मी परत आल्यावर आपण या स्टोरीबद्दल बोलू.”
“गॉट डाईम्स?”
“हो. भेटू आपण.” मी फोन बंद केला.
अँजेलाचं गायब होणं अनाकलनीय होतं. माझी क्रेडिट कार्ड्स रद्द होणं, माझ्या बँक अकाउंटवर कुणीतरी डल्ला मारणं, प्रेन्डोला मी पाठवलेला मेल न मिळणं, आणि आता हे अँजेलाचं गायब होणं. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत की काय असं एक क्षणभर मला वाटून गेलं पण या दोन वेगळ्या गोष्टी असाव्यात.
मी एकदा माझ्या खोलीचं निरीक्षण केलं. पलंगाच्या बाजूला असलेल्या एका टेबलावर एक माहितीपत्रक होतं. त्यात असं म्हटलं होतं की हे हॉटेल पंच्याहत्तर वर्षांहून जास्त काळ कार्यरत आहे आणि एकेकाळी ही इमारत संपूर्ण नेवाडा राज्यातली सर्वात उंच इमारत होती. त्यावेळी एली हे तांब्याच्या खाणींमुळे एकदम नावारूपाला आलेलं शहर होतं आणि लास वेगासचं नावही कुणी ऐकलेलं नव्हतं. आता अर्थातच परिस्थिती पूर्णपणे उलटी होती.
इथे वाय-फाय फुकट होतं. मी माझा इमेल अकाउंट उघडायचा प्रयत्न केला पण माझा पासवर्ड स्वीकारला गेला नाही आणि असं तीन वेळा झाल्यावर टाईम्सच्या सिस्टिमने माझा अकाउंट लॉक केला. ज्याने माझी क्रेडिट कार्ड्स रद्द केली आणि बँक अकाउंट रिकामा केला त्यानेच माझा पासवर्ड पण बदलला असणार.
आता बाहेर तर कुणाशी संपर्क साधता येत नव्हता. त्यामुळे मी जे काम इंटरनेटशिवाय करता येईल ते करायचं ठरवलं. लॅपटॉपवर एक फाईल उघडली आणि गेल्या काही तासांत मला समजलेल्या गोष्टी लिहायला सुरुवात केली. जवळजवळ एक तासभर मी लिहित होतो. जेव्हा माझं लिहून संपलं तेव्हा माझ्याकडे ३० इंचांची एक अफलातून स्टोरी तयार झाली होती. माझी गेल्या पाच वर्षांमधली सर्वश्रेष्ठ स्टोरी.
मी परत एकदा ती वाचून काढली आणि तिच्यात काही सुधारणा केल्या. हे सगळं झाल्यावर मला जाणवलं की आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे. मी परत एकदा माझे पैसे मोजले आणि खाली उतरलो. खोलीमधून निघताना दरवाजा आठवणीने बंद केला.
खाली हॉटेलचा कॅसिनो आणि बार एकत्रच होते. मी एक बीअर आणि सँडविच मागवलं आणि एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसलो. कॅसिनोमधली स्लॉट मशीन्स माझ्या समोरच होती. आजूबाजूचे लोक आणि त्यांचे स्लॉट मशीन्सवर पैसे लावताना होणारे चेहरे बघून मला कसंसंच झालं. इथे अजून बारा तास काढणे म्हणजे शिक्षाच होती. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी अडकलो होतो आणि ही कोंडी उद्या सकाळशिवाय फुटण्याची काही चिन्हं दिसत नव्हती.
मी परत एकदा पैसे मोजले आणि ठरवलं की आपल्याकडे अजून एका बीअरसाठी पैसे आहेत. शिवाय २५ सेंट्सचीही बरीच नाणी होती. स्लॉट मशीन्सवर खेळण्यासाठी. हॉटेलच्या लॉबीजवळ असलेल्या स्लॉट मशीनवर मी बसलो आणि त्याच्याशी पोकर खेळायला सुरुवात केली. माझा पहिला गेम जिंकण्याआधी मी ओळीने सात गेम हरलो. नंतर पुढच्या गेमला माझ्याकडे फ्लश आला. अजून एक बीअर घ्यायला हरकत नाही असं मी ठरवलं.
माझ्या बाजूला एक मशीन सोडून एक माणूस येऊन बसला. तोही सुरुवातीला हरतच होता. त्याने तोंड उघडून बडबड चालू केली नसती तर माझं त्याच्याकडे लक्षही गेलं नसतं. पण त्याला गप्प बसता येत नसावं.
“पोरींसाठी आलायस का इथे दोस्त?” त्याने सुरुवात केली.
मी तेव्हा त्याच्याकडे नीट पाहिलं. तिशीच्या आत-बाहेर असेल. त्याच्याबाबतीत सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्याचे एल्विस प्रीस्लेसारखे अगदी हनुवटीपर्यंत आलेले मटनचॉप कल्ले. केस मळकट सोनेरी. त्यावर त्याने काऊबॉय हॅट घातली होती, चामडी हातमोजे होते – बायकर्स घालतात तसे - आणि गॉगल. आम्ही आतमध्ये होतो आणि उन्हाची तिरीप बऱ्यापैकी कमी झाली होती तरीही या माणसाने डोळ्यावरून गॉगल काढला नव्हता.
“काय?” मी म्हणालो.
“गावाबाहेर दोन-तीन अड्डे आहेत. पोरींसाठी एकदम फेमस. कोणत्या ठिकाणी पैसा वसूल पोरी आहेत ते मला माहित नाही ना पण. मी सॉल्ट लेक सिटीहून इथे फक्त त्याच्यासाठी आलोय.”
“मलाही नाही माहित.”
मी परत माझ्या मशीनकडे वळलो. माझं मन परत समोरच्या खेळावर एकाग्र करायचा प्रयत्न केला. माझ्याकडे इस्पिकचा एक्का, तिर्री, चौव्वी आणि नव्वी होते आणि शिवाय बदामचा एक्का होता. काय करू? फ्लश की मग निमूटपणे तिसरा एक्का मिळेल अशी अपेक्षा करू?
“हातात असलेल्या पत्त्यांवर लक्ष दे दोस्त!” एल्विस म्हणाला.
मी त्याच्याकडे परत एकदा पाहिलं. आता हेच राहिलं होतं. कोणीतरी मला पोकर शिकवणं. मी इस्पिक हातात ठेवून बदामचा एक्का सोडून दिला आणि बटन दाबलं. मला इस्पिक गुलाम मिळाला आणि एकाला सात या दराने पैसे. आत्ता माझं नशीब जोरावर होतं तर हातात नेमके पैसे नव्हते. फक्त पंचवीस सेंट्सची नाणी होती.
मी माझे पैसे मशीनकडून घेतले. चौदा डॉलर्स पंचवीस सेंट्सच्या नाण्यांच्या स्वरूपात खणखणीत आवाज करत कॅश ट्रेमध्ये पडले. मी ते उचलले आणि कॅशियरकडे जाऊन डॉलर्स घेतले. आता नशिबाची अजून परीक्षा पाहण्याची माझी इच्छा आणि हिम्मत – दोन्हीही नव्हते. या जिंकलेल्या पैशातून मी अजून दोन बीअर्स घेणार होतो आणि माझ्या खोलीत परत जाणार होतो. माझ्या स्टोरीमध्ये अजून काही गोष्टींची भर घालायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रायन ओग्लेव्हीला विचारायचे प्रश्नसुद्धा तयार करायचे होते. जेव्हा एखादा माणूस पत्रकार बनायचं ठरवतो तेव्हा अनेक आदर्शवादी ध्येयं डोळ्यासमोर असतात. त्यात लोकांवरचा अन्याय दूर करणे हे एक कारण असतंच असतं. माझ्या बाबतीत उद्या ते प्रत्यक्षात येणार होतं. माझ्या शेवटच्या स्टोरीसाठी का होईना पण मी एका निरपराध माणसाला तुरुंगातून बाहेर येण्यासाठी मदत करणार होतो.
मी लॉबीमध्ये लिफ्टसाठी थांबलो होतो आणि बीअरच्या बाटल्या एका बाजूला, कुणाच्या लक्षात येणार नाहीत अशा प्रकारे धरल्या होत्या. लिफ्ट आल्यावर मी आतमध्ये शिरलो, चौथ्या मजल्याचं बटन दाबलं आणि मागे कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. दरवाजे हळूहळू जवळ येत बंद होत असताना अचानक एक चामडी हातमोजे घातलेला हात मध्ये आला आणि पाठोपाठ माझा पोकर गुरु एल्विस आतमध्ये शिरला. त्याने बटन दाबायला हात उंचावला पण मग तो थांबला.
“अरे! आपण एकाच मजल्यावर आहोत.”
“वा!” मी आवाजात शक्य तेवढा उपरोध आणायचा प्रयत्न केला होता.
तो आतमध्ये येऊन दुसऱ्या कोपऱ्यात उभा राहिला. त्याला गप्प बसवणार नाही हे मला माहित होतंच. त्यानेही मला निराश केलं नाही.
“अरे दोस्त, तिथे खाली तुझ्या नशिबाला नजर लावायची नव्हती हां मला. मला अशी बडबड करायची सवय आहे. माझी बायको – एकेकाळची – तीही असंच म्हणायची. बहुतेक म्हणूनच आमचं पटलं नाही.”
“हरकत नाही. मी तसाही निघतच होतो. मला थोडं काम संपवायचं होतं.”
“अच्छा! तू इथे कामासाठी आलायस? या ठिकाणी असं काय काम असू शकतं कुणाचं?”
अरे बापरे! हा माणूस थांबायला तयारच नव्हता. लिफ्टसुद्धा इतकी हळू चालली होती की आपण जिन्याने यापेक्षा लवकर पोचलो असतो असं मला वाटल्याशिवाय राहिलं नाही.
“उद्या मला तुरुंगात एकाला भेटायला जायचं आहे.”
“अच्छा. तू वकील आहेस?”
“नाही. पत्रकार.”
“अच्छा, रिपोर्टर! ऑल द बेस्ट! निदान तुला तुझं काम झाल्यावर घरी जायला मिळेल. तिथल्या लोकांसारखं नाही. त्यांना तिथेच खितपत पडावं लागतं.”
“हो.”
शेवटी तो चौथा मजला आला. मी दरवाज्याकडे सरकलो. मला आता या आगाऊ माणसाशी अजून बोलायची इच्छा
नव्हती. लिफ्ट थांबली पण दरवाजे उघडायला वेळ लागला.
“गुड नाईट!” मी अगदीच असभ्य वाटायला नको म्हणून म्हणालो आणि ताबडतोब बाहेर आलो. माझी खोली डाव्या बाजूची तिसरी खोली होती.
“ यू टू, पार्टनर!” मागून त्याचा आवाज आला.
माझ्या खोलीची चावी पँटच्या खिशातून बाहेर काढण्यासाठी मला बीअरच्या बाटल्या दुसऱ्या हातात धरायला लागल्या. मी चावी बाहेर काढत असतानाच एल्विसला माझ्याच दिशेने येताना पाहिलं. मी उजवीकडे पाहिलं. फक्त तीन खोल्या होत्या आणि त्यांच्यापुढे जिना होता. या माणसाला माझी खोली कोणती ते समजलं की झालं. तो रात्री पोरींबद्दल गप्पा मारायला माझ्या खोलीत आलाच असता. आता खोलीत गेल्यावर मी सर्वप्रथम रिसेप्शनला सांगून माझी खोली बदलून घेणार होतो. एल्विसला माझं नाव माहित नव्हतं त्यामुळे मी कोणत्या खोलीत गेलोय हे त्याला समजण्याचा प्रश्नच नव्हता.
मी शेवटी चावीने माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि वळून एल्विसकडे पाहिलं. जसजसा तो माझ्या जवळ येत होता, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य रुंदावत होतं.
“हाय जॅक!” माझ्या खोलीमधून आवाज आला.
मी वळलो. एक स्त्री माझ्या खोलीत खुर्चीवर बसली होती. मला आश्चर्याचा आणि आनंदाचा असे दोन्ही धक्के बसले. ती रॅशेल होती. एफ.बी.आय. स्पेशल एजंट रॅशेल वॉलिंग. एल्विस माझ्यामागून निघून गेल्याचं मला जाणवलं.
“रॅशेल?” मी भानावर आल्यावर विचारलं, “तू इथे काय करते आहेस?”
“तू आत येऊन दरवाजा बंद करशील का?”
मी इतका आश्चर्यचकित झालो होतो की एक क्षणाचाही विचार न करता मी दरवाजा बंद केला. मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करत असतानाच मला उजवीकडे अजून एका खोलीचा दरवाजा जोरात बंद केल्याचा आवाज आला. एल्विस बहुतेक त्याच्या खोलीत शिरला होता.
मी तिच्याकडे वळलो.
“ तू इथे आलीस कशी पण?”
“तू आधी इथे येऊन बस. मग मी तुला सांगते.”
बारा वर्षांपूर्वी मी आणि रॅशेल एकमेकांमध्ये गुंतलो होतो. जरी आमच्यातलं नातं अगदी कमी काळ टिकलं असलं तरी त्याच्यात मी जेवढी उत्कटता अनुभवली तेवढी न त्याच्या आधी अनुभवली, ना नंतर. काही लोकांच्या मते आम्ही एकमेकांमध्ये गुंतणं ही फार मोठी चूक होती. पण त्यावेळेला आम्ही दोघांनीही तसा विचार केला नाही. ती एल.ए.ला आल्याचं मला समजलं होतं. पाच वर्षांपूर्वी तिने एल.ए.पी.डी. ला एको पार्क भागात लपलेल्या एका सीरियल किलरला पकडून देण्यात मदत केली होती. तेव्हा तिचे फोटो सर्व पेपरांमध्ये आले होते. मीही ते पाहिले होते. पण आम्ही एकमेकांसमोर, एका खोलीत बारा वर्षांनंतर आलो होतो. याच्याआधी भेटलो होतो ते पोएट केसनंतर झालेल्या एफ.बी.आय.च्या सुनावणीसाठी. त्यानंतर प्रत्यक्ष भेट कधीच झालेली नव्हती. पण या बारा वर्षांमध्ये एकही दिवस तिच्या आठवणींशिवाय गेल्याचं मला आठवत नव्हतं. जर माझ्यासाठी तो काळ हा माझ्या आयुष्याचा आणि करिअरचा उत्कर्षबिंदू असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे रॅशेल होती.
हे सगळं आठवत असताना मी तिच्याकडे पाहात होतो. बारा वर्षे उलटल्याचा थोडाफार परिणाम तिच्यावर झाल्याचं दिसत होतं. तिच्यासाठी एफ.बी.आय.मधला काळ हा नक्कीच सुखाचा गेलेला नव्हता. माझ्याबरोबर, एका पत्रकाराबरोबर प्रेमप्रकरण केल्याची शिक्षा म्हणून तिची बदली साउथ डाकोटामध्ये करण्यात आली होती. बिहेवियरल सायन्ससारख्या प्रतिष्ठित युनिटमधून तिची पदावनती झाली होती आणि पाच वर्षे तिला डाकोटामध्ये एका छोट्या ऑफिसमध्ये काढावी लागली होती. पण ती त्यातून बाहेर पडली होती आणि गेली पाच वर्षे एल.ए. मध्येच कुठल्यातरी दहशतवादविरोधी पथकात काम करत होती. ती एल.ए.ला आल्याचं समजल्यावर मी तिला फोन करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नव्हता. पण तिचं काय चाललंय त्याकडे मी नेहमीच लक्ष ठेवून होतो आणि आता ती माझ्यासमोर, माझ्या हॉटेलच्या खोलीत उभी होती. सत्य हे कुठल्याही कादंबरीपेक्षा अद्भुत असतं असं जे म्हणतात त्यात नक्कीच तथ्य आहे.
आपण हसतोय हे मला त्याक्षणी जाणवलं. ती मात्र अत्यंत गंभीर चेहरा करून उभी होती. तिचे डोळे माझ्यावर खिळलेले होते.
“कोणाबरोबर होतास तू? तुझा फोटोग्राफर?” तिने विचारलं.
“नाही. मी एकटाच आहे. आणि तो कोण होता ते मला माहित नाही. तो मला खाली कॅसिनोमध्ये भेटला. माझ्याबरोबर लिफ्टमध्येही होता. आत्ताच तो त्याच्या खोलीत गेला.
तिने पुढे जाऊन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना पाहिलं. मग दरवाजा परत बंद केला आणि ती माझ्याकडे वळली.
“त्याचं नाव माहित आहे तुला?”
“नाही. मी त्याच्याशी फार काही बोललो नाही.”
“त्याची खोली कुठली आहे हे तरी माहित आहे का तुला?”
“नाही. तेही माहित नाही मला. काय चाललंय काय पण? आणि तू माझ्या खोलीत कशी आलीस?”
हे बोलत असतानाच माझं लक्ष पलंगाकडे गेलं. माझा लॅपटॉप तिथे चालू होता. मी तो बंद करून गेलो होतो हे मला आठवत होतं. मी काढलेल्या नोट्स, माझ्याबरोबर मी आणलेले प्रिंट आऊट्स वगैरे सगळ्यांचा पसारा तिथे पडलेला होता. आणि तो मी नक्कीच केलेला नव्हता.
“आणि तू माझ्या सामानाची उचकाउचकी का केलीस? मी तुला मदत मागितली होती याचा अर्थ असा नाही की तू माझ्या खोलीत येऊन माझ्या सामानाची अशी झडती घ्यावीस.”
“तू खाली बसशील का जरा?” ती शांतपणे म्हणाली.
माझ्या खोलीत एकच खुर्ची होती आणि त्याच्यावर ती बसली. त्यामुळे मला पलंगावर बसावं लागलं. मी जरा वैतागूनच माझा लॅपटॉप बंद केला आणि बाकी पसाराही आवरून ठेवला. ती शांतपणे बसली होती.
“मी इथल्या मॅनेजरला माझा एफ.बी.आय.चा बॅज दाखवला आणि त्याला या खोलीत मला जाऊ देण्याची विनंती केली. मी त्याला हेही सांगितलं की कदाचित तुझ्या जीवाला धोका आहे.”
आता मी चक्रावलो.
“माझ्या जीवाला धोका? काहीतरी काय? कुणालाही माहित नाहीये की मी इथे आहे.”
“मला खात्री नाहीये तशी. तू मला सांगितलं होतंस की तू एली तुरुंगात एकाला भेटायला चालला आहेस. अजून कोणाला हे बोलला होतास तू? कुणाला माहित आहे हे?”
“नाही. कुणीच नाही. माझा एडिटर आणि लास वेगासमधला वकील विल्यम स्किफिनो, ज्याच्या क्लायंटला, ब्रायन ओग्लेव्हीला भेटायला मी जाणार आहे. एवढेच लोक.”
“स्किफिनो? बरोबर. मी बोलले त्याच्याशी.”
“तू त्याच्याशी बोललीस? का? काय प्रकार आहे हा?”
तिने मान डोलावली पण होकारार्थी नाही. तिला मला काही अप्रिय गोष्ट सांगायची असल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर आले.
“ओके. सांगते. तू जेव्हा आज मला फोन केलास, तेव्हा तुझं बोलणं मला नीट कळलं नाही जॅक. तू चांगला लेखक आहेस पण तुला एखाद्याला सांगणं कठीण जातं. असो. तू मला जे बोललास त्यातले तुझ्या क्रेडिट कार्ड्स, बँक अकाउंट्स आणि इमेलबद्दलचे मुद्दे मला जरा खटकले. मी जरी तुला म्हणाले की मी तुला मदत करणार नाही तरी फोन खाली ठेवल्यावर मी त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली आणि मला काळजी वाटायला लागली.”
“का?”
“कारण तू या सगळ्या गोष्टींकडे एक अडचण आणि एक योगायोग म्हणून बघत होतास. तुला असं वाटलं की कोणीतरी तुझ्याबाबतीत हा खोडसाळपणा केलेला आहे आणि तू या स्टोरीवर काम करत असतानाच नेमक्या या गोष्टी झाल्या आहेत पण हा सगळा एक मोठा योगायोग आहे.”
“म्हणजे तुझं म्हणणं आहे की हा योगायोग नाहीये?माझ्याही डोक्यात हा विचार आला होता, पण हे कसं शक्य आहे? मी ज्या खुन्याच्या मागावर आहे, त्याला माहीतही नाहीये की मी इथे आलोय आणि त्याला शोधायचा प्रयत्न करतोय.”
“तिथेच तर तू चूक करतोयस जॅक! तू कधी एखाद्या जंगली जनावराची शिकार केली आहेस? लहानपणी?”
“नाही. मला असल्या गोष्टींमध्ये कधीच रस नव्हता.”
“शिकार करताना शिकारी त्याच्या सावजाला एकाकी पाडतो. त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो आणि मग सावज हतबल झालं की त्याच्यावर झडप घालतो. अगदी पुरातन काळापासून चालत आलेलं तंत्र आहे हे. आजच्या काळात कम्फर्ट झोन म्हणजे काय? तर सतत कनेक्टेड असणं. सतत इतरांच्या संपर्कात असणं. मोबाईल फोन, इंटरनेट, क्रेडिट कार्ड्स, पैसे.”
“पण या माणसाला माझ्याबद्दल समजलं कसं? मला स्वतःला काल संध्याकाळपर्यंत त्याच्याबद्दल किंवा तो अस्तित्वात आहे की नाही याबद्दल काहीही माहित नव्हतं. हे बघ रॅशेल, माझ्या एका फोनवर तू इथे आलीस आणि इतक्या वर्षांनी मला भेटते आहेस ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण तू हे जे काही बोलते आहेस ते माझ्या पचनी पडत नाहीये. तू इथे एवढ्या लवकर पोचलीसच कशी?”
“मी एफ.बी.आय.चं जेट घेऊन नेल्लीसला गेले आणि तिथून हेलिकॉप्टरने इथे पोचले.”
“अरे बापरे! मग तू मला फोन का नाही केलास परत?”
“कारण मला तसं करता येणं शक्य नव्हतं. तू जेव्हा मला फोन केलास तेव्हा तो माझ्यापर्यंत आला पण तुझ्या फोनचा नंबर मला मिळाला नाही. आणि मला असंही वाटलं की तू प्रीपेड फोनने मला फोन केलेला असणार. म्हणजे तो नंबर कोणीही तुझ्याशी जोडू शकणार नाही.”
“अच्छा. मग आता एफ.बी.आय.मधले दुढ्ढाचार्य काय करतील जेव्हा त्यांना कळेल की तू माझा फोन आल्यावर सगळं सोडून आणि एफ.बी.आय.चं विमान घेऊन इथे मला भेटायला आलीस? तू डाकोटामध्ये काही शिकली आहेस असं वाटत नाहीये मला.”
तिने फक्त खांदे उडवले. मला आमच्या पहिल्या भेटीची आठवण झाली. आम्ही असेच हॉटेलच्या खोलीत भेटलो होतो आणि तिने मला अटक केली होती. आमच्यात अजिबात प्रथमदर्शनी प्रेम वगैरे गोष्टी झाल्या नव्हत्या.
“एलीमध्ये असलेल्या एका कैद्याला मला भेटायचंय. गेल्या चार महिन्यांपासून मी त्याला भेटायचा प्रयत्न करते आहे,” ती म्हणाली, “इथे येण्याचं माझं अधिकृत कारण हेच आहे.”
“अच्छा. तो दहशतवादी आहे की काय?तुझं युनिट त्याच्याच संदर्भात काम करतं ना?”
“हे पहा जॅक, मी माझ्या कामाविषयी तुझ्याशी काहीही बोलू शकत नाही. पण तुला शोधून काढणं ही तुला वाटते तितकी कठीण गोष्ट नाहीये. आणि मी एकटीच तुझ्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून नव्हते.”
हे शब्द ऐकल्यावर एक थंड शिरशिरी माझ्या हृदयात उमटून गेली.
“ म्हणजे?”
“तू जेव्हा आज मला फोन केलास तेव्हा तू म्हणालास की तू एलीला चालला आहेस. माझ्या लक्षात आलं की तू कुठल्यातरी कैद्याला भेटायला चालला असणार. मग मी तिथे फोन केला आणि तुझ्याबद्दल चौकशी केली. त्यांनी मला सांगितलं की तू नुकताच तिथून निघाला आहेस. मी कॅप्टन हेन्री नावाच्या तुरुंग अधिकाऱ्याशी बोलले आणि त्याने मला सांगितलं की तुझी आणि ब्रायन ओग्लेव्हीची भेट ही उद्या सकाळी होणार आहे. तो मला हेही म्हणाला की त्यानेच तुला या हॉटेलबद्दल सांगितलं.”
“हो. बरोबर. त्यानेच सांगितलं.”
“मी जेव्हा त्याला विचारलं की तुझी आणि ब्रायन ओग्लेव्हीची भेट पुढे का ढकलण्यात आली, तेव्हा त्याने सांगितलं की ओग्लेव्हीविरुद्ध कुणीतरी धमकीचा मेल पाठवलेला आहे.”
“धमकी?”
“हो. तुरुंगाच्या वॉर्डनला असा धमकीचा मेल आला की आर्यन ब्रदरहूड ओग्लेव्हीला जीवानिशी मारणार आहे. म्हणून त्यांनी त्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला थोपवून धरलं आणि त्याला कडेकोट सुरक्षिततेत ठेवलं.”
“आर्यन ब्रदरहूड? ते ओग्लेव्हीला का मारायला तयार झाले?”
“तो ज्यू आहे म्हणून. आणि त्यांनी ही धमकी गंभीरपणे घेतली कारण वॉर्डनच्या सेक्रेटरीच्या अधिकृत इमेल आयडीवरून हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. तिने अर्थातच तो पाठवला नव्हता. बहुतेक तिचा इमेल अकाउंट हॅक झाला असावा. पण तिच्या अकाउंटवरून मेल आला म्हटल्यावर त्यांना असं वाटलं की ही धमकी खरी असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी तुझी भेट पुढे ढकलली, ओग्लेव्हीला बंदोबस्तात ठेवलं आणि तुला इथे – अनोळखी ठिकाणी - रात्रभर राहण्यासाठी पाठवलं.”
“अजून काही? या सगळ्यावरून कोणीतरी माझा पाठलाग करतंय हे कसं कळलं तुला?”
माझा तिच्या बोलण्यावर शंभर टक्के विश्वास बसला होता पण केवळ तिने मला अजून माहिती सांगावी म्हणून मी विश्वास नसल्याचं नाटक करत होतो.
“मी कॅप्टन हेन्रीला विचारलं की दुसऱ्या कोणी तुझ्याबद्दल फोन करून चौकशी केली होती का. त्याने सांगितलं की विल्यम स्किफिनो, ज्याच्यासाठी तू काम करतो आहेस, त्याने तू एलीला पोचलास की नाही ते जाणून घेण्यासाठी फोन केला होता आणि त्यांनी त्यालाही हेच सांगितलं की तुझी आणि ब्रायन ओग्लेव्हीची भेट उद्या सकाळी होणार आहे आणि तू या हॉटेलमध्ये रात्रभर राहणार आहेस.”
“बरं, मग?”
“मी स्किफिनोला फोन केला. तो म्हणाला, त्याने असा कुठलाही फोन केलाच नाही!”
माझ्या तोंडून शब्दही फुटला नाही. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो.
“मी स्किफिनोला हेही विचारलं की माझ्याशिवाय आणखी कोणी त्याला तुझ्याबद्दल फोन केला होता का, आणि त्याने सांगितलं की त्याला अॅलन प्रेन्डरगास्ट नावाच्या माणसाचा फोन येऊन गेला. तो म्हणाला की तो एल.ए.टाईम्समधून बोलतोय आणि तो तुझा एडिटर आहे. त्याला तू न सांगता गेल्यामुळे काळजी वाटत होती आणि म्हणून त्याने स्किफिनोला फोन केला होता. स्किफिनोने त्याला तू एलीला गेल्याचंही सांगितलं.”
प्रेन्डरगास्टने स्किफिनोला फोन करणं शक्यच नव्हतं. मी स्वतः त्याला अकरा वाजता फोन केला होता आणि त्याला माझा मेल मिळाला नव्हता. किंबहुना, त्याला स्किफिनोबद्दल किंवा मी लास वेगासला गेलोय ह्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. नक्कीच कोणीतरी माझ्या मागावर होतं आणि त्याने माझ्या हालचालींची अगदी खडान् खडा खबर ठेवलेली होती.
माझ्या डोळ्यांसमोरून एल्विसचा चेहरा तरळून गेला. मी कॅसिनोमध्ये त्याच्याबरोबर होतो. नंतर तो लिफ्टमध्ये शेवटच्या क्षणी घुसला होता. त्याची खोलीही माझ्याच मजल्यावर होती आणि तो मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडत असताना माझ्या जवळच येत होता.
जर त्याने रॅशेलचा आवाज ऐकलाच नसता तर? तो तसाच पुढे त्याच्या खोलीत निघून गेला असता की मला माझ्या खोलीत ढकलून आत आला असता?
रॅशेलने इंटरकॉमवरून ऑपरेटरला तिला मॅनेजरशी बोलायचंय असं सांगितलं.
“हो, मी एजंट वॉलिंग बोलतेय. मी अजूनही खोली नंबर ४१० मध्येच आहे. मी मि. मॅकअॅव्हॉयनाही भेटले आहे आणि ते सुरक्षित आहेत. मला फक्त एक सांगा की या मजल्यावर असलेल्या तीन खोल्यांमध्ये कोण आहेत – ४११, ४१२ आणि ४१३.”
तिने लक्षपूर्वक सगळी माहिती ऐकली.
“अजून एकच प्रश्न,” ती म्हणाली, “या कॉरिडॉरच्या शेवटी EXIT असं लिहिलेला एक दरवाजा आहे. तिथे बहुतेक जिना आहे. तो कुठे जातो?”
परत तिने लक्षपूर्वक ऐकलं, मॅनेजरचे आभार मानले आणि फोन ठेवला.
“मॅनेजर म्हणाला की त्या खोल्यांमध्ये सध्या कोणीही नाहीये. परवापासून त्या खोल्या रिकाम्या आहेत. आणि तो जिना खाली पार्किंग लॉटमध्ये जातो.”
“म्हणजे हा एल्विससारखे कल्ले असलेला माणूस माझ्या मागावर होता?”
“अशी दाट शक्यता आहे.”
त्याच्याविषयी मला जे काही आठवत होतं त्याची मी उजळणी केली. त्याचा गॉगल, काऊबॉय हॅट. त्याच्या चेहऱ्याचा बराचसा भाग त्याच्या कल्ल्यांमुळे झाकला गेला होता. त्याला पाहणाऱ्या कोणालाही तेच लक्षात राहिले असते. जर मला कोणीही त्याचं वर्णन करायला सांगितलं असतं तर मला फक्त ह्याच गोष्टी लक्षात राहिल्या असत्या – कल्ले, हॅट, गॉगल, हातमोजे आणि सोनेरी केस. यातली प्रत्येक गोष्ट ही सहज बदलता येण्यासारखी होती. एल्विसचा खरा चेहरा मला समजलेलाच नव्हता.
“एवढा मूर्खपणा माझ्या हातून कसा होऊ शकतो हेच मला समजत नाहीये. या माणसाने मला शोधून कसं काढलं? आधी त्याने माझ्याबद्दल शोधून काढलं, नंतर खुद्द मला शोधून काढलं. काल संध्याकाळी मला त्याच्याबद्दल समजलं आणि चोवीस तासांच्या आत तो माझ्या शेजारी बसलेला होता.”
“आपण खाली कॅसिनोमध्ये जाऊ. तू मला तो कोणत्या मशीनवर बसला होता ते दाखव. कदाचित त्याच्या बोटांचे ठसे मिळतील आपल्याला.”
मी नकारार्थी मान हलवली.
“त्याने हातमोजे घातलेले होते. कॅसिनोमध्ये जर कॅमेरे असतील तर त्यांचाही काही उपयोग होणार नाही. त्याने काऊबॉय हॅट आणि गॉगल घातले होते. तो पूर्ण वेषांतर करूनच माझ्या शेजारी बसला होता.”
“आपण तरीही त्याचा व्हिडिओ पाहू. कदाचित त्यातून आपल्याला काही धागेदोरे मिळतील.”
“मला नाही वाटत तसं. तो माझ्या शेजारी बसला होता आणि त्याला माझ्याविषयी सगळी माहिती होती. आपल्याला
मात्र त्याच्याविषयी काहीही माहिती नाहीये.”
“असं नाही म्हणता येणार जॅक,” रॅशेल म्हणाली, “एलीच्या वॉर्डनच्या सेक्रेटरीच्या मेल आयडीवरून जो मेल पाठवला गेलाय त्यावरून आपल्याला हे माहित आहे की या माणसाकडे कुठलं कौशल्य आहे. तुझे सगळे इमेल अकाउंट्स त्याने आत्तापर्यंत धुंडाळले असतील.”
“पण त्याला माझ्याविषयी समजलं कसं हेच मला कळत नाहीये. माझ्या इमेल अकाउंट्समध्ये घुसण्यासाठी त्याला माझ्याबद्दल माहिती तर पाहिजे. आणि मी काल संध्याकाळी ही मेल्स पाठवली होती हे खरं आहे. माझ्या एडिटरला – प्रेन्डरगास्टला आणि माझ्या पार्टनरला. दोघांनाही मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की ही स्टोरी बदलतेय आणि मला त्यासाठी वेगासला जायला लागेल. मी आज सकाळी प्रेन्डरगास्टशी बोललो तेव्हा तो म्हणाला की त्याला मी पाठवलेला मेल मिळालाच नाही.”
“बरोबर,” रॅशेल म्हणाली, “सावजाला एकाकी पाडण्यासाठी त्याची इतर कोणाशीही संपर्क साधण्याची क्षमता नष्ट करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. तुझा पार्टनर काय म्हणाला? त्याला मेल मिळाला का?”
“ तो नाही, ती आहे आणि तिला मेल मिळाला की नाही हे मला माहित नाहीये कारण ती तिचा फोन उचलत नाहीये आणि तिने इमेलवर पण ....”
मी बोलता बोलता थांबलो आणि रॅशेलकडे नुसताच पाहात राहिलो.
“काय झालं जॅक?”
“ती आज ऑफिसला आलेलीच नाहीये. तिने कुणालाही फोन केला नाही आणि कोणीही तिच्याशी बोलू शकलेलं नाही. त्यांनी तिच्या घरी कोणालातरी पाठवलं होतं पण तिच्या घरालाही कुलूप आहे.”
रॅशेल एका झटक्यात उठून उभी राहिली.
“आपल्याला ताबडतोब एल.ए.ला परत जायला पाहिजे. आत्ता. या क्षणी. हेलिकॉप्टर तयार आहे.”
“पण ... पण मला ब्रायन ओग्लेव्हीला भेटायचंय त्याचं काय? आणि तुलाही कॅसिनोमधून व्हिडिओ घ्यायचाय ना ?”
“या दोन्ही गोष्टी नंतर सुद्धा होऊ शकतात जॅक! तुझ्या पार्टनरचं काय?”
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
18 Jul 2015 - 12:26 am | एस
निव्वळ थरारक. शिकार, सावज, कन्फर्ट झोन... कमाल आहे!
अँजेलाचं काय होणार? तो पोकर गुरू कोण होता?
पुभाप्र!
18 Jul 2015 - 12:53 am | आतिवास
उत्कंठावर्धक!
18 Jul 2015 - 12:56 am | अर्धवटराव
आता हिरो...आपलं ते... हिरॉइन आलि..हेलिकॉप्टरमधे बसुन :)
जबरा थरार.
18 Jul 2015 - 1:02 am | राघवेंद्र
अप्रतिम
18 Jul 2015 - 1:10 am | अनन्त अवधुत
थरारक ...
छान अनुवाद.
भाग पुरेसे मोठे असतात त्यामुळे वाचायला पण मजा येते आहे.
हि कथा वाचायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद
18 Jul 2015 - 2:52 am | स्रुजा
फार च खतरनाक ! तुम्ही मोठे भाग टाकताय पण ते लवकर संपुन गेल्यासारखे वाटतायेत
18 Jul 2015 - 8:07 am | अजया
जबरदस्त!पुभालटा!
18 Jul 2015 - 8:34 am | नाखु
अभामिपारहस्य्कथाअधाशीवाचकसंघ
18 Jul 2015 - 8:45 am | वॉल्टर व्हाईट
या वीकेंड ला पुढच्या भागांची वाट बघतोय. कथानक आता वेग घेतेय, वाट पहाणे जास्त अवघड होणार.
18 Jul 2015 - 9:22 am | प्रचेतस
उत्कृष्ट.
18 Jul 2015 - 9:46 am | ज्योत्स्ना
थरारक.पुभालटा.
18 Jul 2015 - 10:44 am | अद्द्या
जबरा .
आता पुढच्या शनिवार पर्यंत वाट बघणे आले .
18 Jul 2015 - 12:14 pm | मोहन
एका छान कादंबरीचा परीचय करुन दिल्या बद्दल बोके राव तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच ! अनुवादाची भट्टी छानच जमली आहे. मुळ कादंबरी वाचायची आवश्यकताच वाटत नाही. ह्यातच तुमचे यश आहे.
पुभालटा.
18 Jul 2015 - 1:14 pm | पैसा
थरारक!
18 Jul 2015 - 5:55 pm | अमृत
मस्तच
18 Jul 2015 - 5:56 pm | अमृत
मस्तच
18 Jul 2015 - 11:31 pm | पिशी अबोली
सुंदर चालू आहे..
19 Jul 2015 - 1:12 am | मास्टरमाईन्ड
पण पुढचे भाग लौकर टाका राव.
किती वाट पहायची?
19 Jul 2015 - 9:37 am | तुषार ताकवले
परत एकदा वाचायला लागल व्यवस्थित समजन्यासाठी
पुभालटा
27 Jul 2015 - 4:55 pm | झकासराव
थरारक कलाटणी.
:)
28 Dec 2015 - 10:35 am | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग १२