द स्केअरक्रो - भाग ‍१४

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
26 Jul 2015 - 10:13 pm

द स्केअरक्रो भाग १३

द स्केअरक्रो भाग १४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

मी गुरुवारी दुपारपर्यंत टाइम्सच्या ऑफिसमध्ये जाऊ शकलो नाही. तिथे पोचल्यावर एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा सगळीकडे जाणवली. बरेच रिपोर्टर्स आणि एडिटर्स दिसले. अशी मधमाशांच्या पोळ्यासारखी लगबग गेल्या बऱ्याच दिवसांत दिसली नव्हती. आणि याचं कारण उघड होतं. अँजेला कुकचा खून. प्रत्येक दिवशी थोडंच असं घडतं की तुमच्या एका सहकाऱ्याचा खून झालाय आणि दुसरा सहकारी त्याच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे गुंतलाय!

आमची सिटी एडिटर डोरोथी फाऊलर न्यूजरूममध्ये होती. तिनेच मला पहिल्यांदा पाहिलं आणि ती ताबडतोब माझ्या दिशेने आली.

“जॅक, माझ्या ऑफिसमध्ये बसू या आपण.”

मी माझ्या क्युबिकलकडे चाललो होतो ते तिच्या ऑफिसच्या दिशेला वळलो. न्यूजरूममधल्या प्रत्येकाचे डोळे माझ्यावरच खिळले होते. गेल्या शुक्रवारसारखेच. पण आता कारण वेगळं होतं. तेव्हा सगळे माझी नोकरी गेलेली असल्यामुळे सहानुभूती आणि कीव यांच्या नजरेने बघत होते. आता मात्र त्यांच्या डोळ्यात संशय आणि थोडाफार रागही होता, कारण अँजेलाच्या मृत्यूला थोड्याफार प्रमाणात का होईना, पण मी जबाबदार होतो.

आम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिने मला दरवाजा बंद करायला सांगितला. मी तो बंद करून तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो.

“काय म्हणाले पोलिस?”

कसा आहेस, व्यवस्थित आहेस का, अँजेलाबद्दल सॉरी वगैरे काहीही नाही. सरळ मुद्द्याला हात. मलाही त्याचीच अपेक्षा होती.

“वेल्,” मी म्हणालो, “मी जवळजवळ आठ तास त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. पहिल्यांदा एल.ए.पी.डी. आणि एफ.बी.आय., नंतर सांता मोनिका पोलिस. त्यांनी मला सोडून जेमतेम एक तास नाही होत तो मला सगळ्या गोष्टी अथपासून इतिपर्यंत लास वेगास पोलिसांनाही सांगाव्या लागल्या. त्यांचे डिटेक्टिव्हज् खास मला भेटायला म्हणून आलेले होते. त्यानंतर त्यांनी मला जाऊ दिलं पण माझ्या घरी परत जायची परवानगी मला मिळालेली नाही कारण अजूनही तिथे तपास चालू आहे. फोरेन्सिकवाले अजूनही पुराव्यासाठी माझं घर पालथं घालताहेत. मग त्यांनी मला क्योटो ग्रँडमध्ये हलवलं. मी तिथे टाइम्सच्या नावावर एक खोली घेतली आहे कारण माझ्याकडे व्यवस्थित चालणारं क्रेडिट कार्ड नाहीये आणि माझा बँक अकाउंट रिकामा झालेला आहे. मी तिथे चेक-इन केलं, जरा फ्रेश झालो आणि लगेचच इथे आलो.”

क्योटो आमच्या ऑफिसपासून एक ब्लॉक लांब असेल. टाइम्सचे बाहेरून आलेले रिपोर्टर्स आणि नव्याने भरती होणारे लोक यांच्यासाठी तिथेच व्यवस्था केली जात असे.

“ते ठीक आहे,” डोरोथी म्हणाली, “तू पोलिसांना काय सांगितलंस?”

“मी त्यांना तेच सांगितलं जे मी काल प्रेन्डोला सांगायचा प्रयत्न करत होतो. मी हे शोधून काढलंय की सांता मोनिकामध्ये सापडलेली डेनिस बॅबिट आणि लास वेगासमधली शेरॉन ओग्लेव्ही या दोघींचे खून या एकाच माणसाने केलेले आहेत आणि त्यांचे आरोप अनुक्रमे अलोन्झो विन्स्लो आणि ब्रायन ओग्लेव्ही यांच्यावर आलेले आहेत. अर्थातच हे दोघेही निर्दोष आहेत. आमच्या नकळत अँजेलाने किंवा मी या खुन्याला सावध केलं आणि त्याने त्याला असलेला धोका मिटवण्यासाठी पावलं उचलली. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्याने अँजेलाचं अपहरण करून तिचा खून केला आणि त्यानंतर तो माझ्यामागे नेवाडामध्ये आला. पण माझं नशीब जोरावर होतं. प्रेन्डोने जरी माझ्यावर विश्वास ठेवला नसला तरी माझ्या ओळखीच्या एका एफ.बी.आय.एजंटने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती मला एली शहरात मी ज्या हॉटेलमध्ये होतो तिथे भेटली. ती तिथे असल्यामुळे हा खुनी माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. जर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि ती तिथे येऊन मला भेटली नसती तर तुम्ही आत्ता मी कसा अँजेलाचा खून करून तिचा मृतदेह माझ्या घरात लपवला आणि कशी नेवाडामध्ये एका अनोळखी जागी जाऊन आत्महत्या केली – याबद्दल स्टोरीज लिहिल्या असत्या. या अनसबचा तोच डाव होता.”

“अनसब?”

“अननोन सब्जेक्ट. हे एफ.बी.आय.ने त्याला दिलेलं नाव आहे, जोपर्यंत त्याच्याबद्दल काहीही कळत नाही, तोपर्यंत.”

डोरोथीचे डोळे हे ऐकून विस्फारले होते.

“ हे जे तू आत्ता मला सांगितलं आहेस, ते फारच अतर्क्य आणि जबरदस्त आहे. पोलिस काय म्हणताहेत याच्याबद्दल? त्यांना हे सगळं असंच घडलंय हे मान्य आहे का?”

“ तुझ्या म्हणण्याचा अर्थ – त्यांचा माझ्या म्हणण्यावर विश्वास बसलाय का? वेल्, त्यांनी मला अटक न करता जाऊ दिलंय, त्यावरून ते सिद्ध होतंच, नाही का?”

तिचा चेहरा लाल झाला.

“तसं नाही जॅक. या सगळ्या गोष्टी ऐकून माझं डोकं गरगरायला लागलंय. या न्यूजरूममध्ये असं काही याच्या आधी झालंय हे मला आठवत नाहीये.”

“जर हे फक्त मीच सांगितलं असतं तर कदाचित पोलिसांनी विश्वास ठेवलाही नसता पण कालचा जवळजवळ अर्धा दिवस मी या एफ.बी.आय.एजंटबरोबरच होतो. आम्हाला वाटतंय की आम्ही या माणसाला एलीमधल्या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष पाहिलंय. ती माझ्याबरोबर इथे एल.ए.लाही आली आणि नंतर माझ्या घरीपण आली. आम्ही जेव्हा माझ्या घरात शोधाशोध करत होतो तेव्हा तिलाच अँजेलाचा मृतदेह सापडला. मी जे जे पोलिसांना सांगितलं त्या सगळ्याला तिने दुजोरा दिला आणि कदाचित म्हणूनच आपण आत्ता जेव्हा बोलतोय तेव्हा आपल्यामध्ये जाड काच किंवा गज नाहीयेत.”

अँजेलाचा उल्लेख आल्यावर आम्ही दोघेही गप्प झालो. काही क्षण कोणीच काही बोललं नाही.

“तिचा मृत्यू होणं ही फार भयानक गोष्ट आहे,” ती म्हणाली.

“खरं आहे. चांगली मुलगी होती. तिचे शेवटचे क्षण कसे गेले असतील याचा विचारही करवत नाहीये मला.”

“तिचा खून कसा झाला जॅक? या इतर स्त्रियांप्रमाणेच?”

“हो. जवळपास तसाच. निदान दिसतंय तरी तसंच. पण पोस्ट मॉर्टेम तपासणी होईपर्यंत काही निश्चितपणे सांगता येणार नाही.”

“आणि तपास कसा चाललाय? त्याबद्दल काही कळलंय का तुला?”

“एल.ए.पी.डी., सांता मोनिका पी.डी., लास वेगास पी.डी. आणि एफ.बी.आय. या चौघांचा एक टास्क फोर्स बनवण्यात आलेला आहे आणि सगळ्याचा समन्वय इथून, पार्कर सेंटरमधून होणार आहे.”

“पण हे कन्फर्म करता येईल का? म्हणजे आपण आपल्या स्टोरीजमध्ये तसा उल्लेख करू शकतो.”

“हो. मी कन्फर्म करून घेईन. बहुतेक मी एकमेव रिपोर्टर असेन आत्ता या क्षणी, ज्याचा फोन ते उचलतील. मला या स्टोरीसाठी किती इंच जागा देते आहेस तू?”

“जागा?जॅक .... याबद्दल ... याच्याबद्दल मला जरा तुझ्याशी बोलायचंय.”

माझ्या पोटात एक भलामोठा खड्डा पडल्याचं मला जाणवलं.

“ही मुख्य स्टोरी मीच लिहितोय, बरोबर?”

“प्रचंड मोठी स्टोरी आहे ही. मुख्य स्टोरी आणि साईडबार हे पहिल्या पानावर आणि आतल्या पानांवर डबल ट्रक, तेही आर्टसकट. बऱ्याच दिवसांनी आपल्याला एवढी जागा मिळालेली आहे.”

डबल ट्रक म्हणजे आतली दोन पूर्ण पानं. डावीकडचं आणि उजवीकडचं, आणि आर्ट म्हणजे फोटो. जागा तर भरपूर मिळाली होती पण त्याच्यासाठी पेपरच्या एका रिपोर्टरचा खून व्हावा लागला होता.

डोरोथीने मला सगळा प्लॅन ऐकवला, “जेरी स्पेन्सर लास वेगासमध्ये गेलेला आहे – तो स्किफिनोला भेटतोय आणि जिल मेयरसन एलीला गेलीय. ती ब्रायन ओग्लेव्हीशी बोलणार आहे. इथे एल.ए.मध्ये गोगो गोन्झमार्ट साईडबार स्टोरी लिहिणार आहे, जी अर्थातच अँजेलाबद्दल असेल. टेरी स्पार्क्स आत्ता रोडिया गार्डन्समध्ये जाऊन अलोन्झो विन्स्लोवर स्टोरी करणार आहे. आर्ट मुख्यत्वे अँजेलावर केंद्रित असेल. अजूनपण असेल कदाचित.”

“अलोन्झो विस्न्लोचं काय?त्याची आज सुटका होणार आहे का सिल्मारमधून?”

“नक्की माहित नाही. बहुतेक उद्या होईल आणि आपल्याला ती स्टोरी उद्या करावी लागेल.”

विन्स्लो बाहेर यायला जरी पुढचा दिवस उजाडणार असला तरीसुद्धा ही स्टोरी, डोरोथीने सांगितल्याप्रमाणे प्रचंड मोठी होती. मेट्रो रिपोर्टर्सना बाहेर पाठवणं आणि इथे एल.ए.मध्ये पण एका स्टोरीवर इतके रिपोर्टर्स कामाला लावणं हे मी याच्याआधी फक्त संपूर्ण कॅलिफोर्निया राज्यात अचानक वणवे भडकले होते आणि हजारो एकर जंगलं जळून खाक झाली होती, तेव्हा घडताना पाहिलं होतं.

“ठीक आहे. यातल्या प्रत्येक स्टोरीसाठी माझ्याकडे माहिती आहे. मी ती सगळी माहिती एकत्र करून एक मोठी, मुख्य स्टोरी लिहीन.”

डोरोथीने मान डोलावली आणि लगेचच बॉम्ब टाकला, “लॅरी बर्नार्ड मुख्य स्टोरी लिहितोय.”

मी ताबडतोब आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली, “ही काय xxxx आहे डोरोथी?ही माझी स्टोरी आहे, समजलं? माझी! माझी आणि अँजेलाची!”

डोरोथीने माझ्या खांद्यावरून पलीकडे न्यूजरूममध्ये एक नजर टाकली. माझा आवाज बहुतेक काचेतून पलीकडे ऐकू गेला असावा. मला अर्थातच काही फरक पडत नव्हता.

“शांत हो जॅक आणि तोंड सांभाळून बोल. तू ज्या पद्धतीने काल प्रेन्डोशी बोललास तसं माझ्याशी बोललास तर याद राख.”

मी एक-दोनदा दीर्घ श्वास घेतला आणि शांत आवाजात बोललो, “ओके. मी तुझ्याशी आणि प्रेन्डोशी अशा भाषेत बोललो त्याबद्दल सॉरी. पण तू ही स्टोरी दुसऱ्या कोणाला लिहायला कसं काय सांगू शकतेस? ह्या स्टोरीची सुरुवात मी केली आहे आणि मलाच ती लिहू दे. “

“जॅक, तू ही स्टोरी लिहू शकत नाहीस आणि का, तेही तुला चांगलं ठाऊक आहे. तू स्वतः या स्टोरीचा एक भाग आहेस. तू लॅरीबरोबर बस. तो तुला प्रश्न विचारेल, तुझी मुलाखत घेईल आणि मग ही स्टोरी लिहील. स्विचबोर्डवर आत्तापर्यंत तीसपेक्षा जास्त मेसेजेस येऊन गेले असतील आणि तेही आख्ख्या देशभरातून. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, केटी क्युरिक, क्रेग फर्ग्युसन – इतक्या जणांचे फोन आले आहेत आत्तापर्यंत.”

“फर्ग्युसन? तो कुठे रिपोर्टर आहे पण?”

“त्याने काय फरक पडतोय? मुद्दा हा आहे की तू स्वतःच एक स्टोरी आहेस जॅक. तुझी मदत आणि तुला असलेली माहिती या सगळ्यांची गरज आहेच आपल्याला पण एका ब्रेक होत असलेल्या स्टोरीचा विषय असलेल्या व्यक्तीला ती स्टोरी लिहायला कशी देणार? तूच आत्ता सांगितलंस की पोलिसांनी तुला जवळजवळ आठ तास प्रश्न विचारले. तू जी उत्तरं दिलीस त्यावरून त्यांच्या पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे. तू स्वतः त्याच्याबद्दल कसं लिहिणार? तू स्वतःच स्वतःची मुलाखत घेणार ?प्रथमपुरुषी स्टोरी लिहिणार?”

मी उत्तर द्यावं म्हणून ती काही क्षण थांबली पण मी काहीच बोललो नाही.

“बरोबर,” ती म्हणाली, “कळलं ना तुला हे का होऊ शकत नाही ते?”

मी पुढे झुकून माझा चेहरा माझ्या हातांनी झाकून घेतला. तिचं म्हणणं बरोबर होतं. आणि मी न्यूजरूममध्ये येण्याआधी मला ते माहित होतं.

“ही स्टोरी करून मी वाजतगाजत इथून निघून जाणार होतो. त्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढून.”

“तुला श्रेय मिळणार नाही असं तुला का वाटतंय पण? ही स्टोरी जरी इतर कोणी लिहित असलं तरी ती घडवणारा तूच आहेस ना? केटी क्युरिक, लेट नाईट शो यामध्ये तुझी मुलाखत घेतली जाईल. हे काय कमी वाजतगाजत जातोयस तू?”

“माझी हे स्वतः लिहिण्याची इच्छा होती, दुसऱ्या कोणाला सांगायची नाही.”

“हे पहा, आजचा दिवस जाऊ दे. मग आपण प्रथमपुरुषी स्टोरी करण्याबद्दल बोलू. मी तुला वचन देते की तुला स्वतःला याबद्दल लिहायला मिळेल.”

मी मान उचलून तिच्याकडे पाहिलं. त्यावेळी पहिल्यांदाच मला तिच्या खुर्चीमागे भिंतीवर लावलेला एक फोटो दिसला. तो ‘विझार्ड ऑफ ओझ ’ मधला फोटो होता. त्यात या सुप्रसिध्द कादंबरी आणि चित्रपटाची नायिका डोरोथी तिचे तीन मित्र – टिन मॅन, घाबरट सिंह आणि बुजगावण्या किंवा स्केअरक्रो यांच्याबरोबर यलो ब्रिक रोडवरून तिचे ते जादूचे बूट घालून जाताना दाखवली होती. त्याच्याच खाली कोणीतरी मार्करने लिहिलं होतं : YOU ARE NOT IN KANSAS ANYMORE, DOROTHY.

त्या डोरोथीप्रमाणे आमची डोरोथीही कान्सासमधूनच एल.ए.ला आली होती हे मला आठवलं. ती एल.ए.टाइम्सआधी विचिता ईगलमध्ये काम करत होती.

“ठीक आहे. तू जर असं वचन देत असशील तर....”

“मी देतेय तसं वचन तुला.”

“ठीक आहे. मी लॅरीशी बोलतो.”

तिचं वचन ऐकल्यावरही मला ही स्टोरी मी लिहित नाहीये हा माझा वैयक्तिक पराभव वाटत होता.

“तू त्याच्याशी बोलण्याआधी मला तुला एक गोष्ट विचारायची आहे,” ती म्हणाली, “तुला दुसऱ्या एका रिपोर्टरबरोबर ऑन द रेकॉर्ड बोलण्यात काही प्रॉब्लेम नाहीये ना? त्याच्याशी बोलण्याआधी तुला तुझ्या वकिलाचा सल्ला वगैरे घ्यायचाय का?”

“कशाबद्दल बोलतेयस तू?”

“जॅक, हे तुझ्याच चांगल्यासाठी आहे. अजून या प्रकरणाचा तपास चालू आहे. तू लॅरीला जे सांगशील ते पेपरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याचा वापर करून पोलिसांनी तुला नंतर त्रास द्यावा अशी माझी इच्छा नाहीये.”

मी उठून उभा राहिलो आणि महत्प्रयासाने माझ्या आवाजावर आणि मनावर नियंत्रण ठेवलं, “दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर तुझा मी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाहीये. त्याला जे इतरांनी मानायला हवं होतं त्यावरच तुझाही विश्वास आहे, की मीच अँजेलाला माझी नोकरी जाणार आणि ती माझ्या जागी येणार या नैराश्यापोटी आलेल्या संतापातून मारलं.”

“नाही जॅक. तसं अजिबात नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ओके? माझी इच्छा फक्त एवढीच आहे की तुला काही त्रास होऊ नये. आणि ‘त्याला’ म्हणजे कोणाला?”

“दुसरं कोण? हाच खुनी, ज्याने अँजेलाचा आणि त्याच्या आधी त्या दोघींचा खून केलाय. अनसब!”

“ओके. मी उगाचच कायदेशीर बाजू आणली आपल्या संभाषणात. त्याबद्दल सॉरी. आता तू आणि लॅरी कॉन्फरन्स रूममध्ये बसा आणि ह्या मुख्य स्टोरीवर काम करा.”

ती लॅरी बर्नार्डला बोलवायला बाहेर गेली. मीही बाहेर आलो आणि सगळ्या न्यूजरूमकडे एक दृष्टीक्षेप टाकला. सगळे एसेस बसायचे तिकडे ज्यावेळी माझी नजर गेली तेव्हा मला अँजेलाचं रिकामं क्युबिकल दिसलं. मी तिथे गेलो आणि पाहिलं की कोणीतरी एक प्लास्टिकच्या आच्छादनात असलेला एक मोठा पुष्पगुच्छ तिच्या डेस्कवर ठेवला होता. ते प्लास्टिक आच्छादन पाहिल्यावर माझ्या डोळ्यांसमोरून परत एकदा प्लास्टिकमध्येच ठेवलेला अँजेलाचा मृतदेह आणि तिचे थिजलेले निष्प्राण डोळे तरळून गेले. परत एकदा तिला कोणतीतरी अंधारी पोकळी गिळून टाकत असल्यासारखं वाटलं.

“एक्स्क्यूज मी जॅक!”

मी दचकलो आणि माझ्या विचारांतून बाहेर आलो. वळल्यावर पाहिलं तर मागे एमिली गोमेझ-गोन्झमार्ट उभी होती. एल.ए.टाइम्सच्या मेट्रो रिपोर्टर्समधली माझ्या मते सर्वश्रेष्ठ रिपोर्टर. ती सतत कुठल्या न कुठल्या स्टोरीच्या मागे असायची. त्यामुळेच तिला तिचं टोपणनाव मिळालं होतं – गोगो.

“हाय गोगो!”

“सॉरी जॅक, तुला जरा त्रास देतेय पण मी अँजेलावर लिहितेय आणि त्यासाठी तुझी थोडी मदत हवी आहे. आणि तिच्याबद्दल तुला काय वाटतं तेही सांगितलंस तर ....”

ती तिची छोटी वही आणि पेन घेऊन तयारच होती.

मी जरा विचार केला, “काय सांगू मी तिच्याबद्दल?मी तिला इतकं जवळून ओळखत नव्हतो. आम्ही एकत्र काम करायला या सोमवारीच सुरुवात केली होती. पण तिचं जेवढं काम मी पाहिलं त्यावरून हे नक्कीच सांगू शकतो की ती पुढे खूप जबरदस्त रिपोर्टर झाली असती. तिच्यामध्ये उत्सुकता, निश्चय आणि उत्साह यांचं योग्य मिश्रण होतं, जे एका चांगल्या रिपोर्टरसाठी अत्यंत आवश्यक आहे. तिची उणीव भासेल, हे तर खरंच. कोणास ठाऊक, तिने कोणत्या स्टोरीज लिहिल्या असत्या आणि कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला असता?”

गोगो हे लिहीपर्यंत मी थांबलो.

“ठीक वाटतंय का हे?”

“परफेक्ट. थँक्स. अच्छा, पार्कर सेंटरमध्ये कोणाशी बोलू मी तिच्याबद्दल?”

“नाही सांगू शकत. तिने दोन दिवसांपूर्वीच सुरुवात केली होती तिथे जायला. त्यामुळे तिच्याबद्दल कोणी बोलेल ही शक्यता फारच कमी आहे. तिचा ब्लॉग होता असं मी ऐकलंय. तो पाहिलास का तू?”

“हो. तो मी पाहिलाय. तिच्या प्रोफेसर्सशी सुद्धा बोलणं झालंय माझं. तो प्रश्न नाहीये. मी एल.ए.मधलं आणि पत्रकारितेच्या बाहेरचं असं कोणीतरी शोधत होते.”

“ओके. तिने सोमवारीच एक स्टोरी केली होती. कोल्ड केस स्क्वाडमधल्या लोकांनी एक वीस वर्षे जुनी बलात्कार आणि खुनाची केस सोडवली, त्याबद्दल. तिथले लोक तुला मदत करतील. रिक जॅकसन, टिम मार्सिया आणि रिचर्ड बेन्ग्सटन – या तिघांशी ती बोलली होती. ते नक्कीच तुला तिच्याबद्दल सांगतील.”

तिने ही नावं लिहून घेतली, “ठीक आहे जॅक. मी या लोकांशी बोलेन.”

“ओके. तुला अजून काही माहिती हवी असली तर मला विचार. मी इथेच आहे.”

“ओके जॅक.” ती घाईघाईने निघून गेली.

मी अँजेलाच्या डेस्कवर ठेवलेला पुष्पगुच्छ परत एकदा पाहिला. तिला आदरांजली वाहणं एकदम जोरात सुरु होतं. मीही त्याचा एक भाग झालो होतो.

तुम्ही मला सिनिकल म्हणा किंवा काहीही, पण माझ्या डोक्यात हा प्रश्न आल्याशिवाय राहिला नाही की हा पुष्पगुच्छ ज्याने कोणी ठेवलाय तो त्याला किंवा तिला मनापासून दुःख झालंय म्हणून ठेवलाय की दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या एडिशनमध्ये जेव्हा त्याचा फोटो येईल तेव्हा त्या फोटोमध्ये तो तसा ठेवणं चांगलं दिसेल म्हणून ठेवलाय?

###########################################################################

जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी आणि लॅरी बर्नार्ड कॉन्फरन्स रूममध्ये बसलो होतो. ही कॉन्फरन्स रूम बहुतेक वेळा न्यूज मीटिंग्ससाठी वापरली जात असे. एका भल्यामोठ्या टेबलावर मी माझ्या फाईल्स, नोट्स आणि इतर सगळी सामग्री ठेवली होती आणि मी काय केलं आणि का ते सगळं लॅरीला सांगत होतो. तोही आता पूर्णपणे स्टोरीमध्ये घुसला होता. त्याचे प्रश्न एकदम मुद्देसूद होते आणि मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागचं कारण सांगितल्याशिवाय तो मला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ देत नव्हता. ही मुख्य स्टोरी लिहित असल्यामुळे त्याला आनंद झाला होता, हे तर दिसतच होतं. साहजिकच होतं. ही स्टोरी जगभरात जरी नाही तरी संपूर्ण देशात जाणार होती, ती पण त्याच्या बायलाईनबरोबर.

आमची दोघांची ओळख आणि मैत्री बऱ्याच वर्षांपासूनची होती. आम्ही दोघेही डेनव्हरचेच होतो. दोघांनीही तिथे रॉकी माउंटन न्यूजमध्ये एकत्र काम केलं होतं. माझी स्टोरी कोणीतरी दुसरं लिहिणार हे मी माझ्या मनाविरुद्ध मान्य करण्याचं एक कारण लॅरी ती लिहित होता, हेही होतं.

मी केलेल्या काही विधानांबद्दल पोलिस आणि एफ.बी.आय. यांच्याकडून अधिकृतरीत्या दुजोरा मिळवणं लॅरीसाठी आवश्यक होतं. त्यामुळे मी बोलत असतानाच तो बाजूला त्याच्या वहीत पोलिसांना आणि ब्युरोला विचारायचे प्रश्न लिहून ठेवत होता. त्याने स्टोरी प्रत्यक्ष लिहायला सुरुवात करण्याआधी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं होतं, त्यामुळे स्टोरीबाहेर एकही गोष्टीवर तो बोलत नव्हता आणि माझ्यासाठीही ते ठीक होतं. तशीही मला इतर कुठल्याही गोष्टीवर बोलायची इच्छा राहिलेलीच नव्हती.

आम्ही दोघांनी काम सुरु करून एक तासभर झाला असेल-नसेल, माझा फोन वाजला. मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तो तसाच व्हॉइसमेलवर गेला. लॅरी आणि मी त्यावेळी एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलत होतो आणि मला कोणताही व्यत्यय नको होता. पण ज्याने कोणी फोन केला होता त्याने कुठलाही मेसेज सोडला नव्हता कारण कोणी व्हॉइसमेलवर मेसेज ठेवल्यावर जसा आवाज यायचा, तसा आला नाही.

पंधरा मिनिटांनी फोन परत वाजला. आता मात्र मी तो खिशातून बाहेर काढून कॉलर आयडी पाहिला. त्याच्यावरचा नंबर पाहिल्यावर परत एक शिरशिरी माझ्या पाठीतून गेली. हा नंबर माझ्या ओळखीचा होता कारण आदल्या दिवशी मी स्वतः तीन-चार वेळा त्यावर फोन केला होता आणि निरोपही ठेवला होता. अँजेला कुकचा मोबाईल नंबर.

“लॅरी, मला हा कॉल घ्यायलाच पाहिजे. आलोच.”

मी माझ्या जागेवरून उठलो, बाहेर आलो आणि माझ्या क्युबिकलकडे गेलो. जाता जाता कॉल उचलला.

“हॅलो!”

“जॅक बोलतोय का?”

“हो. मीच बोलतोय. कोण?”

“मी तुझा दोस्त बोलतोय जॅक! एलीमध्ये भेटलो होतो आपण!”

एल्विस! दोस्त हा शब्द ऐकल्यावरच माझ्या लक्षात आलं होतं. मी माझ्या क्युबिकलपाशी येऊन तिथल्या खुर्चीवर बसलो आणि पुढे झुकलो. इतर कोणाला आमचं संभाषण ऐकू जावं अशी माझी इच्छा नव्हती.

“काय हवंय तुला?” मी विचारलं.

“काही नाही. मी फक्त तू कसा आहेस ते बघायला फोन केला.” तो म्हणाला.

“मी ठीकच आहे. तुझी जरी तशी इच्छा नसली तरी. तिथे हॉटेल नेवाडाच्या कॉरिडॉरमध्ये तू का थांबलास ? तुझा प्लॅन अंमलात आणायचं सोडून तू सरळ तिथून निघून गेलास.”

मला समोरून हसण्याचा आवाज ऐकू आला.

“तुझ्या खोलीत कोणीतरी होतं आणि मला त्याची अपेक्षा नव्हती. कोण होती ती पोरगी? तुझी गर्लफ्रेंड?”

“हो. तसं समज. आणि तिने तुझा प्लॅन बिघडवला, बरोबर? तुला माझा मृत्यू आत्महत्या म्हणून भासवायचा होता.”

“तू वाटतोस तितका काही बावळट नाहीयेस,” तो म्हणाला, “ किंवा मग त्यांनी तुला जे सांगितलंय, तेच तू मला सांगतोयस!”

“त्यांनी?”

“कम ऑन जॅक! तुला काय वाटतं, काय चाललंय ते मला समजत नाहीये? आता बऱ्याच गोष्टींवरचा पडदा उठलेला आहे. उद्याच्या पेपरात त्याबद्दल बऱ्याच स्टोरीज येणार आहेत. पण त्यातल्या कुठल्याच स्टोरीवर तुझं नाव नाहीये जॅक. असं का?”

याचा अर्थ तो अजूनही टाइम्सच्या डेटा सिस्टिममध्ये होता. हे जर टास्क फोर्समधल्या लोकांना कळलं तर ते त्याला पकडू शकतील का? माझ्या डोक्यात विचार आला.

“हॅलो जॅक, हॅलो....”

“ऐकतोय मी.”

“आणि असंही दिसतंय की तू अजून मला काही नाव दिलेलं नाहीयेस.”

“म्हणजे?”

“तुम्ही पत्रकार लोक माझ्यासारख्यांना एकदम रंगीबेरंगी नावं देता ना? यॉर्कशायर रिपर, हिलसाईड स्ट्रँग्लर, टूल बॉक्स किलर्स, पोएट. तो तर तुझा एकदम खास, बरोबर ना?”

“हो. तुझ्यासाठी नाव ठरवलंय आम्ही. आयर्न मेडन. कसं वाटलं?”

आता समोरून हसण्याचा आवाज ऐकू आला नाही.

“हॅलो, आयर्न मेडन, हॅलो ....”

“तू काळजी घे जॅक. सावध राहा. मी कधीही परत येऊ शकतो.”

मी जोरात हसलो.

“मी लपलेलो नाहीये तुझ्यासारखा. मी इथेच आहे. हिम्मत असेल तर परत एकदा माझ्यासमोर येऊन दाखव.”

तो काहीच बोलला नाही. मी त्याला थोडं डिवचायचं ठरवलं, “बायकांना आणि मुलींना पळवून नेऊन, त्यांना बांधून, त्यांच्यावर बलात्कार करून नंतर खून करायला हिम्मत आहे ना तुझ्याकडे?”

आता परत हसण्याचा आवाज आला.

“तू इतका साधासरळ आहेस ना जॅक! मी तुला अगदी आरपार पाहू शकतो. तुला त्यांनी स्क्रिप्ट दिलंय की काय माझ्याशी बोलण्यासाठी?”

“मला स्क्रिप्टची गरज नाहीये.”

“तुला काय वाटलं, तू काय करतोयस ते मला समजत नाहीये?तू मला डिवचायचा प्रयत्न करतोयस. म्हणजे मी एल.ए. ला येईन आणि तुला गाठायचा प्रयत्न करेन. मग एफ.बी.आय. आणि एल.ए.पी.डी.चे जोकर्स माझ्यावर झडप घालतील आणि मला पकडतील आणि तुला अजून एका राक्षसाला मारल्याचं श्रेय मिळेल. बरोबर ना जॅक?”

“तसं समज हवं तर.”

“अंहं. तसं नाही होणार. माझ्याकडे अफाट संयम आहे जॅक. दिवस जातील, कदाचित महिने आणि वर्षेही जातील. आणि मग अचानक मी तुझ्यासमोर येईन. तेव्हा मी कुठलंही वेषांतर केलेलं नसेल. तेव्हा मग मी तुझी गन परत करेन. हा माझा शब्द आहे.”

तो परत एकदा हसला. त्या क्षणी मला जाणवलं की तो जिथून कुठून माझ्याशी बोलतोय, त्याला त्याचा आवाज खूप खालच्या पट्टीत ठेवायला लागतोय. ऑफिस असेल एखादं किंवा एखादी भरपूर लोक असलेली सार्वजनिक जागा असेल, पण हा माणूस आपला आवाज मुद्दामहून खालच्या पट्टीत ठेवत होता. त्याबद्दल मला खात्री होती.

“अच्छा,गन. पण त्याचं स्पष्टीकरण काय आहे? तुला हे तर माहीतच असेल की मी वेगासला फ्लाईटने गेलो आणि विमानातून तुम्ही गन नेऊ शकत नाही. मग मी माझ्या स्वतःच्या गनने आत्महत्या केली हे कसं दाखवणार होतास तू? तुझ्या प्लॅनमध्ये ही एक मोठी चूक आहे, नाही का?”

आता तो मोठ्याने हसला.

“जॅक, तुला असं वाटतंय की तुझ्याकडे सगळी माहिती आहे, पण तसं नाहीये. जेव्हा तुला सगळी माहिती समजेल, तेव्हा तुला कळेल की माझा प्लॅन अचूक होता, एकच चूक म्हणजे तुझी मैत्रीण. तिची अपेक्षा मी केली नव्हती.”

मीही केली नव्हती, पण हे त्याला सांगणार नव्हतो मी.

“म्हणजेच तो अचूक नव्हता.”

“मी त्याची भरपाई करू शकतो.”

“हे पहा, मी बिझी आहे जरा. का फोन केला आहेस तू?”

“बोललो ना मी. तू कसा आहेस ते बघायचं होतं मला. तुझी नीट ओळख करून घ्यायची होती. आपण आता आयुष्यभरासाठी जोडले गेलेलो आहोत.”

“अच्छा! मग तुला काही प्रश्न विचारू शकतो का मी?”

“नाही जॅक. हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. तुझ्या वाचकांचा यात काहीही संबंध नाहीये.”

“ बरोबर बोलतोयस तू. खरी गोष्ट ही आहे की मीच तुझ्याबद्दल काहीही लिहिणार नाहीये. तुला काय वाटतं, तुझ्या सडलेल्या मेंदूमधल्या तितक्याच सडलेल्या कल्पनांना आम्ही प्रसिद्धी देऊ?”

बराच वेळ शांतता. आणि मग जेव्हा त्याचा आवाज आला, तेव्हा तो चिडलेला असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं.

“तू .... तू मला मान दिला पाहिजेस.”

आता मी त्याच्याचप्रमाणे जोरात हसलो.

“मान? गेलास भोxxxx. कसं वाटलं? जिचा याच्याशी काहीही संबंध नव्हता अशा एका मुलीला हकनाक मारलंस तू....”

“एक मिनिट जॅक,” त्याने मला थांबवलं. पलीकडून एक खोकल्याची जोरात आलेली उबळ जबरदस्तीने थांबवल्यासारखा आवाज आला.

“ऐकलंस तू जॅक? काय होतं ते कळलं का?”

मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग त्याने तो आवाज परत ऐकवला. या खेपेला अगदी थोडा वेळ. नंतर परत एकदा ऐकवला.

“काय आहे हे? नाही समजलं मला,” मी वैतागून म्हणालो.

“तुझी मैत्रीण आणि सहकारी. अँजेला कुक. तुझं नाव घेत होती बिचारी. तिचं तोंड प्लास्टिकने पूर्णपणे झाकलं होतं आणि श्वास घ्यायला अजिबात हवा शिल्लक नव्हती ना, तेव्हा.”

तो परत एकदा खिदळला.

“तुला माहित आहे मी त्यांना काय सांगतो ते? मी सांगतो – ‘ एकदा दीर्घ श्वास घ्या आणि मग सगळं ताबडतोब संपून जाईल.”

तो परत एकदा जोरात हसला आणि परत एकदा त्याने मला तो आवाज ऐकवला आणि फोन ठेवून दिला. मी तसाच सुन्नपणे फोन कानाला लावून माझ्या खुर्चीवर बसून राहिलो.

मला कोणीतरी माझ्या क्युबिकलच्या भिंतीवरून माझ्याकडे पाहातंय हे जाणवलं आणि मी भानावर आलो. लॅरी बर्नार्ड होता.

“किती वेळ अजून?” त्याने दबक्या आवाजात विचारलं. बहुतेक मी अजून कॉलवर आहे असं वाटत असावं त्याला.

मी फोन माझ्या कानापासून बाजूला केला आणि त्याच्याकडे पाहिलं, “पाच-दहा मिनिटं. मी नंतर आतमध्येच येईन. तू नको येऊस बोलवायला.”

“ठीक आहे. मी एक कॉफी घेऊन येतो.”

तो निघून गेला. मी ताबडतोब रॅशेलला फोन केला. तिने चार वेळा रिंग वाजल्यावर फोन उचलला.

“मी तुझ्याशी बोलू शकत नाही जॅक. मला भरपूर काम आहे,” ती फोन उचलल्यावर म्हणाली.

“तू पैज जिंकली असतीस.”

“कुठली पैज?”

“त्याने मला आत्ता फोन केला होता. अनसबने. त्याच्याकडे अँजेलाचा फोन आहे.”

“काय म्हणाला तो?”

“फार काही नाही. तो तुझ्याबद्दल माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत होता.”

“माझ्याबद्दल? माझ्याबद्दल कसं माहित झालं त्याला?”

“त्याला काहीच माहित नाहीये तुझ्याबद्दल. तुझं नावही माहित नाहीये त्याला. पण तू एलीला हॉटेल नेवाडामध्ये येऊन त्याच्या प्लॅनचा सत्यानाश केलास. त्यामुळे त्याला उत्सुकता वाटली की तू कोण आहेस.”

“हे पहा जॅक, त्याने तुला काहीही सांगू दे, पण ते तू छापू नकोस. त्याने आगीत तेल ओतल्यासारखं होईल. जर त्याला हेडलाईन्स मिळाल्या तर तो त्याच्या खुनांची संख्या आणि तीव्रता, दोन्हीही वाढवू शकतो.”

“काळजी करू नकोस. इथे कोणालाही त्याने मला फोन केल्याचं कळलेलं नाहीये आणि मी एकही स्टोरी लिहित नाहीये त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पुढेमागे जेव्हा मी माझं पुस्तक लिहीन, तेव्हा त्याच्यात हे सगळं लिहीन मी.”

मी पहिल्यांदाच पुस्तकाचा उल्लेख केला होता, पण ती शक्यता नाकारता येत नव्हती. ही माझी स्टोरी होती आणि मी ती लिहिणार होतो. जर पेपरमध्ये नाही लिहिता आलं तर पुस्तकामध्ये.

“तू तो काय बोलला ते रेकॉर्ड केलंस का?” रॅशेलने विचारलं.

“नाही, कारण मला त्याची अपेक्षा नव्हती.”

“मग आम्हाला तुझा फोन लागेल. आम्ही तो कॉल कुठून आलाय ते शोधून काढू आणि मग त्यावरून एखादा धागादोरा मिळू शकतो. किमान तो हा कॉल करताना कुठे होता ते तरी समजू शकतं.”

“तो अशा ठिकाणी होता जिथे त्याला त्याचा आवाज एकदम खालच्या पट्टीत ठेवावा लागत होता. बहुतेक एखादं ऑफिस, कारण मला आजूबाजूचा कुठलाच आवाज ऐकू आला नाही. आणि त्याने बोलताना एक चूक केली.”

“काय?”

“मी त्याला थोडं डिवचलं. त्याचं डोकं थोडं फिरवायचा प्रयत्न केला, आणि....”

“जॅक! वेडा आहेस का? काय बोललास तू?”

“ मला अजिबात मी त्याला घाबरलोय हे दाखवायचं नव्हतं. त्यामुळे मी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याला वाटलं की मला तुम्ही, म्हणजे पोलिस किंवा एफ.बी.आय. यांनी एखादं स्क्रिप्ट दिलंय आणि मी त्याला मुद्दामहून त्याला मला येऊन समोरासमोर भेटायचं आव्हान देतोय. तेव्हा तो म्हणाला की - ‘मी एल.ए.ला येईन आणि तुला गाठायचा प्रयत्न करेन’ – मी एल.ए.ला येईन, म्हणजे तो एल.ए.मध्ये नाहीये. तो एल.ए.च्या बाहेर आहे.”

“ते ठीक आहे पण तोही कदाचित तुला खेळवत असेल. तो मुद्दामहून ‘मी एल.ए.ला येईन’ असं म्हणू शकतो, म्हणजे आपल्याला वाटेल की तो एल.ए.च्या बाहेर आहे. पण प्रत्यक्षात तो एल.ए.मध्येच असू शकतो. म्हणून तर म्हणतेय मी की जर हा कॉल रेकॉर्ड केला असतास तू, तर आपल्याला बरंच काही कळू शकलं असतं.”

हा विचार – तो मला खेळवत असल्याचा – मी केला नव्हता.

“सॉरी. लक्षात नाही आलं. अजून एक गोष्ट आहे.”

“काय?”

हे तिने इतक्या पटकन आणि तुटकपणे विचारलं की एक क्षणभर कोणी तिसरा माणूस आमच्यातलं हे संभाषण ऐकतोय की काय असं मला वाटलं.

“एकतर तो टाइम्सची डेटा सिस्टिम हॅक करून आत घुसलाय किंवा मग त्याने कुठलातरी स्पायवेअर प्रोग्रॅम सिस्टिममध्ये ठेवलाय.”

“कशावरून?”

“त्याला उद्याच्या सगळ्या स्टोरीज माहित आहेत. मी त्यातली एकही स्टोरी लिहित नाहीये, हेही.”

“हे आम्ही ट्रेस करू शकतो,” ती थोडी बऱ्या मूडमध्ये आली.

“टाइम्स, आणि एफ.बी.आय.ला त्यांची डेटा सिस्टिम तपासू देणार? वाट बघ. आणि जर हा माणूस तू म्हणालेलीस तेवढा सराईत असेल तर त्याचा स्पायवेअर प्रोग्रॅम एकतर आपल्याला शोधून तरी काढता येणार नाही, किंवा मग तो स्वतःच त्या प्रोग्रॅमला नष्ट करेल, म्हणजे आपण त्याच्यामागे जाऊ शकणार नाही.”

“पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? मी इथल्या मीडिया ऑफिसमधल्या कुणाला तरी टाइम्सला विनंती करायला सांगते.”

“चालेल. कदाचित त्याच्यामुळे प्रसारमाध्यमं आणि एफ.बी.आय. यांच्यात सहकार्याचं नवं युग सुरु होऊ शकतं. तुझ्या-माझ्यासारखंच पण जरा मोठ्या पातळीवर.”

आम्ही दोघेही हसलो.

“तुझ्याइतका आशावादी माणूस मी अजून बघितलेला नाही जॅक. अच्छा, तू आता साकार्याबद्दल बोललाच आहेस, तर मी इथून कोणालातरी तुझा फोन घ्यायला पाठवू का?”

“हो. तू स्वतःलाच का नाही पाठवत पण?”

“मी? शक्य नाही. मी एका दुसऱ्या कामात आहे.”

मी काहीच बोललो नाही. मग एकदम माझ्या डोक्यात विचार आला.

“तू... तू कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहेस का रॅशेल?”

“मला माहित नाहीये, पण मला जायला पाहिजे आता.”

“तू त्या टास्क फोर्सवर आहेस? ते तुला या केसवर काम करू देताहेत?”

“सध्यातरी हो.”

“ठीक आहे मग.”

तिने मला ज्या एजंटला माझा फोन घ्यायला ती पाठवणार होती त्याचं नाव आणि बॅज नंबर सांगितला. तो मला अर्ध्या तासात ग्लोब लॉबीमध्ये भेटणार होता. आता आम्हा दोघांचीही आपापल्या कामावर परत जायची वेळ आली होती.

“माझ्यासाठी थांब रॅशेल,” मी म्हणालो.

ती एक क्षणभर काहीच बोलली नाही, आणि मग म्हणाली, “तू सुद्धा!”

आम्ही दोघांनीही कॉल संपवला. गेल्या छत्तीस तासांत जरी अनेक अतर्क्य, अनाकलनीय आणि वाईट गोष्टी घडल्या होत्या, अँजेलाचा खून झाला होता आणि एका सीरिअल किलरने मला आत्ताच धमकी दिलेली होती – तरीही मला बरं वाटावं अशी एक गोष्ट झाली होती.

पण तरीही काहीतरी बरोबर घडत नसल्याची एक अस्वस्थ करणारी जाणीव माझ्या मनात अजूनही होती.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी )

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

रषातु's picture

26 Jul 2015 - 10:46 pm | रषातु

I am the first...apratim. waiting for next part

भन्नाट. वाचतोय. पुभाप्र.

आतिवास's picture

26 Jul 2015 - 11:03 pm | आतिवास

कथानक वेगात पुढे चालले आहे.

मास्टरमाईन्ड's picture

26 Jul 2015 - 11:45 pm | मास्टरमाईन्ड

छान, उत्तम वेग आहे.
:( आता परत शनिवार रविवार साठी थांबायचं?

वॉल्टर व्हाईट's picture

27 Jul 2015 - 2:12 am | वॉल्टर व्हाईट

खतरनाक वेग पकडलाय कथानकाने. इंग्रजी पुस्तक वाचण्याचा मोह टाळतो आहे आणि पुढल्या भागाची वाट बघतोय.

सामान्य वाचक's picture

27 Jul 2015 - 6:53 am | सामान्य वाचक

अजुन ७ ८ भाग होतील ना?

अजया's picture

27 Jul 2015 - 8:52 am | अजया

वाचतेय.पुभालटाच!

अमृत's picture

27 Jul 2015 - 8:58 am | अमृत

पुढिल विकांताच्या प्रतिक्षेत :-)

प्रचेतस's picture

27 Jul 2015 - 9:27 am | प्रचेतस

अतिशय वाचनीय.

सतोंष महाजन's picture

27 Jul 2015 - 9:44 am | सतोंष महाजन

कथानकाने मस्त वेग घेतलाय. पुढच्या भागासाठी परत शनिवारची वाट पहावी लागेल!उत्सुकता शिगेला पोहचलीय.

पैसा's picture

27 Jul 2015 - 9:56 am | पैसा

सॉलिड थरारक होतंय हे.

नाखु's picture

27 Jul 2015 - 10:00 am | नाखु

वाचकांचा उपास सुटला!!

पुभाप्र.

प्रीत-मोहर's picture

27 Jul 2015 - 10:41 am | प्रीत-मोहर

मस्तच!!!

मोहन's picture

27 Jul 2015 - 2:40 pm | मोहन

भन्नाट ! लगे रहो.

झकासराव's picture

28 Jul 2015 - 3:16 pm | झकासराव

कसलं जबरी भन्नाट आहे...

मोहनराव's picture

28 Jul 2015 - 5:27 pm | मोहनराव

वाचतोय..

जुइ's picture

29 Jul 2015 - 2:35 am | जुइ

भाग १३ आणि १४ वाचले.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 12:09 pm | शाम भागवत