द स्केअरक्रो - भाग ‍१५

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
1 Aug 2015 - 9:40 am

द स्केअरक्रो भाग १४

द स्केअरक्रो भाग १५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसून अगदी लक्षपूर्वक सिक्युरिटी स्क्रीनकडे पाहात होता. दोघेजण जिनिव्हाला त्यांचे बॅजेस दाखवत होते. त्याने बॅजेसवर झूम इन करून ते कोणाकडून आलेले आहेत हे पाहण्याआधीच दोघांनीही बॅजेस परत खिशात ठेवून दिल्यामुळे ते नक्की कोणत्या एजन्सीकडून आलेले आहेत ते कार्व्हरला समजू शकलं नाही.

जिनिव्हाने तिच्यासमोरचा इंटरकॉम उचलला आणि तीन नंबर्स हलकेच दाबले.

ती मॅकगिनिसच्या ऑफिसमध्ये फोन करते आहे, हे त्याच्या लक्षात आलं. तिने तिचं बोलणं अगदी थोडक्यात संपवलं, इंटरकॉम खाली ठेवला आणि त्या दोघांनाही थोडा वेळ थांबायला सांगितलं. दोघेही तिथल्या आरामशीर सोफ्यावर बसले.
कार्व्हरच्या मनात भीती दाटून आली होती. गेल्या दोन दिवसांत त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीची त्याने मनात उजळणी केली आणि नक्की कुठे चूक झाली असेल ते शोधून काढायचा प्रयत्न केला. नाही, कुठेही चूक झालेली नाही, त्याचा प्लॅन एकदम व्यवस्थित आहे – तो स्वतःलाच सांगत होता. फ्रेडी स्टोन हाच एक प्रॉब्लेम होता, कच्चा दुवा म्हणता येईल असा आणि वेळ पडली तर कार्व्हरला त्याच्यापासून उद्भवणारा धोका समूळ नष्ट करण्यासाठी काही पावलं उचलावी लागणार होती.

त्याने परत एकदा स्क्रीनकडे लक्ष केंद्रित केलं. मॅकगिनिसची सहाय्यक योलांडा शॅवेझ आता रिसेप्शन लॉबीमध्ये आलेली होती आणि त्या दोघांशी हात मिळवत होती. दोघांनीही परत एकदा त्यांचे बॅजेस तिला दाखवले आणि मग त्यांच्यातल्या एकाने त्याच्या सूटच्या खिशातून काही घडी घातलेले कागद काढले आणि तिला दिले. तिने ते वाचले आणि त्याला परत दिले, आणि त्या दोघांनाही तिच्या पाठोपाठ यायला सांगितलं. कार्व्हर अर्थातच ते कुठे जात आहेत, ते पाहू शकत होताच. ते अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसच्या दिशेने जात असल्याचं त्याने पाहिलं आणि तो जागेवरून उठला. सर्वप्रथम त्याने त्याच्या ऑफिसचा दरवाजा बंद आहे की नाही ते पाहिलं आणि मग आपल्या जागेवर परत येऊन त्याने रिसेप्शनचा नंबर डायल केला.

“जिनिव्हा, कार्व्हर बोलतोय. मी आत्ता कॅमेरा फीड बघत होतो तेव्हा मला हे दोघेजण आलेले दिसले. त्यांनी तुला बॅजेस दाखवलेले पाहिले मी. कोण आहेत हे लोक?”

“ते एफ.बी.आय.एजंट्स आहेत.”

आपलं हृदय बंद पडतंय की काय असं कार्व्हरला एक क्षणभर वाटलं पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. इकडे जिनिव्हा बोलत होती, “ते म्हणाले की त्यांच्याकडे सर्च वॉरंट आहे. मी ते पाहिलं नाही, पण त्यांनी ते योलांडाला दाखवलं.”

“सर्च वॉरंट? कशासाठी?”

“काही कल्पना नाही मि.कार्व्हर.”

“कोणाला भेटायचंय त्यांना?”

“ते काहीच सांगितलं नाही त्यांनी. ते फक्त म्हणाले की इथला मुख्य अधिकारी कोण आहे? मग मी मि. मॅकगिनिसना फोन केला आणि योलांडा या लोकांना भेटायला इथे आली.”

“ओके. थँक्स जिनिव्हा.”

त्याने इंटरकॉम खाली ठेवला आणि परत एकदा समोरच्या पडद्याकडे पाहायला सुरुवात केली. बघत असतानाच त्याने त्याच्या समोरच्या कीबोर्डवर काही कमांड्स टाईप केल्या. त्यामुळे जरा वेगळे कॅमेरा अँगल्स दिसायला सुरुवात झाली. कार्व्हरने सगळे अँगल्स एकाच पडद्यावर मल्टीप्लेक्स पद्धतीने बघायला सुरुवात केली. हे कॅमेरे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसच्या केबिन्सच्या छतांमध्ये अगदी बेमालूमपणे लपवलेले होते. पाहणाऱ्याला वाटलं असतं की तो स्मोक डिटेक्टर्सकडे पाहतोय पण त्यांच्यामागे कॅमेरे लपवलेले आहेत हे कोणालाच माहित नव्हतं, अगदी मॅकगिनिसलाही नाही. तिथे तितक्याच शिताफीने लपवलेले माईक्स बोलणाऱ्यांचा आवाजही कार्व्हरपर्यंत पोचवत असत.

मघाशी जिनिव्हाबरोबर बोलत असलेले एफ.बी.आय.एजंट्स कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या डेक्लॅन मॅकगिनिसच्या ऑफिसमध्ये शिरताना कार्व्हरने पाहिलं. त्याने माऊसवर एक क्लिक केल्यावर संपूर्ण पडद्यावर मॅकगिनिसचं ऑफिस दिसायला लागलं. ह्या अँगलमुळे कार्व्हरला त्या एजंट्सचे चेहरे दिसत नव्हते कारण त्यांची पाठ कॅमेऱ्याकडे होती. योलांडा त्यांच्या उजवीकडे बसली असल्यामुळे तिचा चेहरा त्याला एका बाजूने दिसत होता. पण मॅकगिनिसचा चेहरा मात्र त्याला पूर्णपणे दिसत होता.

आलेल्या दोघाही एजंट्सबरोबर हस्तांदोलन करून मॅकगिनिस त्याच्या खुर्चीवर बसला. एजंट्सपैकी एक गोरा आणि दुसरा काळा होता. त्यांनी त्यांची नावंही सांगितली. रिचमंड आणि बँटम.

“तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे आमच्या कंपनीच्या संदर्भातलं?”

“होय सर,” बँटम म्हणाला.

त्याने त्याच्या सूटच्या खिशातून मघाशी योलांडाला दिलेले कागद काढले आणि मॅकगिनिसला दिले.

“तुम्ही trunkmurder.com नावाची एक वेबसाईट होस्ट करताय आणि त्याबद्दल तुम्हाला असलेली सर्व माहिती तुम्ही आम्हाला द्यावी अशी आमची विनंती आणि अपेक्षा आहे.”

मॅकगिनिसने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो त्या कागदांवर जे काही लिहिलेलं होतं ते लक्षपूर्वक वाचत होता. कार्व्हर अस्वस्थ झाला. त्या वॉरंटमध्ये काय लिहिलंय आणि एफ.बी.आय.च्या लोकांना किती माहिती आहे हे जाणून घेणं त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. त्याने दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो याच्यासाठी तयार होता, नव्हे, त्याला याची अपेक्षा होती. त्याला एफ.बी.आय.च्या कार्यपद्धतीबद्दल माहित होतं पण एफ.बी.आय.ला त्याच्याविषयी काहीही माहिती नव्हती. तिथून त्याला सुरुवात करता आली असती.

त्याने कॅमेरा फीड बंद केलं आणि त्याच्या डेस्कचा एक ड्रॉवर उघडला आणि दर महिन्याला त्याच्या स्टाफकडून मिळणारे सर्व्हर व्हॉल्युम रिपोर्ट्स बाहेर काढले. गेल्या आठवड्यातच त्याला ते मिळाले होते. जोपर्यंत मॅकगिनिस मागत नसे, तोपर्यंत हे रिपोर्ट्स कार्व्हरकडेच पडून राहात असत, आणि मॅकगिनिसने मागितल्यावरही कार्व्हरचा एखादा इंजिनीअर सिगरेट ओढण्यासाठी बाहेर जाता जाता ते देऊन जात असे. पण यावेळी कार्व्हर स्वतः ते रिपोर्ट्स घेऊन मॅकगिनिसकडे जाणार होता.

रिपोर्ट्स बाहेर काढल्यावर कार्व्हरने ते जरा चाळले आणि मग ते घेऊन तो ऑफिसबाहेर पडला आणि त्याने त्याचं ऑफिस बंद केलं. कंट्रोल रूममध्ये त्यावेळी कर्ट आणि मिझ्झू हे दोन इंजिनिअर्स होते. त्यांना त्याने तो कुठे जातोय ते सांगितलं आणि मग तो बंकरच्या बाहेर पडला. त्याच्या सुदैवाने फ्रेडी स्टोनची शिफ्ट संध्याकाळची होती, कारण तो आता परत कधीच इथे कामावर येण्याची शक्यता नव्हती.

एफ.बी.आय.ची कार्यपद्धती कार्व्हरला चांगलीच माहित होती. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याचं नाव आणि इतर माहिती घेतली असती आणि त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेसबरोबर ती पडताळून पाहिली असती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असतं की फ्रेडी स्टोन हा प्रत्यक्षात फ्रेडी स्टोन नसून कोणीतरी वेगळाच आहे, आणि मग ते त्याच्या मागावर परत आले असते. कार्व्हरला हे कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नव्हतं. फ्रेडीसाठी त्याच्याकडे एक वेगळाच प्लॅन होता.

लिफ्टने कार्व्हर वरच्या ऑफिसमध्ये गेला आणि रिपोर्ट चाळत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये शिरला. त्याची नजर त्याने हातातल्या रिपोर्ट्सवरच ठेवली होती. चालता चालता सहजच त्याने मॅकगिनिसच्या ऑफिसकडे पाहिलं. ऑफिसचा दरवाजा उघडाच होता आणि ऑफिसमध्ये मॅकगिनिसबरोबर ते एफ.बी.आय एजंट्स होते. तो वळला आणि मॅकगिनिसच्या ऑफिसबाहेर बसलेल्या एका सेक्रेटरीच्या टेबलवर झुकला आणि त्याने ते रिपोर्ट्स तिच्या टेबलावर ठेवले.

“डेक्लॅनची मीटिंग संपली की हे त्याला दे,” तो म्हणाला.

तिथून निघून जाण्यासाठी तो वळला. तो तिच्या टेबलावर झुकल्यामुळे मॅकगिनिसचं लक्ष त्याच्याकडे गेलं असणार याची त्याला खात्री होती. पण तो अगदी ऑफिसच्या दरवाज्याजवळ जाईपर्यंत मॅकगिनिसने त्याला हाक मारली नाही.

“वेस्ली?”

आपला चेहरा प्रयत्नपूर्वक निर्विकार ठेवत कार्व्हर वळला. मॅकगिनिस त्याला बोलवत होता.

कार्व्हर जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये शिरला तेव्हा त्याने दोन्ही एफ.बी.आय. एजंट्सकडे पाहून स्मित केलं पण योलांडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ती त्याला अजिबात आवडत नसे. त्याच्यासाठी बसायला जागा नव्हती पण त्याने त्याला काही फरक पडत नव्हता. उलट त्याच्यामुळे त्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव व्यवस्थित दिसत होते.

“वेस्ली, एजंट्स बँटम आणि रिचमंड, फिनिक्स फील्ड ऑफिस, एफ.बी.आय. मी आत्ता तुला फोन करणारच होतो इथे येण्यासाठी.”

कार्व्हरने दोघाही एजंट्सशी हस्तांदोलन केलं.

“वेस्ली इथे बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळतो,” मॅकगिनिस म्हणाला, “तो आमचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर तर आहेच आणि त्याशिवाय आमचा चीफ थ्रेट इंजिनिअरही आहे. आमची इथली सगळी सिस्टिम ही त्याच्याच संकल्पनेनुसार तयार झालेली आहे.”

“काय झालंय?” कार्व्हरला ही बडबड ऐकायची इच्छा नव्हती.

“कदाचित,” मॅकगिनिस म्हणाला, “हे एजंट्स मला असं सांगताहेत की आपण एक वेबसाईट होस्ट करतोय आणि त्यांना त्या वेबसाईटबद्दल जे काही आपल्याला माहित आहे ते सगळं हवंय. त्यांच्याकडे सर्च वॉरंट आहे आणि त्यांना त्या साईटच्या संदर्भातली सगळी कागदपत्रं आणि रेकॉर्ड्स बघायचे आहेत.”

“दहशतवाद?”

“ते आपल्याला त्याबद्दल काहीही सांगू शकत नाहीयेत.”

“मग मी डॅनीला बोलवू का?”

“नाही. त्यांना सध्यातरी डिझाईन आणि होस्टिंगमधल्या कुणाशीही बोलायचं नाहीये.”

कार्व्हरने त्याच्या दोन्ही हातांचे तळवे त्याच्या पांढऱ्या लॅब कोटच्या खिशांत ठेवले. असं केल्याने लोकांना आपण एकदम गंभीरपणे विचार करतोय असं वाटतं हे त्याला माहित होतं. मग तो सरळ एजंट्सकडेच वळला.

“डॅनी ओ’कॉनर आमच्या डिझाईन आणि होस्टिंग विभागाचा प्रमुख आहे. त्याच्याशी बोलायला लागेल आपल्याला. तुम्हाला तो कुठल्यातरी दहशतवादी कारवाईत सहभागी आहे असा तर संशय नाहीये ना?”

आपण जे बोलतोय त्याची अविश्वसनीयता दाखवण्यासाठी तो मुद्दामहून जोरात हसला. दोघा एजंट्सपैकी एजंट बँटमने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, “नाही. आम्हाला अजिबात असं काहीही वाटत नाहीये. आम्ही इथे फक्त माहिती गोळा करायला आलोय आणि जेवढ्या कमी लोकांना याबद्दल माहिती असेल तेवढं बरं. विशेषतः तुमच्या कंपनीच्या होस्टिंग डिपार्टमेंटमधले लोक.”

हे ऐकल्यावर कार्व्हरची नजर एका क्षणासाठी योलांडावर स्थिरावली पण कोणत्याही एजंटने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.

“कोणती वेबसाईट?”

“trunkmurder.com,” मॅकगिनिस म्हणाला, “मी आत्ताच चेक केलं आणि ही साईट एका पॅकेज डीलच्या स्वरुपात आलीय आपल्याकडे. सीअॅटलमधली कुठलीतरी कंपनी आहे.”

कार्व्हरने समजल्याप्रमाणे मान डोलावली. त्याने प्रयत्नपूर्वक त्याचा चेहरा शांत ठेवला होता. या परिस्थितीसाठी त्याच्याकडे प्लॅन तयार होता. तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याचं कारणच ते होतं. त्याच्याकडे नेहमीच प्लॅन तयार असायचा.

त्याने मॅकगिनिसच्या डेस्कवर असलेल्या काँप्युटरकडे बोट केलं, “आपण आत्ता हा काय प्रकार आहे ते पाहू या की त्याच्यामुळे....”

“आत्ता जर तसं नाही केलं तर बरं होईल,” बँटम म्हणाला, “आम्हाला वाटतंय की त्यामुळे जो कोणी याच्यामागे आहे तो सावध होईल. ही साईट पूर्णपणे कार्यरत नाहीये. त्याच्यावर कुठलीही माहिती वगैरे नाहीये. आम्हाला असं वाटतंय की ही साईट एक आयपी ट्रॅप आहे. एक कॅप्चर साईट.”

“ आणि जर आपण ती साईट बघायचा प्रयत्न केला तर आपला आयपी अॅड्रेस या माणसाला मिळेल आणि तो सावध होईल,” कार्व्हर म्हणाला.

“बरोबर.”

“मी ते वॉरंट बघू शकतो का?”

“जरूर!”

मॅकगिनिसने वॉरंट बँटमला परत दिलं होतं. ते त्याने कार्व्हरच्या हातात दिलं. ते वाचायला कार्व्हरने सुरुवात केली. आपल्या चेहऱ्यावर त्याने प्रयत्नपूर्वक कुठलेही भाव येऊ दिले नव्हते, आणि आपण आपल्या नकळत एखादं गाणं गुणगुणायला सुरुवात करणार नाही याकडेही तो लक्ष ठेवून होता.

जगातल्या कुठल्याही सर्च वॉरंटचं एक वैशिष्ट्य असतंच असतं – त्यावर न लिहिलेली माहिती ही नेहमीच त्यावर लिहिलेल्या माहितीपेक्षा जास्त महत्वाची असते. हे वॉरंटही त्याला अपवाद नव्हतं. एफ.बी.आय.ने एक मदतीस अत्यंत तत्पर असलेला फेडरल जज शोधून काढलेला आहे, हे तर समजत होतंच. वॉरंटची भाषा मुद्दामहून ढोबळ ठेवलेली होती. त्यानुसार एफ.बी.आय.ला एका इंटरनेट वापरणाऱ्या अज्ञात माणसाबद्दल किंवा माणसांबद्दल तपास करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. हा तपास अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी होणार होता, किंबहुना त्यामुळेच तो एफ.बी.आय.च्या अखत्यारीत येत होता, आणि त्याच्या अंतर्गत माहितीची चोरी आणि फसवणूक या गुन्ह्यांचा तपास केला जाणार होता. खून हा शब्दही वॉरंटमध्ये वापरलेला नव्हता. पण ही साईट आणि तिच्याबद्दलची पूर्ण माहिती – ती कोण, कुठे, कशी चालवतंय आणि वापरतंय – एफ.बी.आय.ला हवी होती.

पण त्यांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसणार आहे, हे फक्त एकट्या कार्व्हरला माहित होतं.

“ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो,” तो म्हणाला, “ही कोणती कंपनी आहे सीअॅटलमधली?”

“सी जेन रन,” योलांडा म्हणाली.

कार्व्हरने तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. ती तिथे काय करतेय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणभर तरळून गेले. योलांडालाही ते जाणवलं.

“मि. मॅकगिनिसनीच मला त्याबद्दल माहिती काढायला सांगितलं,” ती म्हणाली, “त्यावरून मी हे सांगतेय.”

वेल्, काहीतरी महत्वाचं काम करतेस तू. नुसतीच शोभेची बाहुली नाहीयेस: कार्व्हरच्या मनात हा विचार येऊन गेला.

त्याने आता आपलं संपूर्ण लक्ष एजंट्सकडे केंद्रित केलं आणि तो असा उभा राहिला की त्यामुळे त्याची पाठ तिच्याकडे झाली आणि ती या संभाषणातून पूर्णपणे अलग झाली.

“ठीक आहे,”तो म्हणाला, “ही माहिती तुम्हाला देतो मी.”

“किती वेळ लागेल तरी पण?” बँटमने विचारलं.

“तुम्ही एक काम का नाही करत?आमचा कॅफेटेरिया आहे तिथे जाऊन गरमागरम कॉफी घ्या. ती तुम्ही पिऊ शकाल एवढी गार होईपर्यंत मी ही माहिती घेऊन येतो.”

मॅकगिनिस मोठ्याने हसला, “काय वेस्ली! तू कोणाचीही चेष्टा करतोस! एजंट्स, त्याच्या म्हणण्याचा अर्थ हां आहे की आमच्याकडे कॅफेटेरिया वगैरे काहीही नाही. आमच्याकडे कॉफी मशीन्स आहेत जी कॉफी पुन्हापुन्हा गरम करतात.”

“कॉफीबद्दल धन्यवाद,”बँटम म्हणाला, “पण आम्हाला या वॉरंटची अंमलबजावणी होताना प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची गरज आहे.”

कार्व्हरने समजल्याप्रमाणे मान डोलावली, “तसं असेल तर मग माझ्याबरोबर या आणि आपण ही माहिती एकत्रच बघू. पण मग एक प्रॉब्लेम आहे.”

“काय?”

“तुम्हाला या वेबसाईटच्या संदर्भातली सगळी माहिती तर हवी आहे पण तुम्ही डिझाईन आणि होस्टिंगमधल्या कुणालाही यात गुंतवू नका असं म्हणताय. कसं होणार मग? मी डॅनी ओ’कॉनरबद्दल तुम्हाला खात्री देतो. त्याचा दहशतवाद तर सोडाच, कुठल्याच बेकायदेशीर गोष्टींशी संबंध नाहीये. तुम्हाला या साईटबद्दल जर पूर्ण माहिती हवी असेल तर ती तो तुम्हाला अगदी तपशीलवार देईल.”

बँटमनेही मान डोलावली, “आपण एका वेळी एकच गोष्ट करू या. जेव्हा आपल्याला मि. ओ’कॉनरची गरज भासेल तेव्हाच आपण त्यांना बोलवू.”

हे आपल्या मनाविरुद्ध होत आहे आणि आपण नाईलाजाने ते स्वीकारत आहोत असे भाव कार्व्हरने त्याच्या चेहऱ्यावर आणले, “ठीक आहे एजंट बँटम. तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या.”

“थँक यू.”

“मग तुम्ही माझ्याबरोबर बंकरमध्ये येताय?”

“हो.”

दोघेही एजंट्स आणि योलांडा उठून उभे राहिले. मॅकगिनिसही उभं राहिला.

“गुड लक एजंट्स,”तो म्हणाला, “तुम्ही यामागे जे कोण लोक आहेत त्यांना लवकरच अटक कराल अशी अपेक्षा करतो. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करूच.”

“थँक यू,” रिचमंडने पहिल्यांदाच तोंड उघडलं.

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमधून ते बाहेर पडत असताना योलांडा एजंट्सच्या मागोमाग येत असल्याचं कार्व्हरच्या लक्षात आलं. एजंट्स बाहेर पडेपर्यंत त्याने दरवाजा धरून ठेवला होता पण जेव्हा तिची बाहेर पडायची वेळ आली तेव्हा त्याने तिला थांबवलं.

“याच्या पुढे आम्ही बघून घेऊ. धन्यवाद,” तो म्हणाला आणि तिच्या तोंडावर त्याने दरवाजा बंद केला.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी )

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

खेडूत's picture

1 Aug 2015 - 9:50 am | खेडूत

रोचक...
वाचत आहे.

नाखु's picture

1 Aug 2015 - 10:27 am | नाखु

वाढत आहे. पुन्हा अनिवार्य शनीवार प्रतीक्षा !

तांत्रीकाडाणी नाखु

काय राव.. खूप छोटा भाग टाकलात..

मोहन's picture

1 Aug 2015 - 10:56 am | मोहन

अप्रतीम सुरु आहे.
पु.भा. प्र.

आता शिकारी कोण आणि शिकार कोण..
भारी उत्कण्ठावर्धक वळण. :)

पद्मावति's picture

1 Aug 2015 - 1:41 pm | पद्मावति

मस्तं चाललीय कथा.

अजया's picture

1 Aug 2015 - 3:21 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र.

मास्टरमाईन्ड's picture

3 Aug 2015 - 3:13 pm | मास्टरमाईन्ड

एकच भाग?
काय राव... हे म्हणजे स्कॉच + चिकन + हैद्राबादी चिकन बिर्याणी चा बेत सांगून बोलवायचं आणी फक्त चिकन वाढायचं.
;) बाकी कथेचा वेग, मसाला, लज्जत उत्तमच.
तुम्ही व्यग्र आहात हे मान्य. पण काय करणार? आठवड्यातून एकदाच थ्रिलर वाचायची संधी मिळतेय नां!

वा. छानच नेहमीप्रमाणे! पुभाप्र.

मोहनराव's picture

3 Aug 2015 - 5:44 pm | मोहनराव

छानच. पण जरा हा भाग लहान वाटला... पुभाप्र.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 12:27 pm | शाम भागवत