द स्केअरक्रो भाग ६ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली )
सोनी लेस्टर आणि मी वँडा सीसम्सच्या घरातून जेव्हा निघालो तेव्हा सगळी वस्ती जागी झालेली होती आणि कामात होती. मुलं शाळेतून घरी आलेली होती आणि ड्रग डीलर्स आणि त्यांची गिऱ्हाईकं आजचा सौदा करायला बाहेर पडलेली होती. पार्किंग लॉटस्, खेळण्याची मैदानं आणि दोन इमारतींमधली हिरवळ - सगळीकडे भरपूर लोक होते. मुलं आणि प्रौढ माणसं - दोघेही होते. इथे ड्रग्सचा धंदा हा एका ठिकाणी होत नसे. जो गिऱ्हाईक असेल त्याला त्याच्या गाडीतून इथे यावं लागायचं आणि त्याच्या गाडीवर आणि त्याच्यावर अनेक अदृश्य डोळे लक्ष ठेवून असायचे. जे लोक त्याच्या समोर यायचे तेही त्याला सरळसरळ हातात माल द्यायचे नाहीत तर इथल्या भूलभुलैयातून त्याला प्रत्यक्ष जिथे माल मिळेल तिथे पाठवायचे. जिथे प्रत्यक्ष विक्री व्हायची ते ठिकाण दररोज बदलत असे आणि अतिशय थोड्या लोकांना हे सगळे टप्पे माहित असत. त्यामुळे पोलिसांनी कोणालाही पकडलं तरी इथला धंदा चालूच राहायचा. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी या वस्तीची रचना केली होती त्यांना ही कल्पनाही नसेल की आपण एका अशा कॅन्सरला जन्म देत आहोत जो इथल्या लोकांना या ना त्या प्रकारे उध्वस्त करणार आहे. मी साऊथ ब्यूरोच्या अंमली पदार्थविरोधी पथकाबरोबर या भागात अनेक फेऱ्या मारल्या होत्या. तेव्हा हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळालं होतं.
आम्ही जेव्हा आमच्या गाडीपाशी पोचलो तेव्हा आम्हा दोघांच्याही माना खाली होत्या. अनेक लोक आमच्याकडे बघत असावेत याची मला खात्री होती त्यामुळे इकडेतिकडे कुठेही न बघता आम्ही आमच्या गाडीपाशी आलो. १९-२० वर्षांचा एक मुलगा आमच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या दरवाज्याला रेलून उभा होता. त्याच्या पायांत काळे बूट होते, निळी जीन्स होती. ती एवढी खाली आलेली होती की त्याची निळी अंडरवेअर मला अर्धवट दिसत होती. त्याचा पांढरा टी-शर्ट उन्हात चमकत होता. या वस्तीवर हुकुमत असलेल्या क्रिप्स गँगचा हा गणवेश होता.
" काय, कसं काय? " तो म्हणाला.
" ठीक, " लेस्टर म्हणाला, " आम्ही परत चाललोय. "
" अच्छा! पांडू? "
आयुष्यातला सर्वात विनोदी प्रसंग समोर घडल्यासारखा लेस्टर हसला.
" काहीतरी काय! आम्ही पेपरवाले आहोत."
निर्विकारपणे त्याने आपली कॅमेरा बॅग गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवली आणि तो ड्रायव्हरच्या दरवाज्यापाशी आला. हा पोरगा जागचा हलला नाही.
" बाजूला होणार का तू भाई? मला कामावर जाऊ दे . "
मी दुसऱ्या दरवाज्यापाशी उभा होतो. माझ्या पोटात जरा डचमळलं. जर काही अनावस्था प्रसंग येण्याची शक्यता असती तर आत्ताची वेळ अगदी योग्य होती. या मुलासारखेच कपडे घातलेले अजून काहीजण दूर उभे होते. ते त्याच्या एका हाकेवर आले असते, त्यांच्याकडे हत्यारंही असण्याची शक्यता होती.
त्या मुलाने हातांची घडी घातली आणि लेस्टरकडे रोखून पाहिलं.
" तुम्ही लोक मॉम्सशी काय बोलायला आलेलात, भाई? "
" अलोन्झो विन्स्लो, " मी माझ्या बाजूने म्हणालो, " आम्हाला असं वाटतंय की त्याने खून केलेला नाही आणि आम्ही खरं काय ते शोधून काढायचा प्रयत्न करतोय."
यावर तो वळला आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. " खरं की काय? "
मी मान डोलावली.
" हो. आम्ही तेच बघायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच मिसेस सीसम्सना भेटायला आम्ही आलो होतो."
" मग तिची आणि तुमची टॅक्सबद्दल तर वार्ता झालीच असेल ना! "
" टॅक्स? "
" हां. ती टॅक्स देते ना आपल्याला. इथे कोनचापण धंदा असून दे. सगळे आपल्यालाच टॅक्स देतात, भाई ! "
" काय सांगतोस? "
" मग? इथे जो कुणी पेपरवाला झो स्लो बद्दल वार्ता करायला येतो ना तो टॅक्स देतो. मी घेतो ना तुझ्याकडून आत्ता. "
" किती? "
" दिवसाला पन्नास डॉलर. "
मी हे माझ्या खर्चात टाकीन. नंतर डोरोथीने काही आरडाओरडा केला तर बघू. असा विचार करून मी खिशातून दोन वीसच्या आणि एक दहाची अशा तीन नोटा बाहेर काढल्या आणि त्याला दिल्या.
मी त्याला पैसे देताक्षणी तो दरवाजापासून दूर झाला. लेस्टर आत बसला आणि त्याने गाडी सुरु केली.
" तुम्ही लोक परत आले तर टॅक्स डबल हां ! "
आता मी हे सोडून द्यायला हवं होतं पण मला राहवलं नाही, " आम्ही तुमच्या मित्राला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, याने तुम्हाला काहीच फरक नाही पडत? "
त्या मुलाने त्याचा उजवा हात उंचावला आणि स्वतःच्या जबड्यावर ठेवला. त्याच्या बोटांच्या पेरांवर F-U-C-K या अक्षरांचा टॅटू होता. त्याचा डावा हातही त्याने मला दाखवला. त्यावर DA 50 असा टॅटू होता. मला माझं उत्तर मिळालं. इथे मित्रबित्र कोणीही नव्हते. प्रत्येकजण आलेल्या संधीचा फायदा उठवत होता.
मी गाडीत बसलो आणि लेस्टरने गाडी थोडी मागे घेतली. मी वळून पाहिलं तेव्हा तो पोरगा क्रिप वॉक करत होता. तो खाली झुकला आणि त्याने मी त्याला आत्ता दिलेल्या नोटांनी स्वतःचे बूट पॉलिश करायचा अभिनय केला. मग तो ताठ झाला आणि त्याने दोन्ही बुटांचे पुढचे आणि मागचे भाग एकमेकांना जुळवले. त्या इतर पोरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. मी माझी मनस्थिती सुधारण्यासाठी आमच्या या भेटीच्या सकारात्मक बाजूंवर विचार करायला सुरुवात केली. वँडा सीसम्सने मला या केसमध्ये संपूर्ण सहकार्य कबूल केलेलं होतं. माझ्या मोबाईल फोनवरून तिने विन्स्लोच्या वकिलाला, जेकब मेयरला फोन लावला होता आणि त्याला हे सांगितलं होतं की अलोन्झो अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या संदर्भातला कुठलाही कायदेशीर हक्क हा त्याची पालक म्हणून तिच्याकडे आहे आणि त्याअनुसार ती मला अलोन्झो विन्स्लोच्या केसचे सगळे कागदपत्रं पहायची परवानगी देत आहे. मेयर मला उद्या सकाळी भेटणार होता. त्याच्याकडे पर्याय नव्हता. एक तर तो अलोन्झोसाठी सरकारने दिलेला वकील होता. म्हणजे तो पब्लिक डिफेंडरच्या ऑफिसमध्ये काम करत असणार आणि शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडून स्वतःची प्रॅक्टिस सुरु करण्याची संधी शोधत असणार. मी वँडाला हेही सांगितलं होतं की जर मेयरने आपल्याला सहकार्य नाही केलं तर अनेक वकील उभे आहेत जे ही केस फुकट लढायला तयार होतील. त्यामुळे माझ्याबरोबर काम करून जी प्रसिद्धी मिळते आहे ती घेणं किंवा ही केस सोडून देणं ह्या दोनच गोष्टी मेयर आता करू शकत होता. वँडाने मला सिल्मार ज्युवेनाइल हॉल किंवा रिमांड होममध्ये जाऊन अलोन्झोची मुलाखत घ्यायलाही परवानगी दिली होती. मी आता उद्या मेयरकडून विन्स्लोची फाईल घेऊन तिचा नीट अभ्यास करणार होतो. त्याच्या मुलाखतीच्या वेळी या अभ्यासाचा उपयोग होणार होता. त्याची मुलाखत हा माझ्या स्टोरीचा सर्वात महत्वाचा भाग होता.
एकूण काय तर रोडिया गार्डन्समध्ये जाऊन माझा फायदाच झाला होता. पन्नास डॉलर्सचा भुर्दंड पडला होता, तरीही. ही स्टोरी आता प्रेन्डोला कशी सांगावी या विचारात होतो तेवढ्यात लेस्टरने माझ्या विचारांत व्यत्यय आणला.
" मला कळतंय तू काय करतो आहेस ते! " तो म्हणाला.
" काय करतोय मी ? "
" ही बाई कदाचित मूर्ख असेल आणि या पोराचा वकील पेपरमध्ये नाव येण्यासाठी हपापलेला असेल पण मी नाही. "
" कशाबद्दल बोलतोयस तू ? "
" तू तिला असं भासवलंस की तू तिच्या नातवाला निर्दोष म्हणून सिद्ध करशील आणि बाहेर काढशील. पण प्रत्यक्षात तू त्याच्या उलट करणार आहेस. तू त्यांचा वापर करून या केसमधल्या अगदी आतल्या गोष्टी खणून काढणार आहेस. मग तू जी स्टोरी लिहिशील त्यात एक सोळा वर्षांचा मुलगा कसा थंड रक्ताचा खुनी झाला त्याचं अगदी रसभरीत वर्णन असेल. शेवटी एखाद्याला निर्दोष शाबित करून बाहेर काढणं तर कुठलाही आलतूफालतू पेपर पण करतो रे पण एखाद्या खुन्याच्या मनातले विचार लोकांपर्यंत पोचवणं ? तो कसा काय खुनी बनला हे लोकांना सांगणं? ही म्हणजे पुलित्झर स्टोरी झाली ना भाई. "
मी अवाक् झालो. लेस्टरने मला बरोबर पकडलं होतं.
" मी तिला या केसमधली खरी गोष्ट काय आहे ते शोधून काढेन असं सांगितलंय. ते आता कुठे जाईल ते मला काय ठाऊक? "
" बुलशिट! तू तिचा वापर करतो आहेस कारण आपला वापर होतो आहे हे समजण्याइतकी अक्कल तिला नाहीये. तिचा नातूही जर तेवढाच मूर्ख असेल तर तोही तुला स्वतःचा वापर करू देईल. आणि हे तर सांगायची गरजच नाही की त्याचा वकील फुकट प्रसिद्धी मिळावी म्हणून त्याचा बळी अगदी आनंदाने देईल. तुला खात्री आहे हे असंच होईल, हो की नाही ? "
मी यावर काहीही उत्तर दिलं नाही आणि बाहेर बघत राहिलो. माझा चेहरा आणि मान रागाने लाल झाल्याचं मला जाणवलं. पण हा राग नक्की कशाचा होता? पकडलं गेल्याचा?
" पण हे सगळं ठीक आहे, " लेस्टर म्हणाला.
मी वळलो आणि त्याच्याकडे पाहिलं.
" तुला काय पाहिजे सोनी? "
" या स्टोरीचा एक भाग. बस, अजून काही नाही. आपण एकत्र काम करू. मी तुझ्याबरोबर सिल्मारला येईन, कोर्टातसुद्धा येईन. या स्टोरीची सगळी फोटोग्राफी मी करेन. जेव्हा कधी तुला फोटोची गरज असेल, तू माझं नाव दे. फोटो असले की स्टोरीला पण वजन येतं ना. विशेषतः सबमिशनच्यावेळी. "
तो पुलित्झर पारितोषिकाच्या संदर्भात बोलत होता.
" हे बघ, " मी त्याला म्हणालो, " मी अजून माझ्या एसला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. तू फार पुढचा विचार करतो आहेस. मला हेही माहित नाही की -"
" ते या स्टोरीवर उड्या मारतील आणि तुलाही हे माहित आहे. तुला त्यांनी अशी धासू स्टोरी करण्यासाठीच मोकळं सोडलेलं आहे. मलाही सोडतील. कोणास ठाऊक, कदाचित आपल्याला दोघांनाही बक्षीस मिळेल. तू जर पुलित्झर मिळवलंस तर मग तुला कोणीही हात नाही लावू शकत. "
" तू फारच दूरची गोष्ट करतो आहेस सोनी. हा शुद्ध वेडेपणा आहे. शिवाय, माझी नोकरी गेलेली आहे. या शुक्रवारीच. माझ्या हातात शेवटचे १२ दिवस आहेत. पुलित्झरचं काय घेऊन बसलास? "
त्याच्या चेहऱ्यावर माझी नोकरी गेल्याची बातमी ऐकून आश्चर्य पसरलं. मग त्याने परत एकदा मान डोलावली.
" मग ही तुझी शेवटची स्टोरी आहे. तू त्यांना एक मजबूत थप्पड मारून जाणार आहेस. तू नसलास तरी तुझी स्टोरी इतकी जबरदस्त आहे की त्यांना ती स्पर्धेत उतरवावीच लागेल. मग तू तेव्हा इथे काम करत नसलास तरी! "
मी यावर काहीच बोललो नाही. माझ्या मनातले विचार कोणाला इतक्या सहजपणे समजू शकतात हा धक्का खूपच मोठा होता. मी परत खिडकीकडे वळलो. फ्री वे इथे थोडा उंचावरून जात होता. या उंचीवरून मला अनेक घरं मागे जाताना दिसत होती. बऱ्याच घरांच्या छपरांवर निळ्या रंगाची ताडपत्री टाकलेली होती. तुम्ही दक्षिण एल. ए. च्या जेवढे जवळ जाता तेवढी निळी ताडपत्री टाकलेली घरं जास्त दिसतात.
" काहीही असलं तरी मी या स्टोरीमध्ये आहे " सोनी लेस्टर म्हणाला.
########################################################
मी आता माझ्या एसबरोबर ह्या स्टोरीबद्दल चर्चा करायला तयार होतो. याचा अर्थ मी आता अधिकृतपणे या स्टोरीवर काम करु शकलो असतो आणि सगळ्यांना तसं सांगूही शकलो असतो आणि प्रेंडरगास्ट या स्टोरीबद्दल संपादकांच्या मीटिंगमध्ये बोलू शकला असता. जेव्हा मी न्यूजरुममध्ये परत आलो तेव्हा तो त्याच्या टेबलापाशी होता आणि घाईघाईने काहीतरी टाईप करत होता.
" प्रेन्डो, तुझ्याकडे एक मिनिट वेळ आहे का? "
त्याने मानही वर केली नाही, " आत्ता नाही जॅक! मला चार वाजताच्या मीटिंगचा अजेंडा बनवायचाय. तुझ्याकडे उद्यासाठी अँजेलाच्या स्टोरीशिवाय काही आहे? "
" नाही. मी जरा लांब पल्ल्याच्या स्टोरीबद्दल बोलतोय. "
आता प्रेंडो चक्रावला. ज्याच्या नोकरीचे शेवटचे बारा दिवस राहिले आहेत तो किती लांब पल्ल्याची स्टोरी करु शकतो?
" एवढी लांब पल्ल्याची पण नाहीये ही स्टोरी. आपण नंतर बोलू किंवा उद्या बोलू. अँजेलाने तिची स्टोरी फाईल केली का? "
" नाही अजून. मला वाटतं ती तुझ्यासाठी थांबली आहे. तू आत्ता ते केलंस तर बरं होईल. तिची स्टोरी एकदा नजरेखालून घाल. मला वेब एडिशनला द्यायला लागेल. त्याआधी तू पाहिलंस तर..."
" येस बाॅस! "
" आपण नंतर बोलू किंवा मग तू इमेल कर मला. "
मी वळलो आणि आमच्या न्यूजरुमवरून एक नजर फिरवली. एखाद्या फुटबाॅल मैदानाएवढ्या आमच्या न्यूजरुममध्ये अँजेला कुठे बसली आहे हे मला माहीत नव्हतं पण माझी खात्री होती की ती सगळे एस बसतात त्यापासून कुठेतरी जवळच असेल. जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुमची जागा ही एसच्या आणि इतर संपादकांच्या जवळच असते. टाईम्समध्ये पहिल्यापासून ही पद्धत होती. अगदी दूर बसणारे लोक सहसा अनुभवी रिपोर्टर्स असायचे. त्यांच्यावर देखरेख करण्याची आवश्यकता नसायची.
मला अशाच एका क्युबिकलमध्ये सोनेरी केस दिसले. मी तिथे गेलो. आमच्याकडे सोनेरी केस असलेली नवीन रिपोर्टर अँजेलाच होती.
" काय चाललंय? "
तिने दचकून मागे पाहिलं.
" साॅरी. माझी तुला घाबरवायची इच्छा नव्हती. "
" नाही, ठीक आहे. मी हे वाचण्यात एवढी रंगून गेले की..."
" तुझी स्टोरी आहे का ही? "
तिचा चेहरा लाल झाला. माझ्या लक्षात आलं की तिने तिचे केस मागे बांधले होते आणि त्यात पेन्सिल खोचली होती. त्यामुळे ती नेहमीपेक्षा जास्त सेक्सी दिसत होती.
" नाही. ही अर्काईव्हजमधली स्टोरी आहे. तुझ्याबद्दल आणि पोएटबद्दल. अफलातून आहे. माझ्या अंगावर शहारे आले वाचून! "
मी आता स्क्रीनकडे जरा निरखून पाहिलं. ती वाचत असलेली स्टोरी बारा वर्षांपूर्वीची होती. तेव्हा मी डेनव्हरच्या राॅकी माऊंटन न्यूजमध्ये काम करत होतो. त्यावेळी या सीरियल किलरवर मी ही स्टोरी केली होती. डेनव्हर ते न्यूयॉर्क आणि तिथून एल्.ए. - म्हणजे जवळजवळ संपूर्ण देश फिरलो होतो तेव्हा. माझ्या पत्रकारितेचाच नव्हे तर आयुष्याचा तो उत्कर्षबिंदू होता. आणि आता मला त्याची आठवणही नको होती.
" हो. चांगली स्टोरी होती. तुझ्या स्टोरीचं काय झालं? "
" ती जी एफ.बी.आय. एजंट होती, जिच्याबरोबर तू या केसवर काम केलं होतंस - रॅशेल वाॅलिंग - काय झालं तिचं पुढे? दुस-या एका स्टोरीत मी वाचलं की तिने तुझ्याबरोबर मर्यादा ओलांडली म्हणून तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. "
" ती आहे अजून एफ.बी.आय.मध्ये. इथे एल.ए.मध्येच आहे. अच्छा, आपण तुझी स्टोरी बघूया का? प्रेन्डो म्हणाला की त्याला ती लवकरात लवकर वेब एडिशनसाठी द्यायची आहे. "
" हो. ती स्टोरी कधीच झाली. मी तुझ्यासाठी थांबले होते. "
मी एक खुर्ची ओढून त्यावर बसलो आणि तिने लिहिलेली स्टोरी वाचून काढली. बारा इंचाची स्टोरी होती. न्यूज बजेटने त्याला दहा इंच जागा दिली होती. म्हणजे ती काटछाट करुन आठ इंचांवर आली असती. पण वेब एडिशनमध्ये तुम्हाला ही बंधनं पाळायची गरज नसते. कुठलाही चांगला रिपोर्टर बजेटपेक्षा जास्तच लिहील. त्याला किंवा तिला ही खात्री असते की स्टोरीत आणि लिखाणात इतकी ताकद नक्कीच आहे की सगळे संपादकीय अडथळे ओलांडून ती प्रकाशित होईल, मग ती कुठल्याही एडिशनसाठी असू दे.
सर्वप्रथम मी माझं नाव बायलाईनमधून काढलं.
" का जॅक? आपण एकत्र होतो ना ही स्टोरी करताना? "
" हो. पण स्टोरी लिहिली तू आहेस. बायलाईन तुलाच मिळायला पाहिजे. "
तिने तिचा हात माझ्या उजव्या हातावर ठेवला, " प्लीज. तुझ्याबरोबर बायलाईन मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. "
अशी काय ही पोरगी! मी तिच्याकडे जरा चक्रावून पाहिलं.
" अँजेला, ही बारा इंचांची स्टोरी आहे. डेस्क तिला बहुतेक आठ इंचांमध्ये गुंडाळून आतल्या पानांमध्ये कुठेतरी फेकून देईल. या शहरात अशा अनेक घटना घडतात आणि डबल बायलाईनची खरंच गरज नाही इथे."
" पण माझ्यासाठी ही पहिलीच मर्डर स्टोरी आहे आणि तीसुद्धा टाईम्ससाठी केलेली. प्लीज जॅक! मला माझ्याबरोबर तुझंही नाव या स्टोरीवर हवंय. " तिने अजूनही माझ्या हातावर ठेवलेला तिचा हात काढला नव्हता.
" ठीक आहे, " मी म्हणालो, " जशी तुझी इच्छा! " तिने तिचा हात काढला आणि मी माझं नाव बायलाईनमध्ये परत लिहिलं.
तिने परत एकदा तिचा हात माझ्या हातावर ठेवला, " याच हाताला गोळी लागली होती ना?"
" अं?"
" बघू दे ना! "
मी माझा हात तिला दाखवला. माझ्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामधल्या त्वचेवर अजूनही ती जखमेची खूण होती. आता इतक्या वर्षांनंतर ती खूण दगड लागून तडा गेलेल्या काचेसारखी दिसत होती. मी आणि पोएट - आमच्या झुंजीदरम्यान ही गोळी माझ्या हातातून आरपार जाऊन त्याला लागली होती.
" तू टाईप करताना अंगठा वापरत नाहीस हे आत्ता जाणवलं मला! " ती म्हणाली.
" त्या गोळीमुळे तिथल्या हाडाचा चुराडा झाला. डाॅक्टरांनी नंतर आॅपरेशन केलं, पण तो पूर्ववत नाहीच झाला.
" आता कसं वाटतं? "
" नाॅर्मल! एकदम व्यवस्थित! फक्त माझा अंगठा निकामी झालेला आहे. मला त्याच्याकडून जे काम अपेक्षित आहे ते तो करत नाही."
ती हसली, " मला ते नव्हतं म्हणायचं. "
" मग?"
" एखाद्याला तू जेव्हा ठार मारतोस तेव्हा कसं वाटतं? "
आमचं संभाषण कुठल्यातरी विचित्र पातळीवर चाललं होतं. या मुलीला मृत्यूविषयी एवढं आकर्षण का वाटतं?
" खरं सांगायचं तर माझी त्याबद्दल बोलायची इच्छा नाहीये अँजेला. एकतर हे सगळं ब-याच वर्षांपूर्वी घडलेलं आहे. आणि मी काही मुद्दाम त्याच्यावर गोळी झाडली नाही. आमच्यात झालेल्या मारामारीत त्याला गोळी लागली. "
" मला सीरियल किलर्सबद्दल वाचायला प्रचंड आवडतं. पण मी पोएटबद्दल काहीच ऐकलेलं नव्हतं. मी जेव्हा लंचटाईममध्ये लोकांना त्याच्या केसबद्दल बोलताना ऐकलं तेव्हा मी गूगलमध्ये शोधलं. तू त्याच्यावर लिहिलेलं पुस्तकही वाचायचंय मला. बेस्टसेलर आहे असं ऐकलंय मी. "
" बेस्टसेलर होतं. तेही दहा वर्षांपूर्वी. गेली पाच वर्षे तर ते आऊट आॅफ प्रिंट आहे. "
" तुझ्याकडे तर एक काॅपी असेलच ना! मला देशील का? प्लीज! " हे विचारताना तिने चेहऱ्यावर असे भाव आणले होते की जणू तिचं आयुष्य त्यावर अवलंबून आहे. त्याक्षणी तिला मृत्यूविषयी अनैसर्गिक आकर्षण असल्याचं माझ्या लक्षात आलं. तिला मर्डर स्टोरीज लिहायच्या होत्या कारण पेपर्समध्ये आणि टेलिव्हिजनवर न दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या. पोलिस तर तिच्यावर खुश झाले असतेच आणि त्याचं कारण फक्त ती दिसायला सुंदर होती म्हणून नव्हे तर तिने त्यांच्या अहंकाराला गोंजारलं असतं आणि त्यांच्या कामाबद्दल सहानुभूती दाखवली असती. त्यांना हे समजलंच नसतं की या मुलीला त्यांच्यात नाही तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीत रस आहे.
" मी घरी शोधतो. जर एखादी कॉपी असेल तर देतो तुला. आता ही स्टोरी संपवू या का आपण? प्रेन्डो माझ्या मागे लागलाय. तो चारच्या मीटिंगमधून बाहेर आला की लगेचच ही स्टोरी त्याला दाखवूया. "
" हो जॅक. "
मी एकदा सगळी स्टोरी परत नजरेखालून घातली आणि एकच बदल केला. ज्या स्त्रीवर १९८९ मध्ये बलात्कार आणि खून झाला होता, तिच्या मुलाचा पत्ता आणि फोन नंबर अँँजेलाने शोधून काढला होता आणि त्याच्याशी संपर्कही साधला होता. त्याने पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती आणि त्यांनी आपले प्रयत्न न सोडल्याबद्दल त्यांचे आभारही मानले होते. मी त्याचे उद्गार तिसऱ्या परिच्छेदात टाकले.
" मी हे वरती टाकतोय कारण डेस्कने याला हात लावावा अशी माझी इच्छा नाही, " मी तिला म्हणालो, " पोलिसांच्या कामाविषयी अशा चांगल्या शब्दात फार कमी लोक बोलतात. तुला पुढे याचा फायदा होईल. तुझ्याविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल. "
मी नंतर शेवटची औपचारिकता म्हणून स्टोरीच्या खाली -30 असं टाईप केलं.
" याचा अर्थ काय आहे? " अँँजेलाने विचारलं, " मी बाकी बऱ्याच स्टोरीजच्या शेवटी असंच लिहिलेलं पाहिलंय. "
" जुनी परंपरा. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा स्टोरीच्या शेवटी असं लिहायची पद्धत होती. मला वाटतं टेलिग्राफच्या वेळी असं लिहावं लागत असणार. त्याचा अर्थ आहे स्टोरीचा शेवट. आता त्याची काही गरज नाही. पण ..."
" ओहो! तरीच! म्हणूनच कामावरून कमी केलेल्या लोकांच्या यादीला ' थर्टी लिस्ट ' म्हणतात! "
मी मान डोलावली. तिला हे माहित नसल्याचं बघून मला आश्चर्य वाटलं होतं.
" बरोबर. मी नेहमीच माझ्या स्टोरीच्या शेवटी असं लिहितो आणि या स्टोरीवर माझी बायलाईन असल्यामुळे..."
" माझी काहीच हरकत नाही जॅक! मी पण लिहीन माझ्या स्टोरीजच्या शेवटी. "
मी हसलो, " परंपरा चालू राहिली पाहिजे. बरं, मग उद्या तू पार्कर सेंटरमध्ये जाऊन काही स्टोरी आहे का ते बघून येशील ना? "
तिच्या कपाळावर आठ्या पडल्या, " तुझ्याशिवाय? "
" हो. मला कोर्टात जरा काम आहे आणि त्याला वेळ लागू शकतो. पण मी लंचच्या आधी परत येईन. तू सांभाळू शकशील ना ?"
" ठीक आहे. तू कशावर काम करतो आहेस? "
मी तिला अलोन्झो विन्स्लोच्या स्टोरीबद्दल कल्पना दिली. तिला एकटीला जायला थोडा संकोच वाटत होता पण मी तिची खात्री पटवली की मी नसल्याने काहीही फरक पडणार नाही. शेवटी मी निघून गेल्यावर तिलाच तिथे दररोज जावं लागणार आहे. एकटीलाच.
" काही प्रॉब्लेम आला तर फोन कर मला. "
" ठीक आहे जॅक."
मी तिच्या स्टोरीकडे बोट केलं आणि माझ्या हातांची मूठ वळून तिच्या टेबलावर ठेवली, आणि म्हणालो, " रन दॅट बेबी ! "
माझा हां अत्यंत आवडता संवाद होता. ऑल द प्रेसिडेंट्स मेन मधला. पत्रकारितेवर बनलेला आतापर्यंतचा सर्वात सुंदर चित्रपट. तिला मात्र तो माहित नव्हता. आपण जुने आणि कालबाह्य झाल्याची जाणीव परत एकदा माझ्या मनाला अस्वस्थ करून गेली.
मी माझ्या क्युबिकलपाशी गेलो. माझ्या फोनचा मेसेज लाईट जोराने लुकलुकत होता. याचा अर्थ बरेच मेसेज आले असणार. मी लगेचच फोन उचलला. पहिला मेसेज जेकब मेयरचा होता. त्याला कुठल्यातरी नवीन केसच्या संदर्भात काहीतरी काम होतं त्यामुळे आमची भेट त्याला अर्ध्या तासाने पुढे ढकलावी लागणार होती. ठीक आहे. थोडं जास्त वेळ झोपता आलं असतं मला.
दुसरा मेसेज मला परत एकदा भूतकाळात घेऊन गेला. व्हॅन जॅक्सन पंधरा वर्षांपूर्वी रॉकी माऊंटन न्यूजमध्ये माझ्या हाताखाली काम करत होता. मीच त्याला ट्रेनिंग दिलं होतं. तो वर चढत सिटी एडिटरच्या पदापर्यंत पोचला होता. पण गेल्याच वर्षी पेपर बंद पडला होता. तब्बल दीडशे वर्षांची परंपरा असलेला पेपर. दैनिक पत्रकारितेचे दिवस भरल्याचा आणखी एक पुरावा. जॅक्सन अजूनही बेकार होता. ज्या व्यवसायात त्याने उमेदीची सगळी वर्षे घालवली, तिथे त्याच्यासाठी जागा नव्हती.
मी मेसेज ऐकला, " जॅक, मी व्हॅन बोलतोय. मी तुझ्याबद्दल ऐकलं. वाईट झालं. तुला भेटायचं आणि गप्पा मारायच्या असतील तर सांग. मी अजूनही डेनव्हरमधेच आहे. फ्री लान्सिंग करतोय आणि नोकरीही शोधतोय. " याच्यानंतर बराच वेळ शांतता होती. बहुतेक जॅक्सन मला पुढे जे वाढून ठेवलेलं आहे त्याकरिता तयार करण्यासाठी शब्द शोधत होता.
" मी मनापासून हे सांगतोय तुला. सगळं संपायच्या मार्गावर आहे. मी तर गाड्या विकण्याची पण तयारी ठेवली होती पण कार डीलर्ससुद्धा नोकऱ्या शोधताहेत. मला फोन कर. बघू, आपण एकत्र काही करू शकतो का ते. "
मी मेसेज परत एकदा ऐकला आणि मिटवला. मला आत्ता त्याला फोन करून माझं रडगाणं गाण्याची आणि त्याचं रडगाणं ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि माझ्यासमोरचे पर्याय संपले होते असंही नव्हतं. कादंबरीचा पहिला ड्राफ्ट जरी फसला असला, तरी ती अगदीच हाताबाहेर गेलेली नव्हती.
क्रमशः
(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)
प्रतिक्रिया
28 Jun 2015 - 1:44 pm | एस
असे रोजच एकेक भाग टाकत जा! फारच उत्कंठावर्धक भाग. आता परत तो 'ऑल द प्रेसिडेंट्स मेन' बघणं आलं.
28 Jun 2015 - 4:02 pm | आतिवास
+१
28 Jun 2015 - 4:00 pm | अजया
मस्त.जबरदस्त अनुवाद!
29 Jun 2015 - 1:45 pm | झकासराव
जबराट !!!!
29 Jun 2015 - 3:56 pm | मोहनराव
वाचतोय. पुभाप्र!
17 Jul 2015 - 12:33 pm | पद्मावति
वाचतेय.
27 Dec 2015 - 10:36 pm | शाम भागवत
द स्केअरक्रो - भाग ७