द स्केअरक्रो - भाग २८

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 12:50 am

द स्केअरक्रो भाग २७

द स्केअरक्रो भाग २८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

बुधवारी सकाळी मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा परत लोकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी नोकरी गेली होती आणि प्रत्येकजण माझ्याकडे कीवभरल्या नजरेने बघत होता. गेल्या आठवड्यात अँजेलाचा मृतदेह माझ्या घरात सापडला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत राग आणि संशय होता. आज मी अँजेलाच्या खुन्याला मारून तिच्या मृत्यूचा सूड उगवल्याप्रमाणे सगळेजण पाहात होते. माझी प्रतिक्रिया तिन्ही वेळा सारखीच होती. मी कुणाकडेही न पाहता माझ्या क्युबिकलकडे आलो आणि माझ्या खुर्चीवर बसलो. फोन सारखा वाजत होता आणि लोकांनी अनेक निरोप ठेवलेले असणार कारण त्याच्यावरचा छोटा लाल रंगाचा दिवासुद्धा सतत लुकलुकत होता.

डोरोथी तिच्या ऑफिसमधून जवळजवळ धावतच माझ्या क्युबिकलपाशी आली.

“कसा आहेस तू?”

“ठीक आहे.”

“आज काम करणार आहेस तू?” तिच्या आवाजात काळजी होती.

“तुझं म्हणणं आहे की मला माझ्या हातून एका माणसाचा मृत्यू झालाय त्याबद्दल काही वाटतंय का? वेल्, मला खरं सांगायचं तर काहीही वाटत नाहीये. तो माणूस होता असं आपण म्हणायचं, पण प्रत्यक्षात तो स्त्रियांचं अपहरण करून, त्यांच्यावर बलात्कार करून आणि त्यांचा श्वास घुसमटवून त्यांचा खून करणारा एक गुन्हेगार होता. मला तर असं वाटतंय की तो फार सोप्या रीतीने मेला.”

“ओके. समजलं मला.”

“फक्त एक गोष्ट वाईट झालेली आहे या सगळ्यामध्ये, आणि ती म्हणजे या वेळीही मला ही स्टोरी लिहिता येणार नाहीये, मी याचा भाग असल्यामुळे. बरोबर?”

“हो जॅक.”

“लॅरी बर्नार्डच लिहितोय ही स्टोरी?”

“हो. याआधीचीही त्यानेच लिहिली होती. त्याला काय घडलंय ते माहित आहेच.”

अर्ध्या तासाने मी गेल्या आठवड्याप्रमाणेच लॅरीबरोबर बसलो होतो. मला आठवलं, त्या वेळी मला अनसबचा फोन आला होता, आणि एका आठवड्याच्या आत मी त्याच्या मृत्यूबद्दल लिहिल्या जाणाऱ्या स्टोरीसंदर्भात काम करत होतो. नशीब, दुसरं काय?

लॅरीने मला माझ्या आणि कुरियरच्या झुंजीबद्दल अगदी खोलात जाऊन प्रश्न विचारले.

“तुला असं नाही वाटत, की तू त्याला जो प्रश्न विचारलास त्याचं उत्तर ऐकण्यासाठी तू थांबायला हवं होतंस?”

“कोणता प्रश्न?”

“जर मॅकगिनिस मेला आहे, तर मग एजंट वॉलिंगचं अपहरण करण्याचा धोका कुरियरने का पत्करला? हा महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? तो का पळून गेला नाही? हा त्याचा वेडेपणा होता, असं वाटत नाही तुला? आणि तो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार तेवढ्यात तू त्याला त्या लँपस्टँडने मारलंस.”

“हे पहा, त्याच्या हातात चार इंच लांब धारदार पातं असलेला चाकू होता. माझ्याकडे एक कॉर्कस्क्रू होता. तोही जेव्हा आमची मारामारी चालू झाली, तेव्हा कुठेतरी पडला. मी त्याची मुलाखत घेत नव्हतो. त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होतो. तो जर मला उत्तर देण्याचा विचार करेल, तर त्याच्या हातातून तो चाकू खेचून घेऊन मी कुठेतरी फेकून देणार होतो. मला जशी संधी मिळाली, मी तिचा फायदा उठवला. मला वाटतं म्हणूनच मी जिवंत आहे आणि तो मॉर्गमध्ये पडलेला आहे.”

लॅरीबरोबरचं माझं काम संपवून मी कॉन्फरन्स रूमच्या बाहेर आलो आणि माझ्या क्युबिकलपाशी जाऊन आलेले निरोप बघितले. बरेचसे इतर पेपर्समध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर्सचे होते. एक निरोप तर सी.एन.एन.वर माझ्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्याचा होता. त्याला अर्थातच पुढे काय झालं ते जाणून घ्यायचं होतं. दोन मेल्स होती. त्यातला एक डॉन गुडविनचा होता. मी तो उघडला आणि वाचला आणि त्याचं तपशीलवार उत्तर लिहिलं. दुसरा मेल माझ्या एजंटचा होता. गेले एक वर्षभर मी माझ्या पुस्तकासाठी त्याच्या मागे लागलो होतो पण त्याने नकारघंटा वाजवली होती. आज या सगळ्या घटना घडल्यावर त्याला अचानक जाग आली होती. पण त्याचंही तसं चूक नव्हतं. उगवत्या सूर्यालाच जास्त महत्व असतं. हा जगाचा नियम आहे. त्याच्या मेलनुसार त्याच्याकडे अनेक प्रकाशकांच्या ऑफर्स आलेल्या होत्या आणि तो माझ्याकडून काय प्रतिसाद येतोय याची वाट पाहात होता. मी जरा विचार केला आणि त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं ठरवलं. जर कोणी प्रकाशक माझ्या या ट्रंक मर्डर स्टोरीबरोबर माझी कादंबरीपण घ्यायला तयार असेल तरच मला इंटरेस्ट आहे, नाहीतर नाही.

हा मेल पाठवून झाल्यावर मी माझ्या मेलमध्ये आलेलं उद्याच्या स्टोरीजचं बजेट आणि इतर माहिती पाहिली. एका आठवड्यापूर्वी जेव्हा ही स्टोरी ब्रेक झाली होती, तेव्हा जशी धामधूम उडाली होती, तशीच परिस्थिती आत्ताही होती. तेव्हा टाईम्सच्या एका रिपोर्टरचा खून झाला होता आणि दुसरा रिपोर्टर त्याला जबाबदार होता. आता त्या रिपोर्टरने (बहुतेक) खऱ्या खुन्याचा नुसता छडा लावला नव्हता तर त्या खुन्याला मारून एकप्रकारे या खुनाचा बदला घेतला होता. कुठल्याही पेपरने अशा स्टोरीला उचललं असतंच. वाईट एकच होतं. यातली एकही स्टोरी मी लिहित नव्हतो. पण माझ्या एजंटचा मेल पाहिल्यावर मला आता हे तेवढ्या तीव्रतेने जाणवत नव्हतं.

########################################################

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा टाईम्सची एडिशन लोकांच्या हातात पडली, तेव्हा धमाका झाला. न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट यांनीही आमची स्टोरी उचलली होती. सी.एन.एन., फॉक्स, एन.बी.सी. – जवळजवळ सगळ्या न्यूज नेटवर्क्सवर याच बातमीची चर्चा होती.

टाईम्समधलं वातावरण एकदम एखाद्या महोत्सवी सोहळ्यासारखं होतं. आधीच्या आठवड्यात मला जाणवलेल्या नैराश्याचा कुठेही मागमूस नव्हता. एरवी माझ्याकडे ढुंकून पण न बघणाऱ्या अनेकांनी आज मी आल्याआल्या माझ्याबरोबर हात मिळवले होते. माझं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. रात्रभर मी लॅरी बर्नार्डने मला विचारलेल्या प्रश्नाचा विचार करत होतो. तोच प्रश्न, जो मी कुरियरला विचारला होता. तो पळून का नाही गेला? एका एफ.बी.आय.एजंटचं अपहरण करणं आणि नंतर तिला मारणं यात केवढा मोठा धोका आहे, याची त्याला जाणीव नव्हती का? त्यामुळे मॅकगिनिस आणि कुरियर यांना अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली असती, हे खरं आहे. त्यांचं नाव अगदी घराघरांत गेलं असतं. पण प्रसिद्धीची हाव असलेल्या सीरियल किलर्ससारखे दोघेही आत्तापर्यंत वागले नव्हते. उलट त्यांनी यशस्वीरीत्या दुसऱ्या कोणावरतरी संशय येईल अशी परिस्थिती निर्माण केलेली होती. रॅशेलच्या बाबतीत हा त्यांचा नियम ते बाजूला ठेवतील असं मला वाटत नव्हतं. याचाच अर्थ दुसरं कारण असलं पाहिजे.

मी दुसऱ्या बाजूने विचार करायला सुरुवात केली. जर मी एल.ए.ला निघून गेलो असतो आणि कुरियरने रॅशेलचं अपहरण केलं असतं तर? तरीही ते अपहरण थोड्याच वेळात उघडकीस आलं असतं. रूम सर्व्हिस वेटर, ज्याचा मृतदेह मला सातव्या मजल्यावर सापडला, तो परत आला नाही म्हटल्यावर त्याची शोधाशोध झाली असतीच आणि नंतर एका तासाच्या आत एफ.बी.आय.ने आपली संपूर्ण ताकद त्यांच्या एजंटला शोधायला तिथे लावली असती. पण तोपर्यंत कुरियर त्यांच्या हातातून निसटून लांब कुठेतरी निघून गेला असता.

याचा अर्थ या अपहरणाचा हेतू एफ.बी.आय.चं लक्ष मॅकगिनिस आणि कुरियर यांच्या तपासातून विचलित करण्याचा होता पण हे किती वेळ होऊ शकलं असतं? एफ.बी.आय.ने प्रचंड प्रमाणावर एजंट्सची फौज कामाला लावली असती आणि मेसा, स्कॉटसडेल आणि फिनिक्समधल्या प्रत्येक घराघरांत जाऊन शोध घेतला असता. त्यापेक्षा लांब तर कुरियर जाऊच शकला नसता.

जेवढा मी यावर जास्त विचार करत होतो, तेवढं मला लॅरीचं म्हणणं पटायला लागलं होतं. मी कुरियरला या प्रश्नाचं उत्तर द्यायची संधी द्यायला पाहिजे होती.

अचानक माझ्या क्युबिकलपाशी कोणीतरी उभं असल्याचं मला जाणवलं. मी पाहिलं तर मॉली रोबार्ड उभी होती. ती आमच्या जल्लादाची, रिचर्ड क्रेमरची सेक्रेटरी होती.

“बोल मॉली.”

“तू तुझा फोन उचलत नाहीयेस आणि तुझा इमेल इनबॉक्सपण पूर्ण भरलाय बहुतेक.”

“हो. असेल. मग?”

“मि.क्रेमरना तुला भेटायचंय.”

“अच्छा.”

मी माझ्या जागेवरून हललो नाही. पण तीही तिथेच उभी राहिली. तेव्हा मला समजलं की त्याने तिला मला घेऊन यायला सांगितलं असणार. मी निमूटपणे उठलो आणि क्रेमरच्या केबिनच्या दिशेने गेलो.

मी आत आल्यावर क्रेमर उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्मित होतं. तो जे मला आता सांगणार होता, ती त्याची स्वतःची कल्पना नसणार असा मला दाट संशय होता. हे चांगलंच होतं, कारण त्याच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना चांगल्या कधीही नसायच्या.

“बस ना जॅक.”

मी बसलो.

“माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे.”

त्याने परत माझ्याकडे बघून स्मित केलं. मी दुर्लक्ष केलं. दोन आठवड्यांपूर्वी माझी नोकरी जाते आहे हे सांगतानाही त्याने असंच स्मित केलं होतं.

“काय सांगतोस?”

“आम्ही ठरवलंय की तुला कामावरून कमी करायचं नाही.”

“म्हणजे?”

“म्हणजे तू इथेच काम करू शकतोस.”

“माझा पगार आणि इतर लाभ?”

“त्यात काहीही बदल होणार नाही. जसे आहेत तसे.”

रॅशेलला तिची गन आणि बॅज परत मिळाल्यावर कसं वाटलं असेल, ते समजलं मला. एक क्षणभर मलाही आनंद झाला, पण मी लगेच भानावर आलो.

“अच्छा, म्हणजे तू माझ्याऐवजी दुसऱ्या कोणालातरी बाहेर पाठवणार आहेस.”

“हे पहा जॅक, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. आमचं उद्दिष्ट होतं की या वर्षीचा जून सुरु होईपर्यंत पत्रकारांच्या शंभर जागा कमी करायच्या. तुझा नंबर नव्याण्णव होता.”

“अच्छा. म्हणजे आता माझी नोकरी कायम आहे आणि दुसरं कोणीतरी जातंय.”

“अँजेला कुकला आम्ही नव्याण्णवावी समजतोय. तिच्या जागी नवीन कोणाला आणणार नाही आहोत आम्ही.”

“अच्छा. मग शंभरावा कोण आहे?”

“हे पहा जॅक, इथे हे सांगायला मी बोलावलेलं नाहीये तुला. मी तुला विचारतोय – तुला तुझी नोकरी हवी आहे की नाही? त्याचं उत्तर दे तू मला.”

मी उत्तर देण्याआधी एकदा माझी खुर्ची वळवून सगळ्या न्यूजरूमकडे पाहून घेतलं, आणि खुर्ची न वळवताच बोलायला सुरुवात केली, “ आज सकाळी माझ्या एजंटने मला न्यूयॉर्कहून फोन केला. दोन पुस्तकांची ऑफर आहे. एक या आपल्या स्टोरीवर. दुसरं पुस्तक म्हणजे माझी कादंबरी. मला या दोघांचे मिळून जवळजवळ साडेसात लाख डॉलर्स मिळताहेत. इथे तेवढेच कमवायला मला तीन वर्षे किंवा त्याहून जास्त काळ काम करावं लागेल आणि तेही तुझ्यासारख्या लोकांबरोबर. त्याशिवाय मला डॉन गुडविनकडून ऑफर आहे. त्याच्या वेबसाईटसाठी काम करण्याची. मी माझ्या मनाप्रमाणे शोधपत्रकारिता करू शकतो. तो मला टाइम्सएवढा पगार देत नाहीये,पण इथल्या पगाराच्या पंच्याहत्तर टक्के आहेत.. भरपूर झाले. शिवाय मी घरून काम करू शकतो.”

मी उठून उभा राहिलो आणि त्याच्या दिशेने वळलो.

“आणि मी त्याला होकार दिलेला आहे. त्यामुळे या ऑफरबद्दल थँक्स पण तू मला तुझ्या यादीवरचा शंभरावा समजू शकतोस. उद्या माझा शेवटचा दिवस असेल. नंतर मी परत येणार नाही.”

“तू...तू आपल्या स्पर्धकाबरोबर काम करणार आहेस?” क्रेमरच्या आवाजात राग होता.

“तुला काय वाटलं? माझी नोकरी गेली हे मला तूच सांगितलं होतंस. मला हातपाय नको मारायला?”

“पण तुला तुझी नोकरी मी परत देतोय,” तो जवळजवळ ओरडलाच, “आपण शंभरचा कोटा पूर्ण केलाय.”

“कोण आहे शंभरावा?”

त्याने एकदा परत त्याच्यासमोर असलेल्या फाईलमध्ये पाहिलं, “मायकेल वॉरन.”

मी हसलो, “वाटलंच मला. आणि हे मुद्दामहून केलेलं आहेस तू.”

“म्हणजे?”

“वॉरन आणि मी – आमची जुनी दुष्मनी आहे. पोएट केसच्या काळापासून. त्यामुळे जर त्याला काढलं तर मी राहीन असा विचार केला असणार तू, हो की नाही? पण मी तसं करणार नाहीये. तू त्याला काढू नकोस. मलाच इथे राहण्याची इच्छा नाही.”

“ठीक आहे. मग तू उद्यापर्यंत थांबण्याची गरज नाही. तुझं डेस्क आत्ता, या क्षणी आवर आणि जा. मी सिक्युरिटीमधल्या कुणालातरी बोलावतो. तो तुला बाहेर सोडेल.”

“ठीक आहे.”

दहा मिनिटांनी मी माझ्या डेस्कपाशी उभा राहून कोणकोणत्या गोष्टी इथून न्यायच्या, त्याचा विचार करत होतो. माझ्या आईने मला दिलेली एक जुनी डिक्शनरी सोडली, तर अजून काही महत्वाचं नव्हतं. माझ्या दोन-तीन डायऱ्या होत्या. त्यामध्ये माझ्या सोर्सेसचे नंबर्स होते. एक डेस्क क्लॉक होतं. अजून काही सटरफटर गोष्टी होत्या. त्या मी कॉपी शॉपमधून आणलेल्या एका मोठ्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये भरल्या. सिक्युरिटीमधला एक इसम मी काय करतोय हे लक्षपूर्वक पाहात होता आणि त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की त्याच्यासाठी ही पहिली वेळ नाहीये.

त्याला तिथे तसा उभा पाहणं म्हणजे न्यूजरूममध्ये मोठ्याने ओरडून सांगण्यासारखंच होतं. लॅरी बर्नार्ड लगेचच माझ्या क्युबिकलपाशी आला.

“काय चाललंय?उद्या तुझा शेवटचा दिवस आहे ना?”

“नाही. आजच. क्रॅमरने मला आजच चालू पडायला सांगितलंय.”

“का? तू काय केलंस?”

“त्याने मला माझी नोकरी परत करायचा प्रयत्न केला, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्या नोकरीची गरज नाही.”

“काय? तू त्याची ऑफर धुडकावलीस?”

“मला नवीन नोकरी मिळालीय. दोन मिळाल्या आहेत खरं सांगायचं तर.”

माझा कार्डबोर्ड बॉक्स जेमतेम निम्मा भरला असेल. सात वर्षे इथे काम केल्यावर इथून नेण्यासारख्या फार गोष्टी नव्हत्या माझ्याकडे, आठवणींशिवाय. मी माझी बॅग खांद्यावर लटकवली.

“तुझ्या स्टोरीचं काय?” लॅरीने विचारलं.

“माझी कुठली स्टोरी?ती आता तुझी स्टोरी आहे. तू सांभाळ आता.”

“हो. पण लिहायला तुझ्यामुळेच मिळाली ना! मला जर आतली एखादी खबर हवी असेल तर मी कोणाला फोन करू आता?”

“तू रिपोर्टर आहेस. शोधून काढ.”

“तुला फोन करू का मी नंतर?”

“नाही. नको करूस.”

तो एकदम चमकला. मग मी पण त्याची जास्त खेचली नाही.

“मला जर तू बाहेर जेवायला घेऊन गेलास आणि बिल जर टाईम्स भरणार असेल, तर तुझ्याशी बोलेन मी!”

“स्साला xxxxx!” लॅरी हसत हसत म्हणाला.

“चल येतो!” मी निघालो. बाहेर पडलो आणि लिफ्टच्या दिशेने जाणार एवढ्यात मागून हाक ऐकू आली, “जॅक!”

मी मागे वळून पाहिलं. डोरोथी होती.

“जाण्याआधी एक मिनिट फक्त माझ्या ऑफिसमध्ये ये.”

मी थोडा घुटमळलो, पण मग खांदे उडवले. काय फरक पडतो एका मिनिटाने? मी माझ्या हातातला बॉक्स त्या सिक्युरिटीवाल्याकडे दिला आणि तिच्या ऑफिसमध्ये गेलो.

ती खुर्चीवर बसून माझी वाट पाहात होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं, “बस जॅक.”

मी बसलो आणि माझी बॅग खांद्यावरून काढून बाजूला ठेवली.

“मी रिचर्डला स्पष्टपणे सांगितलं होतं की तो स्वतःचा वेळ वाया घालवतोय. तू परत येणार नाहीस. या रिचर्डसारख्या लोकांना वाटतं की त्यांच्या हाताखाली माणसं नाही तर बाहुले काम करतात. जशा दोऱ्या खेचाल तसे ते नाचतील.”

“तुला एवढी खात्री होती माझ्याबद्दल? मी त्याची ऑफर जवळजवळ स्वीकारली होती.”

“छे. मला नाही वाटत.”

तिचं हे वाक्य मी सकारात्मक अर्थाने घेतलं.

“मग आता काय करणार आहेस तू?”

मी मगाशी क्रेमरला जे तुटकपणे सांगितलं होतं, ते तिला विस्तृत स्वरुपात सांगितलं. मी दोन पुस्तकांवर काम करणार होतो. एक माझी कादंबरी आणि दुसरं पुस्तक या संपूर्ण केसवर. त्याच्याशिवाय डॉन गुडविनची वेबसाईट velvetcoffin.com मध्ये काम करणार होतो, शोधपत्रकार म्हणून. एकप्रकारे डिजिटल जगात पाऊल टाकणार होतो.

“ग्रेट,” ती म्हणाली, “तुझी उणीव भासेल आम्हाला इकडे. तू खरोखरच एक उत्तम पत्रकार आहेस.”

माझी कोणी अशी स्तुती वगैरे करायला लागलं की माझ्यातला सिनिकल स्वभाव जागा होतो. जर मी उत्तम वगैरे असेन, तर मग मला काढण्याची वेळ का आली? खरं कारण हे आहे की मी जरी उत्तम असलो, तरी सर्वोत्तम नाहीये. ती केवळ बोलायचं म्हणून बोलतेय. जेव्हा माझ्याशी कोणी खोटं बोलतं तेव्हा मी त्या माणसाकडे बघत नाही. आताही मी तेच केलं. तिच्यामागे असलेल्या भिंतीकडे पाहिलं.... आणि अचानक मला ते दिसलं. इतके दिवस माझ्या समोर असलेली पण लक्षात न आलेली गोष्ट. माझ्या नकळत मी खुर्चीतून उठलो आणि पुढे झुकलो. मला ते नीट बघायचं होतं.

“काय झालं जॅक?”

मी भिंतीकडे बोट केलं, “मी ते पाहू शकतो का?तो द विझार्ड ऑफ ओझमधला फोटो.”

तिने उठून तो फोटो भिंतीवरून काढला आणि माझ्या हातात दिला.

“माझ्या एका मैत्रिणीने केलेला जोक आहे हा. या डोरोथीप्रमाणे मीही कान्सासमधूनच आले आहे.”

“हो माहित आहे मला.”

हा फोटो मी आधीही पाहिला होता. डोरोथी आणि तिचे तीन मित्र – टिन मॅन, घाबरट सिंह आणि बुजगावण्या किंवा स्केअरक्रो. पण हा फोटो खूप छोटा होता.

“तुझा कॉम्प्युटर वापरू का मी जरा?”

“जरूर. पण काय...”

“मला नक्की माहित नाहीये, पण तरी...”

ती तिच्या जागेवरून उठली. मी तिथ बसलो आणि तिच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर गुगल चालू केलं.

“काय झालंय जॅक?”

“एकच मिनिट.”

गुगल आल्यावर मी गुगल इमेजेसवर गेलो आणि scarecrow हा शब्द तिथे टाईप केला. लगेचच स्क्रीन छोट्या छोट्या फोटोंनी भरून गेला. द विझार्ड ऑफ ओझ मधल्या व्यक्तिरेखेचे फोटो होते, त्याचप्रमाणे बॅटमॅन कॉमिक्समधल्या याच नावाच्या खलनायकाचे फोटोसुद्धा होते. काही एकदम छान, निरागस होते आणि काही खुनशी आणि भयानक. काहींचे डोळे एकदम आनंदी तर काहींचे बंद.

मी जवळजवळ दोन मिनिटं प्रत्येक फोटोवर क्लीक करून तो मोठा करत होतो आणि पाहात होतो. सगळ्या फोटोंमध्ये एक गोष्ट सारखी होती. प्रत्येक स्केअरक्रोच्या रचनेत त्याच्या डोक्याच्या जागी एक पिशवी होती आणि तिच्यामुळे त्याचा चेहरा तयार होत होता. प्रत्येक पिशवी मानेभोवती एका दोराने बांधलेली होती. काही फोटोंमध्ये जाड दोर होता, तर काहींमध्ये बारीक. पण त्याने काहीही फरक पडत नव्हता. ही एक प्रतिमा सगळीकडे होती आणि मला ज्या फाईल्स मिळाल्या होत्या त्यातले डेनिस बॅबिट आणि शेरॉन ओग्लेव्ही यांचे मृतदेह आणि अँजेला कुकचा मृतदेह, जो मी स्वतः पाहिला होता, त्यांंच्यामध्ये अशीच पिशवी मृत व्यक्तीच्या डोक्यावर टाकून गळ्याभोवती बांधलेली होती.

हा खुनी स्केअरक्रोचा, बुजगावण्याचा चेहरा तयार करत होता. डोक्यावर पिशवी आणि त्याच्याभोवती बांधलेला दोर. मी पुढच्या स्क्रीनवर गेलो. अशाच अनेक प्रतिमा दिसल्या. अजून पुढच्या स्क्रीनवर गेलो, तर मला जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीच्या प्रतिमा दिसल्या. जेव्हा द विझार्ड ऑफ ओझ लिहिलं गेलं होतं, तेव्हा काढलेल्या चित्रांच्या. आणि तिकडे मला अजून एक गोष्ट दिसली – ही चित्रं काढणाऱ्या चित्रकाराचं नाव होतं विल्यम वॉलेस डेन्स्लो.

बिल डेन्स्लो. डेन्स्लो डेटा. अँजेलाने क्लिक केलेल्या trunkmurder.com साईटवरून आयपी अॅड्रेस पुढे ज्या साईटवर पाठवला जात होता आणि तिथे तो खुन्याच्या हाताला लागला होता, ती साईट. माझ्या डोक्यात सहज एक विचार आला आणि मी गुगलमध्ये सर्च केलं. लगेचच उत्तर मिळालं. जेव्हा द विझार्ड ऑफ ओझ रंगभूमीवर आलं होतं, तेव्हा स्केअरक्रोची भूमिका करणारा अभिनेता जो होता, त्याचं नाव होतं फ्रेडी स्टोन.

या खुन्याची स्वाक्षरी मला सापडली होती यात शंका नव्हती. रॅशेलने असंच सांगितलं होतं. स्वाक्षरी सापडली की आपल्याला हा खुनी सापडेल.

मी उठून उभा राहिलो, “मला जायला पाहिजे. थँक्स डोरोथी,” आणि माझी बॅग घेऊन पळतच बाहेर गेलो.

##############################################

मी अजूनही रॅशेलला फोन करून याबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं. सर्वात प्रथम मी एअरपोर्टवर गेलो आणि तिथून फिनिक्सच्या फ्लाईटचं तिकिट घेतलं. आता मी जरी रिपोर्टर नसलो, तरी ही स्टोरी अजूनही माझीच होती आणि तिचा शेवट मला हवा तसाच करायची माझी इच्छा होती.

तिला हे कसं सांगायचं, याचा मी संपूर्ण फ्लाईटभर विचार केला आणि फिनिक्सला उतरल्यावर भाड्याची कार घेऊन बाहेर पडलो आणि मेसाच्या दिशेला लागलो. तिथे पोचल्यावर एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये जाऊन एक प्रीपेड फोन विकत घेतला. रॅशेल वेस्टर्न डेटाच्या बंकरमध्ये काम करते आहे हे मला माहित होतं. तिने माझं नाव तिच्या फोनच्या कॉलर आयडीवर पहावं आणि कार्व्हरसमोर घ्यावं अशी माझी इच्छा नव्हती.

काय बोलायचंय ते मनाशी ठरवून मी तिला फोन लावला. तिने पाच रिंग्सनंतर उचलला.

“हॅलो, एजंट वॉलिंग.”

“मी बोलतोय. माझं नाव घेऊ नकोस.”

ती थोडं थांबली, “मी कशा प्रकारे तुमची मदत करू शकते?”

“तू कार्व्हरबरोबर आहेस?”

“हो.”

“ओके. मी मेसामध्ये, तुझ्यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. आपल्याला भेटायला हवं आणि ते तिथल्या कोणालाही कळता कामा नये.”

“सॉरी. हे शक्य होईल असं वाटत नाही. काय झालंय?”

“मी सांगू नाही शकत. मला तुला दाखवायला लागेल. तुझं जेवण झालंय का?”

“हो.”

“ओके. कोणी विचारलं तर सांग, की त्यांच्या ऑफिसमधली कॉफी पिऊन तुला कंटाळा आलाय आणि म्हणून कॉफी आणायला तू बाहेर जाते आहेस. मग हा जो कॅफे आहे – हायटॉवर ग्राऊंड्स – तिथे ये. मला तिथे यायची इच्छा नाही कारण सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत.”

“आणि हे कशाबद्दल आहे, ते तुम्ही मला सांगू शकत नाही.”

“कार्व्हरबद्दल सांगायचंय मला म्हणून म्हणतोय असले प्रश्न विचारू नकोस आणि काहीतरी सबब सांगून बाहेर पड. माझं नाव घेऊ नकोस.”

तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी वैतागलो, “तू येते आहेस की नाही रॅशेल?”

“एवढी माहिती पुरे आहे मला. मी बघते.” तिने फोन बंद केला.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

20 Sep 2015 - 1:05 am | प्यारे१

नॉट अगेन! :(
बोका तुला पायजे ती (...) देतो.
संपवा की राव फाष्टात. ब्रेक पण असा मारताय ना की.... क्याय च्याल्लंय क्याय.

प्यारे१'s picture

20 Sep 2015 - 1:05 am | प्यारे१

नॉट अगेन! :(
बोका तुला पायजे ती (...) देतो.
संपवा की राव फाष्टात. ब्रेक पण असा मारताय ना की.... क्याय च्याल्लंय क्याय.

अच्छा! मागच्या एका भागात कार्व्हरचा उल्लेख यांच्यासमोर 'आमचा स्केअरक्रो' असा केला होता. त्याचा संबंध आता जॅकच्या लक्षात आला असेल का?

कार्व्हरवर शेवटी संशयाची सुई वळाली तर. त्याने कुरिअर ऊर्फ फ्रेडी स्टोनला रॅचेलच्या मागावर पाठविण्याचा धोका का उचलला असावा? रॅचेलला एक फोन येतो व ती काहीतरी कारण सांगून बाहेर जातेय हे पाहून कार्व्हर आता स्वतः यांना मारण्याचा प्रयत्न करणार का?

अद्द्या's picture

20 Sep 2015 - 1:20 am | अद्द्या

क्लास

आता कसं ! कार्व्हर १ आणि आता आपला हिरो - १, हीरो इज बॅक इन गेम !!

अजया's picture

20 Sep 2015 - 7:01 am | अजया

पुभालटा!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Sep 2015 - 7:04 am | कैलासवासी सोन्याबापु

जॅक मॅकएव्हॉय!! \m/

सामान्य वाचक's picture

20 Sep 2015 - 7:23 am | सामान्य वाचक

पण क्रमशः हे वाचायचे जीवावर येते आहे

लालगरूड's picture

20 Sep 2015 - 8:48 am | लालगरूड

let the battle begin. ..

आता परत शनिवार पर्यंत वाट पाहाणे आले. ल्गे रहो बोकेराव.

वॉल्टर व्हाईट's picture

21 Sep 2015 - 5:46 am | वॉल्टर व्हाईट

जबरदस्त, पुढल्या भागाची वाट बघतोय.

नाखु's picture

21 Sep 2015 - 10:35 am | नाखु

शनिवार दोन दिसात येऊ दे !!!

पुभालटा!!

भुमन्यु's picture

21 Sep 2015 - 2:11 pm | भुमन्यु

खुप मस्त झालि आहे मालिका. १-२२ भाग एक सलग वाचुन काढले. आता उत्कंठा इतकी वाढलिये की सगळे भाग एकदम वाचायला हवे होते असं वाटतय...

अप्रतिम लेख मालिका.

राजाभाउ's picture

21 Sep 2015 - 3:26 pm | राजाभाउ

जबरदस्त !!!
आत्ता कधी संपतीय अस झालेय पण एकदा संपल्यावर का संपली असे होणारये. फारच रोचक

पैसा's picture

22 Sep 2015 - 12:41 pm | पैसा

शेवटाच्या जवळ पोचली आहे का कादंबरी?

.....
अप्रतिम लेखन (भाषांतर) शैली...
धन्यवाद...

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Sep 2015 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

अजिबात स्तुती करणार नाहीये मी!! पुभालटा हो बोकेश भाऊ चक्क चक्का झालाय टांगलेला

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Sep 2015 - 1:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाच प्रतिसाद भाग क्र २८ ला सुद्धा वाचावा म्हणे मी

जुइ's picture

22 Sep 2015 - 11:56 pm | जुइ

पुढे काय होते आहे याची उत्सुकता आहे.

लवकर संपवा! पोएटचा पण करायचा आहे ना अनुवाद ;)

मास्टरमाईन्ड's picture

23 Sep 2015 - 12:38 pm | मास्टरमाईन्ड

सुरू झालाय!
मस्तच....

स्नेहनिल's picture

24 Sep 2015 - 1:29 pm | स्नेहनिल

एकदम थरारक चाल्लीये कथा. पुलेशु

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 7:00 pm | शाम भागवत