द स्केअरक्रो - भाग ‍२२

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
30 Aug 2015 - 12:15 am

द स्केअरक्रो भाग २१

द स्केअरक्रो भाग २२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

आदल्या रात्री जेवताना आम्ही पाण्यासारखी रम प्यायली होती. त्यामुळे सकाळी उठल्यावर दोघांचंही डोकं बऱ्यापैकी दुखत होतं. पण कसेबसे आम्ही बाहेर पडलो आणि वेस्टर्न डेटाच्या रस्त्याला लागलो. थोडाफार वेळ होता, त्यामुळे आम्ही आधी हायटॉवर ग्राउंडमध्ये जाऊन गरमागरम कॉफी घेतली. त्यामुळे जरा बरं वाटलं.

मी वेस्टर्न डेटाच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली, आणि रॅशेलकडे वळलो, “गेल्या आठवड्यात जेव्हा फिनिक्स फील्ड ऑफिसमधले एजंट्स इथे आले होते, तेव्हा त्यांनी ते कशासाठी आले आहेत, ते इथे सांगितलं होतं?”

“नाही. ते नक्की काय शोधताहेत याबद्दल ते कमीतकमी शब्दांत बोलले.”

“अच्छा! पण मग सर्च वॉरंटचं काय? त्याच्याकडे बघून तर कुणालाही कळलं असेल ना की त्यांना नक्की काय हवंय?”
तिने नकारार्थी मान हलवली, “हे वॉरंट एका फेडरल जजने दिलं होतं. त्यावर इंटरनेटचा वापर करून केली गेलेली फसवणूक असं म्हटलं होतं. ती trunkmurder साईट त्याच्यामध्ये येतेच. त्यामुळे एफ.बी.आय.ला ते खरोखर काय शोधताहेत ते लपवता आलं.”

“ठीक आहे.”

“आम्ही आमचं काम व्यवस्थित केलं जॅक. पण तुम्ही तसं केलं नाही.”

“म्हणजे?”

“तुझ्या विचारण्याचा उद्देश हाच आहे ना, की आपला जो अनसब आहे - जो इथे असेल किंवा नसेल – त्याला वेस्टर्न डेटाकडे एफ.बी.आय.चं लक्ष गेलंय हे समजलंय की नाही? त्याचं उत्तर अर्थातच हो असं आहे, पण एफ.बी.आय. त्याला जबाबदार नाहीये. तुम्ही, एल.ए. टाईम्सने अँजेलाच्या मृत्यूबद्दल लिहिताना असं म्हटलं होतं की तिने एक वेबसाईट पहिली होती, आणि त्या दिशेने तपास चालू आहे. तुम्ही त्या साईटचं नाव घेतलं नव्हतं. पण त्यामुळे फक्त तुमच्या स्पर्धकांपासून आणि वाचकांपासून तुम्ही ते लपवू शकलात. आपल्या अनसबला तर कुठली साईट ते माहित आहे ना! त्याने ही खूणगाठ त्याच्या मनाशी बांधलीच असेल, की जर आज एफ.बी.आय.ला ही साईट सापडली आहे, तर काही दिवसांच्या काळात ते त्याच्यामागे कोण आहे, ते शोधून काढतील आणि परत वेस्टर्न डेटामध्ये चौकशीसाठी येतील.”

मी होकारार्थी मान डोलावली. तिचं बरोबर होतं. टाईम्समध्ये ही स्टोरी आल्यामुळे आमच्या अनसबला हे समजलं असणारच. तो तर प्रत्येक पेपर घेऊन त्यात कुठल्या गोष्टी आल्या आहेत ते पाहात असेल.

“ठीक आहे,” मी म्हणालो, “मग एफ.बी.आय. इथे येण्याआधी आपल्याला आपलं काम संपवायला पाहिजे.”
आम्ही दोघेही आत गेलो. आम्ही इथे क्लायंट म्हणून आलो होतो, त्यामुळे मी नवीन शर्ट आणि सूट घातला होता. रॅशेल तिच्या नेहमीच्या एफ.बी.आय.एजंटच्या वेशात होती. तुम्ही एखाद्याला एफ.बी.आय.मधनं काढाल, पण त्याच्या मनातून एफ.बी.आय.ला कसं काढणार असा एक विचार उगाचच माझ्या मनात येऊन गेला.

इथल्या लॉबीमध्ये आत जाण्यासाठी एक दरवाजा होता, आणि त्याच्या बाजूला एक माईक ठेवला होता. आम्हाला तिथे आम्ही कोण आहोत, ते जाहीर करून मग आत जावं लागलं. आत एक मोठं रिसेप्शन डेस्क होतं, आणि एक तरुण स्त्री तिथे बसली होती. बहुतेक तिनेच बटन दाबून दरवाजा उघडला होता.

“आम्ही वेळेच्या आधी आलोय. आमची दहा वाजताची अपॉइंटमेंट आहे. मि.मॅकगिनिस आम्हाला भेटणार आहेत,” मी म्हणालो.

“हो. मिस शॅवेझ तुम्हाला सगळा प्लँट दाखवतील,” ती हसतमुखाने म्हणाली, “मी जरा चेक करते की त्या वेळेच्या आधी तुम्हाला भेटू शकतील की नाही ते.”

मी जरा वैतागलो, “आमची अपॉइंटमेंट मि.मॅकगिनिसबरोबर आहे. या कंपनीचे सी.ई.ओ. आम्ही लास वेगासहून खास त्यांनाच भेटायला आलोय.”

“आय अॅम सॉरी, पण ते शक्य नाहीये. मि.मॅकगिनिस काही आकस्मिक कारणामुळे आज ऑफिसला येऊ शकले नाहीयेत.”

“पण मग कुठे आहेत ते?आम्हाला वाटलं होतं की आम्ही त्यांना भेटू आणि आज सगळं ठरवून अॅग्रीमेंटवर सह्या करू.”

“मी मिस शॅवेझना बोलावते. त्या तुम्हाला असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील.”

तिने एक इंटरकॉम उचलला आणि त्यावर तीन बटन्स दाबली. मी आणि रॅशेल – आम्ही एकमेकांकडे पाहिलं. तिने तिची एक भुवई उंचावली. तिच्याही मनात तोच विचार आला होता. काहीतरी विचित्र वाटत होतं इथे. यांनी मला काल मॅकगिनिस ऑफिसमध्ये नाही, म्हणून आजची अपॉइंटमेंट दिली होती, पण तो तर आजही इथे नव्हता.

रिसेप्शनिस्ट इंटरकॉममध्ये भरभर आणि हळू आवाजात बोलत होती. तिचं बोलणं संपल्यावर तिने आमच्याकडे पाहून आपलं ठेवणीतलं स्मित केलं, “मिस शॅवेझ आत्ता लगेच येतील. तुम्ही बसा ना.”

तिने आत्ता लगेच असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात दहा मिनिटांनी रिसेप्शन डेस्कच्या मागे असलेला दरवाजा उघडला आणि एक साधारण तिशीची स्त्री बाहेर आली. तिने बऱ्यापैकी जाड काचांचा चष्मा घातला होता. ती चालत आमच्याच दिशेने आली.

“मि.मॅकअॅव्हॉय, मी योलांडा शॅवेझ. मी मि.मॅकगिनिसची सेक्रेटरी आहे. तुमची काही हरकत नसेल, तर आज तुम्हाला हा सगळा प्लँट मी दाखवीन.”

मी तिच्याशी हस्तांदोलन केलं आणि रॅशेलशी तिची ओळख करून दिली.

“आमची अपॉइंटमेंट मि.मॅकगिनिसबरोबर ठरली होती,” रॅशेल नापसंतीच्या सुरात म्हणाली, “आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, की आमच्यासारख्या फर्मच्या प्रतिनिधींना मि.मॅकगिनिस स्वतः भेटतील, त्यांची सेक्रेटरी नाही.”

“मी तुम्हाला खात्री देते मिस वॉलिंग की आम्हाला तुम्ही क्लायंट म्हणून हवे आहात. पण मि.मॅकगिनिस आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.”

मी खांदे उडवले, “वेल्, तुम्ही आम्हाला सगळा प्लँट दाखवा. जेव्हा मि.मॅकगिनिस ठीक होतील, तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलू.”

“अर्थात,” शॅवेझ म्हणाली, “आणि मी मि.मॅकगिनिसच्या अनुपस्थितीत हे काम बरेच वेळा केलेलं आहे. मी तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती देईन.”

“हरकत नाही.”

शॅवेझ रिसेप्शनपाशी गेली आणि तिने तिथून दोन क्लिपबोर्ड्स आणले, “आपल्याला सर्वात पहिल्यांदा सिक्युरिटी पाहायला लागेल,” ती म्हणाली, “तुम्ही हे वाचा आणि त्यावर सही करा. मग मी तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या दोन कॉपीज काढेन. शिवाय मला तुमच्या फर्मने दिलेलं जे पत्र आहे, ते पण लागेल. आमच्या रेकॉर्डसाठी.”

“आमचं ड्रायव्हिंग लायसन्स कशाला हवंय तुम्हाला?” मी विचारलं. आमची दोघांचीही लायसन्सेस कॅलिफोर्नियामधली होती पण आम्ही तिला लास वेगासहून आलो असं सांगितलं होतं.

“तो आमचा सिक्युरिटी प्रोटोकॉल आहे. तो पाळावाच लागतो. कुणाचाही अपवाद आम्ही करू शकत नाही.”

“अरे वा! मला हेच ऐकायचं होतं.”

मी स्मित केलं. तिचा चेहरा निर्विकार होता. आम्ही आमची लायसन्सेस तिला दिल्यावर तिने थोडा वेळ त्यांचं निरीक्षण केलं, “तुम्ही दोघेही कॅलिफोर्नियामधले आहात? पण तुम्ही तर लास वेगास...”

“आम्ही दोघेही आताच जॉईन झालोय. मी मुख्यत्वेकरून केसेसच्या संदर्भातला तपास करतो, आणि रॅशेल आयटी सांभाळते.”

मी परत एकदा स्मित केलं. शॅवेझने तिचा चष्मा एकदा सारखा केला, आणि स्किफिनोने मला दिलेलं पत्र बघायला मागितलं. दहा मिनिटांत येते असं सांगून ती गेली.

रॅशेल आणि मी आम्ही दोघांनीही आम्हाला तिने दिलेले फॉर्म्स वाचले. त्यात अनेक गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यायचं होतं, उदाहरणार्थ त्याच्यावर सही करणारा किंवा करणारी वेस्टर्न डेटाच्या स्पर्धकाबरोबर काम करत नाही, कुठलाही फोटो घेतलेला चालणार नाही, इथे वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही तंत्रज्ञानाबद्दल बाहेर बोलता येणार नाही, वगैरे.

“बाप रे. हे लोक फारच गुप्तता पाळताहेत,” मी म्हणालो.

“खूप स्पर्धा आहे या व्यवसायात!” रॅशेल म्हणाली.

मी फॉर्मच्या शेवटी सही केली. रॅशेलनेही केली.

“काय वाटतंय तुला?”मी हलक्या आवाजात तिला विचारलं. बोलताना माझे डोळे त्या रिसेप्शनिस्टकडे होते.

“कशाबद्दल?”

“मॅकगिनिस इथे नाहीये, आणि कोणाकडेही त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण नाहीये. आपण आलो, तेव्हा तो काही आकस्मिक कारणामुळे ऑफिसला आलेला नव्हता. नंतर आपल्याला सांगण्यात आलं की तो आजारी आहे. नक्की काय प्रकार आहे?”

रिसेप्शनिस्टने माझ्याकडे रोखून पाहिलं. बहुतेक मी बोललेलं तिला ऐकू आलं असावं. मी तिच्याकडे बघून स्मित केलं. तिने परत समोरच्या कॉम्प्युटरकडे बघून काम करायला सुरुवात केली.

“आपण याबद्दल नंतर बोलू.” रॅशेल म्हणाली.

“रॉजर दॅट!” मीही सहमती दर्शवली.

शॅवेझ परत येईपर्यंत आम्ही काहीही न बोलता शांत बसलो. तिने आम्हाला आमची लायसेन्सेस परत केली आणि आम्ही तिला आम्ही सही केलेले फॉर्म्स दिले. तिने आमच्या सह्या काळजीपूर्वक बघितल्या.

“मी मि.स्किफिनोंशी बोलले,” ती म्हणाली.

“अच्छा!” मी एक आवंढा गिळून म्हणालो.

“हो. तुम्ही दिलेली सगळी माहिती विश्वासार्ह आहे की नाही, ते मला पडताळून पहायचं होतं. तुमच्यासाठी त्यांनी एक निरोप दिलाय, की इथलं तुमचं काम संपलं की त्यांना ताबडतोब फोन करा.”

शाब्बास स्किफिनो. माझा जीव भांड्यात पडला होता. माझं खरं नाव इथे दिलं ते बरं झालं.

“जरूर.” मी म्हणालो.

“त्यांना लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे.” रॅशेल म्हणाली.

“तुम्हाला आता मी जे दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल,” शॅवेझ म्हणाली.

तिने एक की कार्ड वापरून ज्या दरवाज्याने ती इथे आली होती, तो उघडला. तिच्या कार्डवर तिचा फोटो असल्याचं मी पाहिलं. दरवाज्यातून आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये आलो.

“आपण सर्वात पहिल्यांदा ग्राफिक डिझाईन आणि वेब होस्टिंग लॅब्ज पाहणार आहोत. पण त्याच्याआधी मी तुम्हाला या कंपनीच्या इतिहासाबद्दल आणि आम्ही इथे नक्की काय करतो त्याबद्दल सांगणार आहे.”

मी माझी छोटी वही बाहेर काढून नोट्स घेणार होतो, पण रॅशेलने डोळ्यांनीच मला दटावलं.

“ आमच्या कंपनीची सुरुवात जेमतेम चार वर्षांपूर्वी झालेली आहे. क्लायंट्सना सुरक्षित हाय व्हॉल्यूम डेटा मॅनेजमेंट सेवा देण्यासाठी आमचे संस्थापक आणि सी.ई.ओ. डेक्लॅन मॅकगिनिस यांनी ही कंपनी स्थापन केली. त्यांच्याबरोबर त्यांनी या इंडस्ट्रीमधल्या अत्यंत हुशार आणि सर्वोत्तम लोकांना इथे आणलं. आज आमचे जवळजवळ हजार क्लायंट्स आहेत, ज्यांच्यामध्ये छोट्या लॉ फर्म्सपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. कंपनी छोटी असो वा मोठी आणि इथे अमेरिकेत असो वा जगाच्या पाठीवर कुठेही, आम्ही त्यांना सेवा पुरवू शकतो. आमच्या क्लायंट्समध्ये लॉ फर्म्सची संख्या लक्षणीय आहे. आमच्या अनेक प्रॉडक्ट्सची रचना ही त्यांना लागणाऱ्या विशिष्ट सेवा पुरवण्यासाठी केलेली आहे. वेब होस्टिंगपासून ते कोलोकेशनपर्यंत सगळ्या सेवा आम्ही तुम्हाला या एका ठिकाणी पुरवू शकतो.”

आम्ही इथे जरी वेगळ्या उद्देशाने आलो असलो, तरी ही माहिती नक्कीच इंटरेस्टिंग होती.

“इथे मेसामध्ये हा प्लँट सुरु करण्याचं कारण हा भाग समुद्रापासून आणि भूकंपप्रवण क्षेत्रापासून खूप दूर आहे. तसंच नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्हीही प्रकारच्या आपत्ती इथे आलेल्या नाहीत. तसंच आमच्या सेवांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट – २४ तास पुरेसा आणि खात्रीलायक वीजपुरवठा – इथे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या क्लायंट्सना दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस आमच्या सेवा देऊ शकतो. शिवाय इथे असल्यामुळे आम्हाला अतिशय चांगली आणि भरपूर बँडविड्थ मिळते. मुख्यतः डार्क फायबरमुळे.”

“डार्क फायबर?” मी विचारलं, आणि लगेचच जीभ चावली. मला ही माहिती असायला हवी होती. पण सुदैवाने रॅशेल मध्ये पडली, “न वापरलेले फायबर ऑप्टिक्स. जी नेटवर्क्स आहेत, त्यांच्यामध्ये असूनसुद्धा न वापरले गेलेले.”

“बरोबर.” शॅवेझ म्हणाली.

तिने तिचं की कार्ड वापरून एक दुहेरी दरवाजा उघडला, आणि आम्ही आत गेलो.

“आता मी तुम्हाला इथल्या सुरक्षिततेबद्दल सांगते. या संपूर्ण ढाच्याला सात रिश्टर तीव्रतेचा भूकंपही काही करू शकणार नाही, इतका तो मजबूत आहे. बाहेरून सहज दिसू शकेल किंवा कोणाच्याही लक्षात येईल असं काहीही तुम्हाला इथे सापडणार नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक आगंतुक माणसाला आमचा प्रोटोकॉल पाळावाच लागतो आणि जोपर्यंत तो इथे आहे, तोपर्यंत त्याच्यावर आमची नजर असते. तसंच इथे काम करणाऱ्या लोकांवरही आमची नजर असते. प्रत्येक रेकॉर्डिंग आम्ही किमान ४५ दिवस ठेवतो.”

हे बोलताबोलता तिने आम्हाला छताजवळ असलेला, एखाद्या कॅसिनो बॉलप्रमाणे दिसणारा कॅमेरा दाखवला. मी त्याच्याकडे पाहून हात हलवला. रॅशेलने परत एकदा मला दटावलं. शॅवेझचं मात्र याच्याकडे लक्ष नव्हतं. ती आम्हाला सगळं दाखवण्यात एकदम गुंग झाली होती.

“आमच्या या प्लँटमधले सगळे महत्वाचे जे भाग आहेत, तिथे काही ठराविक लोकांनाच जाता येतं. त्यासाठी आम्ही की कार्ड्स आणि बायोमेट्रिक स्कॅनर्स ठेवलेले आहेत. आमच्या नेटवर्क ऑपरेशन सेंटरमधून या सगळ्याचं नियंत्रण केलं जातं. हे सेंटर कोलोकेशन सेंटरच्या किंवा फार्मच्या बाजूला, आमच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.”

माझं आता तिच्या बोलण्यावरून लक्ष उडालं होतं. आता आम्ही एका मोठ्या प्रयोगशाळेसारख्या दिसणाऱ्या खोलीत आलो होतो. इथे जवळजवळ दोन डझन वेब डिझायनर्स वेस्टर्न डेटाच्या क्लायंट्सच्या वेबसाईट्स बनवत आणि चालवत होते. बऱ्याच वेबसाईट्स लॉ फर्म्सच्या होत्या. डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता, तराजू, जजचा हातोडा अशी अनेक प्रतिकं दिसली, त्यावरून मी हा अंदाज बांधला होता.

या विभागाचा प्रमुख डॅनी ओ’कॉनर नावाचा माणूस होता आणि शॅवेझने त्याच्याशी आमची ओळख करून दिल्यावर पुढची पाच-सात मिनिटं त्याने आम्हाला त्याचं डिपार्टमेंट काय करतं आणि इंटरनेटमुळे कसा सामान्य माणसाच्या आयुष्यात फरक पडला आहे आणि कसं आज बहुतेक काम इंटरनेटवरच होतं आहे यावर एक साग्रसंगीत व्याख्यान दिलं. इंटरनेटबद्दल मला सांगायची गरज नव्हती. गेले काही दिवस त्याचे प्रताप आणि परिणाम मी पाहात होतोच. तो बोलत असताना मी त्याच्याकडे लक्षपूर्वक बघत होतो. तो जर आमचा अनसब असता, तर थोडीतरी भीती किंवा आश्चर्य किंवा त्यासारखी भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसली असती. पण हा माणूस आम्हाला ज्या पद्धतीने सगळं सांगत होता, त्यावरून तो अनसब असावा असं वाटत नव्हतं. शिवाय तो चांगलाच गुटगुटीत आणि बाळसेदार होता. मला हॉटेल नेवाडामध्ये भेटलेला माणूस इतका जाडा नव्हता. तुम्ही वेषांतर कितीही बेमालूम केलं, तरी तुम्ही स्वतःचं वजन कमी भासवू शकत नाही.

त्याचं ऐकून घेत असतानाच मी आजूबाजूलाही बघत होतो. कुणी एल्विससारखं दिसतंय का, किंवा संशयास्पदरीत्या वागतंय का, ते मला पहायचं होतं. इथल्या लोकांपैकी किमान निम्म्या स्त्रिया होत्या. त्यामुळे मला उरलेल्या निम्म्या लोकांकडेच बघायचं होतं. पण त्यांच्यातही एल्विस असावा असं कोणीही दिसलं नाही.

आम्ही डॅनीबरोबर बोलत असताना शॅवेझ फोनवर कोणाशीतरी बोलत होती. डॅनीने हात उंचावून तिला बोलावलं आणि ती आमच्याजवळ आली. तिने अजून एक दरवाजा तिच्या की कार्डने उघडला आणि आम्ही या प्रयोगशाळेच्या बाहेर आलो. शॅवेझ आता आम्हाला एका लिफ्टच्या जवळ घेऊन आली होती. तिने तिचं की कार्ड वापरून लिफ्ट बोलावली.

“मी आता तुम्हाला आमच्या बंकरमध्ये घेऊन जाणार आहे,” ती म्हणाली, “आमची नॉक रूम तिथेच आहे, आणि तुम्हाला आमचा सर्व्हर फार्मही तिथे बघता येईल, जिथून आम्ही आमच्या सर्व क्लायंटना कोलोकेशन सेवा पुरवतो.”

आता मला राहवलं नाही, “नॉक रूम?”

शॅवेझने स्मित केलं, “नेटवर्क ऑपरेशन सेंटर. NOC. आमच्या या कंपनीचं हृदय असं म्हणायला हरकत नाही.”

आम्ही लिफ्टमध्ये गेल्यावर तिने सांगितलं की जरी आम्ही फक्त एक मजला खाली जात असलो, तरी ही जागा जमिनीच्या वीस फूट खाली होती. वाळवंटाच्या या भागात अत्यंत खोलवर खोदून तिथे हा बंकर बनवण्यात आला होता. माणूस किंवा निसर्ग, कोणीही बंकरला भेदू शकणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली होती. लिफ्टने अर्ध्या मिनिटात आम्हाला तिथे पोचवलं. इथे येणाऱ्यांना लिफ्टच्या अशा वेगामुळे आपण जणू पृथ्वीच्या केंद्राकडे जात असल्याचं वाटत असणार असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला.

“इथे पायऱ्या नाहीयेत का?” मी विचारलं.

“आहेत ना.” शॅवेझ म्हणाली.

लिफ्ट खाली पोचल्यावर एका अष्टकोनी खोलीमध्ये उघडली. या खोलीला आठ भिंती होत्या आणि चार दरवाजे होते. त्यातला एक म्हणजे आता आम्ही ज्या लिफ्टने आलो, तो. शॅवेझने प्रत्येक दरवाज्याकडे बोट करून पलीकडच्या बाजूला काय आहे, ते सांगितलं, “आमची नॉक रूम, कोअर नेटवर्क इक्विपमेंट रूम, आणि आमची कोलोकेशन कंट्रोल रूम, जिच्यातून तुम्ही आमच्या सर्व्हर फार्ममध्ये जाऊ शकता. मी तुम्हाला इथून थोडं दाखवू शकते, पण तिथे फक्त काही ठराविक लोकच जाऊ शकतात. याला आम्ही कोअर असं म्हणतो.”

“असं का पण?” रॅशेलने विचारलं.

“ तिथे असलेली सगळी उपकरणं आणि यंत्रसामग्री अत्यंत नाजूक आणि महागडी आहे. त्यातली बरीचशी उपकरणं आमच्याच कंपनीने निर्माण केलेली आहेत. त्यामुळे डिझाईन कॉपीराईटचाही प्रश्न आहे. आम्ही आमच्या अगदी जुन्या क्लायंट्सनासुद्धा इथे प्रवेश देत नाही.”

शॅवेझने तिचं की कार्ड नॉक रूमच्या दरवाज्याजवळ असलेल्या एका खाचेत सारलं, दरवाजा उघडला आणि आम्ही एका छोट्याश्या खोलीत आलो. इथे आम्ही तिघेही कसेबसे मावत होतो.

“बंकरमधल्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, तर आधी आतमधल्या लोकांना सांगावं लागतं. बंकरच्या प्रत्येक दरवाज्याला आम्ही एक सापळा बसवलेला आहे. मी जेव्हा कार्ड वापरून हा दरवाजा उघडला, तेव्हा आतमध्ये मी आणि माझ्याबरोबर अजून कोणीतरी आत येणार आहे, अशी सूचना दिली गेली. आत काम करणारे तंत्रज्ञ आता आपल्याला पाहू शकताहेत. त्यांना जर आपल्याला आत प्रवेश द्यायचा नसेल, तर ते हा सापळा कार्यान्वित करून आपल्याला दरवाज्यातच अडवू शकतात.”

शॅवेझने या खोलीच्या छतावर असलेला कॅमेरा आम्हाला दाखवला. तिने आपलं की कार्ड परत एका दरवाज्याच्या बाजूला असलेल्या खाचेत सारलं. तो दरवाजा उघडला, आणि आम्ही नॉक रूममध्ये प्रवेश केला. माझी जरा निराशा झाली. मला नासासारख्या एखाद्या जागेची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात मात्र फक्त दोन ओळींमध्ये भरपूर कॉम्प्युटर्स ठेवलेले होते, आणि तीन तंत्रज्ञ त्यांच्या स्क्रीन्सचं निरीक्षण करत होते. शॅवेझने आम्हाला सांगितलं की ते तापमान, वीजपुरवठा, बँडविड्थ आणि त्याच्याशिवाय संपूर्ण प्लँटमध्ये लावलेल्या २०० कॅमेऱ्यांचं फीड तपासत होते.

मला इथे कोणीही अनसबसारखं दिसलं नाही. मला पाहून कोणीही चमकलेलं किंवा गडबदलेलं दिसलं नाही. त्यांच्या चेहऱ्यांवर ‘ अजून एक क्लायंट ‘ असे वैतागलेले भाव होते. शॅवेझ आता रॅशेलशीच बोलत होती. मी कधी एकदा त्यांचं बोलणं संपतं त्याची वाट बघत उभा होतो.

“आता आपण फार्ममध्ये जाऊ या.” शॅवेझ म्हणाली.

“जरूर.” मी इथे वैतागलो होतो. ही सगळी भेट फुकट जाते की काय अशी शंका माझ्या मनात यायला सुरुवात झालेली होती.

“मी तुम्हाला आता आमच्या सी.टी.ओ.कडे घेऊन जाणार आहे. मला थोडं काम आहे. पण मी तुम्हाला इथून परत न्यायला येईन. मि.कार्व्हर, आमचे सी.टी.ओ., तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित देतील. ते आमचे सी.टी.ई. पण आहेत.”

माझ्या चेहऱ्यावर नक्कीच प्रश्नार्थक भाव उमटले असणार, कारण रॅशेलने लगेचच स्पष्टीकरण दिलं, “चीफ थ्रेट इंजिनीअर.”

“हो,” शॅवेझ म्हणाली, “आमचे स्केअरक्रो!”

आम्ही अजून एका दरवाज्यातून डेटा सेंटरमध्ये गेलो. या खोलीतले दिवे अगदी अंधुक प्रकाश देत होते. इथेही नॉक रूमप्रमाणेच एका ओळीत कॉम्प्युटर्स ठेवलेले होते. दोन अगदी तरुण मुलं तिथे बाजूबाजूला बसली होती, आणि कॉम्प्युटरवरच काहीतरी काम करत होती. आम्ही आल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी आमच्याकडे वळून पाहिलं पण नंतर लगेचच ते आपल्या कामाकडे वळले. हे नेहमीचं असावं त्यांच्यासाठी.

या सगळ्या कॉम्प्युटर्सच्या डाव्या बाजूला एक छोटं ऑफिस होतं, पण तिथे आत्ता कोणी नव्हतं, आणि त्यांच्यासमोर दोन मोठाल्या खिडक्या आणि एक काचेचा दरवाजा होता. त्यातून पलीकडे असणारे टॉवर्स दिसत होते. मी यांच्या वेबसाईटवर हेच दृश्य पाहिलं होतं. कोलोकेशन सेंटर किंवा फार्म.

“कर्ट, मि.कार्व्हर इथेच आहेत ना?” शॅवेझने त्यांच्यातल्या एकाला विचारलं. तो जेमतेम पंचविशीचा, अजून नीट मिसरूड पण न फुटलेला असा तरुण मुलगा होता. त्याने शर्ट आणि टाय घातला होता, पण जीन्स आणि टी-शर्ट त्याला जास्त शोभून दिसले असते.

“वेस्ली फार्ममध्ये गेलाय. सर्व्हर नंबर सत्याहत्तरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे.” कर्ट म्हणाला.

शॅवेझ तिथल्या एका वर्कस्टेशनपाशी गेली आणि तिने तिथे असलेला एक छोटा माईक उचलला, “मि.कार्व्हर, आपल्याकडे काही लोक आलेत भेटायला. तुम्ही इथे येऊ शकता का प्लीज?”

बराच वेळ कोणीही प्रतिसाद दिला नाही.

“मि.कार्व्हर...” तिने परत एकदा प्रयत्न केला.

परत थोडा वेळ गेला, आणि मग एक आवाज आला, “येतोय.”

शॅवेझ आमच्याकडे वळली, “ठीक आहे तर मग. इथली माहिती तुम्हाला मि.कार्व्हर देतील. मी वीस मिनिटांनी तुम्हाला परत न्यायला इथे येईन. नंतर तुम्हाला जर काही विशेष प्रश्न नसतील, तर मग आपली ही भेट संपेल.”

ती वळली, आणि एक क्षणभर तिचे डोळे तिथल्या एका खुर्चीवर ठेवलेल्या कार्डबोर्ड बॉक्सकडे वळले.

“हा बॉक्स फ्रेडचा आहे ना?” तिने त्या दोघांना विचारलं.

“हो,” कर्ट म्हणाला, “त्याला हे सगळं न्यायला वेळच मिळाला नाही. आम्हीच त्याच्या उरलेल्या गोष्टी बॉक्समध्ये ठेवल्या. आम्ही काल त्याच्या घरी हे घेऊन जाणार होतो, पण राहून गेलं.”

शॅवेझच्या कपाळावर एक क्षणभर आठ्या उमटल्या, पण ती काहीही न बोलता दरवाज्याकडे वळली.

आम्हाला त्या काचेच्या दरवाज्यातून एक माणूस येताना दिसला. त्याच्या अंगात एक पांढरा लॅब कोट होता, आणि तो सर्व्हर टॉवर्सच्या मध्ये जी जागा होती, तिथून चालत येत होता. तो एल्विसपेक्षा भरपूर उंच आणि बारीक होता, आणि किमान १५ वर्षे मोठा होता. तुम्ही वेषांतर करताना वय वाढवू शकता पण उंची कमी कशी करणार? रॅशेलने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मी हलकेच मान हलवली. हा तो माणूस नाहीये.

“आला आमचा स्केअरक्रो!” कर्ट म्हणाला.

“तुम्ही त्याला असं का म्हणता? तो उंच आणि बारीक आहे म्हणून?” मी विचारलं.

“नाही. तो या फार्मवर येणाऱ्या सगळ्या हलकट पाखरांना हाकलवून लावतो, म्हणून.”

याचा अर्थ काय असं मी विचारणार, तेवढ्यात रॅशेल बोलली, “हॅकर्स, ट्रोल्स, व्हायरस पसरवणारे. त्याच्याकडे या फार्मच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.”

एव्हाना तो माणूस काचेच्या दरवाज्यापर्यंत आला होता. त्याने त्याच्या हाताचा तळवा तिथल्या कुठल्यातरी यंत्रावर ठेवला आणि ‘क्लिक’ असा आवाज होऊन दरवाजा उघडला. त्याने बाहेर येऊन दरवाजा बंद केला. एका क्षणासाठी सर्व्हर रूममधली थंडगार हवा माझ्या अंगावरून गेली, आणि माझ्या अंगावर शहारे आले. तो आमच्या दिशेने आला आणि त्याने आपला हात पुढे केला.

“हॅलो, मी वेस्ली कार्व्हर. कसे आहात? तुम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला!"

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

शिवोऽहम्'s picture

30 Aug 2015 - 8:49 am | शिवोऽहम्

denouement!

थरारक. कार्व्हरने या दोघांना ओळखलेय पण तो तसे दाखवणार नाही. दुसरीकडे रॅशेल आणि मायकेलला त्यांचा 'अनसब' ओळखू येईल?
मॅकगिनिस आणि फ्रेड, यांच्यापैकी कोणाकडे रॅशेलच्या संशयाची सुई वळेल? कार्व्हर आणि या दोघांत काय बोलणे होईल?

पुभाप्र.

मस्त.. कार्व्हरने ओळखलेय, पण बंकरच्या आत तो काही करू शकणार नाही हे निश्चित. यांची पहिली भेट अशी होईल अशी अपेक्षाच केली नव्हती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Aug 2015 - 9:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऑसम चालु आहे. पु.भा.प्र. :)

थरार वाढतच चाललाय ,मस्त पुढचा भाग शेवटचा आहे का?

थरार वाढतच चाललाय ,मस्त पुढचा भाग शेवटचा आहे का?

अद्द्या's picture

30 Aug 2015 - 12:03 pm | अद्द्या

सामना रंगात येतोय . .

पुढला भाग येउद्या लवकर

नमकिन's picture

30 Aug 2015 - 4:48 pm | नमकिन

चे दिवस आठवतायंत, करमचंद व किट्टी.

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 4:55 pm | मांत्रिक

आयला, तुमच्या लक्षात आहे ते? काय टाईमपास होता मस्त तो. लहानपणीचं भावविश्व या व्यक्तिरेखांनी व्यापून टाकलेलं होतं.

पद्मावति's picture

30 Aug 2015 - 8:45 pm | पद्मावति

आता पुढचे भाग तर खूपच इण्टरेस्टिंग असणार आहेत.

मास्टरमाईन्ड's picture

30 Aug 2015 - 11:44 pm | मास्टरमाईन्ड

पुढे काय?

रातराणी's picture

30 Aug 2015 - 11:56 pm | रातराणी

आता रेशेलच्या बीव्हेरिअल सायन्सच्या स्किल्सची परीक्षा असणार कार्व्हरबरोबर बोलताना. याच लेखकाची द पोएट ही पण प्रसिद्ध कादंबरी आहे हे वाचण्यात आलं, ही संपली की ती पण घ्या अनुवाद करायला ;)
(हावरट आहे मी, पण तुम्हाला या लेखन प्रकाराची अनुवाद कला अप्रतिम जमलीये म्हणून विनंती)

अमृत's picture

31 Aug 2015 - 12:38 pm | अमृत

प्रत्येक शब्दाशी सहमत.

नाखु's picture

31 Aug 2015 - 9:21 am | नाखु

माहीती असल्याने फार समजली नाही पण अन्सबच्या जवळ जाऊनही रहस्यभेद कसा केला जाईल याबद्दल जाम उत्सुकता आहे.

नितवाचक नाखु

आता पुढे काय होणार? पुभालटा च!!

मोहन's picture

31 Aug 2015 - 2:07 pm | मोहन

फारच रोचक कथानक आणि अनुवाद देखील. २३वा भाग येवू द्या आता लवकर :-)

चांगली चालू आहे कथा.

वाचताना आपल्याला माहिती आहे की ते नकळतपणे खुन्याकडेच आलेत आणि त्यांना मात्र माहिती नाही. क्षणाक्षणाने जसे ते कार्व्हर भेटीजवळ जात होते, तसा तसा तणाव वाढत होता माझाच ! आता पुढच्यासाठी ४ दिवस थांबणं आलं...

पैसा's picture

1 Sep 2015 - 7:58 pm | पैसा

जबरदस्त! उंदीर मांजराचा खेळ!

इनिगोय's picture

4 Sep 2015 - 2:44 pm | इनिगोय

लवकर येउद्या पुढचा भाग, प्रतिक्षेत.

राजाभाउ's picture

4 Sep 2015 - 8:21 pm | राजाभाउ

जबरद्स्त !!!
आत्ता पर्यंतचे सगळे भाग एकदम वाचुन काढले. फारच भारी
पुभाप्र

प्यारे१'s picture

4 Sep 2015 - 9:23 pm | प्यारे१

+११११.
आज सगळे भाग वाचले आणि अडकलो.
नेश्ट पार्ट कदी?

प्यारे१'s picture

4 Sep 2015 - 9:23 pm | प्यारे१

+११११.
आज सगळे भाग वाचले आणि अडकलो.
नेश्ट पार्ट कदी?

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 9:51 pm | मांत्रिक

मी मिपावर खूप उशिरा आलो. तोपर्यंत बोकोबाचे १५-२० भाग आले होते. पण आता वा.खु. साठवली आहे. त्यावरून बोकोबाचे पूर्वीचे धागे वाचणे सोपे जाईल.
अनुवाद मस्तच हो बोकोबा!!!

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 6:53 pm | शाम भागवत