द स्केअरक्रो भाग ४

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
21 Jun 2015 - 12:13 am

द स्केअरक्रो भाग १
द स्केअरक्रो भाग २
द स्केअरक्रो भाग ३

द स्केअरक्रो भाग ४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

माझा वीकेण्डचा सगळा प्लॅन डब्यात गेला. शुक्रवारी रात्री मी घरी झोकांड्या खातच घरी गेलो. शनिवारी सकाळी नशा उतरल्यावर मी माझ्या कादंबरीचा कच्चा ड्राफ्ट उघडला आणि वाचायला सुरूवात केली आणि माझ्या पत्नीला जी गोष्ट खूप पूर्वी समजली होती ती मला जाणवली. माझ्या कादंबरीचा प्लाॅट सपशेल गंडला होता. मी स्वतःलाच फसवत होतो.
याचा अर्थ जर मला दोन आठवड्यांनंतर माझ्या कादंबरीवर काम करायचं असेल तर परत पहिल्यापासून सुरूवात करावी लागणार होती. हा विचारच हादरवणारा होता.

मी माझी गाडी परत आणायला जो शाॅर्ट स्टाॅपमध्ये गेलो तो रविवार पहाटेपर्यंत तिथेच थांबलो. डाॅजर्सना परत मार पडला आणि मी पूर्णपणे अनोळखी लोकांना टाईम्सची कशी वाट लागलेली आहे आणि पत्रकारिता हा कसा व्यवसाय न राहता धंदा झाला आहे यावर दारूच्या नशेत लेक्चर दिलं. मला पूर्णपणे भानावर यायला सोमवार सकाळ उजाडावी लागली. मी आॅफिसला जवळजवळ पाऊस तास उशिरा पोचलो. मला स्वतःला माझ्या अंगप्रत्यंगातून येणारा दारूचा वास जाणवत होता.

अँजेला कुक माझ्या टेबलापाशी बसली होती.

" साॅरी, मला उशीर झाला अँजेला! " मी म्हणालो, " वीकेण्ड पूर्णपणे गेला. शुक्रवारच्या आमच्या पार्टीला तू यायला पाहिजे होतंस. "

ती हसली. मी थापा मारतोय हे तिला कळलं होतं बहुतेक.

" मी तुझ्यासाठी थोडी काॅफी आणली होती. पण ती थंड झाली असणार. "
" थँक्स! "

तिने माझ्यासाठी आणलेला कप मी उचलला. काॅफी थंड झाली होतीच. पण टाईम्स कॅफेटेरियात फुकटात काॅफी मिळत असे. ही एक गोष्ट अजून कायम होती.

" मी काय म्हणतो, " मी म्हणालो, " मी डेस्कला विचारून बघतो की काही स्टोरी आहे का. जर नसेल तर आपण कॅफेटेरियात बसू आणि तू कसं काम सांभाळशील त्यावर चर्चा करु. "

तिला तिथेच सोडून मी मेट्रो डेस्कपाशी गेलो. वाटेतच स्विचबोर्डपाशी थांबलो. शुक्रवारी तिथे असणारी लाॅरेनच आत्ताही काम करत होती. मला पाहून तिने मला एक बोट उंचावून थांबायला सांगितलं, दोन काॅल्स निपटवले आणि हेडसेट एका कानावरुन खाली काढला.

" तुझ्यासाठी काही नाहीये जॅक. "
" ठीक आहे. मला शुक्रवारबद्दल विचारायचं होतं. तू दुपारी उशिरा वँडा सीसम्स नावाच्या एका बाईचा काॅल मला दिला होतास. तिचा काय नंबर होता ते कळेल का? मी तिला नंबर विचारला नाही. "

लाॅरेनने हेडसेट परत कानावर अडकवला, एक काॅल घेतला आणि हेडसेट न काढताच मला नंबर नसल्याचं सांगितलं. तिने नंबर कुठेही लिहून ठेवला नव्हता आणि आमच्या सिस्टिममध्ये फक्त शेवटच्या ५०० काॅल्सची नोंद असायची. वँडा सीसम्सचा काॅल दोन दिवसांपूर्वी आला होता आणि आमच्या स्विचबोर्डवर दररोज कमीतकमी हजार तरी काॅल्स यायचे.
लाॅरेनने मला 411 नंबर वापरून वँडा सीसम्सचा नंबर शोधायला सांगितलं. कधीकधी आपण साधा सरळ मार्गही विसरून जातो. हे मी आधीच करायला पाहिजे होतं. तिला धन्यवाद देऊन मी डेस्कपाशी गेलो. आमची सिटी एडिटर होती डोरोथी फाऊलर. टाईम्समधला सर्वात धोक्याचा हुद्दा. या जागेवर काम करणाऱ्या माणसाला नुसतं चांगलं पत्रकार किंवा संपादक असून चालायचं नाही तर मुरब्बी राजकारणीही असण्याची गरज असायची. फाऊलर या जागेवर आठ महिन्यांपूर्वीच आली होती. त्या आधी ती एक उत्कृष्ट पत्रकार होती. शहराच्या राजकारणातल्या बातम्या हा तिचा बीट होता. मी जरी तिचा शुभचिंतक असलो तरी एवढ्या कमी बजेटमध्ये आणि कमी लोकांबरोबर दररोज पेपर काढणं आणि बातम्यांची संख्या आणि दर्जा कायम राखणं तिच्यासाठी अशक्य आहे आणि त्यामुळे तिलाही कधीतरी इतर पर्यायांचा विचार करायला लागेल हे मला माहीत होतं.

तिचं एक छोटेखानी आॅफिस होतं पण ती नेहमीच बाहेर, लोकांमध्ये बसत असे. तिथेच असिस्टंट सिटी एडिटर्स, ज्यांना सगळेचजण एस (ACE) म्हणत असत, ते बसायचे. प्रत्येक रिपोर्टरकरिता एक एस असायचा. कुठलीही बातमी ही पहिल्यांदा त्याच्याबरोबर चर्चा करुन ठरवावी लागत असे. माझा एस होता अॅलन प्रेंडरगास्ट. पोलिस आणि कोर्टाच्या बातम्या त्याच्याकडे असायच्या. तो दुपारी आॅफिसमध्ये यायचा कारण बहुतेक वेळा पोलिस आणि कोर्टाशी संबंधित स्टोरीज दुपारनंतर किंवा संध्याकाळी ब्रेक किंवा डेव्हलप होत असत.

त्यामुळे मी सकाळी आॅफिसमध्ये आलो की आधी डोरोथी फाऊलरशी बोलत असे. तसा मायकेल वाॅरन नावाचा डेप्युटी सिटी एडिटरही होता पण मी शक्यतो डोरोथीशीच बोलायचो कारण : एक, तिचा हुद्दा वाॅरनच्या वरचा होता आणि दुसरं म्हणजे वाॅरनचं आणि माझं कधीही पटत नसे. त्याचंही कारण होतंच. टाईम्समध्ये येण्याआधी मी डेनव्हरमध्ये राॅकी माउंटन न्यूज नावाच्या पेपरसाठी काम करत होतो. त्यावेळी एका मोठ्या स्टोरीच्या संदर्भात आमची समोरासमोर गाठ पडली होती आणि तेव्हा त्याने माझ्याशी लबाडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नव्हता.

डोरोथी तिच्या काँप्युटरवर काहीतरी वाचत होती आणि तिची त्यात एवढी तंद्री लागली होती की मला तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिला जोरात हाक मारायला लागली. मला शुक्रवारी माझ्या हकालपट्टीची बातमी मिळाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. त्यामुळे डोरोथीच्या चेहऱ्यावर एखाद्याला कॅन्सर आहे हे समजल्यावर येतात तशा प्रकारच्या सहानुभूतीचे भाव आले.

" आपण आतमध्ये बसून बोलू. " ती म्हणाली.

तिच्या आॅफिसमध्ये गेल्यावर ती तिच्या टेबलच्या मागे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली आणि तिने मला बसण्याचा इशारा केला. पण मी उभाच राहिलो. मला लवकरात लवकर हा प्रकार संपवायची इच्छा होती.

" मला एवढंच म्हणायचंय जॅक, की आम्हाला इथे तुझी उणीव भासेल. "
मी मान डोलावली, " अँजेला माझ्यानंतर माझा बीट व्यवस्थित सांभाळेल. माझी खात्री आहे. "
" बरोबर आहे जॅक. ती प्रशिक्षित आहे, महत्वाकांक्षी आहे पण तिला अजून अनुभव नाहीये. आणि तोच तर मुद्दा आहे. आपला पेपर हा या शहराचा आरसा आहे. जे काही कुरूप आहे, अयोग्य आहे, भ्रष्ट आहे, चुकीचं आहे - ते सरळ आणि कुठल्याही प्रकारची तडजोड न करता दाखवणारा आरसा. पण आपण तो अननुभवी लोकांच्या हातात देतोय. आपल्या काळात आपण ज्या प्रकारची पत्रकारिता पाहिली ते आठव. आपण भ्रष्टाचार उघडकीला आणले कारण लोकांना, सामान्य माणसाला फायदा व्हायला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात फरक पडला पाहिजे. पण जर देशातला प्रत्येक पेपर याच मार्गाने चालला असेल, तर हा फरक आणणार कोण? सरकार? अशक्य. टीव्ही? इंटरनेट? ब्लाॅग्ज? माझ्या एका मित्राने फ्लोरीडामध्ये अशीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. तो म्हणत होता सध्या भ्रष्टाचार या एकाच व्यवसायात वाढ होते आहे आणि होत राहील. "

तिने रंगवलेलं चित्र तिलाच एवढं निराशाजनक वाटलं की ती थांबली.

" गैरसमज करुन घेऊ नकोस. मी प्रचंड निराश झालेय. अँजेला चांगली आहेच. ती चांगलं कामही करेल आणि पुढच्या तीन-चार वर्षांत जसा हा बीट तू चालवतो आहेस, तसाच तीही चालवेल. पण तोपर्यंत काय? किती स्टोरीज तिच्या हातून हुकतील? आणि जर तू असलास तर त्यातल्या किती स्टोरीज आपण कव्हर करु? "

मी फक्त माझे खांदे उडवले. तिच्यासाठी हे प्रश्न महत्वाचे होते. माझ्यासाठी नाहीत. अजून बारा दिवस. मग मी इथून बाहेर जाणार होतो.

" वेल् " बराच वेळ मी काहीच बोलत नाही हे पाहिल्यावर ती म्हणाली, " साॅरी. मला नेहमीच तुझ्याबरोबर काम करणं आवडलेलं आहे. "
" माझ्याकडे अजून बारा दिवस आहेत. कदाचित मी एखादी सनसनाटी स्टोरी करुन इथून जाईन."
ती प्रसन्न हसली, " ग्रेट! "
" काही स्टोरी आहे माझ्यासाठी? "
" काही विशेष नाही, " ती म्हणाली, " पोलिस चीफ आणि काळ्या समाजाचे नेते यांच्यात चर्चा होणार आहे - गुन्हे अन्वेषण प्रक्रियेमध्ये असलेला वर्णद्वेष या संदर्भात. पण या अशा स्टोरीज चावून चोथा झाल्या आहेत आपल्यासाठी! "
" मग मी अँजेलाला घेऊन पार्कर सेंटरला जातोय. आम्ही तिथे बघतो काही मिळतंय का ते. "
" ओके. "

थोड्या वेळानंतर मी आणि अँजेला कॅफेटेरियात बसलो होतो. आमच्यातलं संभाषण थोडं औपचारिक पातळीवरच चाललं होतं. मी तिला सहा महिन्यांपूर्वीच भेटलो होतो. ती नुकतीच जाॅइन झाली होती आणि डोरोथीने तिची न्यूजरुममधल्या प्रत्येकाशी ओळख करुन दिली होती. पण त्यानंतर आमचा काहीच संपर्क नव्हता. ना मी तिच्याबरोबर एखादी स्टोरी केली होती किंवा बरोबर जेवायला गेलो होतो. त्यामुळे आमच्यात अगदी जुजबी संभाषणसुद्धा झालं नव्हतं.

" तू मूळची कुठली आहेस अँजेला? "
" टँपा. मी युनिव्हर्सिटी आॅफ फ्लोरीडामध्ये शिकले. "
" अरे वा! पत्रकारिता? "
" हो. मास्टर्स. "
" तू याआधी पोलिस रिपोर्टिंग केलं आहेस कधी? "
" मास्टर्स करण्याआधी मी दोन वर्षे सेंट पीटर्सबर्गमध्ये काम केलं. त्यातलं एक वर्ष पोलिस रिपोर्टिंग केलेलं आहे मी. "

मी थोडी अजून काॅफी मागवली.मला त्याची गरज होती कारण मी गेल्या चोवीस तासांत काहीही खाल्लेलं नव्हतं. मी माझ्या पोटात गेले चोवीस तास काहीही ठेवू शकलो नव्हतो असं म्हणणं जास्त बरोबर ठरलं असतं.

"सेंट पीटर्सबर्ग? किती खून होतात तिथे? वर्षाला जेमतेम बारा? पंधरा? "
" जर आमचं नशीब जोरावर असेल तर. "

यातला विरोधाभास जाणवून ती हसली. तुम्ही जर खरे क्राईम रिपोर्टर असाल तर तुम्हाला एखाद्या सनसनाटी खुनाबद्दल लिहायला नक्कीच आवडतं. रिपोर्टरचं चांगलं नशीब याचा अर्थ दुसऱ्या कुणाचं तरी फुटकं नशीब!

" वेल् " मी म्हणालो, " इथे, एल्. ए. मध्ये जर वर्षाला चारशेपेक्षा कमी खून पडले तर आम्ही त्याला चांगलं वर्ष मानतो. राजकीय पत्रकारितेसाठी जसं डी.सी., आर्थिक पत्रकारितेसाठी जसं न्यूयॉर्क, तसं गुन्हेगारीसाठी लाॅस एंजेलिस. जर तू पुढचा बीट मिळेपर्यंत हा बीट कव्हर करणार असशील तर कदाचित तुला इथे आवडणार नाही. "
" मला हेच करायची इच्छा आहे. क्राईम रिपोर्टिंग. पोलिस रिपोर्टिंग. मला मर्डर स्टोरीज लिहायच्या आहेत. त्यानंतर त्यावर पुस्तकंही लिहायची आहेत. "

तिच्या बोलण्यावरून तरी ती सिन्सिअर वाटत होती. खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी मीही असाच होतो.

" ठीक आहे. " मी म्हणालो, " मी आता तुला पार्कर सेंटरमध्ये घेऊन जाणार आहे. तिथे मी तुझी ओळख करुन देईन. बहुसंख्य लोक हे डिटेक्टिव्हज् आहेत. ते तुला मदत करतील पण जर त्यांना तू विश्वासपात्र वाटलीस, तरच. जर त्यांना तुझ्याबद्दल खात्री नाही वाटली, तर तुला फक्त प्रेस रिलीज मिळतील पण बातम्या नाही मिळणार. "
" पण हे मी कसं करु जॅक? त्यांच्या मनात माझ्याबद्दल विश्वास कसा निर्माण होईल? "
" त्यांच्याबद्दल लिही. जे लिहिशील ते अचूक लिही आणि तुझी न्यायबुद्धी वापरून लिही. तुझं कामच तुझ्याबद्दल विश्वास निर्माण करेल. या शहरात पोलिसांचं जाळं इतकं खोलवर पसरलेलं अाहे की कुठल्याही रिपोर्टरबद्दल सगळ्यांना अगदी थोड्या वेळात माहिती मिळते. जर तू जे खरं आहे ते लिहिलंस, कोणालाही झुकतं माप दिलं नाहीस, सर्वांशी संपर्क ठेवलास तर सगळ्यांना समजेल. पण जर तू गोष्टी बदलल्यास, जाणूनबुजून माहिती लपवलीस, किंवा तिचा गैरवापर केलास, तर मग काही खरं नाही. त्यांना तेही समजेल आणि मग ते तुझी ## मारतील. तुला ## काहीही माहिती मिळणार नाही.

तिच्या कानांच्या पाळ्या माझ्या शिव्या ऐकून लाल झाल्या. पण तुम्हाला जर पोलिस आणि क्राईम रिपोर्टिंग करायचं असेल तर शिव्या द्यायची नाही तरी ऐकायची सवय तर पाहिजेच.

" अजून एक. " मी म्हणालो, " त्यांच्या कामात एक प्रकारची उदात्तता आहे. एक चांगुलपणा आहे. मी अर्थातच चांगल्या पोलिसांविषयी बोलतोय. जर हा पैलू तू तुझ्या स्टोरीमध्ये आणू शकलीस, तर तू त्यांचं मन जिंकशील. जेव्हा कधी स्टोरी करायची वेळ येईल तेव्हा असे छोटे पण सकारात्मक मुद्दे आणि तपशील शोधत राहा आणि ते लोकांसमोर मांड. "
" नक्कीच, जॅक! "
" मग तुझं काम होईलच! "

###################################################

मी आणि अँजेला जेव्हा पार्कर सेंटरमध्ये लोकांना भेटत होतो आणि मी तिची ओळख करुन देत होतो तेव्हा आम्हाला ओपन-अनसाॅल्व्हड युनिटमध्ये एक छान स्टोरी मिळाली. वीस वर्षांपूर्वी एका वयस्क स्त्रीवर बलात्कार झाला होता आणि तिची हत्याही झाली होती. त्या वेळी काहीही तपास लागला नव्हता पण त्यावेळी जमा केलेल्या नमुन्यांवरुन पोलिसांनी डी.एन्.ए. मिळवला आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित डेटाबेसशी त्याची तुलना केली. तेव्हा त्यांना एक धागा मिळाला. हा डी.एन्.ए. आता पेलिकन बेमध्ये बलात्काराच्याच गुन्ह्यावरुन शिक्षा भोगत असलेल्या एका गुन्हेगाराचा होता. आता ओपन-अनसाॅल्व्हडमधले डिटेक्टिव्हज् केस तयार करणार होते आणि त्या गुन्हेगारावर आरोप दाखल करणार होते. म्हणजे त्याला पॅरोलसुद्धा मिळाला नसता.

ही स्टोरी एवढी दणदणीत नव्हती कारण यातला खलनायक आधीच तुरुंगात गेला होता. पण आठ इंच जागा या स्टोरीला नक्कीच मिळाली असती. अशा स्टोरीज वाचायला लोकांना आवडतं. चांगल्याचा वाईटावर विजय झालेला पाहिला की लोकांचा कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावर परत विश्वास बसतो. विशेषतः आर्थिक अरिष्टांच्या काळात असा विश्वास निर्माण करणाऱ्या स्टोरीजची गरज असते.

आम्ही जेव्हा न्यूजरुममध्ये परत आलो तेव्हा मी अँजेलाला ही स्टोरी लिहायला सांगितली. या बीटवरची तिची पहिली स्टोरी. आणि मी वँडा सीसम्सला शोधायच्या मागे लागलो. तिने शुक्रवारी केलेल्या काॅलची काहीही नोंद नव्हती आणि मी 411 वर तिची माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा या नावावर कुठलाही नंबर नसल्याचं मला समजलं. आता पुढची पायरी म्हणजे पोलिस. मी सांता मोनिका पोलिस डिपार्टमेंटमधल्या डिटेक्टिव्ह गिल्बर्ट वाॅकरला फोन लावला. त्याचंच नाव प्रमुख तपास अधिकारी म्हणून दिलेलं होतं आणि त्यानेच अलोन्झो विन्स्लोला डेनिस बॅबिटच्या खुनाबद्दल अटक केली होती. मी वाॅकरला ओळखत नव्हतो कारण सांता मोनिकामध्ये एवढे गुन्हे घडत नसत. व्हेनिस आणि मालिबू यांच्यामध्ये असलेलं एक समुद्रकिनाऱ्यावर असलेलं छोटं आणि ब-यापैकी सुरक्षित शहर, एवढीच त्याची ओळख होती. तिथे बेघर लोकांचा प्रश्न गंभीर आहे हे मला माहित होतं पण गुन्हेगारी एवढी नव्हती. तिथले पोलिस वर्षाला एक वीस-पंचवीस खुनांच्या केसेस हाताळत पण बातमीयोग्य असं त्यात काहीही नसायचं. बरेच वेळा या केसेस एल्.ए. मध्ये झालेल्या खुनांच्याच असत. खून दक्षिण एल्.ए. किंवा त्याच्या अासपास झालेला असे पण खुन्याने प्रेत सांता मोनिकामध्ये फेकून दिलेलं असे. ही डेनिस बॅबिटची केस अशीच होती.

मी फोन केला तेव्हा वाॅकर त्याच्या डेस्कवरच होता. मी माझी ओळख टाईम्सचा रिपोर्टर अशी करुन देईपर्यंत त्याच्या आवाजात ब-यापैकी उत्साह होता. पण मी सांगितल्यावर त्याचा सगळा नूर बदलला. त्याच्या आवाजात एकदम तुटकपणा आला. हे मी बरेच वेळा अनुभवलेलं आहे. मी पोलिसांशी गेली वीस वर्षे संपर्कात आहे. माझा सख्खा, जुळा भाऊ पोलिस डिटेक्टिव्ह होता. अनेक डिटेक्टिव्हज् आणि युनिफॉर्ममधले आॅफिसर्स माझे मित्र आणि सोर्सेस आहेत. पण कधीकधी असं होतं की समोरचा डिटेक्टिव्ह अजिबात सहकार्य करत नाही. पोलिस आणि कुठलंही प्रसारमाध्यम - वर्तमानपत्रं, मासिकं, रेडिओ, टीव्ही आणि आता इंटरनेट - हे कधीही एकमेकांचे कायमचेे मित्र बनू शकत नाहीत. प्रसारमाध्यमांना पोलिसांवर आणि पर्यायाने सरकारवर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी वाटते आणि कोणालाही स्वतःवर कोणाचं तरी सतत लक्ष असणं आवडत नाही. पोलिसांना तर अजिबातच नाही. एल्. ए. मध्ये तर १९९२ च्या वांशिक दंगलींनंतर पोलिस आणि माध्यमं यांच्यात एक दरी निर्माण झाली होती आणि दोन्हीही बाजूंनी ती कमी करण्याचे कुठलेही प्रयत्न केले जात नव्हते.

" काय करु शकतो मी तुझ्यासाठी? " वाॅकर तुटकपणे म्हणाला.
" मी अलोन्झो विन्स्लोच्या आईशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय. तू मला काही मदत करु..."
" हा अलोन्झो विन्स्लो कोण? "
' बस काय ' असे शब्द माझ्या तोंडून निघता निघता थांबले. माझ्या लक्षात आलं की पोलिसांनी हा पोरगा अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव कुठेही उघड केलं नसणार. या बाबतीत कायदे अतिशय कडक होते.

" बॅबिट केसमधला संशयित. "
" तुला त्याचं नाव कसं माहित? मी असं म्हणत नाहीये की हे त्याचं नाव आहे. "
" ओके डिटेक्टिव्ह. मला माहीत आहे त्याचं नाव. मी तुम्हाला त्याच्या नावाची खात्री करुन घ्यायला फोन केलेलाच नाही. त्याच्या आईने मला शुक्रवारी फोन करुन हे नाव दिलं. पण तिने मला तिचा फोन नंबर नाही दिला. जर तू.... "
" हॅव अ नाईस डे! " वाॅकरने फोन ठेवून दिला.

मी अँजेलाला याआधी जे पोलिसांमधल्या उदात्ततेबद्दल सांगितलं होतं त्याच्याबरोबर हेही सांगायला हवं होतं की सगळेच पोलिस उदात्त वगैरे नसतात.
" स्साला ###@@ " मी जोरात शिवी हासडली.

हा एक मार्ग बंद झाल्यावर आता या बाईचा फोन नंबर कसा मिळवायचा याचा विचार करणं भाग होतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. हे मी आधीच करायला पाहिजे होतं.

माझ्या ओळखीचा एक डिटेक्टिव्ह लाॅस एंजेलिस पोलिस डिपार्टमेंट किंवा एल्एपीडीच्या साऊथ ब्यूरोमध्ये होता आणि मला खात्रीलायक माहिती होती की विन्स्लोच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस तुकडीतही तो होता. मी त्याला फोन लावला.

केस नोंदवली गेली सांता मोनिकामध्ये कारण डेनिस बॅबिटचा मृतदेह तिच्या गाडीच्या ट्रंकमध्ये किंवा डिकीमध्ये सापडला होता. ही गाडी जेट्टीच्या जवळ असलेल्या पार्किंग लाॅटमध्ये मिळाली होती. एल्एपीडीचा संबंध येण्याचं कारण म्हणजे पोलिसांना मिळालेला पुरावा. त्यावरून त्यांना दक्षिण एल्. ए. मध्ये राहात असलेल्या अलोन्झो विन्स्लोचा पत्ता सापडला. त्यावरून सांता मोनिका पीडीने एल्एपीडीशी संपर्क साधला आणि साऊथ ब्यूरोमधल्या डिटेक्टिव्हजचा एक गट, ज्याला दक्षिण एल्. ए. ची संपूर्ण माहिती होती, त्याला अटक करायला गेला. नेपोलियन ब्रेसल्टन, ज्याला मी आत्ता फोन केला होता, तो या गटात होता. मी त्याला प्रामाणिकपणे मला काय हवं आहे ते सांगणार होतो.

" दोन आठवड्यांपूर्वी तुम्ही एका ड्रग डीलरला त्या ट्रंकमधल्या मुलीच्या खुनासंदर्भात उचललं होतं, आठवलं का? "
" हो. पण ती तर सांता मोनिकाची केस आहे. आम्ही त्यांना फक्त मदत केली होती. "
" हो. माहीत आहे मला. तुम्ही त्यांच्यासाठी विन्स्लोला अटक केलीत. मी त्याच संदर्भात फोन केलाय. "
" ती अजूनही त्यांचीच केस आहे. "
" मान्य, पण मला वॉकरकडून काहीही माहिती मिळालेली नाही आणि मी तिथल्या कोणालाही ओळखत नाही. पण मी तुला ओळखतो. आणि मला त्याला झालेल्या अटकेबद्दल विचारायचंय, या केसबद्दल नाही. "
" का? काही घोटाळा झालाय की काय ? आम्ही त्या पोराला काहीही केलेलं नाही. त्याला सरळ सांता मोनिका पीडीच्या हातात दिलाय. "
" तसं काहीही झालेलं नाही. तुम्ही त्याला अटक केलीत त्याच्यात काहीही बेकायदेशीर नाही. मी फक्त त्याचं घर शोधायचा प्रयत्न करतोय. त्याच्या आईशी बोलायचं आहे मला."
" आई? हा पोरगा त्याच्या आजीबरोबर राहतो. "
" नक्की? "
" आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार तो आजीबरोबर राहतो. त्याचा बाप बेपत्ता आहे आणि त्याला कुणीही पाहिलेलं पण नाही. त्याची आई ड्रग अॅडिक्ट आहे आणि ती रस्त्यावरच असते. तुला समजलं असेलच. "
" ठीक आहे. मी आजीशी बोलेन. पत्ता काय आहे? "
" तू फक्त तिला हॅलो म्हणायला जाणार आहेस? " तो अशा पद्धतीने हे म्हणाला की मला समजलं की मी गोरा असल्याने अलोन्झो विन्स्लोच्या घराजवळ मला कुणी न कुणी तरी हटकतीलच.
" काळजी करू नकोस. मी कोणाला तरी घेऊन जाईन. एक से भले दो."
" गुड लक! माझी ड्यूटी चार वाजता संपते. काय जो गोंधळ घालायचाय तो त्याच्यानंतर घाल. "
" प्रयत्न करतो. पत्ता सांगतोयस ना ? "
" रोडिया गार्डन्समध्ये आहे. एक मिनिट थांब. " पत्ता शोधण्यासाठी त्याने फोन बाजूला ठेवला. रोडिया गार्डन्स म्हणजे लॉस एंजेलिसच्या वॅटस् भागातली एक कुप्रसिद्ध वस्ती. सुप्रसिद्ध कलाकार सायमन रोडिया, ज्याने वॅटस् टॉवर्स उभारले, त्याच्यावरुनच या वस्तीचं नाव पडलं होतं. पण रोडिया गार्डन्सचा आणि कलेचा काहीही संबंध नव्हता. तिथे जुनी, ब-याच वर्षांपूर्वी बांधलेली घरं होती आणि लोक तिथे पिढ्यानपिढ्या राहात होते. गरिबी, गुन्हेगारी आणि ड्रग्स यांचं साम्राज्य. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे इच्छा असूनही लोकांना इथून बाहेर पडणं अशक्य होतं. कितीतरी लोकांनी साधा विमानप्रवास पण केलेला नसेल.

ब्रेसल्टनने मला पूर्ण पत्ता दिला पण त्याच्याकडे फोन नंबर नव्हता. मी त्याला विन्स्लोच्या आजीचं नाव विचारलं. " वँडा सीसम्स," तो म्हणाला.

ग्रेट! हिनेच मला फोन केला होता. एकतर ती तरी आपण अलोन्झोची आई आहोत हे खोटं बोलली होती, किंवा पोलिसांचा तरी गोंधळ झाला होता. काहीही असलं तरी मला आता पत्ता मिळाला होता.

मी तिथून फोटो डिपार्टमेन्टमध्ये गेलो. आमचा फोटो एडिटर बॉबी अझ्मितिया कुठल्यातरी कामासाठी निघतच होता. मी त्याला कोणी फोटोग्राफर मोकळा आहे का ते विचारलं. त्याने मला दोघांची नावं सांगितली. दोघेही बाहेर असाईनमेंटवर होते आणि आता परत येत होते. मी दोघांनाही ओळखत होतो. त्यातला एक काळा होता. मी अझ्मितियाला सोनी लेस्टरला घेऊन जातोय असं सांगितलं. अझ्मितियाने त्याच्याशी बोलून आमची १५ मिनिटांनंतर भेट ठरवली. टाईम्सच्या ग्लोब लॉबीमध्ये तो मला भेटणार होता.

दरम्यान मी अँजेलाची स्टोरी तपासली. माझा एस प्रेंडरगास्टही आलेला होता. तो दिवसाचं पहिलं स्टोरी बजेट बनवत होता. मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, " मला अँजेलाने स्लग दिलेला आहे. " स्लग म्हणजे स्टोरीचं शीर्षक. हे बहुतेक वेळा एका शब्दात असतं. बजेट किंवा बजेट लाईन म्हणजे त्या स्टोरीचं एका वाक्यात वर्णन. जेव्हा दररोजच्या न्यूज मीटिंगसाठी सगळे संपादक एकत्र बसतात तेव्हा त्यांना स्लग आणि बजेट यावरून किती बातम्या आहेत त्याचा अंदाज येतो. मग त्यातल्या वेब एडिशनसाठी किती, प्रिंट एडिशनसाठी किती - हे ठरतं. कुठल्या बातम्या महत्वाच्या, कुठल्या नाहीत, कुठल्या बातम्या कुठल्या पानावर - हे सगळंही ठरतं.

" हो. तिने चांगली लिहिली आहे स्टोरी, " मी म्हणालो, " मी तुला हे सांगायला आलो की मी स्टोरीसाठी बाहेर जातोय. दक्षिण एल.ए.आणि फोटोग्राफरला घेऊन जातोय. "

" काय आहे स्टोरी ?"

" अजूनतरी काही स्पष्ट झालेलं नाही. नंतर सांगू शकेन तुला. "

" ओके. "

प्रेन्डो माझ्या बाबतीत नेहमीच असा होता. त्याच्या बाकीच्या रिपोर्टर्सशीही तो असाच मोकळा वागत असे. मला त्याला फक्त मी काय करतोय आणि कोणती स्टोरी करतोय हे सांगावं लागायचं. पण मी सगळी स्टोरी व्यवस्थित बनवेपर्यंत त्याला नाही सांगितलं तरी त्याला चालायचं.

मी निघालो.

" गॉट डाईम्स? " त्याचा आवाज आला. मागे वळून न पाहता मी फक्त हात उंचावला.

मी जेव्हा कधी एखादी स्टोरी कव्हर करायला बाहेर जात असे , तेव्हा प्रेन्डो हमखास हा प्रश्न विचारत असे. हा रोमन पोलान्स्कीच्या ' चायनाटाऊन ' मधला एक संवाद होता. डाईम्स म्हणजे पंचवीस सेंटसची नाणी. पूर्वीचे रिपोर्टर्स बातमी मिळाली की पे फोनवरून ऑफिसमध्ये फोन करून कळवायचे. त्यासाठी ही नाणी लागायची. आज जरी तसं होत नसलं तरी या मागची भावना कायम होती. संपर्कात राहा.

#################################################################################

ग्लोब लॉबी म्हणजे टाईम्सच्या इमारतीचं अधिकृत प्रवेशद्वार. एक प्रचंड मोठा पृथ्वीगोल तिथे कायम एका अक्षाभोवती फिरत असे. त्यावर टाईम्सचे संपूर्ण जगामधले ब्यूरो, जिथे म्हणून टाईम्सचे प्रतिनिधी आहेत ती जगातली सगळी शहरं - या सगळ्यांची नोंद होती. यातले किती आज अस्तित्वात होते आणि किती पैसे नाहीत म्हणून बंद झाले होते हे कोणाला माहित पण नसेल. संगमरवरी भिंतींवर आमच्या पेपरने आजपर्यंत केलेल्या दैदिप्यमान कामगिऱ्या होत्या. ज्या स्टोरीजना पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं त्यांना कव्हर करणाऱ्या पत्रकारांचे फोटो होते. त्याचबरोबर स्टोरी कव्हर करताना मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांचेही फोटो होते. पण हे सगळं किती दिवस राहणार आहे याची चिंता प्रत्येकालाच भेडसावत होती. ही इमारत विकली जाणार आहे अशीही अफवा मी ऐकली होती.

पण माझ्यासाठी पुढच्या बारा दिवसांमध्ये हे सगळं संपून जाणार होतं. शेवटची डेडलाईन आणि शेवटची स्टोरी. तोपर्यंत हा पृथ्वीगोल फिरत राहावा अशी माझी इच्छा होती.

सोनी लेस्टर टाईम्सच्या गाडीत माझी वाट पाहात थांबला होता. मी गाडीत बसलो आणि त्याला पत्ता सांगितला. त्याने एक मोठा यू टर्न घेतला आणि थोड्याच वेळात आम्ही दक्षिण एल.ए. च्या रस्त्याला लागलो.

" मी या असाईनमेंटवर आहे हा योगायोग नाहीये तर ! " आम्ही थोडं पुढे आल्यावर तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहून खांदे उडवले.

" मला काय माहित? अझ्मितियाला विचार. मी त्याला म्हणालो की मला कोणीतरी पाहिजे आणि त्याने मला तुझं नाव दिलं. "

लेस्टरच्या चेह-यावर अविश्वासाचे भाव होते. मला अर्थातच काही फरक पडत नव्हता. जवळजवळ सगळी प्रसारमाध्यमं वर्णभेद आणि वंशभेद यांच्या विरोधात असतात किंवा आहेत. पण व्यवहार हा व्यवहार असतो. जर टोकियोमध्ये विनाशकारी भूकंप झाला, तर जपानी रिपोर्टरला पाठवा. जर ऑस्कर जिंकणारी अभिनेत्री काळी असेल तर तिची मुलाखत घ्यायला काळाच रिपोर्टर पाठवा. जर सीमा सुरक्षा दलाने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या मेक्सिकनांना पकडलं तर हे कव्हर करायला तुमचा स्पॅनिश बोलणारा रिपोर्टर पाठवा. जर तुम्हाला स्टोरी हवी असेल तर हे सगळे प्रकार करायला लागतात. लेस्टरच्या वर्णामुळे आम्ही दोघेही रोडिया गार्डन्ससारख्या भागात सुरक्षित राहिलो असतो. मला या गोष्टीने नक्कीच फरक पडत होता कारण मला स्टोरी करायची होती.

लेस्टरने अर्थातच प्रश्न विचारले पण मी त्याला मला जेवढी माहिती होती, तेवढीच देऊ शकलो, की या मुलाला पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून पकडलंय आणि त्याच्या आजीने शुक्रवारी मला फोन करून तो निर्दोष असल्याचं ठासून सांगितलंय. तिला शोधून काढून खरं काय आहे ते मला जाणून घ्यायचंय आणि तिच्या नातवाला सोडवण्यासाठी काही करता येतं का ते बघायचंय.

माझा खरा प्लॅन मी त्याला सांगितलाच नव्हता. पण तो एवढा हुशार तर नक्कीच होता की त्याच्या लक्षात तो आलाच असता.

मी त्याला सगळी पार्श्वभूमी दिल्यावर लेस्टरने मान डोलावली आणि उरलेला प्रवास आम्ही शांततेत केला. रोडिया गार्डन्समध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा दुपारचा १ वाजला होता. सगळीकडे शांतता होती. मुलं अजून शाळेतून घरी आली नव्हती आणि संध्याकाळ होईपर्यंत ड्रग्ज विकणारे आणि विकत घेणारे बाहेर पडणार नव्हते. बहुतेक झोपलेले असावेत.

संपूर्ण रोडिया गार्डन्स म्हणजे दुमजली इमारतींनी बनलेला एक भुलभूलैया होता. सगळ्या इमारतींना दोनच रंग. एक तर तपकिरी आणि राखाडी नाहीतर मग हिरवा आणि बेज. इमारतींच्या समोर झाडं-झुडुपं वगैरे नव्हती, कारण त्यांचा वापर ड्रग्ज आणि हत्यारं ठेवण्यासाठीही केला जाऊ शकतो. तो धोका कोणीही पत्करलेला नव्हता.

एखाद्या पहिल्यांदाच आलेल्या किंवा हा कोणत्या प्रकारचा भाग आहे हे माहित नसलेल्या माणसाला रोडिया गार्डन्स म्हणजे नवीन बांधकाम वाटलं असतं. पण जवळून निरखून पाहिल्यावर हे लक्षात येत होतं की बांधकाम आणि रंग नवीन नाहीयेत.

सुदैवाने आम्हाला पत्ता लगेचच सापडला. एका कडेला ही इमारत होती. पत्ता दुसऱ्या मजल्यावर होता. लिफ्ट अर्थातच नव्हती आणि एकच जिना होता.

लेस्टरने त्याची मोठी कॅमेरा बॅग बाहेर काढली आणि गाडी लॉक केली.

" एवढ्या सगळ्या सामानाची गरज आहे? तिने जर तुला फोटो काढायला परवानगी दिली तर तुला पटापट सगळं आवरायला लागेल. "
" मला एकही फोटो नाही मिळाला तरी चालेल. मी हे सामान गाडीत सोडून नाही जाणार. "
" बरोबर!"

जेव्हा आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोचलो तेव्हा या घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. त्याच्या पाठी असलेल्या दरवाजाला गज होते. मी पुढे झालो आणि दार ठोठावण्याआधी आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. खाली गाड्यांचा पार्किंग लॉट पूर्णपणे निर्मनुष्य होता.

मी दरवाजा ठोठावला, " मिसेस सीसम्स?"

मी थांबलो. थोड्याच वेळात मला आवाज ऐकू आला. शुक्रवारी माझ्याशी बोललेल्या बाईचाच होता.

" कोन पायजे? "
"मी जॅक मॅकअॅव्हॉय. तुम्ही मला शुक्रवारी फोन केला होता. मी टाईम्समधून आलोय."

तिथे एक पडदा होता. त्याच्यावर सगळ्या दुनियेभरची धूळ साठली होती. मला घरात काय आहे ते दिसत नव्हतं.

" तुला काय पायजे पोरा?"
" मी तुमच्याशी बोलायला आलोय. तुम्ही फोनवर जे बोललात त्यावर मी विचार केला आणि … "
" पन तू मला शोधून कसा काडलास? "

तिचा आवाज ज्या प्रकारे येत होता त्यावरून ती आता त्या पडद्याच्या दुसऱ्या बाजूला असावी असा मी तर्क केला. मला तिचा चेहरा मात्र दिसत नव्हता.

" अलोन्झोला इथूनच पोलिसांनी उचलून नेला हे समजलं मला. त्यावरून मी तुमचा पत्ता शोधला. "
" तुझ्यासंगत कोन हाय? "
" सोनी लेस्टर. तो माझ्याचबरोबर पेपरमध्ये काम करतो. मी इथे आलो कारण तुम्ही मला फोनवर जे सांगितलंत त्यावरून मी आता अलोन्झोच्या केसमध्ये काय झालंय ते शोधून काढणार आहे. जर त्याने काही केलेलं नसेल तर मला त्याला मदत करायची आहे. "

मी ' जर ' या शब्दावर जोर दिला होता. ' जर ' अलोन्झो निर्दोष असेल तर.

" त्यानं काय नाय केलेलं. मी सांगते ना."
" आम्ही आत येऊ का? म्हणजे आपल्याला बोलता येईल, " मी पटकन म्हणालो.
" आत या तुमी दोगंबी पन फोटूबिटू नाय हां काडायचा! "

आतला दरवाजा काही इंच उघडला. मी आणि सोनी आत गेलो.

दरवाज्यात उभी असलेली बाई अलोन्झोची आजी होती हे मी ताबडतोब ओळखलं. जवळजवळ साठ वर्षांची होती ती. केस बऱ्यापैकी पांढरे. ती एखाद्या पेन्सिलएवढी बारीक होती. तिने हवा एवढी थंड नसूनही स्वेटर घातला होता. तिने फोनवर स्वतःला त्याची आई म्हणून का सांगितलं याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होती पण त्याने काही फार फरक पडत नव्हता. कदाचित तिनेच त्याला आईप्रमाणे सांभाळलं असेल. कळेलच थोड्या वेळात.

तिने एका छोट्या सोफ्याकडे बोट केलं. त्याच्यासमोर एक जुनं कॉफी टेबल होतं. आजूबाजूला सगळीकडे घडी घालून ठेवलेले कपडे होते. अनेकांवर कागदाचे तुकडे होते. त्यांच्यावर नावं लिहिलेली होती. आतमध्ये कुठेतरी
वॉशिंग मशीन चालू असल्याचा आवाज येत होता. ही घरं सरकारने दिलेली होती आणि अशा घरांमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायला बंदी असते. कदाचित म्हणूनच तिने फोटो नको म्हणून सांगितलं असेल.

" ती कापडं बाजूला ठेव," ती म्हणाली, " आन् आता मला सांग तू माझ्या झोसाठी काय करनारेस ते!"

तिने सांगितल्याप्रमाणे करून मी आणि सोनी बसलो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इथल्या कुठल्याही कपड्यांचा रंग लाल नव्हता. रोडिया गार्डन्स क्रिप्स गँगचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे त्यांचे शत्रू असलेल्या ब्लड गँगचा रंग दिसणं म्हणजे हाणामारी किंवा गोळीबार ठरलेला.

सोनी लेस्टरने त्याची कॅमेरा बॅग त्याच्या पायांच्या मध्ये ठेवली होती. त्याच्या हातात कॅमेरा होता. तो त्याने बॅगमध्ये परत ठेवून दिला.

आम्ही बसलेलो असलो तरी वँडा सीसम्स उभीच होती. तिने जवळची एक लाँड्री बास्केट उचलली आणि कॉफी टेबलवर ठेवली आणि त्यातल्या कपड्यांच्या घड्या घालायला सुरुवात केली.

" वेल्, " मी म्हणालो, " मला झोच्या केसमध्ये नक्की काय घडलंय ते शोधून काढायचंय आणि जर तो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निर्दोष असला तर मी त्याला तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन. "

मी आत्ताही ' जर ' वर माझा जोर ठेवला होता.

" असा कसा तू त्याला बाहेर काडनार पोरा ? मेयर येवडा वकील पन तो आजून झोला कोरटात पन उभं नाय करू शकला. "
" मेयर? अलोन्झोचा वकील? "
" हो. सरकारने दिलेला वकील. तो ज्यू हाय "

हे बोलताना तिच्या आवाजात थोडा अभिमान होता. जणू ज्यू वकील मिळणं म्हणजे तिच्या नातवाला मोठा मान मिळाला होता.

" मी त्यांच्याशी बोलेनच मिसेस सीसम्स. पण कधी कधी काय होतं की एक पेपर खूप काही करू शकतो, जे दुसरं कोणी नाही करू शकत. जर मी पेपरमध्ये लिहिलं की अलोन्झोने काहीही केलेलं नाही आणि तो निर्दोष आहे, तर लोक लक्ष देतील. तेच जर एखादा वकील म्हणाला तर नाही देणार कारण ते नेहमी त्यांच्या क्लायंट बद्दल असंच म्हणतात. मग प्रत्यक्षात तो निर्दोष असो किंवा नसो. तुम्ही ती ' लांडगा आला रे आला ' असं ओरडणा-या मुलाची गोष्ट ऐकली असेल. त्यात जेव्हा खरोखर लांडगा आला तेव्हा लोकांनी विश्वासच ठेवला नाही. तसंच वकिलांचं झालंय. खरोखरच त्यांचा क्लायंट निर्दोष असेल तरी लोक आता विश्वास ठेवत नाहीत. "

मी हे सगळं बोलत असताना ती माझ्याकडे फक्त बघत होती. तिच्या चेह-यावर एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. ती संभ्रमात तरी पडली होती किंवा मग मी तिला फसवतोय असं तिला वाटत असावं. तिला विचार करायला वेळ देण्याऐवजी मी माझं बोलणं चालू ठेवलं.

" जर तुम्हाला वाटत असेल की मी झोच्या बाबतीत खरोखर काय झालंय ते शोधून काढावं, तर तुम्ही मि. मेयरना फोन करा आणि त्यांना माझ्याशी सहकार्य करायला सांगा. मला कोर्ट फाईलं आणि डिस्कव्हरी फाईलं या दोन्ही बघायला लागतील.
" हे काय आनखी? असं काय मेयरकडे हाय असं मला नाय वाटत. "
" डिस्कव्हरी म्हणजे सरकारकडे जो पुरावा आहे किंवा जो त्यांनी शोधून काढलेला आहे. तो सगळा पुरावा त्यांना झोच्या वकिलाला द्यावाच लागेल. तोच मला बघायचा आहे. तेव्हा मला कळेल की खरी परिस्थिती काय आहे. मग मी झोला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकेन. "

तिचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हतं. कपड्यांच्या बास्केटमधून तिने एक लाल रंगाची अंडरवेअर बाहेर काढली. एखाद्या मेलेल्या उंदराला धरावा तशी तिने ती अंडरवेअर धरली होती.

" पहा आता या पोरीला. काय अक्कल हाय का नाय हिला, " असं काहीसं पुटपुटत तिने ती अंडरवेअर कचऱ्याच्या डब्यात टाकली.

मी परत संभाषण चालू केलं, " मिसेस सीसम्स, मी डिस्कव्हरीबद्दल जे बोललो ते समजलं का तुम्हाला? मी ..."
" पन तू हे कसं सांगनार पोलिसांना? तुझी सगली माहिती तर ठुल्लेच देनार तुला आणि ते तर झाडावरच्या सापासारखे खोटारडे मेले! "

ती काय बोलते आहे हे समजायला मला थोडा वेळ लागला. तिने पोलिसांबद्दल रस्त्यावर वापरला जाणारा शब्द आणि धार्मिक संदर्भ एकदम वापरल्याने माझा गोंधळ झाला.

" मी सगळी माहिती स्वतः गोळा करीन आणि मी ठरवेन की खरं काय आहे आणि खोटं काय आहे, " मी म्हणालो, " मी जेव्हा गेल्या आठवड्यात ती स्टोरी लिहिली तेव्हा मी फक्त पोलिस जे म्हणाले तेच सांगितलं. पण आता मी स्वतः शोधून काढीन की खरी परिस्थिती काय आहे. जर तुमचा झो निर्दोष असेल तर मला समजेल. आणि मी तसं लिहीन. मग आपण झोला बाहेर काढू शकू. "
" मंग ठीक हाय. देव तुला माझ्या पोराला सोडवायला मदत करेल बग!"
" पण मला तुझी पण मदत लागेल वँडा! " मी आता एकदम तिचं नाव घेतलं. तिला ती या सगळ्यात सहभागी आहे असा विचार करायला लावण्याची गरज होतीच.

" माज्या झोसाठी मी कायबी करेन. " ती म्हणाली.

" ठीक आहे, " मी म्हणालो, " मग मी आता तुला काय करायचंय ते सांगतो. "

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

हळूहळू कादंबरी ग्रिप घेऊ लागली आहे!

पुभाप्र.

आतिवास's picture

21 Jun 2015 - 1:23 am | आतिवास

वाचते आहे.

अजया's picture

21 Jun 2015 - 9:04 am | अजया

वाचतेय!पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

21 Jun 2015 - 2:37 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

मजा आली.....

मोहनराव's picture

22 Jun 2015 - 4:37 pm | मोहनराव

वाचत आहे. पुढचे भाग पटापट टाका पाहु. :)

मृत्युन्जय's picture

22 Jun 2015 - 6:23 pm | मृत्युन्जय

और आने दो.

वॉल्टर व्हाईट's picture

22 Jun 2015 - 9:59 pm | वॉल्टर व्हाईट

पुढील भागाची वाट बघतोय. असे वाटते की ४-५ भाग साठु द्यावेत अन एकदमच वाचावेत.

पैसा's picture

27 Jun 2015 - 10:50 pm | पैसा

मस्त!

शाम भागवत's picture

27 Dec 2015 - 11:32 am | शाम भागवत