द स्केअरक्रो - भाग ‍८

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
5 Jul 2015 - 7:45 am

द स्केअरक्रो भाग ७

द स्केअरक्रो - भाग ‍८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

पार्कर सेंटर - एल.ए. पोलिस डिपार्टमेंटचं मुख्य ऑफिस - आपल्या शेवटाकडे चाललं होत. शेवटची घरघर लागली होती असं म्हटलं तरी चालेल. जवळजवळ पन्नास वर्षे पोलिसांनी इथूनच शहरातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली. काही लोकांच्या मते पार्कर सेंटरमधून पोलिस डिपार्टमेंट दहा वर्षे उशिरा बाहेर पडत होतं . जे काही असेल ते पण या इमारतीने शहराची सेवा चांगली केली. दोन मोठ्या वांशिक दंगली, अगणित निदर्शनं, अनेक गुन्हे - या सगळ्यांशी पार्कर सेंटरचा संबंध आला होता. मी आत्ता ज्या प्रेस कॉन्फरन्ससाठी चाललो होतो तशा तर भरपूर झालेल्या होत्या इथे. पण आता जशी एका वयानंतर माणसं थकतात तशी ही इमारतही थकली होती. एखादा मोठा भूकंप झाला किंवा पूर आला तर पार्कर सेंटरचं काय होईल यावर टीव्हीवर गेली ५-७ वर्षे चर्चा चालू होत्या. अनेक वेळा डिटेक्टिव्हज् इथल्या ऑफिसेसमध्ये यायचेच नाहीत कारण जर एखादा मोठा उत्पात झाला तर आणि आपण इथेच अडकलो तर काय? अशी सार्थ भीती त्यांना वाटायची.

पार्कर सेंटरची जागा घेणारी सुंदर इमारत आता बांधून पूर्ण होत आली होती. काही आठवड्यांचाच प्रश्न होता. ही इमारत स्प्रिंग स्ट्रीटवर, एल. ए. टाईम्सच्या इमारतीच्या शेजारीच होती. पुढच्या पन्नास-साठ वर्षांसाठी. पण मी मात्र तेव्हा तिथे नसणार होतो. माझी सुंदर सहकारी माझा बीट सांभाळणार होती. पार्कर सेंटरच्या प्रचंड हळू जाणाऱ्या लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर जात असताना मला हे जाणवलं की पार्कर सेंटरविषयी आता मला एवढी आपुलकी वाटण्याचं कारण म्हणजे आमची दोघांचीही अवस्था साधारण सारखीच होती. जुनेपुराणे आणि निरुपयोगी.

प्रेस कॉन्फरन्स मीडिया रूममध्ये होती. मी पोचलो तेव्हा ती कधीची सुरु झाली होती. मला मीडिया रूमच्या दरवाज्यावर एका गणवेशधारी पोलिसाने अडवलं. मी माझं ओळखपत्र दाखवल्यावर त्याने माझ्या हातात एक प्रेस हँडआऊट दिला आणि मला आत सोडलं.

दरवाज्याजवळ सगळे कॅमेरामेन उभे होते आणि क्षणन् क्षण टिपत होते. मी एक रिकामी खुर्ची बघून तिच्यावर बसलो. मी या रूममध्ये बऱ्याच वेळा आलो होतो. आज त्या मानाने लोक कमी होते कारण नार्कोटिक्सने टाकलेल्या धाडीविषयी कॉन्फरन्स होती. एखाद्या सनसनाटी खून किंवा वांशिक दंगलीबद्दल वगैरे असती तर उभं राहायलाही जागा मिळाली नसती. लॉस एंजेलिसमधल्या नऊ स्थानिक केबल चॅनेल्सपैकी पाच जणांचे प्रतिनिधी आलेले होते. दोन रेडिओ रिपोर्टर्स होते. तीन-चार पेपरवाले पण होते. अँजेला दुसऱ्या रांगेत बसलेली होती. तिच्या छोट्या लॅपटॉपवर ती काहीतरी टाईप करत होती. बहुधा आमच्या वेब एडिशनसाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय घडलं ते लाईव्ह फाईल करत होती.

मी हातातला प्रेस हँडआऊट वाचायला सुरुवात केली. एकच परिच्छेद होता. त्यात जे म्हटलं होतं त्यावर पोलिस चीफ आणि ग्रॉसमन बोलणार होते. या हँडआऊटचा साधारण सारांश असा होता की डेनिस बॅबिटच्या हत्येनंतर (जी रोडिया गार्डन्समध्ये झाली असावी असं पोलिसांना वाटत होतं) एल.ए.पी.डी. साउथ ब्यूरोच्या नार्कोटिक्स पथकाने एक पूर्ण आठवडा तिथे चालणाऱ्या ड्रग्जच्या व्यापाराची अत्यंत काटेकोर टेहळणी केली आणि आज पहाटे बारा घरांवर धाड टाकून सोळा संशयित ड्रग डीलर्सना अटक केली. या अटक झालेल्यांमध्ये अकरा जण प्रौढ तर पाच अल्पवयीन होते. हेरॉइन, क्रॅक कोकेन आणि मेथाअँफेटामाईन यांचा मोठा साठाही जप्त करण्यात आलेला होता. याशिवाय सांता मोनिका पोलिस आणि डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस यांनी याच हत्येसंदर्भात तीन सर्च वॉरंट्स बजावली होती . या आणि इतर काही हत्यांच्या संदर्भातला अतिरिक्त पुरावा शोधणं हा या वॉरंट्सचा उद्देश होता.

आता इतक्या वर्षात मी हजारो प्रेस रिलीजेस वाचलेले असल्यामुळे यातली मखलाशी माझ्या लगेच लक्षात आली. ड्रग्जचा मोठा साठा असं म्हटलंय, पण नक्की किती हे दिलेलं नाही याचा अर्थ जेवढी ड्रग्ज मिळाली ती अपेक्षेपेक्षा एवढी कमी होती की जर ते जाहीर झालं असतं तर पोलीसांचंच हसं झालं असतं. शिवाय अतिरिक्त पुरावा शोधणं हा उद्देश होता याचा अर्थ काहीही पुरावा मिळालेला नाही कारण जर असा काही पुरावा मिळाला असता तर पोलिस आणि डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस यांच्यात श्रेय घेण्यावरून चढाओढ लागली असती आणि हा पुरावा सगळ्यांना बघायलाही मिळाला असता.

पण यात मला तसा काही रस नव्हता. मला जाणवलेली गोष्ट ही होती की जर ही धाड डेनिस बॅबिटच्या हत्येमुळे पडली असेल तर त्यामुळे नक्कीच वांशिक तणाव वाढणार होता, कारण ती गोरी होती आणि तिच्या खुनाचा आरोप असलेला काळा होता. माझ्या स्टोरीचं महत्व त्यामुळे वाढणार होतं कारण मी खरं काय घडलंय ते शोधायचा प्रयत्न करणार होतो. आमच्या लोकांना माझी स्टोरी स्वीकारणं भागच पडलं असतं.

प्रेस रिलीज वाचून मी समोर पाहिलं तर चीफनी ग्रॉसमनच्या हातात माईक दिला होता. त्याने पाॅवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने माहिती द्यायला सुरुवात केली. अटक केलेल्या लोकांपैकी अकरा जणांची माहिती तो देत होता. बाकीचे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची माहिती देता येणार नव्हती. नंतर त्याने धाड कशी घालण्यात आली याचं अगदी तपशीलवार वर्णन केलं.

आदल्या दिवशी माझ्याकडून पन्नास डॉलर्स उकळणाऱ्या त्या मुलाचा फोटो जेव्हा पडद्यावर आला तेव्हा मला एक क्षणभर टाळ्या वाजवाव्याश्या वाटल्या. ग्रॉसमनने त्याचं नाव डार्नेल हिक्स असं सांगितलं आणि त्याचं वर्णन तिथल्या स्थानिक टोळीचा म्होरक्या असं केलं. मी तर ही स्टोरी लिहिताना त्याचं नाव पहिलं लिहिणार होतो. हा माझा क्रिप वॉक होता.

अजून एक दहा मिनिटं बोलून ग्रॉसमनने प्रश्नोत्तरांना सुरुवात केली. दोन-तीन टीव्ही रिपोर्टर्सनी त्याला साधेसरळ प्रश्न विचारले. त्यांना उत्तरं देणं म्हणजे ग्रॉसमनच्या डाव्या हातचा मळ होता. कोणी अवघड प्रश्न विचारतंय का याची मी वाट बघत होतो. शेवटी मी हात वर केला. तो मला ओळखत होताच आणि मी कुठे काम करतो हेही त्याला माहित होतं. त्यामुळे माझ्याकडून त्याला साध्या प्रश्नांची अपेक्षाही नव्हती. त्याने सरळ मला प्रश्न विचारायला सांगितला नाही. त्याऐवजी तो इतर कोणी प्रश्न विचारणारं आहे का ते बघत होता. शेवटी निरुपायाने त्याने माझ्याकडे पाहिलं.

" काय विचारायचंय मि. मॅकअॅव्हॉय?"

" मला हे विचारायचंय कॅप्टन की तुम्हाला काळ्या समाजाकडून काही प्रत्युत्तर किंवा नकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे का? "

" नकारात्मक प्रतिसाद? अजिबात नाही. जर आम्ही ड्रग डीलर्स आणि इतर समाजविघातक गुन्हेगारांना अटक करून लोकांचं आयुष्य सुखकर करत असू, तर त्याबद्दल कुणाची काय तक्रार असणार आहे? शिवाय मी हे सांगू इच्छितो की आम्हाला या कारवाईसाठी सक्रीय पाठिंबा आणि सहकार्य मिळालेलं आहे. तुम्ही म्हणताय त्याच समाजाच्या लोकांकडून. असं असताना नकारात्मक प्रतिसाद कोण देईल आणि का हे मला समजत नाहीये. "

हे असं आधी घोटून बसवलेलं उत्तर येणार ही मला अपेक्षा होती. मी लगेच पुढचा मुद्दा मांडला, " तुम्हाला तर माहित असेलच कॅप्टन की रोडिया गार्डन्समधला ड्रग डीलर्सचा आणि गँगवॉरचा प्रश्न हा आजचा नाहीये. खूप जुना आहे. पण तुमच्या डिपार्टमेंटने मात्र कारवाई करण्याचा निर्णय हॉलीवूडमध्ये राहणाऱ्या एका गोऱ्या स्त्रीचं अपहरण आणि खून झाल्यावर घेतला. हा निर्णय घेताना तुम्ही काळ्या समाजाकडून एखादी नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकते याचा विचार केला होतात का हा माझा प्रश्न होता. "

आता ग्रॉसमनचा चेहरा लालबुंद झाला. त्याने चीफकडे एक दृष्टीक्षेप टाकला पण चीफनी काहीच हालचाल केली नाही. त्यालाच हे निस्तरावं लागणार होतं.

" आम्ही... याकडे अशा दृष्टीने अजिबात बघत नाही आहोत, " तो म्हणाला, " डेनिस बॅबिटच्या हत्येमुळे तिथले हे प्रश्न जास्त ज्वलंतपणे समोर आले आहेत. आम्ही आज जी कारवाई केलेली आहे त्यामुळे तिथल्या लोकांना नक्कीच आनंद झालेला आहे कारण आता त्यांना तिथे सुरक्षितरीत्या राहता येणार आहे. नकारात्मक प्रतिक्रियेचा प्रश्न येतच नाही. आणि असंही नाही की आम्ही तिथे पहिल्यांदा कारवाई केलेली आहे. "

" पण प्रेस कॉन्फरन्स तर पहिल्यांदाच बोलावली आहे ना? " केवळ त्याला हैराण करायला म्हणून मी विचारलं.

" मला माहित नाही. असू शकेल. " तो म्हणाला. हे बोलताना त्याचे डोळे इकडेतिकडे फिरत होते. कुणीतरी या, दुसरा प्रश्न विचारा आणि मला यातून सोडवा. पण कोणीही काहीही विचारलं नाही.

" माझा अजून एक प्रश्न आहे, " मी म्हणालो, " तुमच्या प्रेस रिलीजमध्ये सर्च वॉरंट्सचा उल्लेख आहे. तुम्हाला तिचं अपहरण झाल्यावर तिला जिथे डांबून ठेवण्यात आलं होतं आणि जिथे तिचा खून झाला त्या जागा सापडल्या का?"

ग्रॉसमनकडे यासाठी उत्तर होतं, " ती आमची केस नाहीये. तुम्हाला त्यासाठी सांता मोनिका पीडी किंवा डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस यांच्याशी बोलावं लागेल. "

हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर माझी कशी जिरवली अशा आविर्भावाचं छद्मी हास्य होतं. माझ्याकडेही अजून काही प्रश्न नव्हते. त्यामुळे त्याने लगेचच प्रेस कॉन्फरन्स संपल्याचं जाहीर केलं. मी अँजेलासाठी माझ्या जागीच थांबलो. मला पोलिस चीफ काय म्हणाले ते तिच्याकडून हवं होतं. बाकी सगळं मला मिळालं होतं. पण त्याआधीच ज्याने मला प्रेस रिलीज दिला होता त्या ऑफिसरने मला बोलावलं.

" लेफ्टनंट मिंटरना तुमच्याशी जरा बोलायचंय, " तो म्हणाला.

आम्ही कॉन्फरन्स रूमच्यापाठी असलेल्या खोलीत गेलो. मिंटर तिथे माझी वाट पाहात होता. तो एल.ए.पी.डी.च्या मीडिया रिलेशन्स विभागाचा प्रमुख होता. एल.ए. सारख्या पूर्ण देशात गुन्हेगारीमध्ये पहिल्या नंबरवर असलेल्या शहरात ही नक्कीच मोठी जबाबदारी होती. पण मला एक प्रश्न नेहमी पडायचा की पोलिस ट्रेनिंग घेतल्यावर आणि गन आणि बॅज मिळाल्यावर कोणीही हे काम का करत असेल? मान्य आहे की तुम्हाला दररोज टीव्हीवर यायची संधी मिळते पण तरीही कुणी हे का करत असावं?

" हाय जॅक! " कुणीतरी जुना मित्र भेटल्यासारखा मिंटर मला बघून उठला आणि त्याने माझ्याशी हात मिळवला. मीही मग मीच त्याला भेटायला बोलावल्याचा आव आणला.

" हाय लेफ्टनंट ! माझं एक काम होतं तुमच्याकडे. त्या हिक्स नावाच्या मुलाचा फोटो असेल ना तुमच्याकडे? मग शॉट ? माझ्या स्टोरीसाठी हवा होता. "

" मिळेल ना. तो काय अल्पवयीन नाही. त्याचा फोटो पेपरात येऊ शकतो. अजून कोणाचा हवा असेल तर..."

" नाही. एकच पुरे. तसंही पेपरात मग शॉट कोणी फारसं वापरत नाही. हा एक मी वापरू शकेन. "

" मला तू हिक्सचा फोटो मागितल्याचं पाहून जरा मजा वाटली जॅक. "

" का ?"

त्याने त्याच्या डेस्कच्या ड्रॉवरमधून एक फाईल काढली, उघडली आणि मला एक 8 X 10 आकाराचा फोटो दाखवला. त्याच्या उजव्या कोपऱ्यात पोलिस कोड होतं. त्यावरून तो टेहळणी करताना काढलेला फोटो होता हे मी ओळखलं. फोटोत मी हिक्सला पन्नास डॉलर्स देत होतो. आदल्या दिवशी रोडिया गार्डन्समध्ये. बऱ्याच अंतरावरून हा फोटो घेतलेला होता. मी त्याला जिथे पैसे दिले तो भाग रोडिया गार्डन्सच्या मध्यभागात होता. आणि ज्या अँगलने माझा फोटो काढला होता तो काढण्यासाठी फोटोग्राफरला तिथल्याच कुठल्यातरी घरात असणं आवश्यक होतं. ग्रॉसमन जे समाजाच्या पाठिंबा आणि सहकार्याविषयी बोलला त्याचा अर्थ हा होता तर!

मी तो फोटो हातात धरला, " मला भेट म्हणून देत आहात का हा फोटो ?"

" नाही. तुला याच्याबद्दल मला काही सांगायचं असेल तर सांगू शकतोस. जर तुला मदतीची गरज असेल तर आम्ही मदतीला तयार आहोत! " त्याच्या चेहऱ्यावर हे बोलत असताना मला बरोबर अडकवल्याचे भाव होते. त्याक्षणी काय चाललंय ते माझ्या लक्षात आलं. तो माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. जर असा फोटो बाहेर लीक झाला तर त्याचा विपर्यास होणं अगदी सहज शक्य होतं. आता मीही हसलो.

" तुम्हाला काय हवंय ते स्पष्टपणे सांगा लेफ्टनंट. "

" जर कुठलीही काँट्रोव्हर्सी होण्याची गरज नसेल तर आम्हालाही ती व्हावी असं वाटत नाही जॅक. उदाहरणार्थ हा फोटो. लोक याचे अनेक अर्थ काढू शकतात, नाही का? उगाचच धुरळा उडवायची काय गरज आहे? "

त्याचा मुद्दा स्पष्ट होता. काळ्या समाजाच्या नकारात्मक प्रतिसादाचा जो मुद्दा तू उठवला आहेस, तो सोडून दे. मिंटर आणि त्याच्या वरिष्ठांना हे माहित होतं की एल.ए. मध्ये पत्रकारितेचं सगळं क्षेत्र एल.ए.टाईम्सभोवती केंद्रित होतं. बाकीचे पेपर्स आणि चॅनेल्स टाईम्सवरूनच आपल्या बातम्यांची दिशा ठरवत असत. जर टाईम्सने पोलिसांची बाजू ' समजून ' घेतली, तर बाकीचा मीडिया आपोआप वठणीवर येईल.

" तुम्हाला कदाचित माहित नसेल लेफ्टनंट, " मी शांतपणे म्हणालो," मी जातोय. गेल्या शुक्रवारीच माझ्या नोकरीचा निकाल लागलाय. माझे शेवटचे दोन आठवडे बाकी आहेत, त्यामुळे तुम्हाला जर हा फोटो माझ्या ऑफिसमध्ये कुणाला पाठवायचा असेल तर डोरोथी फाऊलरला पाठवा. पण त्याने काही फरक पडत नाही. मी मला जे लिहायचं ते लिहीनच. बरं, तुमच्या नार्कोटिक्सच्या लोकांना हे माहित आहे का की तुम्ही त्यांचे फोटो असे चारचौघात राजरोसपणे दाखवताय? यातला धोका तुम्हाला माहित नाही की काय ? "

मी तो फोटो त्याच्यासमोर धरला

" माझं सोडा, या फोटोमुळे हे समजतंय की नार्कोटिक्सच्या लोकांनी रोडिया गार्डन्समधल्या कुणाच्या तरी घरातून हा फोटो काढलाय. तिथल्या क्रिप्स गँगच्या गुंडांना हे समजलं तर ते काय करतील हे मी तुम्हाला सांगायला नकोच. ब्लाईथ स्ट्रीटची घटना आठवत असेलच तुम्हाला? "

मिंटरच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी अशीच धाड घातली होती. तो भाग व्हॅन नाईजमधल्या ब्लाईथ स्ट्रीटवर होता आणि तिथे मेक्सिकोहून आलेल्या लॅटिनो गँगचं वर्चस्व होतं. अटक झालेल्या लोकांच्या वकिलांच्या हातात जेव्हा टेहळणीचे फोटो पडले तेव्हा गँगला कुणाच्या घरातून हे फोटो काढले आहेत ते समजलं. त्यांनी तो फ्लॅट बाँबने उध्वस्त केला आणि तिथे राहणाऱ्या लोकांना जिवंत जाळलं. पोलिसाची या प्रकरणात प्रचंड बदनामी झाली. आणि मिंटरला मी आत्ता त्याचीच आठवण करून दिली होती.

" चला. मी निघतो. मला काम आहे, " मी म्हणालो, " मी मीडिया रिलेशन्समधून मग शॉट घेईन. थँक्स लेफ्टनंट !"

" ओके जॅक! " तो थंडपणे म्हणाला, जणू आमच्यात काही अप्रिय गोष्टींवर बातचीत झालीच नव्हती, " भेटू या परत ! "

मी परत कॉन्फरन्स रूममध्ये आलो तेव्हा अँजेला मला कुठे दिसली नाही. बहुतेक माझ्यासाठी न थांबता ऑफिसला गेली असावी.

########################################################################################

मीडिया रिलेशन्स ऑफिसमधून मी हिक्सचा मग शॉट घेतला आणि चालतच आमच्या ऑफिसला आलो. मी आधीच प्रेन्डोला या प्रेस कॉन्फरन्सची बजेट लाईन पाठवली होती. आता मला काही फोन कॉल्स करून या स्टोरीचा एक सांगाडा तयार करायचा होता आणि माझ्या मुख्य स्टोरीशी तो कसा संबंधित आहे हे प्रेन्डोला पटवून द्यायचं होतं.

अलोन्झो विन्स्लोचा ९२८ पानांचा कबुलीजबाब आणि इतर फाईल्स यांचे प्रिंट आऊटस् माझ्या टेबलावर पडलेले होते. बाकी सगळं सोडून ते वाचायला घ्यायचा मोह मी आवरला आणि माझा कॉम्प्युटर चालू केला. त्यावर असलेल्या फोनबुकमधून रेव्हरंड विल्यम ट्रीचरचा नंबर शोधून काढला. तो दक्षिण एल.ए. मधल्या चर्च मिनिस्टर्सचा प्रमुख होता आणि एल.ए.पी.डी. चा स्वघोषित टीकाकार. एल.ए.पी.डी.च्या कुठल्याही कृतीला त्याचा नेहमीच विरोध असायचा. प्रीचर ट्रीचर या त्याच्या टोपणनावाने तो सगळीकडे प्रसिद्ध होता.

मी फोन करणार एवढ्यातच कोणीतरी माझ्या मागे उभं आहे असं मला जाणवलं. मी पाहिलं तर प्रेन्डो होता.

" तुला माझा मेसेज नाही मिळाला? "

" नाही. मी आत्ताच आलो आणि इतर कोणी करण्याआधी प्रीचर ट्रीचरला फोन करतोय. काय झालं ?"

" मला तुझ्या स्टोरीबद्दल बोलायचं होतं. "

" मी पाठवलेली बजेट लाईन मिळाली नाही तुला? मला हा कॉल करून घेऊ दे आणि मग मी त्यात काही अजून गोष्टी..."

" आजची स्टोरी नाही जॅक! अँजेला ती स्टोरी लिहिते आहे. तुझ्या त्या लांब पल्ल्याच्या स्टोरीबद्दल बोलतोय मी. आमची फ्युचर बजेट मीटिंग आहे आत्ता. "

" एक मिनिट. अँजेला ती स्टोरी लिहिते आहे याचा अर्थ काय? "

" हाच अर्थ आहे त्याचा. ती प्रेस कॉन्फरन्समधून परत आली आणि म्हणाली की तुम्ही दोघे या स्टोरीवर एकत्र काम करताय. तिने ट्रीचरला फोन केला आणि ती त्याच्याशी बोलली पण ! "

मी त्याला हे सांगता सांगता थांबलो की या स्टोरीवर मी आणि ती एकत्र काम करत नाही आहोत. ही माझी स्टोरी आहे आणि मी लिहिणार आहे असं मी तिला सांगितलं होतं.

" तुझी स्टोरी काय आहे जॅक? या आजच्याच स्टोरीशी संबंधित आहे, बरोबर? "

"हो. असं म्हणू शकतो आपण. "

अँजेलाने दिलेल्या धक्क्यातून मी अजून बाहेर आलो नव्हतो. न्यूजरूममध्ये अशा प्रकारची स्पर्धा असतेच पण तिच्यासारख्या नव्या मुलीकडून माझी अशी अपेक्षा नव्हती.

" जॅक, मला लवकर काय ते सांग. वेळ कमी आहे माझ्याकडे. " "

" ठीक आहे. ही डेनिस बॅबिटच्या खुनाबद्दल आहे. पण तिच्या खुन्याच्या दृष्टीकोनातून. सोळा वर्षांच्या अलोन्झो विन्स्लोवर तिच्या खुनाचा आरोप कसा आला यावर ही स्टोरी आहे. "

प्रेन्डोने मान डोलावली, " आणि तुझ्याकडे मालमसाला आहे? "

मालमसाला याचा अर्थ तो विचारत होता की माझ्याकडे इतरांकडे नसलेलं असं काही आहे का? मला या प्रकरणाशी प्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या कुणाकडून माहिती मिळालेली आहे का? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीत त्याला रस नव्हता. तथाकथित हा शब्दही मला वापरता आला नसता. जर त्याला या स्टोरीसाठी इतर संपादकांचा पाठिंबा हवा असेल तर ही स्टोरी पेपरात आलेल्या साध्या बातमीच्या पलीकडे गेली पाहिजे आणि तिने प्रखर वास्तव दाखवून वाचकांचे डोळे उघडले पाहिजेत. त्यासाठी तिच्यात विस्तार आणि खोली या दोन्ही गोष्टी पाहिजेत. टाईम्स यासाठीच तर प्रसिद्ध होता आणि आर्थिक प्रश्न असले तरी इतर पेपरांच्या पुढे होता.

" अर्थात. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे त्याची आजी आणि वकील या दोघांशी बोललोय मी आणि बहुतेक उद्या या मुलालाही भेटायला जाईन."

मी त्याला माझ्या टेबलावर पडलेले प्रिंट आऊटस् दाखवले, " हे सर्वात मोठं घबाड मिळालंय मला. या मुलाचा ९२८ पानी कबुलीजबाब. खरंतर हे माझ्याकडे असायला नको पण ते मला मिळालंय आणि इतर कोणाकडेही हे नाहीये. "

प्रेन्डोने परत एकदा मान डोलावली. तो आता या मीटिंगमध्ये ही स्टोरी कशी मांडायची त्याचा विचार करत असावा. त्याने बाजूची एक खुर्ची ओढली आणि तो त्यावर बसला.

" माझ्या डोक्यात एक आयडिया आहे जॅक. " तो माझ्या बाजूला झुकून म्हणाला.

त्याने माझं नाव वापरणं आणि माझ्याशी अशा रहस्यमय प्रकारे बोलणं यामुळे मला जरा विचित्र वाटत होतं. याआधी तो असा कधीच वागला नव्हता.

" काय आयडिया आहे अॅलन ? "

" जर आपण फक्त हा मुलगा खुनी कसा झाला यावर लक्ष केंद्रित न करता डेनिस बॅबिटचा बळी कसा गेला यावरही लक्ष दिलं तर ? "

मी एक क्षणभर विचार केला आणि मग हळूहळू होकारार्थी मान डोलावली. ही माझी चूक होती. जेव्हा तुम्ही होकारार्थी सुरुवात करता तेव्हा नंतर नकार देणं खूप कठीण जातं.

" पण आपण जर असं करणार असू तर मला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल, कारण मला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. "

" नाही. तसं होणार नाही, कारण तू दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. तू एकाच गोष्टीवर लक्ष दे - हा मुलगा खुनी कसा झाला. आपण अँजेलाला या दुसऱ्या बाजूवर काम करायला सांगू. मग तू दोन्ही बाजू एकत्र आण आणि आपण ही कॉलम वन स्टोरी करू. "

कॉलम वन स्टोरी म्हणजे पेपरच्या पहिल्या पानावरची सर्वात महत्वाची स्टोरी. टाईम्समध्ये कॉलम वनवर येण्यासाठी स्टोरी संपूर्णपणे नवीन, खास आणि जबरदस्त हवी असे. तिचा परिणामही तितकाच जबरदस्त असायला हवा. माझ्या सात वर्षांच्या टाईम्समधल्या कारकिर्दीत मला एकदाही हा मान मिळालेला नव्हता, आणि आता प्रेन्डो माझ्यासमोर कॉलम वन स्टोरी करून इथून निघून जाण्याचं भलंमोठं गाजर धरून उभा होता.

" ही आयडिया तिने दिली तुला?

" कुणी?"

" अँजेलाने ?"

" नाही. अजिबात नाही. हे माझ्या डोक्यात आलं आत्ता. तुला काय वाटतं याबद्दल ?"

" मी हा विचार करतोय की आम्ही दोघेही जर यावर काम करत असू तर नेहमीच्या बातम्या कोण कव्हर करणार?"

" तो प्रश्न फारसा येणार नाही. तुम्ही आळीपाळीने करा, आत्ता करताय तसंच. अगदीच जर गरज भासली तर मी जनरल रिपोर्टर्सकडून काही स्टोरीज करून घेईन. जरी तू एकटाच काम करत असतास या स्टोरीवर, तरी तुला मी बाहेर पाठवलं असतंच. "

माझ्या सिनिकल स्वभावामुळे मी त्याच्या कॉलम वनच्या आश्वासनावर विश्वास ठेवला नाही. पण माझ्या हे लक्षात आलं होतं की ही कल्पना त्याची असू दे किंवा अँजेलाची, त्यामुळे स्टोरी चांगली झाली असती.

" आपण या स्टोरीला ' टक्कर ' असं म्हणू शकतो, " मी म्हणालो, " तो बिंदू जिथे हे दोघं - शिकारी आणि सावज - समोरासमोर आले आणि ते तिथे कसे आले. "

" परफेक्ट! " प्रेन्डो म्हणाला आणि उभा राहिला, " मी हे आमच्या मीटिंगमध्ये मांडेनच पण तू आणि अँजेला जरा एकत्र बसा आणि मला आजच्या दिवसाच्या शेवटी बजेट म्हणून काहीतरी द्या. मी त्यांना सांगेन की तू या आठवड्याच्या शेवटी ही स्टोरी फाईल करशील. "

फार वेळ नव्हता. पण जमण्यासारखं होतं. जास्त दिवस लागले असते तरी मिळू शकले असते.

" ठीक आहे, " मी म्हणालो.

" गुड! " तो म्हणाला, " मला मीटिंगला जायला हवं! "

तो तिथून गेल्यावर मी अँजेलाला एक इमेल पाठवला आणि तिला मला आमच्या कॅफेटेरियात भेटायला बोलावलं. मी तिच्यावर वैतागल्याचा कुठलाही उल्लेख त्या मेलमध्ये नव्हता. तिचं ताबडतोब उत्तर आलं. ती पुढच्या पंधरा मिनिटांत मला तिथे भेटणार होती.

आता माझं आजची स्टोरी देण्याचं काम झालं होतं आणि पंधरा मिनिटांचा वेळ होता त्यामुळे मी अलोन्झो विन्स्लोचा कबुलीजबाब वाचायला सुरुवात केली.

वॉकर आणि ग्रेडी या दोघांनी अलोन्झोला प्रश्न विचारले होते. रविवार २६ एप्रिल, सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरूवात केली होती. त्याला अटक केल्यापासून साधारण चार तासांनी. सुरूवातीची सगळी प्रश्नोत्तरं थोडक्यात होती. पिंगपाँगचा खेळ चालू असल्यासारखी.

सर्वप्रथम त्यांनी त्याला त्याचे हक्क समजावून सांगितले आणि त्याला ते समजले आहेत का हे विचारलं. मग त्यांनी अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असलेले खास प्रश्न विचारले. हे प्रश्न त्याची चांगलं- वाईट, योग्य-अयोग्य यांची जाणीव कितपत आहे ते जाणून घेण्यासाठी होते. नंतर मग खरा ' खेळ ' चालू झाला. एक गोष्ट माझ्या लक्षात आली. अलोन्झोचं जरी पोलिस रेकाॅर्ड असलं तरी त्याला पोलिसांच्या प्रश्नांची सवय आणि माहिती, दोन्हीही नव्हते आणि टिपिकल सोळा वर्षांच्या मुलासारखा तो स्वतःला जास्त शहाणा समजत होता. त्यामुळे त्याने सगळे अननुभवी गुन्हेगार करतात तीच चूक केली - बडबड. त्याला बहुतेक असं वाटत होतं की तो बोलून त्यांना गार करेल आणि त्यामुळे त्यांचा हेतू त्याच्या लक्षात अाला नाही. कदाचित त्याला असंही वाटत असावं की जर तो गप्प बसला तर पोलिसांना त्याचा जास्त संशय येईल म्हणून तो अगदी सुरूवातीपासून बोलत होता. आणि हे दोघेही अनुभवी डिटेक्टिव्हज् असल्यामुळे त्यांनी त्याला व्यवस्थित बाटलीत उतरवला.

पहिली दोनशे पानं तर हे असंच चाललं होतं. ते त्याला जे विचारत होते, त्या प्रत्येक प्रश्नाला तो उत्तरं देत होता. त्यांनी त्याला डेनिस बॅबिटबद्दल काहीही विचारलं तर मात्र त्याचं उत्तर नकारार्थी होतं. हळूहळू प्रश्नांची गाडी खुनाच्या रात्री तो कुठे होता याकडे वळली. आता तो काहीही बोलला असता - खरं किंवा खोटं - तरी पोलिसांसाठी चांगलंच होतं. खरं बोलला असता तर नक्की काय घडलंय हे समजलं असतं आणि खोटं बोलला असता तर पोलिसांना त्याला त्याच्याच शब्दांत अडकवता आलं असतं.

त्याने सांगितलं की त्या रात्री तो घरीच झोपला होता आणि त्याची 'माॅम्स' म्हणजे वँडा सीसम्स त्याची खात्री देईल. तो डेनिस बॅबिटला ओळखत नाही, याआधी कधीही तिला भेटलेला नाही आणि तिच्याबद्दल, तिच्या अपहरणाबद्दल आणि खुनाबद्दल त्याला काहीही माहित नाही. कबुलीजबाबाच्या तीनशेव्या पानापर्यंत हे असंच चाललं होतं. पान ३०५ वर मात्र वाॅकर आणि ग्रेडी यांनी त्याच्यासाठी सापळा रचायला आणि त्याची दिशाभूल करायला सुरूवात केली.

वाॅकर - हे असं नाही चालणार अलोन्झो. तू आम्हाला जे घडलंय ते सांग. तुला जर असं वाटत असेल की तू इथे बसशील, आम्हाला सांगशील की तुला काय माहित नाही आणि एकदम सुमडीत इथून निघून जाशील, तर तसं होणार नाहीये. आम्ही तुझ्यासारखे हजारो पाहिलेत. तुला नक्कीच खरं काय ते माहित आहे. आणि तुला माहित आहे हे आम्हाला माहित आहे!
विन्स्लो - तुमाला xx काय माहित नाय! तुमी जी पोरगी बोलताय, आपन तिला पायलंच नाय!
वाॅकर - खरं की काय? मग आमच्याकडे तू तिची गाडी पार्किंग लाॅटमध्ये ठेवत असतानाचा व्हिडिओ कसा काय आला?
विन्स्लो - कोनता विडियो?
वाॅकर - पार्किंग लाॅटमधला. तू तिच्या गाडीतून उतरतानाचा. तू उतरल्यानंतर तिची बाॅडी मिळेपर्यंत कुणीही तिच्या गाडीजवळ गेलेलंच नाही. म्हणजे तूच केलेलं असणार हे!
विन्स्लो - नाय. आपन नवतोच थिते. आपन कायपन केलेलं नाय!
मेयरने डिस्कव्हरी म्हणून मला दिलेल्या गोष्टींमध्ये कुठल्याही व्हिडिओचा समावेश नव्हता पण हेही तितकंच खरं होतं की अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार पोलिसांना संशयितांना प्रश्न विचारताना एका मर्यादेपर्यंत खोटं बोलायचे अधिकार देण्यात आलेले असल्यामुळे असा कुठलाही व्हिडिओ नसला तरी पोलिसांनी विन्स्लोची दिशाभूल करणं हे पूर्णपणे कायदेशीर होतं. वाॅकर आणि ग्रेडी याचा पुरेपूर फायदा घेत होते.

मी एकदा एक स्टोरी लिहिली होती. असंच एका खुनाच्या संशयिताला पोलिस प्रश्न विचारत होते आणि त्या दरम्यान त्यांनी त्याला एक रिव्हाॅल्व्हर दाखवलं आणि सांगितलं की मृत व्यक्तीच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या त्याच रिव्हाॅल्व्हरमधून झाडल्या गेल्याचं सिद्ध झालेलं आहे. प्रत्यक्षात तसं नव्हतं. ते फक्त प्रत्यक्ष वापरल्या गेलेल्या रिव्हॉल्व्हरसारखं दिसत होतं. पण ते पाहून त्या संशयिताची गाळण उडाली आणि त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांना त्यावेळी पुरावा सापडला नव्हता पण त्याने गुन्हाच कबूल केला म्हटल्यावर त्यांचं काम झालं. यात जरी एक खुनी पकडला गेला असला तरी माझ्या मनाला ही गोष्ट तेव्हा पटलेली नव्हती की पोलिसही गुन्हेगारांप्रमाणेच संशयितांची दिशाभूल करतात आणि तेही गुन्हा उघडकीला आणण्यासाठी. मग त्यांच्यात आणि गुन्हेगारांत काय फरक आहे? हाच प्रश्न मी माझ्या स्टोरीत विचारला होता.

मी पुढे वाचत गेलो आणि अजून एक शंभर पानं नजरेखालून घातली. तेव्हा माझा फोन वाजला. मी काॅलर आयडीकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की मला अँजेलाला भेटायचं होतं.

" अँजेला? साॅरी. मी दुस-या एका कामात गुंतलो होतो. मी आत्ता येतोय तिथे! "
" लवकर ये जॅक. मला आजची स्टोरी संपवायची आहे! "

मी जवळजवळ धावतच आमच्या कॅफेटेरियात गेलो. ती एका टेबलापाशी बसली होती. मी काॅफी न घेताच तिच्या शेजारी बसलो. तिचा कप रिकामा होता आणि त्याच्या बाजूला एक प्रिंट आऊटसचा गठ्ठा होता.

" अजून काॅफी हवी आहे का तुला? "
" नाही, ठीक आहे. "
" ओके. "

मी आजूबाजूला पाहिलं. दुपारी उशिराची वेळ होती आणि कॅफेटेरियात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हतं.

" काय झालंय जॅक? लवकर सांगशील तर..."

मी सरळ तिच्या नजरेला नजर भिडवली.

" झालंय असं की तू माझ्या स्टोरीवर डल्ला मारलेला मला आवडलेलं नाही. मी अजूनही इथे आहे, माझा शेवटचा दिवस अजून झालेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुला बोललो होतो की ही प्रेस काॅन्फरन्सची स्टोरी मी करणार आहे कारण माझ्या या मोठ्या स्टोरीसाठी ती पार्श्वभूमी आहे. "
" साॅरी ‌जॅक! तू जेव्हा प्रेस काॅन्फरन्समध्ये प्रश्न विचारलेस तेव्हा मी एवढी उत्तेजित झाले की मी ताबडतोब न्यूजरूममध्ये येऊन या स्टोरीवर काम करायला सुरूवात केली. मी प्रेन्डोला सांगितलं की आपण दोघेही यावर काम करतोय. तो मला म्हणाला की लिही."
" तू माझ्या या मोठ्या स्टोरीवरसुद्धा काम करणार आहेस हे जेव्हा तू त्याला सांगितलंस तेव्हाच याबद्दल पण बोललीस?
" नाही. हा काय प्रकार आहे? "
" मी आत्ता जेव्हा त्याला भेटलो, एक अर्ध्या तासापूर्वी, तेव्हा तो मला म्हणाला की आपण दोघे ही मोठी स्टोरी करतोय. मी खुन्याच्या दृष्टिकोनातून आणि तू जिचा खून झालाय तिच्या दृष्टिकोनातून. तो हेही म्हणाला की हे तूच सुचवलंस त्याला! "

तिचा चेहरा लाल झाला आणि तिने मान खाली घातली. आता मी दोघांचं खोटं बोलणं बाहेर काढलं होतं. अँजेलाचं ठीक होतं कारण तिच्या खोटं बोलण्याचं कारण तिला ती स्टोरी करायची होती. मी तिच्या जागी असतो तर फार वेगळं वागलो नसतो. पण माझ्या मनाला प्रेन्डोने माझ्याशी असं वागणं खूप लागलं. गेली सहा-सात वर्षे आम्ही एकत्र काम केलं होतं आणि एकदाही त्याने असं केलेलं नव्हतं. मला वाटतं तो फक्त आपण कोणाच्या बाजूने आहोत ते दाखवत होता. मी बाहेर जाणार होतो आणि अँजेला राहणार होती. त्यामुळे तो तिच्याशी सलगी वाढवत होता.

"माझा अजूनही त्याने तुला असं सांगितलं यावर विश्वास बसत नाहीये, " अँजेला म्हणाली.
" वेल, तू इथे कोणावरही विश्वास ठेवण्याआधी दहा वेळा विचार कर, " मी म्हणालो, " मग तो तुझा स्वतःचा एडिटर का असेना!"
" खरं आहे! "

तिने तिचा कप उचलला आणि त्यात अजून काॅफी शिल्लक आहे का ते पाहिलं, जरी तो रिकामा आहे हे तिला माहित होतं तरी. माझी नजर चुकवण्यासाठी.

" हे पहा अँजेला, मला तू जे केलंस ते आवडलं नाही असं जरी मी म्हणालो तरी तुझी ही वृत्ती मला आवडली. स्टोरीसाठी वाट्टेल ते करायची तयारी. मला माहित असलेले सर्व उत्कृष्ट रिपोर्टर्स असंच वागले असते. आणि तुझी ही कल्पना - दोघांच्या दृष्टिकोनातून स्टोरी करण्याची - नक्कीच चांगली आहे."

आता तिचा चेहरा उजळला आणि तिने माझ्याकडे पाहिलं.

" मला तुझ्याबरोबर या स्टोरीवर काम करायचंय जॅक!"
" पण आत्ताच एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतोय तुला की याची सुरूवात आणि शेवट - दोन्हीही माझी जबाबदारी आहे आणि शेवटी मीच ही स्टोरी लिहिणार आहे. "
" नो प्राॅब्लेम जॅक! तू काल जेव्हा मला सांगितलंस की तू कशावर काम करतो आहेस, तेव्हापासून माझ्या मनात ही स्टोरी होती. म्हणून मी प्रेन्डोला सुचवलं. पण ही तुझीच स्टोरी आहे जॅक! तूच लिहिशील आणि बायलाईनमध्येही तुझंच नाव पहिलं असेल! "

ती आत्ताही मला गुंडाळायचा प्रयत्न करते आहे का ते बघण्यासाठी मी तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतो. पण तसं काही मला आढळलं नाही.

" मग तुला या प्रेस काॅन्फरन्सच्या स्टोरीसाठी काही मदत हवी आहे का?"
" नाही. मला वाटतं सगळी माहिती आहे माझ्याकडे. तू जे समाजाच्या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारलेस त्यावरून मला एकदम इंटरेस्टिंग माहिती मिळाली. मी जेव्हा रेव्हरंड ट्रीचरशी बोलताना याचा उल्लेख केला तेव्हा ते म्हणाले की एल.ए.पी.डी.मधल्या वंशभेदाचं हे अजून एक ज्वलंत उदाहरण आहे. दरवर्षी जवळजवळ आठशे निरपराध काळे लोक - जे रोडिया गार्डन्ससारख्या वस्त्यांमध्ये राहतात - गँगवाॅरमध्ये मारले जातात आणि डिपार्टमेंट काहीही करत नाही पण एका देहप्रदर्शन करुन पैसे कमावणा-या आणि ड्रग्ज घेणाऱ्या गो-या स्त्रीचा खून झाला की मात्र लगेचच कारवाई होते."

बातमीत उद्गार म्हणून टाकायला हे नक्कीच चांगलं वाक्य होतं पण ज्याच्याकडून ते आलं होतं तो आवाज चुकीचा होता. ट्रीचर एक अत्यंत संधिसाधू माणूस होता. माझ्या मते त्याने काळ्या समाजाचा नेता असल्याची फक्त एक प्रतिमा तयार केली होती आणि तिचा वापर तो स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी करत होता. टीव्हीवर येऊन अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करणं हा त्याचाच एक भाग होता. आपण त्याच्यावर स्टोरी करुन काय खरं आहे ते बाहेर काढू असं मी एकदा डोरोथीला सुचवलं होतं पण तिने माझा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. ' आपल्याला त्याची गरज आहे ' असं तिने मला ऐकवलं होतं आणि एकप्रकारे ते बरोबरही होतं. ट्रीचरसारख्या सरकारच्या स्वघोषित विरोधकांची कुठल्याही पेपरला गरज असतेच.

" चांगलं वाक्य आहे, " मी म्हणालो, " तू मग आता ही स्टोरी लिही आणि मी या मोठ्या स्टोरीची बजेट लाईन तयार करतो. "

" हे बघ, " तिने तो प्रिंट आऊटचा गठ्ठा माझ्याकडे सरकवला.

" काय आहे हे? "

" काही विशेष नाही पण तुझा वेळ वाचेल. काल संध्याकाळी घरी जाण्याआधी मी या तुझ्या मोठ्या स्टोरीवर विचार करत होते. माझ्या मनात एकदा तुला फोन करुन सरळसरळ आपण एकत्र काम करु या असं सुचवण्याचा विचार आला पण मग मला थोडी भीती वाटली की तू नाही म्हणालास तर काय? म्हणून मग मी गूगलवर थोडा रिसर्च केला. मी ' ट्रंक मर्डर ' असं टाईप केलं तर मला कळलं की असे बरेच लोक आहेत ज्यांचा खून करुन खुन्याने प्रेत गाडीच्या ट्रंकमध्ये टाकलेलं आहे. त्यात स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत. माफियाची तर ही आवडती पद्धत आहे. "

मी त्या गठ्ठ्याची पहिली काही पानं चाळली. लास वेगास रिव्यू जर्नलमधली एक स्टोरी होती. जवळजवळ एक वर्षापूर्वीची. पहिल्या परिच्छेदात असं म्हटलेलं होतं की आपल्या माजी पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या एका माणसाचा गुन्हा कोर्टात सिद्ध झालेला आहे. या माणसाने आपल्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह त्याच्या स्वतःच्या गाडीच्या ट्रंकमध्ये दडवला होता आणि ही गाडी त्याच्या स्वतःच्या गॅरेजमध्ये पार्क केलेली होती.

" ही स्टोरी आणि तू जी स्टोरी करणार आहेस त्यांच्यात ब-यापैकी साम्य आहे, " ती म्हणाली, " काही तर खूप जुन्या केसेस आहेत. ही एक आहे ज्यात एका चित्रपट निर्मात्याचा मृतदेह त्याच्या रोल्स राॅईसच्या ट्रंकमध्ये सापडला आणि ती गाडी हाॅलिवूड बाऊलच्या समोर असलेल्या टेकडीवर पार्क केलेली होती. आणि हो, मला trunkmurder.com नावाची एक वेबसाईटसुद्धा सापडली. पण ती अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मी काही शोधू शकले नाही. "

मी मान डोलावली, " थँक्स! या सगळ्याचा काय आणि कसा उपयोग होईल ते मला माहित नाही पण बघू. "
" हो. मीही तोच विचार केला. "

ती तिच्या जागेवरून उठली आणि तिने तिचा रिकामा कप उचलला, " ओके. आता मी जाते, ही प्रेस काॅन्फरन्सची स्टोरी लिहिते आणि तुला मेल करते. "
" मला मेल करायची काय गरज आहे? ही तुझी स्वतःची स्टोरी आहे."
" नाही. तुझंही नाव या स्टोरीवर असेलच. शेवटी तुझ्याच प्रश्नांमुळे या स्टोरीला विस्तार आणि खोली या दोन्हीही गोष्टी मिळाल्या ना! "

विस्तार आणि खोली हे तर टाईम्सचं वैशिष्ट्य होतं. सर्वच चांगल्या पेपर्सचं असतं आणि असायला हवं. टाईम्समध्ये तर अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या मनांवर ही गोष्ट बिंबवली जात असे. नुसती स्टोरी कव्हर करून किंवा फक्त काय घडलं ते सांगून थांबू नका. त्याचा अर्थ काय आणि समाजावर त्याचा काय परिणाम होणार आहे, तेही सांगा.

" तसं असेल तर थँक्स! " मी म्हणालो, " मग मला मेल कर स्टोरी. "
" तू वरती येतो आहेस आत्ता माझ्याबरोबर? "
" नाही. मी काॅफी घेतो आणि तू काय जमा केलं आहेस ते बघतो."
" ठीक आहे. " तिच्या चेहऱ्यावर मी काय मिस करतोय ते मला कळत नाहीये अशा स्वरूपाचे भाव होते. ती निघून गेली पण मी मात्र बराच वेळ आता घडलेल्या प्रसंगाबद्दल विचार करत होतो. एक गोष्ट नक्की होती. तिच्याबरोबर वागताना सावध असण्याची गरज होती. तिने मला दिलेला प्रिंट आऊट्सचा गठ्ठा मी थोडा चाळला आणि मग कच-याच्या टोपलीत फेकून दिला.

###############

माझ्या मोठ्या स्टोरीसाठी मी बजेट लाईन लिहून काढली आणि प्रेन्डोला मेल केली. मग अँजेलाची स्टोरीही वाचून काढली आणि प्रिंट एडिशनसाठी पाठवून दिली. मग न्यूजरुमचा एक एकदम दूरचा कोपरा शोधला आणि तिथे बसून अलोन्झो विन्स्लोचा कबुलीजबाब वाचायला सुरूवात केली. मला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नको होता. वाचता वाचता मी मार्करने महत्वाच्या भागांवर खुणा करायला सुरुवात केली.

पुष्कळसा भाग मला भरभर वाचता आला पण काही वेळा पोलिसांचा डाव लक्षात येण्यासाठी जरा लक्षपूर्वक वाचावं लागत होतं. एक भाग तर मला दोन-तीन वेळा वाचावा लागला. ग्रेडीने एक टेप आणली आणि विन्स्लोला सांगितलं की त्याला विन्स्लोच्या दोन्ही हातांच्या अंगठ्याचं टोक आणि तर्जनीचं टोक यांच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर किती आहे ते बघायचं आहे. विन्स्लोने त्याला तसं माप घेऊ दिलं आणि लगेचच ग्रेडी म्हणाला की हे अंतर आणि ज्या हातांनी डेनिस बॅबिटचा गळा घोटला आहे त्यांच्या अंगठा आणि तर्जनीतलं अंतर हे तंतोतंत जुळतात. विन्स्लोने अर्थातच याचा इन्कार केला पण बोलताना एक मोठी चूक केली.

विन्स्लो - पन या xxला थोडीच कोनी गला दाबून मारलं? त्या हलकटाने तर तिच्या डोक्यावर एक थैली बांधलीये! "
वाॅकर - हे तुला कसं काय माहित अलोन्झो?
विन्स्लो - मला कसं माहित? मला ... मी... आपन टीवीवर पायलं ना! नायतर कोनतरी बोल्ला असेल!
वाॅकर - नाही बाळा. ही माहिती आम्ही जाहीर केलेलीच नव्हती. हे फक्त तिला मारणाऱ्यालाच माहित असू शकतं. आता एकतर तू आम्हाला हे तू कसं केलंस आणि का केलंस ते मुकाट्याने सांग. म्हणजे आम्ही तुला मदत करु. नाहीतर मग कायद्याप्रमाणे जे व्हायचं ते होईल.
विन्स्लो - मी सांगतो ना तुमाला xxxxx आपन तिला तसं नाय मारलं.
ग्रेडी - मग कसं मारलंस ते सांग. आणि मारताना काय काय केलंस तिच्याबरोबर ते पण सांग.
विन्स्लो - मी काय नाय केलेलं तिला!

पण आता काही उपयोग नव्हता. एकतर पोलिस स्टेशनमध्ये वेळ ही गोष्ट पूर्णपणे पोलिसांच्या मालकीची असते. संशयित माणसाला तिथून जायची घाई असते, पोलिसांना नाही. वाॅकर आणि ग्रेडी यांच्याकडे भरपूर वेळ होता आणि ते अजिबात कुठल्याही गोष्टीची घाई करत नव्हते. हळूहळू अलोन्झो विन्स्लोच्या बचावाचे बुरूज ढासळायला सुरुवात झाली. त्याला माहित नसलेल्या गोष्टी त्यांना माहित होत्या त्यामुळे हे कधीनाकधी होणारच होतं. ८३०व्या पानावर त्याच्या निर्धाराला तडे जायला लागले.

विन्स्लो - मला घरी जाव द्या सायेब. मला माॅम्सला भेटायचंय. मी जाऊन तिला भेटतो आन् उद्याच्याला परत येतो ना! नक्की!
वाॅकर - असं थोडंच होतं अलोन्झो! आम्हाला खरं काय ते कळेपर्यंत आम्ही तुला सोडू शकत नाही. जर तू खरं बोलणं चालू केलंस तर आम्ही तुला तुझ्या माॅम्सला भेटू देण्याबद्दल विचार करु.
विन्स्लो - हे मी नाय केलं. मी या xxला कदी भेटलो नाय आन् पायलेलं पन नाय!
ग्रेडी - मग तिच्या गाडीवर सगळीकडे तुझ्या बोटांचे ठसे कसे काय आले? आणि तिचा गळा कसा घोटला गेला हे तुला कसं माहित?
विन्स्लो - नाय. हे खरं नाय. तुमी खोटं बोलताय. माझे ठसे कुठेपन नाय मिलनार तुमाला.
वाॅकर - अच्छा! आम्ही खोटं बोलतोय? आणि हे तुला माहित आहे कारण तू तिच्या गाडीवरचे तुझे सगळे ठसे पुसून टाकलेस, बरोबर? पण एक विसरलास तू अलोन्झो. ड्रायव्हरच्या समोर असलेला आरसा. आता आठवलं तुला? तू त्या आरशात पाहिलं असणार की तुझ्यामागून कोणी येतंय का, आणि नीट दिसावं म्हणून तो आरसा नीट केला असणार. कळलं तुला तुझ्याकडून काय चूक झाली ते?
ग्रेडी - आणि आम्हाला पण समजतं ना बाळा! गोरी पोरगी, त्यातून डान्सर. कदाचित ती तुला काहीतरी बोलली किंवा मग तिच्याकडे पैसे नव्हते पण तिला तल्लफ तर आली होती म्हणून मग तिने तुला अाॅफर दिली आणि मग तू अजून काहीतरी जास्त मागितलंस, ती नाही म्हणाली आणि ती तिची चूक झाली. असंच घडलं ना? जर तू आम्हाला आता सांगितलंस तर मग तुला तुझ्या माॅम्सकडे नेऊ आम्ही.
विन्स्लो - नाय. असं काय झालेलंच नाय तर!
वाॅकर - हे पहा अलोन्झो, आता बराच वेळ तुझी ही बडबड ऐकतोय आम्ही. आम्हालाही आपापल्या घरी जायचंय. आम्ही तुला मदत करायचा प्रयत्न करतोय पण तू काहीच ऐकत नाहीयेस. आता एकतर सगळं सांगून टाक किंवा मग तुला आम्ही लाॅक अपमध्ये पाठवू. मी तुझ्या माॅम्सला फोन करुन कळवेन की तुझी काळजी करायची गरज नाही कारण तू आता कधीच परत येणार नाहीयेस.
विन्स्लो - हे असं तुमी का करताय? मी कोन मोठा डीलर नाय. का तुमी मला अडकवताय?
ग्रेडी - तू स्वतःला अडकवलं आहेस बाळा! जेव्हा तू त्या पोरीचा गळा घोटलास ना तेव्हाच अडकलास तू!
विन्स्लो - मी काय नाय केलेलं!
वाॅकर - जे काही असेल ते. तुझी माॅम्स तुला भेटायला येईल ना तुरूंगात, तेव्हा हे सांग तिला. मध्ये मोठी जाड काच असेल. बाहेरच्या बाजूला ती आणि आतल्या बाजूला तू. मग सांग तिला की तू काहीही नाही केलं! चल, उठ. तू आता लाॅक अपमध्ये जाणार आहेस आणि मी घरी जाणार आहे.
ग्रेडी - ऐकू नाही आलं तुला? चल, उभा रहा!
विन्स्लो - नाय, नको. आपन तुमाला आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगतो आन् मग आपनला जायला मिलेल?
ग्रेडी - आधी तू सांग काय झालं ते, आणि खरं सांग.
वाॅकर - आता दहा सेकंदांत जर तू सुरूवात केली नाहीस तर...
विन्स्लो - असं झालं - मी फेसला घेऊन फिरत होतो तेव्हा मी टाॅवरच्या जवल तिची गाडी पायली. मग मी आत पायलं तर चाव्या तशाच आन् मग तिची पर्स पन तशीच पडलेली होती.
वाॅकर - एक मिनिट. फेस कोण?
विन्स्लो - माझी कुत्री.
वाॅकर - तुझ्याकडे कुत्री आहे? कोणत्या जातीची?
विन्स्लो - पिटबुल.
वाॅकर - केस लांब आहेत तिचे?
विन्स्लो - नाय. छोटे.
वाॅकर - ठीक आहे. आणि ती पोरगी कुठे होती मग?
विन्स्लो - पोरगी नवती कुठेपन. मी बोल्लो ना आधी, मी तिला पायलंच नाय. जिवंतपणी.
वाॅकर - अच्छा. म्हणजे फक्त तू आणि तुझी कुत्री, एवढेच होतात तिथे. मग काय झालं?
विन्स्लो - मग काय? मी गाडीत बसलो आन् गाडी चालू केली.
वाॅकर - आणि फेस?
विन्स्लो - हो, ती पण.
वाॅकर - मग कुठे गेलास तू?
विन्स्लो - कुठेपन नाय. जरा चक्कर मारायला गेलो. हवा खायाला.
ग्रेडी - आॅल राईट! हे आम्हाला चुना लावणं पुरे झालं. आता खरोखरच निघू या आपण!
विन्स्लो - नाय. थांबा. सांगतो. मग मी गाडी घेऊन आपल्या एरियात गेलो. रोडिया गार्डन्समध्ये. तिकडे कच-याचा मोठा डबा असतो ना तिकडे. तिकडे त्या वेली सामसूम असते. मला गाडीत अजून काय ते बघायचा होता. मी ती पर्स पाहिली. तिच्यात तीनशे डालर होते. मी बाकी सगलं पन शोधलं. पन काय मिलालं नाय. मग मी डिकी खोलली त्या टायमाला तिला पायलं. xxx माझी xx xxx. तिचे कपडेपन तसेच होते.
ग्रेडी - म्हणजे तू आता असं सांगतो आहेस आम्हाला की तू फक्त तिची गाडी चोरलीस आणि तिच्या ट्रंकमध्ये तिचं प्रेत आधीपासून होतं?
विन्स्लो - बरोबर. तेच. तिला पायल्यावर मला वाटलं, साला हा कायतरी खतरनाक मामला वाटतो. तुमाला xxxxx बोलायला जेवडा टाईम लागेल त्याच्या आत मी डिकी बंद केली. आन् गाडी बाहेर काडली. आधी मला वाटलेलं की जिथे होती थितेच परत ठेवावी पन मग आपल्या पोरांना समजला असता मग मी ती गाडी त्या हाॅटेलच्या बाजूला पार्क केली. पोरगी गोरी होती मग मी तिला गो-या लोकांच्या एरियात ठेवली. हे सगलं असं झालेलंय.
वाॅकर - मग तू तुझे बोटांचे ठसे कुठे पुसलेस?
विन्स्लो - थितेच. पन तुमी बोल्ले तसा तो आरसा पुसायचा राहून गेला. xxxxx.
वाॅकर - हे सगळं करायला कुणी मदत केली तुला?
विन्स्लो - नाय. कोन नाय. मी एकटाच होतो.
वाॅकर - आणि तुझे ठसे कुणी पुसले?
विन्स्लो - मी.
वाॅकर - कधी आणि कुठे?
विन्स्लो - पार्किंगमध्ये. थिते गेल्यावर.
ग्रेडी - तू घरी कसा परत गेलास?
विन्स्लो - चालत. ओकवुडला. नंतर बस.
वाॅकर - आणि फेसचं काय?
विन्स्लो - नाय. मी तिला माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी सोडला. ती थितेच असते. माझ्या माॅम्सची लाँड्री खराब होते आन् तिला तसापन कुत्रे नाय आवडत!
वाॅकर - बरं, मग त्या मुलीला कोणी मारलं?
विन्स्लो - मला काय माहित? मला सापडली त्या टायमाला तर ती आधीच मेलेली होती.
वाॅकर - तू फक्त तिची गाडी आणि पैसे चोरलेस.
विन्स्लो - हो. हे मी केलं. बरोबर.
वाॅकर - तू खोटं बोलतो आहेस अलोन्झो. तुझा डी.एन्.ए. मिळालाय आम्हाला तिच्या प्रेतावर!
विन्स्लो - नाय. असं काय पण नाय तुमच्याकडं. तुमी खोटं बोलताय.
वाॅकर - आम्हाला खोटं बोलून काय मिळणार? तू तिला मारलंस आणि आता काय तू तुरूंगाच्या बाहेर पडणार नाहीस!
विन्स्लो - नाय. मी तिला हातपन नाय लावलेला!

पुढची सगळी पानं हे असंच होतं. ते अलोन्झोवर एकामागून एक आरोपांचा आणि त्यांच्याकडे नसलेल्या पुराव्यांचा भडिमार करत होते आणि तो प्रत्येक आरोप फेटाळून लावत होता. पण हे वाचत असताना एक गोष्ट मला जाणवल्याशिवाय राहिली नाही, ती म्हणजे त्याने आपण हे केल्याची कबुली कुठेही दिलेली नव्हती. जेवढेवेळा पोलिसांनी त्याच्यावर हा आरोप केला, तेवढेवेळा त्याने त्याचा इन्कार केला होता.

या ' कबुलीजबाबात ' कबुली फक्त एकाच गोष्टीची होती. त्याने डेनिस बॅबिटच्या पर्समधून पैसे चोरल्याचं आणि तिचा मृतदेह असलेली गाडी सांता मोनिकामध्ये ठेवल्याचं कबूल केलं होतं पण यात आणि खुनाची कबुली देण्यात प्रचंड फरक होता.

मी माझ्या जागेवरून उठलो आणि माझ्या क्युबिकलकडे आलो. माझ्या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून सांता मोनिका पोलिस डिपार्टमेंटने अलोन्झो विन्स्लोच्या अटकेनंतर दिलेला प्रेस रिलीज शोधून काढला. याच्यावर विसंबूनच मी ती स्टोरी, जी वाचल्यावर वँडाने मला फोन केला होता, लिहिली होती. त्याचे चार परिच्छेद मी पुन्हा एकदा वाचले आणि माझ्या हे लक्षात आलं की पोलिसांनी सत्य तर लपवलं होतंच आणि शिवाय आम्हाला मुद्दाम चुकीची माहिती पुरवली होती आणि आम्हीही ती पडताळून न पाहाता छापली होती.

सांता मोनिका पोलिस डिपार्टमेंटने दक्षिण लाॅस एंजेलिसमधल्या एका १६ वर्षांच्या मुलाला डेनिस बॅबिट खून प्रकरणातील संशयित म्हणून अटक केलेली आहे. त्याचं अल्पवयीन गुन्हेगार म्हणूनही रेकाॅर्ड आहे. त्याच्या वयामुळे त्याला पोलिसांनी सिल्मार ज्युवेनाईल हाॅल येथील अल्पवयीन मुलांच्या तुरूंगात ठेवलेलं आहे. पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या बोटांचे ठसे त्यांना डेनिस बॅबिटच्या गाडीत सापडले आणि त्याआधारे त्याला वॅटस् येथील रोडिया गार्डन्स हाऊसिंग प्राॅजेक्ट येथून अटक करण्यात आली. पोलिसांचा असा कयास आहे की डेनिस बॅबिटचं अपहरण आणि खून हे दोन्हीही गुन्हे रोडिया गार्डन्सच्या परिसरात किंवा जवळपास घडलेले आहेत.
या संशयितावर हत्या, अपहरण, बलात्कार आणि चोरी हे मुख्य आरोप आहेत. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात या संशयिताने हे कबूल केलेलं आहे की त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी डेनिस बॅबिटचा मृतदेह तिच्याच गाडीच्या ट्रंकमधून सांता मोनिका येथे हलवला.
या सर्व कारवाईत लाॅस एंजेलिस पोलिस डिपार्टमेंटने दिलेल्या सहकार्याबद्दल सांता मोनिका पोलिस डिपार्टमेंट आभारी आहे.

हा प्रेस रिलीज पूर्णपणे चुकीचा नसला तरी अलोन्झो विन्स्लोचा कबुलीजबाब वाचल्यावर मी आता त्याच्याकडे अत्यंत सिनिकल दृष्टीने पाहात होतो. मेयरने मला बरोबर सांगितलं होतं. या कबुलीजबाबाला कोर्टाच्या दृष्टीने काहीही अर्थ नव्हता.

शोधपत्रकारितेच्या क्षेत्रात वाॅटरगेट प्रकरणाचं स्थान सर्वोच्च आहे. एका राष्ट्राध्यक्षाला राजीनामा द्यायला लावणं नक्कीच असामान्य आहे पण निर्दोष माणसाला तुरूंगातून बाहेर काढणं हेही काही कमी नाही. सोनी लेस्टरने मला आदल्या दिवशी डिवचलं होतं आणि मला राग आला होता पण आता मी या सगळ्या प्रकरणाकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघत होतो. अलोन्झो विन्स्लोवर अजून खटला चालायचा होता पण लोकमताच्या न्यायालयात आम्ही त्याला दोषी ठरवून मोकळे झालो होतो. मीही त्याचा एक भाग होतो पण आता हे बदलण्याची आणि जे योग्य आहे ते करण्याची एक संधी मला मिळाली होती.

त्या क्षणी मला अँजेलाने मला दिलेल्या प्रिंट आऊट्सची आठवण झाली. मी ते कच-याच्या डब्यात फेकले होते. मी उठलो आणि धावतच आमच्या कॅफेटेरियात गेलो. मी ते फेकून दिले होते कारण इतर खुनांचा, ज्यात प्रेत गाडीच्या ट्रंकमध्ये टाकण्यात आलं होतं, आणि या प्रकरणाचा काही संबंध असेल असं मला तेव्हा वाटलं नव्हतं पण आता तसं म्हणता येत नव्हतं. त्या लास वेगासमधल्या खुनात आणि या प्रकरणात दिसतंय त्यापेक्षाही अजून साम्य असण्याची शक्यता होती.

आमच्या कॅफेटेरियातला कच-याचा डबा जवळजवळ माझ्या उंचीचा होता. मी त्याचं झाकण उघडलं आणि अगदी वर असलेल्या दोन-तीन गोष्टी बाजूला केल्या. सुदैवाने सगळा गठ्ठा अजून तिथेच होता. मी तो तिथून उचलला, झाकण लावलं आणि धावतच परत न्यूजरुममध्ये गेलो.

माझ्या क्युबिकलमध्ये बसून मी आता तिचा तो गठ्ठा लक्षपूर्वक वाचायला सुरूवात केली. अँजेलाला सापडलेल्या बहुतेक स्टोरीज या जुन्या, पाच वर्षांपूर्वीच्या होत्या. काही तर मला माहीतही होत्या. त्यांच्यातले गुन्हेगार उघडकीला येऊन त्यांना शिक्षाही झालेली होती. पण त्या लास वेगासच्या स्टोरीचं तसं नव्हतं. ही एकच स्टोरी नव्हती तर पाच भाग होते. एका माणसाला त्याच्या माजी पत्नीच्या खुनाच्या आरोपावरुन अटक झाली होती आणि तिचा मृतदेहदेखील गाडीच्या ट्रंकमध्ये सापडला होता. मजा म्हणजे या पाचही स्टोरीज मी ओळखत असलेल्या रिपोर्टरने लिहिलेल्या होत्या. रिक हाईक्स पूर्वी टाईम्समध्ये होता पण त्यालाही माझ्यासारखंच पैसे वाचवण्यासाठी नोकरीवरून कमी करण्यात आलं होतं. पण आता त्याचं लास वेगास रिव्यू जर्नलमध्ये चांगलं चाललं होतं असं दिसत होतं. तोटा टाईम्सलाच झाला होता. अजून एक चांगला रिपोर्टर दुसरीकडे गेल्याचा. मी सगळ्या स्टोरीज भरभर वाचून काढल्या. एकीने माझं लक्ष वेधून घेतलं. ही स्टोरी याच प्रकरणातल्या खटल्यात जी काॅरोनरची साक्ष झाली, त्याच्यावर होती. :

क्लार्क काउंटी काॅरोनर गॅरी शाॅ यांनी नेवाडा राज्य सरकार विरूद्ध ब्रायन ओग्लेव्ही या खटल्यात या बुधवारी दिलेल्या साक्षीमध्ये असं स्पष्ट प्रतिपादन केलं की शेराॅन ओग्लेव्हीचा मृत्यू तिचं अपहरण झाल्यानंतर १२ तासांनी गळा घोटल्यामुळे झाला.

गॅरी शाॅ यांनी सरकारी पक्षातर्फे ही साक्ष दिली. या साक्षीमध्ये त्यांनी या गुन्ह्यातले अनेक तपशील न्यायालयापुढे मांडले. त्यांनी असं प्रतिपादन केलं की एका साक्षीदारानुसार शेराॅन ओग्लेव्हीला एका व्हॅनमध्ये ढकललं गेल्याचं पाहण्यात आलं होतं. ती जर तिच्या अपहरणाची वेळ मानली तर त्यानंतर १२ ते १८ तासांनी तिचा मृत्यू झालेला आहे आणि पोस्ट माॅर्टेम तपासणीनुसार तसं स्पष्ट होतं आहे. शेराॅन ओग्लेव्हीचं अपहरण ती डान्सर म्हणून काम करत असलेल्या क्लिओपात्रा कॅसिनो अँड रिसाॅर्टच्या मागे असलेल्या पार्किंग गॅरेजमधून एक किंवा अधिक अज्ञात व्यक्तींनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

सरकारी वकिलांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मि.शाॅ असं म्हणाले - ' ती तिच्या अपहरणकर्त्याबरोबर कमीतकमी १२ तास होती आणि या १२ तासांत तिच्यावर अपरिमित अत्याचार करण्यात आले, आणि मग तिला मारण्यात आलं. '
शेराॅन ओग्लेव्हीचा मृतदेह तिच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला. त्यावेळी पोलिस तिचा माजी पती ब्रायन ओग्लेव्ही याच्या समरलँड येथील घरी तिच्या गायब होण्याचा तपास करण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान पोलिसांनी घराची पूर्ण झडती घेण्याची परवानगी ब्रायन ओग्लेव्हीला मागितली आणि त्यानेही ती दिली. तेव्हा पोलिसांना घराच्या गॅरेजमध्ये असलेल्या ब्रायन ओग्लेव्हीच्या गाडीच्या ट्रंकमध्ये शेराॅन ओग्लेव्हीचा मृतदेह सापडला. या घटनेच्या आठ महिने आधी या दोघांचा घटस्फोट झाला होता. ब्रायन या घटस्फोटाबद्दल समाधानी नव्हता आणि शेराॅन ओग्लेव्हीने त्याच्याविरूद्ध न्यायालयातून प्रतिबंधात्मक आदेश मिळवला होता, ज्यानुसार ब्रायन ओग्लेव्हीला ती किंवा तिचं घर यांच्यापासून १०० फुटांपेक्षा कमी अंतर ठेवण्याची मनाई करण्यात आली होती. त्याने तिला ठार मारण्याची आणि वाळवंटात पुरण्याची धमकी दिली होती.

शेराॅन ओग्लेव्हीचा मृतदेह मिळाल्यावर पोलिसांनी ब्रायन ओग्लेव्हीला संशयित म्हणून अटक केली. त्याच्यावर हत्या, अपहरण आणि बाह्य साधनाने बलात्कार हे प्रमुख आरोप आहेत. पोलिसांच्या मतानुसार त्याने आपल्या माजी पत्नीचा मृतदेह आपल्या गाडीत लपवला कारण त्याला तो वाळवंटात पुरायचा होता.

ओग्लेव्हीने आपल्या माजी पत्नीच्या हत्येत हात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे आणि पोलिस आपल्याला अडकवत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या अटकेनंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला नाही त्यामुळे तो अजूनही तुरूंगातच आहे.

मि. शाॅ यांच्या साक्षीमुळे ज्यूरीचे सदस्य हादरून गेले होते. त्यांनी सांगितलं की शेराॅन ओग्लेव्हीवर बाह्य साधनाने पुन्हापुन्हा बलात्कार करण्यात आला आणि त्यामुळे तिच्या योनिमार्गात आणि गुदद्वारात अनेक जखमा आढळल्या. तिच्या शरीरातील हिस्टामाईनची पातळी ही सर्वसामान्य पातळीपेक्षा खूपच अधिक होती आणि त्याचं कारण म्हणजे तिच्या मृत्यूआधी तिला झालेल्या या जखमा. तिला मारताना खुन्याने तिच्या डोक्यावर एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी टाकून तिला घुसमटवलं आणि नंतर दोरीने तिचा गळा आवळला. तिच्या गळ्यावर अशा दोरीने आवळल्याच्या अनेक खुणा होत्या आणि डोळ्यांभोवती साकळलेल्या रक्तामुळे हेही सिद्ध होत होतं की तिला हळूहळू घुसमटवण्यात आलं आणि ती जेवढे वेळा बेशुद्ध पडली तेवढे वेळा तिला परत शुद्धीवर आणण्यात आलं.

ही साक्ष म्हणजे सरकारची संपूर्ण केस आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरीही त्यात अनेक त्रुटी आहेत. उदाहरणार्थ लास वेगास पोलिसांना ज्या ठिकाणी शेराॅन ओग्लेव्हीला अपहरणानंतर आणण्यात आलं आणि तिचा खून करण्यात आला ते ठिकाण अजूनही सापडलेलं नाही. तिचा मृतदेह जरी ब्रायन ओग्लेव्हीच्या गॅरेजमध्ये सापडलेला असला तरी तिची हत्या त्याच्या घरात झाल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांना तिचं अपहरण ज्या व्हॅनमधून झालं ती व्हॅनही सापडलेली नाही आणि त्या व्हॅनचा ब्रायन ओग्लेव्हीशी कुठल्याही प्रकारे संबंध जोडता आलेला नाही.

ब्रायन ओग्लेव्हीचा वकील विल्यम स्किफिनो यांनी अनेक वेळा ही साक्ष चालू असताना आक्षेप घेतले पण न्यायाधीशांनी ही साक्ष पूर्ण होऊ दिली. खटल्याचं कामकाज आज चालू राहणार आहे. बचावपक्षाचा प्रतिवाद पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. ब्रायन ओग्लेव्हीने हा गुन्हा केल्याचा इन्कार केला आहे पण असं कुणी केलं असेल आणि का याच्यावर त्याने कुठलंही उत्तर अजून दिलेलं नाही.

मी याच्या आधीच्या स्टोरीज वाचून काढल्या आणि प्रत्येक स्टोरीने मला हादरवलं पण माझ्या पायाखालची जमीन सरकवली ती पोस्ट माॅर्टेम तपासणीच्या स्टोरीने. डेनिस बॅबिट आणि शेराॅन ओग्लेव्ही यांच्या मृत्यूमध्ये प्रचंड साम्य होतं. दोघीही डान्सर्स, दोघींचंही अपहरण झालं, दोघींवरही १२ ते १८ तास अत्याचार झाले, दोघींवर झालेल्या बलात्कारांमध्ये साम्य होतं, दोघींचाही मृत्यू गळा घोटल्यामुळे झाला, दोघींच्याही चेहऱ्यांवर प्लॅस्टिक पिशव्या सापडल्या आणि सर्वात महत्वाचं - दोघींचेही मृतदेह गाडीच्या ट्रंकमध्ये मिळाले.

माझं विचारचक्र सुरू झालं. खरोखरच या दोन गोष्टींमध्ये साम्य आहे की हे माझ्या मनाचे खेळ आहेत? ब्रायन ओग्लेव्ही आणि अलोन्झो विन्स्लो यांना बळीचे बकरे बनवणारे दोन वेगवेगळे लोक असू शकतील का? पण मग त्यांच्या खून करण्याच्या पद्धतीत इतकं साम्य कसं? अँजेलाने तिच्या नकळत काहीतरी असं शोधून काढलंय का ज्याबद्दल पोलिस पूर्णपणे अनभिज्ञ आहेत?

यातल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं पण ते शोधून काढण्यासाठी काय करायचंय ते मला माहित होतं. लास वेगासला जाणे.

मी त्याक्षणी उठलो आणि जिथे सगळे एस बसायचे तिथे आलो. वेगासला जाण्यासाठी प्रेन्डोची परवानगी गरजेची होती. पण तो त्याच्या टेबलापाशी नव्हता.

" प्रेन्डो कुठे गेलाय? " मी बाकीच्यांना विचारलं.
" जेवायला गेलाय बहुतेक, " त्यातल्या एकाने उत्तर दिलं, " एक तासाभरात येईल. "

मी माझ्या घड्याळाकडे पाहिलं. पाच वाजायला आले होते. मला निघणं गरजेचं होतं. आधी घरी जाऊन बॅग भरायची होती आणि नंतर एअरपोर्ट. जर फ्लाईट नसती मिळाली तर मी माझ्या गाडीने वेगासला गेलो असतो. मी अँजेलाच्या क्युबिकलकडे पाहिलं. तीही तिथे नव्हती. मी स्विचबोर्डपाशी गेलो. लाॅरेनच होती ड्यूटीवर.

" अँजेला कुक गेली का?"
" ती आणि प्रेन्डरगास्ट, दोघेही जेवायला गेलेत. एक तासाभरात येतील असं सांगून गेलेत. तिचा मोबाईल नंबर देऊ का? "
" नको. आहे माझ्याकडे. "

मी माझ्या क्युबिकलकडे परत आलो. मला संशय आणि राग, दोन्हीही आले होते. माझा एस आणि माझी जागा घेणारी मुलगी - दोघंही एकत्र जेवायला गेले होते. मला न सांगता किंवा बोलावता. याचा अर्थ उघड होता. दोघंही माझ्या स्टोरीचे लचके कसे तोडायचे यावर विचार करत होते.

हरकत नाही. मी विचार केला. मी त्यांच्या चांगली दहा-बारा पावलं पुढे होतो आणि तसंच राहायची माझी इच्छा होती. करु देत त्यांना काय करायचं ते. मी जी खरी स्टोरी आहे तिच्या मागावर जाणार होतो. लास वेगासला.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी )

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

उत्कृष्ट अनुवादामुळे ही कथा अतिशय वाचनीय होतेय.

नेहमीप्रमाणेच अप्रतिम. पुभाप्र.

अचाट अनुवाद करताय बोकाभाऊ!जबरदस्त कथानक आहे.केवढं अवघड काम!

वॉल्टर व्हाईट's picture

6 Jul 2015 - 12:39 am | वॉल्टर व्हाईट

कथानक प्रचंड वेग घेतेय आता. वाट बघतोय पुढच्या भागाची.

मृत्युन्जय's picture

6 Jul 2015 - 11:11 am | मृत्युन्जय

अनुवाद उत्कंठावर्धक आहे यात शंकाच नाही. पण अधुनमधुन अलोन्झोच्या तोंडची भाषा खाताना तोंडात खडा लागल्यासारखी वाटते. इंग्रजी पिक्चरच हिंदी अनुवाद केल्यावर त्यातले मवाली लोक साधारण असे बोलतात " हे भिडु अपुन से पंगा नय लेना का क्या? अपुनके फटे मे टांग अडायेगा तो अओउन तेरी ट्यांय ट्यांय फिश कर देगा क्या. ऐ चिकने तु समझा रे अपने दोस्त को नय तो विल्सन भाई बहुत खतरनाक इन्सान है. क्या?:

अनुवादित इंग्लिश पिक्चर पाहताना वरचे अनुवाद जसे वाटतात अगदी तसेच वाटली अलोन्झोच्या तोंडची भाषा, :)

हम्म!मलाही हाच भाषेचा बाज खटकला.अनुवादात अशा वेळी कशी भाषा वापरली जाऊ शकते? ती गावठी इंग्रजी वाचकांसमोर अनुवादित स्वरुपात कशी आणता येईल?

झकासराव's picture

6 Jul 2015 - 11:34 am | झकासराव

अफाट इन्टेरेस्टिन्ग आहे :)

मोहनराव's picture

6 Jul 2015 - 5:50 pm | मोहनराव

कथानक आता पकड घेत आहे. पुभालटा.

अनन्त अवधुत's picture

6 Jul 2015 - 11:24 pm | अनन्त अवधुत

+१ पु.भा.ल.टा.

मालिका खूपच उत्कंठावर्धक होत चाललीय.

पैसा's picture

7 Jul 2015 - 10:23 pm | पैसा

जबरदस्त कथानक आहे! मला वाटते, मूळ लेखकाने स्लेंग वापरली असेल म्हणून वेगळेपणा दाखवण्यासाठी बोक्याने अशी भाषा वापरली असावी.

अर्धवटराव's picture

7 Jul 2015 - 10:32 pm | अर्धवटराव

तुफ्फान चाललय कथानक.
अनुवाद शैली फार आवडली.

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 12:09 am | शाम भागवत