द स्केअरक्रो - भाग ‍७

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
4 Jul 2015 - 10:17 am

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

द स्केअरक्रो भाग ७ (मूळ लेखक मायकेल कॉनेली )

मंगळवारी जेकब मेयर अजून अर्धा तास उशिरा आला. बराच वेळ मी त्याची वाट पाहात पब्लिक डिफेंडर ऑफिसमध्ये बसलो होतो. माझ्या आजूबाजूला बरेच ' क्लायंटस् ' होते. ज्यांची वकिलाचे पैसे द्यायची ऐपत नसते त्यांना सरकारकडून वकील पुरवला जातो. अगदी राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे हा - पण मला मात्र हे विचित्र वाटायचं आणि अजूनही वाटतं. दोन्हीही बाजू सरकारच्याच हातात. जे तुमच्यावर आरोप ठेवणार तेच तुम्हाला त्या आरोपांना उत्तर देणारा वकील पण देणार!

मेयर मला वाटलं त्यापेक्षा खूपच तरुण होता. जेमतेम ३-४ वर्षे झाली असतील त्याला लाॅ स्कूलमधून बाहेर पडून. आणि तो इथे एका खुनाचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलाची केस लढत होता. त्याची ब्रीफकेस इतकी गच्च भरलेली होती की काही फाईल्स जवळजवळ अर्ध्या बाहेर आल्या होत्या. ती ब्रीफकेस पण त्याने काखोटीला मारली होती. हँडलला धरायचा प्रयत्न केला असता तर नक्की तुटली असती. आल्यावर त्याने रिसेप्शनिस्टला काही मेसेज आहेत का असं विचारलं. तिने माझ्याकडे बोट केलं. त्याने ब्रीफकेस दुसऱ्या काखेत पकडली आणि माझ्याशी हस्तांदोलन केलं.

" आपण माझ्या ऑफिसमध्ये बसू या. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे., " तो म्हणाला.

" हरकत नाही. आत्ता मीही तुझा फार वेळ घेणार नाही. "

आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये गेलो. मोठा असला तरी तो एकदम अरुंद होता कारण दोन्हीही बाजूंना असलेली कपाटं.

" या इथे. " मेयर म्हणाला.

तो जरी ' माझं ऑफिस ' म्हणाला असला तरी ते त्याचं एकट्याचं ऑफिस नव्हतं. तिथे अनेक टेबलं आणि खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. आणि थोडीफार प्रायव्हसी देण्यासाठी मध्ये पार्टिशन्स टाकलेली होती. आम्ही गेलो तेव्हा एक दुसरा वकील तिथे काहीतरी काम करत बसलेला होता. त्याचं टेबल मेयरच्या टेबलाच्या बऱ्यापैकी जवळ होतं. आम्ही बसलो.

" अलोन्झो विन्स्लो!" मेयर म्हणाला, " त्याची ती आजी म्हणजे एक मजेशीर प्रकार आहे! "

" हो. "

" तिने तुला सांगितलं का की तिला तिच्या नातवाचा वकील ज्यू आहे याचा अभिमान वगैरे वाटतो? "

" हो. ती म्हणाली तसं. "

" खरं सांगायचं तर मी ज्यू नाहीये. मी आयरिश आहे. पण मी तिची चूक सुधारली नाही. बरं, अलोन्झो विन्स्लोचं काय?"

मी माझ्या खिशातून एक मायक्रोरेकॉर्डर काढला आणि चालू केला. एखाद्या सिगरेट लायटरच्या आकाराचा होता तो. तो मी टेबलावर ठेवला, " मी आपली बातचीत रेकॉर्ड केली तर तुझी काही हरकत? "

" नाही. मलाही रेकॉर्ड हवंच आहे. "

" ओके. मी काल फोनवर बोललो त्याप्रमाणे - अलोन्झोच्या आजीची - मिसेस सीसम्सची - अशी खात्री आहे की तिच्या नातवाने काहीही केलेलं नाही. पोलिसांनी चूक केलेली आहे. मी तिला म्हणालो होतो की मी खरी परिस्थिती काय आहे ते शोधून काढीन कारण पोलिसांनी त्याला अटक केल्यावर असं सांगितलं होतं की त्याने गुन्हा कबूल केलेला आहे आणि ती स्टोरी मी लिहिली होती. तो अल्पवयीन आहे. ती त्याची कायदेशीर पालक आहे आणि तिने मला या केसबद्दल पूर्ण सहकार्य कबूल केलेलं आहे. "

" ती असेल त्याची कायदेशीर पालक वगैरे. ते बघतो मी. पण तिने तुला पूर्ण सहकार्य कबूल करणंं याला कायदेशीर दृष्ट्या काहीही अर्थ नाहीये. त्यामुळे मलाही त्याने काहीही फरक पडत नाही. तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते?"

आदल्या दिवशी जेव्हा वँडा सीसम्स त्याच्याबरोबर बोलली तेव्हा तो हे काहीच म्हणाला नव्हता. मी त्याला त्याची आठवण करून देणार तेवढ्यात मी त्याला त्याच्या खांद्यावरून मागे बघताना पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं नाटक त्या दुसऱ्या वकिलाला काही कळू नये म्हणून चाललं होतं.

" अर्थात! " मी म्हणालो, " आणि मला हे सुद्धा माहित आहे की तू मला काय आणि किती सांगू शकशील याचे नियम आहेत. "

" जोपर्यंत या गोष्टीवर आपलं एकमत आहे तोपर्यंत आपण एकत्र काहीतरी करू शकतो. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईन पण एका मर्यादेपर्यंत. पण मी आत्ता या केसमधली कुठलीही डिस्कव्हरी तुला देऊ शकत नाही. माझे हात बांधलेले आहेत."

हे म्हणताना त्याने परत एकदा आपली खुर्ची वळवून त्या दुसऱ्या वकिलाची अजूनही आमच्याकडे पाठ आहे याची खात्री करून घेतली आणि माझ्या हातात एक पेन ड्राईव्ह सरकवला.

" ही सगळी माहिती तुला पोलिस देतील किंवा प्रॉसिक्युटर देईल. " तो मोठ्याने म्हणाला.

" कोण आहे प्रॉसिक्युटर?"

" रोझा फर्नान्देझ असते बहुतेक वेळी पण ती अल्पवयीन मुलांच्याच केसेस बघते. इथे ती नसेल कारण अलोन्झोवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची पोलिसांची आणि डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसची इच्छा आहे. त्यामुळे दुसरं कोणीतरी असेल. "

" आणि तुझा ही केस अल्पवयीन मुलांच्या कोर्टाच्या बाहेर न्यायला विरोध आहे ?"

" अर्थात. माझा क्लायंट फक्त सोळा वर्षांचा आहे. त्याने वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी शाळा सोडलेली आहे. त्याला शारीरिक दृष्ट्या तर जाऊच दे पण मानसिक दृष्ट्याही प्रौढ म्हणता येणार नाही. "

" पण पोलिसांच्या मते या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार हां एक मुद्दा आहे आणि हा अतिशय सफाईदारपणे हा गुन्हा केला गेलेला आहे. डेनिस बॅबिटवर अनेक वेळा बलात्कार झालेला आहे, तोही एखाद्या हत्याराने किंवा साधनाने. तिचे हालहाल करून तिचा खून केला गेलेला आहे. "

" आणि तू हे गृहीत धरतो आहेस की माझ्या क्लायंटने हा गुन्हा केलेला आहे. "

" पोलिस म्हणताहेत की त्याने कबुलीजबाब दिलाय. "

मेयरने माझ्या हातातल्या पेन ड्राईव्हकडे बोट केलं, " बरोबर. पोलिस म्हणताहेत ना असं. मला त्याबद्दल दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे माझा असा अनुभव आहे की जर तुम्ही एखाद्या सोळा वर्षांच्या मुलाला एका खोलीत ९-१० तास डांबून ठेवलं, त्याला काहीही खायला-प्यायला दिलं नाही, त्याच्याशी अस्तित्वात नसलेल्या पुराव्याबद्दल खोटं बोललात आणि त्याला कोणाशीही बोलू दिलं नाही - त्याची आजी, वकील, मित्र - कोणाशीही, तर तो त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी काय वाट्टेल ते, अगदी तुम्हाला जसं ऐकायचंय तसं सांगेल. आणि दुसरं म्हणजे त्याने नक्की कशाचा कबुलीजबाब दिलाय हा मोठा प्रश्न आहे. पोलिसांचा दृष्टीकोन माझ्यापेक्षा अगदी भिन्न आहे. "

मी त्याच्याकडे एक क्षणभर रोखून पाहिलं. आमच्यात चाललेलं संभाषण नक्कीच वेगळ्या कुठल्यातरी गोष्टीकडे इशारा करत होतं पण हा माणूस इतक्या गूढपणे बोलत होता की मला नीट काही समजत नव्हतं. याला बाहेर कुठेतरी घेऊन जायला हवं.

" तू कॉफी घेणार ? " मी विचारलं.

" नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि मी या केसबद्दल तुला याहून जास्त काही सांगू शकत नाही. त्याबद्दल अत्यंत कडक नियम आहेत. आणि सरकार काहीही म्हणू दे - हा मुलगा अल्पवयीन आहे ही खरी गोष्ट आहे. मजा म्हणजे एकीकडे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवणार आहे पण दुसरीकडे जर मी त्याच्या केसबद्दल बाहेर कुठे बोललो तर हेच लोक आमच्याविरुद्ध कोर्टात तक्रार करतील की आम्ही अल्पवयीन मुलांवरच्या खटल्यांचे नियम मोडले. अजून ही केस कोर्टात गेलेली नाही त्यामुळे अल्पवयीन मुलांबद्दलचे नियम अजूनही लागू होतात म्हणे. पण मला खात्री आहे की तुझ्यासारख्या रिपोर्टरकडे पोलिसांमध्ये भरपूर सोर्सेस असतील, जे तुला पाहिजे ती माहिती देऊ शकतील. "

" आहेत माझ्याकडे तसे सोर्सेस. "

" वा! मग जर तुला माझं स्टेटमेंट हवं असेल तर मी असं म्हणेन - माझा क्लायंट - मी त्याचं नाव घेऊ शकत नाही - हाही डेनिस बॅबिटप्रमाणेच या प्रकरणातला एक बळी आहे. ही खरी गोष्ट आहे की तिची आणि त्याची तुलना होऊ शकत नाही कारण तिचा जीव गेलाय आणि फार भयानक पद्धतीने तिचा खून झालाय. पण माझ्या क्लायंटने तो केलेला नाही. त्याचं स्वातंत्र्य त्याच्यापासून हिरावून घेण्यात आलेलं आहे आणि तो तिच्या खुनाबद्दल कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. जर ही केस कोर्टात गेली तर माझी खात्री आहे की मी हे सिद्ध करू शकेन. त्याच्यावरचा खटला सरकारने अल्पवयीन मुलांच्या कोर्टात चालवू दे किंवा नेहमीच्या कोर्टात - मी त्याची बाजू ठामपणे मांडीन कारण त्याने हे केलेलं नाही अशी माझी खात्री आहे. "

तो असं काहीतरी बोलणार हे मला माहित होतंच पण तरीही मी विचारात पडलो. मेयरने मला पेन ड्राइव्ह देऊन तो माझ्या बाजूचा आहे हे तर दाखवलं होतं पण मला हा प्रश्न पडला होता की का? मी यापूर्वी कधीही त्याच्यावर किंवा त्याने लढवलेल्या केसेसवर लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे एक रिपोर्टर आणि सोर्सेस यांच्यात जो विश्वास असतो तो इथे नव्हता. आणि तरीही मेयरने हे केलं होतं. का? कुणासाठी? अलोन्झोसाठी? याला खरंच असं वाटतंय की अलोन्झो विन्स्लो निर्दोष आहे आणि म्हणून तो हे सगळं करतोय?

आपण वेळ वाया घालवतोय हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. मला लवकरात लवकर माझ्या ऑफिसला पोहोचायला पाहिजे आणि या पेन ड्राइव्हमध्ये काय माहिती आहे ते बघायला पाहिजे. त्यातून मला हवी असलेली दिशा मिळेल. मी रेकॉर्डर बंद केला.

" मदतीबद्दल धन्यवाद !" मी मुद्दामहून त्या दुसऱ्या वकिलाला ऐकू जावं म्हणून आवाजात उपरोध आणून हे बोललो, मेयरकडे बघून माझा एक डोळा बारीक केला आणि तिथून बाहेर पडलो.

##############################################################################

न्यूजरूममध्ये पोचल्यावर कुणाशीही न बोलता मी सरळ माझ्या क्युबिकलकडे गेलो. मेयरने दिलेला पेन ड्राईव्ह माझ्या लॅपटॉपमध्ये फिट केला आणि ओपन केला. तीन फाईल्स होत्या. SUMMARY.DOC, ARREST.DOC आणि CONFESS.DOC. तिसरी फाईल सर्वात मोठी होती. मी ती उघडल्यावर माझ्या लक्षात आलं की तिच्यात तब्बल ९२८ पानं आहेत. कदाचित म्हणूनच प्रॉसिक्युटरने ही फाईल मेयरला मेल केली असावी. अलोन्झो विन्स्लोची पोलिस चौकशी ९ तास चालली होती. त्यामुळे ही फाईल मोठी असणं स्वाभाविक होतं. मेयरला जर तिचा प्रिंट आऊट हवा असेल तर तो त्याला स्वतःच्या खर्चाने काढावा लागला असता. पब्लिक डिफेंडर ऑफिसमध्ये दररोज अशा हजारो फाईल्स येत असाव्यात. सगळ्यांचे प्रिंट आऊट काढून ठेवायला ना त्यांच्याकडे जागा होती ना बजेट.

मला मात्र सुदैवाने हा प्रश्न सतावणार नव्हता. आमच्याकडे स्वतःचं फोटोकॉपी सेंटर होतं. मी सर्वप्रथम या तिन्ही फाइल्स तिथेच मेल केल्या. मला एवढा मोठा मजकूर कॉम्प्युटरच्या पडद्यावर वाचताना कंटाळा आला असता. या तिन्ही फाईल्स एका निश्चित क्रमाने वाचायचा माझा विचार होता. पहिल्या दोन्ही फाईल्सनी तिसऱ्या फाईलची पार्श्वभूमी दिली असती आणि तिसऱ्या फाईलने माझ्या स्टोरीची.

मी SUMMARY.DOC ही फाईल उघडली. अगदी थोडक्यात त्यात या संपूर्ण केसची माहिती लिहिलेली होती. माझा ' मित्र ' गिल्बर्ट वॉकरनेच लिहिली होती. आदल्या दिवशी माझा कॉल कट करणारा. फाईलमध्ये जेमतेम चार-पाच पानं असतील. वेगवेगळ्या फॉर्म्सवर टाईप केलेली माहिती नंतर स्कॅन करून ही फाईल बनवलेली होती. वॉकर आवाजावरून तरी अनुभवी पोलिस अधिकारी वाटला होता. म्हणजे त्याला हे माहित असणार की ही फाईल दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या नजरेखालून जाणार आहे आणि दोघेही त्यातल्या चुका काढण्याचा प्रयत्न अगदी कसोशीने करणार आहेत. त्यामुळे त्याने त्या फाईलमध्ये अजिबात जास्तीची माहिती लिहिली नव्हती. जितकी माहिती कमी, तितक्या चुका कमी किंवा चुका काढण्याची संधी कमी. वॉकर त्यात यशस्वी झाला होता.

माझ्या दृष्टीने या फाईलमध्ये असलेली सर्वात महत्वाची माहिती म्हणजे पोस्ट मॉर्टेम तपासणीचे आणि गुन्हा घडला त्या ठिकाणच्या तपासणीचे रिपोर्ट्स. त्यात अनेक फोटोसुद्धा होते. माझ्या स्टोरीसाठी याचा खूप उपयोग झाला असता.

प्रत्येक रिपोर्टरमध्ये भोचकपणा असतोच. किंबहुना भोचकपणा असल्याशिवाय कोणी चांगला रिपोर्टर बनूच शकत नाही. त्यामुळे मी रिपोर्ट वाचण्याआधी फोटो बघितले. ४८ रंगीत फोटो होते. डेनिस बॅबिटचा मृतदेह तिच्याच १९९९ सालच्या माझदा मिलेनिया गाडीच्या ट्रंकमध्ये सापडला होता. तेव्हापासून ते तो तिथून हलवण्याचे, त्याच्या तपासणीचे आणि तो पोस्ट मॉर्टेम तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला गेला तोपर्यंतचे असे हे सगळे फोटो होते. तिच्या गाडीचा आतला भाग आणि तिचा मृतदेह बाहेर काढल्यावर गाडीच्या ट्रंकचा भाग यांचेही फोटो त्यात होते.

एका फोटोमध्ये तिचा चेहरा होता. एका पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. पिशवी तिच्या मानेपर्यंत आलेली होती आणि कपडे वाळत घालायच्या दोरीच्या घट्ट फासाने तिची मान आवळलेली होती. डोळे सताड उघडे होते आणि त्यांच्यात भीती ही एकमेव भावना होती. तिला डोळे उघडे असतानाच मरण आलेलं होतं. मी अनेक मृतदेह पाहिलेले आहेत. प्रत्यक्षातही आणि फोटोमध्येही. मला एका होमिसाइड डिटेक्टिव्हने - माझ्या सख्ख्या जुळ्या भावानेच - सांगितलं होतं की मृतदेहांच्या उघड्या डोळ्यांकडे पाहू नये. ते तुमचा पाठलाग करतात आणि तुम्ही कधीही ते विसरू शकत नाही.

डेनिसचे डोळे त्याच प्रकारचे होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर तुमच्या मनात तिच्या शेवटच्या क्षणांबद्दल आणि तिला मरताना काय वाटलं याबद्दल विचार येतीलच.

मी बाकीची माहिती वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता मी माझ्या लॅपटॉपवर POLICESTORY.DOC नावाची फाईल तयार केली आणि महत्वाच्या गोष्टी या नवीन फाईलमध्ये कॉपी करायला सुरुवात केली. हे करताना मी प्रत्येक परिच्छेद माझ्या स्वतःच्या भाषेत लिहून काढत होतो. पोलिस रिपोर्टची भाषा ही एखाद्या सामान्य वाचणाऱ्याला नेहमीच बुचकळ्यात पाडते. मला ते नको होतं.

लिहून झाल्यावर मी परत एकदा माझी फाईल संपूर्णपणे वाचून काढली. मला माहिती अचूक आणि ओघवती हवी होती. जेव्हा मी ही स्टोरी पेपरमध्ये येण्यासाठी म्हणून लिहिणार होतो तेव्हा या माहितीमधला बराच भाग त्यात येणार होता. आत्ता जर काही चूक झाली तर ती नंतर तशीच राहिली असती.

शनिवार दिनांक २५ एप्रिल २००९ या दिवशी सकाळी पावणेदहाच्या सुमारास डेनिस बॅबिटचा मृतदेह तिच्या माझदा मिलेनियाच्या ट्रंकमध्ये सांता मोनिका पोलिस डिपार्टमेंटच्या रिचर्ड क्लीडी आणि रॉबर्टो हिमिनेझ या दोन गस्ती अधिकाऱ्यांना सापडला होता. तपासासाठी ही केस डिटेक्टिव्हज् गिल्बर्ट वॉकर आणि विल्यम ग्रेडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

गस्ती अधिकाऱ्यांना पार्किंग लॉटमधल्या लोकांनी बोलावलं होतं. हा पार्किंग लॉट समुद्रकिनाऱ्याजवळ कासा डेल मार हॉटेलजवळ आहे, आणि तो २४ तास चालू असतो. जेव्हा कुणी तिथे गाडी पार्क करतं तेव्हा त्यांना पार्किंग पास घ्यावा लागतो.. संध्याकाळी आणि रात्री जरी पार्किंग मोफत असलं तरी दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तिथे पैसे द्यावे लागतात. आणि जर एखादी गाडी रात्री पार्क केलेली असेल पण ९ ते ५ यादरम्यान हटवली नसेल तर तिच्या मालकाला पार्किंगचे पैसे भरावे लागतात. ही माझदा मिलेनिया बहुदा रात्री पार्क केलेली होती. पण सकाळी कोणीही ती हटवायला आलं नाही त्यामुळे पार्किंग ऑफिसर विली कोर्तेझ काय प्रकार आहे ते बघायला गाडीपाशी आला. तेव्हा त्याला गाडीच्या खिडक्या उघड्या दिसल्या. गाडीची चावी इग्निशनमध्येच होती. एक लेडीज पर्स मागच्या सीटवर उघडी ठेवलेली होती आणि तिच्यातलं सगळं सामान इकडेतिकडे विखरून पडलं होतं. कोर्तेझला हे सगळं विचित्र वाटलं म्हणून त्याने पोलिसांना फोन केला आणि क्लीडी आणि हिमिनेझ तिथे आले. त्यांनी गाडीची नंबर प्लेट पाहिली तेव्हा त्यांना गाडीच्या ट्रंकमधून एक रेशमी स्कार्फ बाहेर आलेला दिसला. त्यामुळे त्यांनी ट्रंक उघडली. गाडीच्या ट्रंकमध्ये त्यांना एका स्त्रीचा मृतदेह सापडला. नंतर हे समजलं की हा मृतदेह डेनिस बॅबिटचा आहे आणि गाडीही तिचीच आहे. तिचा मृतदेह संपूर्ण नग्नावस्थेत होता आणि तिचे सगळे कपडे तिच्या मृतदेहावर रचून ठेवलेले होते.

डेनिस बॅबिट २३ वर्षांची होती. हॉलीवूडमध्ये ऑर्किड स्ट्रीटवर ती एका फ्लॅटमध्ये राहात होती. क्लब स्नेक पिट नावाच्या एका बारमध्ये ती डान्सर होती. हा बार हॉलीवूडमध्ये आहे. तिचं हेरॉईन जवळ बाळगल्याच्या गुन्ह्यावरूनएक वर्ष जुनं पोलिस रेकॉर्ड होतं. ही केस अजूनही निकाल न लागलेल्या परिस्थितीत होती कारण तिच्या वकिलाने तिला एका प्री-ट्रायल ड्रग ट्रीटमेंटमध्ये भरती केलं होतं. एल. ए. पी.डी. ने रोडिया गार्डन्समध्ये केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये तिला अटक झाली होती. तिने एका डीलरकडून हेरॉईन विकत घेतलं होतं. वेषांतर केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी ते पाहिलं होतं आणि ती रोडिया गार्डन्समधून बाहेर पडल्यावर तिला अटक केली होती. अर्थात, तिला एकटीलाच नव्हे. बऱ्याच लोकांना अटक झाली होती.

तिच्या गाडीच्या तपासणीत पोलिसांना कुत्र्याचे केस मिळाले होते. कुठल्या जातीचा कुत्रा आहे ते समजलं नव्हतं पण केसांची लांबी कमी होती. डेनिस बॅबिटकडे कुठलाही पाळीव प्राणी नव्हता.

तिचा मृत्यू गळा घोटल्यामुळे झाला होता. गळा घोटण्यासाठी कपडे वाळत घालायच्या दोरीचा वापर केला गेला होता. या दोरीनेच तिच्या चेहऱ्याभोवती प्लॅस्टिकची पिशवी घट्ट बांधण्यात आली होती. तिच्या मनगटांवर आणि पायांवर बांधल्याच्या जुन्या खुणा होत्या. त्यावरून तिचं अपहरण करून मग तिचा खून केला गेला होता हे स्पष्ट होत होतं. पोस्ट मॉर्टेम तपासणीत हेही निष्पन्न झालं होतं की तिच्यावर वारंवार कुठल्यातरी लाकडी हत्याराने किंवा वस्तूने बलात्कार झाला होता. तिच्या योनीमार्गातून आणि गुदद्वारातून लाकडाचे सूक्ष्म तुकडे मिळाले होते. त्यावरून पोलिसांचा असा अंदाज होता की कदाचित झाडू किंवा एखाद्या वस्तूच्या लाकडी मुठीचा वापर झाला असावा. वीर्य, केस किंवा अन्य कुठलाही डी.एन्.ए. असलेला पुरावा घटनास्थळावरून मिळालेला नव्हता. तिचा मृत्यू तिचा मृतदेह मिळण्याच्या १२ ते १८ तास आधी झाला असावा असं पोलीसांचं म्हणणं होतं.

ती क्लब स्नेक पिटमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होती. तिचं काम शुक्रवार २४ एप्रिल २००९ या दिवशी पहाटे २.१५ वाजता संपलं. तिची रूममेट लोरी रॉजर्स (वय २७) ,जी स्वतः तिथेच आणि तेच काम करत होती, तिने पोलिसांना असं सांगितलं की नेहमीप्रमाणे डेनिस काम संपल्यावर घरी आलीच नाही आणि शुक्रवारच्या संपूर्ण दिवसात ती परत आली नाही. तिचा मृतदेह आणि गाडी पोलिसांना दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी, २५ एप्रिलला मिळाले.

२३ एप्रिलची रात्र आणि २४ एप्रिलची पहाट - या काळात काम करत असताना डेनिसला ३०० डॉलर्सपेक्षा जास्त टिप्स मिळाल्या होत्या. पण तिच्या पर्समध्ये काहीही रोकड सापडली नव्हती.

घटनास्थळावर तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी हे शोधून काढलं की ज्या कुणी तिची गाडी पार्किंग लॉटमध्ये सोडली होती त्याने आपले बोटांचे ठसे पुसण्याचा प्रयत्न केलेला होता. दरवाजे, त्यांना असलेली हँडल्स, स्टीअरिंग व्हील, गिअर शिफ्ट या सगळ्यांवरचे ठसे पुसलेले होते. ट्रंकचा दरवाजा आणि त्याचं हँडल यावरही ठसे नव्हते. एकच सुस्पष्ट ठसा मिळाला होता. आतल्या रिअर व्ह्यू मिररवर असलेला. बहुधा खुन्याने गाडी चालवताना आरसा व्यवस्थित करायचा प्रयत्न केला असणार आणि तेव्हा तो ठसा तिथे आला असणार.

हा ठसा अलोन्झो विन्स्लोचा होता. त्याचं बालगुन्हेगार म्हणून रेकॉर्ड होतं. त्याला त्याच रोडिया गार्डन्समध्ये हेरॉईन विकण्याच्या गुन्ह्यामुळे अटक झालेली होती.

पोलिसांची थिअरी अशी होती - २४ एप्रिलच्या पहाटे डेनिस बॅबिट काम संपवून रोडिया गार्डन्समध्ये गेली. तिला हेरॉईन किंवा दुसरं एखादं ड्रग विकत घ्यायचं होतं. ती गोरी होती आणि रोडिया गार्डन्समधले ९८% लोक काळे असूनही तिला फरक पडत नव्हता. तिथले लोक तिला ओळखत होते. तिने अनेक वेळा तिथून ड्रग्स विकत घेतली होती. कदाचित ती अलोन्झो विन्स्लोला आणि इतर डीलर्सना ओळखत होती. कदाचित तिने ड्रग्सचा मोबदला सेक्सने चुकवला होता. या वेळी मात्र अलोन्झो विन्स्लोने एकट्याने किंवा इतर कोणाच्या मदतीने तिचं अपहरण केलं, तिला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवलं आणि जवळजवळ १८ तास तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिच्या डोळ्यांभोवती साकळलेल्या रक्तावरून हेही सिद्ध होत होतं की तिला गळा दाबून वारंवार बेशुद्ध केलं गेलं आणि परत शुद्धीवर आणलं गेलं. शेवटी तिला दोरीने गळा घोटून मारण्यात आलं, तिचा मृतदेह तिच्याच गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवला गेला आणि गाडी जवळजवळ वीस मैल लांब असलेल्या सांता मोनिकामध्ये समुद्राजवळ असलेल्या पार्किंग लॉटमध्ये ठेवण्यात आली, जिथे ती पोलिसांना सापडली.

सुस्पष्ट ठसा, ज्याचा ठसा आहे त्याचं पोलिस रेकॉर्ड, त्याचं रोडिया गार्डन्समध्ये राहाणं, डेनिस बॅबिटचा रोडिया गार्डन्सशी असलेला संबंध आणि तिचंही असलेलं रेकॉर्ड - या सगळ्यांवरून पोलिसांनी अलोन्झो विन्स्लोला ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला. वॉकर आणि ग्रेडी यांनी त्याच्या अटकेचं वॉरंट मिळवलं, विन्स्लो दक्षिण एल.ए. मध्ये राहात असल्यामुळे तिथल्या पोलिसांचं सहकार्य मिळवलं आणि रविवार २६ एप्रिलच्या सकाळी त्याला त्याच्या घरातून अटक केली. ९ तासांच्या प्रश्नोत्तरांच्या नंतर त्याने गुन्हा कबूल केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार, २७ एप्रिल या दिवशी पोलिसांनी हे जाहीर केलं.

माझ्या मनात एकच विचार आला आणि तो म्हणजे किती लवकर पोलिसांना अलोन्झो विन्स्लोचा छडा लागला, आणि का तर त्याच्या बोटांचा ठसा त्यांना डेनिसच्या गाडीत मिळाला. तो पुसून काढायचं राहून गेलं. त्याने कदाचित असा विचार केला असेल की रोडिया गार्डन्सपर्यंत पोलिस पोचणार नाहीत. आता तो सिल्मारमध्ये बालगुन्हेगारांच्या तुरुंगात बसून असा विचार करत असेल की आपण त्या आरशाला हात लावला नसता तर बरं झालं असतं.

माझा डेस्क फोन वाजला आणि मी कॉलर आयडीवर अँजेला कुकचं नाव वाचलं. मी माझ्या स्टोरीवर काम करण्यात इतका गुंग झालो होतो की हा फोन घेण्याची माझी इच्छा नव्हती. पण जर मी हा फोन घेतला नसता तर तिने स्विचबोर्डवर फोन केला असता आणि तिथे जे कोण असेल त्याने किंवा तिने तिला सांगितलं असतं की मी माझ्या जागेवर आहे पण तिचा फोन घेऊ शकत नाही. मला ते नको होतं म्हणून मी तिचा फोन उचलला.

" बोल अँजेला! काय चाललंय? "

" मी इथे पार्कर सेंटरला आहे आणि मला वाटतंय की काहीतरी घडलेलं आहे पण मला कोणीही काही सांगत नाहीये. "

" असं का वाटतंय तुला? "

" कारण भरपूर रिपोर्टर्स आणि चॅनेलवाले येताहेत इथे. "

" तू कुठे आहेस? "

" मी लॉबीमध्ये आहे. मी निघतच होते तेव्हा मी या लोकांना येताना पाहिलं. "

" तू प्रेस ऑफिसमध्ये चेक केलंस का ? "

" हो अर्थात! पण कोणी माझा फोन उचलला नाही. "

" सॉरी, माझा प्रश्न चुकीचा होता. मी शोधून काढतो काय चाललंय ते. तू तिथेच थांब. मी फोन करतो तुला मला समजल्यावर. अच्छा, टीव्हीवाले जास्त आलेत का?"

" मला वाटतं टीव्हीवालेच आलेत. "

" ओके. तू पॅट्रिक डेनिसनला ओळखतेस का? "

" हो. तो इथे नाहीये. "

डेनिसन डेली न्यूजचा मुख्य क्राईम रिपोर्टर होता. आमची स्पर्धा, निदान एल.ए. मध्ये तरी, त्यांच्याशीच असायची. कितीतरी वेळा मी त्याने ब्रेक केलेल्या स्टोरीजचा फॉलो अप केलेला होता. आमच्या व्यवसायात तुम्हाला तुमच्या स्पर्धकाने ब्रेक केलेली स्टोरी छापावी लागणे ह्याच्यापेक्षा मोठा अपमान आणि शरमेची गोष्ट असू शकत नाही. पण तो इथे नव्हता आणि टीव्हीवाले रिपोर्टर्स आले होते त्यामुळे मी निश्चिंत होतो. टीव्हीवाले एवढ्या घाऊक प्रमाणात आले याचा अर्थ एकतर आदल्या दिवसाच्या कुठल्यातरी बातमीमुळे त्यांची झोप उडालेली आहे किंवा मग प्रेस कॉन्फरन्स आहे. १९९१च्या रॉडनी किंगला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर टीव्हीला या शहरात कुठलीही स्टोरी ब्रेक करता आलेलीच नव्हती.

अँजेलाचा फोन मी कट केला आणि माझ्या ओळखीच्या एका मेजर क्राईम्समधल्या लेफ्टनंटला फोन केला. त्याला माहित नसेल तर मी रॉबरी-होमिसाईडमध्ये फोन करणार होतो. तिथेही काही नाही मिळालं तर मग नार्कोटिक्स. कुणाला तरी काय चाललंय ते माहित असेल. टीव्हीवाल्यांना बोलावलंय आणि आम्हाला नाही म्हणजे काय?

मला लेफ्टनंट हार्डीचा फोन ताबडतोब मिळाला. हार्डीने लेफ्टनंट म्हणून अजून एक वर्षही पूर्ण केलेलं नव्हतं आणि मी त्याला हळूहळू सोर्स म्हणून घोळात घेत होतो. मी कोण बोलतोय हे त्याला सांगितल्यावर लगेचच त्याला त्याचे हार्डी बॉईज म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारे डिटेक्टिव्हज् काय करताहेत ते विचारलं. त्याने त्याचा अहंकार सुखावतो हे मला माहित होतं. खरं सांगायचं म्हणजे तो फक्त एक सरकारी मुकादम होता आणि त्याच्या हाताखालचे लोक इतके अनुभवी होते की त्यांना त्याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नव्हती. पण त्याचा अहंकार गोंजारणं माझ्यासाठी महत्वाचं होतं.

" आज काही नाहीये जॅक, " हार्डी म्हणाला, " सांगण्यासारखं काहीही नाही. "

" नक्की? मी तर ऐकलं की भरपूर टीव्हीवाले आलेत म्हणून! "

" अच्छा, ते! ती वेगळी गोष्ट आहे. आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. "

चला. म्हणजे मेजर क्राईम्सकडे काहीही नव्हतं आणि आम्हीही पाठीमागे राहिलेलो नव्हतो.

" काय चाललंय काय पण ? " मी विचारलं.

" तुला ग्रॉसमनशी किंवा चीफच्या ऑफिसमध्ये कोणाशीतरी बोलावं लागेल. त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे. "

आता मात्र मला काळजी वाटायला लागली. पोलिस चीफनी पेपरमध्ये छापून आलेल्या गोष्टींबद्दल प्रेस कॉन्फरन्स बोलावणं हे जरा विचित्र होतं. चीफ बहुतेक वेळा स्वतः माहिती द्यायचे, जेणेकरून माहितीचा ओघ नियंत्रित करता येईल आणि त्यांना श्रेय मिळेल.

दुसरं म्हणजे हार्डीने ग्रॉसमनचं नाव घेतलं. कॅप्टन आर्ट ग्रॉसमन नार्कोटिक्समधला होता. बहुतेक काही तरी घडलं होतं आणि आम्हाला आमंत्रण द्यायला सगळेच जण विसरले होते. मी हार्डीचे आभार मानले, फोन खाली ठेवला आणि अँजेलाला फोन केला. तिने लगेचच उचलला.

" परत पार्कर सेंटरला जा. सहाव्या मजल्यावर. तिथे प्रेस कॉन्फरन्स आहे. पोलिस चीफ आणि नार्कोटिक्सचा प्रमुख आर्ट ग्रॉसमन यांची. "

" किती वाजता? "

" मला नक्की वेळ माहित नाही. तू आत्ताच जा. जर सुरु झाली असेल कॉन्फरन्स तर तुला काहीतरी कव्हर करता येईल. तुला याच्याबद्दल कुणीही काहीही बोललं नाही?"

" नाही! " ती ठासून म्हणाली.

" किती वेळ होतीस तू तिथे? "

" पूर्ण सकाळभर. "

"ओके. तू तिथे जा. मी फोन करेन तुला. "

फोन खाली ठेवल्यावर मी कामाला सुरुवात केली. एकीकडे ग्रॉसमनच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि दुसरीकडे सीएनएस वायर बघायला सुरुवात केली. सीएनएस म्हणजे सिटी न्यूज सर्व्हिस. त्यांची २४ तास चालणारी डिजिटल न्यूज सेवा काहीही घडलं की लगेच
अपडेट करत असे आणि शहरात होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल पण त्यात माहिती असायची. त्यावरून आम्हाला प्रेस कॉन्फरन्सबद्दल समजायचं. मी तर त्यावर सतत नजर ठेवून असायचो. पण आज मी डेनिस बॅबिटच्या केसवर काम करत होतो आणि अँजेला पार्कर सेंटरमध्ये होती. त्यामुळे कोणीही सीएनएस पाहिलंच नव्हतं.

ग्रॉसमनच्या ऑफिसमध्ये त्याची सेक्रेटरी होती. तिने तिचा बॉस सहाव्या मजल्यावरच्या कॉन्फरन्स रूममध्ये असल्याचं सांगितलं. फोन खाली ठेवता ठेवता मला एक ११ वाजताच्या कॉन्फरन्सचा एक उल्लेख सापडला. त्यात बाकी खास काही नव्हतं पण एक ओळ होती - ही प्रेस कॉन्फरन्स रोडिया गार्डन्समध्ये पोलिसांनी पहाटे छापा मारून बरंच हेरॉइन आणि कोकेन जप्त केलं आणि अनेक ड्रग डीलर्सना अटक केली, त्याबद्दल होती.

वा! माझी लांब पल्ल्याची स्टोरी आणि ही आत्ता ब्रेक होणारी स्टोरी या एकमेकांना पूरक होत्या. ही स्टोरी माझ्या स्टोरीमध्ये फिट बसली असती. माझा उत्साह वाढला. मी लगेच अँजेलाला फोन केला.

" आलीस सहाव्या मजल्यावर? "

" हो, पण अजून काही सुरु झालेलं नाही. काय चाललंय? मला या टीव्हीवाल्यांना विचारायचं नाहीये. ते मला बावळट समजतील."

" बरोबर. रोडिया गार्डन्समध्ये पोलिसांनी जी धाड टाकली त्याबद्दल ही प्रेस कॉन्फरन्स आहे. "

" एवढंच? "

" हो पण ही स्टोरी मोठी असू शकते कारण मला वाटतंय की काल मी तुला ज्या खुनाबद्दल बोललो त्याचा प्रतिसाद म्हणून ही धाड पोलिसांनी टाकलेली आहे. जिचा खून झाला तिचा आणि रोडिया गार्डन्सचा संबंध आहे. "

" हो. ते तू म्हणालेलास. "

" ही स्टोरी माझ्या स्टोरीशी संबंधित आहे, त्यामुळे मी प्रेन्डोशी त्याबद्दल बोलणार आहे. ही स्टोरी मला लिहायची आहे कारण माझ्या मोठ्या स्टोरीची पार्श्वभूमी म्हणून ही स्टोरी येईल. "

" हरकत नाही जॅक! " ती ताबडतोब म्हणाली, " तू लिही ही स्टोरी. तूच लिहायला पाहिजेस. माझी काही मदत तुला हवी असेल तर सांग. "

मला जरा लाज वाटली. मी स्वार्थीपणे वागलो होतो.

" थँक्स अँजेला! आपण बघू काय करायचं ते. मी प्रेन्डोला या स्टोरीचं बजेट देतो आणि मग तिथे येतो. "

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी.)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अतिशय उत्कंठावर्धक. मूळ कादंबरी जेवढी थरारक वाटली तेवढीच थरारक ही अनुवादमालिकाही आहे.

अजया's picture

4 Jul 2015 - 11:36 am | अजया

मजा येतेय वाचायला.पुभालटा.

आतिवास's picture

4 Jul 2015 - 5:39 pm | आतिवास

+२

असंका's picture

4 Jul 2015 - 4:34 pm | असंका

सुंदर!

वॉल्टर व्हाईट's picture

4 Jul 2015 - 9:16 pm | वॉल्टर व्हाईट

पुढचा भाग कधी येतोय याची वाट बघतोय.

पैसा's picture

16 Jul 2015 - 9:43 am | पैसा

मस्त चाललीय मालिका!

ऋतुराज चित्रे's picture

18 Jul 2015 - 11:28 am | ऋतुराज चित्रे

दोन्हीही बाजू सरकारच्याच हातात. जे तुमच्यावर आरोप ठेवणार तेच तुम्हाला त्या आरोपांना उत्तर देणारा वकील पण देणार!

मजा म्हणजे एकीकडे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिस त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवणार आहे पण दुसरीकडे जर मी त्याच्या केसबद्दल बाहेर कुठे बोललो तर हेच लोक आमच्याविरुद्ध कोर्टात तक्रार करतील की आम्ही अल्पवयीन मुलांवरच्या खटल्यांचे नियम मोडले

खरोखरीच विचित्र प्रकार.

शाम भागवत's picture

27 Dec 2015 - 11:04 pm | शाम भागवत