द स्केअरक्रो - भाग ‍२३

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
5 Sep 2015 - 4:58 pm

द स्केअरक्रो भाग २२

द स्केअरक्रो भाग २३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

कार्व्हरने आधी रॅशेलशी हात मिळवला, मग माझ्याशी. आम्ही आपापली नावं त्याला सांगितली.

“योलांडा तुम्हाला वीस मिनिटांनी घ्यायला येणार आहे. तेवढ्या वेळात मी तुम्हाला इथली संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही आमच्या टीमला भेटलात की नाही? हा कर्ट आणि हा मिझ्झू. मोठी हुशार मुलं आहेत. दोघेही आज सर्व्हर सपोर्ट इंजिनीअर्स आहेत. जेव्हा मी आमच्या राजवाड्याच्या आत येऊ पाहणाऱ्या लोकांच्या मागे लागतो, तेव्हा तेच इथली सगळी व्यवस्था सांभाळतात.”

“हॅकर्स?” रॅशेलने विचारलं.

“हो. आमच्या कंपनीसारखी जागा म्हणजे या लोकांना आव्हान वाटतं. त्यामुळे आम्हालाही सतत तयार राहावं लागतं. जोपर्यंत आम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहोत, तोपर्यंत काही हरकत नाही.”

“वा!” मी काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो. ते त्याच्या लक्षात आलं असावं.

“पण तुम्ही इथे हे ऐकायला तर नक्कीच नाही आलेले आहात. योलांडाने तुम्हाला माहिती द्यायची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर मग आम्ही इथे काय करतो ते मी तुम्हाला समजावून सांगतो.”

“जरूर.” रॅशेल म्हणाली.

कार्व्हरने आमचं लक्ष त्या खिडकीतून दिसणाऱ्या टॉवर्सकडे वेधलं, “हा आमच्या या व्यवसायाचा मेंदू, हृदय काय जे म्हणाल ते आहे. कोलोकेशन, डेटा स्टोरेज, ड्राय डॉकिंग – तुम्ही त्याला कुठल्याही नावाने पुकारा, आम्ही ती सेवा इथे तुम्हाला देतो. हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. ओ’कॉनर आणि त्याची वेब होस्टिंग टीम एकापेक्षा एक अफलातून वेबसाईट्स बनवत असतील, पण त्यांच्यासारखं काम करणारे अनेक आहेत. पण इथे जे आहे, ते मला नाही वाटत मार्केटमध्ये कुणाकडे आहे.”

आमचं बोलणं ऐकत असलेल्या कर्ट आणि मिझ्झू यांनी एकमेकांना टाळी दिल्याचं मी पाहिलं.

“संपूर्ण माहिती तंत्रज्ञान व्यवसायातला हा जो भाग आहे, त्याची वाढ गेल्या दशकात सर्वात प्रचंड वेगाने झालेली आहे. अमेरिकेतच नाही तर जगभर,” कार्व्हर म्हणाला, “ सुरक्षित आणि पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता तुम्हाला तुमच्या सगळ्या माहितीला साठवून ठेवता आलं पाहिजे आणि तेही अशा प्रकारे की तुम्हाला पाहिजे तेव्हा एका सेकंदात ती माहिती उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी कनेक्टिव्हिटी – अत्याधुनिक प्रकारची आणि पूर्णतः विश्वासार्ह – ही काळाची गरज आहे. आम्ही तेच इथे देतो. कुठल्याही कंपनीला आम्ही असताना स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवायची गरज नाही. जर तुम्हाला तुमचा सर्व्हर तुमच्या ऑफिसमध्येच असल्यासारखा वेग आणि उपलब्धता आम्ही देत असू, तर तुम्हाला त्यासाठी वेगळे पैसे खर्च करायची काय गरज आहे?”

“तो प्रश्नच नाहीये मि.कार्व्हर,” रॅशेल त्याचा बोलण्याचा ओघ थांबवत म्हणाली, “म्हणून तर आम्ही इथे आलोय. आणि तुम्हाला हे सांगायला हरकत नाही की तुमची कंपनी ही एकमेव कंपनी नाहीये, जिथे आम्ही जाणार आहोत किंवा याआधीही गेलेलो आहोत. तुम्ही आता आम्हाला जरा तुमच्या लोकांबद्दल सांगाल का? कारण आमचा निर्णय हा त्यावर अवलंबून आहे. तुमच्या प्रॉडक्टबद्दल आमची खात्री पटलेली आहे. आम्हाला ज्यांच्या ताब्यात आम्ही आमची माहिती सोपवणार आहोत त्या लोकांबद्दल तशीच खात्री पटायची गरज आहे.”

तिने एका क्षणात गाडी तंत्रज्ञानाकडून ते वापरणाऱ्या लोकांकडे वळवली होती.

कार्व्हरने होकारार्थी मान डोलावली, “बरोबर आहे. शेवटी सगळं लोकांवरच येऊन थांबतं, नाही का?”

“नेहमीच.” रॅशेल शांतपणे म्हणाली.

“सॉरी, मी विचारायचं विसरून गेलो. तुमची कंपनी कुठे आहे?”

“लास वेगास,” मी म्हणालो.

“आणि काय करते तुमची कंपनी?”

“लॉ फर्म.”

“अच्छा. लॉ फर्म. ठीक आहे. आपण माझ्या ऑफिसमध्ये जाऊ आणि लोकांबद्दल बोलू. पण त्याआधी तुम्हाला इथे काय मिळणार आहे, ते मी तुम्हाला सांगतो.”

नंतर त्याने शॅवेझने आधी थोडक्यात सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित विस्ताराने सांगितल्या. माझ्या नकळत मी ते ऐकण्यात गुंगून गेलो. आमच्या फर्मला स्वतःचा सर्व्हर मिळणार होता. लास वेगासला भूकंप येऊन किंवा आग लागून किंवा वीज पडून किंवा अजून कुठल्याही प्रकारे जर आमची माहिती नष्ट झाली, तरी आम्हाला चिंता करायचं काही कारण नव्हतं, कारण ती सगळी माहिती इथे आमच्या सर्व्हरवर त्याच क्षणी साठवली जाणार होती, ज्या क्षणी ती आमच्या लास वेगास ऑफिसमध्ये टाईप केली जाणार होती. ज्या खोलीत हे सर्व्हर टॉवर्स ठेवलेले होते ती खोली अभेद्य होती. तिची काच अत्यंत उच्च प्रतीची होती आणि एके -४७ किंवा रायफलच्या गोळ्यांनीही काही फरक पडला नसता. उलट त्या गोळ्या काचेवरून उलटून येऊन त्या मारणाऱ्या माणसालाच इजा होऊ शकली असती. वगैरे. वगैरे.
“मी आत्ता ज्या दरवाज्याने बाहेर आलो, तो एकमेव दरवाजा आहे. त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तुम्हाला आत जाता येत नाही, किंवा आत असाल तर बाहेर येता येत नाही. या खोलीत फक्त ज्यांना तिथे जायचा अधिकार आहे, तेच लोक जाऊ शकतात. तिथला बायोमेट्रिक स्कॅनर हा फक्त तुमचा हात बघत नाही, तर तो तुमच्या हाताचा आकार, तळव्याचा ठसा आणि हातातल्या रक्तवाहिन्या एवढं सगळं बघतो. तुमच्या नाडीचे ठोकेही तो मोजू शकतो. त्यामुळे माझा हात तोडून जर तुम्हाला आत घुसायचं असेल, तर ते अशक्य आहे.” तो जोरात हसला. मला आणि रॅशेलला यात हसण्यासारखं काही वाटलं नाही, म्हणून आम्ही गप्प राहिलो.

“जर अत्यंत आणीबाणीची परिस्थिती असली तर?” मी विचारलं, “लोक अडकतील इथे.”

“नाही. आतमध्ये एक बटन आहे, जे फक्त या निवडक लोकांनाच माहित आहे. त्याने हा काचेचा दरवाजा या खोलीच्या आतून उघडू शकतो. या सगळ्याचा हेतू आगंतुक लोकांना बाहेर ठेवणं हा आहे, इथे काम करणाऱ्या लोकांना आत ठेवणं नाही.”

त्याने माझ्याकडे बघून प्रश्नार्थक चेहरा केला. मी लक्षात आल्याप्रमाणे मान डोलावली.

“आम्ही फार्ममध्ये बासष्ट अंश फॅरनहाइट एवढं तापमान ठेवतो. आगीपासून संरक्षण म्हणून आमच्याकडे VESDA नावाची सिस्टिम आहे. VERY EARLY SMOKE DETECTION ALARM. जर आग लागली तर ही सिस्टिम हे समोरचे टँक्स कार्यान्वित करते.” त्याने बोलताबोलता आम्हाला फार्मच्या मागच्या भिंतीवर लावलेले लाल रंगाचे कार्बन डायऑक्साईडचे टँक्स दाखवले, “जर कधी आग लागली तर हे टँक्स सगळीकडे कार्बन डायऑक्साईड वायू पसरवतील. पाण्याची गरजच नाही. इथली कुठलीही उपकरणं आणि माहिती खराब आणि नष्ट व्हायचादेखील धोका नाही.”

“जर इथे लोक असतील तर त्यांच्या जिवाचं काय?” मी विचारलं.

कार्व्हर ही सगळी माहिती रॅशेलकडे पाहत देत होता. माझा प्रश्न ऐकल्यावर त्याने माझ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.

“ एकदम चांगला प्रश्न विचारलात मि.मॅकअॅव्हॉय. हा जो अलार्म आहे, तो तीनवेळा होतो. त्यामुळे इथे असलेल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी एक पूर्ण मिनिट मिळतं. शिवाय जे कोणी फार्ममध्ये जाणार असतील, त्यांच्यासाठी आम्ही हा रेस्पिरेटर बरोबर ठेवणं बंधनकारक केलेलं आहे.” त्याच्या लॅब कोटाच्या खिशातून त्याने तो आम्हाला काढून दाखवला.

“अजून काय मी तुम्हाला सांगू शकतो?जर एखादा सर्व्हर किंवा दुसरं एखादं उपकरण बिघडलं तर आम्ही लगेचच, एका तासाच्या आत ते दुरुस्त करू शकतो किंवा तसंच दुसरं उपकरण इथे बसवू शकतो. योलांडाने तुम्हाला सांगितलंच असेल की इथली बहुतेक सगळी सिस्टिम ही आम्हीच बनवलेली आहे. त्यामुळे आम्हीच तिच्या सुरुस्तीकडे लक्ष देतो. तुम्हाला याच्या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.”

मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या, त्यामुळे मी नकारार्थी मान डोलावली आणि रॅशेलकडे पाहिलं.

“पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो. इथे काम करणारे लोक. तुम्ही तुमचा सापळा कितीही चांगला बनवला तरी जे लोक तो सापळा वापरणार आहेत, त्यांच्यावरच त्याचं यश अवलंबून असतं.” ती म्हणाली.

कार्व्हरने होकारार्थी मान डोलावली. तो अजूनही सर्व्हर रूमकडेच पाहात होता पण त्याच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब मला त्या काचेत दिसत होतं.

“आपण माझ्या ऑफिसमध्ये बसून यावर सविस्तर बोलू,”

आम्ही त्याच्यामागोमाग त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. जात असताना मी त्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये पटकन पाहून घेतलं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी व्यक्तिगत दिसत होत्या. बरीच तांत्रिक नियतकालिकं, कुठलीतरी जुनाट कादंबरी, एक सिगरेट केस, स्टार ट्रेकचा लोगो असलेला एक कॉफी मग, त्यामध्ये भरपूर पेन्स, पेन्सिली, दोन-तीन सिगरेट लायटर्स, काही पेन ड्राईव्ह्ज आणि एक आयपॉड आणि इअरफोन्स.

कार्व्हर त्याच्या ऑफिसचा दरवाजा धरून उभा होता. आम्ही आत गेल्यावर त्याने तो बंद केला. आम्ही बसलो. त्याच्या समोर एक वीस इंचांचा कॉम्प्युटर स्क्रीन होता. तो दंतवैद्याच्या दवाखान्यात असलेल्या ट्रेसारख्या एका एक्स्टेन्शनवर ठेवला होता. त्याच्या टेबलावर असलेल्या काचेखाली एक छोटा स्क्रीन होता. त्याच्यावर फार्मची प्रतिमा दिसत होती. मिझ्झू आताच फार्ममध्ये गेल्याचं आणि सर्व्हर टॉवर्समधून चालत जात असल्याचं मी पाहिलं.

“इथे कुठल्या हॉटेलमध्ये उतरला आहात तुम्ही?” कार्व्हरने येऊन बसता बसता विचारलं.

“मेसा वेर्डे इन,” मी म्हणालो.

“अरे वा! छान हॉटेल आहे. दर रविवारी त्यांचा खास ब्रंच असतो. एकदम छान!” तो म्हणाला. आम्ही दोघांनी स्मित केलं.

“अच्छा, आता लोकांबद्दल बोलण्याची तुमची इच्छा आहे!” त्याने आमच्याकडे रोखून पाहात विचारलं.

“होय. तुम्ही आणि त्याआधी मिस शॅवेझनी आम्हाला जी माहिती दिली, ती खरोखरच फार विस्तृत स्वरूपात दिली. पण खरं सांगायचं तर आम्ही त्यासाठी इथे आलेलो नाही. तुम्ही दाखवलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या वेबसाईटवरही नमूद केलेली आहे. आम्ही इथे मुद्दामहून येण्याचं कारण आम्ही ज्यांच्या हातात आमची अत्यंत गोपनीय अशी माहिती सोपवणार आहोत, ते त्या विश्वासाला पात्र आहेत की नाहीत हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही मि.मॅकगिनिसना भेटू शकलो नाही, हे आम्हाला खटकतंय. स्पष्टच सांगायचं झालं तर आम्ही थोडेसे वैतागलेलो आहोत. ते आज इथे का नाहीयेत याचं व्यवस्थित स्पष्टीकरण आम्हाला मिळालेलं नाहीये.”

कार्व्हरने आपले हात वर केले, “योलांडा त्याबाबतीत तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही.”

“तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या मि.कार्व्हर,” रॅशेल म्हणाली, “ आम्ही इथे ज्या माणसाला भेटायला आलो, तोच इथे नाहीये.”

“मी समजू शकतो,” कार्व्हर म्हणाला, “पण मीही या कंपनीचा एक डायरेक्टर आहे, आणि त्या अधिकारानेच मी तुम्हाला याची खात्री देतो की तुमची लॉ फर्म आणि आमची कंपनी यांच्यामधल्या करारावर डेक्लॅन इथे नसल्यामुळे काहीही परिणाम होणार नाही. तो काही दिवसांच्या रजेवर गेलाय.”

“हे त्यांच्या अनुपस्थितीबद्दल तिसरं स्पष्टीकरण आहे या एक तासाभरात. आम्हाला त्यामुळे निर्णय घ्यायला कठीण होणार आहे मि.कार्व्हर.”

कार्व्हरने एक खोल निःश्वास सोडला, “मी जर तुम्हाला याहून जास्त सांगू शकलो असतो, तर जरूर सांगितलं असतं पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की आम्ही जी गोपनीयता सांभाळतो, तो आमच्या सगळ्या सेवांमधला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याची सुरुवात आमच्या स्वतःच्या लोकांपासून होते. जर तुम्हाला मी दिलेलं स्पष्टीकरण पसंत नसेल, तर मग कदाचित आम्ही तुम्हाला हव्या असलेल्या सेवा पुरवू शकणार नाही.”

त्याने रॅशेलला निरुत्तर केलं होतं.

“ठीक आहे मि.कार्व्हर. मग मला इथे असलेल्या आणि तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांबद्दल सांगा. आम्ही जी माहिती तुमच्याकडे सोपवणार आहोत, ती अत्यंत महत्वाची आणि संवेदनशील असणार आहे. ती इथे सुरक्षित राहील याची खात्री तुम्ही देऊ शकता का? आत्ताच तुम्ही तुमच्या सर्व्हर इंजिनिअर्सची आणि आमची ओळख करून दिलीत. मला तर ते तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांपासून तुमच्या सिस्टिमचं संरक्षण करू इच्छिता, त्याच प्रकारचे लोक वाटले.”

कार्व्हर हसला आणि त्याने होकारार्थी मान हलवली.

“खरं सांगायचं तर रॅशेल – मी तुला रॅशेल म्हणून संबोधित करू शकतो ना?”

“हो.”

“बरोबर. तर डेक्लॅन जेव्हा इथे असतो आणि आमच्या क्लायंटना इथे घेऊन येतो, तेव्हा मी त्या दोघांना ब्रेक देतो. ते तेवढ्या वेळात एक सिगरेट ओढून येतात. आज तसं झालं नाही. पण हेही तितकंच खरं आहे की ते दोघेही अत्यंत हुशार आणि कामसू आहेत. मी हे तुला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय. हे खरं आहे, की आमच्या काही कर्मचाऱ्यांनी इथे येण्याआधी, त्यांच्या पूर्वायुष्यात हॅकिंग किंवा त्यासारख्या बेकायदेशीर गोष्टी करून पाहिल्या आहेत, पण तरीही आम्ही त्यांची निवड केली, कारण चोराची पावलं ही बरेच वेळा चोरालाच ठाऊक असतात. पण इथे आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याची सायकिअॅट्रिस्टकडून तपासणी करवतो आणि त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासल्याशिवाय त्याला नोकरीवर ठेवत नाही. आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने बेकायदेशीररीत्या क्लायंटच्या माहितीच्या संदर्भात ढवळाढवळ किंवा घुसखोरी केलेली नाही. तुम्ही असंही म्हणू शकता की आम्हीच आमचे स्वतःचे सर्वात महत्वाचे क्लायंट आहोत. या संपूर्ण प्लँटमध्ये असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरवर टाईप झालेलं प्रत्येक अक्षर तुम्हाला इथे वाचायला मिळू शकतं. शिवाय योलांडाने तुम्हाला आमच्या कॅमेऱ्यांबद्दल सांगितलं असेलच.”

आम्ही दोघांनीही होकार दिला पण आम्हाला हे माहित होतं की प्रत्यक्षात इथे काम करणाऱ्या कोणीतरी क्लायंटच्या फाईल्समधून डेनिस बॅबिट आणि शेरॉन ओग्लेव्ही या दोघींबद्दल माहिती काढली होती आणि तिचा वापर करून त्यांचा खून केला होता. कार्व्हरला एकतर हे माहित नव्हतं, किंवा मग माहित असलं तर तो ते कंपनीचं नाव बदनाम होऊ नये म्हणून लपवत होता.

“त्या माणसाबद्दल काय मि.कार्व्हर?” मी विचारलं.

“कोणाबद्दल?”

“ज्याचा कार्डबोर्ड बॉक्स बाहेर खुर्चीवर ठेवलेला आहे, तो. मला वाटतं, त्याचं नाव फ्रेड आहे. तो इथून गेलाय पण त्याच्या वस्तू इथे आहेत. तो त्या न घेता का गेलाय इथून?”

कार्व्हर उत्तर देण्याआधी थोडा घुटमळला. तो सावधपणे विचार करून उत्तर देत होता हे कुणाच्याही लक्षात आलं असतं.

“हो मि.मॅकअॅव्हॉय. त्याने अजून स्वतःच्या वस्तू इथून नेलेल्या नाहीत. पण तो नेईल आणि म्हणूनच आम्ही त्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवल्या आहेत.”

मी अजूनही मि.मॅकअॅव्हॉय होतो त्याच्यासाठी. रॅशेलला मात्र तो तिच्या नावाने हाक मारत होता.

“का पण? त्याला तुम्ही बडतर्फ केलंय का? काय केलंय त्याने?”

“नाही, तसं काहीही झालेलं नाही. त्यानेच कुठलंही कारण न देता नोकरी सोडली आहे. त्याची शुक्रवार रात्रीची शिफ्ट होती पण तो आलाच नाही आणि त्याने आपण नोकरी सोडत असल्याचा मेल मला पाठवला. ही तरुण मुलं म्हणजे इतकी चंचल असतात! त्यांच्या कौशल्याला आमच्या इंडस्ट्रीत प्रचंड मागणी आहे. आमच्या एखाद्या स्पर्धकाने त्याला गटवला असणार. आम्ही पगार चांगलाच देतो, पण आमच्यापेक्षा चांगला पगार त्याला कोणीतरी देऊ केला असणार. लगेच उडी मारून तो गेला तिकडे.”

मी समजल्याप्रमाणे मान डोलावली, पण त्या बॉक्समध्ये ज्या वस्तू होत्या त्यांच्याबद्दल मी विचार करत होतो. विशेषतः आयपॉडबद्दल. एफ.बी.आय.चे एजंट्स येतात, trunkmurder.com बद्दल प्रश्न विचारतात आणि तो इथून निघून जातो – अगदी त्याचा आयपॉडही न घेता – या सगळ्या गोष्टी शुक्रवारीच घडल्या होत्या. आणि मॅकगिनिसचं काय? त्याच्या इथे नसण्याचा आणि फ्रेडच्या गायब होण्याचा काही संबंध आहे का? मी हे कार्व्हरला विचारणार, तेवढ्यात एक बझर वाजला. कार्व्हरच्या टेबलावर असलेल्या काचेच्या खाली असलेल्या स्क्रीनवर आम्हाला योलांडा शॅवेझ परत येताना दिसली.

रॅशेल तिच्या बसलेल्या जागेवरून थोडी पुढे झुकली आणि तिने थोड्या धारदार आवाजात विचारलं, “फ्रेडचं आडनाव काय आहे?”

जणू त्यांच्यात किती अंतर ठेवावं त्याबद्दल अलिखित करार झाला असल्यासारखा कार्व्हर थोडा मागे झाला. मी मनातल्या मनात चरफडलो. तिच्या डोक्यातून आपण एफ.बी.आय. एजंट आहोत हे अजून गेलेलं दिसत नव्हतं.

“त्याचं आडनाव कशाला हवंय तुम्हाला? तो आता इथे काम करत नाहीये.”

“मला फक्त...” आता रॅशेल अडकली. या प्रश्नाचं समर्पक उत्तर आम्हा दोघांकडेही नव्हतं. कुणालाही आमचा आणि आमच्या खऱ्या हेतूचा संशय येण्यासाठी हे पुरेसं होतं. नेमक्या त्याच वेळी शॅवेझने दरवाज्यावर टकटक केलं आणि ती आत आली.

“कसं काय चाललंय आपल्या पाहुण्यांना माहिती देणं?” तिने विचारलं.

कार्व्हर आणि रॅशेल एकमेकांकडे रोखून पाहात होते.

“व्यवस्थित,”:तो तिच्यावरची नजर न हटवता म्हणाला, “अजून काही प्रश्न आहेत माझ्यासाठी?”

रॅशेलने माझ्याकडे पाहिलं.

“नाही,” मी म्हणालो, “जे आम्हाला पहायचं होतं, ते सगळं पाहून झालेलं आहे. या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद!”

“ठीक आहे,” शॅवेझ म्हणाली, “मग मी तुम्हाला वरच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि आपण पुढे काय करायचंय त्याबद्दल बोलू.”

रॅशेल उठली आणि तडक दरवाज्याकडे गेली. मीही उभा राहिलो आणि कार्व्हरबरोबर हस्तांदोलन केलं.

“तुला भेटून आनंद झाला जॅक,” तो म्हणाला, “आपण परत भेटूच.”

“जरूर वेस्ली!” चला, शेवटीतरी का होईना, या माणसाने मला माझ्या नावाने हाक मारली.

#########################################################

आमची गाडी एखाद्या भट्टीसारखी तापली होती. मी स्टिअरिंग व्हीलला हात लावल्यावर चक्क चटका बसला.

“काय वाटतंय तुला?” मी रॅशेलला विचारलं.

“आधी इथून बाहेर पडू या, मग सांगते.”

“ठीक आहे.”

मी गाडी चालू केली, पण त्यांच्या कम्पाउंड बाहेर गेलो नाही. त्याऐवजी मी दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गाडी नेली आणि एक यू-टर्न घेऊन वेस्टर्न डेटाच्या मागच्या बाजूला गेलो.

“काय करतोयस तू?”

“इथे पाठच्या बाजूला काय आहे, ते बघायचंय मला. आपण अजूनही क्लायंट आहोत. आपल्याला इथे जातं येईल.”

आम्ही तिथून बाहेर पडायच्या बेतात असताना मला इमारतीचा मागचा भाग दिसला. तिथेही कॅमेरे लावले होते. तिथे एक EXIT असं लिहिलेला दरवाजा होता, आणि त्याच्यापुढे एक कापडी कनात होती. त्याच्याखाली दोन-तीन खुर्च्या ठेवल्या होत्या आणि एका खुर्चीवर कार्व्हरने मिझ्झू म्हणून ज्याची ओळख करून दिली होती, तो सर्व्हर इंजिनीअर बसला होता, आणि सिगरेट ओढत होता.

“स्मोकर्स पोर्च.” रॅशेल म्हणाली, “झालं समाधान?”

मी मिझ्झूकडे बघून हात हलवला. त्यानेही हात उंचावून प्रतिसाद दिला. आम्ही आता बाहेर जाण्यासाठी असलेल्या गेटच्या दिशेने निघालो.

“मला वाटतं, तो सर्व्हर रूममध्ये होता. कार्व्हरच्या ऑफिसमध्ये आपण आलो, त्याचवेळी मी त्याला सर्व्हर रूममध्ये जाताना पाहिला होता.” मी म्हणालो.

“मग?”

“एवढ्या उकाड्यात तो इथे बाहेर फक्त सिगरेट ओढण्यासाठी आलाय? ती कनात नसती, तर आत्तापर्यंत त्याचं काय झालं असतं?”

“स्मोकर्सना तल्लफ आल्यावर काहीही सुचत नाही!”

मी गाडी बाहेर काढली. बराच वेळ आम्ही दोघेही काहीही बोललो नाही. जेव्हा वेस्टर्न डेटाची इमारत क्षितिजावरूनही दिसेनाशी झाली, तेव्हा मी तोंड उघडलं, “मग, काय वाटतंय तुला?”

“मी घोटाळा केला बहुतेक.”

“शेवटी? मला नाही वाटत. शॅवेझने अगदी योग्य वेळी येऊन आपल्याला वाचवलं. पण तुला हे लक्षात ठेवायला हवं की तू आता एफ.बी.आय.एजंट नाहीयेस. लोक केवळ तुझा बॅज पाहिल्यावर तुला निमुटपणे माहिती द्यायचे. ते दिवस गेले आहेत आता.”

“थँक्स जॅक. हे माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!”

“सॉरी रॅशेल. म्हणजे मला...”

“नाही, तुझं बरोबर आहे जॅक. ते दिवस खरोखरच गेले आहेत.”

ती खिडकीतून बाहेर बघत होती.

“ते जाऊ दे रॅशेल. तुला तिथे जे काही दिसलं त्याबद्दल काय वाटतंय?”

ती माझ्या दिशेने वळली, “मला तिथे जे लोक दिसले नाहीत, त्यांच्यात जास्त रस आहे.”

“फ्रेड?”

“आणि मॅकगिनिस. आपल्याला या दोघांबद्दल ही शोधून काढायला पाहिजे. एफ.बी.आय.एजंट्स तिथे गेल्याबरोबर दोघेही बेपत्ता झालेत. हा योगायोग असावा असं माझं मन मानत नाहीये.”

माझ्याही मनात हाच विचार आला होता.

“म्हणजे तुलाही वाटतंय की त्यांच्या बेपत्ता होण्याचा एकमेकांशी संबंध आहे?”

“आपण दोघांशीही बोलल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाहीये.”

“ते कसं करणार आहोत आपण? आपल्याला फ्रेडचं आडनावही माहित नाही.”

तिने जरा विचार केला, “मी काहीजणांना फोन करून ही माहिती देऊ शकते. पण त्यांनी माझं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. जे एफ.बी.आय.एजंट्स तिथे शुक्रवारी गेले होते, त्यांनी इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची यादी तर आणली असेलच.”

“आणि जर कोणी तुझं ऐकून नाही घेतलं तर? मागच्या वेळी गोष्ट वेगळी होती. त्यांनी तुला डाकोटाला पाठवलं होतं, पण तू तरीही एफ.बी.आय. मध्ये होतीस. आता तू बाहेर पडली आहेस. तेही विवादास्पद परिस्थितीमध्ये. एफ.बी.आय.सारख्या सरकारी संस्थांमध्ये एकदा एखादा माणूस बाहेर पडला, की त्याच्यासाठी सगळं संपतं.”

“मग मला माहित नाही,”ती थोडी वैतागून म्हणाली, “एक करू शकतो आपण. आपण फ्रेडचे मित्र बाहेर पडायची वाट पाहू शकतो. मग ते आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातील, किंवा मग आपल्याला त्यांच्याकडून ते काढून घ्यावं लागेल.”

“हां, हे करू शकतो आपण. पण आपल्याला जरी फ्रेड कुठे राहतो, ते समजलं तरी आपल्याला तो तिथे सापडेल याची खात्री नाही. मी तर म्हणतो नाहीच सापडणार.”

“का?”

“त्या बॉक्समध्ये काय होतं, हे पाहिलं होतंस तू?”

“नाही. मी आधी शॅवेझशी आणि नंतर कार्व्हरशी बोलत होते. ही तुझी जबाबदारी होती, पार्टनर!” तिने स्मित केलं. मला जरा बरं वाटलं.

“ओके. त्यात अशा वस्तू होत्या, ज्यांच्याशिवाय तुम्ही बाहेर पडणार नाही, विशेषतः नोकरी सोडून जाणार असाल तर. सर्वात महत्वाची गोष्ट – आयपॉड. या वयातल्या मुलांना आयपॉडशिवाय बाहेर पडण्याची कल्पनाही करवणार नाही. शिवाय तू म्हणालीस तसं – एफ.बी.आय.एजंट्स आले, आणि तो गायब झाला.”

रॅशेलने याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती विचार करत होती.

“कसला विचार करते आहेस तू?”

“हाच की तुझं म्हणणं बरोबर आहे आणि आता पोलिस आणि ब्युरो या दोघांनाही इथे बोलवायची वेळ आलेली आहे. आपल्याकडे त्यांच्यासारखे अधिकार आणि साधनसामग्री या दोन्हीही गोष्टी नाहीयेत.”

“नाही रॅशेल. आपण आपल्याला काय मिळतंय ते आधी बघू या.”

“नाही जॅक. आपल्याला त्यांना बोलवायला पाहिजे.”

“नाही. निदान सध्यातरी नाही.”

“हे पहा जॅक, हे तू शोधून काढलं आहेस. यापुढे जे काही होईल ते तू या गोष्टींमधला संबंध शोधून काढल्यामुळेच होणार आहे. तुला श्रेय मिळेल त्याचं.”

“मला श्रेय नकोय.”

“मग हे का करतो आहेस तू? माझी स्टोरी वगैरे नेहमीची कारणं देऊ नकोस. त्याच्यातून बाहेर पड.”

“तू एजंट असण्याच्या परिस्थितीमधून बाहेर पडली आहेस का?”

ती उत्तर न देता परत खिडकीतून बाहेर बघायला लागली.

“माझंही तसंच आहे,” मी म्हणालो, “ही माझी शेवटची स्टोरी आहे, आणि माझ्यासाठी ती महत्वाची आहे. आणि शिवाय, समजा, फ्रेड आपला अनसब असला, आणि तू त्याला शोधून काढलंस तर त्याचा वापर करून तू एफ.बी.आय.मध्ये परत जाऊ शकतेस.”

तिने नकारार्थी मान डोलावली, “जॅक, मी शोधून काढलं की अफगाणिस्तानऐवजी ओसामा बिन लादेन इथे, अमेरिकेत एल.ए.मधल्या ग्रिफिथ पार्कमध्ये लपला आहे, तरीही ते मला परत घेणार नाहीत.”

आम्ही दोघेही गप्प बसलो. थोडं अंतर पुढे गेल्यावर मला रोझीज बार्बेक्यू नावाचं एक रेस्तराँ दिसलं. अजून लंचला वेळ होता, पण गेले तासभर अंडरकव्हर वावरल्यामुळे असेल कदाचित, पण मला प्रचंड भूक लागली होती. मी रोझीजच्या पार्किंगच्या दिशेने गाडी वळवली.

“एक काम करू आपण,” मी म्हणालो, “आपण काहीतरी खाऊ या आता आणि मग कर्ट किंवा मिझ्झू – दोन्हीपैकी कोणीतरी बाहेर पडेलच. त्याची वाट पाहू.”

“येस पार्टनर!” रॅशेल म्हणाली.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

वाङ्मयभाषांतर

प्रतिक्रिया

अमृत's picture

5 Sep 2015 - 5:33 pm | अमृत

अब आगे क्या होगा?? देखिये (सॉरी पढिये) कल... :-)

प्यारे१'s picture

5 Sep 2015 - 5:45 pm | प्यारे१

मस्त सुरु आहे मालिका.

प्रचेतस's picture

5 Sep 2015 - 6:11 pm | प्रचेतस

भन्नाट कथानक आहे अगदी.

अजया's picture

5 Sep 2015 - 6:44 pm | अजया

लवकर लिहा ना भाऊ!

स्रुजा's picture

5 Sep 2015 - 7:03 pm | स्रुजा

अजुन तर त्या कार्व्हर चा भूतकाळ कळायचा आहे. तो असा का वागतो हे तेंव्हाच समजेल. शिवाय आज त्याने हे लोकं कुठे उतरलेत ही माहिती काढुन घेतली आहे. कधी येणार पुढचा भाग???

अद्द्या's picture

5 Sep 2015 - 8:19 pm | अद्द्या

आला आला शनिवार आला

बोक्याचा लेख आला . .

मस्त चाललंय .

पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत

आत कार्व्हरच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय ते पाहूयात.

पुभालटा.

मास्टरमाईन्ड's picture

6 Sep 2015 - 12:48 am | मास्टरमाईन्ड

पण पुढच्या भागाची आतुरतेनं वाट पाहतोय.

भन्नाट सुरू आहे. २४ वा भाग लवकर येवु द्या !

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 6:54 pm | शाम भागवत