द स्केअरक्रो - भाग ३०

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 12:50 am

द स्केअरक्रो भाग २९

द स्केअरक्रो भाग ३० (अंतिम भाग) (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

कार्व्हर तिथे असेल असा मला संशयसुद्धा आला नव्हता पण आता तो माझ्या मागे उभा होता.

“तू रिपोर्टर आहेस त्यावरूनच मला समजायला हवं होतं. एक नंबरचे सिनिकल असता तुम्ही लोक. मी आत्महत्या करीन यावर तुझा विश्वास न बसणं साहजिक आहे.”

बोलता बोलता त्याने माझ्या हातातली गन काढून घेतली आणि माझ्या शर्टाची कॉलर धरून माझा चेहरा भिंतीवर दाबला. तो माझी झडती घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं.

“ही गन एजंट वॉलिंगने दिली वाटतं तुला? तुझी स्वतःची गन तर गायब झालीय.” त्याची झडती संपल्यावर त्याने मला दरवाज्याच्या दिशेने ढकललं, “एक काम करू या आपण. एजंट वॉलिंगला भेटायला जाऊ या. आणि मग हा सगळा तमाशा तिथेच कायमचा संपवून टाकू या. दुर्दैवाने या वेळी मी लेडीज फर्स्ट असं म्हणणार नाही. तुला आधी जावं लागेल कारण माझी एजंट वॉलिंगच्या सहवासात थोडा वेळ घालवण्याची इच्छा आहे.”

आम्ही आता त्या दरवाज्यापर्यंत आलो होतो.

“तुझं की कार्ड वापरून दरवाजा उघड,” कार्व्हर म्हणाला.

मी निमुटपणे दरवाजा उघडला. त्याने मला पुढे ढकललं आणि तोही बाहेर पडला.

एकदम त्याची माझ्यावरची पकड ढिली पडल्याचं मला जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर रॅशेल तिथे उभी होती आणि कार्व्हर जमिनीवर पडला होता. तिने तिच्या गनच्या दस्त्याने त्याच्या डोक्यावर मारून त्याला बेशुद्ध केलं होतं बहुतेक.

“रॅशेल? तू कशी काय आलीस इथे?”

“त्याने साराचं की कार्ड ती काम करत होती त्या डेस्कवर ठेवलं होतं. मी तुझ्यापाठोपाठ आले. आता त्याला परत कंट्रोल रूममध्ये घेऊन चल.”

“का?”

“त्याचा हात. त्याचा हात स्कॅनरवर ठेवून आपल्याला सर्व्हर रूम उघडावी लागेल.”

कार्व्हर काहीही हालचाल करत नव्हता. रॅशेलने मला तिने दिलेली गन त्याच्या हातातून काढून घेतली. त्याच्या कोटाच्या खिशात अजून दोन गन्स होत्या. मी त्या काढून घेतल्या आणि माझ्या पँटच्या खिशात ठेवल्या.

“आपल्याला त्याला त्या अष्टकोनी खोलीत न्यायची गरज नाही,” मी म्हणालो, “त्याला या मागच्या दरवाज्याने आपण सर्व्हर रूममध्ये नेऊ शकतो.”

“ठीक आहे. तुला तिथे कसं जायचं ते माहित आहे. तूच पुढे हो.”

कार्व्हरला आम्ही जवळजवळ खेचतच त्या मागच्या दरवाज्याच्या दिशेने नेलं. तो उंच होता पण त्याचं वजन काही फार नव्हतं. त्यामुळे हे मी सहजपणे करू शकलो.

“आपल्याला त्या दोघांना वाचवायलाच हवं,” ती म्हणाली.

“हो. पण आपल्याला उशीर झालेला असला तर?”

“मी असा विचार नाही केला जॅक. चल लवकर!”

शेवटी एकदाचा तो सर्व्हर रूमचा मागचा दरवाजा आला. त्याच्या बाजूला स्कॅनर होताच. मी कार्व्हरला उभं करायला लागलो. मला त्याला वळवायचं होतं, म्हणजे रॅशेलला त्याच्या उजव्या हाताचा तळवा स्कॅनरवर ठेवता आला असता.
त्याच क्षणी कार्व्हरचा पाय उंचावला गेल्याचं मी पाहिलं. त्यामुळे रॅशेलला त्याची लाथ लागली आणि ती मागे कोलमडली. त्याने मला जोराने दरवाज्याकडे ढकललं. माझं डोकं दरवाज्यावर आपटलं आणि एक क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटून आली. त्याने मला दरवाज्यापासून दूर ओढलं आणि फिरवून स्वतःच्या समोर घेतलं. तो काय करतोय हे माझ्या लक्षात आलं. तो मला त्याच्या आणि रॅशेलच्या मध्ये ठेवायचा प्रयत्न करत होता. त्याने माझ्या पँटच्या खिशातून गन काढलेली मला जाणवलं आणि तेवढ्यात ....

एक कानठळ्या बसवणारा आवाज आला. माझ्या कानाच्या एवढ्या जवळ की माझ्या दोन्ही कानांना दडे बसले. माझ्या चेहऱ्यावर रक्त उडालं आणि कार्व्हर जमिनीवर कोसळला.

मी एक पाऊल मागे झालो आणि माझे कान दाबून धरले. एखादी ट्रेन बाजूने जावी इतक्या तीव्रतेचा तो आवाज होता. मी समोर पाहिलं तर रॅशेल हातात गन घेऊन फायरिंग पोझिशनमध्ये होती.

“ठीक आहेस तू जॅक?”

“हो.” नशिबाने मला ऐकू येत होतं.

“त्याला उचल. तो जर मेला तर आपल्याला काही करता येणार नाही.”

आम्ही दोघांनी मिळून कार्व्हरला उचललं आणि कसंबसं उभं केलं. रॅशेलने त्याच्या उजव्या हाताचा तळवा स्कॅनरवर ठेवला आणि पाच सेकंदांत आम्हाला दरवाजा उघडल्याचा क्लिक असा आवाज ऐकू आला. रॅशेलने दरवाजा उघडला आणि मी कार्व्हरला दरवाज्याच्या बाजूला ठेवलं. मला बाहेरची हवा आत यायला हवी होती. त्याच्या कोटाच्या खिशात दोन-तीन मास्क्स मिळाले. मी आणि तिने एक-एक मास्क चढवला आणि आम्ही आत शिरलो.

तिथला पांढरा वायू हळूहळू कमी होत होता. आम्हाला जॉर्ज आणि सारा यांना शोधायला लागलं नाही. दोघेही ज्या अवस्थेत आम्हाला दिसले होते, त्याच अवस्थेत होते. आम्ही दोघांनीही आमचे मास्क्स काढले आणि त्यांच्या चेहऱ्यांवर लावले.

“तू जॉर्जला बाहेर ने. मी साराला घेऊन येते,” रॅशेल म्हणाली.

आम्ही तिथून बाहेर पडण्याची घाई करत होतो कारण या दोघांची परिस्थिती नक्की कशी आहे ते मला समजत नव्हतं.
कार्व्हरला ओलांडून मी पुढे गेलो आणि मला जॉर्जच्या खोकण्याचा आवाज आला. तो हळूहळू शुद्धीवर येत होता बहुतेक. रॅशेल माझ्यापाठोपाठ साराला घेऊन बाहेर आली. सारा अजून शुद्धीवर आली नव्हती. रॅशेलने तिला बाहेर आणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि तिला कृत्रिम श्वासोच्छवास द्यायला सुरुवात केली. एक-दोन मिनिटांत आम्हाला तिच्या खोकण्याचा आवाज ऐकू आला.

मी मटकन खाली बसलो. असह्य वाटणारा ताण अचानक संपल्यावर असंच होत असावं. मी बसलो होतो तिथून कार्व्हरला पाहू शकत होतो. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती बहुतेक. मी उठलो आणि त्याच्या जवळ गेलो.

“बॅकअप येतोय. वैद्यकीय मदत पण येतेय.” रॅशेल तिचा फोन बंद करत म्हणाली, “मी बाहेर जाते आणि त्यांच्यासाठी थांबते. त्यांना या भूलभुलैयामध्ये काही समजणार नाही.”

“ ठीक आहे.”

तिची नजर कार्व्हरवर गेली, “ दुर्दैवाने त्याला आपण जिवंत पकडू शकलो नाही. कुरियर गेला. आता कार्व्हरपण गेला. त्यांचं रहस्य त्यांच्याचबरोबर गेलं. त्यांनी हे खून का केले ते आपल्याला कधीच कळू शकणार नाही.”

मी कार्व्हरकडे पाहात होतो. मला त्याच्या मानेवरची शीर हळूहळू थरथरताना दिसली.

“नाही रॅशेल. आपला स्केअरक्रो अजून जिवंत आहे.”

#############################################################

मेसामध्ये घडलेल्या या घटनांना आता सहा आठवड्यांहून जास्त काळ लोटला आहे. पण अजूनही माझ्या डोळ्यांसमोर त्या तेवढ्याच स्पष्ट आहेत.

मी आता लिहितोय. दररोज. आता ऑफिसला जाणं वगैरे फालतू गोष्टी मागे नसल्यामुळे मी दुपारी एखाद्या वर्दळ असलेल्या कॉफी शॉपमध्ये जातो आणि तिथे माझा लॅपटॉप घेऊन बसतो. मी शांत वातावरणात लिहू शकत नाही. गर्दी आणि गोंगाट असलेल्या न्यूजरूममध्ये लिहायची एवढी सवय झालीय की शांततेत लिहिणं जमत नाही. अर्थात, खऱ्या न्यूजरूमची सर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला येऊ शकणार नाही हे माझं मत कायम आहे.

सकाळी मी माझ्या पुस्तकाबद्दल रिसर्च करतो. वेस्ली जॉन कार्व्हर नावाचं गूढ पूर्णपणे उकलणं कठीण आहे पण मी हळूहळू त्याला समजून घेतोय. तो एल.ए.जनरल हॉस्पिटलच्या प्रिझन वॉर्डमध्ये असतो आजकाल. कोमामध्ये.
त्याच्याबद्दल मला असलेली माहिती ही थोड्याफार प्रमाणात एफ.बी.आय.कडून मिळालेली आहे. त्यांचं काम अजूनही संपलेलं नाही. अॅरिझोना, नेवाडा आणि कॅलिफोर्निया या तिन्ही राज्यांमध्ये त्यांचा तपास चालू आहे. पण माझ्या स्वतःच्या सोर्सेसकडूनही मला माहिती मिळालेली आहे.

कार्व्हर हा अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस होता. त्याच्या विषयात – कॉम्प्युटर सायन्समध्ये तर तो जबरदस्त होताच पण त्याचा लोकांच्या मानसशास्त्राचा फार चांगला अभ्यास होता. त्यामुळेच तो त्यांच्या इच्छा आणि आकांक्षांबद्दल जाणून घ्यायचा आणि ते ज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचा. अनेक वेबसाईट्स आणि चॅटरूम्समध्ये तो टोपणनावाने वावरायचा आणि एखादं ‘सावज ’ किंवा ‘ सहकारी ’ हेरायचा. नंतर त्यांचा पत्ता शोधून काढून तो त्यांच्याशी प्रत्यक्षात संपर्क साधायचा आणि नंतर त्यांचा ‘ वापर ’ करून खून करायचा.

हे सगळं तो वेस्टर्न डेटामध्ये येण्याच्या आधीपासून चालू होतं. मार्क कुरियर उर्फ फ्रेडी स्टोन हा त्याचा गेल्या तीन वर्षांपासून सहकारी होता पण त्याच्याआधीही अनेकजण होते. कार्व्हरने त्यांची कशी विल्हेवाट लावली आणि त्यांना कसं गायब केलं ते रहस्य उलगडायला कदाचित बरीच वर्षे लागतील.

कार्व्हरचे गुन्हे लोकांपुढे येणं महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे त्यांच्यामागचं कारण समजणं. माझा संपादक – जेव्हा आम्ही माझ्या पुस्तकाबद्दल बोलतो – तेव्हा मला हेच सांगत असतो. जे घडलंय ते लोकांना माहित आहेच. आपण त्याच्यापलीकडे जायला पाहिजे. ‘का’ या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न मी केलाच पाहिजे. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर विस्तार आणि खोली. टाईम्सप्रमाणेच.

मला आतापर्यंत जे समजलंय ते हे – कार्व्हरला कोणीही भाऊ-बहिण वगैरे नव्हते. त्याने त्याच्या वडिलांनाही कधी पाहिलं नव्हतं. त्याची आई स्ट्रिप क्लबमध्ये डान्सर होती आणि तिच्या कामामुळे त्याचं बालपण हे अमेरिकेच्या एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत फिरण्यात गेलं. जेव्हा त्याच्या आईचा कार्यक्रम असायचा तेव्हा त्याला ड्रेसिंग रूममध्ये डांबून ठेवलं जायचं. त्याच्या आईचा एक ठरलेला कार्यक्रम म्हणजे त्यावेळचा प्रसिद्ध रॉक ग्रुप द डोअर्सच्या गाण्यांवरचा स्ट्रिप डान्स. हा ग्रुप एल.ए.मधला होता आणि त्यामुळे त्याची आई एल.ए.वुमन या नावानेच प्रसिद्ध होती.

या सगळ्या वातावरणात त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले आणि कधीकधी तर त्याची आई जिथे तिच्या गिऱ्हाईकांबरोबर झोपायची, तिथेच त्यालाही झोपावं लागलं.

अजून एक माहिती मला जी समजली ती म्हणजे त्याच्या आईला तिच्या तिशीत एक विचित्र अस्थिविकार जडला होता आणि त्याच्यामुळे तिचं काम कायमचं बंद होण्याचा धोका होता. त्यापासून वाचण्यासाठी तिला डॉक्टरांनी लेग ब्रेसेस वापरण्याचा सल्ला दिला होता आणि छोट्या वेस्लीला बरेच वेळा या लेग ब्रेसेसचे पट्टे बांधावे लागत आणि त्या सांभाळून ठेवाव्या लागत.

कार्व्हरबद्दलची ही सगळी माहिती सुन्न करणारी आहे पण त्याच्यामुळे तो खुनी कसा आणि का झाला या प्रश्नांची निश्चित उत्तरं मिळत नाहीत. हे थोडंफार कॅन्सरसारखं आहे. डॉक्टर तुम्हाला तो कशामुळे होऊ शकतो किंवा झालाय ते सांगू शकतात. पण नेमक्या कुठल्या क्षणी तुमच्या पेशी तुमचा घात करायला सुरुवात करतात ते मात्र ते सांगू शकत नाहीत. कार्व्हरच्या बाबतीतही त्याने खून करण्याचा विचार कधी केला आणि प्रत्यक्ष तसं करायला सुरुवात कशी आणि का केली हे अजूनही अज्ञात आहे. रॅशेल तर मला नेहमी सांगत असते की हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. ते फक्त त्या माणसाला माहित असतं.

मी आता बेकर्सफील्डमध्ये आहे. गेले चार दिवस दररोज सकाळी मी कॅरेन कार्व्हरला भेटतोय आणि ती मला तिच्या मुलाच्या आठवणी सांगतेय. तो वयाच्या अठराव्या वर्षी कुठलीतरी स्कॉलरशिप मिळवून एम.आय.टी.मध्ये शिकायला गेला तेव्हा तिने त्याला शेवटचं पाहिलं. एवढ्या वर्षांत त्याने तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवला नव्हता. पण तिची त्याच्याबद्दल बोलायची आणि माहिती द्यायची इच्छा आहे. तिच्या तिशीत झालेल्या त्या आजाराने आता तिचा पूर्ण ताबा घेतलेला आहे, त्यामुळे ती व्हीलचेअरवरच असते.

उद्या मात्र मी घरी परत जाणार आहे. हो. माझ्याच घरी. ते विकायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. बाकी बरीचशी कामं आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे रॅशेलला भेटणं. मी तिला पाहून पाच दिवस झालेले आहेत आणि आता दूर राहणं कठीण आहे. तिच्या सिंगल बुलेट थिअरीवर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे आता.

दरम्यान, कार्व्हरची परिस्थिती काही फार चांगली किंवा सुधारण्यासारखी नाहीये. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना असं वाटतंय की तो कधीच परत शुद्धीवर येऊ शकणार नाही. रॅशेलने झाडलेल्या त्या गोळीमुळे कार्व्हरच्या मेंदूचा तो भाग कायमचा निकामी झालेला आहे. तो तुरुंगात काहीतरी बोलत असतो, बडबडत असतो. क्वचित गुणगुणतो. पण त्याहून जास्त प्रतिसाद तो देत नाहीये.

ही स्टोरी ब्रेक झाल्यावर अनेकांनी त्याच्यावर या अवस्थेतदेखील खटला भरून त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी केली होती पण त्याला तितकाच तीव्र विरोध झाला. दोन्ही बाजूंचे लोक अधूनमधून एल.ए.जनरल हॉस्पिटलच्या बाहेर मोर्चे वगैरे काढतात. एक गट त्याला विजेच्या खुर्चीत बसवण्याची मागणी करतो. दुसरा त्याचं आयुष्य वाचवण्याची.

कार्व्हरला स्वतःला काय वाटत असेल हा विचार माझ्या मनात नेहमी येतो. दुसरा सतत येणारा विचार म्हणजे अँजेला कुकचा. तिचा तो थिजलेल्या उघड्या डोळ्यांनी गर्तेत कोसळत असणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून कितीही प्रयत्न केला तरी जात नाही. त्यामुळे मला वाटतं, की वेस्ली कार्व्हरवर कुठल्यातरी वरच्या न्यायालयात खटला चालवला गेलेला आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मरेपर्यंत. पॅरोलशिवाय!

#############################################################

कार्व्हर अंधारात थांबलाय. वाट पाहतोय कशाची तरी. त्याचं मन म्हणजे विचारांचा गडबडगुंडा झालाय. इतके विचार. त्यातल्या खऱ्या आठवणी कोणत्या आणि नुसतेच विचार कोणते, त्याला काहीही कळत नाहीये. सगळे विचार एखाद्या धुरासारखे त्याच्या मनातून विरून जाताहेत. तो काहीच पकडून ठेवू शकत नाहीये.

त्याला कधी कधी आवाज ऐकू येतात. पण नक्की कशाचे ते त्याला समजत नाही. लोक त्याच्याभोवती घोळका करून काहीतरी बोलत असतात. पण त्याच्याशी कोणीच बोलत नाही. तो प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही.

त्याचं आवडतं संगीत त्याच्याबरोबर आहे आणि त्याच एका गोष्टीने त्याला शेवटपर्यंत साथ दिलेली आहे. तो गुणगुणायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या तोंडातून आवाज फुटत नाही.

This is the end…..Beautiful Friend …… The End…..

हा ऐकू येणारा आवाज आपल्या वडिलांचा आहे असं त्याला वाटतं. त्यांना कधीच तो भेटू शकला नव्हता.

अचानक त्याच्या डोक्यातून वेदनेची एक तीव्र चमक जाते. कोणीतरी डोक्याच्या मध्यभागी कुऱ्हाड मारल्यासारखी वेदना. कमी नाही होत. कुणीतरी ती थांबवावी म्हणून तो वाट पाहतो. पण कुणी येत नाही.

हळूहळू सगळीकडे अंधार पसरतो.........

समाप्त

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी)

ता.क.: ही कादंबरी संपवताना मनात संमिश्र भावना आहेत. दर शनिवारी आणि रविवारी एकेक भाग टाकायची आणि आठवडाभर ते लिहायची सवय झाली होती. वाचकांचे प्रतिसाद ही तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे. आता पुढच्या शनिवारी सवयीने मिपा उघडलं जाईल, पण लगेचच लक्षात येईल, अरे कादंबरी तर संपली. मूळ कादंबरी इतकी अफलातून आहे, की कोणीही अनुवाद केला असता तरीही तो सुंदरच झाला असता. यातल्या चुका मात्र माझ्या आहेत. प्रिय मिपाकर वाचकांनी त्या मोठ्या मनाने खपवून घेतल्या आणि मला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद कसे म्हणणार? घरातल्या लोकांना कोणी धन्यवाद देतो का?
असाच लोभ असावा ही विनंती.

बोका-ए-आझम

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अद्द्या's picture

27 Sep 2015 - 1:46 am | अद्द्या

_/\_

जेव्हा केव्हा भेटाल तेव्हा तुमच्या आवडीचं पेय / खाद्य माझ्याकडून लागू साहेब

जबरदस्त अनुवाद होता . जियो

नाखु's picture

28 Sep 2015 - 7:59 am | नाखु

पुण्यात "मस्तानी"* आप्ल्याला सहर्ष पेश करण्यात येईल तीचा स्वीकार करावा ही विनंती.

आपण टक्या नसल्याने प्यायची का कुठली असला प्रशन उदभवत नाही.

बोकोबाच्या असंख्य पंख्यांपैकी एक नाखुस

अभामिपात्स्केअलेख्मालानियमित्वाचकस्वादक्संघ

एस's picture

27 Sep 2015 - 1:51 am | एस

वा! शेवटी स्मितहास्याची एक लकेर उमटली चेहर्‍यावर. पुढच्या शनिवार-रविवारच्या रात्री जागं राहून मिपा रिफ्रेश करत बसण्याचं 'स्केअरक्रो' हे कारण आता राहणार नाही ह्याची रुखरुख आहे. पण ती कसर तुम्ही अजून एखाद्या छानशा अनुवादमालिकेने भरून काढाल अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक गुन्ह्यामागे न संपणारी एक गुन्हामालिका असतेच, विशेषतः अशा थंड डोक्याने केलेल्या निर्घृण गुन्ह्यांचे कारणच गुन्हेगाराचा भूतकाळ असू शकतो हे अधोरेखित करणारी ही थरारक कादंबरी होती. मराठी वाचकांना ती किती आवडलीये हे मायकेल कॉनेलींपर्यंत अवश्य पोहोचवा. त्यांनी मोठ्या मनाने तुम्हांला अनुवादाची परवानगी दिली आणि तुम्हीही नेटाने फार सुरेख अनुवाद करत ती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुम्हां दोघांचेही आभार. हा अनुवाद वाटतच नव्हता इतका तो पुरेपूर उतरला हे वेगळे सांगायला नकोच.

आणि जाताजाता - 'अंधारक्षण'. कृपया पूर्ण करा. :-)

सहमत! बोकोबा एखादी भयकथा शक्य तर करा अनुवादित ही एक वैयक्तिक विनंती! बाकी भाषांतर लाजवाब!! तुमची मेहनतही कौतुकास्पद आहे! जियो बोकेश!

स्रुजा's picture

27 Sep 2015 - 5:51 am | स्रुजा

जबरदस्त अनुवाद. कुठेही कृत्रिम न वाटु देता पूर्ण कादंबरी अनुवादीत करणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. कादंबरी आतापर्यंत खुप विचार करुन वीणली होती. त्यातलं रहस्य, कथेचा वेग , वर्णनातुन भाष्य न करता घटनांमधुन भाष्य करणं, पात्रांचा परिचय, काही अत्यंत हुशारीने दिलेल्या कलाटण्या यामुळे आतापर्यंत कादंबरीने खिळवुन ठेवलं. मात्र, आज चा शेवट ( तुमचा अनुवाद नाही, मुळ कादंबरीचा शेवट) जरा त्रोटक वाटला. तो असा का झाला, इतका विकृत का झाला यावर फारसा काही खुलासा नाही . एक वेळ आहे तो खुलासा पुरेसा सुचक आहे असं जरी मान्य केलं तरी या सगळ्या बायकांना तो कसा "हंट" करत होता वगैरे गोष्टी रेट्रोस्पे़क्ट मध्ये अजुन उजेडात येतील असं वाटलं होतं. आता हे लिहीताना पण माझ्या हे लक्षात आहे की लीगल डेटा असल्याने त्यातल्या अडचणीत सापडलेल्या बायका आपसुन मिळत होत्या वगैरे पण त्याचा पण एक एम ओ असणार च ना. तो ही माहिती मिळवताना काय करत होता, कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी फ्लॅग होत होत्या वगैरे समोर नाही आलं. मला एक वाचक म्हणुन मुळ कादंबरीच्या या मर्यादा वाटल्या.

तुमच्या अनुवादा बद्दल काय बोलावे? दर आठवड्याला तुम्ही न चुकता हे अनुवाद आणत होतात, शनि - रवि ची वाट आतुरतेने बघायचो आम्ही. पुन्हा एकदा या अनुवादाबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील साहित्यकृतीच्या प्रतिक्षेत..

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2015 - 6:44 am | कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है!!! तुमच्या एफर्ट्स ना साष्टांग दंडवत! मी स्वतः एलए चा एक नागरीक आहे इतकी समरसुन वाचणे झाले,अमेरिकन कल्चर ते ही मातृभाषेत मांडत होतात तुम्ही अन इतके कठीण काम इतक्या सोप्या पद्धतीने केलेत! (नाहीतर हल्ली 'यु नो न आमचे न बे साइड ट्रॅफिक यु नो इतके स्लो मूविंग असते न वगैरे सर्रास वाचायला मिळते) मुजरा घ्या मानाचा!

बोकेराव अनुवाद अप्रतीम झालेला आहे.

अमृत's picture

27 Sep 2015 - 9:28 am | अमृत

अतिशय उत्कंठावर्धक. कुठेही भाषांतर केल्याचं जाणवलं नाही. पोएट चा पण अनुवाद करायचं मनावर घ्या तेव्हडं.

सामान्य वाचक's picture

27 Sep 2015 - 9:34 am | सामान्य वाचक

अनुवाद न वाटण्या एवढा चांगला !
आता शनि रवि कशाचि वाट पहायची?

नविन कादंबरी हाती घ्या आता

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 9:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

संपली :(!!!!!!!!!

जबरदस्तं ताकदीचं भाषांतर वाचायला मिळालं बर्‍याचं दिवसांनी. आता काहितरी नवं सुद्धा येउ दे :)!!

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 10:14 am | मृत्युन्जय

अतिशय सुंदर. दर वेळेस मिपा उघडल्यावर स्केअरक्रो चा नविन भाग दिसला की तो लगेच उघडुन बघितलाच जातो. मूळ कादंबरी तर स्सुंदर असेलच पण अतिशय उत्तम अनुवाद जमल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

पैसा's picture

27 Sep 2015 - 10:25 am | पैसा

अप्रतिम झालंय भाषांतर! कार्व्हरला शेवट उत्तम शिक्षा झाली असे वाटते. मेला असता तर एकदाच सुटला असता. गुन्हेगाराला भूतकाळ असतो हे खरंय, पण त्याच्या बळींना बिचार्‍यांना तोही नसतो आणि भविष्यही. भूतकाळात परिस्थितीचा बळी असलेल्या गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटावी का हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण मग हाच न्याय भयानक गुन्हे करणारे अतिरेकी, नक्षले, माफिया सगळ्यांनाच लावावा लागेल. मग त्यांच्या निरपराध बळींचं काय?

हे भाषांतर व्यापारी उपयोगासाठी नव्हते हे मान्य. पण भविष्यात व्यावसायिक भाषांतरे करायलाही काही हरकत नाही! शक्य असेल तर कॉनेलीच्या इतर पुस्तकांचेही भाषांतर करून मिपासाठी लिहा! आणि आधीची अर्धी राहिलेली अंधारक्षण मालिका जरूर पुरी करा. वाचायला त्रास होतो खरे पण काही इलाज नाही.

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 2:19 pm | मांत्रिक

गुन्हेगाराला भूतकाळ असतो हे खरंय, पण त्याच्या बळींना बिचार्‍यांना तोही नसतो आणि भविष्यही.

एकदम क्लास वाक्य!!!

आनन्दा's picture

27 Sep 2015 - 10:52 am | आनन्दा

अतिशय सुंदर.. मधले बरेच भाग मी प्रतिक्रिया देत नव्हतो. कारण म्हटले एकदमच शेवटी एकच प्रतिक्रिया देऊ आता. धन्यवाद एका सुंदर थ्रिलरची ओळख करून दिल्याबद्दल.
बाय द वे यावर कोणता चित्रपट आलेला आहे का?

जिमहेश's picture

27 Sep 2015 - 11:46 am | जिमहेश

उत्कंठा वाढविणारा व ओघवता अनुवाद

प्यारे१'s picture

27 Sep 2015 - 11:58 am | प्यारे१

एका सुंदर अनुवादासाठी आपले धन्यवाद बोका सेठ.

संजय पाटिल's picture

27 Sep 2015 - 12:18 pm | संजय पाटिल

शेवटचा भाग आल्या नंनतर सगळे भाग परत एकद वाचुन कढले. जबरद्स्त अनुवाद आहे. आता दुसरं काहि तरी घ्या हातात अशी एक विनंति ...

मृत्युन्जय's picture

27 Sep 2015 - 12:33 pm | मृत्युन्जय

सहमत. आता. रॉबर्ट लुडलुम ची एखादी कादंबरी घ्या बरे मनावर.

मोहन's picture

27 Sep 2015 - 12:43 pm | मोहन

अत्युत्तम अनुवाद दिल्याबद्दल शतशः आभारी आहे. स्वॅप्स ने लिहील्या प्रमाणे अनुवादाची परवानगी दिल्या बद्दल कॉनेली व विशेष मेहनत घेवुन अनुवाद केल्या बद्दल तुम्ही असे दोघेही अभिनंदनास पात्र आहात.

राजाभाउ's picture

27 Sep 2015 - 12:54 pm | राजाभाउ

अतिशय सुंदर मुळ कादंबरी आणि तुमच्या अनुवादा बद्दल काय बोलु , अनुवाद वाचतोय असे कुठे जाणवत सुद्धा नाही इतकी ओघवती शैली आहे तुमची. या कादंबरीतील 'द पोएट' च्या उल्लेखामुळे त्या बद्दल उच्छुकता निर्माण झाली आहे तर त्या काद्न्बरीचा अनुवाद हाती घ्यावा ही विनंती

पद्मावति's picture

27 Sep 2015 - 2:07 pm | पद्मावति

अप्रतिम.
तुम्ही केलेला अनुवाद इतका सुरेख आणि सहज होता की हा अनुवाद आहे हे विसरल्यासारखंच झालं होतं. मूळ पुस्तकातील थरार तितक्याच ताकदीने अनुवादित रूपात वाचकांपर्यंत पोहोचवणे हे खूप कठीण काम आहे. पण तुम्ही हे काम दोनशे टक्के यशस्वीरित्या करून दाखविले त्याबदद्ल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. तुमच्या पुढील लेखनाची प्रतीक्षा आहे.

तुषार ताकवले's picture

27 Sep 2015 - 2:50 pm | तुषार ताकवले

पुढच्या शनिवारी व रविवारी कशाचि वाट बघायची ते शोधाव लागेल.

पुनः वाचण्याचा आनंद दिल्याबद्दल आभारी आहे. अंधारक्षण च तेव्हड़ बघा

द स्केअरक्रो तुफ्फान आवडली. सरस अनुवादामुळे प्रचंड वाचनीय झालीय. मालिका संपल्याची हुरहूर आहेच.

लवकरच तुमचे अजून काही लिखाण येईल ह्याची खातरी आहेच.

सुंदर, अप्रतिम अनुवाद. अनुवाद वाटलाच नाही इतका सुरेख.
आता एका शांत दिवशी सगळे भाग क्रमाने परत एकदा वाचून काढणे.
(मला एका वाचनात रहस्यकथा झेपत नाहीत हो. दोनतीनदा वाचाव्या लागतात)

मास्टरमाईन्ड's picture

27 Sep 2015 - 8:27 pm | मास्टरमाईन्ड

अप्रतिम अनुवाद, कथेचा वेग आणि बरंच काही.
कधी आपण भेटू तेव्हा माझ्याकडून पण १ ट्रीट (लंच / डिनर काहीही / पेयांसह )
पुढच्या शनिवारी नवीन काही आहे कां? ;)

गामा पैलवान's picture

27 Sep 2015 - 8:41 pm | गामा पैलवान

बोका-ए-आझम,

अनुवाद अतिशय प्रवाही आणि प्रत्ययी झाला आहे. या मालिकेचे पहिले आठेक भाग वाचल्यावर राहवलं नाही आणि मूळ इंग्रजी कादंबरी वाचून काढली. नंतर म्हंटलं की आता रहस्य तर माहीत पडलंय आपल्याला. मग अनुवादित मालिका वाचणं फारसं उत्कंठावर्धक नसणार. असा आपला विचार चाटून गेला मनाला. पण माझा अंदाज साफ चुकला. हे सांगायला मला खूप आनंद होत आहे. :-)

वर पैसाताईंनी म्हंटल्याप्रमाणे व्यावसायिक भाषांतरे हाती घेण्यास काहीच हरकत नाही. धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

ओसु's picture

28 Sep 2015 - 9:40 am | ओसु

गेले काही महिने, प्रत्येक विकांताला तुमच्या भागांची वाट पाहत असायचो. एक सवयच लागली होती.
अतिशय सुंदर अनुवाद आणि त्यासाठी घेतलेल्या कष्टांसाठी मन: पूर्वक धन्यवाद.
पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत...

पगला गजोधर's picture

28 Sep 2015 - 8:58 pm | पगला गजोधर

दर्जेदार वाचायाला मिळाले, तुमच्या या अनुवादित कादंबरी लिखाणामुळे. Thanks

वॉल्टर व्हाईट's picture

28 Sep 2015 - 10:08 pm | वॉल्टर व्हाईट

बोका-ए-आझम हे भाषांतर आम्हाला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. इतका मोठा प्रकल्प एकट्याने आणि विशेष म्हणजे सातत्याने करणे फार मोठे काम आहे, ते तुम्ही यशस्वीपणे केले ते खरेच कौतुकास्पद आहे.
वर इतर प्रतिसादक ज्या पद्धेतीने तुम्हाला, आपुलकीने संबोधत आहेत, त्यावरून हे स्पष्ट आहे की या मालिकेने तुमची रिडरशिप बनली आहे. तुम्हाला भाषांतराची हातोटी आहे, कृपया पुढचा प्रकल्प लगेच हाती घेऊन ही रिडरशिप वाढवा, अशी थोडीफार स्वार्थी विनंती यानिमित्ताने करतो :-)

अभिनंदन.

जुइ's picture

29 Sep 2015 - 3:51 am | जुइ

ही लेख मालिका इथे अनुवादाच्या स्वरूपात टाकल्याबद्दल आपले धन्यवाद. अतिशय उत्कंठावर्धक मालिका संपल्याची हुरहुर आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

शेवटचा भाग वाचायची एवढी हुरहुर लागली होती की घरी आल्या आल्या वाचून काढला! मालिका संपल्याचे वाईट वाटते आहे.पुढच्या अनुवादासाठी परवानगी वगैरे सुरु करा राव.म्हणजे परत मेजवानी मिळेल सर्वांना! !

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Sep 2015 - 9:44 am | कैलासवासी सोन्याबापु

बोका भाऊ,

तेवढे पोएट च्या भावांतराचे बघाच!

कोनेली आहेत घरचे होऊ दे खर्च

प्रभो's picture

29 Sep 2015 - 11:00 am | प्रभो

मस्त!!!!!!!! :)

उत्कंठा वाढविणारा व ओघवता अनुवाद +१ .पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

मी-सौरभ's picture

29 Sep 2015 - 8:56 pm | मी-सौरभ

मस्त लेखन...
मी जाणीवपुर्वक ही लेखमाला पुर्ण होईपर्यंत वाचली नाहि कारण एक आठवडा हा खुप लांब काळ आहे आणि माझ्यासारख्या रहस्यकथा एका बैठकीत वाचणार्‍याला असे एक एक भाग वाचणे खुप अवघड आहे.

आत्ता अधाश्यासारखे सगळे भाग वाच्ले. वर लिहीलेल्या जवळपास प्रत्येक प्रतिक्रियेशी मी सहमत आहे आणि आता तुमच्या नव्या लेखनाची वाट बघतोय.

तुमचाएक्पंखा
सौरभ

बोकोबा
आपण एखादी कादंबरी वाचावी ती आपल्याला खुप आवडावी व मग आपण दुसरी वाचायला घ्यावी असे आपण सर्वच नेहमीच करत असतो.
पण दुसरी वाचण्याला सुरुवात करण्याएवजी आपला आनंद इतरापर्यंत पोहोचण्यासाठी
इतके प्रचंड परीश्रम
इतक टंकन कार्य
अचुक पर्यायी शब्द योजना करण, कादंबरीचा मूळ गाभा सांभाळण , अकृत्रीमता टाळण, त्याचा फ्लो सांभाळण इतकी सगळी कसरत करुन
आणि ती वाचकांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करुन देण का तर केवळ त्यांना
आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी बस
हाऊ लव्हली
तुम्ही आपल्या जयंत कुलकर्णी सरांचा वारसा समर्थपणे चालवत आहात.
अनुवादा साठी अनेक धन्यवाद !

उत्कंठा वाढविणारा आणि अप्रतिम अनुवाद. ही कथा वाचण्यासाठीच मिसळपाव चे सदस्यत्व काल घेतले. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

कौशिकी०२५'s picture

30 Sep 2015 - 6:28 pm | कौशिकी०२५

अत्तिशय दर्जेदार अनुवाद. संपूर्ण मालिका वाट पाहुन पाहुन वाचली. बाकिच्या सर्व प्रतिसादकांच्या शब्दाशब्दाशी सहमत.
भाषेचा लहेजा आणि प्रवाह इतका सुन्दर साधला आहे कि, ही सम्पुर्ण मालिकाच अनुवाद न वाटता स्वतंत्र कलाकॄती वाटते आहे. धन्यवाद या मालिकेसाठी. अशाच प्रकारे इतर भाषेतील दर्जेदार कथा/ कादंबरी आपल्यामार्फत आम्हाला वाचायला मिळाव्यात, ही विनंती.

आनंद's picture

30 Sep 2015 - 6:52 pm | आनंद

अप्रतिम अनुवाद!
" द पोएट" ही आत्ताच संपवली.
थोड्या ब्रेक नंतर पोएट पण घ्या अनुवादा साठी.
तुमच्या मुळे चक्क इंग्रजी कादंबरी पुर्ण वाचली.
धन्यवाद!!

रातराणी's picture

3 Oct 2015 - 12:04 am | रातराणी

अप्रतिम! इतका सुंदर अनुवाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! मजा आली. तुमच्या पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 12:13 am | समीर_happy go lucky

सगळे भाग एकत्र कसे/कुठे शोधायचे??

नरेश माने's picture

26 Dec 2015 - 11:02 pm | नरेश माने

सुंदर आणि खिळवून ठेवणारी कादंबरी!!!

सुरेख अनुवाद!

मार्गी's picture

28 Dec 2015 - 8:57 am | मार्गी

दंडवत बोका ए आझम जी!!

काल संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सलग सर्व तीस भाग वाचले! ज ब रा ट !!!!!! अतिशय ग्रेट!

धन्यवाद!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Sep 2016 - 3:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट भन्नाट आहे, मुळ कादंबरी आणि तुमचा अनुवाद!!
__/\__!

मास्टरमाईन्ड's picture

9 Sep 2016 - 4:02 pm | मास्टरमाईन्ड

सध्या नवीन काही कादंबरी नाही?

हकु's picture

16 Feb 2017 - 11:53 am | हकु

एकदम जबरदस्त!
बोकशेठ, तुमचं लेखन बघता बघता ही कादंबरी सापडली आणि वाचायला घेतली. १३-१४ व्या भागापासून तर मोबाइल खाली ठेववलाच नाही. शेवटचा भाग मी घरी जायच्या आधी रेल्वेच्या ब्रिज वर उभं राहून वाचून संपवला. खरंच खूप माजा आली.
मूळ कादंबरीच्या कथानका इतकाच तुम्ही केलेला अनुवाद ही सशक्त आहे. तुमच्या मुळे मला आज ही कादंबरी वाचायला मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

24 Jun 2017 - 7:25 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

बोकेभाऊ, मी काही दिवसांपुर्वीच मिपा वर सक्रिय झालो आहे. एका व्यसनासारखे मिपामध्ये गुंतत जातोय. काल तर स्केअरक्रो वाचायला घेतली दुपारी व मग ऊठवले गेलेच नाही. फक्त एल. ए., एफ. बी.आय. वगैरे ठिकाणांचा ऊल्लेख असल्याने कथा या मातीत जन्मली नसल्याचे कळते अन्यथा भाषा ईतकी चपखल वापरलीय की अनुवाद वाटतच नाही. बरेच मोठे लिखाण केलेत व आम्हाला आनंद दिलात. धन्यवाद.

सनि's picture

14 Sep 2017 - 11:58 am | सनि

सुरेख अनुवाद.
सध्या नवीन काही कादंबरी नाही?

सस्नेह's picture

11 Apr 2018 - 10:19 pm | सस्नेह

काही कारणाने ही मालिका अर्धीच वाचली होती ती आज पूर्ण वाचली.
मूळ कादंबरी तितक्याच ताकदीच्या अनुवादाने प्रबळपणे पेलली आहे.
अनुवाद अतिशय नैसर्गिक अन सहज वाटला. बोका -ए-आझम यांना सलाम !

मधुरा कुलकर्णी's picture

19 Jun 2019 - 12:55 pm | मधुरा कुलकर्णी

मला २ दिवसांपूर्वी ही कादंबरी वाचायला मिळाली....
खूप जबरदस्त अनुवाद केलाय तुम्ही ..खूप आवडलं आणि मी जेंव्हा वाचायला सुरुवात केली तेंव्हा सगळे भाग पूर्ण उपलब्ध होते त्यामुळं पहिल्या भागापासून सलग वाचत गेले ...
एकदम मस्त लिहिलय तुम्ही! कादंबरी संपेपर्यंत अक्षरशः फोन हातातून ठेऊ वाटला नाही ...

आता दुर्दैवाने हा प्रतिसाद त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. :-(

झिंगाट's picture

23 Jun 2019 - 8:48 am | झिंगाट

:-(

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2019 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

आताच वाचून संपवली. छान अनुवाद केलाय बोकाशेटनी. दुर्दैवाने ते आता नाहीत.
पण काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. त्या मॅकओवाय ला का मारलं?
कार्व्हर असा का झाला? कार्व्हर ची विस्तृत कथा हवी होती.