✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 08/20/2017 - 16:22  ·  लेख
लेख
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
227730 वाचन

💬 प्रतिसाद (589)

प्रतिक्रिया

दिशाबदल टेबल

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 00:51 नवीन
पाकिस्तानातील आहे, संभाळुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वा, मस्त !

हेमंतकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 05:03 नवीन
फिरता गाडीमंच आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

उद्वेग जनक ....

चौकटराजा
Fri, 10/25/2019 - 11:35 नवीन
एकदा मी वेस्टएंड सिनेमाला ( पुर्वीचे वेस्टएंड ) कॅम्पात गेलो होतो. त्यावेळी मी तळेगाव येथे राहात असे. पुणेच स्थानकावरून रात्री ०९३० ची ट्रेन पकडण्यासाठी मी सिनेमाचा शेवट ना बघताच पु स्टे व आलो तर गाडी माझया देखत समोरून गेली. त्यांतर ११३० ची लोकल होती तीत बसलो व पहाटे चार ला घोरवाडी ला उतरलो .शिवाजीनगर ला १ तास , मग दापोडीला दीड तास असे करीत त्यावेळाच्या १ तासाच्या प्रवासाला मला साडेचार तास लागले. चेन्नई ला जाण्यासाठी पुणे स्टेशन मध्ये आलो. बदलापूरला डिरेलमेंट मुळे चेन्नई व्हाया मनमाड दौंड येथे येईल असे अनाऊन्स झाले. त्यासाठी रात्री १० वाजता पुणे दौंड खास गाडी सोडण्यात आली . त्यानंतर दुसर्या दिवसाच्या दुपारी १ वाजता सदर गाडी आली . दरम्यान दौंड फलाटावर अंथरून टाकून आडवे झालो .आमच्या शेजारीच पथारी टाकली होती गोनीदा ची कन्या वीणा देव ( मृणाल देव ची आई ) व तिचे पती यानी. पहाटे उठल्यावर मग आम्ही दोन तीस तास गप्पा मारून एकमेकांची करमणूक करून घेतली. बंगलोरला गेलो असताना परत येताना दुधनी येथे जबरदस्त भयानक डिरेलमेट अपघात झाल्याने गुलबर्गा येथे ९ तास गाडी स्टेशनांत थांबली होती. तो मनस्ताप काही औरच होता.
  • Log in or register to post comments

लेखाची फास्ट ट्रेन झाली आहे.

कंजूस
Fri, 10/25/2019 - 12:35 नवीन
लेखाची फास्ट ट्रेन झाली आहे. मला आतापर्यंत रेल्वे लाभली आहे.घाण, गडबड, गोंधळ ,त्रास झाला नाही. बससुद्धा धार्जीणी आहे. जिथे जायचे असते ती अगदी सुटण्याच्या तयारीत असते. आत जाऊन बसतोय तर लगेच निघतेच.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे अनुभव मजेदार आहेत.

कंजूस
Fri, 10/25/2019 - 12:37 नवीन
सगळ्यांचे अनुभव मजेदार आहेत.
  • Log in or register to post comments

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

हेमंतकुमार
Fri, 10/25/2019 - 12:45 नवीन
जे कधीतरी रेलप्रवास करतात त्यांचे माहितीसाठी काही : गाडीच्या डब्यांचा प्रकार आणि त्यासाठीची अक्षरे अशी: 1. A = वातानुकुलीत पहिला वर्ग 2. HA ( Half A) = 2 AC = वातानुकुलीत २ टिअर 3. 3 AC = वातानुकुलीत 3 टिअर 4. 3 AC economy : फक्त काही गाड्यांत. 5. CC = वातानुकुलीत खुर्ची व्यवस्था 6. E = एक्सेक्युटीव्ह वातानुकुलीत खुर्ची व्यवस्था 7. SL = स्लीपर ३ टिअर (आरक्षित व पंखे ) 8. 2 S = पंखे लावलेली खुर्ची व्यवस्था 9. UR / Gen = अनारक्षित वर्ग. प्रवासाचे अंतरानुसार खुर्ची किंवा बर्थ 10. MST = Monthly Season Ticket = मासिक पासधारकांसाठी राखीव • CC च्या डब्यात १ ते ७५ आसने असे डब्यावर लिहीले असते पण, ३ व ७३ क्रमांकाची आसने अस्तित्वात नसतात. दार उघडता येण्यासाठी ती काढून टाकलेली असतात.
  • Log in or register to post comments

एम

हेमंतकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 05:05 नवीन
3 AC economy : फक्त काही गाड्यांत >>> त्या डब्याला M असे नाव दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

यमराज आणि प्रबोधन !

हेमंतकुमार
गुरुवार, 11/07/2019 - 15:44 नवीन
रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांना थेट उचललं 'यमराजाने' बातमी : https://www.loksatta.com/mumbai-news/yamraj-on-railway-tracks-for-commuters-in-mumbai-scj-81-2010110/
  • Log in or register to post comments

चांगला लेख

Nitin Palkar
गुरुवार, 11/07/2019 - 20:24 नवीन
लेख आणि सर्व पुरवणी टीपंण्या छान.
  • Log in or register to post comments

कितपत विश्वासार्ह?

हेमंतकुमार
Fri, 12/27/2019 - 07:46 नवीन
रेल्वेसंबंधी ही ‘मटा’ तील बातमी: भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक वेगळा विक्रम झाला आहे. या वर्षात एकाही प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. रेल्वेच्या १६६ वर्षाच्या काळात २०१९-२० हे वर्ष 'जीरो पॅसेंजर डेथ'चा साक्षीदार ठरला आहे. (https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/no-passenger-death-in-rail-accidents-in-year-2019-claim-by-railway-authority/articleshow/72977204.cms) यावर आक्षेपार्ह मुद्दे: १. मुळात अजून २०१९ समाप्त झालेले नसताना ते खाते ‘२०१९-२०’ असे कसे म्हणू शकते ? २. बातमीतच पुढे मुंबईच्या प्रवाशांचा हा आक्षेप आहे: “मुंबईत दरदिवशी सरासरी ६ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो.” .....गोंधळात पाडणारे आहे हे...
  • Log in or register to post comments

रेल्वेतून पडणे (गर्दीमुळे,

गवि
Fri, 12/27/2019 - 08:06 नवीन
रेल्वेतून पडणे (गर्दीमुळे, धावत्या गाडीत चढू उतरू गेल्याने अथवा अन्य कारणाने), रूळ क्रॉस करताना ट्रेनखाली येणे इत्यादि अपघात मोजत नसतील ते. फक्त ट्रेन घसरणे, टक्कर, आग इत्यादि घटनांनाच ते रेल्वे दुर्घटना मानत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

चांगली प्रगती....

हेमंतकुमार
Fri, 01/31/2020 - 14:15 नवीन
'इंद्रायणी’ होणार अपघातरोधक! https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/indrayani-to-be-accidental/articleshow/73778171.cms
  • Log in or register to post comments

आज काढलेला फोटू

सुमो
Fri, 02/14/2020 - 15:45 नवीन
Image removed. रच्याकने: डेंझेल वॉशिंग्टनचा 'unstoppable' शिणुमा आठवला या फोटो निमित्तानं.
  • Log in or register to post comments

गाव कोनचं?

गामा पैलवान
Fri, 02/14/2020 - 22:35 नवीन
झ्याक आलीये फटू! गाव कंचं म्हनायचं ह्ये? पुनं काय? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

गाव कोल्लापूर

सुमो
Mon, 02/17/2020 - 15:11 नवीन
असंच म्हणत्यात आमच्या कोल्हापुरात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जीव शांत झाला यकदाचा

गामा पैलवान
Tue, 02/18/2020 - 18:22 नवीन
ज्यावरनं फटू काडला त्यो पूल गूगल नकाशाला जाऊन पायला अन झाला सुदीक जीव शांत माजा! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

सुमो ,

हेमंतकुमार
Sat, 02/15/2020 - 07:37 नवीन
फोटू लई झ्याक हो ! एकदम जिवंत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

ज्या अपघाताची भरपाई देण्यास

कंजूस
Fri, 02/14/2020 - 20:06 नवीन
ज्या अपघाताची भरपाई देण्यास रेल्वे बांधील असते तेवढेच धरतात. रूळ ओलांडताना मेल्यास एलआईसीचा विमा भरपाई मिळत नाही. फक्त भरलेल्या रकमेची परतफेड करतात. 'फुटबोर्डवर उभे राहून प्रवास गुन्हा आहे' या पाट्या लोकलमध्ये अशासाठीच लावल्या आहेत.
  • Log in or register to post comments

मोदी साहेबांनी महामहीम नितीन गडकरी साहेबांना रेल्वे मंत्री

गड्डा झब्बू
Sat, 02/15/2020 - 00:22 नवीन
मोदी साहेबांनी महामहीम नितीन गडकरी साहेबांना रेल्वे मंत्री करावे. त्यांना रस्त्यावर अपघाती मृत्यू येनारांचा फार कळवला आहे. ते रेल्वे मंत्री झाले तर मुंबईतल्या लोकलने प्रवास करणाऱ्या वर्षाला शेकडो-हजारो प्रवाशांचे प्राणही वाचतील आणि त्यांचा प्रवासही सुखरूप होईल. पण एकाच समस्या आहे की रेल्वे हि सरकारी आहे, तिथे कोणी irb सारखा मातब्बर कंत्राटदार नाही कि ज्याचे भले करता येईल. तिथे शेठ्जींचे भले कसे होईल? हा प्रवाशांचे भले झाले तर एकवेळ ते भाजपला आजन्म मत देतील पण त्याचा काय (आर्थिक)फायदा? मोदींबद्दल आदर आहे पण भाजपच्या इतर नेत्यांबद्दल बिलकुल नाही. दिवंगत प्रमोद महाजन मोहोदायांनी दुनिया मुठ्ठीमे करणार्यांच्या भल्या साठी कशी bsnl ची वाट लावली होती ते आठवते अजून.
  • Log in or register to post comments

रेल्वे रुळांच्या

अनन्त्_यात्री
Sat, 02/15/2020 - 16:15 नवीन
बाजूच्या पाट्यांवर W/L , T/G, T/P वगैरे सूचना मोटरमनसाठी असतात. त्यांचे अर्थ काय होतात?
  • Log in or register to post comments

अनंत,

हेमंतकुमार
Sat, 02/15/2020 - 17:30 नवीन
हे घ्या : T / P = termination of speed restriction for passenger trains. T / G = termination of speed restriction for goods trains W/L = Whistle for Level Crossing (बिन पहारेकरीवाले फाटक पुढे असल्यास).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

आणि हे हिंदी बघा ..

हेमंतकुमार
Sat, 02/15/2020 - 19:41 नवीन
W/L चा हिंदी पर्याय तर मस्त आहे : सी/ फा = सिटी बजाव , फाटक है !
  • Log in or register to post comments

हे सही आहे!

फारएन्ड
Sun, 02/16/2020 - 00:16 नवीन
धन्यवाद. बरेच दिवस सस्पेन्स होता. पूर्वी आम्ही लांब पल्ल्याच्या गाड्या, मुंबई-पुणे गाड्या ई च्या डब्यांचा पॅटर्न बघून ओळखायचा प्रयत्न करत असायचो. डब्यांच्या बाजूला उजवीकडे त्यांचे कोड्स असतात त्यावरून समजा एक उद्यान एक्सप्रेस धरली तर इंजिनापासून ते गार्डच्या डब्यापर्यंत एसी २ टियर, २ टियर, स्लीपर, जनरल वगैरे कोचेस चा एक सहसा कॉमन पॅटर्न असतो. तो चेक करायचा उद्योग असे. त्यामुळे नुसती स्टेशनवरून जाणारी गाडी सुद्धा लक्षपूर्वक बघायचो. बाय द वे, कुमार१ हे एकदा नजरेखालून घाला. आवडेल तुम्हाला. https://www.misalpav.com/node/41372
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

फारएन्ड,

हेमंतकुमार
Sun, 02/16/2020 - 08:55 नवीन
धन्यवाद, तुमचा तो धागा वाचला होता, आवडला.
  • Log in or register to post comments

रेल्वे व दिशा एक आभासी जागा ..

चौकटराजा
Tue, 02/18/2020 - 19:35 नवीन
रेल्वे चे अनेक प्रकारची रूळ जोडणी असते त्यातील एक डायमंड क्रॉस ही रचना आहे . त्याचा फटू आंजावर पाहायला मिळेल. पण मनमाडजवळ अंकाई टंकाई नावाचे दोन जोडकिलले आहेत. तिथे एक मजा जर योगायोग्य असेल तर पाहावयास मिळते. मनमाड ते दौंड मार्ग तसा जुना आहे . पण त्यानंतर मनमाड नांदेड असा मार्ग मनमाड रेल्वे स्थानकातून बरोबर उलट्या दिशेने काढून त्याला वळवून नांदेड ला नेण्यात आले आहे ज्या योगे मनमाड दौंड मार्गाशी तो क्रॉस होऊ नये . पण अंकाई किल्याच्या पायथ्याशी हे दोनाही मार्ग समांतर येतात. काही वेळा योगायोगाने मनमाड नांदेड व मनमाड दौंड अशा दोन गाड्या मनमाडाच्या दिशेने आलया तर अप व डाऊन दोन्ही रूळावर एकाच दिशेने गाड्या धावत आहेत असे दृश्य दिसते. वास्तविक दोन्ही मार्ग एकेरी व भिन्न दिशेला जाणारे आहेत पण काही अंतर हे समांतर असल्याने असा विचित्र प्रकार आपलयाला दिसतो.
  • Log in or register to post comments

काही वेळा घाटाचा डोंगर

कंजूस
Wed, 02/19/2020 - 10:59 नवीन
काही वेळा घाटाचा डोंगर चढण्यासाठी पुरेसा पसरलेला डोंगर मिळाला नाही तर पायरी पद्धत वापरतात. मायनामारला आहे. १८८५.
  • Log in or register to post comments

भारीच !

हेमंतकुमार
Wed, 02/19/2020 - 11:00 नवीन
* अप व डाऊन दोन्ही रूळावर एकाच दिशेने गाड्या धावत आहेत असे दृश्य >>>> रोचक . संधी मिळाल्यास जरूर पाहणार .
  • Log in or register to post comments

आता कल्याण / बोरीवली इकडे सहा

कंजूस
Wed, 02/19/2020 - 18:48 नवीन
आता कल्याण / बोरीवली इकडे सहा रूळ झाल्याने एकाच वेळी तीन जाणाऱ्या ,दोन येणाऱ्या बाजुबाजूला दिसतात. पण मनमाडला गम्मतच.
  • Log in or register to post comments

हा लूप पहा

चौकटराजा
Wed, 02/19/2020 - 19:12 नवीन
ग्रेट लूप
  • Log in or register to post comments

या बद्दल काय म्हणाल ....?

चौकटराजा
Wed, 02/19/2020 - 19:31 नवीन
अभियांत्रिकी कमाल रेल्वेची
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Sat, 02/22/2020 - 19:26 नवीन
हे फार मस्त आहे. जाउनच बघायल हवे तेथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौरा,

हेमंतकुमार
Wed, 02/19/2020 - 20:06 नवीन
केवळ अप्रतिम ! नागमोडी वळणे अगदी चक्रावून टाकतात.
  • Log in or register to post comments

Longest Train in Indian

सुबोध खरे
Fri, 02/21/2020 - 20:11 नवीन
Longest Train in Indian Railways 2 KM Long https://www.youtube.com/watch?v=sJJcKG6ix5M
  • Log in or register to post comments

अंकाई पेक्षा वेगळाच प्रकार " विल्यमस लूप "

चौकटराजा
Fri, 02/21/2020 - 21:30 नवीन
विल्यमचा लूप
  • Log in or register to post comments

चौराकाका.. हा व्हिडीओ बघा..

मोदक
Fri, 04/17/2020 - 12:44 नवीन
चौराकाका.. हा व्हिडीओ बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

गंडलेले ऍप

हेमंतकुमार
Sat, 02/22/2020 - 10:33 नवीन
वरील सर्व दुवे छान ! ट्रेन बदलून जो जोडप्रवास असतो, त्याच्या इ- तिकिटाचा अनुभव लिहितो. मागच्या वर्षी याबाबत नियमात एक चांगली सुधारणा झाली. समजा आपण अशी 2 तिकिटे काढली आहेत. जर का पहिली ट्रेन उशीरा पोचल्याने आपली पुढची चुकली, तर पुढच्या तिकिटाचे पैसे आपल्याला रेल्वे परत करते. पण….. यासाठी दुसरे तिकीट विशिष्ट प्रकारे काढावे लागते. त्याची सोय रेल्वे-app वर 'plan connecting journey' अशी आहे. तिथे आपण आपल्या पहिल्या तिकिटाचा PNR टाकायचा असतो. मग आपली सर्व माहिती पुढच्या तिकीटात आपोआप भरली जाते. …… ही यंत्रणा छान केली आहे, पण….. ते app बऱ्याच वेळा गंडलेले असते ! त्याचा खूप त्रास होतो. शेवटी वैतागून आपण दुसरे तिकीट स्वतंत्रपणे काढतो. म्हणजेच जर पहिल्या ट्रेनला उशीर झाला तर आपले पुढचे नुकसान होणार. …. ते app कार्यक्षम व्हायची गरज आहे .
  • Log in or register to post comments

विल्यम व ग्रेट लूप

गामा पैलवान
Sat, 02/22/2020 - 14:05 नवीन
चौकटराजा, विल्यम व ग्रेट लूप्स रंजक आहेत. एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे त्यांच्या उंच्या जास्त वाटंत नाहीत. बहुतेक अतिशय अवजड मालगाड्या ओढून नेता याव्यात म्हणून कमी चढावाची अतिसर्पिल वळणे निर्माण केली आहेत. अर्थात, त्यामुळेच तर ती प्रेक्षणीय ठरलीत. मात्र हलक्या प्रवासी गाड्यांना इतक्या नागमोडी वळणांची गरज नसावी, असा अंदाज. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

चौकटराजा
Sun, 02/23/2020 - 09:10 नवीन
लूप हा 2 डिग्री ग्रेडियंट मेंटेन करण्यासाठीच करायची आयडियेची कल्पना आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

दोन अंश चढाव

गामा पैलवान
Sun, 02/23/2020 - 14:20 नवीन
चौकटराजा, दोन अंश चढाव जरा जास्त वाटतोय का? पळसदरी ते खंडाळा हा बोरघाट तीव्र चढावाचा मानला जातो. किंमत काढली तर १.३३ अंश आली. अमेरिकी सर्पिलांचे चढाव शोधणे रंजक ठरावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मला अजून 'सर्क्युलर जर्नी'

कंजूस
Sat, 02/22/2020 - 17:05 नवीन
मला अजून 'सर्क्युलर जर्नी' तिकिट काढणे जमले नाही. माझा मार्ग त्यांनी दिलेल्या नियमांत बसवता येतो किंवा बसतो तरीही मी तशी तिकिटं न काढता वेगवेगळीच काढली आहेत. आमच्या इमारतीतील शेजारी त्यांच्या धार्मिक यात्रा करणाऱ्या गटातून जातो. त्याने मला फॉर्मही दिला आणि कसं करायचं सांगितलं परंतू केलं नाही.
  • Log in or register to post comments

नवे इंधन संशोधन

हेमंतकुमार
Wed, 02/26/2020 - 14:28 नवीन
भारतीय रेल्वे भविष्यात नव्या इंधनावर धावू शकेल. या तंत्राला hydrogen-powered fuel cell-based train. असे म्हणतात. अशा इंजिनाचे कार्बन उत्सर्जन शून्य मानले जाते. नुकतेच हे संशोधन आंध्र च्या अमरावती येथील विद्यापीठात सुरू करण्याचे सूतोवाच झाले. या संशोधनास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

हेमंतकुमार
Wed, 04/01/2020 - 10:42 नवीन
करोना उपचार आणि रेल्वेचे योगदान भारतीय रेल्वेनं करून दाखवलं! https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2120762/coronavirus-in-india-indian-railways-converts-coach-into-covid-19-isolation-ward-bmh-90/ ही चित्रमाला जरूर पाहा. हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदनास पात्र

Nitin Palkar
Wed, 04/01/2020 - 15:20 नवीन
भारतीय रेल्वे नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अंतर विकत घेणे !

हेमंतकुमार
Sun, 04/05/2020 - 15:40 नवीन
काही वर्षांपूर्वीची घटना. तीन जणांनी ट्रेनच्या 2S डब्यातून प्रवासाची आरक्षित तिकिटे काढली होती. पूर्ण बसूनचा प्रवास होता. आयत्या वेळेस त्यांतील एक जण गळाला. ते तिकीट रद्द करायची वेळ टळून गेली होती. मग उरलेल्या दोघांनी ठरवले की तिघांच्या जागेत ऐसपैस बसून मधली जागा कुणाला द्यायची नाही. आता या डब्यात कायमच गर्दी आणि बिगरआरक्षितवालेही भरपूर. गाडी सुरु होताच अशांतील एकाने त्या रिकाम्या जागेची मागणी केली. या दोघांनी अशी भूमिका घेतली की आम्ही ३ जागांचे पैसे भरले आहेत. त्यामुळे त्या जागेवर आमचाच हक्क आहे. या डब्याच्या रचनेत ३ जणाना तसे खेटूनच बसावे लागते. मग डब्यातील उभे लोक त्यांच्याशी वादावादी करू लागले. त्यांनी माणुसकीचा मुद्दा काढला. नेमके तेव्हा पूर्ण प्रवासात तपासनीस आलेच नाहीत. त्या दोघांचा प्रवास इतरांशी धुसफूस करीतच झाला. यासंदर्भात नियम काय आहे याचा निवाडा काही झाला नाही. ........ हा प्रसंग आता मुद्दाम लिहीत आहे. सध्याच्या ‘सामाजिक अंतराच्या’ वातावरणात मला याबद्दल कुतूहल आहे. १. वरीलप्रमाणे ट्रेनमध्ये एखाद्या रिकाम्या जागेचे पूर्ण पैसे भरून ती आपण घेऊ शकतो का? अनोळखी व्यक्ती आपल्या जवळ येऊ नये म्हणून? २. की आरक्षित रिकामी जागा दुसऱ्याला द्यायचा तपासनिसांना अधिकार असतोच? ३. माणुसकी हा मुद्दा बरोबरच आहे, पण मला नियमाची उत्सुकता आहे. कोणाला माहिती आहे ?
  • Log in or register to post comments

रेल्वेचे माहिती नाही परंतु

सुबोध खरे
Mon, 04/06/2020 - 23:54 नवीन
रेल्वेचे माहिती नाही परंतु अत्यवस्थ रुग्णाला विमानातून न्यायचे असले तर तीन सीट बुक करतात आणि शेवटचा तीन जागा असलेला बाक काढून टाकतात आणि तेथें रुग्णाला झोपवले जाते. बाकी रेल्वेने द्वितीय वर्गाच्या 3 x 2 अशी संरचना काढून 3 x 3 अशी केल्यावर जागा खरंच अपुरी पडते. माझ्या सारख्या बारीक माणसाला अपुरी पडते तर शेजारी एखादी लठ्ठ बाई आली तर प्रवास फारच त्रासदायक होतो. कारण बऱ्याच वेळेस आशा बायका अंग सैल सोडून बसतात आणि मग "हगत्याला लाज की बघत्याला" या उक्तीप्रमाणे बाजूला बसलेल्या पुरुषाला "अंग चोरूनच" बसावे लागते. अर्थात लठ्ठ माणूस बसलेला असेल तर शेजारच्या स्त्रीला सुद्धा तसाच त्रास होतोच
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Tue, 04/07/2020 - 07:42 नवीन
सुबोध, माहितीसाठी धन्यवाद. खरंय, 2S डब्यातील तिघांची जागा ही खरे तर अडीच माणसांना पुरेल एवढीच आहे. त्यामुळे तिघात एक जरी जाड व्यक्ती आली की बाजूच्या माणसाची एकच मांडी आसनावर मावते ! तर खिडकीजवळच्याला अगदी दाबून बसावे लागते.
  • Log in or register to post comments

स्लीपर मधील स्थिती

चौकटराजा
Fri, 04/17/2020 - 12:00 नवीन
सेकंड क्लास स्लीपर मधे ज्या 3 सीट्स असतात त्या तीन जणाना नीट पुरतात. समस्या अशी आहे की 72 सीटस ड्बयात आणखी 72 वेटिग लिस्ट वाले घुसतात त्यामुळे 3 च्या जागी निदान सीझन मधे सरसकट 4 सीटस असतातच . एरवी रेल्वे तुम्ही चुकलात तर दंड वसूल करते पण 72 च्या जागी फक्त 72 नाच परवानगी हे भारत देशात कदापिही शक्य नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

रेल्वेचा १६७ वा वाढदिवस

हेमंतकुमार
Fri, 04/17/2020 - 11:24 नवीन
रेल्वेचा १६७ वा वाढदिवस ‘ऑनलाइन’ साजरा (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/celebrate-railway-birthday-online/articleshow/75185127.cms) सर्व रेलप्रेमींना शुभेछा !
  • Log in or register to post comments

चौरा,

हेमंतकुमार
Fri, 04/17/2020 - 12:20 नवीन
चौरा,
पण 72 च्या जागी फक्त 72 नाच परवानगी हे भारत देशात कदापिही शक्य नाही !
>> अगदी अगदी. निदान आपल्या हयातीत तरी. आता पुढचे १-२ महिने मात्र वेगळे चित्र दिसू शकेल. ७२च्या जागी ३६ वा ५४ ! कोविद निवळेपर्यंत बसायचे अंतर ठेवून तिकीटे देतील, असे जाहीर झाले होते. तसेच बिगर-आरक्षणवालेही नसतील. बघूया काय होतंय.
  • Log in or register to post comments

20 वर्षे पूर्ण....

हेमंतकुमार
गुरुवार, 05/14/2020 - 09:18 नवीन
सध्याच्या ट्रेनचे प्रमुख इंजिन असलेले हे डब्ल्यू ए पी ७ या प्रकारचे इंजिन. नुकतीच त्याने आपल्या सेवेची 20 वर्षे पूर्ण केली. या इंजिना मुळेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना 24 डबे लावता आले आणि गाडीचा वेगही वाढवता आला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा