माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो.