टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन. सरकार कसे आंदोलकांचे हाल करत आहे, अशा प्रकारच्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया, व्हायरल व्हिडिओ, जरांगे यांचे नवे नवे अल्टिमेटम तासा-तासाला येऊ लागले. राज्यातील इतर सर्व समाज भेदरून एका बाजूला जाऊन बघत राहिले. शासनाने जरांगे यांचे समाधान करण्यासाठी नेहमीप्रमाणे एक अध्यादेश काढला आणि गुलाल उधळत जरांगे हे आपल्या गावी निघून गेले. आता तो अध्यादेश कसा मराठा समाजाच्या फायद्याचा आहे हे जरांगे समर्थक व सरकारमधील मराठा मंत्री सांगत आहेत तर तो कसा कायद्याला धरून नाही असे ओबीसी आंदोलक, व सरकारमधील ओबीसी मंत्री व काही मराठा आंदोलन अभ्यासकही सांगत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनानंतर सर्वसाधारणपणे असेच होत आलेले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनांचा इतिहास खूपच रोचक आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर फार मोठा अन्याय होत आहे असा आर्त टाहो फोडत जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यांची ग्रामीण भाषा, थेट बोलणे आणि साधे व्यक्तिमत्व यामुळे ते मराठा आंदोलनाचे सर्व मान्य नेते झाले. पण त्यांची भाषा नंतर मुख्यमंत्र्यांना नुसते अरे तुरे करण्यापर्यंत गेली एवढेच नव्हे, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची आय माय काढायला सुरुवात केली. 'कसा देत नाहीस तेच बघतो' अशी अतिशय उर्मट भाषा वापरून जरांगे आरक्षण मागू लागले. खरे तर गरजवंत माणूस दबलेला असतो, दुर्बळ असतो. तो सत्ताधाऱ्यानी आपल्या पदरात काहीतरी टाकावं म्हणून विनंती करत असतो. परंतु मराठा समाजाचे जरांगे आणि सामान्य आंदोलकही अत्यंत आक्रमक भाषेत 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा प्रकारच्या घोषणा देऊ लागले. मराठा समाज एका बाजूला आम्ही मागास आहोत म्हणून आरक्षण द्या अशी मागणीही करत होता आणि त्याच वेळी आपण कसे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हा गंडही कुरवाळत होता. एका पोस्टरवर तर एक आंदोलक आरक्षण ही आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे, आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील असे लिहिलेले पोस्टर बरेच व्हायरल झाले होते. बहुधा ही सध्याचे ओबीसी व अनुसूचित जाती जमाती यांना उद्देशून होते. असाच मस्तवाल माज मराठा समाजाचे आय ए एस अधिकारी विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता दुवा: यांच्या बेछुट तोंडावर आळा कोणी आणेल का ? विश्वास पाटील यांनी आपल्या निवृत्तीच्या महिन्यात मुंबईच्या धानदांडग्या बिल्डरांच्या तीसहून अधिक फाईल्स निकालात काढल्या होत्या. ही अफाट कार्यक्षमता अर्थातच फुकट आणी केवळ पगारातून आलेली नाही. त्यांच्या लेखनावर त्यांच्या भावानेच वाङमय चौरयाचा आरोप केला होता. दुवा: विश्वास पाटील यांची जातीय गुर्मी
राजेंद्र लाखे नावाचे मराठा आंदोलनाचे नेते सध्या जरांगे यांच्यावर टीका करतात. ते म्हणाले की मराठा समाजाने पूलापुलावर पाच पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत आणि समाजाने आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच लाखे हे असेही म्हणत आहेत की जरांगे यांनी केलेल्या मागण्या अजिबात घटनेनुसार कायद्यानुसार व संविधानिक नाहीत. दुवा: जरांगेंची एकही मागणी वैध नाही. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च केले
आंदोलनात झालेल्या एकूण खर्च, मुंबईत आलेली हजारो वाहने आणि आंदोलनाची एवढी भव्य व्याप्ती पाहिल्यानंतर आपल्या जरांगे यांच्यासारख्या नेत्यावर जेसीबी वापरून फुले उधळणारा मराठा समाज कोणत्या अंगाने गरजवंत आहे तेच कळत नाही.बापट आयोग, सराफ आयोग, खत्री आयोग, गायकवाड आयोग, राणे समिती इत्यादी अनेक आयोग व समित्या आल्या आणि गेल्या पण कोणालाही मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे व त्यांचे शासनातील व नोकऱ्यातील प्रतिनिधित्व कमी आहे असे सिद्ध करता आले नाही. ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. ती काही फक्त मराठा समजाचीच वाईट झाली आहे असे नव्हे. पण मराठा समजासाठीची आरक्षणाची मागणी मात्र अधिक अधिक तीव्र स्वरूप धारण करत गेली आहे.
सध्या मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून ए ई बी सी आरक्षण दिले गेलेलेच आहे. घटनेनुसार आरक्षण कधीच एका जातीला मिळत नसते. ते प्रवर्गाला मिळत असते. परंतु मराठा या एकाच जातीसाठी वेगळा प्रवर्ग तयार करून तब्बल दहा टक्के आरक्षण देण्यात आले. इतर कोणती जात सरकारकडून अशी तरतूद करून घेऊ शकेल? याशिवाय ई डब्लु एस प्रवर्गात मराठा समाजाला आधीच दहा टक्के जागा आरक्षणात उपलब्ध आहेत. त्यातील साधारणपणे 80 टक्के आरक्षण हे मराठा समाजाने घेतलेले आहे तरीही जरांगे यांचे नुकतेच संपलेले आंदोलन हे मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आहे, या कारणासाठी होते. आमचे म्हणणे मानले नाही तर आता मुंबईचे दाणापाणी बंद करू अशी धमकी ते देत आहेत. जरांगे यांची ताजी मागणी मान्य करताना शासनाने मराठा समाजाला जात प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक अध्यादेश काढलेला आहे. शासनाने असा कोणताही आदेश एकाच जातीसाठी कधी काढला असेल असे वाटत नाही.
आर्थिक तरतुदींचा विचार केला तर गेल्या तीन वर्षात मराठा समाजाच्या भल्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या सारथी संस्थेला फक्त कार्यालयसाठी मिळालेला निधी २५४८ कोटी रुपये आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठीच्या वस्तीग्रूहसाठी १३०० कोटी रूपये देण्यात आलेले आहेत. मराठ मुलाना उद्योगासाठी थेट कर्ज म्हणून १२४८ कोटी रुपये दयेण्यात आलेले आहेत. बँकांकडून जे कर्ज त्यांना वितरित केले गेले आहे ते आहे १२६०० कोटी रुपये. मात्र गेल्या 23 वर्षात महाज्योती या ओबीसींच्या संस्थेला मिळालेला निधी साधारण 2500 कोटी आहे. आर्थिक तरतुदींचा विचार दुवा: https://www.youtube.com/live/w6AZyc-6Z1Q?si=w1UvS8R927RPpCPW इतर आरक्षित जातीच्या मुलांच्या विद्यावेतन व शैक्षणिक बाबतीत शासन कमालीचे उदासीन आहे. मराठा समाजाच्या अजित पवार यांच्याकडे गेले अनेक वर्षे आहे आणि ही आकडे केवळ योगायोग नव्हेत.
जेव्हा जरांगे यांचे आंदोलन चालू होते तेव्हा पार शरद पवार, महाजन, भुमरे, भरणे, विखे, कोकाटे यांच्यासारख्या अनेक मंत्र्यांनी जरांगेंच्या गादी शेजारी बसून त्यांची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील आंदोलनाच्या वेळी मध्यरात्री त्यांच्याजवळ आपले सचिव पाठवून दिले व पहाटे पहाटे जरांगे यांना हवा तसा अध्यादेश काढण्याची आधीसूचना जारी केली. असे लक्ष कुणा इतर जातीकडे शासनातील लोकप्रतिनिधी आणि बडे अधिकारी यांनी दिले आहे असे उदाहरण आढळून येत नाही. आठवा: सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण.
जरांगे हे फडणीसांना नेहमीच शेलक्या आक्रमक भाषेत दूषणे देत असतात परंतु शिंदे यांनी काढलेला आधीचा अध्यादेश कितीही कूचकामाचा असला तरी जरांगे यांनी एकदाही चकार शब्दाने कधी शिंदे यांच्या विषयी नापसंती व्यक्त केली नाही. तीच बाब अजित पवार यांच्याबाबत. हे पुढारी केवळ आणि केवळ मराठा जातीचे आहेत म्हणून जरांगे त्यांच्याविषयी कधीच काहीही नकारात्मक बोललेले नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे.
1994 साली गोवारी समाजाने केलेल्या आंदोलनाची आता आठवण होते. तेव्हा त्यांच्यावर लाठीमार झाला, चेंगराचेंगरी झाली व 114 गोवारी आंदोलकांचा मृत्यू झाला. या समाजाला शासनाने काय दिले?
जरांगे यांनी आता हैदराबाद गेझेट लागू करण्याची मागणी करून सरसकट मराठ्यांना कुणबी करूनच घेतो अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. त्यावर आता लक्ष्मण माने हे त्याच हैदराबाद गेझेट चा आधार घेऊन भटक्या विमुक्त समाजाला आदिवासींचे सवलती लागू कराव्यात अशी मागणी करून त्याच आझाद मैदानात आंदोलनास बसले आहेत. त्यांची उपद्रवक्षमता अर्थातच जरांगे व मराठ समाजाइतकी नाही. भटक्या विमुक्तांना मराठ्यांइतका मोठा मोर्चा ट्रक, ट्रॅक्टर, हजारो वाहने घेऊन काढणे शक्य नाही. त्यांना मुंबई जाम करून सरकारच्या नाकी दम आणणे शक्य नाही. परंतु लक्ष्मण माने यांची मागणी मराठा समाजाच्या मागणीपेक्षा कमी न्याय आहे असे मात्र अजिबातच नाही. आता शासन लक्ष्मण माने यांच्या आंदोलनाला फुल मराठा समाजाच्या आणि जरांगे यांच्या आंदोलन इतकेच महत्त्व देते की त्यांच्यासाठी काही वेगळा अध्यादेश काढते ते पाहावे लागेल. अन्यथा एका जातीचे एका जातीसाठी चाललेले हे शासन आहे का, असा प्रश्न पडतो.
प्रतिक्रिया
14 Sep 2025 - 3:59 am | स्वधर्म
पोस्टर
14 Sep 2025 - 7:23 am | युयुत्सु
असा लेख लिहायला खूप धैर्य लागतं. ते दाखवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
14 Sep 2025 - 7:39 am | युयुत्सु
<जरांगे हे फडणीसांना नेहमीच शेलक्या आक्रमक भाषेत दूषणे देत असतात>
मागासलेपणाचे दुसरे लक्षण शोधायची आवश्यकता आहे का?
14 Sep 2025 - 9:34 am | मारवा
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे.
1
आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे.
2
आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे.
3
आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे.
4
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ?
5
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
14 Sep 2025 - 10:05 am | Bhakti
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
आणि शिक्षण हाही आहे.
आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही.
याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन दिला आहे.
quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.
14 Sep 2025 - 9:55 am | युयुत्सु
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते
हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.
14 Sep 2025 - 10:22 am | रात्रीचे चांदणे
जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते.
त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती.
विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे.
आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले.
मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही.
ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये
14 Sep 2025 - 12:42 pm | मारवा
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही.
हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ?
ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?
14 Sep 2025 - 1:12 pm | मारवा
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स...
१-
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ?
२
शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा
३
देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल.
४
व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे
५
प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.
15 Sep 2025 - 10:08 am | सुबोध खरे
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं
चाललंय?
ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं.
गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील.
नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता?
इंदिरा इज इंडिया
एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात.
जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत
किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये
हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.
14 Sep 2025 - 7:16 pm | रात्रीचे चांदणे
हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील.
देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.
14 Sep 2025 - 9:30 pm | कॉमी
उत्तम लेख.
14 Sep 2025 - 10:44 pm | नावातकायआहे
उत्तम लेख आणि प्रतिसाद!!
15 Sep 2025 - 9:09 am | प्रसाद गोडबोले
सलाम
लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे !
बाकी,
स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो.
पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते.
एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे .
तेव्हा , जपा स्वतःला.
15 Sep 2025 - 5:40 pm | विवेकपटाईत
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.
16 Sep 2025 - 2:45 am | स्वधर्म
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो:
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे.
लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे:
मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_...
कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या:
https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-al...
वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे:
https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-...
लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-f...
लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/
लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/
संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh
22 Sep 2025 - 11:18 pm | खटपट्या
चांगला लेख,
मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही)
जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही.
त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला?
ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच)
असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.
24 Sep 2025 - 5:45 pm | धर्मराजमुटके
मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अॅप्रोच नंतर आला असावा.
मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे.
मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही .
इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते.
आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे)
असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स).
आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा.
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.
24 Sep 2025 - 6:27 pm | अभ्या..
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.
हे तर आहेच.
कीती काळ आरक्षण द्यायचे?
कोण देतंय आरक्षण असे समजायचे?
घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे?
वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम
असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत.
समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत.
अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार.
जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.
25 Sep 2025 - 10:24 am | सुबोध खरे
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे.
आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे.
मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच.
जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही.
मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात.
आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे.
जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत.
आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे.
सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही.
आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.