वाडा

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
25 Oct 2021 - 1:38 am

जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||

इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||

कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||

सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||

फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||

आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती
मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती ||

बाकी सारे बेवारस अन कुणीच नाही वाली त्याला
जुनाट जाते, चूल मोडकी, फडताळातील जुनाट शेला ||

वाड्या सोबत जीर्ण जाहली मोहाची ही जीर्ण बंधने
किंमत उरली जागेला बस, फक्त तिचे हे वाट पाहणे ||

उद्या तिचीही होईल भेट उरल्या सुरल्या ह्या भिंतींशी
अन मग नंतर जडेल नाते नवीन घरांच्या नवलाईशी ||

बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी
किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणी ||

उन्नती अवनीतीच्या लाटांवर प्रवास त्याचा असा निरंतर
तशाच तैशा अलिप्तपणाने आपण पाहु हे स्थित्यंतर ||

-
प्रसाद गोडबोले

मुक्त कवितासमाज

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Oct 2021 - 6:34 am | प्रचेतस

मस्त एकदम

छान
बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी
किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणी

छान
बघता बघता वाडा जाईल आठवणींच्या धुक्यात विरुनी
किंवा कदाचित उरेल मागे पत्यामधुनी काही निशाणी

सत्यता काव्यात उतरली आहे. छान काव्य.

सारे प्रवासी घडीचे अशा अर्थाने सारे कवी एकसारखे म्हणावे वाटते. कारण वाडा या विषयाने अन त्यातीत अर्थाने साम्य असणार्या तीन माझ्या रचना आठवल्या.

ढासळला वाडा - कविता
http://www.misalpav.com/node/46919

ढासळला वाडा - लेख
https://www.misalpav.com/node/46921

वाडा - कविता
https://www.misalpav.com/node/17890

प्रसाद गोडबोले's picture

25 Oct 2021 - 9:42 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद पाभे !

तुमच्या दोन्ही कविता वाचल्या ! मस्तच !

आपला अनुभव सार्वत्रिक असणे किंव्वा काही तरी मोजक्या लोकांनी अत्यंत जवळुन अनुभवलेला असणे हा विचार खुप सुखद आहे ! भवभूतीने "समानधर्म:" असा जो काही अफलातुन शब्द वापरलाय त्याचा प्रत्यय येऊन जातो !

बाकी ही कविता मला मे महिन्यात सुचली , आईबाबा आज्जी आजोबा ज्या वाड्यात रहायचे तिथे जाण्याचा योग आलेला , तो वाडाही आता अंतिम घटका मोजत आहे , त्याचे फोटो इथे द्यायचे मोह झालेला पण हे उगाचच स्वतःचं स्वतःला त्रास दिल्यासारखं आहे ! म्हणजे माझं वाड्याशी इतकं काही भावनिक नातं नाही पण बांबांच्या किंवा अन्य कोणाच्या ज्याने अख्खे आयुष्य तिथे काढले आहे त्याच्या नजरेतुन पहताना काहीतरी न सांगता येण्यासारखं दुखंत मनात कोठे तरी ! आणि आजच्या जगात आपल्याला इतकं हळवं व्ह्यायला वेळ नाही !

आपण आपले लेखन शेयर केल्याबद्दल
पुनः एकदा मनःपुर्वक धन्यवाद !

कॉमी's picture

25 Oct 2021 - 8:50 am | कॉमी

छान कविता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Oct 2021 - 11:02 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

25 Oct 2021 - 11:30 am | सौंदाळा

खूप सुंदर.
पोचली आणि आवडली

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2021 - 11:44 am | चौथा कोनाडा

व्वा छानच !
🏆

फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||

+१

दीपक११७७'s picture

25 Oct 2021 - 4:53 pm | दीपक११७७

आवडली कविता!

श्वेता व्यास's picture

25 Oct 2021 - 5:19 pm | श्वेता व्यास

कविता आवडली.

कविता र्‍हदयस्पर्शी आहे. मी तरूणपणी ज्या अनेक खेडेगावांची, गढ्या, जुने वाडे वगैरेंची चित्रे बनवली तिथे आता नवी घरे, मॉल्स वगैरे झाल्याचे बघून अतीव दु:ख होते. युरोपात जुने सगळे कसोशीने जपले जाते, त्याबद्दल कडक कायदे असून ते पाळले जातात तसे आपल्याकडे का नसावे असे वाटत रहाते.
आणखी कुणास हवे की नको, माझ्यासाठी तरी नक्की वाड्याचे जेवढे असतील तेवढे फोटो लवकर टाका.

प्रसाद गोडबोले's picture

27 Oct 2021 - 12:31 am | प्रसाद गोडबोले

नमस्कार काका !

वाडा अगदीच काही चौसोपी वगैरे नव्हता , आवर्जुन फोटो काढुन दाखवावेत असा तर मुळीच नाही , साधासाच होता , चारी बाजुंनी छोटी छोटी घरे , त्यात बिर्‍हाडकरु रहायचे , मध्यवर्ती रिकामा चौक , आणि मुख्य वास्तुत एक प्राचीन पादुकांचे मंदीर! वरील मजल्यावर मुख्य बिर्‍हाडाकरु !

वाड्याचे मुख्य मालक केव्हाच गेले होते , पादुकामंदिराचा ट्रस्ट होता , पण योगायोगाने त्याचे पाचही ट्रस्टी संपुर्ण कुटुंबासोबत निजधामी गेले, बाकी बहुतांश भाडेकरुंची मुले अमेरिकेत !

आता वाडा जवळपास बेवारस ! एका भाडेकरुने मोडकळीस आलेल्या वास्तुत हातपाय पसरायला सुरुवात केलीय पण त्याला कोण काय बोलणार ! सगळ्यांनीच जबाबदार्‍या झटकल्या म्हणल्यावर असेच होणार :(

बाबांना म्हणालो - बाबा , अगदी आजोबांच्या काळापासुन तुम्ही रहाताय तिथं , आपण आपली जागा घेऊन टाकु की , मी बघतो कसा जुगाड करायचा , तर बाबा म्हणाले - अरे असं कसं , महाराजांची जागा आपण हडपायची ? ह्यॅ . हे काही शक्य नाही मला.
मग म्हणालो - बरं मग जाऊन दे सोडून तरी द्या, तर म्हणे - असं कसं , इतके वर्ष राहिलो आहे मी तिथे , कित्ती आठवणी आहेत असं कसं सोडून देणार ? आणि आपण सोडलं तर महाराजांच्या पादुकांची पुजा कोण करेल ?

हे असं आहे , आता काय बोलणार ! असो.

फोटो मात्र टाकवत नाहीत , मला सर्ब दुरावस्था पाहुन खुप खंत वाटते . फेसबुक वर तुम्हाला रिक्वेस्ट टाकली आहे , तिथे शेयर करतो !

धन्यवाद !

कर्नलतपस्वी's picture

25 Oct 2021 - 8:35 pm | कर्नलतपस्वी

वाडा संस्कृती मधेच जन्मलो इथेच वाढलो रमलो.मोठे मोठ्ठे दिंडी दरवाजे, लोखंडी कड्या, भरभक्कम अडसर तेल पिवून काळ्या तुकतुकीत तुळया वासे, नक्षीदार खांब काळाच्या ओघात धुळीला मिळाले. वाडा चार लाखाला विकला तर माती आणी सागवान लाकडाचेच दिडपट उत्पन्न आले.

अन्नासाठी दाहीदिशा, पुर्वी खण, मण, खंडी मोजणारे आता स्केअर फुट आणी किलो मधे खुश होतायत.
कालाय तस्मै नमः

कविता आवडली, अश्या वाड्यात असणारे मोठे लाकडाचे झोपाळे देखील तितकेच विलोभनिय असतात. जिर्ण अवस्थे नंतर तेच भितीदायक देखील भासतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]

या "वाडा" वरुन आठवलं, फेबुवरच्या "आठवणीतील पुणे" या समुहाने "आठवणीतील वाडा" हा छापील विषेशांकच प्रकाशित केला आहे.
समुहातल्याच लेखकांनी वेळोवेळी या पानवर प्रकाशित केलेले लेखच यात समाविष्ट आहेत, हा पहिला भाग आहे, पुढील भाग देखिल येणार आहेत.
कुशल चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले हे सुंदर मनमोहक मुखपृष्ठ :

HNBD123H2234

किसन शिंदे's picture

27 Oct 2021 - 3:27 pm | किसन शिंदे

वाडा म्हटलं की मला 'वास्तुपुरूष' आठवतो.

श्रीगणेशा's picture

27 Oct 2021 - 7:09 pm | श्रीगणेशा

कविता आवडली. वाड्याचं चित्र डोळ्यासमोर आलं.

माझ्या आजोबांनी ५० वर्षांपूर्वी बांधलेला वाडा एकेकाळी मोठ्या वैभवात, माणसांच्या गर्दीत नांदला. आणि आज मात्र अगदी मृत्युशय्येवर असल्यासारखी अवस्था झाली आहे.. व्यवहार, फायदा तोटा, स्वार्थ, भावकी या दुष्टचक्रात सापडून.

पण अजूनही मन रमते तिथे गेल्यावर. लहानपणीच्या अनेक आठवणी परत जिवंत होतात.

हीच आपल्या शब्दांची ताकद ,काही संबंध नसतांही ऐके काळी वैभवयुक्त वाडा आता खंडहररुप घेतांना पाहून उदास वाटले.

एक हवा का झोंका आया
टूटा डाली से फूल टूटा डाली से फूल
ना पवन की ना चमन की
किसकी है ये भूल किसकी है ये भूल
खो गयी खो गयी खुशबू हवा में कुछ न रह गया

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2021 - 6:24 pm | प्राची अश्विनी

फार सुरेख गेय आणि चित्रदर्शी कविता!
असे अनेक वाडे डोळ्यासमोर आले.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 7:53 pm | मुक्त विहारि

असे दोन वाडे बघीतले आहेत