जगणे
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही
मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही.
जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा
सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही.
करार मदार सजावट कागदावरची
जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही.
होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे
पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही
हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी
नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही.
----- अभय बापट
३१/१०/२०२२