मामाचे गाव - तात्या (२)

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
15 Sep 2014 - 10:34 pm

पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत.

मागील भाग

मग दुपारची उन्हं कलू लागली की, तात्या हातात मोठं घमेलं घ्यायचा, व झोपडीत असलेल्या पोत्यातून घमेल्यात काहीतरी भरायचा. भरलेले घमेले आपल्या डाव्या खांद्यावर ठेऊन तो ऐटीत तो ते घमेलं मिरवत बांधावर उभा रहायचा व मला म्हणायचा “ निलं मरी, इदू कैल्सा आईतू अंदरे.. हो गुनु मनिकडे!” (थांब बाळा, एवढे काम घाले, कि जाऊ घराकडे) असे म्हणून तो खांद्यावरील घमेल्यातून मूठ-मूठभर खाद्य शेतात पसरवत, वेगवेगळे आवाज काढत फिरत असे.

तो येईपर्यंत मी आपला अंब्याच्या झाडावर चढून, मोठ्याश्या फांदीवर निवांत पाय हलवत बसून, समोर दिसत असलेल्या क्षितिजाकडे पहात असे, शेकडो झाडांनी वेढलेले व भले मोठे हिरवेगार शेताचे अंगण असावे असे देखणं गाव, त्या थोड्या दूरवर असलेल्या गावातल्या चूली जाग्या झालेल्या असायच्या, घराच्या कौलातून ३-४ फूट बाहेर डोकावत असलेली चिमणी पांढर्या धुराचे लोट नसले तरी, हलके हलके आपल्या अस्तित्वाची साक्ष देत बाहेर डोकावत होते. गावातील मंदिरात वाजत असलेल्या घंटीचे आवाज हळू आवाजात आत चालू होत असलेल्या पूजेबद्दल माझ्याशी गुजगोष्टी करत होते व तोच.. मागून तात्या माझ्या डोक्यावर टपली मारत म्हणायचे, “ नडी, ऊराग होग बरुनु!” (चल, गावात जाऊन येऊ) ते असे म्हणताच क्षणी मी अत्यानंदाने उडी मारून, अंग झटकून तयार होत असे.

तात्या, तेथेच विहिरीवर हात पाय स्वच्छ करून, शेतातील कपडे काढून, आत ठेवलेली शुभ्र असा त्याचा कुर्ता व पायजमा घालून, आपली सायकल हातात घेऊन चालत असे व मी त्याच्या मागे मागे.. तात्या बडबडे जरी नसले तरी, त्यांचा मूड लागला असेल तर मात्र छान गप्पा मारत, इकडचे-तिकडे प्रश्न विचारात.. आणि अजून जास्त मूड मध्ये असतील तर उजव्या-डाव्या बाजूला असलेल्या प्रत्येक शेताबद्दल, त्या शेताच्या मालकाबद्दल मला सांगत. त्यातील मला एक अक्षर देखील कळत नसे पण मी हम्म.. हम्म करत त्यांच्या मागे निवांत पायाने माती उडवत, आजू-बाजूला असलेल्या गावरान फुले तोडत जात असे. दीड-दोन मैलाची ही रपेट त्यांच्यासाठी नेहमीची होती, पण माझे चालून चालून पाय दुखू लागले की मी सरळ सायकलीच्या पुढील दांड्यावर जाऊन बसत असे, ते माझ्याकडे पाहून हसत व म्हणत “राज्या मगना, नडीक ब्याड निगु” (राज्या लेकाच्या, चालायला नको तूला!)

गावाची वेश आली की, तात्यांना जो कोणी माणूस भेटेल तो “बर्री सावकार!!” (या सावकार) म्हणून बोलवत असे, पण तात्या आपला नेहमीप्रमाणे कलप्पा आजोबाच्या दुकानाजवळ आपली सायकल लावत व कलप्पाआजोबाकडे पाहत म्हणत “इंदे इने? स्वल्पू नीर कुड!” (अजून आहेस का? जरा पाणी दे) कलप्पाआजोबा माझ्याकडे पाहत म्हणायचे.. “यानरी, सन्न सावकार, निमगु यान बेकू?” (काय हो, लहान सावकार, तुम्हाला काय पाहिजे?”

जो अलीबाबाचा खजानाजवळ घेऊन आहे असा हा कलप्पाआजोबा मला विचारात असे काय हवे? त्याच्या दुकानात काय नव्हते? वेगवेगळ्या गोट्यांनी भरलेल्या काचेच्या भल्यामोठ्या बरण्या, पोत्यांनी भरलेले भवरे, गोळ्या, बिस्किटे तर तुडूंब भरलेली! आणि मला काय पाहिजे हा प्रश्न? पण हे सगळे बघण्यासाठी असते, मागायचे नाही अशी आईची सक्त ताकीद असायची पण आता येथे आई नाही ना सोबत.

“तात्या, आदु...” मी आपला साळसूदपणे गोट्यांच्या बरणीकडे बोट दाखवत असे, तात्या काही बोलायच्या आत कलप्पाआजोबा मुठभर गोट्या माझ्या ओंजळीत ठेवत असे.. तात्या मग एकदम खेसकत म्हणायचा “आज्जा, उतरू रक्का ना कुडेल. मरी ब्याडी!” (आजोबा, याचे पैसे मी नाही देणार, विसरू नकोस).. कलप्पाआजोबा म्हणे.. “बीड रे सावकार, गुर्तू ईदे” (सोडा हो सावकार, माहिती आहे मला)

अर्ध्या चड्डीतील दोन्ही खिश्यात गोट्या वाजवत मी, परत तात्याच्या मागे मागे जात असे, सायकल कलप्पाआजोबाच्या दुकान उभी करून तात्या सरळ बस्तीकडे चालू लागे. बस्ती... माझे तोंड जरासे कडवट होत असे.. आता किमान अर्धातास यांची पूजापाठ. ते बस्तीकडे वळले रे वळले की मी मागून पसार होत असे व सरळ मामाच्या वाड्याकडे पळत सुटत असे. वाड्यात पाऊल टाकायची हिमंत नसे, त्यामुळे वाड्यासमोरून सुसाट पळत कुंभार गल्लीत जात असे, तेथे पोरं जमून हमखास गोट्या खेळत बसलेली असत.

त्या पोरांनी मला बिघडवला की मी त्यांना याबद्दल गावात दोन प्रवाद होते, कुंभाराच्या पोरांच्या घरचे माझ्या नावाने बोटे मोडत व जैनाच्या गल्लीतील घरे त्यांच्या नावाने. पण तरी आम्ही मुले एकत्रच गोट्या खेळत असू. गल्लीच्या टोकाला, ओढ्याकडे जाणारया रस्तावर भले मोठे एक चिंचचे झाड होते, लांबवर पसरलेल्या त्याच्या फांद्या व अजस्त्र असे त्याचे धूड! त्याच्या खाली गोट्यांचा डाव रंगात येत असे.

पण हे सुख खूप काळ नशिबात नसे, तात्याचा जोरदार आवाज कानापर्यंत आल्या आल्या मी डाव हरत असे, तात्या गल्लीच्या त्या कोपर्यापासून माझ्या नावाने शंख करत झपझप येत असे व माझा कान धरून म्हणे “राज्या, निन्न आज्जा, नंदे जीवा तागुंगा.. नि इल्ले आटा माडकोत खुतिडे!” ( राज्या, तुझा आजोबा, माझा जीव घेईल. तू येथे खेळ मांडून बसला आहेस?) असे म्हणत मला ओडत त्यातून बाहेर काढत असे व बाकीच्या मुलांना देखील दोन-चार शिव्या देऊन पळवून लावत असे.

आता मी मावशीच्या घरी राहत असल्यामुळे मला आजोबांच्याकडे जायची किंवा तात्याला मला त्यांच्याकडे घेऊन जायची गरज नसे पण गावात आलो व आजोबांना भेटलो नाही, व मी येऊन गेलो हे कळले त्यांना तर? ही भीती माझी नाही तात्याची असावी.. तो मला तडक वाड्यावर घेऊन जात असे व वाड्याच्या दरवाजा ढकलत आवाज देत असे “सुभाष, अप्पा इदारू?” (सुभाष, आजोबा आहेत का?) मामा काय उत्तर देणार यावर माझे पुढील भवितव्य ठरलेले असे, ते आहेत म्हणजे दोन रट्टे ते नाहीत म्हणजे मामाकडून दहा-बारा रट्टे! फक्त तात्यासोबत आहे म्हणजे वाचण्याची शक्यता जास्त. तरी मार हा नक्की पडणार हे गृहीत धरून मी इकडे-तिकडे मामी कुठे दिसते का हे पहात असे, एकदा का तिच्या पदराआड गेलो की कोणाची हीमत नसे की मला मार देईल.

एकदा का मामीचा पदर हाती लागला की, तात्या माझ्याकडे पहात हसे व काही न बोलता मामाशी गप्पा मारत बसे. मग थोड्यावेळाने आवाज देई की निघतो. मी आपला गप्पगुमान त्याच्या मागे मागे जात असे व सायकल घेऊन तात्या चालू लागला की हळूच कधीतरी मी सायकल च्या पुढील दांड्यावर जाऊन बसे. तात्या पण चालून दमला असे मग.. तो पायडलवर एका पायाने जोर देत, ढांग टाकून सायकलवर बसे व जोरात सायकल चालवत आपल्या घराकडे निघे... तोंडाला लागणारा गारवारा.. पेंगुळलेले माझे डोळे आणि सोबतीला संध्याकाळचा संथ अंधार.. किर्र किर्र रातकिडा आता रात्र होणार म्हणून आवाज करत असे.. व समोर फर्लांगभर पसरलेला धुळीचा रस्ता तात्या वेगाने कापत दूरवर लुकलुक करत असलेल्या दिव्याकडे पहात म्हणायचा... बत्तू! (आलेच!)

क्रमश:

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीप्रकटनआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Sep 2014 - 10:42 pm | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला...

पैसा's picture

15 Sep 2014 - 11:08 pm | पैसा

अगदी तब्बेतीत लिहिलंय! सगळा जीव ओतलाय यात!

एस's picture

15 Sep 2014 - 11:29 pm | एस

पुभाप्र.

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2014 - 12:22 am | प्रभाकर पेठकर

व्वा! मस्त लिहीलंय. आमचं बालपण मुंबईत गेलं त्यामुळे असे अनुभव नाहीत. पण त्याकाळी मी राहात असलेलं दहिसर गाव मुंबईत असून 'गावंच' होतं. त्या कारणाने मुंबईत बालपण जाऊनही गावाकडची थोडीफार मजा अनुभवायला मिळायची.

माझे ही तसे फार असं बालपण नाही आहे, काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी चित्रित करत असलेले हे गाव पाहिली की माझा मलाच विश्वास बसत नाही की, जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे.

काही धुरसर आठवणी आणि त्यातून मीच माझे बालपण उभे करण्याचा प्रयत्न करत आहे
हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण.

बाकी ते जे लहानपणी सुन्दर वाटत होते ते गाव आता कुरुप झाले आहे. हे वाचून वाईट वाटलं.

>>हे असं अर्धं आठवणींमधून आणि अर्धं कल्पनेतून सुरेख चित्रण उभं करणं लाजवाब आहे, तुमचा जीव त्या बालपणात किती गुंतला आहे ते फार प्रकर्षाने कळतंय. मस्त लिखाण.

कधी कधी हातात जेव्हा आठवणीच राहिलेल्या असतात तेव्हा त्याची जास्त वेळा उजळणी होते :)

कंजूस's picture

17 Sep 2014 - 8:18 am | कंजूस

छान लिहिलंय.

स्पंदना's picture

17 Sep 2014 - 10:01 am | स्पंदना

तात्यांची प्रत्येक हालचाल नजरेसमोर दिसते वाचताना.
मस्त लिहीलं आहे दशानन!!

मस्त लिहिलंय. पु.भा.प्र.

दशानन's picture

19 Sep 2014 - 12:28 am | दशानन

धन्यवाद!

रेवती's picture

17 Sep 2014 - 6:39 pm | रेवती

छान लिहिताय. वाचत राहीन.

पालव's picture

17 Sep 2014 - 8:44 pm | पालव

वा !! फार छान तुम्हि मामाचा गाव उभा केला वाचताना...

दशानन's picture

19 Sep 2014 - 12:29 am | दशानन

सर्वांचे आभार!