मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
28 Apr 2013 - 11:15 pm

त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!

भाग -१

इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का? तांबे, पेले, वाट्या, घागरीची तोंड गोल असतात म्हणून विहीरीचे तोंड गोल. नाना प्रश्न ना ना उत्तरे.

आजोबांच्या दुरवर परसलेल्या उसाच्या वाडीत एका कोपर्‍यात एक कौलारु बैठ घर. मातीच्या भिंती, दोन खोल्या. त्यावेळी लाईट नसायची आमच्याकडे. लाईट फक्त शेताला पाणी द्यायचे असायचे तेव्हाच येते असं इसावअज्जा सांगायचा. आतल्या खोलीत काहीबाही सामान भरुन ठेवलेले असायचे. मला त्या खोलीची खुप उत्सुकता लागून राहलेली असे, कारण आत हजारो गोष्टी भरुन ठेवलेल्या होत्या व त्या सगळ्या मला हव्या होत्या. त्यात जूने पणतीचे दिवे होते, कंदिल होते, वेगवेगळी अवजारे होती व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरच्या मोठ्या तुळईवरच्या खिळ्यावर काही पतंग लटकलेले होते. इसावअज्जा माझे भले किती लाड करत असे पण त्या खोलीकडे मला जाऊ देत नसे. मी मागे ते देत असे पण ते पतंग देत नसे. तरी मी खुष होतो, इसावअज्जा माझा फुगलेला चेहरा व मला ती खोली का पाहू देत नाही या रागामुळे लाल झालेला नाकाचा शेंडा पाहून लगेच खास लपवून ठेवलेले लाल पेरु विळत्यावर कापून माझ्या समोर धरत असे. त्याला माहीती होते एकवेळ मी आंबा नको म्हणेन रागात पण लाल पेरुला कधीच नाही म्हणणार नाही.

त्या घराच्या बाहेरच्या खोलीत मात्र मला मनसोक्त दंगा घालण्याचा मुभा होता, ज्वारीची पोती आणि पोती भरलेल्या त्या खोलीत काय नव्हते? पोत्यांची घसरगुंडी होती, दगडी दोन दोन जाती होती, भली मोठी वजन तांगडी होती व सगळ्यात महत्वाचे तेथे मोठा, खूप मोठा म्हणजे मी व माझ्या सगळया बहिणी त्यात बसतील असा एक मोठा लाकडी झोपाळा होता. मी त्यावर पुर्ण झोपलो तरी दोन्ही बाजुला व उजवीकडे डावीकडे खूप म्हणजे खूप जागा राहत असे. मी माझे दोन्ही हात, दोन्ही पाय फैलावून त्यावर झोपलो तरी त्यावर तरीही खूप जागा राहत असे.

इसावअज्जा समोर लाकडी आराम खुर्चीवर बसून कडदोर्‍याला बांधलेली चंची काढून, त्यातून पान, चूना, तंबाखु व कात काढून माझा चाललेला दंगा बघत, गालातल्या गालात हसत पान तयार करून घेत. जर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले की मी पानासाठी हट्ट धरणार हे त्यांना माहीती असायचे मग ते हळून एक कोवळे इटुकले पानं काढत व पान करण्याची सगळी साग्रसंगीत अवलंबून ते चुन्याच्या जागी पाणी लावलेले, तंबाखुच्या जागी चार बडिसोफाच्या गोळ्या घातलेले पान मला देत. मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघू, मी बाहेर पडण्यासाठी पुढे झालो की इसावअज्जा प्रत्येक भिंतीवर प्रदक्षिणा घालताना जसा हात भिंतीवर ठेऊन चालतात तसे चालत घराच्या चारी कोपर्‍यातून दरवाजाकडे येत असे. तो पर्यंत मी समोर असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर हुडदंग चालू केलेला असे व इसावअज्जा माझ्यावर डाफरत म्हणे "कन्नगं मन्न होईत नोडू (डोळ्यात माती गेली बघ!)" असे म्हणून डोळे धोतराने पुसत असे. मग ते न बोलता पुढे पुढे निघत व मी त्यांच्या मागे मागे.

तुळतुळीत डोक्याचे, खुप उंच असलेले, नेहमी धोतर नेसणारे, सदरा न घालता फक्त पंचा खांद्यावर बाळगणारे हे इसावअज्जा म्हणे गांधीजींचे भक्त होते पण ते असे पुढे पुढे चालत असले की त्यांच्या हलणार्‍या सावलीतून त्यांच्या मागे मागे जाण्यात मला खूप आनंद मिळत असे. ते जरा खुषीत असले की स्तोत्र इत्यादी म्हणत रमत-गमत चालायचे व मी ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी त्यांच्या मागे-पुढे पळापळ करायचो. आमची ही दांडीयात्रा घरी पोहचू पर्यंत संध्याकाळ झालेली असायची. अंधार पडायच्या आत इसावअज्जा पडवीतील दिवे लावण्याच्या कामी लागायचा व मी आज काय मज्जा केली हे सांगायला माजघराकडे पळायचो.

असेच एकदा आम्ही शेतातून परत आल्यावर कट्यावरील आपल्या वेताच्या आराम खुर्चीत डुलत बसलेल्या आजोबांनी इसावअज्जाला आपल्याकडे बोलवले. इसावअज्जा व आजोबा खूप वेळ बोलत बसले, मी खाऊ खाऊन आलो तरी ते बोलत होते, मी वर जाऊन आक्काशी भांडून आलो तरी बोलत होते, जेवणासाठी पंगत बसली तरी ते बोलत होते. रोज पंगतीत होणारा थोडाफार हास्य विनोद थांबला होता, सगळे मोठे गंभीर चेहर्‍याने जेवत होते व आम्ही लहान मंडळी बावरुन गप्प मऊ भात गिळत होतो. अचानक फुटलेल्या एका हुंदक्यामुळे मी बावरुन इकडे तिकडे पाहिले मोठी मामी, सन्न मामी, सदलगा मामी, लहान माऊशी, मोठी माऊशी, बेळगावची काकी व एकोंडीची काकी तोंडात पदर घेऊन रडत होत्या व सोबत जेवत होत्या. शेजारी बसलेली आई हुंदके देत होती व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होती. मोठी लोक भुतकाळात गेली होती व लहान मंडळी मोठ्यांचा हा वेगळाच अवतार पाहून डोळ्यात आलेले पाणी थोपवून एकमेकांच्याकडे पाहत आधी कोण रडण्याची सुरवात करतो हे पहात होती.

"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल." आजोबा थोडे जोरातच बोलले. भरल्या ताटात हात धूऊन माझ्याकडे भरल्या डोळ्याने बघत इसावअज्जा पंगतीतून उठले. पंगत संपली. काय झाले? हा प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर घेऊन बालचूम अंगणात जेथे झोपायचे होते त्या त्या जागेवर जाऊन बसले. दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीमध्ये आजोबा दोन्ही हात मागे बांधून करारी चेहर्‍याने शतपावली करत होते, स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजासोबतच खुसफुस चाललेली कळत होती पण समजत मात्र काहीच नव्हते. मात्र रात्री झोपण्याच्या वेळेस उलगडा झाला.. तो मोठे मामा व एकोंडीच्या काकीच्या बोलण्यातून.

चुलीत भडकलेली आग, त्यात इसावअज्जा च्या बायकोने घेतलेला पेट व त्या गोंधळात आपल्याच तान्हा मुलाला पाळण्यातून काढण्याच्या तीचा प्रयत्न.. सगळेच संपलेले होते. शेतावर असलेले इसावअज्जा व कामगार तेथे पोहचू पर्यंत कोळसा झालेला होता दोघांचा.. पेटल्या घराची आग सगळ्यांनी मिळून विजवली पण इसावअज्जा चे ते पेटलेले घर काय त्यांच्या मनातून विजले नाही. माजघराच्या दोन पाऊले समोर असलेल्या विहीरीत जर पेटलेल्या बायकोने उडी मारली असती तर सगळे नीट झाले असते असे इसावअज्जाला नेहमी वाटतं असे. पण त्यांच्या बायकोला पोहता येत नव्हतं!

या गोष्टीला अनेक वर्ष झाली, जखमावर खपली चढली, शेतातलं घर सोडून आमच्या आजोबांच्या घरी इसावअज्जा राहण्यासाठी आला कायमचा, त्या वर्षी जन्मलेल्या मुलीच्या पोटी अनेक वर्षानी मुलगा झाला. दोन्ही आजोळ मुलींनी फुलले असताना कोणाच्या ध्यानीमनी नसतात ना! सगळेच आनंदले पण सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर इसावअज्जाला कारण त्याच्या त्या तान्हामुलाच्या उजव्या ओठावर पण म्हणे तीळ होता...

क्रमशः

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

28 Apr 2013 - 11:31 pm | बॅटमॅन

हाही भाग आवडला. खूप सुंदर रीतीने फुलवला आहे.

"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल."

असे म्हटल्यावर पुढे काय होते याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

सूड's picture

29 Apr 2013 - 2:09 pm | सूड

>>"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल."

अरथ बरय मरें!!

बॅटमॅन's picture

29 Apr 2013 - 2:12 pm | बॅटमॅन

अर्थ असा आहे:

"हा विषय परत घरात नको! राजा त्या घरी पाऊल टाकणार नाही म्हंजे नाही!"

किसन शिंदे's picture

29 Apr 2013 - 3:08 am | किसन शिंदे

पुढचा भाग येऊ दे पटकन!

अभ्या..'s picture

29 Apr 2013 - 3:11 am | अभ्या..

दशाननराव काही म्हणा पण आई सरस्वती हाय प्रसन्न तुमच्यावर.
इतकं अप्रतिम लिहिताय तुम्ही की बस्स. केवळ जबरदस्त.
पहिल्या भागात चुणुक दिसलीच होती पण हा भाग म्हणजे सच्चं ऑब्झरवेशन दाखवतोय. कथनाची शैली पण अप्रतिम.
निरर्थक शब्दांचे केवळ फुलोरे फुलवण्यापेक्षा मूळ कथाविषय सशक्त असला की असे लेखन साध्य होते.

पण त्यांच्या बायकोला पोहता येत नव्हतं!

ह्या जीवाला लागलेल्या चट्क्यासाठी सलाम. :(
खूप शुभेच्छा पुढील लेखनासाठी.

शुचि's picture

29 Apr 2013 - 6:27 am | शुचि

वा! अतिशय सकस लिखाण!!

पियुशा's picture

29 Apr 2013 - 9:57 am | पियुशा

हुच्च लिखाण :)
"इ विषय मत मन्याग ब्याड! राज्या आमण्याग काल इडाव इल्ल अंदे इल्ल."
प्लिज मला या वाक्याचा अर्थ सांगा रे कुणीतरी !

अद्द्या's picture

29 Apr 2013 - 1:23 pm | अद्द्या

हा विषय परत घरात काढू नको . राजा त्या घरात पाय ठेवणार नाही म्हणजे नाही !!

दशानन's picture

29 Apr 2013 - 7:45 pm | दशानन

बरोबर, हाच अर्थ आहे.

इरसाल's picture

29 Apr 2013 - 10:03 am | इरसाल

भाग आवडले. अतिशय छान लिहीत आहात.पुढील भाग लवकर टाका

चौकटराजा's picture

29 Apr 2013 - 10:11 am | चौकटराजा

देवा, हे लिखाण पाहून मजला प्रश्न पडला की आपण आय डी घेताना गजानन का घेतली नाही ? अभ्या ने म्हटल्या प्रमाणे
सरस्वतीचा वरदहस्त आहे.स्मरणे व परत ते शैलीदार भाषेत, संवेदनशीलपणे प्रकट करणे. त्रिवेणी संगम.म्या तर फ्यान जालल्लो बॉ.

दशानन नावामागे इतिहास आहे, तो येथे नको :)

लन्का नरेश असा अर्थ आहे ना ?

कोमल's picture

29 Apr 2013 - 10:41 am | कोमल

क्रमशः वाचून आनंद झाला..

सगळ्यात महत्वाचे तेथे मोठा, खूप मोठा म्हणजे मी व माझ्या सगळया बहिणी त्यात बसतील असा एक मोठा लाकडी झोपाळा होता.

माझ्या आजोळी खानदेशात अशा झोपाळ्यांना बंगळी म्हणतात.. आम्च्या घरी पण अशी एक बंगळी होती. सुट्यांना आजोळी गेल्यानंतर आम्हा भावंडांचे घोळका करुन त्या बंगळी वर बसायचं, मोठ्ठे मोठ्ठे झोके घ्यायचे असे उद्योग चालायचे. आज्जी-आजोबांकडून गोष्टी पण अशाच बंगळी वर बसून ऐकल्या. मोठे झाल्यावर कळलं की घराची वाटणी झाली आणी यात माझी बंगळी कुठे गेली काही कळालचं नाही.

तस या चॅप्टरचे नेमच इसावअज्जा असल्याने टोलरेट होउन जातय... बट टु बि टेल्ल्यु फ्रँक्ली. या चॅप्टरच्या फोकल पाँइटात "तुम्ही" मेजर्ली "मिसिंग" आहात. म्हणुन पहिल्या भागाची रंगत-गंमत यात नाही वाटली. पेन इज एव्हरीव्हेर युनो... बट ते एक्स्प्रेस्स करताना खुस्खाशितपना कमी पडला असेल तर.. काहीसा उदासवाणा लेख तयार होतो. पन हे, लेखकाने काय लिवायचे हे सांगायचा मला अधिकार नाही.. म्या फकस्त आपलं मन मोकल केलय.

दशानन's picture

29 Apr 2013 - 11:58 am | दशानन

सर्वांचे आभार.
ग्लिफ, पॉइंट नोट केला आहे.दुखा:ची झालर लेखायला येऊ नये म्हनूनच सगळ्याचे कारण शेवट्या चार ओळीत बसवले आहे. बाकी सर्व लेखनात "राज्या" आहेच.

अद्द्या's picture

29 Apr 2013 - 1:25 pm | अद्द्या

दशानन राव

दोन्ही भाग लाई आवडले

पुढचे भाग युन्द्या लवकर

jaypal's picture

29 Apr 2013 - 2:33 pm | jaypal

देखिल आवडला. दुस-या पॅरा मधील पहील वाकय
>>>आजोबांच्या दुरवर परसलेल्या उसाच्या वाडीत एका कोपर्‍यात एक कौलारु बैठ घर.
उसाची वाडी नसते. फड किंवा मळा असतो.

दशानन's picture

29 Apr 2013 - 8:06 pm | दशानन

अरे आमच्याकडे "ताट" असे म्हणतात, उदा. जोशीताट, मजलेताट.
बोली भाषेत "ताटकडे बा, ताटकडे होत्यानू" असा उल्लेख होतो.
मग ताट या शब्दाला पर्याय म्हणून मी वाडी हा शब्द वापरला.

दशाननराव, म स्त च लेखन! पुढचा भाग लवकर येऊदे!

प्रचेतस's picture

30 Apr 2013 - 8:04 am | प्रचेतस

खूप छान लिहित आहेस रे.

दशानन's picture

1 May 2013 - 1:53 pm | दशानन

सर्वांचे आभार!

विसोबा खेचर's picture

1 May 2013 - 2:02 pm | विसोबा खेचर

लैच भारी..
मस्त वाटलं..

पैसा's picture

1 May 2013 - 6:43 pm | पैसा

चटका लावणारं पण पहिल्या भागाइतकंच सुंदर लेखन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

दशाननराव काही म्हणा पण आई सरस्वती हाय प्रसन्न तुमच्यावर.
इतकं अप्रतिम लिहिताय तुम्ही की बस्स. केवळ जबरदस्त.
इती अभ्या... याच्याशी १००% सहमत.

पुभाप्र.

हे जरा परत बघावं:
...हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी... >>> हे पहिल्या भागात आलं होतं.
...चुलीत भडकलेली आग, त्यात इसावअज्जा च्या बायकोने घेतलेला पेट... >>> हे या भागात आहे.

का माझा काही घोळ होतोय?

दशानन's picture

1 May 2013 - 8:35 pm | दशानन

वरील घटना कळू पर्यंत आमच्या सर्वांसाठी ते ब्रम्हचारी आहेत (असा समज होता).
घरातील वयाने खूपच मोठे असलेले आजोबा, लहान आजोबा व मोठे दोन मामा इत्यादी लोकांना माहीती होते काय घडले आहे ते. व याचा खुल्लासा पुढील भागात करायचा होता पण आता वाचकांचा गैरसमज नको म्हणून येथेच लिहले. पहिल्या भागामध्ये असलेल्या पेटीचा उल्लेख त्यासाठीच होता.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

1 May 2013 - 9:47 pm | मनोज श्रीनिवास जोशी

ग्रामीण जीवन चांगले चित्रित केले आहे.पहिला भाग वाचलेला नाही. शोधून वाचतो.

इरसाल कार्टं's picture

28 Jun 2017 - 7:01 pm | इरसाल कार्टं

लवकर येउद्या.

दशानन's picture

28 Jun 2017 - 10:48 pm | दशानन

उजव्या बाजूला असलेल्या अनुक्रमणिकावर क्लिक केले तर बाकीचे भाग दिसतील.
लेख थोडे जुने आहे, आज थोडे वर आले (काढले)
:)