मामाचे गाव - (भरत)

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 9:58 pm

मागील भाग

मळ्यावर असले की ही शेतं ती शेतं अशीच भटकंती सुरु असायची, मळ्यात मोजून १५-१६ घरं. त्यात एक भरतचे घर, भरतला आई-बाबा नव्हते, तो आज्जी-आजोबा सोबत रहात असे, आम्ही त्याला भरत जरी नावाने हाक मारत असू तरी तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. मोठी माणसं नेहमी त्याच्याकडे बघून चूकचुकायची पण का? हे आम्हाला कळत नसे, पण भरत सोबत खेळायला आम्हां लहानांना खूप आवडायचे कारण एवढं मोठ्या वयाचे त्यावेळी कोणी आमच्या सोबत खेळतच नसायचे, पण भरत खेळायचा, अगदी लपाछपीपासून ते कवड्यांचा सारीपाट पण. घरातल्या कुठल्या मोठ्याने कवड्या लपवून ठेवल्या तर भरत अगदी चीचोक्याच्या कवड्या करून देत असे, तासनं तासं ते अर्धे चीचिके घासत बसत असे तो, आमच्यासाठी.

भरत मोठ्यांसारखा शेतात कामाला जात नसे त्यामुळे तो सदा आमच्या खेळात रमलेला असे. त्याला आवडायचे आमच्या सोबत खेळायला, पण धन्नापा आज्जा त्याला नेहमी ओरडायचा व भरत मुसमुसत आपले नाक फुसत लांब कुठेतरी पेरूच्या, चिंचेच्या झाडाखाली रुसून बसायचा मग, मागू त्याची आज्जी धन्नापा आज्जावर ओरडत यायची “निमगं यान मनशेरतना? राजा मरी, होगु यल्ल इदा नोडू मत आडरी आटा निवू” (तुम्हाला काय माणुसकी?, राजा बाळा, जा कुठे गेला आहे बघ आणि खेळा तुमचा खेळ) भरतला शोधून पुन्हा खेळ सुरु होतं असे, थोड्यावेळाने भरतची आज्जी आम्हां पोरांना आवाज देत असे व आम्ही तिच्या झोपडीत गेलो, की मग ती आम्हाला जे काही तिच्याकडे असेल ते खायला देत असे, मग त्यात पेरू पासून कोणीतरी आठवणीने आणून दिलेले रव्याचे लाडू असतील किंवा मक्याचा चिवडा. भरतच्या डोक्यावर ती आपला थरथरता हात ठेवत एकटीच बडबडे.. “ना सत्ने अंदरे निंदू यान आगोदू मरी..” ( मी मेले तर तुझे कसे होणार बाळा..) थोडावेळ मी तिच्याकडे एकटक पहात बसायचो, डोक्यावर पदर घेतलेली, चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या असलेली, तिच्या डोळ्यात पाहिले की असे वाटे की भरून आले आहेत.. आणि मी एकदम कावरा-बावरा होतं असे, कोणा मोठ्याच्या डोळ्यात पाणी पाहिले की अजून ही होतो. तिच्या ते लक्षात आल्यावर ती हलकेच डोळे पुसून माझ्या डोक्यावर टपली मारून म्हणे “मत बेकू?” ( अजून हवे?) मी मान हलवून नकार देत असे.

आमच्या सगळ्याच घरात भरत बद्दल एक आत्मियता होती, आजोबापासून अगदी माझ्या आईपर्यंत सर्वजण त्याचा विषय निघाला की एकदा का होईना डोळे पुसत. असेच एका दिवाळीत आईने सर्व मुलांसाठी, मुलींसाठी कोल्हापूरहून कपडे आणले होते. सगळ्यांना वाटून झाल्यावर आईने एका पिशवीत ठेवलेला एक सदरा आणि विजार घेतली, घरून करून आणलेले फराळाचे पदार्थ घेतले व माझा हात धरून मळ्यात आली, भरतच्या झोपडीसमोर पोचल्या पोचल्या आईने आवाज दिला “भरत, धन्नापा आज्जा?” आतून धन्नापा आज्जा बाहेर आला व आम्हाला बघून एकदम सुखावला, त्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य मी त्यावेळी पहिल्यांदाच पाहिले होते, “बा सूसा, बा. हंगे ईदे मरी? यल्ला छलु?” (ये, सूसा, ये. कशी आहेस मुली? सगळे छान?) आईने हातातील पिशवी त्यांच्या हातात दिली व म्हणाली “तगोरी, फराळ उदे मत व्हसा अरीगोळ, भरतगं कुडरी” (घ्या, फराळ आहे आणि नवीन कपडे, भरतला द्या.) हातातील पिशवी घेत आज्जा एकदम गदगदून आल्यासारखा निशब्द झाला होता, काही न बोलता, आईच्या व माझ्या डोक्यावर हात ठेवतं त्याने आशिवार्द दिला.

आम्ही परत गावाकडे निघालो, आईचा हात धरून मी चाललो होतो, तोच आई स्वत:शी बोलल्यासारखी बोलू लागली “काय या दोन जीवांचे नशीब. देवा, असे कोणासोबत नको व्हायला. देवाची पूजा करायला चालेल्या भरतच्या आई-बाबासोबत असं कसं देव करू शकतो. हे लहानगं पोरं आता वाढणार कसं आणि याचे होणार कसं. त्यात हा मंदबुद्धी.” मी ऐकता ऐकता आईला प्रश्न केला “आई, मंदबुद्धी म्हणजे काय गं?” आई एकदम थबकली, व तीने माझ्याकडे पाहिले, “त्याला बरं नाही आहे, तू कसा रूपा पेक्षा मोठा आहेस, मोठ्या सारखा वागतोस? पण तो मोठा झाला आहे, पण डोक्याने अजून तो रूपा एवढाच लहान आहे.” आई काय म्हणाली काही कळले नाही, पण तो आजारी आहे एवढं कळलं होते. संध्याकाळ होऊ पर्यंत आम्ही परत गावातल्या वाड्यावर पोचलो, आणि वाड्यात पोचल्या पोचल्या आजोबांना शोधू लागलो. आजोबा विहिरीजवळ काहीतर करत होते, व मी त्यांना तेथे जाऊन विचारले “आजोबा, भरत कधी चांगला होणार?” आजोबांनी माझ्याकडे पाहिले व स्वयंपाक घराच्या दाराजवळ बसलेल्या माझ्या आईकडे पाहिले व म्हणाले “होईल. रे. भरतला कपडे दिले?” मी मान डोलावली. माझे आजोबानां मी मराठी बोललेलं कळतं हे माहिती होते पण त्यांना मराठी बोलता येतं हा त्या दिवसातील महत्त्वाचा शोध माझ्यासाठी होता. भरत आजारी आहे म्हणजे नेमकं त्याच्या आजारपणाचे स्वरूप मला समजले नसले तरी तो मोठा आहे, पण अजून लहान मुलांसारखा वागतो एवढं कळलं होते, आणि आता हे कळल्यावर सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता त्याला आपल्यासोबत खेळायला घ्यायचे की नाही.

क्रमशः

समाजजीवनमानराहणीप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

अमित खोजे's picture

20 Nov 2014 - 10:09 pm | अमित खोजे

लहानपणच्या आठवणी खरंच खूप छान आहेत तुमच्या. त्यातही कारुण्याची झालर आहेच. लहानपणी बर्याच गोष्टी कळत नसतात. मोठे झाल्यावर त्या तशा का होत्या याचा शोध लागतो परंतु तेव्हा आपण काहीच करू शकत नसतो. कधी कधी याची हुरहूर लागून रहाते.

अजून ही भरत आठवला की कसंतरी होतं.. :(

एस's picture

20 Nov 2014 - 11:07 pm | एस

अगदी असेच म्हणतो.

मुक्त विहारि's picture

22 Nov 2014 - 4:20 am | मुक्त विहारि

प्रकाश आणि राम्या आठवले.

अमितदादा's picture

29 Jun 2017 - 10:34 pm | अमितदादा

तुमची लेख मालिका वाचली ..खूप सुंदर आहे आवडली.

प्रीत-मोहर's picture

30 Jun 2017 - 5:57 am | प्रीत-मोहर

हे कस काय राहिलं होत वाचायचं

उपेक्षित's picture

30 Jun 2017 - 4:37 pm | उपेक्षित

राजे मस्त होता हा हि भाग

उपेक्षित's picture

22 Nov 2017 - 11:45 am | उपेक्षित

फूडचे भाग कवा टाकणार राजे ?

बबन ताम्बे's picture

26 Nov 2017 - 9:03 pm | बबन ताम्बे

वाचून झाल्यावर आंवंढा दाटून आला.

अजून काहिजण जुनं वाचत आहेत पाहून आंनद झाला.. या लेखाला प्रतिसाद भेटला नाही व वाचक ही! दैवी आदेश समजून मी लेखन बंद केले. आताशा लेखन म्हणजे.... ;(
जाऊ दे.. माईंड स्टोन हरवला आहे :D

पैसा's picture

2 Dec 2017 - 10:04 am | पैसा

वाचलं होतं. प्रतिक्रिया द्यायची कशी राहिली कळेना! की फार वाईट वाटून लिहिणे शक्य झाले नव्हते.

हम्म, राजा लिहिणे बंद करू नको. देवाची इच्छा होती म्हणून तुझ्या नशिबी लिहिणं आलं. नाहीतर ते आलं नसतं.