मामाचे गाव - तात्या (३)

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
20 Sep 2014 - 8:24 pm

मागील भाग

मळ्यामध्ये कच्चा रस्त्याच्या एकाबाजूला मावशीचे घर होते व मागे दूरवर पसरलेले शेतच शेत. त्यामध्ये गावातील अनेक लोकांच्या शेताबरोबर मामाचे शेत देखील दूरवर दिसत असे. त्याची ओळख पटवणारी ओळखीची खुण म्हणजे त्याच्या बांधावर उभी असलेली नारळीची ८-१० झाडे आणि शेताच्या मध्यभागी असलेले आंब्याचे भले मोठे झाड. मावशीच्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भला मोठा जमिनीचा तुकडा मावशीचा होता, त्यात तात्याने केळीची बाग, डाळिंब्याची झाडे, पापी आणि रोज लागणाऱ्या हिरव्या मिरच्या पासून कोथिंबीरीपर्यंत अनेक वेगवेगळी झाड लावलेली होती. या मळ्याचा संभाळ तात्याचा लहान भाऊ बापूतात्या करत असे.

तात्यापेक्षा वयाने ८-१० वर्ष लहान होता बापूतात्या, थोडासा अबोल पण कामासाठी अत्यंत कष्टाळू जीव. वाडीतील, घरातील लोक त्याचे कायम कौतुक करत असत. मी मावशीच्या घरी रहायला आलो की दिवसभर या घरातून त्या घरात, या शेतातून त्या शेतात भटकणे व भूक लागली की जवळ जे घर असेल त्या घरात सरळ स्वयंपाक घरात जाऊन “जेवण द्या” म्हणत ताट घेऊन बसणे मला सहज शक्य होते कारण इनमीन १५-२० घरं असलेली ही वाडी कधीकाळी आमच्या पंजोबाच्या कृपेने वसलेली व अर्ध्यापेक्षा जास्त घरे ही दूरवरची नातलग. मग सकूमावशीचे घर असो, नाहीतर सुनंदामावशीचे नाही तर अप्पासो तात्याचे घर! हव्या त्या घरात कधीही येजा करण्यास मला बंधन नव्हतेच. त्यात मी सर्वांचा लाडका त्यामूळे असेल पण मला कोणी कश्याला नकार देत नसे.

पण, बापू कायम कुठल्या ना कुठल्या कामात असे. कधी बैलांना चारा-पाणी दे, विहिरीतून पिण्याचे पाणीभर, कधी शेतीच्या औजारं ठीकठाक करत बस असे काहीना काही त्याचे काम चालू असे. आठवड्यातून किमान तीनदा तो गोठ्यातील सर्व म्हशीनां ओढ्यावर नेत असे व त्यांना घासून अंघोळ घालत असे. नेहमीप्रमाणे बापू सकाळची न्याहारी करून गोठ्यातील म्हशी सोडवत असे व जर मी जवळपास असलो तर माझ्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणे “नडी!” (चल)

मला म्हशींची तेव्हा देखील खूप भीती वाटायची जेवढी आज देखील वाटते. पण बापूतात्या सोबत आहे म्हणून मी त्याच्या मागे मागे जात असे. काळ्याभोर व अंगाने धिप्पाड अश्या ह्या म्हशी, आपले शेपूट हालवत, माश्या झटकत उभ्या रहात व, बापू त्यांच्या गळ्यात लोढणे अडकवत असे अगदी न घाबरता, एखादी म्हस जरा देखील हलली की मी सरळ गोठ्याच्या बाहेर अगदी रस्त्याच्याकडे धावत जाऊन उभा राहत असे व तेव्हा मात्र बापू जोर जोरात हसू लागे माझी अवस्था पाहून. मग म्हशीच्या पाठीवर हात फिरवत त्यांची बांधणी सोडत तो त्यांना हाकत गोठ्यातून बाहेर येत असे. गोठ्याच्या छतावर ठेवलेला नेहमीचा सोटा हाती घेऊन तो.. तोंडाने...हुर्रे..नडीर्र..! म्हणून तो सोटा जोरात जमिनीवर आपटत म्हशीच्या पाठीवर हलकासा हात मारत असे. एक म्हस चालू लागली की सगळ्या हळूहळू एका मागे एक असे ओढ्याच्या दिशेने चालू लागत व बापूतात्या माझ्या खांद्यावर थोपटत म्हणे “इष्ट अंजाक यानु आईतू मरी?” (एवढे घाबरायला काय झालं बाळा?) असे म्हणून माझा हात धरून तो झटझट पावले टाकत व जवळपास मला ओढत तो म्हशीच्या वरातीच्या सर्वात पुढे होत असे व सर्वात पुढे बापूतात्या, त्याच्या मागे मागे मी व माझ्यामागे गारगोटीपेक्षा मोठे दोन दोन डोळे असलेल्या ७-८ म्हशी, आपली मान हलवत, इकडे तिकडे मिळेल तो चारा खात येत असतं.

रस्त्यात दोन्ही बाजूला मोठमोठी झुडपे, वेगवेगळी झाडे निवांत उभी असत व त्यातून कुठून कुठून अनेक पक्ष्यांचे आवाज येत, कधी कधी एकादी कोकिळा कुठेतरी कुहू कुहू करून आपले अस्तित्व जाणवून देत असे तरी कधी एखादा पोपटांचा थवा डोक्यावरून उगाच इकडे-तिकडे उडून एखाद्या भल्यामोठ्या झाडावर स्थिरावत असे. मग बापूतात्या आपल्या सोट्याने हनुवटीला आधार देत उभा रहात असे व त्यांच्याकडे एकटक बघत उभा राहत असे, एखाद्या पक्ष्याचा आवाज आला की त्याच्या रोखाने त्याला शोधण्याचा प्रयत्न करे व दिसला रे दिसला की मला हलकेच खुण करून दाखवत असे. मग आनंदाने मान डोलवत चालू लागे व मी वळून वळून त्या पक्ष्याकडे पाहत पाहत त्याच्या मागे मागे चालू लागे.
ओढाजवळ आला की, आजूबाजूला देखील फरक पडत असे, सुकलेली झुडपे मागे पडलेली असत व बाजूला हिरवीगार झुडपे दिसू लागत, अंगाला जाणवेल एवढा हवेत गारवा येत असे व पायाखालची दगडमाती संपून मऊ मऊ वाळू येत असे.. दाटीने पसरलेल्या झुडपातून वाट काढत पुढे पुढे जावे व अचानक झुडपे संपून ओढ्याचे विस्तृत दर्शन घडत असे, भले मोठे पात्र असलेला हा ओढा गावाची ओळख होता. भर उन्हाळ्यात देखील जेव्हा आसपासच्या नद्या सुकलेल्या असायच्या तेव्हा देखील या ओढ्यात तेव्हा गुढगाभर पाणी असायचे. बापूतात्या एखादा मोठा डोह पाहून म्हशी त्यात सोडायचा व जवळ काठावर असलेल्या एखाद्या झाडाच्या बुंध्याला टेकून निवांतपणे अंग टेकायचा. मी देखील त्याच्या सोबत तेथे बसायचो व समोर डुंबत असलेल्या म्हशी पहात बसायचो. बापूतात्या फारसा बोलायचा नाही, पण कधी कधी आमच्या कोल्हापूर बद्दल, माझ्या शाळेबद्दल, शाळेत काय शिकवतात त्याबद्दल प्रश्न विचारायचा. पण ते विचारताना देखील तो दूरवर कुठेतरी पाहत विचारायचा. पण माझ्या प्रत्येक उत्तराने त्याचे त्याचे डोळे विलक्षण चकाकत असतं, मी जेव्हा जेव्हा शाळेबद्दल बोलत असे तेव्हा तेव्हा त्याचे डोळे कुठल्याश्या अनामिक आनंदाने भरून येत व माझ्या डोक्यावर हात फिरवत तो म्हणत असे “राज्या, भरपूर शिक, भरपूर अभ्यास कर, मोठा हो. नशिबाने शाळेत जायला तुला मिळत आहे, आई-बाबा तुझे तुला शिकवत आहेत, तो पर्यंत शिकून घे.” आणि डोक्यावरील हात तसाच ठेऊन तो काहीक्षण न बोलता तसाच टेकून बसून रहात असे.

अंगापिंडाने दणकट असलेला हा बापुतात्याची सकाळ भल्यापहाटे होत असे, विहिरीवर अंघोळ करून आल्यावर तो सायकल घेऊन, गावातल्या बस्तीत जाऊन पूजा करून परत येत असे व सकाळ सकाळी गुरांसाठी चारा आणायला शेतात जात असे. पण असा कधी तो निवांत बसलेला असा की मात्र टक लावून कुठे ना कुठे पाहत असायचा. मध्येच कधीतरी कुठेतरी कानावर पडलेले गाणे गुणगुणू लागायचा व माझ्याकडे पाहत म्हणायचा “तुला कन्नड गाणी समजतात?” मी मानेनेच नकार देत असे. त्याची इच्छा होईल तेव्हा तो उठायचा व सरळ उठून डोहाकडे जायचा. मग मी त्याच्या मागे मागे धावत. डोहाच्या बाजूला कुठेतरी झुडपावर अंगावरील बंडी, विजार काढून तो ठेवत असे व झप करून डोहात उडी मारत असे. अचानक थारारलेल्या पाण्यामुळे म्हशी बावचाळत पण याचा आवाज आला की परत गप्प डोहात आपले बस्तान मांडून शांत बसत. मी काठावर बसून आता बापूतात्या काय करतो हे उत्सुकतेने पहात असे. तो म्हशींच्या अंगावर दोन्ही ओंजळीने पाणी उडवत असे व मनसोक्त पाणी उडवून झाले की जवळ असलेले एखादे झुडूप तोडून, तो म्हशींचे अंग घासायला सुरु करत असे. एका हाताने अंग घासणे व दुसरया हाताने त्याजागी पाणी उडवणे ही दोन्ही कामे तो अगदी तन्मयतेने करत असे. एखादी म्हस उगाच हंबरायची तेवढ्यापूर्तीच. पण बाकी हे काम आरामात चालत असे.

कधीतरी मग डोक्यावर उन्हांचे चटके जाणवू लागले की तात्या म्हशींना डोहातून बाहेर काढायचा व झुडपांवर टाकलेले कपडे अंगावर चढवत त्यांना हाकत त्यांच्यामागे मागे घराकडे निघत असे व मी त्याच्या मागून वाळूत पाय रुतवून रुतवून चालत असे, व मागे उडणारी धूळ पहात पहात हसत खिदळत..

गोठ्यात म्हशी बांधल्या आणि त्यांच्यासमोर चारा-पाणी ठेवले की मग बापूतात्या निवांत होत असे व मागे विहिरीवर जाऊन आपले हातपाय व माझे हातपाय धूत पुन्हा थोडावेळ पाण्याशी खेळत असे. जेवणाची ताटे आमची वाट पाहत आहेत असा मावशीचा आवाज आला रे आला की मग आम्ही पाण्याशी खेळ बंद करून माजघरात जेवायला जात असू. घरात मावशी मला सकाळपासून काय काय केलं हे जेवण वाढता वाढता विचारात असे व मी सर्व काही सांगत जेवण सुरु करत असे. बापूतात्या गुमान भाकरीचा तुकडा मोडत माझी बडबड ऐकत जेवण सुरु करे व जेवण संपता संपता.. मावशीला तो हळूच विचारे.. “वाहिनीरी , नानू सूसाअक्काकडे याड दिना होगली?” (वहिनी, मीपण सूसाअक्काकडे (कोल्हापूरला) दोन दिवस जाऊ का?) व मावशी हसत म्हणायची.. “बारली औरू ना केळतेने. होगोके.” (त्यांना येऊ देत, मी विचारते त्यांना. जा म्हणेस तू.)

संस्कृतीमुक्तकजीवनमानप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

एस's picture

20 Sep 2014 - 8:36 pm | एस

तन्मयतेनं वाचतोय. अजून येऊ द्या!

जो पर्यंत वाचक आहेत तो पर्यंत लेखन सुरु असेलच. वाचक नसतील तर मग लिहायचे कोणासाठी :)

१००मित्र's picture

21 Sep 2014 - 9:00 am | १००मित्र

व्वा...दशानन

सुंदर. प्रवाही. मुख्य म्हणजे म्हशींबद्दल सविस्तर लिहिलयत. बायकोचे काका म्हशीला नदीवर सोडतात, तर ती म्हैस काकांना लईच दमवते. बाहेर यायलाच तयार नस्ते.

त्यांनी तिचं नाव "दमयंती" ठेवलंय !

गुळाचा गणपती's picture

21 Sep 2014 - 3:15 pm | गुळाचा गणपती

सुंदर ! म्हशीचे नाव नेहमी लक्षात राहील. सो रोमान्तिक.

पैसा's picture

23 Sep 2014 - 3:10 pm | पैसा

अगदी शब्दातून चित्रं काढली आहेस!

दशानन's picture

23 Sep 2014 - 9:19 pm | दशानन

धन्यु!
वाचकांचा न मिळालेला प्रतिसाद पाहून थोडा गडबडलो ;)
लेख कुठे चूकला हे शोधतो आहे.

श्रीरंग_जोशी's picture

24 Sep 2014 - 5:31 am | श्रीरंग_जोशी

सर्व चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले. ग्रामीण लोकजीवनाचे वर्णन आजच्या काळात इतके सहजासहजी वाचायला मिळत नाही.

अवांतर - माझ्या लहानपणी माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय होता. म्हशींना चारा घालताना सरकी, ढेप व कटियाचे मिश्रण करणे ही कामे मी एखादवेळेस केली आहेत. तसेच आजोबा किंवा मामा गोबरगॅसमध्ये शेण ओतताना पाहणे हे पण आवडते काम होते.

शैलेन्द्र's picture

24 Sep 2014 - 12:12 pm | शैलेन्द्र

छान लेखन

आवडले

शिद's picture

24 Sep 2014 - 1:38 pm | शिद

हा भाग पण खुपच छान.

लहानपणीच्या आठवणी सगळ्यांच्या थोड्या अधिक प्रमाणात सारख्याच असतात. तुमचे लेख वाचून मला उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी केलेली धमाल आठवते. धन्यवाद.

पु.भा.प्र.

खुपच छान लिहीलय. वातावरण अगदी डोळ्यासमोर उभं राहीले.
गावाकडचे जीवन न अनुभवलेल्या आमच्यासारख्या शहरी लोकांसाठी तर हे लेख म्हणजे पर्वणीच आहेत.
तुमचे सगळे लेख आवडीने वाचतो. लिहीत राहा.
तात्या जोरात चाल्लाय.
ईसावअज्जा पण आवडला होता.

दशानन's picture

6 Oct 2014 - 11:34 pm | दशानन

सर्वांचा आभारी आहे, ही लेखमाला लिहिण्यामागे उद्देश असा सुरवातीला नक्कीच नव्हता, पण जसे जसे लेखन करत आहे त्यातून जाणवले की आपण त्या काळातील लोकांचे राहणीमान, पद्धती याबद्दल देखील लिहित आहोत, तर हे लेखन असेच सुरु ठेवण्याचा मानस आहे. कदाचित पुढे कोणाला तरी याचा उपयोग होईल आणि नाहीच झाला तर मनोरंजन मूल्य तर नक्कीच राहील याची मी खबरदारी घेतो आहेच.

मुक्त विहारि's picture

7 Oct 2014 - 12:57 am | मुक्त विहारि

आवडला