एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
13 Oct 2013 - 11:38 pm

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

निसर्गामध्ये लहान-मोठें कोणी नसते, तो नियम माणसाने बनवला आहे. म्हणजे बघा, गरवारे कॉलेजच्या चहा टपरी वरती जर (इतकुशी)मुंगी जर चावली तर समोरच्या सुंदर मुलीपण विसरल्या जातात. फुरसे हा घोणासाच्या कुटुंबातीलच (viperidae) लहान भाऊ, पण वासेपूरच्या छोट्या फैजल खान सारखा "केहेके लुंगा" म्हणत भल्याभल्यांच्या तोंडाला रक्त आणणारा.

फुरसे (विषारी):

याचा आढळ अगदी अमेरिकन शस्त्रात्र (वॉरलॉर्ड) व्यापाऱ्यांसारखा मिडल-इस्ट, आफ्रिका ते मध्य आशिया आणि शेवटी भारतीय उपखंडात.(भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ.)
२००९ साली इराक मध्ये तेग्रीस आणि युफ्रेटिस च्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरस्यांनी इराकी जनतेची वाट लावून टाकली होती. बहुतेक इराकचे "स" या शब्दाशी वाकडे आहे, आधी सद्दाम-मग अंकल सॅम-शेवटी सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे)! आपल्या इकडे पुण्या-मुंबईच्या (घाटावरच्या) लोकांना फुरसे एवढे माहित नसेल, पण कोंकणात म्हणजे जेवणात चिंच-गुळाची ज्या आमटी चवीने चाखली जाते त्याच चवीने "फुरसे" हा विषय चघळला जातो.

"जास्तीत जास्त हातभर लांबी, मातेरी रंग, डोक्यावर बाण" असे सोपे वर्णन फुरस्याचे केले जाते(~लांबी ३८- ८० सेमी). डोक्यावरचा बाण म्हणजे याचे "ट्रेडमार्क शिक्रेट", ते म्हणजे "जर आपल्याला भिडला तर तिकडेच तोडला" हेच चित्रातून सांगायचा निसर्गाचा प्रयत्न. "मातेरी" रंग हा १० वी च्या "डी ग्रुप" च्या प्रश्नासारखा "अर्थ एक पण उत्तरे अनेक"..मातेरी मध्ये "राखाडी, चॉकलेटी, करडा, लालसर करडा, शेवाळी करडा असे अनेक प्रकार. जशी जमिनीवरची माती तसे फुरस्याची रंगसंगती, "आपली माती- आपले फुरसे" असा कार्यक्रम पण आपण त्यावरून काढू शकतो.

हा फोटो मिपाकर 'अभिजा'यांनी साताऱ्याला (चाळकेवाडीला ) काढला आहे. हे फुरसे करड्या मातेरी रंगाचे आहे.

सातारी फुरसे

या फोटो मध्ये फुरस्याच्या डोक्यावरचा "ट्रेडमार्क बाण" नीट दिसतो आहे.

बाण

हा फोटो आमोद झांबरे यांचा, त्यांनी पुण्याच्या जवळ काढला आहे, रंग संगती मधला फरक बघा.

पुणेरी फुरसे

लहान असल्यामुळे लपण्यासाठी जागा अनेक: दरवाज्याची कडी, बिजागर; उंबरठ्याच्या, मोरीच्या,पलंगाच्या फटीत, घरातल्या कुंडीच्या खालच्या प्लेट मध्ये, कुंपणाची दगडांची भिंत, अंगणात पसरलेल्या दगडाच्या खाली इ. तसेच या सापाला "हीच-हायकिंग" करायला खूप आवडते, म्हणजे एका भाजीच्या ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये असे करून हे साप पुण्यात पोहचतात. मी जी काही फुरशी पुण्यात पकडली ती मार्केट यार्ड परिसरामध्ये भाजीच्या गोडाऊनमध्ये पकडली आहेत. तशी कोथरूडच्या किंवा कोंढवा टेकडी वर मजबूत फुरशी आहेत, पण मला कॉल ला कधी मिळाली नाहीत. असेच एक फुरसे इंग्लंडमध्ये एका आज्जीच्या घरी भाजीच्या कंटेनर मधून पोहचले, "असेल कुठला तरी साप म्हणून", त्यांनी त्याला स्वयंपाकाच्या चिमट्याने उचलून डब्यात टाकले, नंतर ते फुरसे आणि ती आज्जी इंग्लंड मध्ये शेलीब्रिटी झाल्या होत्या, कोणाचे काय...तर कोणाचे काय !

संकटाची जाणीव झाली की फुरसे अंगावरचे खवले घासून करवत घासल्यासारखा आवाज करते,तो आवाज घोणसाच्या शिट्टी एवढा मोठा नसला तरी कचकचीत तीव्र (high frequency) असतो. घोणासाच्याच कुटुंबातील फुरसे असल्यामुळे आधीच्या भागात लिहिलेले वर्णन याला पण लागू होते- "डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला फुरसे पण असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघा: फुरस्याचा हल्ला. हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी फुरस्याचा हल्ला चित्रित केला आहे. )

वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १/१० घोणासाच्या विषाच्या मात्रेएवढे म्हणजे २० mg तो २५ mg एवढे विष फुरसे टोचते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो.

फक्त हे विषाचे प्रमाण(घोणसाच्या तुलनेत) कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे हाफकिनचे प्रती-विष उपलब्ध आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाचे रुग्ण हे फुरसे चावल्यामुळे आढळतात, १९९२ ते २००१ या दहा वर्षाच्या काळात २७४ फुरसे दंश तर ७२ नाग दंशाचे रुग्ण फक्त नांदेड भागात आढळले.(डॉ.डी.पी. पुंडे )म्हणजे साधरण पणे नागाच्या चौपट प्रमाणात फुरसे चावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आढळते.
निसर्गाला कमी लेखायची ही चूक अशी महागात पडते. हा व्हिटेकर साहेबांचा व्हिडिओ बघा- फुरस्याचे विष !

जास्तीत जास्त फुरसे चावण्याचे प्रमाण हे रात्री आढळते, "व्होल वावर इज अवर" हा मनुष्यप्राण्याचा गैरसमज फुरसे रात्री दूर करते, शेतात डबा टाकायला गेला, धार मारायला गेला आणि फुरसे चावले, हे प्रकरण...आज ३१ नंबर ची पी.एम.टी खूप उशिरा आली एवढे कॉमन आहे.
माणूस वाचला तरी, ज्या जागी फुरसे चावते तिकडचे टिशू जळून जातात, कधी-कधी बोटे कापायला लागतात.

एका सर्पतज्ञांच्या भाषेत "एकवेळ नाग परवडला पण फुरसे नको,इतका त्रास होतो की बाळंतपण परवडले !"

एका मंगळवारच्या संध्याकाळी (~२००२-२००५ )अनिकेत (माझा सर्पोद्यानचा मित्र)त्याच्या रूमवर (सर्पोद्यान मधली वरची खोली) गप्पा टाकत पडला होता. इतक्यात कोर्पोरेशनचा ड्रायवर, हातात एक साप घेऊन आला. संध्याकाळी कोर्पोरेशनची "दुटी" संपल्यावर त्याने कात्रजच्या गुत्त्यावर पहिल्या धारेची लावली होती. "अरे हा बघ मांजऱ्या धरून आणला बघ !"

खालचा फोटो बघा, मांजरऱ्या म्हणजे कॅट स्नेक, बिनविषारी साप, याच्यात पिल्लात आणि फुरस्यामध्ये लोकं, सर्पमित्र नेहमीच गोंधळ घालतात.

मांजऱ्या

अनिकेत मुरलेला सर्पतज्ञ असल्यामुळे संधीप्रकाशात पण त्याने ते फुरसे आहे हे ओळखले, त्याने तो साप पहिल्यांदा डब्यात टाकला. ड्रायवरचे चालूच होते-" गुत्त्यावर हा मांजऱ्या दिसला, इतकुसा साप, असाच धरला..." अनिकेतने त्याची बोटं चेक केली तर बोटाला, ब्लेड मारावे तसा दात लावला होता.

अनिकेतला गंभीर परिस्थीची जाणीव झाली, पण हा आपला तळीराम "फुल ओन" होता, "आपल्याला काय पण होत नाय,लई मोठें मोठें नाग धरले आहेत आपण"..हे चालूच होते. पुढच्या काही क्षणात , अनिकेत ने त्याला स्प्लेंडर वर झाशीच्या राणीसारखा स्वतःला मागून बांधला आणि गाडी ससूनच्या दिशेला तडक सोडली.

आत्ता ज्यांना कात्रज ते पुणे स्टेशन रस्ता माहित असेल त्यांना माहित असेल की संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे कुष्णा नदीच्या प्रवाहात उडी टाकून उलट्या दिशेने (भोपळा न लावता) पोहोण्यासारखे आहे. कसेबसे करत हा ससूनला पोहचला तर ही मोठी रांग...आता दारूचा अंमल कमी होऊन विषाचा अंमल चालू झाला होता, त्यामुळे ड्रायवर पण बोंबलत होता. लायनी शिवाय फक्त व्हीयपीला एन्ट्री हा तिरुपती-बालाजीचा नियम इकडेपण लागू होता.

मोबाईलच्या आधीचा काळ, त्यामुळे अण्णाना फोन(ल्यांड लाईन) लागे पर्यंत त्या छोट्या-इवलुश्या फुरस्यानी ड्रायवरला सात जन्म दाखवले होते. फोन लागल्यानंतर वरून सूत्र हालली, ड्रायवरला प्रतिविष चालू झाले. ससूनच्या आणि अनिकेतच्या कृपेने, नंतर तो (हाल होत होत)वाचला, त्याचे बोट पण वाचले. पण निसर्गातल्या त्या इतकुश्या फुरस्याने, ड्रायवरला त्याची जागा दाखवून दिली होती.

(हा वरचा अनुभव माझा स्वतःचा नाही पण तो १००% खरा आहे, फक्त थोडे छोटे तपशील कानगोष्टीमुळे चुकू शकतात.)

आत्तापर्यंत मी ४ मुख्य विषारी सापांची (नाग, मण्यार, घोणस, फुरसे) माहिती दिली, हेच साप साधरण करून मानवीवस्ती मध्ये आढळतात. तसे अजून भारतात अजून खूप विषारी साप (साधा,मलबार-चापडा, किंग कोब्रा, पोवळा साप, समुद्र साप इ.) आहेत, पण त्यांचा माझा कॉल वर कधी संबध आला नाही म्हणून मी त्यांची माहिती देणे टाळले.ज्यांना कोणाला अजून त्यांच्या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी अण्णांचे "साप" (इंग्लिश-स्नेक्स) हे पुस्तक वाचावे.(त्याच्या प्रती सर्पोद्यान मध्ये मिळतात.)

पुढच्या भागात बिनविषारी साप....

(अण्णा म्हणजे सर्पोद्यान चे संस्थापक-श्री.निलीमकुमार खैरे.)
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

समाजजीवनमानराहणीशिक्षणलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

बाप्पू's picture

25 Oct 2013 - 9:56 pm | बाप्पू

जॅक-डी साहेब आता बिनविषारी साप आणि त्यान्चे आनुभव येउदेत....!! वाट पहतोय....!!

मन१'s picture

27 Oct 2013 - 12:27 am | मन१

लेखमालिका उत्तम सुरु आहे.
फक्त दरवेळी येउन प्रतिसद द्यायला जमतेच असे नाही.

शिद's picture

30 Oct 2013 - 4:27 pm | शिद

असेच म्हणतो...!

vijayraj's picture

4 Nov 2013 - 3:40 pm | vijayraj

उत्कृष्ट लेखमालिका लिहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद….

कृपया इथे मी दिलेल्या तू नळी अरील उपचाराबद्दल आपले मत व्यक्त करावे …

http://www.youtube.com/watch?v=3rFlNu-ze3s

जॅक डनियल्स's picture

4 Nov 2013 - 9:30 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
मी डॉक्टर नाही, पण जे काही अनुभवले आहे आणि पहिले आहे त्या वरून सांगू शकतो की अश्या व्हिडीओ मुळेच खूप नुकसान होते आणि अंधश्रद्धा पसरल्या जातात.
पहिली गोष्ट म्हणजे सापाचे विष शरीरात क्षणार्धात पसरते, ३ तास वगैरे लागत नाही, जर कधी नसे वर चावला असेल तर ३ तासात तो माणूस तिरडी वर पण असतो. जे काही दाखवले आहे, ते त्यामुळे काही कामाचे नाही, एकतर सुरवातीलाच सापांची चुकीची माहिती दिली आहे. मण्यार-नाग आणि घोणस -फुरस असे दोन वेगळे ग्रुप आहेत, मागच्या लेखात लिहिले आहे ही त्यांचे कुटुंब वेगळे असल्याने विष पण वेगळे असते.
शेवटी जे औषध सागितले आहे, ते तर काय असेल मला माहित नाही, पण सापाचे विष हे व्हेनोम असते, त्यामुळे रक्तात औषध द्यावे लागते , तोंडाने १० लिटर औषध ओतून पण काही उपयोग नाही.
साप चावला तर (जीव वाचवायचा असेल तर)सरकारी दवाखान्यात जावे.

लिंक बघून खूप करमणूक झाली !

सुबोध खरे's picture

5 Nov 2013 - 10:50 am | सुबोध खरे

संपूर्ण भंपक

vijayraj's picture

5 Nov 2013 - 5:23 pm | vijayraj

जेडी साहेब व खरे साहेब,शंकेचे समाधान केल्याबद्दल धन्यावाद ….
आपण दोघांनीही प्रतिक्रिया दिल्याने हि उपचार पध्दत व्यर्थ आहे हेच सिद्ध झाले आहे…

होबासराव's picture

5 Nov 2013 - 2:00 pm | होबासराव

जेडी
पुर्ण ले़खमाला वाचुन थक्क व्हायला होत..खुपच अभ्यासपुर्ण माहिति तुम्हि आणि डॉ.खरे साहेबानि दिलि. काल निखिल वागले ह्याचा ग्रेट भेट बघत होतो..डॉ. प्रकाश आमटे मुलाखत होति त्यानि सरळ मण्यार उचलुन आपल्या ५ वर्षाच्या नातवाच्या हातात दिलि....पण ते बघताना मला मात्र तुमचे लेख आठवले आणि त्या लहान मुलाविषयी काळजी वाटायला लागली.

सुबोध खरे's picture

6 Nov 2013 - 2:16 pm | सुबोध खरे

वाट पाहत होतो. शंभरावा प्रतिसाद माझा. असो
मण्यार तुम्ही हाताळता तेंव्हा ती कोणत्याही तर्हेने उद्दीपित झालेली नसली तरच ती हाताळतात आणी दिवसा मण्यार तशी मंदबुद्धीच असते. तशा स्थितीत ती मुळीच चावत नाही. डॉक्टर आमटे ना हे माहित आहे त्यामुळे ते अशाच वेळी तिला मुलांच्या हातात देतात. शिवाय तिचे पोट भरलेले असले तर ती उगाच कष्ट करीत नाही.

खटासि खट's picture

6 Nov 2013 - 1:29 pm | खटासि खट

थोडा अवांतर आहे प्रतिसाद.

मला सापाची भिती बसलेली आहे. भूत, मगर, वाघ, सिंह यांचं काहीच वाटत नाही हे विशेष. सापाचा फोटो, व्हिडीओ पहायचंही टाळतो नाहीतर स्वप्नात साप येतात. सापाची स्कीन देखणी असल्याचं म्हटलं जातं पण याबाबतीत माझ्याकडून सपशेल पास असतो. त्यातून फुरसं कडकडून चावतं हे माहीत असल्याने हा साप आवडत नाही.
भितीयुक्त उत्सुकतेतून धागा उघडला गेला..

अफाट लेखनशैली आणि उत्तम माहिती.......... पुण्यात आलात कि भेटण्यास उत्सुक्त...

आनंदराव's picture

1 Dec 2013 - 12:56 pm | आनंदराव

दिसेम्बर मधे अलत कि भेतयला अवदेल

हा साप कोणता? कृपया सांगता का जरा?
Snake

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5614326492656169412&Se...

जॅक डनियल्स's picture

6 Feb 2014 - 9:30 pm | जॅक डनियल्स

हा दिवड जातीचा साप आहे. याला देंडू, विरोळा किंवा इंग्लिश मध्ये चेकर्ड किलब्याक म्हणतात. विहारी, नदी मध्ये आढळणारा बिनविषारी साप आहे. पण बिनविषारी असला तरी उचलला तर कचकच चावतो.

आदूबाळ's picture

7 Feb 2014 - 12:05 am | आदूबाळ

नवीन लेख कुठंय रे?

जॅक डनियल्स's picture

7 Feb 2014 - 2:02 am | जॅक डनियल्स

येतो आहे काही दिवसात, आत्ता सुट्टीवरून परत आलो त्यामुळे प्रोफेसर डोक्यावर बसला आहे सध्या. तो जरा खाली उतरला की लिहितो.

हुप्प्या's picture

7 Feb 2014 - 2:29 am | हुप्प्या

साप वा अन्य प्राण्याकरता वापरले जाणारे मराठी भाषेतले शब्द हे फार काटेकोर नसतात असे दिसते.
दिवड जातीत आणखी कोणते साप असतात?
विरोळ्याच्या चावण्याबद्दल बर्‍याच ठिकाणी वाचायला मिळाले आहे. जोरदार रक्त वगैरे काढतो असेही ऐकून आहे.
हा कायम पाण्यात असतो का उभयचर?

जॅक डनियल्स's picture

7 Feb 2014 - 8:35 am | जॅक डनियल्स

दिवड हीच त्याची जात आहे, म्हणजे तेच त्याचे विशेष नाव आहे. कुटुंबाचे नाव piscator आहे, त्यात इतर किलब्याक पण येतात. म्हणजे ग्रीन किलब्याक इ. पण आपल्या एकडे सरसकट सगळया पाण सापाला दिवड म्हणण्याची पद्धत आहे. हा साप पाण्याच्या जवळ आढळतो (सगळे साप उत्कृष्ट पोहू शकतात.) आणि मासे आणि बेडूक खातो. सहकारनगर मध्ये लोकांच्या बाथरूम मधून पण मी त्याला पकडला आहे.
चावण्याचे म्हणाल, तर हातावर गुप्ती चालवल्या सारखा चावतो, अगदी हात फोडून काढतो आणि रक्तबंबाळ करून टाकतो.

अभिजा's picture

6 Feb 2014 - 5:52 am | अभिजा

जेडी, हा चेकर्ड कीलबॅक आहे का?

जॅक डनियल्स's picture

6 Feb 2014 - 9:31 pm | जॅक डनियल्स

जे बात !