संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
5 Aug 2020 - 6:55 am

कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!!
‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण! कॅल्क्युलेशन हेच...गंधर्वला डोसा खाल्ला प्लस लस्सी - बत्तीस रुपये, चांदणी चौकात दोन कणसं प्लस एक थम्सअप अठरा रुपये, युनिव्हर्सिटीला एक चक्कर मारली की पीएमटीचे बारा रुपये अन भेटली तर चहाचे आठ रुपये...एकूण गेल्या सात महिन्यात सहाशे त्रेपन्न रुपये ऐशी पैसे उडवले
...एवढं करून 'मी तुला माझा चांगला मित्र मानते म्हंजे मोठा पोपट...
.....मग उडत उडत रात्री उशिरा रूमवर यायचं अन सकाळी डोळे चोळत चोळत बारा नंबर पकडून कंपनीत रोजंदारीवर जायचं....
ती आबा साहेब गरवारेवाली तर बेक्कार मॉडेल. सगळ्यात ज्यास्त खर्च. काजु मस्तानी शिवाय काहीच प्यायची नाय. नो कॉम्प्रोमाइज. अमृततुल्य चहा किंवा थम्सप म्हंजे लय तुच्छ. स्किन खराब होते. लक्ष्मी रोडवर एकदा रविवारी मस्तानी खात / पीत असताना तिची इंग्लिश टीचर भेटली तिला. गुड मॉर्निंग नंतर आपली अत्यंत धाडसी ओळख करून दिली. ही इज ऍन इंजिनियर. अ व्हेरी गुड पर्सन. माय बेस्ट फ्रेंड. मच मोअर दॅन अ ब्रदर.... पाच महिन्यातला टोटल खर्च होता नऊशे सव्वीस रुपये.....
आज मितीस डायरीत या टोचणाऱ्या वायफळ खर्चाची एकूण नोंद आहे बावीसशे त्रेपन्न रुपये ऐशी पैसे इतकी....क्लेशदायक !
फ्रेंडशिप डे आला की असं वाटतं एकएकटीला व्हॉट्सऍपवर बिलं पाठवून द्यावीत.
टीप : पोस्टवर कमेंटमध्ये शंका उपस्थित केलीय म्हणून स्पष्टीकरण देणे भाग आहे. पोपट झाल्यावर उडत उडत रूमवर जायच्या आधी अर्थातच मित्राच्या रूमवर फडफडफडणे हे पहिले काम आलेच ! पण तिथला सांत्वन समारंभाचा खर्च फारच किरकोळ. कारण प्रमुख औषध मस्तानीच्या मानाने खुपच स्वस्त - एक पाव ओल्ड मॉंक ! शिवाय एक थम्सप, मूठभर खारे दाणे, चार बॉइल्ड अंडी आणि तीन तांबे पाणी....! काय लागतं गरिबाला या व्यतिरिक्त ??? एका सांत्वन समारंभाचा टोटल खर्च एकशे त्रेचाळीस रुपये ! दोन पापड भाजायची ज्यास्तच गमजा केली तर दोन रुपये अधिक ! बस्स !!! सांत्वन करणारा मित्रच करायचा हा खर्च. भाई है तु मेरा म्हणायचा. त्यामुळे तो खर्च ' मित्र मानते तुला' अकौंटमध्ये घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तशी देवाणघेवाण हे आपलं अंडरस्टँडिंगच होतं. त्याचा पोपट झाला की तो आपल्या रूमवर फडफडायचा. फिर वो अपना भाई ! त्याच्यावर त्यावेळी मी केलेला खर्च मित्राच्या अकौंटवर टाकायचा. ते हिशेब चालू रहातील. चालू आहेत. विषय कधीकाळी बंद पडलेल्या अकौंटसचा आहे.
...पण एक आहे बॉस ! त्या सांत्वन समारंभानंतर पंखाखाली अचाट वारं शिरायचं. एकदम टोट्टल. त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम. नवा जोम. नवा दम. उमेद वाढलेला ताजातवाना फासेपारधी....

धोरणमांडणीइतिहासवाङ्मयबालकथासाहित्यिकप्रकटनविचारआस्वादसल्लाआरोग्यविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

5 Aug 2020 - 7:45 am | विजुभाऊ

आहा हाहा
मस्तच लिवलय. एकदम झकास.
सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

सुधीर मुतालीक's picture

5 Aug 2020 - 5:51 pm | सुधीर मुतालीक

डिटेलमध्ये एकेक एपिसोड लिहिला तर तुम्हाला माझे बरेच पास्वर्ड्स समजण्याचा धोका आहे.

गणेशा's picture

5 Aug 2020 - 9:10 am | गणेशा

वा मज्जा आली वाचून...
'हिशोबात रहा' चा असा अर्थ नक्कीच लावला पाहिजे :-)

दुर्गविहारी's picture

5 Aug 2020 - 1:17 pm | दुर्गविहारी

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी..

उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

मी पण :)
वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

दुर्गविहारी's picture

6 Aug 2020 - 12:49 pm | दुर्गविहारी

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का.
माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2020 - 7:21 pm | टवाळ कार्टा

खिक्क

सौन्दर्य's picture

5 Aug 2020 - 10:48 pm | सौन्दर्य

नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.

खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव's picture

6 Aug 2020 - 6:08 am | अर्धवटराव

बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम.

पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )