आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
18 Oct 2019 - 12:23 pm

लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :
भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433
भाग ४ - https://misalpav.com/node/45481
भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533

आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे. दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.) भारताचे ‘जन-गण-मन‘ आणि बांगलादेशचे ‘आमार सोनार बांगला‘ दोन्ही मात्र निर्विवादपणे टागोरांची अपत्ये. दोन्ही देशांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलंय, त्यांच्या स्मृती जपल्या आहेत, अमर केल्या आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजे बंगाली संस्कृती-साहित्य-कला-समाज सर्व प्रांत व्यापून दशांगुळे उरलेलं व्यक्तिमत्व. बंगाली जनमानसाच्या ‘मर्मबंधातील ठेव’. कोलकाता शहर टागोरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही. उत्तर कोलकात्यातील जोरासंखो ठाकुरबारी हे टागोर परिवाराचे कोलकात्यातील निवासस्थान. रवींद्रनाथांचा जन्म (१८६१) आणि मृत्यू (१९४१) ह्या वास्तूने बघितला. जोरासंखोच्या निष्प्राण भिंती रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे साहजिकच कोलकाता शहराला टागोरांबद्दल आत्मीयता आहे, शहराचे नाव उंचावणाऱ्या त्यांच्या कार्यलौकिकाबद्दल अभिमान आहे.

टागोरांचा ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन त्यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला तो १९१३ साली. हा पुरस्कार त्यांना कवितेच्या क्षेत्रातील योगदानामुळे मिळाला खरा पण रवींद्रनाथांचे योगदान फक्त कवितांपर्यंतच मर्यादित नव्हते. कादंबरी, नाटके, लेख, लघुकथा, प्रवासवर्णने, निबंध अशा सर्व साहित्यविधा रवींद्रनाथांना वश होत्या. इंग्रजी आणि बंगाली भाषांवर असामान्य प्रभुत्व होते. कंठसंगीत, वाद्यसंगीत, चित्रकला, सुलेखन, नाट्यमंचन, शिक्षण, समाजकार्य, धर्म-अध्यात्म, लोककला, स्थापत्यकला अशा अनेकानेक प्रांतात त्यांनी यथेच्छ मुशाफिरी केली. त्यांच्या व्यक्तित्वाचा फार मोठा प्रभाव कोलकात्याच्या समाजजीवनावर पडला.

रविंद्रनाथांची प्रसिद्ध कविता

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षांपासून कविता लिहिणाऱ्या रविंद्रनाथांनी १६ व्या वर्षी पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. गुरुदेव टागोरांच्या सुमारे २३०० रचना ‘गीतबितान‘ ह्या नावाने ओळखल्या जातात. ‘गीतबितान’चा शब्दशः अर्थ गीतांची बाग. प्रेम, पूजा, निसर्ग अशा विषयांना वाहिलेली ही गीते म्हणजे त्यांचे काव्यमनोगतच आहे. काही मोजकी गीते ‘विचित्रा’ म्हणून ओळखली जातात, कारण त्यांचे विषय अगदी वेगळे आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्रनाथांनी नाटके लिहायला सुरूवात केली. टागोरांची नाटके आणि संगीतनाट्यात त्यांनी केलेल्या प्रयोगांनी बंगाली नाट्यसृष्टीला वेगळ्या धाटणीच्या नाट्याची ओळख करून दिली. ‘रवींद्रनाट्य‘ अशी एक वेगळीच नाट्यविधा त्यांनी निर्माण केली. संगीत आणि नृत्यांनी नटलेल्या नाटकांमध्ये कलाकारांच्या मोहक पण कमीतकमी हालचाली आणि नाजूक पदन्यास रवींद्रनाट्याचे वैशिष्ट्य असते. संथ सुरुवात आणि हळूहळू उत्कंठा वाढवत रोचक-रंजक शेवट असा फॉरमॅट टागोरांच्या नाटकात दिसून येतो. जोरासंखो बारीच्या रंगमंचावर रवींद्रनाट्यांचे प्रयोग होत, त्यासाठी गुणिजनांची गर्दी लोटत असे. टागोरांच्या नाटकांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शंभू मित्र यांच्या ‘बहुरूपी थियेटर’मुळे. बहुरूपीने टागोरांची विसर्जन, वाल्मिकी प्रतिभा, चंडालिका सारखी प्रसिद्ध-अप्रसिद्ध नाटके मोठ्या प्रमाणावर सादर केली आणि त्यांना कोलकात्यातल्या रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

८४ लघुकथांचा एक संग्रह प्रसिद्ध करून रवींद्रनाथांनी बंगाली लघुकथांचा पायंडा पाडला. सर्व कथा बंगालच्या मातीतल्या, साध्या सोप्या विषयांवर आहेत पण त्यातील संदेश आणि प्रतीके चिरंतन आणि सर्व जगाला लागू होणारी आहेत. काबुलीवाला (१८९२), अतिथी (१८९५), क्षुधित पाषाण (१८९५) अशा प्रसिद्ध कथांचे विषय सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवन-संघर्षातून आलेले आहेत. टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.

टागोरांनी स्वधर्मातील विशेषतः जातिप्रथेच्या कुरूपतेवर भाष्य टाळले असा आरोप त्यांच्यावर होतो पण तो योग्य नाही. त्यांनी जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या विषयांवर लिहिले आहे. उदा.:- ‘चंडालिका’ ह्या नाटकात तथाकथित अस्पृश्य चांडाळ समाजातील वाळीत टाकलेली छोटी मुलगी प्रकृती आणि भिक्खु भन्ते आनंद यांच्यातील संवादाने कथा जितक्या सहजतेने फुलवली आहे त्याला तोड नाही.

टागोरांच्या कथांवर आधारित सिनेमांची जंत्री बरीच मोठी होईल. टागोरांच्या ‘नष्टनीड’ ह्या रचनेवर सत्यजित रॉय यांचा ‘चारुलता’ हा प्रसिद्ध सिनेमा बेतलेला आहे. समाप्ती, मणिहार आणि पोस्टमास्टर अशा तीन टागोरकथांनी एकत्रितपणे ‘तीन कन्या’चे रूप घेतले आहे. तपन सिन्हानी टागोरांच्या ‘अतिथी’ला सिनेरूप दिले आहे. घरे बायरे, गोरा, काबुलीवाला, तप्तपदी, उपहार, थोड्या अलीकडच्या चतुरंग, चोखेर बाली अशा अनेक सिनेमांच्या कथा मूलतः टागोरांच्या आहेत.

संगीत क्षेत्रातले टागोरांचे योगदान तर असामान्य म्हणावे असे आहे. गायन आणि वादन यात नाव मिळवलेल्या मोठ्या भावाकडून, ज्योतिन्द्रनाथांकडून त्यांना संगीताचे प्राथमिक ज्ञान मिळवता आले. लहानपणापासून कानावर आणि मनावर संगीताचे संस्कार झाले. ‘रवींद्रसंगीत‘ ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची संगीत विधा निर्मिण्याचे श्रेय टागोरांना आहे. टागोरांनी स्वतः रचलेली जवळपास २३०० गीते हा रवींद्रसंगीताचा आत्मा आहे. रवींद्रसंगीत मूलतःहिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या रागांवर बेतलेले आहे, अनेक गीतांवर भावप्रधान ठुमरी गायकीचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे. बहुतेक गीते सुंदर निसर्ग, अमूर्त ईश्वर आणि मनुष्याच्या भाव-भावना ह्याच विषयांना वाहिलेली आहेत. हे विषय टागोरांचे हातखंडा विषय आहेत, त्यामुळे स्वर-रस-शब्द अशी सुंदर त्रिवेणी जुळून येते. विषय, भाव, राग, स्वर, काव्यसौष्ठव, गेयता-श्रवणीयता अशा सर्व निकषांवर रवींद्रसंगीत मौलिक ठरते. भारतीय शास्त्रीय संगीताचा ठसा आहे, पण गडद नाही. काव्यातील ‘भाव’ सर्वोच्च महत्त्वाचा आहे, त्यावर कुरघोडी करणाऱ्या सुरावटी अजिबात नाहीत. भावार्थाला पूरक होईल इतपतच भारतीय रागदारी संगीताचे मिश्रण आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील काही अनवट रागांचा कळेल-न-कळेल असा बेमालूम मिलाफही काही गीतांमध्ये दिसून येतो. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे संपूर्ण रवींद्रसंगीत हे लिखित सुरावटींचे असते, त्यामुळे जगात कोठेही गायिले तरी नव्यानेच संगत करणाऱ्या अपरिचित वादकांनाही समजते आणि साथसंगत करणारी वाद्ये सुरात वाजविता येतात. ह्याच कारणामुळे संगीतरचनेतील रेखीवपणा थोडा जाचक होतो आणि सुरावटींमध्ये लवचिकपणा राहत नाही असे काही संगीतप्रेमींचे मत आहे. ह्या गीतांचे दुसऱ्या भाषेत भाषान्तर किंवा भावरुपान्तर करतांना मात्र त्यातील गोडवा कमी होतो असे समस्त बंगालीजनांचे मत आहे. एक मात्र आहे, रवींद्रसंगीताच्या ह्या सुरावटी समजल्या नाहीत तरी मनाला भिडतात, अर्थात आवड आणि तयार कान असेल तर. त्याची आवड निर्माण व्हावी लागते. काहीसे बीथोवेन, बाख आणि मोझार्ट अशा प्रसिद्ध संगीतकारांच्या रचना ऐकण्यासारखे. अन्यथा अनेक लोकांना रवींद्रसंगीत प्रचंड कंटाळवाणे वाटू शकेल, वाटतेही. अनेकांना प्राणप्रिय वाटणाऱ्या आणि अनेकांना अर्थहीन-कंटाळवाणे वाटणाऱ्या रवींद्रसंगीतासाठी आजही जगभरातील दर्दी बंगालीजन जीव ओवाळून टाकतात. टागोरांचे हे असामान्य योगदान एक जागतिक ठेवा आहे.

बंदिस्त शाळा आणि अभ्यासक्रम टाळून निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्याना वेगळ्या धाटणीचे, जीवन समृद्ध करणारे शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन टागोरांनी बोलपुरला ‘शांतिनिकेतन’ स्थापन केले. हा प्रयोग जगभर नावाजला गेला त्यात आश्चर्य नाही. आधुनिक भारताला अनेकानेक उत्तम कलाकार, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, नाटककार शांतिनिकेतनने दिले आहेत.

रवींद्रनाथ टागोरांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असली तरी टागोर कुटुंबातील ते एकमेव कलाकार नाहीत. कुटुंबातील अनेक सदस्यांनी वेगवेगळ्या कलाविषयात मोठी मजल गाठली आहे. सामवेदात वर्णिलेल्या रागरागिणींना सतार आणि तबल्यावर, कंठसंगीताद्वारे प्रत्यक्ष रूप देऊ पाहणारे हरकुमार टागोर असोत की नाटककार जतींद्रमोहन टागोर. भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताचा पाश्चात्य पद्धतीचा पहिला ‘ऑर्केस्ट्रा’ बसवणारे सतारवादक सुरेंद्रमोहन टागोर असोत की बंगाली चित्रकलेला नवीन आयाम देणारे ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरियंटल आर्ट’चे संस्थापक अबनिंद्रनाथ टागोर. गणितज्ज्ञ आणि गीतकार एकाचवेळी असलेले द्विजेंद्रनाथ टागोर असोत की चित्रकार-व्यंगचित्रकार गगनेंद्रनाथ टागोर….कलाप्रांतातल्या मूर्धन्य टागोरांची यादी न संपणारी.

कोलकातावासीयांनी टागोरांचे घर सुंदर जतन केले आहे. दरवर्षी पांच बैशाख (रवींद्रनाथांचा जन्मदिवस) बाईशे श्रावण (पुण्यतिथी) अशा महत्वाच्या दिवशी इथे कलामेळावे, संगीतसभा आणि साहित्य-नाट्य जलसे असे कार्यक्रम होतात. त्यात शेकडो लोक भाग घेतात. कोलकात्याची कलाप्रियता जिवंत असल्याची पुरेपूर खात्री पटते. अन्य संग्रहालयासारखे निर्जीव वातावरण इथे नसते. आवारातच रबींन्द्रभारती विद्यापीठाचे मुख्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांचा चिवचिवाट कानी पडतो. आवारात रवींद्रनाथांचा काव्यवाचन करण्याच्या मुद्रेतला देखणा पुतळा आहे. घराच्या आत मंद आवाजात रवींद्रसंगीत सतत ऐकू येईल अशी व्यवस्था आहे. बाहेरच्या घनदाट वस्तीचा आणि धावत्या जगाच्या कोलाहलाचा विसर पडून संगीताच्या मंद सुरावटी ऐकवत जोरासंखो ठाकुरबारीतले कलादालन आणि संग्रहालय तुम्हाला टागोरांच्या महान व्यक्तित्वाचे रुपेरी कवडसे दाखवते.

* * *

प्रतिभाशाली माणसांमुळे शहराचे नाव होते, सन्मान वाढतो हे खरेच. पण सामान्य माणसांचे समूह सुद्धा आपापल्या परीने शहराला समृद्ध करतात. फार जुन्या काळापासून कोलकात्याला वास्तव्य करणाऱ्या, शहराला आपले म्हणणाऱ्या समाजसमूहांबद्दल पुढील भागांमध्ये.

क्रमश:
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. चित्रपटांचे पोस्टर वगळता सर्व चित्रे लेखकाने स्वत: काढलेली आहेत.)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयलेख

प्रतिक्रिया

नूतन's picture

18 Oct 2019 - 1:21 pm | नूतन

लेख आवडला.

रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी,
भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन
ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 11:01 am | अनिंद्य

उत्तम निवड !
मला पुरुष कंठातली गाणी जास्त आवडतात. :-)

सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

जेम्स वांड's picture

19 Oct 2019 - 10:20 am | जेम्स वांड

त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की.

आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

कुमार१'s picture

18 Oct 2019 - 1:40 pm | कुमार१

लेख आवडला.

सुधीर कांदळकर's picture

19 Oct 2019 - 8:57 am | सुधीर कांदळकर

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

यशोधरा's picture

19 Oct 2019 - 9:37 am | यशोधरा

रवींद्र चिंतन आवडले.

जेम्स वांड's picture

19 Oct 2019 - 10:16 am | जेम्स वांड

एक एक सूत्र पकडून झक्कास उलगडताय सगळं काही, तुफान लेखमाला होतेय.

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 1:44 pm | जॉनविक्क

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_

दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)

क्या बात है...

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 1:47 pm | जॉनविक्क

समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 11:18 am | अनिंद्य

@ जॉनविक्क

रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी.

कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे.
१. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही.

२. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही.

३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात.

४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस's picture

20 Oct 2019 - 8:54 am | प्रचेतस

हा लेखही आवडला.
रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द?

मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

जेम्स वांड's picture

20 Oct 2019 - 10:29 am | जेम्स वांड

महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

प्रचेतस's picture

20 Oct 2019 - 11:04 am | प्रचेतस

अगदी अगदी.
लैच जबरदस्त मालिका होती ती.

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 11:39 am | अनिंद्य

@ प्रचेतस,

.... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ...

होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे.

मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 11:30 am | अनिंद्य

@ जेम्स वांड
@ प्रचेतस
@ यशोधरा
@ सुधीर कांदळकर
@ जालिम लोशन
@ कुमार१
@ जॉनविक्क
@ नूतन

प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 12:50 pm | अनिंद्य

मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ७ – मेरा नाम चिन-चिन-चू - येथे आहे :-

http://www.misalpav.com/node/45585

सुबोध खरे's picture

22 Oct 2019 - 7:09 pm | सुबोध खरे

बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात.

आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत.

आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

चौथा कोनाडा's picture

8 May 2020 - 11:33 am | चौथा कोनाडा

सहमत, सुबोध खरे साहेब !
बंगाली लोकांची नावे सुंदर आणि प्रेमात पाडणारी असतात !

अनिंद्य's picture

22 Oct 2019 - 7:25 pm | अनिंद्य

.... चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात.....

सहमत :-)

अनिंद्य's picture

7 May 2020 - 10:08 am | अनिंद्य

आज ७ मे - कलाशिरोमणी गुरुदेव रवींद्रनाथांचा वाढदिवस !

My Salutes !

गुरुदेवांना आदरांजली
कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे
एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते
<<<<<<<"टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो)
वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते
कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते
आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो
चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

अनिंद्य's picture

7 May 2020 - 9:49 pm | अनिंद्य

प्रतिसादाबद्दल आभार.

..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी .....

सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत.
मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो.

तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत.
Bhanusingher Padavali, Pt. 1
https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic

Bhanusingher Padavali, Pt. 2
https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic

तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का?
तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-)

मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे.
https://www.misalpav.com/node/43651

त्यांनाच विनंती करूयात.

नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे.

जय हो !

हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो.

लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल.

🙏