घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Mar 2017 - 7:38 am

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Mar 2017 - 8:13 am | यशोधरा

लेकरु आणि घुंगरु आवडले.

संदीप-लेले's picture

12 Mar 2017 - 6:58 pm | संदीप-लेले

आणखी एक सुंदर रचना !

सत्यजित...'s picture

15 Mar 2017 - 1:17 am | सत्यजित...

यशोधराजी,फुत्कार धन्यवाद!

पुंबा's picture

15 Mar 2017 - 8:50 pm | पुंबा

अतिशय सुंदर.
आजकाल फार उत्तमोत्तम कविता येताहेत मिपावर.

गौरी कुलकर्णी २३'s picture

20 Mar 2017 - 12:33 pm | गौरी कुलकर्णी २३

आवडली !

सत्यजित...'s picture

21 Mar 2017 - 10:48 pm | सत्यजित...

सौरा,गौरीजी मनःपूर्वक धन्यवाद!