Skip to main content

असं कुठं लिहिलंय?

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 22/08/2025 11:04 या दिवशी प्रकाशित केले.

पेरणा 

मागे वळून बघू नये, 

म्हातार्‍याने चळू नये, 

आठवणीत जळू नये, 

असं कुठं लिहिलंय? 

अवचिता परिमळू नये, 

शरदी मेघांनी पळू नये, 

अवकाळी झरू नये,

 असं कुठं लिहिलंय? 

कातरवेळी झुरू नये, 

कांचनसंध्यी उमलू नये, 

गजरा भाळी माळू नये, 

असं कुठं लिहिलंय?

 एकांताशी बोलू नये, 

भरल्या डोळी डोलू नये, 

ओल्या शब्दीं भिजू नये, 

असं कुठं लिहिलंय?

 उंबऱ्याशी थांबू नये, 

गवाक्षी झांकू नये,

 प्रेमागंधी गंधू नये, 

असं कुठं लिहिलंय? 

सावलीं मागे धावू नये,

 भूतकाळाशी भांडू नये, 

शब्द मागे फिरवू नये , 

असं कुठं लिहिलंय? 

हसू ओठी बांधू नये, 

आंसू कुणाचे पुसू नये, 

सुख दु:ख वाटू नये, 

असं कुठं लिहिलंय? 

जिवंतपणी मरू नये, 

हरवलेलं शोधू नये, 

गुंत्यात गुंतुनी राहू नये , 

असेच म्हणेन. 

आला सांगावा टाळू नये, 

मागे वळून बघू नये.

 शिणियर बेतुक्या

लेखनविषय:

वाचने 2798
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त!

आवडली ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो असे काहीतरी आठवले

​उम्र तो खालिस गिनती है, कोई बंदिश नहीं, ख्वाब बुनने की कोई हद नहीं। गिला ही तो है,कोई रंजिश नही||

हाहाहा..
मागे वळून बघू नये.
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)

मस्तच! कांचनसंध्या , सुंदर शब्द आहे.

वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले: घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय। जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥ 'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?

छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच, . असं कुठे लिहिलंय? ;)

भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे. मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे. अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला. चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.

खूपच सुंदर कविता . खास करून - आला सांगावा टाळू नये, मागे वळून बघू नये.

छान आहे. आवडली.

एकदम सुंदर. ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो हा प्रतिसाद पण खूप आवडला