न्यू यॉर्क : ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 Apr 2017 - 1:28 am

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

न्यू यॉर्क शहरात फिरताना लांब लांबची अंतरे पार करायला सबवे ही फार सोयीची व वेळ वाचवणारी सोय आहे. मात्र, तिचा ९५% पेक्षा जास्त भाग जमिनीखालून जातो. याचा फार मोठा तोटा म्हणजे, न्यू यॉर्क शहर पाहायला आलेल्या बहुसंख्य प्रवाशांना, फक्त शहराच्या दक्षिण टोकावरचे काँक्रिटचे जंगल दिसते व सर्व शहर तसेच असेल असे वाटते. मात्र, जरा जास्त वेळ हाताशी असला आणि बसने प्रवास करता आला तर मात्र शहराच्या वैविध्यपूर्ण इमारती, संस्कृती आणि समाजांचे दर्शन घेता येते. हे आपण एका पुढच्या भागात जरा विस्ताराने बघूच. पण, इथे त्याची आठवण येण्याचे कारण असे की, शहराचा फेरफटका करताना, मॅनहॅटनच्या दक्षिणेकडून उत्तरेकडच्या घरी परतताना, वेळ हाताशी असल्यास, सबवे ऐवजी बसने येणे आम्ही पसंत करत असू. हा पर्याय जवळ जवळ दुप्पट किंवा जास्त वेळ खाणारा होता, पण त्यामुळे शहराच्या विविध रूपांची जी ओळख झाली ती कितीही वर्णने वाचून अथवा फोटो पाहून होणे शक्य नव्हते.

अश्याच एका बसच्या प्रवासात अनपेक्षितपणे एक खास फायदा झाला. अ‍ॅमस्टरडॅम अ‍ॅव्हन्यूवरून परतत असताना अचानक एक प्राचीन शैलीतली भव्य वास्तू दिसली. तिला निरखून पाहण्यात फोटो घेण्याची आठवण झाली नाही. मात्र, तिच्या जवळच्या खाणाखुणांची नोंद करून ठेवली. घरी आल्यावर गुगलबाबावर शोधाशोध केली तेव्हा कळले की ती इमारत म्हणजे तीन ब्लॉक्सच्या भव्य आवारातले तितकेच भव्य चर्च आहे. अर्थातच त्याची माझ्या भेट देण्याच्या गोष्टींच्या यादीत भर पडली. या अनपेक्षित दृश्याने व अचानक केलेल्या निर्णयाने माझ्या या भटकंतीच्या आनंदात मोलाची भर टाकली हे मात्र नक्की.


कॅथेड्रलची भव्य इमारत व तीन ब्लॉक्स व्यापणारे तिचे आवार (मूळ नकाशा जालावरून साभार)


कॅथेड्रलची भव्य इमारत व तिचे तब्बल तीन ब्लॉक्स व्यापणार्‍या आवाराचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

***************

हे १२० वर्षांपेक्षा जास्त जुने चर्च "कॅथेड्रल ऑफ सेंट जॉन द डिव्हाईन" किंवा अधिकृतरीत्या "कॅथेड्रल चर्च ऑफ सेंट जॉन" या नावाने ओळखले जाते. त्याने अ‍ॅमस्टरडॅम अ‍ॅव्हन्यू आणि मॉर्निंगसाईड ड्राइव्ह याच्यामधील १०० ते ११३व्या स्ट्रीट्समधील तब्बल तीन ब्लॉक्सचा ४. ७ हेक्टर (११. ५ एकर) परिसरात व्यापला आहे. हे अँग्लिकन पंथाच्या न्यू यॉर्क विभागाचे (Episcopal Diocese of New York) मुख्य चर्च उर्फ कॅथेड्रल असले तरीही, हे चर्च कोणत्याच एका पंथाला बांधील नाही. त्यामुळे त्याच्या उद्येशांमध्ये वैविध्यपूर्ण धार्मिक विषयांबरोबर अनेक वाङ्मयीन, सांकृतिक, सामाजिक, शैक्षणिक, इत्यादी विषयासंबंधी मुद्दे समान महत्त्वाचे समजले गेले आहेत. इथे प्रार्थना करायला धर्म, पंथ आणि समाजाचे बंधन नाही. थोडक्यात हे चर्च धार्मिक कारणांएवढेच अधार्मिक (सेक्युलर) कारणांसाठी व्यासपीठाचे काम करते. या विविध उद्येशांना धरून येथे वर्षभर चर्चासत्रे, कार्यशाळा, सांगीतिक कार्यक्रम, प्रदर्शने, सामाजिक सभा, इत्यादी आयोजित केले जातात.

सन १८८७ मध्ये, आपल्या कॅथेड्रलची इमारत, सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलशी स्पर्धा करणारी असावी या विचाराने या चर्चच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. सन १८८८ मध्ये एका सार्वजनिक स्पर्धेद्वारे याच्या इमारतीचा बायझेंटाइन-रोमनस्क-पुनरुज्जीवन शैलीतला (Byzantine Romanesque Revival styles) पहिला आराखडा मान्य केला गेला. १८९२ मध्ये सुरुवात झालेल्या बांधकामामध्ये, दोन महायुद्धांच्या काळात मनुष्यबळाची कमतरता झाल्याने खंड पडला. पैशाची चणचण तर पहिल्यापासून सतत पाठपुरावा करत होती आणि ती आजतागायत चालू आहेच. अर्थातच, चर्चचे बांधकाम सतत खंड पडत आणि अत्यंत संथगतीने चाललेले आहे.

चर्चच्या उद्द्येश्यांच्या वैविध्याचा परिणाम इमारतीच्या शैलीवर झाला नसता तरच आश्चर्य होते! त्याचबरोबर, शतकापेक्षा जास्त कालखंडातील बदलत्या विश्वस्तांच्या आवडीप्रमाणे बांधकामाची शैलीही बदलत गेली. १९०९ साली मूळ आराखड्यात बदल करून बांधकामात गोथिक पुनरुज्जीवन शैलीला प्राधान्य दिले गेले. अश्या अनेक बदलांमुळे, या चर्चाचे गर्भगृह गोथिक शैलीत आहे; घुमट रोमनस्क शैलीत आहे; अंतर्गत उपमंदिरे फ्रेंच, इंग्लिश व स्पॅनिश गोथिक शैलीत आहेत; कॉईर स्टॉल्स गोथिक शैलीत आहेत; इमारतीत रोमन कमानी व स्तंभ आहेत; आणि नॉर्मन व बायझेंटाइन शैलीच्या झलका जागोजागी आहेत.

या चर्चच्या इमारतीमध्ये १८९९ साली पहिली प्रार्थना केली गेली. ३० नोव्हेंबर १९४१ रोजी चर्चची इमारत नेहमीच्या वापरासाठी खुली केली गेली आणि आठवड्याभरात जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला व अमेरिका दुसर्‍या महायुद्धात ओढली गेली. त्या काळाच्या बिशपने चर्चच्या इमारतीवर खर्च करण्याऐवजी ते पैसे समाजातील गरजूंसाठी वापरण्याचे ठरवले व बांधकाम मागे पडले. मात्र, चर्चची इमारत अपूर्ण असली तरी, तेव्हापासून काही खंड सोडता, येथे नियमित धार्मिक समारंभ होत आहेत.

पैशाची चणचण या कॅथेड्रलच्या पाचवीलाच पुजलेली आहे असे दिसते. त्यामुळे केवळ त्याचे बांधकामच शतकापेक्षा जास्त वेळ निघून गेल्यावरही अपुरे राहिले आहे असेच नाही तर धार्मिक कार्यक्रमांसाठी आणि मोठ्या आवारात असलेल्या कॅथेड्रलसह इतर इमारतींच्या देखभालीसाठी होणारा खर्च उभा करणे नेहमीच दुरापास्त ठरले आहे. त्यातच, २००१ साली ही इमारत मोठ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यातून सावरून नोव्हेंबर २००८ मध्ये परत सुरू झालेल्या या चर्चची इमारत अजूनही पूर्णपणे बांधून झालेली नाही. पैशाच्या समस्येवर उपाय म्हणून २००८ नंतर आवारातील जमिनीचे दोन तुकडे आधुनिक रहिवासी वापराच्या इमारती बांधण्यासाठी खाजगी विकासकांना दीर्घ मुदतीच्या लीजने दिलेले आहेत. त्यातून दरवर्षी मिळणार्‍या सुमारे $५५ लाख उत्पन्नाने रोजमर्राचा खर्च निभावून नेला जात आहे.

नवीन बांधकाम आणि नुकसानीच्या जीर्णोद्धाराचे काम, ही दोन्ही कामे इथे हातात हात घालून दीर्घकाल चालू आहेत. कॅथेड्रलचा सर्व इतिहास पाहता त्याची इमारत कधीकाळी बांधून पूर्ण होईल काय यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे, या चर्चला गमतीने "सेंट जॉन द अनफिनिश्ड" असे म्हटले जाते! असे असले तरीही, जे काही बांधकाम पूर्ण झाले आहे तेही पूर्णावस्थेतील असंख्य नावाजलेल्या चर्चेसच्या इमारतींना मागे टाकेल यात संशय नाही.

इमारतीचा दर्शनी भाग

सबवेच्या कोलंबिया विद्यापीठ स्थानकावर उतरून ब्रॉडवेवर आलो आणि ११२व्या स्ट्रीटवर वळून काही अंतर गेल्यावर दूरवरून हिरव्या झाडीतून डोकावणारी कॅथेड्रलची इमारत दिसू लागली. तिच्या दर्शनी भागातील फुलाची नक्षी असलेली ४० फूट व्यासाच्या गोलाकार खिडकीने लक्ष वेधून घेतले. मात्र, बाहेरून दिसणार्‍या दगडी कोरीवकामापेक्षा अधिक काही आश्चर्यकारक गुण तिच्यात आहेत जे चर्चच्या इमारतीमध्ये गेल्यावर आपल्याला दिसतात...


कॅथेड्रलचे प्रथमदर्शन

जवळ गेल्यावर या इमारतीचा फोटो काढताना ध्यानात येते की मागे वळून इमारतीसमोरचा भला रुंद अ‍ॅमस्टरडॅम अ‍ॅव्हन्यू ओलांडून परत विरुद्ध बाजूच्या फूटपाथवर गेल्याशिवाय ते शक्य नाही. तेथूनही सर्व इमारत एका फोटोच्या चौकटीत बसवताना बरीच खटपट करावी लागते आणि ते काम जेमतेम साधते...


कॅथेड्रलचा दर्शनी भाग

इतक्या दुरून काढलेल्या फोटोत पूर्ण इमारत बसते पण तिचे स्थापत्य आणि कलाकुसरीचे बारकावे लपून जातात. मग जवळ येऊन एक एक भाग निगुतीने बघून त्याला फोटोत बंदिस्त केल्याशिवाय समाधान होत नाही.

१९८० मध्ये इमारतीच्या दर्शनी भागातल्या दोन मनोर्‍यांच्या आराखड्यापैकी दक्षिणेकडील मनोरा बांधण्याचे काम सुरू झाले. मूळ इमारतीच्या उंचीत १५ मीटरची भर पडल्यावर ते काम थांबविण्यात आले. हा अर्धवट दक्षिण मनोरा आणि न बांधलेला उत्तर मनोरा, ही इमारतीच्या अपूर्णतेची बाह्यरूपी साक्ष आजही आपले लक्ष वेधून घेते...


दर्शनी भागाचा वरचा भाग

दोन्ही मनोरे पूर्ण बांधून झाले असते तर कॅथेड्रल कसे दिसले असते हे इमारतीमध्ये असलेल्या चित्रांवरून आपल्याला पाहता येते...


कॅथेड्रलची इमारत पूर्ण बांधून झाल्यावर ती कशी दिसेल त्याचे चित्र

इमारतीच्या दर्शनी भागात एकूण आठ दरवाजे आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात दोन, त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक आणि त्यांच्या पलीकडे प्रत्येक बाजूला अजून एक दरवाज्यांची जोडी आहे...


दर्शनी भागाचा खालचा भाग

इमारतीच्या जवळ गेल्यावर आपल्याला तिच्या बांधणीतले स्थापत्य, कला आणि धर्मावर आधारीत बारकावे दिसू लागतात. दर्शनी भागाच्या सर्वात मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात काशाचे दोन भव्य दरवाजे आहेत. त्यांना विभागणारा एक खांब आहे व त्यांच्या दोन्ही बाजूंना कोरीव खांबांच्या मालिका आहेत. प्रत्येक दरवाज्यावर स्वतंत्र कोरीव कमान आहे आणि त्यांच्यावरच्या असलेल्या एका सामायिक कमानीत असलेल्या गोलाकारात येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे. दरवाज्यांच्या बाजूच्या खांबांच्या मालिका अर्धगोलाकार पोर्चच्या स्वरूपात आहेत आणि ते खांब वरच्या बाजूला नक्षीदार कमानीत परावर्तित होतात...


मुख्य प्रवेशद्वार

पोर्चच्या खांबांवर ख्रिस्ती संतांची शिल्पे कोरलेली आहेत...

      
मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चचे कोरीव खांब

मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन दरवाज्यांच्या चार फळ्या, प्रत्येकी १८ फू X ६ फू आकाराच्या व ६ टन वजनाच्या आहेत. जगप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याची बांधणी करणार्‍या बार्बेडिएन् (Barbedienne) याच फ्रेंच कंपनीने त्यांची घडण केली आहे. त्यांच्यावर बायबलमधील कथांवर आधारित एकूण ६० ठाशीव चित्रे आहेत...

      
मुख्य प्रवेशद्वारातील दरवाजे (बाहेरून)

मुख्य दरवाजे केवळ खास कार्यक्रमांसाठी उघडले जातात. त्यांच्या बाजूच्या एकेरी दरवाज्यांपैकी एक नेहमीच्या व्यवहारांसाठी वापरला जातो. एकेरी दरवाजे एखाद्या जुन्या वाड्याच्या दरवाज्यांसारखे आहेत. त्यांच्यावरच्या कमानींची नक्षी मात्र कलात्मक होती...

  
मुख्य दरवाज्यांचा बाजूच्या एकल दरवाजा असलेल्या प्रवेशद्वारांपैकी नेहमीच्या वापरात असलेले एक व त्याच्या दरवाज्याची एक फळी

सर्वात बाहेरच्या बाजूंच्या दरवाज्यांच्या जोड्या मात्र शिल्पे व कलाकुसरीने मढवलेल्या आहेत...


उपप्रवेशद्वारांवरील नक्षी ०१


उपप्रवेशद्वारांवरील नक्षी ०२

अंतर्भाग : प्रवेशद्वाराजवळील भाग

बाहेरूनच इतके बघण्यातच बराच वेळ गेल्यावर, "अरे, आता आत जायला हवे! " ही जाणीव झाली! :) उघड्या एकल दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच स्वागतकक्ष दिसला, तेथून माहितीपत्रके उचलली. आतापर्यंतचा इमारतीचा अनुभव आणि माहितीपत्रके पाहून ध्यानात आले की हे प्रकरण नीट समजून घ्यायचे असल्यास, मार्गदर्शकासह सहल करण्याला पर्याय नाही. कर्मधर्मसंयोगाने वीस एक मिनिटात एक सहल सुरू होणार होती. ताबडतोप तिचे आरक्षण केले.


कॅथेड्रल आणि त्याच्या आवाराचा आराखडा (कॅथेड्रलच्या माहितीपत्रकावरून साभार) :
१. मुख्य प्रवेशद्वारातले काशाचे दरवाजे, २. चाळीस फूट व्यासाची वर्तुळाकार 'ग्रेट रोज खिडकी',
३. नाकाशिमाचे 'अल्टार ऑफ पीस' टेबल, ४. पंधराव्या शतकातला 'जर्मन कॉईर स्टॉल', ५. पोएट्स कॉर्नर,
६. द फायरमॅन मेमोरियल, ७. सभागृहातील (नेव्ह) 'पिलग्रिम्स पेव्हमेंट्स'',
८. सभागृहाच्या बाजूच्या भिंतीलगत असलेले चवदा 'थिमॅटिक बेज', ९. पीटर गुर्फेनचे 'फेट ऑफ द अर्थ' कोलाज,
१०. शॅलो डोम, ११. कॅथेड्रलचा सांस्कृतिक व कलापूर्ण वस्तूंचा खजिना (निवडक बार्बेरिनी टेपेस्ट्रीज इथे आहेत),
१२. थायलंडच्या राजाने दिलेल्या भेटवस्तू, १३. द ग्रेट ऑर्गन, १४. बॅप्टिस्ट्री,
१५. मार्टिन ल्यूथर किंग, आईन्स्टाईन, सुसान अँथनी आणि महात्मा गांधी याचे समुहशिल्प,
१६. दोन जपानी क्लॉइसोन व्हासेस, १७. दोन बारा फुटी मेनोराज (वृक्षाकारी कँडल स्टँड),
१८. अल्टारभोवतीचे आठ विक्रमी ग्रॅनाइट स्तंभ, १९. अमेरिकेतील स्थलांतरित समूहाचे प्रतिनिधित्व करणारी सात प्रार्थनामंदीरे (चॅपल्स), २०. 'लाईफ ऑफ ख्राईस्ट' अल्टार पीस, २१. माऊंट रशमोअरवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची शिल्पे कोरणार्‍या शिल्पकाराची कलाकृती.

जगात कोणते कॅथेड्रल सर्वात मोठे आहे याची चर्चा केली जाते तेव्हा हे कॅथेड्रल आणि लिव्हरपूल (इंग्लंड) कॅथेड्रल यांच्यामध्ये निर्णय करणे कठीण होते. काही बाबतीत हे कॅथेड्रल वर आहे तर काही बाबतीत लिव्हरपूलमधिल कॅथेड्रल. ११, २०० चौ मीटर (१, २१, ००० चौ फूट) अंतर्गत क्षेत्रफळ (कार्पेट एरिया) असलेल्या या इमारतीची लांबी १८३. २ मी (६०१ फू) व उंची ७०. ७ मी (२३२ फू) आहे. त्याच्या प्रार्थनागृहाची (नेव्ह) आतून मोजलेली उंची ३७. ८ मी (१२४ फू) भरते.

मुख्य दरवाज्याचा आतील भाग

इमारतीच्या आत गेल्यावर मुख्य दरवाज्याचे वेगळे स्वरूप पाहायला मिळते. त्यांचे आतले पृष्ठभाग घासून पुसून पॉलिश केलेले आहेत. त्यांच्यावर आतही एकूण साठ ठाशीव चित्रे आहेत. मात्र, आत प्रामुख्याने पाने-फुले-पक्षी-प्राणी-चिन्हे इत्यादी वापरून बनवलेली नक्षी आहे...



मुख्य प्रवेशद्वारातील दरवाजे (आतून) : पूर्णाकार दाखवणारे चित्र आणि दोन ठाशीव चित्रे जवळून पाहताना

या दरवाज्यांचा वरच्या कमानीत एक रंगीत काचेची नक्षीदार खिडकी आहे...


कॅथेड्रलच्या दर्शनी भागाच्या अंतर्भागाचा मध्यभाग

रोज खिडकी

या खिडकीवर एक गॅलरी आहे. गॅलरीच्या, डोक्यावरची टोपी (किंवा, हॅट) पडेल इतके, वर पाहिले की बाहेरून दिसलेल्या ४० फूट व्यासाच्या वर्तुळाकार रोज (गुलाब) खिडकीचे आंतरिक मोहक रूप दिसते. तिला रंगीत काचांच्या १०, ००० तुकड्यांच्या नक्षीने सजवलेले आहे. तिच्या मध्यभागातील असलेली ख्रिस्ताची मूर्ती पुर्णाकृती (लाईफ-साइज) आहे. ही आकाराने अमेरिकेतील सर्वात मोठी रंगीत काचांची खिडकी आहे. खूप उंचावर असल्यामुळे या खिडकीचे सौंदर्य जवळून दिसते त्यापेक्षा जरा दूर जाऊन पाहिले की जास्त खुलून दिसते. त्यामुळे, इमारत पाहत पुढे पुढे जाताना सतत मागे वळून पाहण्याचा मोह आपल्याला पडतो...


४० फूट व्यासाची 'द ग्रेट रोज' खिडकी

अंतर्भाग : नेव्ह (Nave)

मुख्य दरवाज्याकडे पाठ करून उभे राहिले की या इमारतीच्या अंतर्भागाच्या भव्यपणाची झलक दिसते...


प्रवेशद्वाराच्या बाजूने दिसणारा कॅथेड्रलचा अंतर्भाग ०१

सभागृहाच्या दोन्ही बाजूचे भव्य स्तंभ आणि छतांवरील नक्षीत रोमन आणि गोथिक शैलीची सरमिसळ आहे...


प्रवेशद्वाराच्या बाजूने दिसणारा कॅथेड्रलचा अंतर्भाग ०२

पण जसजसे आपण पुढे पुढे जातो तेव्हा, ती भव्यपणाची जाणीव पुरेशी नव्हती आणि १८३ मीटरपेक्षा जास्त लांब म्हणजे नक्की किती लांब हे हळूहळू ध्यानात येत जाते!

अल्टार ऑफ पीस

नेव्हमध्ये सर्वप्रथम उजव्या बाजूला असलेले एक भव्य टेबल दिसते. ३०० वर्षे वयाच्या ब्लॅक वॉलनटच्या झाडाच्या खोडापासून बनवलेले हे 'अल्टार ऑफ पीस' नावाचे टेबल सन १९८६ मध्ये नाकाशिमा नावाच्या जगप्रसिद्ध कसबी सुताराने (मास्टर वूडवर्क क्राफ्ट्समन) भेट दिलेले आहे. सात खंडांना अशी सात टेबले देण्याची त्याची इच्छा आहे. आजतागायत त्याने या टेबलाखेरीज, भारत (ऑरोव्हिल, तामिळनाडू, भारत, आशिया मधील हॉल ऑफ पीस) व रशियाला (युरोप) त्याने टेबल भेट दिले आहे...


नाकाशिमाचे 'अल्टार ऑफ पीस'

जर्मन कॉईर स्टॉल्स

त्यापुढे, सभागृहाला (नेव्ह) आडवे छेदणार्‍या भिंतीसारख्या उंच्यापुर्‍या जर्मन कॉईर स्टॉल्सची (चर्चमध्ये संघगान करणार्‍या गायकांना बसण्यासाठीचा बेंच) मागची बाजू दिसते. ही न्यू यॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टने काही कालासाठी कॅथेड्रलमध्ये प्रदर्शित केलेली वस्तू आहे. प्राचीन जर्मन चर्चमधून आणलेल्या शिसूसारख्या काळ्या रंगाच्या लाकडापासून बनलेल्या या पाच शतके जुन्या भरभक्कम बेंचवर प्रत्येक बाजूला सात गायकांना बसण्याच्या जागा आहेत आणि त्या मधल्या आडव्या कलापूर्ण पट्टीने एकमेकाला जोडलेल्या आहेत. त्या पट्टीखालील रुंद प्रवेशद्वारासारख्या जागेतून आपल्याला सभागृहाच्या (नेव्ह) पुढील भागात जाता येते व मागे वळून स्टॉल्स पाहता येतात...


जर्मन कॉईर स्टॉल्स (पार्श्वभूमीवर इमारतीच्या दर्शनी भागाचा अंतर्भाग)

पिल्ग्रिम्स पेव्हमेंट

चर्चच्या जमिनीवरील टाइल्स भाविकांनी दान केलेल्या पैशातून बसवलेल्या आहे त्यामुळे त्यांना 'पिल्ग्रिम्स पेव्हमेंट' असे म्हणतात. जमिनीच्या मध्यभागी असलेल्या काळ्या टाइल्सच दोन पट्ट्यांमध्ये ख्रिस्ताशी संबंधीत अथवा त्याने भेट दिलेल्या धर्मक्षेत्रांची प्रतिनिधित्व करणारी काशाची पदके (मेडॅलियन्स) आहेत...

  
  
  
सभागृहाच्या (नेव्ह) जमिनीच्या मध्यभागी असलेली काशाच्या पदकांपैकी काही


अजून एक खास पदक

थिम्ड बेज (विषयवार लघुविभाग)

नेव्हच्या दोन्ही बाजूच्या भिंतीलगत प्रत्येक बाजूला सात असे एकूण चौदा चौकोनी विभाग (बेज) आहेत. त्यातला प्रत्येक एका व्यवसायाला किंवा मानवी आयुष्याशी संबंधीत विषयाला वाहिलेला आहे आणि तेथे त्या विषयाशी संबंधीत वस्तू किंवा कलाकृती प्रदर्शित केलेल्या आहेत. अल्टारकडे पाहत असताना उजव्या बाजूला क्रमाने संतमहात्मे (ओला सेंट्स), कामगार, संचार, वैद्यकशास्त्र, पृथ्वी आणि सैन्य असे विभाग आहेत; तर डावीकडे खेळ, बनलेल्या (क्रूसेडर्स), शिक्षण, कायदा, अँग्लिकन आणि अमेरिकन असे विभाग आहेत. या विषयांच्या निवडीवरून या चर्चच्या सर्वसमावेशक व निधर्मी (सेक्युलर) उद्येशांच्या प्रामाणिकपणाची कल्पना येते.

त्यातील काही विभागांची प्रकाशचित्रे...


ऑल सेंट्स बे

अर्थ बे मध्ये पीटर गुर्फेन नावाच्या कलाकाराने बनविलेले २४ कांस्यपट्टीकांचे कोलाज आहे. प्रत्येक पट्टीकेवर पर्यावरणाच्या हानीच्या वेगवेगळ्या प्रकाराचे (जंगलांचा ऱ्हास, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, इत्यादी) दृश्य आहे...


अर्थ बे मधले पीटर गुर्फेनचे 'फेट ऑफ द अर्थ' कोलाज


मिलिटरी / आर्म्ड फोर्सेस बे

     
लेबर बे, लॉ बे आणि मेडिसिन बे

अंतर्भाग : क्रॉसिंग

नेव्ह ओलांडून आपण क्रॉसिंग नावाच्या दालनात प्रवेश करतो...


अल्टारच्या बाजूने क्रॉसिंगमधून मागे वळून घेतलेल्या या फोटोत क्रॉसिंगचा काही भाग आणि नेव्ह दिसत आहेत. दूरवर जर्मन कॉईर स्टॉल्स व त्यांच्या वर दर्शनी भागातल्या दोन रंगीत काचांच्या खिडक्या दिसत आहेत, यावरून इमारतीच्या दालनांच्या भव्यतेची कल्पना येते.

शॅलो डोम

नेव्ह ओलांडून आपण क्रॉसिंग नावाच्या पुढच्या दालनात येतो. कॅथेड्रलचा पुढचा (नेव्ह) व मागच्या (कॉइर व अल्टार) भागांना जोडणाऱ्या या विशाल चौकोनी भागाला क्रॉसिंग असे म्हणतात. हा भाग सर्वात शेवटी बांधायला घेतला होता. तो कसा असावा यासंबंधी मतभेद होते. याच्यावर असलेला घुमट (शॅलो डोम) हा केवळ तात्पुरते छप्पर म्हणून सन १९०९ मध्ये घाईघाईत केवळ १५ आठवड्यांत बांधला गेला. त्यानंतर काहीच काम शक्य न झाल्याने तो आजही तसाच शेवटचा हात न फिरवलेल्या अपूर्ण अवस्थेत आहे. या डोमची उंची इतकी आहे की त्याच्या खाली (पाया सोडून) स्वातंत्र्यदेवतेची अख्खी मूर्ती ठेवता येईल!...


क्रॉसिंगवरचा अपूर्ण शॅलो डोम

क्रॉसिंगला पुढे नेव्हला व मागे कॉईर व अल्टार असलेल्या भागाला सांधणारे जोडकामही अर्धवट अवस्थेत आहे...


क्रॉसिंगला इतर भागांशी सांधणारे अर्धवट राहिलेले (फिनिशिंग न केलेले) जोडकाम

लाईफ अँड डेथ

जगातल्या इतर कोणत्याही चर्चमध्ये किंवा कोणत्याच देवस्थानात नसणारे वैशिष्ट्य येथे आहे. ते म्हणजे टॉम ऑटर्नेस नावाच्या कलाकाराची मानवी सापळ्यांचे आकार वापरून बनवलेली "लाईफ अँड डेथ" नावाची कलाकृती. क्रॉसिंगशी नेव्ह आणि कॉइर्सला असलेल्या जोडांच्या जागी असलेल्या खांबांच्या बरोबरीने असलेल्या चार स्तंभांच्या स्वरूपात ही कलाकृती येथे आहे. देवस्थानात मानवी सापळे हा अस्थायी विषय प्रदर्शित करणार्‍या या कलाकृतीला, अर्थातच, अनेकांनी आक्षेप घेतला. पण तरीही २०१५ पासून अजून तरी ती तेथे दिमाखाने टिकून आहेत!...

     
टॉम ऑटर्नेसच्या "लाईफ अँड डेथ" कलाकृतीचे काही भाग

कलाकृतींचा खजिना

क्रॉसिंगच्या मध्यभागात प्रवचन ऐकणार्‍या भाविकांसाठी खुर्च्या आहेत. खुर्च्यांच्या सभोवतीच्या मोकळ्या जागेवर आणि क्रॉसिंगच्या भिंतींवर, कॅथेड्रलच्या मालकीच्या अनेक प्राचीन वस्तूंचा व कॅथेड्रलला भेट मिळालेल्या अर्वाचीन कलावस्तूंचा, कायमस्वरूपी संग्रह प्रदर्शित केलेला आहे. प्रार्थनेची वेळ सोडून इतर वेळी इथे भेट देणार्‍यांना मोकळेपणाने फिरून या वस्तू जवळून पाहता येतात. काही कलाकार व कलेचे विद्यार्थी त्यांची रेखाचित्रे काढताना दिसले.

बार्बेरिनी टॅपेस्ट्रीज

या चर्चचे एक खास वैशिष्ट्य असे की त्याच्याकडे अनेक कलापूर्ण वेलबुट्टी काढलेली प्राचीन वस्त्रे व गालिचे (tapestry) आहेत. त्यांच्यावरच्या धार्मिक प्रसंगापासून ते राफाएलच्या व्यंगचित्रांपर्यंत वैविध्य आहे. या संग्रहात, १७ व्या शतकात रोममधील पोपच्या मालकीच्या मागांवर ख्रिस्ताच्या जीवनातले प्रसंग विणलेली बार्बेरिनी प्रकारची वस्त्रे आहेत. चर्चच्या या अनमोल खजिन्याची जपणूक करण्यासाठी, चर्चमध्ये जागतिक कीर्तीची वस्त्र-जतन प्रयोगशाळा (Textile Conservation Lab) आहे. ती जगभरच्या संस्थांना व खाजगी संग्राहकांनाही प्राचीन वस्त्रजतनाच्या कामात मदत करते.


  
बार्बेरिनी टॅपेस्ट्रीजपैकी काही

जुनी धार्मिक चित्रे


जुनी धार्मिक चित्रे

    
क्रॉसिंगमधील इतर काही कलाकृती

अंतर्भाग : कॉईर्स

क्रॉसिंग ओलांडून पुढे गेल्यावर लागणार्‍या पायर्‍या चढून गेल्यावर कॉईर्सचे भव्य दालन लागते.

कॉईर्स व द ग्रेट ऑर्गन

कॉईर्स दालनाचा दोन बाजूंना संघगायकांना बसण्यासाठी शिसूसारख्या गडद तपकिरी-काळ्या रंगाच्या लाकडाच्या कोरीव खुर्च्यांच्या रांगा आहेत. या खुर्च्यांची कलाकारी बघण्यासारखी आहे.

कॉईर्सच्या खुर्च्यांच्या मागे कॅथेड्रलचा द ग्रेट ऑर्गन आहे. जागतिक कीर्तीचा ऑर्गनबिल्डर अर्नेस्ट स्किनरने १९०६ मध्ये हा ऑर्गन त्याच्या कंपनीच्या सर्वात भव्य १५० ऑर्गन बनवण्याच्या (Opus 150) प्रकल्पांतर्गत बनवला. या कॅथेड्रलच्या मालकीच्या पाच ऑर्गन्सपैकी हा सर्वात मोठा आहे. सन १९५४ मध्ये त्याचा विस्तार करून त्याला अजून मोठा केले गेले. यातील १३० सेमी (५० इंच) आकाराचा 'ऑर्गन स्टॉप' जगातला सर्वात जास्त ताकदवान हवेचा दाब निर्माण करणारा आहे. २००१ सालच्या आगीत याचे बरेच नुकसान झाले होते, पण त्याचे आता पुनर्निर्माण केले गेले आहे. शिसपेन्सिलइतक्या लहान आकारापासून ३२ फूट उंचीच्या आकाराइतके भव्य, एकूण ८, ५०० पाइप्स असलेल्या या ऑर्गनची सद्याची किंमत $८० लाखापेक्षा जास्त आहे.


कॉईर्सचे दालन आणि त्या पलीकडे दिसणारे अल्टारचे दालन


कॉईर्समधिल गायकांना बसण्यासाठी असलेल्या कलापूर्ण खुर्च्या आणि त्यांच्या मागील 'द ग्रेट ऑर्गन'चा एक भाग

कॉईर्सच्या चौथर्‍यावरील शिल्पे

सन २००१ मध्ये पूर्ण झालेल्या कॉइर्सच्या चौथर्‍यावर ख्रिस्ती धर्माच्या जन्मापासूनच्या २००० वर्षांतल्या प्रत्येक शतकाचे प्रतिनिधित्व करणार्‍या जागतिक स्तराच्या नेत्यांची शिल्पे आहेत. तेथील मार्टीन ल्यूथर किंग, अल्बर्ट आईन्स्टाईन, सुसान अँन्थनी आणि महात्मा गांधी याचे २० व्या शतकाचे प्रतिनिधित्व करणारे समुहशिल्प आपले लक्ष वेधून घेते...

  
कॉईर्सच्या चौथर्‍यावरील काही शिल्पे : (अ) डावीकडील चित्रातली शिल्पे (घड्याळाच्या क्रमाने) : विल्यम शेक्सपियर, जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन व ख्रिस्तोफर कोलंबस; (आ) उजवीकडील समुहशिल्प (डावीकडून क्रमाने) : मार्टीन ल्यूथर किंग, अल्बर्ट आईन्स्टाईन, सुसान अँन्थनी आणि महात्मा गांधी

अंतर्भाग : हाय अल्टार

कॅथेड्रलमधील अल्टार हे सर्वात उंचावरचे दालन आहे. तेथे पोचायला कॉईर्समधून दहाएक पायर्‍या चढून वर जावे लागते. अल्टारभोवती ८ स्तंभांची अर्धगोलाकार रचना आहे. त्या स्तंभांना जोडणार्‍या कठड्यांनी अल्टारचे दालन बनले आहे. प्रत्येक स्तंभाची उंची ५५ फू (१६. ७६ मी), व्यास ६ फूट आणि वजन १३० टन आहे. प्रत्येक स्तंभ एकाच शीळेतून कोरलेला आहे. आकारमान आणि वजनाच्या परिमाणांत पाहिले तर स्तंभामध्ये हा एक जागतिक विक्रम समजला जातो...


अल्टारच्या मागून एका बाजूने घेतलेल्या फोटोत दिसणारे विक्रमी स्तंभ

अल्टारवर असलेल्या वस्तूंत काही खास कलाकुसरीच्या वस्तू पाहण्यासारख्या आहेत :

मेनोरा (Menorah) : मेनोरा म्हणजे मेणबत्त्यांचा झाडाच्या फांद्यांसारख्या आकाराचा स्टँड. न्यू यॉर्क टाईम्सचा प्रकाशक अ‍ॅडॉल्फ ऑखने भेट दिलेले दोन १२ फूट उंचीचे दोन कलापूर्ण मेनोरा येथे आहेत.

क्लॉईसोन प्रकारच्या जपानी व्हासेस : सन १९२६ मध्ये तत्कालीन जपानी राजदूताने त्याच्या देशातर्फे दोन कलापूर्ण क्लॉईसोन व्हासेस कॅथेड्रलला भेट दिल्या. त्यांच्यावरच्या नक्षीमध्ये हिबिस्कस मुताबिलिस उर्फ कॉन्फेडेरेट रोज या फुलांची आणि जपानमधील काही पक्षांची चित्रे आहेत.


अल्टारचे दालन

अंतर्भाग : चॅपल्स ऑफ द टंग्ज (Chapels of the Tongues, भाषांची मंदिरे)

अल्टारच्या सभोवती अर्धगोलाकारात सात चॅपल्स आहेत. १९व्या शतकात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या सात लोकसंघांच्या नावे ही चॅपल्स उभारलेली आहेत, ते संघ असे आहेत (उत्तर ते दक्षिण) : स्कँडिनेव्हिया, जर्मनी, ब्रिटन, पूर्व युरोप, आशिया, फ्रान्स, इटली आणि स्पेन. विविध लोकसंघांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या चॅपल्सच्या बांधकामांच्या शैलीत नॉर्मन पासून हाय रिनेसाँपर्यंतचे वैविध्य आहे. तेच वैविध्य त्यांच्यामधील धार्मिक वस्तू व इतर कलाकृतींत प्रतीत होते.

प्रत्येक चॅपलमध्ये बघण्यासारखे इतके आहे की तेथील सर्व बारकावे पाहण्यास प्रत्येकी पंधरा मिनिटेही कमी पडतात. प्रत्येक चॅपलचे वर्णन करणे विस्तारभयास्तव टाळत आहे. परंतू तेथे काढलेली काही प्रकाशचित्रे काही प्रमाणात त्यांच्या वैविध्यपूर्ण कलात्मकतेची झलक दाखवू शकतील...


चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०१

     
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०२

     
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०३

     
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०४

     
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०५

     
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०६

चर्चचे काही सभासद आपले मृतदेहाचे दफन न करता दहन करणे पसंत करतात. अश्या लोकांच्या अस्थी साठवून ठेवण्याची सोय एका दालनात केलेली आहे...


मृतदेहाच्या दहनानंतर अस्थी साठविण्यासाठी असलेली खोली

अंतर्भाग : गॅलरी

तब्बल ७० मीटर उंची असलेल्या कॅथेड्रलच्या इमारतीच्या अंतर्भागाच्या चारी बाजूंना नक्षीदार कठडे असलेली गॅलरी आहे. गॅलरीतून फिरण्यासाठी मार्गदर्शकासह असलेली एक खास "व्हर्टिकल टूर" दर शुक्रवारी सकाळी असते असे कळले. तेथून कॅथेड्रलचा अंतर्भाग (विशेषतः वरच्या बाजूला असणार्‍या रंगीत काचांच्या खिडक्या), कॅथेड्रलचे अ‍ॅटिक आणि बाह्यपरिसराचे विहंगम दृश्य निश्चितच मनोहारी असणार. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असलेल्या दिवशी कॅथेड्रलच्या अर्धवट बांधलेल्या मनोर्‍यावरून जवळ जवळ ११ किमी दूर असलेल्या 'वन वर्ल्ड सेंटर'चा मनोरा दिसतो. मी तेथे बुधवारी गेलो होतो, त्यामुळे मला "व्हर्टिकल टूर" मध्ये जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, कॅथेड्रलच्या जमिनीवरून होणारे गॅलरीचे दर्शन घेऊन आनंद मानावा लागला...

    
कॅथेड्रलच्या जमिनीवरून दिसणारी गॅलरी (डावीकडील व मधले चित्र) व तिच्या खालचा पॅसेज (उजवीकडचे चित्र)

कॅथेड्रलचे आवार : पीस गार्डन

चर्चच्या दक्षिणेला असलेल्या आवारात "पीस गार्डन" नावाची बाग आहे. या बागेत बायबलमध्ये उल्लेख केलेल्या सर्व वनस्पती लावलेल्या आहेत, म्हणून तिला "बिब्लिकल गार्डन" असेही म्हणतात. ग्रेग वॉट याने १९८५ मध्ये न्यू यॉर्क धार्मिक प्रभागाच्या (Diocese of New York) स्थापनेच्या द्विशतकी वर्धापनदिनानिमित्त बनवलेले "पीस फाउंटन" येथील एक मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. या कारंज्याच्या शिल्पामध्ये, सैतानाचा पराभव केल्यानंतर आर्चएंजल मायकेल शिल्पातील नऊपैकी एका जिराफाला कवटाळताना दिसतो. सैतानाचे उडवलेले मुंडके मायकेलच्या पायाशी पडलेले आहे. याशिवाय एक सिंह आणि मेंढीचे कोकरू आहे. कारंज्याचा आवर्तणारा पायथा (spiraling base) डिएनएच्या डबल हेलिक्सचे प्रतिनिधित्व करतो...


पीस फाउंटन


पीस फाउंटन आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारे कॅथेड्रलचे दक्षिणेकडील बाह्यस्वरूप

चर्चच्या परिसरातल्या बारावी पर्यंतच्या (K-12) विद्यार्थ्यांनी बनवलेल्या काशाच्या शिल्पकृती कारंज्याच्या भोवती मांडलेल्या आहेत. त्यांना 'Children’s Sculpture Garden' असे म्हणतात...

  
चिल्ड्रेन्स स्कल्प्चर गार्डनमधील दोन शिल्पे

सकाळची अर्ध्या दिवसाची म्हणून सुरू केलेली ही सहल संपली आणि मगच घड्याळाकडे लक्ष गेले. साडेचार वाजून गेले होते. सहल चालू होती तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली आहे हे पण ध्यानात आले नव्हते. मात्र, परतीचा प्रवास सुरू झाला आणि थकलेले पाय व भुकेले पोट यांनी जोरदार निदर्शने सुरू केली. सबवेकडे जाताना कोलंबिया विद्यापीठासमोरचे एक चांगलेसे रेस्तराँ पाहून त्याला राजाश्रय दिला आणि भरल्या मनाने आणि पोटाने घराकडे मार्गक्रमण सुरू केले.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2017 - 1:47 am | पिलीयन रायडर

काका!

साष्टांग दंडवत!!!!!

अहो किती तपशीलवार लिहीता तुम्ही. एखाद्या जागेचा सं पु र्ण अभ्यास होतो!

मलाही हे चर्च अनपेक्षितरित्या सापडले. सेंट्रल पार्कच्या सर्वात वरच्या टोकाला गेलो असता लांबुनच ह्या चर्चचे वरचे सुळके दिसले. खरंच अत्यंत सुरेख चर्च आहे.

बसने फिरण्याशी सहमत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2017 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

न्यू यॉर्कच्या डाउनटाउनच्या गजबजाटापासून दूर असलेले हे चर्च बहुतेक प्रवाश्यांच्या यादीत नसतेच. अपर मॅनहॅटनच्या बस सहलीत तेथे नेतात... पण बहुतेक बसमधूनच दाखवतात.

मात्र, तेथे थांबून निगुतिने बघता आले तर ही जागा अनेक प्रकारे पर्यटन खजिना आहे यात वाद नाही !

पद्मावति's picture

15 Apr 2017 - 2:10 am | पद्मावति

वाह!

माहितीपूर्ण भाग. फोटोही मस्त! खूप भव्य दिसतंय हे कॅथेड्रल.

प्रचेतस's picture

15 Apr 2017 - 8:31 am | प्रचेतस

अत्यंत भव्य.
हा भागही अत्यंत सुरेख झालाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2017 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !