न्यू यॉर्क : १८ : सेंट्रल पार्क-२

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
18 Nov 2016 - 10:58 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

बेथेस्डा परिसराचे निरीक्षण करत बसून काही काळ पायांना विश्रांती दिली आणि पार्कच्या मानवनिर्मित जंगलातून पुढची वाटचाल सुरू केली...

बल्वडिअर कॅसल (Belvedere Castle)

ही गोथिक आणि रोमनेस्क स्थापत्यशात्रांचा संगम असलेली गढी सेंट्रल पार्कमधील दोन क्रमांकाच्या उंचीच्या टेकाडावर व एका तलावाच्या काठावर बांधलेली आहे. ग्रॅनाइट दगड वापरून बांधलेली मुख्य गढी, तिच्यापासून जरा दूर शंकूच्या आकाराचे छप्पर असलेला टॉवर आणि सभोवती एक कठडा असलेला उंच निरीक्षण चौथरा आहे. तेथून दिसणार्‍या पार्क व मॅनहॅटनच्या उंच इमारतींचे पॅनोरॅमिक दृश्यावरून गढीचे बल्वडिअर (इटॅलियन भाषेत, सुंदर दृश्य) हे नाव पडले आहे.


तलावाच्या विरुद्ध किनार्‍यावरून दिसणारे गढीचे सुंदर दृश्य

असे असूनही ही सुंदर जागा सुरुवातीला सेंट्रल पार्क वेदर स्टेशनला दिली गेली आणि पर्यटकांना सुंदर अनुभवापासून वंचित ठेवले गेले. काही काळाने हवामानाचा अंदाज करण्याच्या सुधारलेल्या यंत्रणांमुळे या जागेची गरज संपली व तिला पडीक ठेवले गेले. मात्र, १९८३ मध्ये तिचा जीर्णोद्धार करून नवीन हवामानविषयक यंत्रासाठी टॉवर राखून ठेवून इतर भाग पर्यटकांसाठी खुला केला गेला. त्यामुळे पर्यटकांसाठी पार्कमध्ये एक सुंदर आकर्षण निर्माण झाले. अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांत या गढीचे चित्रण केले गेले आहे.

गढीकडे जाणार्‍या रस्त्यावर इतकी दाट झाडी वाढली आहे की ती दुरून सर्व बाजूंनी सहजी दिसत नाही. पण हिरवाईत लपलेल्या तिची जागा गूगलची मदत घेऊन शोधून काढलीच...


झाडीत लपलेली गढी

गढीवर नेणार्‍या पायर्‍या चढून निरीक्षण चौथर्‍यावर आलो तेव्हा पाश्चात्त्य परिकथेतील गढीत गेल्यासारखे वाटले...


गढीच्या इमारतीत फारसे बघण्यासारखे नाही. एक आठवणवस्तूंचे दुकान व एक छोटे रेस्तराँ आहे. मात्र निरीक्षण मनोर्‍यावरून दिसणारे विहंगम नजारे मनमोहक होते. त्यातले काही खालील चित्रांत पाहता येतील...


निरिक्षणमनोर्‍यावरून दिसणारा तलाव; त्याच्या शेजारचे ग्रेट लॉन व त्याच्यावर पिकनिक साजरा करणारे लोक; आणि दूरवर दिसणार्‍या गगनचुंबी इमारती


निरिक्षणमनोर्‍यावरून दिसणारे देलाकोर्ट खुले थिएटर

१८०० आसनक्षमतेच्या देलाकोर्ट थिएटरमध्ये आतापर्यंत शेक्सपियरच्या नाटकांचे १५० पेक्षा जास्त मोफत प्रयोग सादर केले गेले आहेत.

स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटर

गढीच्या पायर्‍या उतरल्या की आपण पार्कच्या एका फुलझाडांनी भरलेल्या विभागात प्रवेश करतो. त्यात एक जुन्या लाकडी घरासारखी दिसणारी इमारत आहे. ही स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटरची इमारत स्वीडनने पार्कला १८७६ मध्ये दिलेली भेट आहे. येथे मुलांसाठी बनवलेल्या जुन्या गाजलेल्या आणि नवीन नाटकांचे प्रयोग होतात...


शेक्सपियर गार्डन

मॅरिओनेट थिएटरच्या जवळच ४ एकर जागेवर एक बाग आहे. १९१३ मध्ये निर्माण केलेल्या या बागेचे वैशिष्ट्य असे की येथे शेक्सपियरच्या कवितांत आणि नाटकांत उल्लेख आलेल्या फुलझाडांची आणि इतर वनस्पतींची लागवड केलेली आहे. लागवडीची रचनाही नाटककाराच्या मूळ इंग्लिश गावाच्या परिसरातील बागांप्रमाणे केलेली आहे. १९१६ मध्ये शेक्सपियरच्या त्रिशतकी निर्वाणवर्षी या बागेचे नाव शेक्सपियर गार्डन असे ठेवले गेले.

सेंट्रल पार्कच्या इतिहासातील अनास्थेच्या काळात ही बागही दुर्लक्षित होऊन १९७० पर्यंत तिची पूर्ण दुर्दशा झाली. १९७५ मध्ये नागरिकांच्या स्वयंसेवी संस्थांनी तिच्या पुनर्निर्माणाच्या कामाची सुरुवात केली. त्यानंतर सेंट्रल पार्क काँझरवेटरीने ते काम हातात घेऊन, तेथे अनेक फुलझाडांची पुनर्लागवड करून, १९८७ पर्यंत तिला तिचे मूळ वैभव प्राप्त करून दिले.

या बागेतल्या काही वैशिष्ट्यपूर्ण फुलांची प्रकाशचित्रे...

  
  
  
शेक्सपियर गार्डनमधली काही फुले

बागेतून पुढे निघालो आणि घ्यानात आले की जेमतेम अर्धाच पार्क बघून झाला आहे. आणि तेही आम्हाला महत्त्वाची न वाटणारी आकर्षणे गाळून पुढे जात असल्याने जमले होते ! वाटेत नावाप्रमाणेच विस्तीर्ण असलेले "ग्रेट लॉन" लागले. या अंडाकृती जागेवर विविध खेळांची सहा मैदाने आहेत. असे असूनही त्या मैदानांमधल्या व भोवतालच्या हिरवळीत अनेक मोठमोठी दाट छाया देणारी झाडे आहेत. आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असल्याने भरगच्च गर्दी होती. बरेच गट मोक्याच्या जागा पकडून मैदानांवर खेळत होते, हिरवळीवर खेळत होते, बसून गप्पा मारत होते, तर काहींनी मस्तपैकी ताणून दिली होती...


चार वाजत आले होते. त्या विस्तीर्ण हिरवळीवर एक कमी गजबजाटाची झाडाच्या सावलीतली जागा शोधणे फारसे कठीण गेले नाही. मग काय, आम्ही तिच्यावर हक्क प्रस्थापित करून मोकळेपणे हिरवळीवर पसरून ताणून दिली ! अर्ध्या पाऊण तासांच्या डुलकीने ताजेतवाने होऊन परत वाटचाल सुरू केली. पुढचा थांबा होता क्लिओपात्राज नीडल्.

क्लिओपात्राज नीडल्

प्राचीन इजिप्तमधून पाश्चात्त्य जगात आणलेल्या आणि लंडन, पॅरिस व न्यू यॉर्क शहरात पुरर्स्थापित केलेल्या तीन दगडी स्तंभांना (ओबेलिस्क) क्लिओपात्राज नीडल् या लोकप्रिय नावाने संबोधले जाते. हे प्रत्येकी साधारण २१ मीटर उंच व १८० टन वजनाचे आहेत. या स्तंभांना प्राचीन इजिप्तमध्ये अनंतत्वाची आणि अमरत्वाची खूण समजले जात होते. प्राचीन इजिप्तमध्ये हे स्तंभ दोन जोड्यांच्या रुपाने उभारले गेले होते. लंडनचा व न्यू यॉर्कचा स्तंभ एका जोडीतील आहेत. पॅरिस येथील स्तंभाचा जुळा भाऊ इजिप्तमधील लुक्झॉर येथे आहे.

फॅरो थुत्मोज-III याने हेलिओपोलिस येथील रा (सूर्यदेव) मंदिराच्या आवारात इ स पूर्व १४२५ मध्ये या स्तंभांची सर्वप्रथम उभारणी केली. त्यांच्यावरची प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीतील अक्षरे (हायरोग्लाफिक्स) साधारण २०० वर्षांनंतर फॅरो रामसेस-II याच्या कारकीर्दीत त्याच्या युद्धविजयांची स्तुती नोंदण्याखातर कोरली गेली. या सनावळी पाहता, सेंट्रल पार्कमधील स्तंभ ही न्यू यॉर्क शहरातील सर्वात जुनी वस्तू मानवनिर्मित वस्तू आहे.

रोमन सम्राट ऑगस्ट्स सीझरच्या काळात इजिप्त रोमन साम्राज्याचा भाग होता. त्या काळापर्यंत हे स्तंभ आदवे होऊन रेतीखाली गाडले गेले होते. ऑगस्टसने इ स पूर्व १२ मध्ये या स्तंभांना वाळूतून काढून इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरातील सिझेरियम नावाच्या इमारतीसमोर ज्यूलियस सीझरच्या स्मरणार्थ उभारले. सिझेरियम ही इमारत प्रसिद्ध इजिप्शियन राणी क्लिओपात्रा-VII हिने मार्क अँटनी याच्या नावाने देऊळ म्हणून बांधली होती. या इतिहासामुळे या स्तंभांना क्लिओपात्राज नीडल् असे नाव पडले आहे.

न्यू यॉर्क शहरातला स्तंभ तेथे कसा पोचला याबाबत दुमत आहे. स्तंभाजवळ कोरलेल्या पाटीप्रमाणे इस्मेल पाशा या इजिप्तमधील सत्ताधार्‍याने हा स्तंभ शहराला भेट दिला. तर काहींच्या मते विल्यम वांडरबिल्ट या प्रसिद्ध अमेरिकन व्यापार्‍याने तो चलाखीने हस्तगत केला व अमेरिकेत आणला. हा अवजड स्तंभ इजिप्तमधून अमेरिकेत आणणे हा एक मोठा प्रकल्प होता. त्याची सेंट्रल पार्कमध्ये १९८० साली उभारणी केली गेली.

आजूबाजूच्या घनदाट झाडीमुळे या २१ मीटर उंचीच्या स्तंभाचे ठिकाण शोधायला गूगलची जराशी मदत घ्यावीच लागली. मात्र जवळपास आल्यावर झाडीतून डोकावणार्‍या क्लिओपात्राच्या सुईचे दर्शन झाले व तिच्या दिशेने निघालो...

  
क्लिओपात्राज नीडल् ०१ व ०२ : प्रथमदर्शन व जवळून दर्शन

त्याच्या जवळ जाऊन आजूबाजूला फिरत त्याच्या प्रत्येक बाजूवर कोरलेले शिलालेख पाहता येतात. हायरोग्लाफीक्स न वाचता येणार्‍या बहुसंख्य पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांचे भाषांतर प्रत्येक बाजूस असलेल्या ब्रॉझच्या पट्ट्यांवर कोरलेले आहे. तो बहुतेक सर्व मजकूर फॅरोंची स्तुती आणि त्याच्या युद्धातल्या विजयांची वर्णने आहेत...


स्तंभाच्या एका पृष्ठभागावरची हायरोग्लाफिक्स व त्यांचे इंग्लिश भाषांतर

फॅरोच्या स्तुत्या वाचून त्याला "वा, वा" अशी दाद देत पुढे वाटचाल सुरू केली. या सुईच्या बाजूलाच मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट आहे. पण पुरेश्या वेळे अभावी त्याला दुरूनच "हाय" म्हणून पुढे निघालो. थोड्याच वेळात एक विशाल तलाव लागला.

जॅक्लीन केनेडी ओनासिस (जेकेओ) रिझर्वायर

१८५८ ते १८६२ या कालखंडात निर्मिलेला हा ४३ हेक्टर (१०६) एकर क्षेत्रफळाचा मानवनिर्मित तलाव ३८ लाख घनमीटर पाण्याची साठवण करतो. १९९३ पर्यंत याचे पाणी मॅनहॅटनच्या लोकवस्तीसाठी वापरले जात असे. पण हल्ली त्याचे पाणी केवळ पार्कसाठी आणि पार्कमधल्या इतर मानवनिर्मित तलावांत पाणी भरण्यासाठी वापरले जाते. पूर्वी (आणि आताही स्थानिक लोकांमध्ये) केवळ सेंट्रल पार्क रिझर्वायर या नावाने या तलावाची ओळख आहे. न्यू यॉर्क शहराच्या विकासात श्रीमती केनेडी ओनासिस यांनी केलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ या तलावाचे नाव १९९४ मध्ये जॅकलिन केनेडी ओनासिस (जेकेओ) रिझर्वायर असे बदलले गेले.


जेकेओ रिझर्वायर ०१

तलावाच्या काठाने सुंदर झाडी व फुलझाडांची लागवड केलेला रूंद धावण्याचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) बनवलेला आहे. मॅनहॅटनकर त्याचा पुरेपूर उपयोग करताना दिसले. या तलावाच्या किनार्‍याजवळील १०४० फिफ्थ अ‍ॅव्हन्यू येथे श्रीमती केनेडी ओनासिस यांचा निवास होता व तेथून जवळ असलेल्या तलावाच्या किनार्‍यावर त्या धावण्याचा व्यायाम करसाठी येत असत. आम्हीही उजव्या किनार्‍यावरील धावण्याच्या मार्गावरून पुढे चालू लागलो...


जेकेओ रिझर्वायर ०१ : अल्याडच्या किनार्‍यावरून चालताना


जेकेओ रिझर्वायर ०१ : पल्याडच्या किनार्‍यावरचे दृश्य

काही वेळाने उजवीकडील ५व्या अ‍ॅव्हन्यूवर नेणारा जोडरस्ता दिसला. त्यावरून चालत ५वा अ‍ॅव्हन्यू पकडून एका बाजूला पार्क व एका बाजूला अ‍ॅव्हन्यूची मजा बघत पुढे निघालो. वाटेत अ‍ॅव्हन्यूपलिकडचे "म्युझियम ऑफ द सिटी ऑफ न्यू यॉर्क" दिसले. साडेसहा वाजले होते, संग्रहालय बंद झाले होते. उघडे असते तरी ते बघायला ताकद उरली नसल्याने पुढे चालत राहिलो...


म्युझियम ऑफ द सिटी ऑफ न्यू यॉर्क

काँझरवेटरी गार्डन

आता बस पकडून घरी निघावे असा विचार करत बसथांब्याकडे जात असतानाच गुगलबाबाने पार्कमधली काँझरवेटरी गार्डन केवळ पन्नासएक मीटरवर आहे असे दाखवले. तिला भेट देण्याचा मोह आवरला नाही. पुढे निघालो तर तिचे प्रवेशद्वार केवळ १०-१५ मीटरवरच दिसले (गुगलबाबा छोट्या अंतरांच्या बाबतीत अशी गंमत नेहमी करतो !). आतापर्यंत न्यू यॉर्क शहरातल्या अनेक सुंदर बागा बघून झाल्या असल्या तरी या बागेनेही काही नवीन दाखविण्याचा पायंडा न मोडता नवीन नजारे दाखवून आमचे भरपूर मनोरंजन केले. तेथे काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो खाली देत आहे...


काँझरवेटरी गार्डन ०१


काँझरवेटरी गार्डन ०२


काँझरवेटरी गार्डन ०३


काँझरवेटरी गार्डन ०४


काँझरवेटरी गार्डन ०५


काँझरवेटरी गार्डन ०६

  
  
  
काँझरवेटरी गार्डन ०७ : काही फुलोरे

बागेने मनाचे बरेच रंजन केले. पण पायांची तक्रार बरीच वाढल्याने परत सरळ ५वा अ‍ॅव्हन्यू गाठून घराकडे जाणारी बस पकडली.

(क्रमशः )
===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

सेंट्रल पार्क वर लिहिलेले दोन्ही भाग खूप आवडले. फोटो छान आणि वर्णनही खासच. खूप जुना वारसा किंवा वास्तू नसल्या तरी इतर देशांकडून उसनं घेऊन किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांची नक्कल करून का होईना सुंदर आकर्षणं निर्माण केली आहेत, असं वाटतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 12:28 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे असे पार्क जनतेच्या व समाजसेवी धनवानांच्या प्रयत्नांनी आणि बहुतांश वेळेस राजकारण्यांचे बेत मोडीत काढून बनलेले आहेत.

पिलीयन रायडर's picture

19 Nov 2016 - 9:06 am | पिलीयन रायडर

किती डिट्टेल लिहीता हो काका मस्त! मी सुद्धा अजुनही १-२ ठिकाणं पाहिली नाहीयेत ह्यातली. अर्थात सेंट्रलपार्क आहेच फार मोठं..

मस्त सफर.. सुरेख फोटो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तुम्ही तिथेच आहात तर सेंट्रल पार्क तीनचार फेर्‍यांत एक एक भाग पहात पाहिलात तर अजूनच मजा येईल. तिथे बर्च कार्यक्रमही असतात, उदा. दुपारी थोडे भटकणे व रात्री उघड्या थिएटरमधले शेक्स्पियरचे नाटक; जलविहार, ग्रेट लॉनवर पिकनिक आणि कॉझवेटरी गार्डनमधली फेरी, इ.

एका दिवसात सर्व पार्कमधली केवळ महत्वाची आकर्षणे पाहताना, मधेच हिरवळीवर पसरून डुलकी काढली होती तरी, घरी यायची बस पकडेपर्यंत पायांचे अक्षरशः तुकडे पडले होते ! :)

इशा१२३'s picture

19 Nov 2016 - 4:02 pm | इशा१२३

वा!सुंदर पार्क.
छान सफर घडवलीत.

प्रसाद_१९८२'s picture

19 Nov 2016 - 4:19 pm | प्रसाद_१९८२

लेख डॉ. म्हात्रे सर,
सेंट्रल पार्क चे दोन्ही लेख आवडले.

यशोधरा's picture

19 Nov 2016 - 4:40 pm | यशोधरा

लईच भारी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

पद्मावति's picture

21 Nov 2016 - 8:58 pm | पद्मावति

फारच मस्तं!