न्यू यॉर्क : ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधिल पदविदान समारंभ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
13 Sep 2016 - 10:23 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

फिरत्या गाडीवरचा हॉट डॉग, सँडविच इत्यादी खात खात इथली मजा पाहत फिरणे, दुकानांत शिरून काही खरेदी करणे किंवा फक्त त्यांच्या अनेकमजली काचांच्या भिंतीपलीकडचे वस्तूंच्या सादरीकरणाचे देखावे पाहणे, प्रचंड आकाराच्या बिलबोर्डांवरच्या व्हिडिओ जाहिराती पाहणे, रस्त्यावरच्या कलाकारांच्या करामती पाहणे, चालायचा कंटाळा आला तर मोक्याची खुर्ची पकडून इकडून तिकडे लगबगीने जाणार्‍या लोकांना न्याहाळणे, असे अनेक प्रकार करत टाईम्स स्क्वेअरवर तासनतास खर्च केले तरी कंटाळा येत नाही.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे न्यू यॉर्क शहरातले ठिकाण जगभरच्या बॉक्सिंग, बास्केटबॉल आणि आईस हॉकीच्या दर्दी खेळप्रेमींना आणि जागतिक किर्तीच्या गायकांच्या कार्यक्रमांमध्ये (कन्सर्ट्स) रस असलेल्या रसिकांना नवीन नाही. याला 'MSG' किंवा नुसते 'द गार्डन' या संक्षिप्त नावांनीही संबोधले जाते.

सद्याच्या स्वरूपात, मॅडिसन स्क्वेअर गार्डन हा त्याच्या नावात असलेला चौक किंवा बगिचा यापैकी काहीच नाही ! ते नाव त्याला त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे पडलेले आहे. मॅडिसन स्क्वेअर गार्डन म्हणजे अजस्त्र बहुउद्द्येशी इमारतीत सामावलेले स्टेडियम, सभागृह, क्लब, पन्नासएक बार व रेस्तराँ, इत्यादींचे जागतिक किर्तीचे भले मोठे संकुल आहे. हे संकुल मध्य मॅनहॅटनमध्ये (मिडटाऊन) ७वा व ८वा अ‍ॅव्हेन्यू आणि ३१वा ते ३३वा स्ट्रीट यांच्या मधल्या विशाल जागेवर पसरलेले आहे.


मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०१ : सद्य संकुलाचे ३४व्या स्ट्रीटकडून होणारे दर्शन

या संकुलाचे अजून एक विशेष म्हणजे, न्यू यॉर्कची सबवे आणि देशभर जाणार्‍या इतर रेल्वे लाईन्सचे जंक्शन असलेला पेन्सिल्वानिया स्टेशन हा विशाल थांबा याच्या पायाखालच्या जमिनीच्या पोटात आहे ! त्यामुळे, या इमारतीचे काही दरवाजे सबवेच्या थांब्याकडे तर इतर मॅडिसन स्क्वेअर गार्डन संकुलाच्या अनेक विभागांत घेऊन जातात ! खरे तर, हे संकुल, पेन् स्टेशनची जमिनीवर असलेली जुनी इमारत पाडून त्या जागी बांधलेल्या अजस्त्र पेन्सिल्वानिया किंवा पेन् प्लाझाचा एक भाग आहे !


मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०२ : पेन्सिलवानिया (पेन्) स्टेशनचे मुख्य प्रवेशव्दार

जेम्स मॅडिसन या अमेरिकेच्या चवथ्या अध्यक्षाच्या नावाने बांधलेल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन या संकुलाची जागा आणि इमारत अनेकदा बदलेली आहे. १८७९ ते १८९० पर्यंत वापरात असलेल्या पहिल्या दोन संकुलांची जागा पूर्व २६वा स्ट्रीट आणि मॅडिसन ऍव्हेन्यू यांच्या चौकात होती. तिसरे संकुल बरेच उत्तरेकडे ५०वा स्ट्रीट आणि ८व्या ऍव्हेन्यूच्या चौकात बनवले गेले.

$११० कोटी (सुमारे रु ७,५०० कोटी) खर्चून बांधलेले व ११ फेब्रुवारी १९६८ ला उद्घाटन झालेले सद्याचे ठिकाण या संकुलाची चौथी जागा आहे. हे बहूउद्द्येशीय संकुल बास्केटबॉल, आइस हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती (रेसलिंग), गाण्यांच्या कन्सर्ट, आइस स्केटिंग शोज, सर्कस आणि इतर अनेक प्रकारच्या खेळांसाठी व करमणुकींच्या कार्यक्रमांसाठी वापरले जाते. न्यू यॉर्क रेंजर्स या अमेरिकन राष्ट्रीय हॉकी लीगमधिल (NHL) संघ, न्यू यॉर्क निक्स या अमेरिकन राष्ट्रीय बास्केटबॉल असोशिएशनमधील (NBA) संघ आणि अमेरिकन राष्ट्रीय फुटबॉल लीगमधिल (NFL) न्यू यॉर्क जायंट्स व जेट्स या संघांसह इतर अनेक संघांचे व संस्थांचे हे माहेरघर आहे.

इमारतीत बंदिस्त असलेल्या याच्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये १९,८१२ आसने; आइस हॉकी स्टेडियममध्ये १८,००६ आसने; रेसलिंग स्टेडियममध्ये १८,५०० आसने; गाण्याच्या कंन्सर्टच्या स्टेडियममध्ये २०,००० आसने, बॉक्सिंगच्या स्टेडियममध्ये २०,७८९ आसने असतात. त्याच्या थिएटरमध्ये ५,६०० आसने आहेत. गाण्याच्या कन्सर्टसच्या उत्पन्नाच्या प्रमाणात याचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक आहे.

 ...
मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०३ : बास्केटबॉल स्टेडियम आणि आइस हॉकी स्टेडियम (जालावरून साभार)

२८ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत या संकुलाच्या कन्सर्ट हॉलमध्ये सभा घेऊन अमेरिकेतील भारतीय मूळाच्या लोकांशी व अनिवासी भारतीयांशी संवाद साधला होता. अमेरिकेमध्ये आजतागायत कोणत्याही परदेशी नेत्याने इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या आपल्या देशवासीयांना संबोधलेले नाही. या घटनेमुळे या संकुलाचे नाव भारतात खूप जणांच्या तोंडी आले हे मात्र नक्की...


पंतप्रधान मोदी त्यांच्या २०१४ च्या अमेरिकाभेटीत अनिवासिय भारतीय व भारतिय मूळाच्या लोकांना संबोधताना
(जालावरून साभार)

चिरंजीवाच्या विद्यापीठाचा पदविदान समारंभ याच संकुलातल्या थिएटरमध्ये आहे हे समजले होते तेव्हापासून या जागेला भेट देण्याची उत्सुकता वाढत चालली होती !

सकाळची टाइम्स स्क्वेअरची रपेट आटपून चालत चालत आम्ही जवळच्या कोरिया टाऊन या विभागात आलो. नंतर ध्यानात आले की तो गुरुवार आणि म्हणून शाकाहाराचा दिवस होता. 'कोरियन विभागात शाकाहारी खाणे मिळणे कठीण आहे' हाच विचार प्रथम मनात आला. पण सकाळच्या भरपूर चालण्याने दमलेल्या पायांनी 'जरा गुगलबाबांना साकडे घालून तर बघा' अशी कळकळीची विनंती केली. तसे केले आणि चक्क शाकाहारी जेवण मिळणारे रेस्तराँ दीड-दोन ब्लॉक दूर आहे असे गुगलबाबांनी सांगितले. त्या जागेवर जाऊन जरा अविश्वासानेच चौकशी केली तर, अहो आश्चर्यम्, ते कोरियन रेस्तराँ १००% शाकाहारी होते !

पदार्थ चवदार होते, पण पदविदान समारंभाची वेळ जवळ येत असल्याने जरासे घाईगडबडीत जेवण आटपले. बाहेर येऊन भरल्या पोटी चालायला नको म्हणून टॅक्सीला हात करू लागलो. भरपूर टॅक्स्या इकडून तिकडे पळत होत्या. पण,जगभरच्या टॅक्सीवाल्यांची इज्जत राखण्यासाठीच की काय, रिकामी टॅक्सीवालेही आमच्याकडे बघितले न बघितले करत सरळ पुढे जात होते. त्यांचा हाच रिवाज दहा एक मिनिटे चालू राहिल्यावर ध्यानात आले की गुगलबाबाचे ऐकून चालत गेलो तर पुढच्या १०-१५ मिनिटांत मॅडिसन स्क्वेअर गार्डनला पोहोचू. नाहीतर टॅक्सीच्या नादात कार्यक्रमाला उशीर होईल. मग काय भरल्या पोटी पदयात्रा सुरू केली आणि दहा मिनिटांतच गगनचुंबी इमारतींच्या घोळक्यातून मॅडिसन स्क्वेअर गार्डन संकुल आमच्याकडे डोकावून पाहताना दिसले व आनंदाचा सुस्कारा सोडला...


मॅडिसन स्क्वेअर गार्डन / पेन् प्लाझा : ०१ : प्रथमदर्शन

पदविदान समारंभाचे डगले परिधान केलेले स्नातक हसतमुखाने धावपळ करताना दिसले. त्यानंतर विद्यापीठाच्या नावाचा बोर्डही दिसला आणि आपण या भल्या मोठ्या संकुलातील योग्य दरवाज्याजवळ पोचलो आहोत यावर शिक्कामोर्तब झाले...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०१ : दर्शनी भाग

अगोदरच पोहोचलेले व पदविदान समारंभाचे गाऊन्स घालून तयार झालेले आमचे उत्सवमूर्ती दिसले. त्यांचे परत एकदा एकशेएकव्या वेळेला अभिनंदन करून थोडे फोटो काढणे वगैरे झाले आणि ते आत गेले...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०२ : आत जाण्यापूर्वीचा उत्सवमूर्तींचा फोटोसेशन

मुलाच्या पोस्टग्रॅजुएट पदविदान समारंभाचे एक विशेष कौतुक असतेच यात वाद नाही. पण, मला स्वतःच्या ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅजुएट अश्या कोणत्याच पदवीदान समारंभाला हजर राहता आलेले नाही. त्यामुळे मी बघणारा हा पहिला वहिला पदवीदान समारंभ होता आणि तोही अश्या जगप्रसिद्ध स्थळावर, म्हणून खूपच उत्सुकता होती ! अर्थातच, पुढची जागा पटकाविण्यासाठी आम्हीही इमारतीत शिरलो...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०३ : सर्वात बाहेरचे प्रवेशद्वार

स्टेडियमच्या तुलनेत एक चतुर्थांश आसनक्षमता असलेले हे थिएटर खरेच किती भव्य आहे याचा अंदाज प्रत्यक्ष आत गेल्याशिवाय येणे कठीण आहे...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०४ : बाहेरच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर लागणारी लॉबी

आता थिएटरमध्ये शिरू असे वाटत असतानाच अजून एक सुबक व भव्य प्रवेशद्वार; आणि त्याच्या पलीकडे अजून मोठी आणि अजून चकचकीत लॉबी दिसू लागली...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०५ : दुसरे प्रवेशद्वार आणि दुसरी लॉबी

या लॉबीत सुरक्षा तपासणी झाली. एक्स रे स्कॅनर असलेली द्वारे आणि श्वानपथके असलेली इथली सुरक्षाव्यवस्था एखाद्या विमानतळाला साजेशी आहे...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०६ : दुसर्‍या लॉबीतील एक्स रे द्वारे असलेली सुरक्षाव्यवस्था

सुरक्षाव्यवस्था ओलांडून गेल्यावर आतमध्ये तिसरी प्रशस्त गोलाकार लॉबी होती. ती इतकी प्रशस्त होती की तिच्यात आल्यावर बाहेर वाटणारी गर्दी एकदम कमी झाल्यासारखे वाटले. या लॉबीत ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे होती आणि थिएटरच्या वेगवेगळ्या विभागातल्या आसनांकडे जाण्यासाठी अनेक प्रवेशद्वारे होती...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०७ : थिएटरभोवतालची अंतर्गत (तिसरी) लॉबी


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०८ : थिएटरभोवतालची अंतर्गत (तिसरी) लॉबी

आपण थिएटरमध्ये चाललो आहोत की जमिनीखालच्या एखाद्या छोट्या भुयारी उपनगरात चाललो आहोत असा संभ्रम होण्याजोगी सगळी परिस्थिती होती ! शेवटी पोचलो एकदाचा थिएटरमध्ये ! बघतो तर आमच्या अगोदर बरेच लोक मोक्याच्या खुर्च्या पकडून बसलेले होते. मग मात्र चपळाईने आम्हीही त्यातल्या त्यात चांगल्या खुर्च्या पकडल्या. थिएटरची मांडणी अशी आहे की सर्वच ठिकाणांहून स्टेज विनाअडथळा दिसत होते. खुर्च्यांच्या रांगांची मांडणी तीव्र खोलगट पृष्ठभागावर केल्यामुळे पुढच्या माणसाचे डोके मध्ये आल्याने स्टेजवरचे दिसत नाही, असा प्रकार अजिबात नव्हता. त्यामुळे, खचाखच भरलेल्या थिएटरमध्येही सर्व कार्यक्रम आरामात खुर्चीत रेलून बसून, मान बगळ्यासारखी न ताणता पाहता आला...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०९ : भरलेले थिएटर


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १० : भरलेले थिएटर

कार्यक्रम मोठा शिस्तबद्ध पद्धतीने झाला. पाच विद्यालयांच्या वेगवेगळ्या विसापेक्षा जास्त पदव्युत्तर (एम एस, डॉक्टरेट, इ) अभ्यासक्रमांचे तीनशेपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आपापल्या विद्यालयांप्रमाणे राखीव असलेल्या पुढच्या आसनांवर प्रत्येकाला दिलेल्या क्रमाने बसलेले होते. सर्वप्रथम स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर विद्यापिठातिल कॉलेजेसची नावे एकामागून एक पुकारली गेली. नाव पुकारल्यावर, खास मानदंड हातात घेऊन नेतृत्व करणार्‍या कॉलेजच्या प्राचार्यांच्या मागे रांगेने इतर सर्व अध्यापक व इतर वरिष्ठ अधिकारी, प्रेक्षकांमागून येऊन आसनांच्या मधील जागेतून प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारत, स्टेजवरच्या आपापल्या राखीव जागांवर जाऊन बसत होते. प्रत्येक कॉलेजच्या वेषात काही खास स्वतंत्र चिन्ह होते.

असे मिरवणूकीने येण्याच्या प्रथेला प्रोसेशनल असे म्हणतात. ही प्रथा विद्यापीठाच्या मानाचा आणि अभिमानाचा भाग समजला जातो व काटेकोरपणे पाळला जातो. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपले स्थान ग्रहण केले. या अध्यक्षांचे, "उदय सुखात्मे, प्रोवोस्ट अँड एक्झेक्युटीव व्हा‌इस प्रेसिडेंट फॉर अ‍ॅकॅडेमिक अफेअर्स" असे नाव व पद असे होते. अमेरिकेतल्या या ११० वर्षे जुन्या नामवंत विद्यापीठातले इतके मानाचे स्थान एका भारतीय वंशाच्या माणसाने भूषवले आहे हे पाहून आश्चर्यपूर्ण आनंद झाला.

अमेरिकेचे राष्ट्रगीत झाले व कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाल्याचे जाहीर केले गेले. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंचे व खास पाहुण्याचे भाषण झाले. या वर्षी खास पाहुणे म्हणून याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व सद्या अमेरिकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अंडर सेक्रेटरी फॉर हेल्थ (मिनिस्टर ऑफ स्टेट, आरोग्य) यांना आमंत्रित केलेले होते.

भाषणे संपल्यावर एकेका विद्यार्थ्याचे नाव पुकारून त्याला स्टेजवर त्याच्या प्राचार्यांच्या हस्ते डिग्री सर्टिफिकेट दिले जात होते व जरा पुढे गेल्यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थ्याच्या पदवीप्रमाणे विशिष्ट रंगाच्या कापडाची पट्टी त्याच्या गळ्यात घालून पदवी मिळाल्याचे शिक्कामोर्तब करत होते. जमलेले नातेवाईक अर्थातच हे कौतुक पाहून सुखावून जात होते. नाव पुकारल्यावर एखाद्या नातेवाईकाने केलेल्या "दॅट्स माय हजबंड / वाईफ / बॉय / गर्ल !" अश्या उत्स्फूर्त पुकार्‍यामुळे हशा पिकत होता आणि वातावरणातला ताण कमी करून ते किंचित हलकेफुलके बनवत होता...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ११ : पदविदान समारंभ

कार्यक्रमातील बहुतेक सर्व कार्यक्रम पुस्तिकेत दिलेल्या वेळा पाळून होत राहिले आणि ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा पदविदानसमारंभ कार्यक्रमपत्रिकेत लिहिलेल्या वेळेप्रमाणे अडीच तासांत संपला.

मुलाचा पदवीदान समारंभ संपवून इमारतीच्या बाहेर पडलो तेव्हा,अर्थातच, उर अभिमानाने आणि आनंदाने भरून आला होता. त्याशिवाय, त्यानिमित्ताने जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनला आतून भेट द्यायला मिळाली म्हणून "डबल बेनेफिट स्कीम" मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला होता !

बाहेर पडल्यावर त्या इमारतीचे अजून काही फोटो काढण्याचा मोह झालाच...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १२ : पेन् स्टेशनच्या द्वाराजवळ

आणि हा खास त्या भेटीच्या आठवणीसाठी...


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १३ : आठवणफोटो

दिवसभराच्या दगदगीचा थकवा आता जाणवू लागला होता. त्यामुळे पावले आपोआप सबवेच्या दिशेने वळली. जाण्याच्या वाटेवर न्यू यॉर्कच्या दोन मानबिंदूंनी लक्ष वेधले. त्यांना दुरूनच हाय म्हणून पुढे निघालो...


एम्पायर स्टेट बिल्डिंग


युनायटेड स्टेट्स पोस्ट ऑफिस

(क्रमश :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 10:40 pm | पिलीयन रायडर

मस्तच काका!! आता मला पण काही तरी करुन आत जाऊन यायचं जमवायला पाहिजे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2016 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

आत जायचा नक्की प्रयत्न करा. खास अनुभव होता तो. मी तर फक्त थिएटरमध्ये गेलो होतो. त्याच्या पाचपट आसनक्षमता असलेल्या एरिनामध्ये जायला जमले नाही. तेथे गेलात तर इथे भरपूर फोटो टाकायला विसरू नका !

पद्मावति's picture

13 Sep 2016 - 10:46 pm | पद्मावति

वाह!! प्राउड डॅड!!! अभिनंदन. खूप मस्तं.
लेख आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुन्दर.

पगला गजोधर's picture

13 Sep 2016 - 11:14 pm | पगला गजोधर

आणि अभिनंदन

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 11:27 pm | टवाळ कार्टा

+१

भारून टाकणारी माहिती व फोटू.
आपले व आपल्या चिरंजिवांचे अभिनंदन.
असे समारंभ हे पालकांसाठी अभिमानाचे असणार यात शंका नाही.

प्रचेतस's picture

14 Sep 2016 - 7:02 am | प्रचेतस

+१

असेच म्हणतो.

सुधीर कांदळकर's picture

14 Sep 2016 - 7:52 am | सुधीर कांदळकर

थिएटर आणि लॉबीज अवाक होऊन चित्रे पाहिली. अबब या शब्दाचा खरा अर्थ जाणवला.

धन्यवाद

एकदा तरी अनुभवायला पाहिजे अशी जागा आणि प्रसंगही!
तुमचे आणि लेकाचे अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2016 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे धन्यवाद !

लेकाचे कौतूक करण्यासाठी खास आभार !

नि३सोलपुरकर's picture

14 Sep 2016 - 2:58 pm | नि३सोलपुरकर

आपले व आपल्या चिरंजिवांचे हार्दिक अभिनंदन.

अभिनंदन. आपल्या चिरंजीवांनी घातलेला काळा डगला त्यांचाच आहे का? थोडा मोठा आहे आणि त्यातून त्यांचा हातही बाहेर आलेला नाहीय..डावा हात...कींवा माझ्याच बघण्यात काहीतरी चूक होत असेल...

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 8:33 am | संदीप डांगे

त्यांचा हात पाठीमागे धरलेला आहे, जे दिसतंय ते बाहीचे जोडलेले कापड आहे, दुसऱ्या मुलाच्या उजव्या बहिकडे बघा, तो वाढीव बाहेरून जोडलेला भाग लक्षात येईल
.

प्रीत-मोहर's picture

15 Sep 2016 - 8:26 am | प्रीत-मोहर

तुमचे आणि तुमच्या लेकाचे अभिनंदन काका.
हाही भाग आवडला.

वरुण मोहिते's picture

15 Sep 2016 - 12:53 pm | वरुण मोहिते

नेहमीप्रमाणेच मस्त लेखमालिका

सुहास बांदल's picture

15 Sep 2016 - 2:59 pm | सुहास बांदल

तुम्हा दोघांचे पण अभिनंदन ...

मस्त तुमचे आणि लेकाचे अभिनंदन!खास लेख!

पैसा's picture

26 Oct 2016 - 6:31 pm | पैसा

चिरंजिवांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

चौकटराजा's picture

27 Oct 2016 - 4:04 pm | चौकटराजा

माझा एक मित्र कनेक्टेकटला फार वर्षापूर्वी जाउन आला. त्याने अमेरिकेचे वर्णन एकाच सूचक शब्दात केले. तो शब्द "भव्यता"
त्याच्या विधानाचा प्रत्यय येथे येतोय! आपल्या मुलाचा हा संस्मरणीय क्षंण याची देही पहाताना आपणा उभयताना काय वाटले असेल हे शब्दापलिकडचे ! धन्यवाद ! मालिका वाचत आहेच !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Oct 2016 - 4:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !