महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

न्यू यॉर्क : २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Jan 2017 - 2:23 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

विद्यापीठ मोठे असो की लहान, इथे केवळ शिक्षणव्यवस्थेकडेच लक्ष दिले जाते असे नाही तर विद्यापीठाचा परिसरही सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याकडे कसोशीने लक्ष दिले जात असल्याचे सतत दिसून येते.

स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन

अमेरिकन सरकारने सन १८४६ मध्ये ज्ञानवर्धन आणि ज्ञानप्रसार करण्यासाठी "युनायटेड स्टेट्स नॅशनल म्युझियम" या नावाने एक सरकारी विभाग स्थापन केला. सन १९६७ साली त्याला स्वतंत्र संस्थेचे स्वरूप देऊन स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन असे नाव दिले गेले. या महाप्रकल्पाअंतर्गत आजतागायत एकूण १३ कोटी ८० लाख वस्तू जमा केल्या गेलेल्या आहेत. यामुळे त्याला देशाचा पोटमाळा (the nation's attic) असे म्हटले जाते. या वस्तू १९ संग्रहालये, ९ संशोधन केंद्रे आणि एक प्राणिसंग्रहालय अश्या अनेक प्रकल्पांत संग्रहित केलेल्या आहेत. यापैकी अनेक प्रकल्प ऐतिहासिक आणि राष्ट्रीय स्मारके समजले गेले आहेत. यातले बहुतेक सर्व प्रकल्प अमेरिकेची राजधानी, वॉशिंग्टन डि सी, मध्ये आहेत. पण त्याच बरोबर काही अ‍ॅरिझोना, मेरिलँड, मॅसेचुसेट्स, व्हर्जिनिया, टेक्सास या राज्यांत; न्यू यॉर्क शहरात आणि पनामा या देशातही आहेत. याशिवाय, अमेरिकेच्या ४५ राज्यांत आणि पनामा या देशात स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनच्या २०० च्या वर सहकारी संस्था आणि संग्रहालये आहेत. अश्या या महाकाय संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रकही $१.२ बिलियन (रु ८,००० कोटीच्या वर) आहे. यातले २/३ सरकारी अनुदान असते आणि उरलेले १/३ संस्थेला मिळणार्‍या देणग्या, सभासद वर्गणी, आठवण वस्तूंच्या दुकानांतली विक्री, इत्यादीतून मिळवण्यात येतात. या संस्थेच्या कोणत्याही संग्रहालयांमध्ये प्रवेशमुल्य आकारले जात नाही.

न्यू यॉर्क शहरातले "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" उर्फ
"जॉर्ज गुस्ताव हेये सेंटर"

कोलंबिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी घेऊन अ‍ॅरिझोना राज्यात रेल्वेमार्गाच्या बांधकामावर काम करणार्‍या जॉर्ज गुस्ताव हेये (१८७४ ते १९५७) याच्या हाती सन १८९७ साली नावाजो जमातीच्या वापरातला हरिणाच्या कातड्याचा पोशाख आला. येथून त्याचा अमेरिकन इंडियन जमातींच्या वस्तू जमवण्याचा छंद सुरू झाला. या संग्राहकाने उत्तर व दक्षिण अमेरिकन खंडात तब्बल ५४ वर्षे भटकून अनेक जमातींच्या वापरातल्या असंख्य वस्तू जमा केल्या. तो संग्रह इतका मोठा झाला की त्याने त्याची काळजी घेण्यासाठी त्याने हेये फाऊंडेशन आणि "म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" यांची स्थापना केली. हेये फाउंडेशनने १९२२ साली न्यू यॉर्क शहरातील औडूबॉन टेरेस या जागी सर्वप्रथम म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन थाटले. काही कारणाने १९९४ साली संग्रहालय बंद करावे लागले आणि त्यातला काही भाग दक्षिण मॅनहॅटनमधील "अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउस"या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारतीच्या दोन मजल्यांमध्ये हलवला गेला. सन १९९० मध्ये हेये फाउंडेशनच्या ताब्यातील संपूर्ण संग्रहाला स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनने सामावून घेतले.

हा संग्रह आणि त्यासंबंधीचे काम पुढे नेण्यासाठी स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनचे "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" नावच्या तीन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यापैकी एक भावंड वॉशिंग्टन डि सी च्या जगप्रसिद्ध नॅशनल मॉलवरच्या आकर्षणांच्या रांगेतील एका संग्रहालयाच्या रूपात आहे; दुसरे न्यू यॉर्क शहरातल्या एका संग्रहालयाच्या रूपात आहे आणि तिसरे अमेरिकन इंडियन समाजासंबंधीचे सांस्कृतिक संसाधन, संशोधन आणि संग्रह केंद्राच्या रूपात मेरिलँड राज्यातल्या सुटलँड शहरात आहे.

सद्य भेटीत यातले न्यू यॉर्क शहरातील संग्रहालय पाहण्याचा योग आला. येथे वस्तूसंग्रह प्रदर्शनाव्यतिरिक्त वर्षभर चलतचित्र / व्हिडिओ कार्यक्रम; शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम; आणि अमेरिकन इंडियन समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित केले जातात. हेये फाउंडेशनच्या संग्रहापैकी ८ लाख वस्तू आणि १.२५ लाख फोटो येथे आहेत.

तर अश्या तर्‍हेने, एका नागरिकाच्या छंदातून निर्माण झालेल्या प्रकल्पातून, आता अमेरिकेच्या तीन शहरांत जगप्रसिद्ध आकर्षणे निर्माण झालेली आहेत. त्यातले न्यू यॉर्क शहरातले संग्रहालय पाहण्याचा योग या भेटीत आला.

***************

घरून निघालो तेव्हा धो धो पाऊस सुरू होता. सबवेचा थांबा घराजवळ असल्याने धावत त्याच्या भुयारी मार्ग गाठला. आत गेल्यावर कळले की आज तेथून पुढच्या काही थांब्यांपर्यंतचा रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी बंद होता. पण तेथे एक कर्मचारी उभा राहून "थांब्याच्या पलीकडच्या रस्त्यावर चालू थांब्यापर्यंत नेणारी मोफत बससेवा चालू आहे" असे सांगत होता. सन २०१२ मध्ये आलेल्या हरिकेन सँडीने न्यू यॉर्क शहराचे सुमारे $३२ बिलियनचे (रु२.१५ लाख कोटी) नुकसान केले. सबवेचा सर्व मार्ग पाणी आणि वाळूने भरून गेल्याने त्याचे अपरिमित नुकसान झाले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानाची दुरुस्ती व त्याचबरोबर सततच्या नवीनीकरणाचे काम करण्यासाठी आठवडी सुट्टीच्या दिवसांत (शनिवार-रविवार) सबवेचे काही भाग बंद असणे हे नेहमीचे आहे. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर मोफत पर्यायी व्यवस्था पुरवली जाते. त्यामुळे, फारतर १०-१५ मिनिटाचा उशीर सोडता नागरिकांना फारशी तोशीस पडत नाही, हे विशेष.

बसने आम्हाला गाड्या चालू असलेल्या थांब्यापर्यंत पोचवले. तेथून जणू आमचीच वाट पहात असलेली एक गाडी पकडून आम्ही साऊथ फेरी हा मॅनहॅटनच्या दक्षिण टोकावरच्या थांबा गाठायला निघालो. वाटेत अनेक ठिकाणी रेल्वेमार्गाचे व थांब्याचे काम चालू असलेले दिसत होते...


दुरुस्तीचे काम चालू असलेला सबवेचा थांबा


साऊथ फेरी हा थांबा दक्षिण मॅनहॅटनच्या टोकाला असल्याने येथून रेल्वेमार्ग ९० अंशात वळून पश्चिमेकडील ब्रूकलीनच्या दिशेने जातो. हे वळण थांब्यातच असल्याने हा थांबा काहीसा अर्धवर्तुळाकार आहे !...


सबवेचा अर्धवर्तुळाकार साऊथ फेरी थांबा


थांब्यातून बाहेर जमिनीवर आलो तेव्हा नशिबाने फारसा पाऊस नव्हता. पण वातावरण ढगाळ होते आणि गगनचुंबी इमारतींची शिखरे धुक्यात गुरफटलेली होती. भर उन्हाळ्यात मॅनहॅटनचे हे एक नवीन "हिल स्टेशन" रूप पहायला मिळाले...


पावसाळी हवामानात गुरफटलेले दक्षिण मॅनहॅटन ०१पावसाळी हवामानात गुरफटलेले दक्षिण मॅनहॅटन ०२


पाऊस पडत नसल्याने, या सुखद वातावरणात रमत गमत चालत आम्ही संग्रहालयाकडे निघालो. या भागात, बागेसमान हिरवाई असलेल्या जागा आणि दक्षिण मॅनहॅटनचे विशेष असलेल्या एकमेकाला ढुशी देणार्‍या गगनचुंबी इमारतींचे जंगल, यांचा मनोहारी संगम आहे...

   
संग्रहालयाकडे जाताना दिसलेली दक्षिण मॅनहॅटनमधील जमिनीलगतची हिरवाई आणि गगनचुंबी कॉक्रिट जंगल


एका कोपर्‍यावर वळल्यानंतर "अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउस" ही भव्य इमारत पुढे आली. ती इमारत चित्राच्या एका फ्रेममध्ये बसवणे, खूप दूर जाऊन मोक्याच्या जागेवरून फोटो घेतल्याशिवाय शक्य नाही. तेव्हा सर्वांगसुंदर दर्शन करवणारे जालावरून घेतलेले तिचे चित्र खाली टाकलेले आहे...


अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउसचे सर्वांगसुंदर दर्शन (जालावरून साभार)


ही इमारत संग्रहालयाकरिता बांधलेली नसून संग्रहालयाच्या वापराला दिलेली यु एस कस्टमची जुनी इमारत आहे. सरकारी कामासाठी बांधलेली इमारत असली तरी तिच्यावरची कलाकुसर आणि दर्शनी भागातल्या अनेक शिल्पकृतींना न्याहाळल्याशिवाय आत जाणे शक्य होत नाही...


संग्रहालयाच्या इमारतीवरची कलाकुसर ०१संग्रहालयाच्या इमारतीवरची कलाकुसर ०२


   
संग्रहालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातल्या शिल्पकृतींपैकी काही


एका छोट्या टेकडीच्या उंचीच्या पायर्‍या चढून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. आत गेल्यावर स्वागतकक्ष लागतो. तो अमेरिकन परंपरेला जागून पुरेसा उंचापुरा भव्य बनवलेला आहे. आपल्या मोठेपणाचे दर्शन करणे आणि अमेरिकेला भेट देणार्‍या व्यापार्‍यांवर मानसिक प्रभाव पाडणे या दोन उद्येशांना तो पुरेपूर न्याय देणारा आहे, हे प्रथमदर्शनीच पटते.

त्याच्या लंबगोल घुमटाकार छतावर अनेक चित्रे चितारलेली आहेत. अर्थातच ती इमारतीच्या मूळ वापराला साजेशी, म्हणजे सागरी वाहतूक व व्यापाराशी संबंधित आहेत...


स्वागतकक्षाचे छत ०१स्वागतकक्षाचे छत ०२


येथे, हेये संग्रहातल्या निवडक ७०० वस्तू वापरून, "इन्फिनिटी ऑफ नेशन्स (Infinity of Nations) नावाचे खास कायमस्वरूपी प्रदर्शन बनवलेले आहे. त्यात अमेझॉन नदीची खोरी, अँडीज पर्वतशृंखला, आर्क्टिक/सबआर्क्टिक, कॅलिफोर्निया/ग्रेट बेसिन, मेसोअमेरिकन/कॅरिबियन, अमेरिकेचा उत्तरपश्चिम किनारा, पॅटागोनिया, सपाट व पठारांवरच्या, जंगलातल्या, इत्यादी अनेक प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत विकसित झालेल्या अनेक अमेरिकन इंडियन लोकांच्या विविध सामाजांच्या सांस्कृतिक विशेषांची आपल्याला ओळख करून देतात. सद्य अमेरिकन इंडियन कलेसाठीही एक स्वतंत्र दालन बनवलेले आहे.

या संग्रहालयाची ही एक चित्रसफर...


शिकारीच्या कथा सांगणारे कातड्यावरचे चित्रयुरोपियन लोकांच्या आगमनाने अमेरिकन इंडियन लोकांच्या जीवनात घडलेले बदल दाखवणारे कातड्यावरचे चित्र


  

   

   
समारंभाचे पोशाख आणि भरतकाम केलेली स्त्रियांनी डोक्यावर घ्यायची खोप (शेवटच्या रांगेतले उजवीकडचे चित्र)


  
समारंभांत वापरायची कलाकुसर केलेली छत्री आणि जिचा नातेवाईक युद्धात धारातीर्थी पडलेला आहे अश्या स्त्रीला भेट दिला जाणारा कातडी अंगरखापारंपरिक पोशाखात एक अमेरिकन इंडियन कुटुंबपारंपरिक पोशाखात एका जमातीचा नेता (ट्रायबल चीफ)


  
घोडेस्वाराचा चाबूक आणि इंडियन अमेरिकन घरातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूलहान मुलांचे खेळणे आणि पाणी साठवण्याचे कलाकुसर असलेले मातीचे भांडेमाया संस्कृतीतील एक मातीचे चेहराशिल्प, गळ्यातला हार बनविण्यासाठी वापरल्या जाणारी मातीची चिमुकली मुंडकी आणि रंगवलेले मातीचे मगमेक्सिकोमधील अमेरिकन इंडियन संस्कृतींतील लहानमोठ्या शिल्पकृतीखुर्ची, पर्स, तंतूवाद्य, भांडी, पडदे, मुखवटा, इत्यादीवेताचे सूप, कलापूर्ण मातीची भांडी, भिंतीवर टांगण्याची चित्रे, इत्यादी


हल्ली स्त्रियांचे पंजाबी ड्रेस शिवण्यासाठी रंगकाम किंवा भरतकाम केलेले कापड मिळते. ही पद्धत अमेरिकन इंडियन प्राचीन कालापासून वापरत असल्याचे खालच्या चित्रातील स्त्रियांचे कपडे शिवण्यापूर्वी म्हशीच्या कातड्यावर केलेले रंगकाम पाहून दिसले...


स्त्रियांचे कपडे शिवण्यापूर्वी म्हशीच्या कातड्यावर केलेले रंगकाम


  
वेताचा वापर करून बनवलेल्या कलापूर्ण वस्तूकालपूर्ण पादत्राणे आणि हातमोजेभेटवस्तू म्हणून देण्यासाठी वनस्पतिजन्य साधनांनी बनवलेली कलाकुसर असलेली भांडीमानवी चेहर्‍यांचे कोरीवकाम असलेली भांडीकलापूर्ण पाण्याची भांडी


  
अजून काही कलापूर्ण भांडी


  
कलाकुसरीच्या वस्तूकापडावर नक्षी काढण्यासाठी बनवलेले ठसे


  
सपाट प्रदेशांतील आणि ग्रेट लेक्स प्रदेशांतील अमेरिकन इंडियन लोकांचे पारंपरिक घर (टेपी) आणि त्याच्या अंतर्भागातली चित्रे


एका विभागात जुन्या अमेरिकन इंडियन जीवनशैलीची आणि युरोपियन लोकांच्या आगमनाने तिच्यात होत गेलेल्या बदलाची रेखाटलेली रंगीत चित्रे ठेवलेली आहेत. ही चित्रे मुख्यतः हिशेबांसाठी जुन्या काळी वापरल्या जाण्यार्‍या लेजरबुकांच्या कागदांवर काढलेली आहेत. काही चित्रे तर, कोरा कागद न मिळाल्यास हिशेबांसाठी वापरलेल्या लेजर कागदांवर काढलेली आहेत...


  

  

  

  

  
जुन्या अमेरिकन इंडियन जीवनशैलीची आणि युरोपियन लोकांच्या आगमनाने होत गेलेल्या संघर्षांची आणि बदलाची रेखाटलेली रंगीत चित्रे


अमेरिकन इंडियन राजे त्यांच्या राज्याचे हिशेब ठेवण्यासाठी एक जगावेगळी पद्धत वापरत असत. एका आडव्या धाग्याला अनेक उभे धागे बांधलेले असत. प्रत्येक उभा धागा बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, धाग्याची लांबी, त्यावरच्या गाठी मारण्याची पद्धत, गाठींची संख्या, इत्यादीवरून संसाधनाचा प्रकार (लोकसंख्या, धान्याचा प्रकार, प्राण्याच्या प्रकार, धातूचा प्रकार, इ.), त्याचे प्रमाण (संख्या, वजन, इ) आणि त्याचे भौगोलिक स्थान, इत्यादी माहिती साठवली जात असे. मोठ्या साम्राज्यांचे हिशेबही याच पद्धतीने साठवले जात असत. हिशेब ठेवण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेले हिशेबनीस असत...


अमेरिकन इंडियन खाताबही


या सगळ्या वस्तू पाहिल्यावर युरोपियन लोक अमेरिका खंडांत पोचण्याअगोदर तेथे सांस्कृतिक व कलादृष्टीने विकसित असलेल्या अनेक संस्कृती नांदत होत्या असेच दिसते. त्यावरून युरोपियन अमेरिकेत पोचण्याअगोदर तेथे केवळ असंस्कृत आणि अविकसित लोक होते हे आक्रमकांचे दावे किती पोकळ होते याची खात्री पटते. युद्धासाठी लाकडी शस्त्रांचा उपयोग करणार्‍या व त्यामुळे चिलखताची गरज नसणार्‍या पायदळाचा वापर करणार्‍या मूलवासींच्या विरुद्ध युरोपियन आक्रमकांकडे घोडे, पोलादी तलवारी आणि बंदुका असल्यानेच युरोपियन विजयी झाले. युरोपियन आक्रमकांनी स्थानिक जमातींची नृशंस कत्तल करून त्यांच्या जमिनी कश्या बळकावल्या, युरोपमधून सोबत आणलेल्या देवीसारख्या रोगांचा वापर करून (त्या रोगांशी पूर्वी कधीच संबंध न आल्याने) रोगप्रतिकारकशक्ती नसलेल्या स्थानिक जमातींना कसे नष्ट केले याच्या अनेक कहाण्या (दाबण्याचा खूप प्रयत्न करूनही) आता सर्वमान्य झाल्या आहेतच. माध्यमे आणि विशेषतः सामाजिक माध्यमे नसल्याने वसाहत वादाच्या काळात असे अनन्वित अत्याचार अनिर्बंधपणे होऊ शकले. काही केले तरी आता त्याचे परिमार्जन करणे शक्य नाही. पण, तो इतिहास मान्य करून, त्या संस्कृतींची जमेल तितकी माहिती साठवून पुढच्या पिढीकडे ती पोचवणे इतकेच हाती आहे.

या संग्रहालयात एक गोलाकार बहूद्येशी रंगमंच आहे. त्यातल्या पडद्यावर अमेरिकन इंडियन जीवनाशी संबंधीत चलतचित्रे प्रदर्शित करणे सतत चालू असते. याशिवाय, कलाकारांनी सादर केलेले समयोचित कार्यक्रमही तेथे मधून मधून सादर केले जातात...या रंगमंचाच्या भिंतींत केलेल्या खोबण्यांत वेगवेगळ्या अमेरिकन इंडियन जमातींच्या नृत्यसमारंभांचे पारंपरिक पोशाख घातलेले पुतळे बसवलेले आहेत...

    

    


अमेरिकन इंडियन जमातींचे नृत्यसमारंभांचे पारंपरिक पोशाख घातलेले पुतळे


या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू खूप विचारपूर्वक निवडलेली दिसली... त्यामुळे त्यातली एखादी टाळून पुढे जाणे कठीण जाते. वेळेच्या अभावामुळे तसे करावे लागले की जरासे अपराध्यासारखेच वाटते.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

6 Jan 2017 - 7:43 pm | खटपट्या

छान फोटो आणि माहीती

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Jan 2017 - 8:03 am | अनिरुद्ध.वैद्य

आपणच नष्ट केलेल्या लोकांचही संग्रहालय!

निनाद's picture

10 Jan 2017 - 6:39 am | निनाद

सुरेख माहिती दिली आहे.
वसाहत वादाच्या काळात असे अनन्वित अत्याचार अनिर्बंधपणे होऊ शकले. काही केले तरी आता त्याचे परिमार्जन करणे शक्य नाही. पण, तो इतिहास मान्य करून, त्या संस्कृतींची जमेल तितकी माहिती साठवून पुढच्या पिढीकडे ती पोचवणे इतकेच हाती आहे. खरे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2017 - 10:47 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

फेदरवेट साहेब's picture

12 Jan 2017 - 5:09 pm | फेदरवेट साहेब

आपुनला तुमाला आभार मानायचा आहे हा, आज समदा रायटिंग वाचूनश्यानी काढला तुमचा. तुमी ट्रॅव्हलॉग लिवण्यात नॅचरली टॅलेंटेड हाय हा, आपुनला फ्री ऑफ कॉस्ट एन वाय सी दाखवलानी, तो अंतू बर्वा असते नी कोकण मंदी तसा फील झ्याला एकदम. साला बद्धा चोकस लिखान हाय भासा ने फोटो अन थिमिंग बी. ए तुमी काय पॉलिटिक्स अन गव्हर्नन्स वर वाद घालत राहते भावसाहेब आय रिक्वेस्ट यु सिंसीयरली टू एक्सप्लोर द ट्रॅव्हलॉग रायटर इन यु इन्स्टेड भावसाहेब,

ते 'एका नागरिकाच्या छंदातून निर्माण झालेल्या प्रकल्पातून, आता अमेरिकेच्या तीन शहरांत जगप्रसिद्ध आकर्षणे निर्माण झालेली आहेत'

हे सेंटन्स वाचूनश्यानी आपुनला आपुनच्या लाडक्या पुणेसिटी मंदी असलेले, राजा दिनकर केळकर म्युझियम आठवला हा, सेम भाव्हना हाय ते उभे करण्यामंदी, वन कलेक्टर क्लेक्टिंग इट ऑल अँड नेमिंग इट आफ्टर हिज डिसीज्ड सन. भावसाहेब आपुन गॉडला प्रे करते का तुमाला गुड हेल्थ द्यावा अने तुमाला अजून फिरायचा मौका मिळावा, अने तमे अजून बीजा प्लेसेसचा ट्रॅव्हलॉग लिवावा, गॉड ब्लेस यु हा

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2017 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठेंकू वेरी मच हा फेदरवेट साहेब बावाजी ! :)

आज अमेरिकन नेटिव्ह लोकांची काय स्थिती आहे याबद्दल उत्सुकता आहे. संग्रहालय आवडलं. पण त्यालाही वसाहतवादाची आणि नृशंस कत्तलींची काळीकुट्ट किनार आहेच. निदान संग्रहालयाच्या निमित्ताने का होईना ह्या आदिम संस्कृतींच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न होत आहे हेही नसे थोडके.

एक लहानशी दुरुस्ती : १९५७ साली मरण पावलेल्या व्यक्तीला १९८७ साली अंगरखा सापडला आणि त्यानंतर चोपन्न वर्षे त्याने संग्रह करण्यात घालवली यात १९८७ हे साल चुकीचे पडले असावे असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2017 - 9:53 am | डॉ सुहास म्हात्रे

साल १८९७ ऐवजी १९८७ असे लिहिले गेले आहे. हे ध्यानात आणून दिल्याबद्दल खास धन्यवाद ! ती टंकनचूक आता दुरुस्त करून घेतली आहे.