न्यू यॉर्क : १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 Dec 2016 - 1:06 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

बागेने मनाचे बरेच रंजन केले. पण पायांची तक्रार बरीच वाढल्याने परत सरळ ५वा अ‍ॅव्हन्यू गाठून घराकडे जाणारी बस पकडली.

न्यू यॉर्क शहराचा नजारा बघण्याचा अजून एक महत्त्वाचा पर्याय पाण्यातून जातो. हा पर्याय अनेक देखण्या शहरांत उपलब्ध आहे. मॅनहॅटनसारखे जगप्रसिद्ध बेट आणि त्याच्या बाजूचा भूभाग अशी भौगिलिक रचना असलेल्या आणि जलवाहतूक ही रोजच्या जीवनाची गरज असलेल्या न्यू यॉर्क शहरात, हा पर्याय पर्यटन व्यवस्थेतले एक महत्त्वाचे आकर्षण बनले नसते तरच आश्चर्य होते. ही जलसफर दिवसा किंवा रात्री, धावती किंवा आरामात, दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणासह आणि गायनवादनाच्या साथीत करता येते. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे.

स्टॅटन आयलँड फेरी :
या फेरीने मॅनहॅटनवरून स्टॅटन बेटावर किंवा विरुद्ध दिशेने जाऊन गंतव्यावर हवे तितका वेळ भटकून परतता येते. अर्ध्या तासाचा प्रवास असलेली ही फेरी दोन्ही बाजूंनी दर अर्ध्या तासाने सुटते व विनासुट्टी वर्षभर २४ X ७ चालू असते. या प्रवासात जलसफरीच्या आनंदाबरोबरच मॅनहॅटनची आकाशरेखा, न्यू जर्सीची आकाशरेखा व हिरवागार किनारा, एलिस बेट, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, इत्यादी आकर्षणाचे बोटीवरून दर्शन होते. ही मुनिसिपल फेरी सेवा पूर्णपणे चकटफू आहे ! त्यामुळे दोनतीन तास मोकळे असले तर गंमत म्हणून या सोयीचा फायदा घेता येईल.

स्टॅटन आयलँड फेरी

अनेक कंपन्यांच्या असंख्य पर्यायांतून शेवटी प्रकार, आवड आणि खर्च यांचे उत्तम गुणोत्तर असलेला सर्कल फेरी या कंपनीची मॅनहॅटन बेटाला पूर्ण प्रदक्षिणा करणारी सफर निवडली. या अडीच-तीन तासांच्या, तीन नद्यांतून व २० पुलांखालून जाणार्‍या जलसफरीत, पाण्यातून दिसू शकणारी न्यू यॉर्क शहरातील पाच बरोंतील (कंपनीच्या दाव्याप्रमाणे) १०१ आकर्षणे दिसतात. अर्थातच, आपल्याला इतक्या सगळ्या आकर्षणांच्या जंत्रीत रस नसतो. पण ज्यात आपल्याला रस वाटेल अशी अनेक आकर्षणे प्रवासात सतत दिसत राहून आपल्याला सतत गुंतवून ठेवतात इतके मात्र नक्की. मार्गदर्शक त्यांच्याकडे निर्देश करत सतत धावते समालोचन करत असतो. त्यामुळे आरामात खुर्चीत बसून किंवा डेकच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे फेर्‍या मारत दोन्ही बाजूंचे नजारे पाहत अडीच-तीन तास भरकन उडून जातात.

भटकंतीसाठी घरातून बाहेर पडताना, त्या दिवशीच्या यादीत, सगळ्यात पहिली ही प्रदक्षिणा होती. तेथे पोचायला प्रथम सबवे, मग बस आणि शेवटी थोडेसे चालणे असा प्रवास होता. चालताना हा भोपळा वाटेत उभा असलेला दिसला. त्यातली म्हातारी कुठे जवळपास दिसली नाही. बहुतेक भोपळा तेथे पार्क करून ती आमच्यासारखीच बाजूला कोठेतरी भटकायला गेली असावी. भोपळ्याची सोनेरी चमक पाहता, तिच्या मुलीने तिला चांगली खातीरदारी करून परत पाठवलेले दिसत होते !...


भोपळा

आम्ही धक्का गाठला आणि तिकिटे काढून मोक्याची जागा पकडायला बोटीकडे निघालो. फेरीच्या मध्यम आकाराच्या दोन मजली बोटीवर मोठ्या खिडक्या असलेली वातानुकूलित दालने होती. वरच्या मजल्यावरचा अर्धा भाग उघड्या डेकचा होता. परिसराचे मुक्त दर्शन व्हावे यासाठी आम्ही उघड्या डेकवरच्या जागा पकडल्या. जून महिना असला तरी उन्ह अमेरिकेतले असल्याने तितकीशी काळजी नव्हती. तसेही लवकर डेक गाठल्याने आम्हाला सावलीतली जागा मिळाली. बोटीवर असलेल्या कॅफेत सँडविचेस, बर्गर, हॉट डॉग, सलाद, इतर अनेक खाण्याचे पर्याय आणि थंड पेये, बियर व वाइनचे प्रकार उपलब्ध होते. अनेक सुविधागृहांची सोयही होती. चिरंजीवाने खाण्यापिण्याची बेगमी केली आणि तोंड चालवत स्थानापन्न होऊन आम्ही जलप्रदक्षिणेला तयार झालो...


सर्कल लाइन फेरी बोट (सहलकंपनीच्या संस्थळावरून साभार)

बोट सुटायला थोडा वेळ होता. पण, आजूबाजूच्या परिसरात बरेच काही चालू होते, ते बघण्यात तो मजेत गेला.

बीस्ट

ही १०० फूट लांबीची बीस्ट नावाची वेगवान बोट (स्पीडबोट) हडसन नदीतून ताशी ७२ किमी वेगाने सफर करण्याचा थरारक आनंद देते. तिच्या फेरीत ती स्वातंत्र्यदेवीचे पाण्यातून १०० फूट दुरून दर्शन देते आणि मधूनच ३६० अंशात गिरकी मारत पर्यटकांच्या हृदयाचा एखादा ठोका चुकवते ! एक बीस्ट धक्का सोडून वेगाने पाणी कापत जाताना दिसली...


बीस्ट सफारी

वॉटर टॅक्सी

न्यू यॉर्क शहर अनेक बेटे आणि मुख्यभूमीची काही जमीन मिळून बनले आहे हे आपण अगोदर पाहिले आहेच. त्यामुळे जलप्रवास ही तेथील एक सर्वसामान्य आवश्यकता आहे. सरकारी कंपन्या, खाजगी कंपन्या व वॉटर टॅक्सी ही सेवा पुरवतात. आमच्या बोटीपासून जवळच एक वॉटर टॅक्सीचा थांबा होता. तेथून सुटलेली एक टॅक्सी...


वॉटर टॅक्सी

जरा दूरच्या पाण्यात एक छोटी स्पीडबोट घेऊन एक जण आपले कसब दाखवत होता...


छोटी स्पीड बोट

सफरीची वेळ झाली आणि बोटीने किनारा सोडला...


आमच्या जलसफरीचा मार्ग असा होता...


मॅनहॅटनप्रदक्षिणेचा नकाशा

बंदराच्या बाहेर पडल्यावर एका बाजूला हडसन नदीच्या किनार्‍याजवळील मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारती दिसल्या...


धक्क्याच्या जवळील हडसन नदीचा मॅनहॅटन किनारा ०१


धक्क्याच्या जवळील हडसन नदीचा मॅनहॅटन किनारा ०२ (उजवीकडे टोकदार शिखर असलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसत आहे)

तर, नदीच्या विरुद्ध किनार्‍यावर दूरवर न्यू जर्सी राज्यातील जर्सी सिटी शहरातील डाऊनटाऊन सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधल्या व त्याच्या जवळच्या गावांतील गगनचुंबी इमारती दिसल्या...


जर्सी सिटीतील व शेजारच्या गावांतील गगनचुंबी इमारती

लॅकावाना

थोडे पुढे गेल्यावर, या दोन गगनचुंबी आकाशरेखांच्या मध्यभागी असलेल्या, न्यू जर्सी राज्यातील माँटक्लेर गावातील तांबड्या विटांनी बांधलेल्या जुन्या ग्रेशियन-डोरीक शैलीत बांधलेल्या व Lackawanna असे भल्यामोठ्या अक्षरांत नाव असलेल्या आकर्षक इमारतीने लक्ष वेधून घेतले. १९१३ साली ही इमारत रेल्वे स्टेशनच्या स्वरूपात कामी आणली गेली. १९८१ साली स्टेशन जवळच दुसरीकडे हलविले गेले आणि या इमारतीचे सुपरमार्केट, इतर लहान दुकाने व रेस्तराँ असलेल्या मॉलमध्ये रूपांतर केले गेले. भाडेकरू कंपनीने, १९१५ साली लीज संपल्यावर त्या इमारतीचा उच्चस्तरीय व्यापारी उपयोग करण्यासाठी तिच्या दृश्य स्वरूपात बदल करण्याचा मनोदय जाहीर केल्यामुळे, त्याला विरोध म्हणून लीजची मुदत वाढवली गेली नाही. सद्या ही आकर्षक इमारत मोकळी पडून आहे...


लॅकावाना इमारत

कोलगेट घड्याळ व गोल्डमन साक्स इमारत

जर्सी सिटीच्या किनारपट्टीच्या अजून थोडे जवळ गेल्यावर कोलगेट कंपनीचे नाव असलेले १५ मीटर व्यासाचे एक मोठे घड्याळ दिसते. पूर्वी कोलगेट-पामोलिव कंपनीच्या मुख्य कार्यालयाची इमारत घड्याळाच्या जागेजवळ होती पण आता ती तेथून ४०० मीटर दूर हलविली आहे. या घड्याळामागे न्यू जर्सी राज्यातली सर्वात उंच १०० मीटर उंचीची गोल्डमन साक्स टॉवर ही इमारत दिसते...


कोलगेट घड्याळ व त्याच्या मागची गगनचुंबी गोल्डमन साक्स इमारत

एलिस बेट व इमिग्रेशन संग्रहालय

थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एलिस बेट व त्याच्यावरची जुन्या शैलीतली आकर्षक इमारत दिसते. हे बेट १८९२ ते १९५४ या कालखंडात परदेशातून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी येणार्‍या लोकांची तपासणी करण्याचे केंद्र होत. या बेटावर दिसणार्‍या इमारतीत १९९० सालापासून इमिग्रेशन संग्रहालय आहे...


एलिस बेट

स्वातंत्र्यदेवीचा पुतळा (Statue of Liberty)

इथून पुढे, आतापर्यंत दूर असल्याने चिमुकला दिसणारा एका स्वतंत्र बेटावरचा स्वातंत्र्यदेवीचा पुतळा त्याचे खरे भव्य स्वरूप हळू हळू उघडे करू लागतो...


स्वातंत्र्यदेवीचा पुतळा व त्याचे बेट

निओक्लासिकल शैलीतला हा जगप्रसिद्ध पुतळा ४६ मीटर उंचीचा आहे. जमिनीपासून (चौथर्‍यासकट) मशालीच्या टोकापर्यंत त्याची उंची ९३ मीटर आहे. या २४०,१०० किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चपलांचा नंबर अमेरिकन परिमाणाप्रमाणे ८७९ आहे !

या लिबर्टास नावाच्या रोमन देवतेच्या पुतळ्याच्या उंचावलेल्या एका हातात मशाल व दुसर्‍या हातात ४ जुलै १७७६ ही अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची तारीख कोरलेली पाटी (tabula ansata) आहे. हा पुतळा फ्रेंच जनतेकडून अमेरिकेला मिळालेली भेट आहे. तो ४ जुलै १८८४ ला पॅरिसमध्ये अमेरिकेला अर्पण केला गेला. मात्र त्याचा अमेरिकेतला पायथा बांधून पुरा झालेला नसल्याने तो जानेवारी १८८५ पर्यंत फ्रान्समध्येच होता. इतका मोठा पुतळा सलग वाहून नेणे शक्य नसल्याने वाहतुकीच्या सोयीसाठी त्याचे अनेक भाग केले गेले व ते २१४ खोक्यांत भरून बोटीने अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली गेली. पैश्यांच्या समस्येमुळे वाहतूकीचे काम रखडलेल. तो खर्च फ्रेंच सरकारने उचलला आणि १८८५ च्या जूनमध्ये पुतळ्याचे सर्व भाग अमेरिकेत पोचले.

इकडे अमेरिकेत चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे, फ्रान्सवरून येणार्‍या या भेटीसाठी लागणारा पायथा बनविण्यासाठी अमेरिकने पैसे खर्च करण्याला लोकांचा विरोध झाला. पैसे उभे करण्यासाठी केलेल्या अनेक कार्यक्रमांनंतरही पुतळ्याचे काम करणार्‍या समितीच्या बँकेच्या खात्यात १८८२ साली केवळ $३००० होते. त्यात भर म्हणून, पायथ्यासाठी लागणारे $१० लाख देण्याला सरकारने नकार दिला ! त्यानंतर, १८८४ साली या कामासाठी $५०,००० देण्याच्या मसुद्याला न्यू यॉर्कच्या मेयरने व्हेटो वापरून विरोध केला. ही अवस्था पाहून केवळ न्यू यॉर्क शहरच नव्हे तर बोस्टन, फिलाडेल्फिया व इतर शहरांतील अनेक नागरिक संघटनांनी पुढे येऊन हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शेवटी त्यांच्या मदतीने २८ ऑक्टोबर १८८६ या दिवशी पूर्व न्यू यॉर्क गव्हर्नर व त्या काळचे अमेरिकन राष्ट्रपती ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या हस्ते पुतळा अमेरिकन जनतेला अर्पण करून भेटीला खुला केला गेला.

तेव्हापासून हा पुतळा बोटीने एलिस बेटावर पोचणार्‍या स्थलांतरितांचे १९५४ पर्यंत स्वागत करत उभा राहिला. त्यानंतर, विमानवाहतूक सुरू झाल्याने स्थलांतरीत बोटीने येणे बंद झाले. त्यामुळे, ते पूर्वीचे महत्व आता इतिहासजमा झाले असले तरी जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांच्या यादीतले या पुतळ्याचे स्थान आजही अबाधित आहे.

एकंदरीत, आपण समजत असतो की, हा पुतळा फ्रेंच आणि अमेरिकन सरकारांचा प्रेमाचा संयुक्त प्रयत्न असेल. पण, फ्रेंच सरकारने केलेला वाहतूक खर्च सोडला तर इतर बाबतीत, विशेषतः अमेरिकेत, या प्रकल्पाला विरोधच झाला होता ! तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प मुख्यतः फ्रेंच व अमेरिकन जनतेच्या खाजगी प्रयत्नातून आणि सरकारी विरोधाला न जुमानता, झालेला आहे !

कॅप्टन आपले कौशल्य वापरत बोट या पुतळ्यापासून साधारण १०० फुटांवर आणून तिची गती कमी करतो. येथून ते भव्य शिल्प पूर्णरूपात पाहण्यात वेगळीच मजा आहे. त्याचे रूप डोळ्यात सामावून घेण्यात आपण गुंगून जातो...


स्वातंत्र्यदेवीचा पुतळा

तेथून परत फिरून मॅनहॅटन व ब्रूकलीनमधून वाहणार्‍या इस्ट नदीच्या दिशेने जाण्यासाठी बोट डावीकडे वळू लागते. न्यू यॉर्क बे (सामुद्रधुनी) आणि हडसन, इस्ट व हार्लेम या तीन नद्या न्यू यॉर्क शहराच्या प्रभागांना एकमेकापासून दूर करतात. त्यापैकी हडसन व हार्लेम याना नद्या असे संबोधले जात असले तरी न्यू यॉर्क शहरातले त्यांचे भाग प्रत्यक्षात खाड्या आहेत आणि इस्ट तर पूर्णपणे खाडी आहे. नद्या व खाड्यांनी विभागलेले न्यू यॉर्क शहराचे अनेक प्रभाग शेकडो पूल व पाण्याखालून जाणार्‍या भुयारी मार्गांनी जोडलेले आहेत. त्यांची संख्या जवळ जवळ २००० आहे असा दावा केला जातो (खरे खोटे न्यू यॉर्क प्रशासन जाणे), त्यातल्या मुख्य पूल व भुयारी मार्गांची यादी इथे सापडेल. यातले बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पूल आपल्याला आजच्या जलप्रवासात दिसणार आहेत.

व्हेराझॅनो-नॅरोज पूल

बोट इस्ट नदीच्या दिशेने वळू लागली की ब्रूकलीन व स्टॅटन आयलँड हे दोन प्रभाग जोडणारा व्हेराझॅनो-नॅरोज नावाचा पूल दिसतो. इटॅलियन दर्यावर्दी व्हेराझॅनो याचे नाव दिलेला हा पूल ब्रूकलीन व स्टॅटन आयलँड यांच्यामध्ये असलेल्या अरुंद पाण्यावरून (इंग्लिशमध्ये, दोन विशाल पाण्याचे साठ्यांना जोडणार्‍या अरुंद भागाला नॅरोज असे म्हणतात) जातो यावरून त्याचे नाव पडले आहे. सन १९६४ साली बांधलेला हा पूल १९८१ पर्यंत जगातला सर्वात जास्त लांबीचा टांगता (सस्पेन्शन) पूल होता. या पुलाची एकूण लांबी ४,१७८ मीटर आणि त्यांच्या स्टीलच्या दोरांवर टांगलेल्या भागाची लांबी १,२९८ मीटर आहे. आजही तो अमेरिकन खंडांतला सर्वात जास्त लांबीचा सस्पेन्शन पूल आहे. न्यू यॉर्क व न्यू जर्सी बंदरांत येजा करणार्‍या सर्व जहाजांना त्याच्या खालून जावे लागते, यामुळे भरतीच्या पाण्याच्या उंचीपासून पुलाच्या खालच्या भागाची उंची ६९.५ मीटर आहे. हा द्वीस्तरीय (डबलडेकर) पूल आहे व त्याच्या प्रत्येक स्तरावर ६ लेनचे रस्ते आहेत. याच्या स्टॅटन आयलँडकडील टोकापासून जगप्रसिद्ध न्यू यॉर्क मॅरॅथॉनची सुरुवात होते.


व्हेराझॅनो-नॅरोज पूल

इस्ट नदीचे ब्रूकलीन व मॅनहॅटन किनारे

बोट १८० अंशात वळण घेऊन ती मागे फिरली की सर्वात प्रथम आपल्याला उजवीकडे ब्रूकलीनचा सुंदर हिरवा किनारा व तेथील मध्यम उंचीच्या इमारतींनी बनलेली आकाशरेखा दिसू लागते...


ब्रूकलीन ०१ : सुंदर हिरवा किनारा व तेथील मध्यम उंचीच्या इमारतींनी बनलेली आकाशरेखा

जरा पुढे गेले की ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड दिसू लागते. काही दिवसांपूर्वी तेथून मॅनहॅटनची आकाशरेखा बघितली असल्याने ती जागा आता नदीच्या बाजूने बघणे जास्तच रोचक वाटले...


ब्रूकलीन ०२ : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड

तेथून बोट वळवत नजर डावीकडे नेताना, अर्ध्या वाटेत नाकासमोर आपल्याला प्रसिद्ध ब्रूकलीन पूल दिसतो...

ब्रूकलीन ब्रिज

हा जगातला पहिला स्टीलच्या तारांनी टांगलेला (सस्पेन्शन) १८२५ मीटर लांबीचा पूल आहे. १८८३ ते १९०३ या कालखंडात तो जगातील सर्वात लांब टांगता पूल होता. न्यू यॉर्क शहरातील, केवळ ४.५ फूट जास्त लांब असलेल्या विलियम्सबुर्ग पुलाने त्याची जागा १९०३ मध्ये पटकावली ! निओगोथिक शैलीत बांधलेल्या या पुलावरून दिवसभरात १२५,००० चारचाकी, २,६०० सायकली आणि ४,००० माणसे प्रवास करतात. या पुलावरून मॅनहॅटन ते ब्रूकलीन किंवा विरुद्ध दिशेने चालत जाणे हा एक सुंदर पर्यटन अनुभव असल्याचे मानले जाते...


ब्रूकलीन ०३ : ब्रूकलीन ब्रिजचा ब्रूकलीनच्या बाजूचा भाग

नजर डावीकडे नेली की मॅनहॅटनच्या दक्षिण टोकावरील न्यू यॉर्कच्या डाऊनटाऊनची जगप्रसिद्ध आकाशरेखा दिसू लागते...


मॅनहॅटन ०१ : डाऊनटाऊन


मॅनहॅटन ०२ : ब्रूकलीन ब्रिजखालून प्रवास करताना दिसणारे न्यू यॉर्क शहराचे (मॅनहॅटन) डाऊनटाऊन

त्यानंतर पुढे इस्ट नदीच्या दोन्ही किनार्‍यांवरची दृश्ये पाहत असतानाच बोट एकामागोमाग मॅनहॅटन ब्रिज व विलियम्सबुर्ग ब्रिजखालून जाते...


मॅनहॅटन ०३ : विलियम्सबुर्ग ब्रिजखालून दिसणारा मॅनहॅटन ब्रिज, त्या पलीकडील ब्रूकलीन ब्रिजचा काही भाग व डाऊनटाऊन


मॅनहॅटन ०४ : इस्ट नदीचा मध्य मॅनहॅटन किनारा


ब्रूकलीन ०४ : इस्ट नदीचा मध्य ब्रूकलीन किनारा

इथून पुढे उजव्या बाजूला ब्रूकलीन आणि डाव्या बाजूला मॅनहॅटनच्या किनार्‍यांवर दिसणारे नजारे बघता बघता आपण टेनीसचा सामना पाहत असल्यासारखे मान डावी-उजवीकडे हलवत राहतो...


मॅनहॅटन ०५


ब्रूकलीन ०५


मॅनहॅटन ०६ (डावीकडे संयुक्त राष्ट्रसंघाची इमारत व उजवीकडे टोकदार शिखराची क्राय्सलर इमारत दिसत आहेत)


मॅनहॅटन ०७

४३२ पार्क अ‍ॅव्हन्यू

४२६ मीटर उंचीची "४३२, पार्क अ‍ॅव्हन्यू" ही जगातली सर्वात उंच "निवासी" इमारत, न्यू यॉर्क शहरातली (१ वर्ल्ड सेंटरच्या खालोखाल) दुसर्‍या क्रमांकाच्या उंचीची व संपूर्ण अमेरिकेतली तिसर्‍या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहे. २३ डिसेंबर २०१५ साली पूर्ण झालेल्या या इमारतीत १०४ सदनिका आहेत.


मॅनहॅटन ०८ : ४३२ पार्क अ‍ॅव्हन्यू, आपल्या उंचीने बाकीच्या उंच इमारतींना न्यूनगंड देत उभी दिसत आहे

जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे मॅनहॅटन बेटावरची हिरवाई अधिकाधिक होत जाते आणि इमारतींची उंची कमी होत जाते...


मॅनहॅटन ०९


मॅनहॅटन १०

  
मॅनहॅटन ११ व १२


ब्रूकलीन ०६

हार्लेम नदीचे मॅनहॅटन व ब्राँक्स किनारे

बोट इस्ट नदी व हार्लेम नदीच्या संगमामधून हार्लेम नदीत शिरते व उत्तरेकडील प्रवास चालू ठेवते. येथून पुढे, आपल्या डाव्या बाजूला हार्लेम नदीचा मॅनहॅटन किनारा व उजव्या बाजूला ब्रूकलीनऐवजी ब्राँक्स प्रभागाचा किनारा दिसू लागतो.


ब्राँक्स ०१

यांकी स्टेडियम

थोड्याच वेळात उजव्याकिनार्‍यावरील पूल, रस्ते आणि मध्यम उंचीच्या इमारतींमागे, ब्राँक्समधले प्रसिद्ध यांकी स्टेडियम, दिमाखाने मिरवताना दिसते. याला "अमेरिकन बेसबॉलचे कॅथेड्रल" असे म्हटले जाते. या मैदानाच्या उद्घाटनाच्या दिवशी (१८ एप्रिल १९२३) झालेल्या सामन्यात बेब रुथ याने इथली पहिली होम रन काढली. त्यामुळे या मैदानाला लाडाने "द हाउस दॅट रुथ बिल्ट" असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र जेकब रुपर्ट या बेसबॉल रसिकाने पदरचे $२४ लक्ष (आजच्या घडीला $३२० लाख) खर्च करून हे मैदान बांधले आहे ! आजतागायत येथे ६५०० च्या वर सामने खेळले गेले आहेत. यांकी संघाच ते माहेरघर (होम ग्राऊंड) आहे. ते काही काळ न्यू यॉर्क जायंट्स या संघाचेही माहेरघर होते.


ब्राँक्स ०२ : यांकी स्टेडियम

द हाय ब्रिज

हा ब्राँक्स व मॅनहॅटन जोडणारा हार्लेम नदीवरचा दगडी पूल, १८४८ साली साली मॅनहॅटनला पाण्याचा पुरवठाकरणार्‍या जलवाहिनीसाठी बांधला गेला. त्यामुळे तो सुरुवातीला अक्वेडक्ट ब्रिज (Aqueduct Bridge) या नावाने ओळखला जात असे. १९२७ साली केलेल्या डागडुजीत त्याचा एक भाग पाडून तेथे पोलादी कमान उभारली गेली. १९७०च्या दशकात पाणी वाहून नेण्याची गरज संपल्यावर तो ४० वर्षे निकामी पडला. २०१५ मध्ये त्याचे पदमार्ग व सायकलमार्गात रूपांतर करून जनतेसाठी खुला केले गेले. आता न्यू यॉर्क शहराचा पार्क व मनोरंजन विभाग याची निगा राखण्याचे काम करत आहे.


द हाय ब्रिज उर्फ अक्वेडक्ट ब्रिज ०१

यापुढे उत्तर मॅनहॅटनचा जंगलासमान दिसणारा हिरवागार भाग सुरू होतो. त्यातून मधूनच डोकावणारी एखादी चुकार इमारत हा शहराचा भाग असल्याची आठवण देते...


मॅनहॅटन १३

ब्रॉंक्सचा किनारा मात्र त्याच्या मध्यम उंचीच्या इमारती व बर्‍यापैकी झाडी असा नजारा चालूच ठेवतो...


ब्राँक्स ०३

ब्रॉडवे ब्रिज

थोड्या वेळाने जरासा विचित्र दिसणारा आणि आमच्या ओळखीचा पूल दिसला आणि बोट डावीकडे वळून मॅनहॅटनच्या उत्तर टोकाला वळसा घालत हडसन नदीच्या दिशेने चालली आहे ध्यानात आले. आमच्या घरापासून तीनेक किमीवर असलेल्या या पुलावर आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारलेला असल्याने तो माहितीचा झालेला होता. हा पूल जलवाहतूकीसाठी बनवलेल्या हडसन व हार्लेम नद्यांना जोडणार्‍या मानवनिर्मित कालव्यावर आहे. या द्विस्तरीय पुलाच्या वरच्या स्तरावरून सबवेचा "१" हा मार्ग जातो व खालच्या स्तरावरून जाणारा ब्रॉडवे (US 9) मॅनहॅटन सोडून अमेरिकेच्या मुख्य भूमीवर ३०-३२ किलोमीटर उत्तरेकडे गेल्यावर संपतो. या रस्त्यामुळेच या पुलाला ब्रॉडवे ब्रिज हे नाव पडले आहे.


ब्रॉडवे ब्रिज

या पुलापलीकडे ब्राँक्स प्रभागात कालव्याच्या किनार्‍याला लागून असलेले रेल्वे स्टेशन व रस्त्यापासून तेथे नेणारा वैशिष्ट्यपूर्ण जिना लक्ष वेधून घेत होता...


ब्राँक्स ०४ : ब्रॉडवे ब्रिज जवळचे रेल्वे स्टेशन

जरासे पुढे गेल्यावर कालव्याच्या तासलेल्या उभ्या उजव्या कड्यावर, कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पांढर्‍या रंगाने रंगवलेले प्रचंड आकाराचे "C" हे विद्यापिठाचे आद्याक्षर दिसते...


कालव्याच्या किनार्‍यावरील कड्यावरचे कोलंबिया विद्यापिठाचे अद्याक्षर

हेन्री हडसन ब्रिज व स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज

यानंतर रुंद स्प्युटेन ड्युव्हिल खाडी लागते व तिच्यावरून जाणारा मोठा आणि उंच हेन्री हडसन ब्रिज समोर येतो. हा मॅनहॅटनची पश्चिम किनारपट्टी व फोर्ट ट्रायॉन पार्क यांच्या मधून जाणार्‍या हेन्री हडसन पार्कवेला हा पूल ब्राँक्समध्ये घेऊन जातो. हा पूल एकुलत्या एक भव्य स्टीलच्या वैशिष्ट्यपूर्ण कंसाच्या (आर्क) आकारावर तोलून धरलेला आहे.

या पुलाच्या जवळ स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज नावाचा अ‍ॅमट्रॅक रेल्वेचा एक बसका पूल आहे. १८४९ साली बांधलेला हा पूल लाकडी होता. नंतर १९०० मध्ये त्याचे स्टीलने बांधलेल्या पुलाच्या रूपात नूतनीकरण केले गेले. या पुलावरून दर दिवशी सुमारे तीस रेल्वेगाड्या धडधडत जातात. इतर वेळी नदीच्या मध्यभागी असलेल्या पायाभोवती तो पूल ९० अंशांत गोल फिरवून त्याच्या दोन्ही बाजूंना पर्यटक बोटींच्या वाहतुकीसाठी जलमार्ग खुले केले जातात...


हेन्री हडसन ब्रिज व स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज

आतापर्यंत इतर अनेक चित्रविचित्र मध्यम आकाराच्या व लहान पूलांखालून बोट गेली होती. सगळ्यांचेच मोठे ऐतिहासिक महत्त्व नसले तरी न्यू यॉर्कच्या प्रभागांना जोडून वाहतूक सुसह्य करण्यात सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. त्यातल्या काही प्रेक्षणीय पुलांचे फोटो खाली देत आहे...

  
  
  
  
  
मॅनहॅटनला ब्रूकलीन व ब्राँक्सशी जोडणारे काही प्रेक्षणीय पूल

मॅनहॅटनच्या उत्तर टोकाला वळसा घालून बोट हडसन नदीच्या विशाल पात्रात शिरते व डावीकडे वळून दक्षिण दिशेने जाऊ लागते. आता इथून पुढे डाव्या बाजूला मॅनहॅटनचा तर उजव्या बाजूला न्यू जर्सी राज्याचा, असे दोन दाट झाडीने भरलेले हिरवागार किनारे दिसू लागतात. इथून पुढे हडसन नदीचे (खरे तर, खाडीचे) पात्र आतापर्यंतच्या प्रवास केलेल्या नद्या/खाड्यांच्या मानाने खूपच प्रशस्त आहे. जसजसे आपण पुढे पुढे जातो तसे ते अधिकाधिक विशाल बनत जाते व न्यू यॉर्क सामुद्रधुनीत परावर्तित होते. यापुढच्या प्रवासात न्यू जर्सीच्या किनार्‍याची हिरवाई बर्‍याच प्रमाणात अबाधित राहते, तर मॅनहॅटनच्या किनार्‍यावर इमारतींची गर्दी आणि उंची जास्त जास्त होत जाते.

फोर्ट ट्रायॉन पार्क व क्लॉईस्टर्स संग्रहालय

थोड्याच वेळात डावीकडे अजून एक ओळखीची खूण दिसते... फोर्ट ट्रायॉन पार्कमधल्या टेकडीवरच्या जंगलात दिमाखाने उभे असलेले क्लॉईस्टर्स संग्रहालय त्याच्या मनोर्‍यामुळे लगेच ओळखू येते...


फोर्ट ट्रायॉन पार्क व क्लॉईस्टर्स संग्रहालय

या टेकडीच्या पलीकडे आपले काही काळासाठीचे का होईना, पण घर आहे हे आठवून, त्याबद्दल उगाचच जरासे मस्त वाटले !

जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज

थोडे पुढे गेल्यावर या सफरीतला शेवटचा पूल, जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज, लागतो. हा द्वीस्तरीय टांगता पूल मॅनहॅटनला न्यू जर्सीतील फोर्ट ली शहराशी जोडतो. वरच्या स्तरावर प्रत्येक दिशेला जाणार्‍या ४ लेन आणि खालच्या स्तरावर प्रत्येक दिशेला जाणार्‍या ३ लेन असणारा हा विशाल पूल दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हाच पूल वापरून आम्ही न्यू जर्सीतल्या न्युअर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मॅनहॅटनमध्ये पोचलो होतो. संध्याकाळच्या फोर्ट ट्रायॉन पार्कमधल्या अनेक फेरफटक्यांत याचे मनोहर दर्शन झालेले होते. शिवाय घराशेजारचे रस्ते पालथे घालण्याच्या पदयात्रांपैकी दोनतीनमध्ये याला मॅनहॅटनच्या भूमीवरून पाहिले होतेच. तरीही... किंवा त्यामुळेच... त्याच्याखालून बोटीने जाताना, त्याच्या खर्‍या भव्यतेची नीट कल्पना येत असल्याने, अधिकच मजा वाटत होती...


जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज

रिव्हरसाईड चर्च

तेथून पुढे, जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाशेजारी असलेले, एक उंच सुळक्यासारखे दिसणारे रिव्हरसाईड चर्च आजूबाजूच्या हिरवाईच्या व इमारतींच्या खूप वर डोके... आपलं, मनोरा... उंचावून आपले लक्ष वेधून घेते. निओगोथिक मनोरा असलेले व ४० पेक्षा जास्त ख्रिश्चन पंथांना एकत्रित करणारे हे चर्च, रॉकंफेलर (ज्युनिअर) व पाद्री हॅरी फोस्डिक यांच्या समन्वयाने बांधले गेले. त्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात, या चर्चने अमेरिकेच्या व एकंदरच जगाच्या, न्याय व समतेसाठीच्या, सामाजिक व राजकीय लढ्यांत भरीव योगदान दिले आहे...


रिव्हरसाईड चर्च

इथून पुढे उजव्या बाजूला असलेल्या न्यू जर्सीच्या किनारपट्टीवरची हिरवाई तशीच गर्द आणि मनोहर राहते व बहुतेक इमारती तिच्यात लपलेल्या राहतात. त्याविरुद्ध, डावीकडील मॅनहॅटनच्या इमारतींची उंची क्रमाक्रमाने वाढत जाते आणि नदीकाठच्या पार्क व इतर झाडी त्यांच्या पायाशी लोळताना दिसते. त्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण इमारतींचे हे फोटो...


मॅनहॅटन १४


मॅनहॅटन १५

हडसनचे पात्र खूपच विशाल असल्याने मॅनहॅटन बेटाचा एक पॅनोरामा फोटो काढता आला...


मॅनहॅटन १६ : पॅनोरामा

काही काळाने मध्य-दक्षिण मॅनहॅटनवरच्या बंदराचा भाग सुरू झाला. वैविध्यपूर्ण गगनचुंबी इमारतींच्या आकाशरेखेच्या पार्श्वभूमीवर दिसणार्‍या बंदरातील गमतीजमती पाहत असताना बोट तिच्या धक्क्याला केव्हा लागली हे ध्यानातच आले नाही...


मॅनहॅटन १७ : आकाशरेखा व किनारपट्टीवरील त्रिकोणी इमारत


मॅनहॅटन १८ : आकाशरेखा व धक्क्यावर उभे असलेले अनेक मजली क्रूझशिप


मॅनहॅटन १९ : आकाशरेखा व इंट्रेपिड संग्रहालय (डावीकडून : काँकॉर्ड विमान, विमानवाहू नौका व तिच्यावरील एन्टरप्राइज अवकाशयानाचे पांढर्‍या रंगाचे दालन)

ही सहज गंमत म्हणून केलेली अडीच-तीन तासांची जलसफर अपेक्षेपेक्षा जास्त रोचक आणि नक्कीच चिरस्मरणिय ठरली.

***************

या सफरीच्या काही चलतचित्रे (क्लिप्स) (सर्कल लाइन टूर्सच्या संस्थळावरून साभार)

***************

(क्रमशः )
===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

छान फोटो.
बाकी मजकूर वाचतोय

प्रत्येक फोटो वैशिष्ठ्यपूर्ण व लेखन माहिती देणारे आहे. न्यूयॉर्कदर्शन आवडले.

अजया's picture

4 Dec 2016 - 8:34 pm | अजया

आख्ख्या न्यूयॉर्कची एकाच सफरीत तोंडओळख झाली की!

प्रचेतस's picture

5 Dec 2016 - 8:41 am | प्रचेतस

अहा.
खूपच सुंदर. अतिशय देखण्या इमारती आहेत एकेक.

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2016 - 10:33 pm | सुधांशुनूलकर

स्वतःच जलसफर केल्यासारखं वाटलं.
फोटो मस्तच आहेत, चलतचित्रंही आवडली.

अवांतर - सगळे भाग वाचले आहेत, आणि खूप आवडले आहेत.
लेखमाला मस्त चालली आहे, मोठी असूनही अजिबात कंटाळवाणी नाही, उलट पुढच्या भागात काय असेल याची उत्कंठा असते.

पाटीलभाऊ's picture

6 Dec 2016 - 1:08 pm | पाटीलभाऊ

सुंदर फोटो आणि वर्णन.
मस्त भटकंती...!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2016 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

पद्मावति's picture

7 Dec 2016 - 10:40 pm | पद्मावति

हाही भाग आवडला.