न्यू यॉर्क : २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
8 Jan 2017 - 10:30 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू खूप विचारपूर्वक निवडलेली दिसली... त्यामुळे त्यातली एखादी टाळून पुढे जाणे कठीण जाते. वेळेच्या अभावामुळे तसे करावे लागले की जरासे अपराध्यासारखेच वाटते.

न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन्स ही "National Historic Landmark" असा महत्त्वाचा मान मिळालेली जगातील सर्वात मोठी वनस्पतीशास्त्रिय संशोधन आणि संवर्धन करणारी संस्था आहे. या उद्यानाची व आजूबाजूची बहुतेक सर्व जमीन तंबाखूच्या व्यापारात गडगंज संपत्ती मिळवणार्‍या लोरिलार्ड (Lorillard) कुटुंबाच्या मालकीची होती. न्यू यॉर्क शहर प्रशासनाने यापैकी विकत घेतलेल्या जागेवर हे उद्यान व ब्राँक्स प्राणिसंग्रहालय निर्माण केले. उद्यानाला लागून असलेल्या, त्याच कुटुंबाच्या जागेवर, सेंट जॉन्स कॉलेज स्थापन केले गेले, जे वर्धिष्णू होत आजच्या घडीला फोर्डहॅम विद्यापीठात विकसित झाले आहे.

कोलंबिया विद्यापीठातील वनस्पतिशास्त्रज्ञ नाथानील ब्रिटन आणि त्यांची पत्नी गर्ट्रूड ब्रिटन यांनी लंडनमधील जगप्रसिद्ध रॉयल बोटॅनिकल गार्डन्सपासून (क्यू गार्डन्स) स्फूर्ती घेऊन या उद्यानाच्या निर्माणात पुढाकार घेतला होता. टोरी बोटॅनिकल क्लब (Torrey Botanical Club) आणि ब्रिटन पतिपत्नी यांच्या निधी उभारण्यासाठी केलेल्या मोहिमांतून या उद्यानाला निर्माण करण्यासाठी लागणारे धन उभारले गेले. सन १८९१ साली जनतेसाठी खुले झालेल्या या उद्यानाला सन १९६७ साली "National Historic Landmark" हा दर्जा मिळाला. या उद्यानाने २०१६ मध्ये त्याचा १२५ वा वाढदिवस साजरा केला.

या संस्थेचे मिशन स्टेटमेंट असे आहे :
The New York Botanical Garden is an advocate for the plant kingdom. The Garden pursues its mission through its role as a museum of living plant collections arranged in gardens and landscapes across its National Historic Landmark site; through its comprehensive education programs in horticulture and plant science; and through the wide-ranging research programs of the International Plant Science Center.

ब्राँक्स उपनगरातील २५० एकरावर पसरलेल्या या उद्यानातील असंख्य संग्रहात मिळून सुमारे १० लाख वनस्पती आहेत. या उद्यानात सुमारे ५० वैशिष्ट्यपूर्ण बगिचे आणि वनस्पतीसंग्रह आहेत. या संस्थेत २०० पूर्णवेळ संशोधक व ८० पीएचडीचा अभ्यास करणारे विद्यार्थी कार्यरत आहेत. उच्च कोटीचे संशोधन करण्यासाठी येथे एक अत्याधुनिक (स्टेट-ऑफ-आर्ट) आण्विक प्रयोगशाळा (मोलिक्युलर लॅब) आहे. येथील संशोधक ४९ देशांतील वनस्पतीसंशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करत आहेत. ते जगभर फिरून नवनवीन वनस्पतींना शोधण्याचे कामही करतात. त्यांच्या संशोधनामागे वनस्पतींचा अन्न, औषधे आणि ऊर्जा यासाठी उपयोग करणे हे सुद्धा एक महत्त्वाचे उद्येश असतात.

दरवर्षी या उद्यानाला सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात. येथे वर्षभर प्रसंगानुरुप खास वनस्पती प्रदर्शनेही भरवली जातात. याशिवाय ही संस्था नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनेक शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमही सतत आयोजित करते. यासाठी ती वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, आरोग्यवर्धक अन्न, इत्यादी अनेक विषयांवरील कार्यशाळा आयोजित करते व मान्यताप्राप्त अभ्यासक्रम असलेले शिक्षणही देते. याचा फायदा दर वर्षी ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांना होतो.

तर एका सकाळी सज्जड न्याहरी करून हे उद्यान बघायला बाहेर पडलो. ब्राँक्स आमच्या घरापासून उत्तर-पूर्वेला असल्याने सबवेऐवजी बस हा चांगला पर्याय होता. त्यानिमित्ताने ब्राँक्सचे दर्शन झाले. ब्राँक्स हा न्यू यॉर्क शहराचा तुलनेने गरीब प्रभाग आहे. इथे इतर प्रभागांसारख्या उंच इमारती फार कमी आहेत. मुख्य बाजारपेठेत तर बहुतेक इमारती दोन-तीन मजलीच आहेत. भपकेदार शोरूम्सचाही अभाव आहे. मात्र, हिरवाईची मात्र इथेही फारशी कमी नाही.

उद्यानाच्या दिशेने जाताना बसमधून दिसलेले ब्राँक्स हे असे होते...


ब्राँक्स ०१ब्राँक्स ०२ब्राँक्स ०३ : बसमधून दिसलेला फोर्डहॅम विद्यापीठ परिसर


बसच्या थांब्यापासून प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी उद्यानाला जवळ जवळ एक किलोमीटरची फेरी मारून जायला लागले. ते करताना उजवीकडे उद्यान आणि डावीकडच्या रस्त्यापलीकडे असलेला फोर्डहॅम विद्यापीठाचा तितकाच झाडीने भरलेला हिरवागार परिसर दिसत होता...


ब्राँक्स ०४ : उद्यानाच्या कडेने चालताना दिसलेला फोर्डहॅम विद्यापीठ परिसर


गुगलबाबा उद्यानाचे प्रवेशद्वार या दिशेला आहे असे दाखवतोय खरे, पण ते नक्की या बाजूलाच आहे ना ? की उगाच पायपीट करवतोय ? असे विचार मनात येत असतानाच उद्यानाच्या कुंपणावर त्याच्या नावाची पाटी आणि प्रवेशद्वार समोर आहे आणि हायसे वाटले...


न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन्सचे प्रवेशद्वार


आत शिरून तिकिट काढून उद्यानाच्या आवारात शिरल्या शिरल्या हा १०० वर्षे वयाचा हिमालयन पाईन (Pinus wallichiana) समोर आला आणि आपल्या गावचा भिडू पाहून नाही म्हटले तरी जरा बरे वाटलेच ! याचा विशेष म्हणजे याच्या सुईसारख्या पानांची लांबी एक फूटभरापर्यंत असते...

  
हिमालयन पाईन (Pinus wallichiana)


हे उद्यान फारच आखीव रेखीव आहे, अंतर्गत रस्ते डांबरी आणि रुंद आहेत. उद्यानात फिरण्यासाठी विद्युत ऊर्जेवर चालणार्‍या टायरवाल्या पर्यटक गाड्यांची ट्रेन धावत असते. तिने प्रवास करताना पर्यटक कोणत्याही थांब्यावर चढू-उतरू शकतात. तरीही इतक्या सुंदर परिसराचे गाडीत बसून धावते दर्शन करण्याऐवजी सुरुवातीला प्रवेशद्वारापासूनची ठिकाणे पाहत पाहत चालत पुढे जावे आणि पाय तक्रार करू लागल्यावर गाडीचा आधार घ्यावा असे ठरवून वाटचाल सुरू केली...


आखीवरेखीव उद्यानाचे प्रथमदर्शन


जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डन

प्रवेशद्वाराच्या पासून डावीकडे वळल्यावर थोड्याच अंतरावर जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डन आहे. उन्हाळ्यात फुललेले रंगीबेरंगी फुलोरे पाहून पाय आपोआप तिकडे वळले. हा उघड्यावरचा बगिचा असला तरी विविध हवामानात वाढणार्‍या वनस्पतींचे अनेक संग्रह त्यात आहेत. वनस्पतींच्या बहरात येण्याच्या ऋतूवरून त्या विभागांना कूल रूम, हॉट रूम, फॉल रूम, बॉग रूम (पाणथळ जमिनीत वाढणार्‍या वनस्पतींचा विभाग) अशी नावे दिलेली आहेत. अर्थातच, येथे वर्षभर ऋतुमानानुसार कोणत्या ना कोणत्या "रूम"मध्ये आकर्षक फुले-वनस्पती बहरलेल्या असतात...


पेरेनियल गार्डन ०१


पेरेनियल गार्डनमध्ये फुललेले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती...

  

  

  
जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डनमधील काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१


    
जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डनमधील काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२


एनिड ए हाऊप्ट वनस्पतीसंरक्षकगृह (काँझरव्हेटरी)

या बगिच्याला लागूनच एक प्रशस्त वनस्पतीसंरक्षकगृह (काँझरव्हेटरी) आहे. ब्रिटन दांपत्याने लंडनच्या क्यू गार्डनमधील पाम हाउस आणि हाईंड पार्कमधील क्रिस्टल पॅलेस या इमारतींपासून प्रेरणा घेऊन एका स्थानिक ग्रीन हाउस बनवणार्‍या कंपनीकरवी याचे काम करून घेतले आहे. घडीव लोखंडी जाळ्यांच्या व काचांच्या रचनेने बनवलेले, अठराशे नव्वदीच्या इटॅलियन रेनेसाँ शैलीत बनवलेले हे वैशिष्ट्यपूर्व वनस्पतीसंरक्षकगृह १९०२ साली जनतेसाठी खुले झाले. त्यानंतर त्याला अत्याधुनिक ठेवण्यासाठी आजतागायत चारदा पुनर्निमाणाची मोठी कामे केली गेली आहेत.

लांबट इंग्लिश 'C' अक्षराच्या आकाराच्या या इमारतीमध्ये शिरल्यावरच तिच्या भव्यतेची कल्पना येते. तिच्यात आपण जसजसे पुढे पुढे जात राहतो, तसतसे आपण इमारतीत नसून एखाद्या छोट्याश्या जंगलातच फिरत असल्याचा भास होऊ लागतो. त्यातली काही आकर्षक क्षणचित्रे खाली देत आहे.

(अ) वर्षारण्य विभाग


वर्षारण्य विभाग ०१वर्षारण्य विभाग ०२


       
वर्षारण्य विभाग ०३ व ०४


काही ठिकाणी वनस्पतीभांडाराचे विहंगमावलोकन करण्यासाठी उंचावरचे निरिक्षणमनोरे केलेले आहेत...


वर्षारण्य विभाग ०५ : निरिक्षणमनोर्‍याकडे नेणारे जिने


वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती...

  

  
वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१


    

    

    
वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२


(आ) वाळवंटी विभाग

  

  
वाळवंटी विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१


    
वाळवंटी विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२


(इ) ऑर्किड विभाग


ऑर्किड विभागाच्या सुरुवातीला एका काचेच्या दालनात असलेली आकर्षक पुष्परचना


  

  


ऑर्किड विभागातले काही आकर्षक फुलोरे ०१


    

    
ऑर्किड विभागातले काही आकर्षक फुलोरे ०२


पुढच्या विभागात विविध रंगांचे आणि आकारांचे वौशिष्ट्यपुर्ण फुलोरे असलेल्या वनस्पतींचे आकर्षक वाफे होते...

  

  

  

  

  
विविध रंगांचे आणि आकारांचे वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे असलेल्या वनस्पतींचे आकर्षक वाफे ०१


त्यातला हा एक मला खास आवडलेला वाफा...


मला खास आवडलेला अनेक वैशिष्ट्यपुर्ण फुलोर्‍यांचा वाफा ०२


बहुतेक सर्व वनस्पती पूर्ण बहरात येऊन आपल्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या फुलोर्‍यांची उधळण करताना दिसत होत्या. त्यापैकी अजून काही खास आकर्षक फुलोरे...

    

    

    
वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०१


  

  

  

  
वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०२


काँझरवेटरीतील फुलोर्‍यांच्या आकारांची आणि रंगांची विविधता केवळ वेड लावणारी होती ! काय बघू आणि काय नको असे झाले होते. तेथून पाय निघायला मागत नव्हते. पण, अजून बरेच काही बघायचे होते त्यामुळे बाहेर पडून पुढे निघालो.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Jan 2017 - 8:38 am | प्रचेतस

हा भागही सुंदर.
जैवविविधता उत्तम प्रकारे जपलीय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2017 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद, प्रचेतस !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2017 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी धन्यवाद !