न्यू यॉर्क : २७ : रॉकंफेलर सेंटर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
31 Jan 2017 - 11:04 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

मॅनहॅटन बेटाच्या मध्यभागात (midtown) २२ एकर (८९,००० चौ मीटर) क्षेत्रफळावरच्या सहा ब्लॉक्सच्या जागेवर १९ गगनचुंबी इमारती मिळून बनलेले रॉकंफेलर सेंटर नावाचे एक विशाल व्यापारी संकुल आहे. यातल्या इमारतींतली जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७४३,००० चौ मी (८,०००,००० चौ फू) इतके मोठे आहे. या संकुलात केवळ व्यापारी जागाच नाही तर बगिचे, थिएटर्स, स्केटिंग रिंक, जमिनीखालच्या एकमेकाला छेदणार्‍या मार्गांच्या जाळ्यामध्ये सुमारे २०० दुकाने, रेस्तराँ आणि चक्क सबवेचा एक थांबा पण आहे. या संकुलात रेडिओ सिटी म्युझिक हॉल, एन बी सी या दूरदर्शन संस्थेच्या "टुडे" नावाच्या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण करणारा स्थायी स्टुडिओ, इत्यादी गोष्टी आहेत. हे कमी झाले की काय म्हणून, इमारतींच्या बहिर्भागावर आणि इमारतींच्या व्हरांड्यांच्या भिंतींवर, हे संकुल अजून आकर्षक बनविणारी अनेक चित्र व शिल्पकलेचे नमुने आहेत. याशिवाय, येथे वर्षभर प्रसंगानुरूप अनेक रोचक कार्यक्रम साजरे केले जातात. या संकुलात ख्रिसमसनिमित्त केलेली सजावट आणि रोषणाई पहायला लोक मोठ्या संख्येने आवर्जून जातात. अश्या अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींनी भरलेल्या या जागेला "सिटी विदिन अ सिटी" असे अभिमानाने म्हटले जाते. एक मिनिटाचीही उसंत न घेता २४ X ७ चालू असलेले हे संकुल वर्षभर गजबजलेले असते.

सन १९८८ मध्ये या संकुलाला National Historic Landmark हा दर्जा दिला गेला आहे. या जागेची पर्यटकांमधली लोकप्रियता केवळ खरेदीसाठीच नव्हे तर कला, क्रीडा, खवय्येगिरी व मनोरंजन या कारणांसाठीही आहे. मोठ्या संखेने असलेली आकर्षणे न चुकवता या संकुलाची फेरी मारायची असल्यास मार्गदर्शकासह असलेल्या सहलीसुद्धा उपलब्ध आहेत.

सन १९२९ मध्ये, जॉन डी रॉकंफेलर (धाकला) नावाच्या त्या काळाच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणसाच्या मुलाने हे संकुल उभे आहे ती जागा कोलंबिया विद्यापीठाकडून दीर्घ मुदतीच्या करारावर (लीज) घेतली. १९व्या शतकाच्या शेवटी न्यू यॉर्क शहरातल्या सधन समजल्या जाणार्‍या या भागाला १९२०च्या दशकापर्यंत उतरती कळा लागली होती. कराराच्या वेळेस हा भाग अवैध दारूची दुकाने आणि पब्ज, वेश्यागृहे आणि छोट्या छोट्या खोल्यांच्या बसक्या इमारतींच्या रांगांनी (rooming houses) भरलेला होता. त्याला उर्जितावस्तेत आणण्याच्या उद्येशाने रॉकंफेलरने तो ताब्यात घेतला होता. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग म्हणून संगीत नाटकांचे रंगमंदिर (ऑपेरा हाउस) बांधण्यासाठी या जागेचा एक महत्त्वाचा भाग त्याने एका ऑपेरा कंपनीला देऊ केला. त्याच वर्षी, म्हणजे १९२९ मध्ये, प्रचंड आर्थिक मंदीचे संकट अमेरिकेवर कोसळले. त्यामुळे ऑपेरा कंपनीने त्या प्रकल्पातून आपले अंग काढून घेतले. रॉकंफेलर (धाकला)च्या अंगावर मोठे लीज पडले होते आणि तेथे विकासकाम करायला मोठा भागीदार मिळणे दुरापास्त झाले होते. पण अश्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रकल्प बाद करण्याचे सल्ले धुडकारून, त्याने सर्व जुने आराखडे बाद केले आणि त्या जागेवर स्वतःच्या बळावर एक व्यापारी महासंकुल बनवण्याचे ठरविले.


हे सेंटर बांधण्याचा निर्णय घेतानाची जॉन डी रॉकंफेलर (धाकला)ची मन:स्थिती दाखविणारा फलक

आपले नवीन मनसुबे सिद्धीस नेण्यासाठी जॉन डी रॉकंफेलर (धाकला)ने कोलंबिया विद्यापीठाबरोबर (पहिली २७ वर्षे आणि नंतर २१ वर्षांच्या तीन मुदतवाढी असा) एकूण ८७ वर्षांसाठी जमिनीच भाडेकरार (लीज) केला; स्वतःच्या जबाबदारीवर Metropolitan Life Insurance Company कडून कर्ज उभे केले आणि स्वतःच्या मालकीचे तेल कंपन्यांतील समभाग विकले. सन १९३१ साली कामाला सुरुवात झाली आणि या संकुलातल्या पहिल्या १२ इमारती १९४० साली पूर्ण झाल्या. हा आधुनिक काळातला जगातल्या सर्वात मोठा खाजगी बांधकाम प्रकल्प असल्याचे म्हटले जाते.

या प्रकल्पातील एका इमारतीच्या नावामागे एक रोचक इतिहास आहे. दुसर्‍या महायुद्धापूर्वी तयार झालेल्या शेवटच्या चार इमारतींपैकी एकीला काय नाव द्यावे याचा विचार चालू होता. जर्मन व्यापारी कंपन्यांना ती भाड्याने देऊन तिचे Deutsches Haus (जर्मन गृह) असे नामकरण करण्याचा एक प्रस्ताव होता. मात्र, हिटलरच्या नाझी जर्मनीची दुसर्‍या महायुद्धाच्या दिशेने चाललेली वाटचाल पाहून जॉनने त्याला आक्षेप घेतला. जॉनने तसे केले नसते तर, काही काळाने युद्ध सुरू झाल्यावर, हा सर्व प्रकल्पच वादग्रस्त ठरला असता. त्या इमारतीचे International Building North असे नामकरण करण्यात आले. ही इमारत अमेरिका आणि मुख्यतः ब्रिटिश व इतर दोस्त राष्ट्रांच्या हेरगिरीच्या समन्वयाचे मुख्य केंद्र बनले. तिच्यातले ३६०३ क्रमांकाचे दालन दोस्त राष्ट्रांच्या Allied intelligence नावाच्या हेरसंस्थेचे मुख्यालय होते. युद्ध संपल्यावर Allied intelligence चे रूपांतर Central Intelligence Agency (CIA) मध्ये झाले व ३६०३ क्रमांकाचे दालन सीआयएचा पहिला मुख्य अ‍ॅलन डलेस याचे कार्यालय झाले !

हा व्यापारी प्रकल्प असल्याने त्याला स्वतःच्या कुटुंबाचे नाव देण्यासाठी जॉनचा विरोध होता. पण या प्रकल्पाला "Rockefeller Center" असे नाव दिल्यास जास्त चांगले आणि जास्त संख्येने भाडेकरू मिळतील या मुद्द्यावर "पब्लिक रिलेशन्स पायोनियर" म्हणून ओळखल्या जाणार्‍या आयव्ही ली ने त्याची संमती घेतली.

अश्या रितीने, एका माणसाच्या जिद्दीतून, "रॉकंफेलर सेंटर" या अमेरिकेतील सर्वात मोठ्या खाजगी व्यापारी संकुलाचा जन्म झाला ! एवढेच नव्हे तर, या एका महाप्रकल्पामुळे, आर्थिक मंदीच्या कालात ४०,००० बांधकाम कर्मचार्‍यांना नोकर्‍या मिळाल्या आणि एका अर्थाने रॉकंफेलरने न्यू यॉर्क शहरातील बांधकाम व्यवसायाला जीवनदान दिले.

कोलंबिया विद्यापीठाने या संकुलाची जागा १९८५ मध्ये रॉकंफेलर ग्रुपला $४० कोटीला विकली. १९८९ मध्ये Mitsubishi Estate ने रॉकंफेलर ग्रुपसकट रॉकंफेलर सेंटर विकत घेतले. त्यानंतर १९९६ मध्ये हे संकुल जेरी स्पेयरच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांच्या एका गटाने विकत घेतले. सन २००० मध्ये शिकागोमधील लेस्टर क्राऊन कुटुंबाने या संकुलातील मुख्य १४ इमारती $१८५ कोटींना विकत घेतल्या.

चला तर, अमेरिकेच्या व्यापारी इमारतींच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, रॉकंफेलर सेंटरची सफर करायला.


सहा ब्लॉक्सवर विस्तारलेल्या रॉकंफेलर सेंटरमधल्या इमारतींचा नकाशा व त्यांच्यातील आकर्षणे :
१. कॉमकास्ट बिल्डिंग, २. आईस स्केटिंग रिंक आणि पॉल मॅनशिपचे 'प्रोमेथेउस' शिल्प, ३. रॉकंफेलर क्रिडो,
४. कारंजी, ५. छतावरचे बगिचे, ६. प्रोमोनेड व चॅनेल गार्डन्स, ७. इंटरनॅशनल बिल्डिंग,
८. ली लॉरीचे 'अ‍ॅटलास' शिल्प, ९. मिचिओ इहाराचा 'लाइट अँड मुव्हमेंट' चा खेळ,
१०. चार्ल्स लिंडबर्गचा अर्धपुतळा, ११. ली लॉरीची 'स्टोरी ऑफ मॅनकाईंड', १२. बँक ऑफ अमेरिका,
१३. रेडिओ सिटी म्युझिक हॉल, १४. बॅरी फॉल्कनरचे 'इंटेलिजन्स अवेकनिंग' मोझेइक,
१५. NBC च्या 'Today' शो चा स्टुडिओ, १६. इस्टर्न एअरलाईन बिल्डिंग, १७. मूळ 'टाइम-लाईफ' बिल्डिंग,
१८. होजे मारिया सर्टचे 'मॅन्स इंटेलेक्चुअल मास्टरी ऑफ द मटेरियल युनिव्हर्स' शिल्प, १९. बार सिक्स्टी फाईव्ह, २०. काँकोर्स, २१. रिदम्स ऑफ इन्फिनिटी
(रॉकंफेलर सेंटरच्या माहितीपत्रकावरून साभार)

कॉमकास्ट (Comcast) बिल्डिंग

ही या सेंटर मधली सर्वात पहिली इमारत. इथे 'मेट्रोपोलिटन ऑपेरा हाउस' बांधायचे ठरले होते. त्या योजनेचा प्लॅन प्रशासनाने पास केल्यानंतर तो मनसुबा कसा फिसकटला याबद्दल वर आले आहेच. त्याच सुमारास डेविड सारनॉफ हा 'रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका (RCA)' चा अध्यक्ष त्याच्या कंपनीच्या NBC नावाच्या नवीन उपकंपनीसाठी जागेच्या शोधात होता. NBC ला तिच्या दोन रेडिओ स्टेशन्ससाठी आणि चलतचित्रपट/नाटक यांच्यासाठी खास सोयी असलेल्या थिएटरसाठी इमारत हवी होती. त्यानुसार ही इमारत "एलीट प्रकारातला क्लास A" शैलीत बांधली आणि सजवली गेली. तिची रचना अशी आहे की भाड्याने दिलेली कोणतीही जागा बाहेरून आत येणार्‍या नैसर्गिक प्रकाशापासून २७.५ फुटांपेक्षा जास्त दूर नाही. आजच्या घडीला NBC च्या ९ प्रमुख दूरदर्शन स्टुडिओंनी या इमारतीचे २४ मजले व्यापलेले आहेत. त्यात 'Saturday Nite Live' हा प्रसिद्ध कार्यक्रम प्रसारित करणारा 8H हा स्टुडिओही येतो. या इमारतीच्या मुख्य भाडेकरूंच्या वरून तिचे "RCA and GE Building" असे नाव पडले होते. २०१५ मध्ये ते बदलून 'Comcast Building' असे केले गेले.

या इमारतीच्या दर्शनी भागावर चुनखडीचा दगड आणि काच वापरून ली लॉरी या कलाकाराने बनवलेली आकर्षक शिल्पे आहेत...


कॉमकास्ट बिल्डिंगच्या दर्शनी भागावरची शिल्पे

यातले मध्यभागातील मुख्य शिल्प मानवी ज्ञानाचा उपयोग करून निसर्गनियमांचे विश्लेषण करणारी हुशारी (विसडम) दर्शविते. त्यात हुशारी (विसडम) मानवी व्यक्तिरेखेच्या रूपात प्रकाश आणि ध्वनीच्या लहरी कोरलेल्या २४० पायरेक्सच्या तुकड्यांपासून बनवलेल्या पडद्याकडे निर्देश करते आहे. त्या पडद्यावर "Wisdom and knowledge shall be the stability of thy time" हे बायबलमधले वचन कोरलेले आहे. मुख्य शिल्पाच्या दोन बाजूला प्रकाश आणि ध्वनी यांना दर्शविणारी शिल्पे आहेत.

आईस स्केटिंग रिंक आणि पॉल मॅनशिपचे 'प्रोमेथेउस' शिल्प

कॉमकास्ट बिल्डिंगच्या समोरचा रॉकंफेलर प्लाझा (गाड्यांना बंदी असलेला रस्ता) ओलांडून गेलो की समोर एक अमेरिकन ध्वजांच्या रांगेने वेढलेली जमिनीच्या खालच्या स्तरावर असलेल्या चौकोनी जागा व तिच्यापर्यंत पोचवणार्‍या पायर्‍या आहेत. या जागेवर उन्हाळ्यात उघडे रेस्तराँ असते आणि तिथे हिवाळ्यात एका वेळेस १५० खेळाडूंना सामावून घेईल इतकी मोठी जागतिक स्तराची आईस स्केटिंग रिंक बनवतात ! गंमत म्हणजे आजच्या घडीला वर्षभर पर्यटकांनी गजबजलेली ही जागा सेंटरच्या मूळ आराखड्यातील एका अपयशी कल्पनेतून जन्मली आहे. सुरुवातीला या सखल जागेच्या चारी भिंतींना लागून छोट्या दुकानांच्या रांगा होत्या. सन १९३९ पर्यंत वरखाली जाण्यासाठी या जागेला एकाच बाजूला पायर्‍यांची व्यवस्था असल्याने ही जागा पर्यटकांना अडचणीची वाटे. त्यामुळे तेथे फारशी वर्दळ नसे. १९३६ सालच्या हिवाळ्यात तेथे प्रायोगिक तत्त्वावर एक आईस स्केटिंग रिंक बनविण्यात आली. ही नवी कल्पना इतकी लोकप्रिय झाली की ती सेंटरचे सौंदर्य आणि उत्पन्न वाढवणारे स्थायी आकर्षण बनली.


कॉमकास्ट बिल्डिंगसमोरून दिसणार्‍या स्केटिंग रिंकसभोवतालच्या अमेरिकन ध्वजांच्या रांगा


उन्हाळ्यातले स्केटिंग रिंकच्या जागेवरचे "समर गार्डन अँड बार" रेस्तराँ


हिवाळ्यातली आईस स्केटिंग रिंक (जालावरून साभार)

या सखोल भागाच्या एका बाजूला, अग्नी घेऊन उडत येणार्‍या प्रोमेथेउसचे सोनेरी रंगाचे पितळी शिल्प आपले लक्ष वेधून घेते. त्याच्या पार्श्वभागी कारंज्याची सजावट आहे. प्रोमेथेउस नावाच्या देवाने मानवाची निर्मिती केली आणि त्याच्याकरिता ऑलिंपस पर्वतावरून अग्नी चोरून आणला अशी कथा ग्रीक पुराणात आहे.


प्रोमेथेउसचे सोनेरी रंगाचे पितळी शिल्प

ख्रिसमसनिमित्त उभारलेल्या जाण्यार्‍या भव्य झाडासाठी हे प्रोमेथेउसचे शिल्प आधार म्हणून वापरले जाते. ते झाड आणि स्केटिंग रिंकच्या आजूबाजूला केलेली ख्रिसमसनिमित्त केलेली सजावट व रोषणाई पाहण्यासाठी दरवर्षी येथे मोठी गर्दी होते...


रॉकंफेलर सेंटरमधील ख्रिसमस ०१ : दिव्यांची रोषणाई (जालावरून साभार)


रॉकंफेलर सेंटरमधील ख्रिसमस ०२ : सजावट (जालावरून साभार)

रॉकंफेलर प्लाझा, प्रोमोनेड, कारंजी व चॅनेल गार्डन्स

तीन इमारतींच्या दोन रांगामधील जागेमध्ये रॉकंफेलर पादचारी प्लाझा आहे. तेथे फुलझाडांच्या सुंदर मांडणीमध्ये पर्यटकांना बसायची व्यवस्था केलेली आहे...


रॉकंफेलर प्लाझा

स्केटिंग रिंकच्या पुढे 'फ्रेंच बिल्डिंग' व 'ब्रिटिश एम्पायर बिल्डिंग' या दोन इमारतींच्यामध्ये असलेली २०० फूट लांब आणि ६० फूट रुंद जागा कारंजी, शिल्पे आणि बगिच्यांनी सुशोभित केली आहे. सेंटरच्या परिसरात भटकताना खिनभर बसून त्या सौंदर्याचा आस्वाद घेत पर्यटक श्रमपरिहार करताना दिसतात...

  
प्रोमोनेड, कारंजी व चॅनेल गार्डन्स

ली लॉरीचे 'अ‍ॅटलास' शिल्प

इंटरनॅशनल बिल्डिंगचा आकार इंग्लिश अक्षर 'C' सारखा आहे. त्या 'C' च्या पाचव्या अव्हेन्यूकडील चौकोनी खोबणीत ली लॉरीने बनवलेले 'अ‍ॅटलास' शिल्प आहे. हे या सेंटरमधील सर्वात मोठे शिल्प आहे. १५ फूट उंचीचे, १४००० पाउंड वजनाचे व ९ फूट उंच पायथ्यावर उभे असलेले हे प्रभावी शिल्प अ‍ॅटलासच्या ताकदीची पुरेपूर कल्पना करून देते...


ली लॉरीचे 'अ‍ॅटलास' शिल्प

सेंटरमधील इतर कलाकृती

वरच्या वर्णन केल्याशिवाय इतरही अनेक कलाकृती या सेंटरच्या परिसरात फिरताना दिसतात. त्यापैकी काहींची छायाचित्रे...

  
       
       
सेंटरच्या परिसरातील इतर कलाकृतींपैकी काही

रेडिओ सिटी म्युझिक हॉल

रेडिओ सिटी म्युझिक हॉल हे अमेरिकेतील सर्वात मोठे व प्रसिद्ध थिएटर आहे. त्याअंतर्गत पूर्ण वेळ काम करणार्‍या सिंफनी ऑर्केस्ट्रा, ग्ली क्लब आणि बॅले कंपनी या संस्था आहेत. या संस्थांनी १९२९ ते १९३९ च्या आर्थिक महामंदीच्या काळात आणि नंतरही हजारो कलाकारांना आश्रय दिला आहे. त्यानंतर काळानुसार बदलत म्युझिक हॉलला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी चलतचित्रपट प्रदर्शित करणे भाग पडले. हल्ली तेथे लाइव्ह कंन्सर्ट्स, वार्षिक बक्षीस समारंभ आणि इतर कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात.


रेडिओ सिटी म्युझिक हॉलच्या दर्शनी भागावरची नृत्य, नाट्य आणि संगीत दर्शविणारी चिन्हे


रेडिओ सिटी म्युझिक हॉल इमारत


रेडिओ सिटी म्युझिक हॉलचा अंतर्भाग (जालावरून साभार)

'द रॉक' वरचे आरोहण

'कॉमकास्ट बिल्डिंग' किंवा '३० रॉकंफेलर सेंटर' ही इमारत अजून एका महत्त्वाच्या कारणामुळे या संकुलाचा मध्यबिंदू समजली जाते. या २६६ मीटर व ७० मजली उंच इमारतीच्या ६७, ६९ व ७० व्या मजल्यावर निरीक्षण डेक आहे. ७० व्या मजल्यावरील डेकवरून चारी बाजूच्या न्यू यॉर्क शहराच्या परिसराचे निरीक्षण करता येते.

कॉमकास्ट बिल्डिंगच्या तळमजल्यावरील 'टॉप ऑफ द रॉक" स्वागतकक्षातल्या तिकिटघराकडे जाताना लागणार्‍या लॉबीच्या भिंतींवर अनेक चित्रे आहेत. त्यात ९९ चौ मी (१०७१ चौ फूट) आकाराचे "Man at the Crossroads" नावाचे भित्तिचित्र दिएगो रिवेरा नावाच्या समाजवादी कलाकाराने काढले होते. मूळ रेखाटनांमध्ये नसलेले 'मॉस्कोमधील मे दिवस' आणि 'लेनिनची छबी' या दोन तपशिलांचा रिवेराने चित्रात समावेश केल्याने ते अर्थातच वादग्रस्त ठरले. त्या तपशिलांना बदलून निनावी इसमांचे चेहरे रंगवायचे आदेश रिवेराला दिले गेले. त्याने ते धुडकावून लावले त्यामुळे त्याला कामावरून बरखास्त केले गेले. त्याच्या चित्रात बदल करून ते वाचवायचे प्रयत्न असफल झाल्यामुळे, ते नष्ट करण्यात आले. नंतर त्या जागी जोसेफ मारिया सर्ट या कलाकाराकरवी "American Progress" नावचे चित्र काढून घेण्यात आले. या चित्रात आधुनिक अमेरिकेच्या विकासाचे चित्रीकरण आहे. याशिवाय, त्या चित्रात अब्राहम लिंकन, महात्मा गांधी आणि राल्फ वाल्डो इमर्सन यांचे चेहरे आहेत...


'अमेरिकन प्रोग्रेस' भित्तिचित्र ०१


'अमेरिकन प्रोग्रेस' भित्तिचित्र ०२

तिकिटघराच्या दालनाच्या छताखाली शेकडो लोलक वापरून बनवलेली आकर्षक रचना आणि दोन मजली उंचीचे झुंबर आहे...

  
तिकिटघरातली लोलकांची आकर्षक रचना आणि दोन मजली उंचीचे झुंबर

'द रॉक' च्या निरीक्षण मजल्यांवर नेणार्‍या स्काय शटल नावाच्या उद्वाहकात शिरण्याअगोदर रॉकंफेलर सेंटरच्या बांधकामाच्या इतिहासाचा एक छोटासा चलतचित्रपट दाखवला जातो...


रॉकंफेलर सेंटर बांधताना जेवणाच्या वेळेत घेतलेले कामगारांचे हे प्रकाशचित्र खूपच गाजले आहे (जालावरून साभार)

त्यानंतर अतिजलद स्काय शटल आपल्याला एक मिनिटापेक्षा कमी वेळात ६७ व्या मजल्यावर घेऊन जातो. ६७ आणि ६९ मजल्यावरून बंद इमारतीच्या खिडक्यांतून आपल्याला परिसर पाहता येतो. ७० व्या उघड्या मजल्यावरून चारी बाजूचा नजारा मोकळेपणे पाहता येतो. ही इमारत मध्य मॅनहॅटनच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे तिच्या उत्तरेकडे असलेला सेंट्रल पार्क आणि दक्षिणेकडील गगनचुंबी इमारतींसह चारी बाजूंचे विहंगमावलोकन करण्यासाठी तिचे स्थान मोक्याचे आहे.

टॉप ऑफ द रॉकवरून काढलेली काही प्रकाशचित्रे...


उत्तरेकडे गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर दिसणारा सेंट्रल पार्क


दक्षिणेकडे काँक्रिटच्या घनदाट गगनचुंबी जंगलातही मान उंचावून ताठ उभी असलेली टोकदार एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तिच्या पलीकडे उजवीकडे दूरवर दिसणारे 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर'


८६ व्या धक्क्यावर असलेले इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय


मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारती, त्यांच्या पलीकडे इस्ट नदी आणि तिच्या पलीकडील ब्रूकलीन


रॉकंफेलर सेंटरजवळच्या गगनचुंबी इमारतींच्या गोतावळ्याचे विहंगमावलोकन


७० व्या मजल्यावरून ६८ व्या मजल्यावरील गॅलरीचे आणि इमारतीच्या आजूबाजूचे होणारे दर्शन


हडसन नदीचे मुख आणि त्यातली एलिस व लिबर्टी बेटे

    
काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती : ०१ : १. "४३२, पार्क अ‍ॅव्हन्यू" ही जगातली सर्वात उंच रहिवासी इमारत ; २. सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल; ३. मेटलाईफ या विमाकंपनीची इमारत व तिच्या पलीकडील टोकदार घुमट असलेली क्रायस्लर बिल्डिंग

  
इतर काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती : ०२

निरीक्षण डेकच्या मजल्यांवरून ३६० अंशातले सर्व दृश्य पुरेपूर पाहून नजरेचे आणि कॅमेर्‍याचे पोट भरल्यावर 'द रॉक' वरचे आरोहण संपवून आम्ही खाली उतरलो आणि पोटोबा करायला रेस्तराँ शोधू लागलो.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर… २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

फोटो आणि वर्णन दोन्हीही आवडले.

माझीही शॅम्पेन's picture

1 Feb 2017 - 1:17 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम वर्णन आणि सुरेख फोटो

सिरुसेरि's picture

1 Feb 2017 - 6:31 pm | सिरुसेरि

उत्तम परिचय आणी छान फोटो

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Feb 2017 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

अनिंद्य's picture

14 Feb 2017 - 3:39 pm | अनिंद्य

- छान ओळख होत आहे न्यू यॉर्क परिसराची
- येत्या एप्रिल मध्ये न्यू यॉर्क भेटीचा योग आहे
- त्यावेळी तुमच्या ह्या मालिकेतील माहिती, विशेषतः शहरांतर्गत प्रवासाची माहिती खूप कामी येईल.