न्यू यॉर्क : १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
13 Oct 2016 - 2:23 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

काय बघू आणि काय नको असे होत असले तरी अजून काँकॉर्ड विमान, एन्टरप्राइज अवकाशयान व USS ग्रोवलर पाणबुडी ही तीन महत्त्वाची आकर्षणे पहायची असल्याने पुढे जाणे भागच होते.

संग्रहालयाच्या सर्वसाधारण फीमध्ये पुढची तीन आकर्षणे फक्त त्यांच्या बाहेरून पाहता येता. आत प्रवेश करून त्यांचा अंतर्भाग पाहायचा असल्यास अधिक मूल्य भरून मार्गदर्शकासह असलेल्या सहली घ्याव्या लागतात. काँकॉर्डच्या सहलीची वेळ झाली असल्याने आम्ही तिकडे निघालो.

काँकॉर्ड अल्फा डेल्टा जी-बीओएडी (Concorde Alpha Delta G-BOAD)

एरोस्पॅतिएल्/ब्रिटिश एअरवेज कॉर्पोरेशनचे काँकॉर्ड (Aérospatiale/BAC Concorde) हे टर्बोजेट प्रणालीवर चालणारे व व्यापारी वाहतुकीसाठी वापरात आणलेले पहिले स्वनातित विमान होते. फ्रान्स व ब्रिटन या दोन देशांच्या सहकार्याने बनवलेल्यामुळे याचे नाव काँकॉर्ड असे ठेवले गेले, या शब्दाचा अर्थ करार किंवा सुसंवाद किंवा संयोग (agreement or harmony or union) असा होतो. असे असले तरी, त्याच्या नावाच्या (Concorde) स्पेलिंगमधला शेवटचा e फ्रेंचमध्ये असतो व इंग्लिशमध्ये नसतो, त्यामुळे तो ठेवावा की नाही यासाठी दोन देशांतील देशाभिमानी लोकांमध्ये बराच वाद झाला ! त्या लोकांचे समाधान करण्यासाठी, त्या e चा अर्थ Excellence, England, Europe किंवा Entente (मैत्री) असा आहे किंवा स्कॉटलंडच्या विमानाच्या बांधणीत झालेल्या मदतीमुळे (तेथे विमानाचे नाक बनत असे व फ्रेंचमध्ये स्कॉटलंडला Écosse म्हणतात) तो e स्कॉटलंडचे प्रतिक आहे, इत्यादी अनेक गमतीदार राजकीय कोलांट्या उड्या मारून लोकक्षोभ बोथट केला गेला. हे विमान बनवण्याच्या प्रकल्पाच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या खर्चामुळे त्या e चा extravagance (उधळपट्टी) व escalation (खर्चवृद्धी) असा अर्थ लावून त्याची यथेच्छ चेष्टाही केली गेली !

१९६९ पासून आकाशात उडू लागलेल्या या विमानाने २१ जानेवारी १९७६ ला पहिली व्यापारी भरारी घेतली व ते २००३ सालापर्यंत म्हणजेच २७ वर्षे वापरात होते. याच प्रकारातल्या दुसर्‍या रशियन बनावटीच्या स्वनातित व्यापारी टुपोलेव (Tupolev Tu-144) विमानाचे व्यापारी आयुष्य यापेक्षा बरेच कमी ठरले.

हे विमान ९२ ते १२८ प्रवासी घेऊन आवाजाच्या दुपटीपेक्षा जास्त वेगाने कमाल Mach 2.04 किंवा प्रतीतास २,१८० किमी वेगाने उडत असे. अशी एकूण २० विमाने निर्माण केली गेली. एअर फ्रान्स व ब्रिटिश एअरवेज या केवळ दोनच कंपन्यांनी ही विमाने विकत घेऊन त्यांचा व्यापारी तत्त्वावर उपयोग केला.

या जगावेगळ्या विमानातल्या अनेक खासियतीपैकी काही विशेष अश्या आहेत :
* डेल्टा प्रकारचे (त्रिकोणी) पंख
* या विमानाचे नाक जमिनीवर उतरताना धावपट्टी वैमानिकांना दिसावी यासाठी स्वतंत्रपणे खाली वाकत असे
* आकारमान : ६१.६६ मीटर लांब, २५.६ पंख्यांची रुंदी व १२.२ मीटर उंची
* कमाल Mach 2.04 किंवा १,३५४ किमी प्रतीतास वेग
* कमाल १८,००० मीटर (६०,००० फूट) उंचीवरून प्रवास
* २२,००० लीटर दर तास इंधनाची गरज
* पुर्णकाळ (विमान उडण्यापासून ते उतरेपर्यंत) पूर्ण क्षमतेची स्वयंचलित (hands off) नियंत्रण प्रणाली
* विमानाचे वजन ताब्यात ठेवण्यासाठी बांधणीत केलेला अल्युमिनियमचा लक्षणीय प्रमाणातला उपयोग
* वाढीव सुरक्षेसाठी स्वतंत्र तीन पदरी सुरक्षाप्रणाली व एक अतिरिक्त टर्बाईन
* विमान बनवले त्या काळापुढे असलेली अपवादात्मकरीत्या विकसित असलेली संगणकप्रणाली
वरच्या आणि त्या कालाच्या पुढे असलेल्या इतर अनेक प्रणाली या विमानात होत्या.

या विमानाच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम असल्यास नवल नव्हते. त्यापैकी काही असे :
* फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू यॉर्क (जेएफके) ते लंडन (हिथ्रो) हे अंतर २ तास ५२ मिनिटे व ५९ सेकंदात पार करणे
* फेब्रुवारी १९८५ मध्ये लंडन ते सिडनी हे अंतर (इंधनासाठी घेतलेले थांबे धरून) १७ तास ३ मिनिटे व ४५ सेकंदात पार करणे
* ऑक्टोबर १९९२ मध्ये पश्चिमदिशेने (Westbound) प्रवास करत (इंधनासाठी घेतलेले सहा थांबे धरून) ३२ तास ४९ मिनिटे व ३ सेकंदात जगप्रदक्षिणा करणे
* ऑगस्ट १९९५ मध्ये पूर्वदिशेने (Eastbound) प्रवास करत (इंधनासाठी घेतलेले थांबे धरून) ३१ तास २७ मिनिटे व ४९ सेकंदात जगप्रदक्षिणा करणे


काँकॉर्ड ०१ : जमिनीवर उतरताना नाक वळवून खाली केलेले दिसत आहे (जालावरून साभार)

उत्पादनाच्या वाढलेल्या खर्चामुळे व विमान चालविण्यासाठी होणार्‍या अतिरिक्त खर्चामुळे या विमानाचे तिकीट खूप महाग होते. लंडन-न्यू यॉर्क मार्गावर सर्वसाधारणपणे याच्या एका दिशेच्या तिकिटाची किंमत £४,३५० व येण्याजाण्याच्या तिकिटाची किंमत £८,२९२ होती. त्यामुळे, उच्चपदस्थ राजकारणी, श्रीमंत उद्योजक, सिनेमा-संगीत जगतातले तारे, गर्भश्रीमंत लोक, इत्यादींनाच त्याने प्रवास करणे परवडत असे. अर्थातच, काँकॉर्डने प्रवास करणे हा "श्रीमंतांचा खेळ" आहे असा सर्वसामान्यांचा सकारण ग्रह झाला होता. इतके असूनही या विमानांचा वापर फायदेशीर ठरला नाही तो नाहीच.

सुरुवातीचे कुतूहल ओसरल्यावर; फार महागड्या तिकिटांमुळे घटणार्‍या प्रवाशांच्या संखेमुळे, स्वनातीत वेग गाठताना होणार्‍या तीव्र आवाजाबद्दलच्या (सॉनिक बुम) पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींमुळे आणि वापराच्या शेवटच्या काळात (इ स २०००) झालेल्या काही अपघातांमुळे ही सर्व विमाने व्यापारी सेवेतून निवृत्त केली गेली. असे असले तरीही पॉल जेम्सच्या नेतृत्वाखालील क्लब काँकॉर्ड ही काँकॉर्डप्रेमी संस्था स्वस्थ बसलेली नाही. तिने आतापर्यंत £१६ कोटी जमा केले आहेत व काँकॉर्डच्या पहिल्या भरारीच्या सुवर्णजयंतीच्या मुहूर्तावर २०१९ मध्ये काँकॉर्ड विमानसेवा परत सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

इंट्रेपिड संग्रहालयात पियर ८६ वर उभे असलेले "काँकॉर्ड अल्फा डेल्टा जी-बीओएडी (serial no. 100-010)" हे ब्रिटिश विमानकंपनीच्या सेवेतून निवृत्त झालेले व संग्रहालयाला कर्जाऊ मिळालेले विमान आहे. त्याच्या नावावर खालील जागतिक विक्रम नोंदवलेले आहेत :

१. याने फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू यॉर्क (जे एफ के) ते लंडन (हिथ्रो) हे अंतर २ तास ५२ मिनिटे व ५९ सेकंदात पार केले आहे. ही वेळ आजच्या कोणत्याही आधुनिक विमानाला लागणार्‍या वेळेच्या निम्म्यापेक्षा कमी आहे !

२. याने इतर कोणत्याही काँकॉर्ड विमानापेक्षा जास्त, एकूण २३,३९७ किमी चा, हवाई प्रवास केला आहे.

चला तर बघू या हे विक्रमी काँकॉर्ड विमान.

सहलीच्या सुरुवातीला मार्गदर्शकाने दिलेल्या माहितीनंतर आम्ही विमानाच्या दिशेने निघालो...


काँकॉर्ड ०२ : विमानाकडे प्रस्थान


काँकॉर्ड ०३ : विमानाकडे प्रस्थान


काँकॉर्ड ०४ : विमानाच्या जवळ

सर्वांना हे विमान त्याच्या खालून व सर्व बाजूंनी फिरून बघता येते. केवळ खास सहल घेतलेल्या पर्यटकांना विमानाशेजारचा कायमस्वरूपी जिना वापरून मार्गदर्शकाबरोबर विमानाच्या आत जाता येते. आतमध्ये आम्हाला विमानाच्या खुर्च्यांवर आरामात बसवून मार्गदर्शकाने विमानासंबंधीच्या अनेक खास गोष्टी मनोरंजक व विनोदी पद्धतीने सांगितल्या...


काँकॉर्ड ०५ : विमानाच्या आत बसून माहिती ऐकताना


काँकॉर्ड ०६ : विमानाच्या आत फिरताना

आताच्या अजस्त्र विमानांची सवय झालेल्या डोळ्यांना, हे प्रत्येक बाजूला असलेल्या दोन आसनांच्या रांगांच्या मधोमध एकच आईल (aisle) असलेले विमान, काहीसे BAC111 विमानासारखे, बरेच छोटे दिसते. त्याची आसनेही जराशी लहानच वाटतात.

मार्गदर्शकाने माहिती सांगून झाल्यावर सर्व विमान आरामात फिरून बघता आले. नंतर एकदोघांच्या गटाने जाऊन विमानाचे कॉकपिटही आतमध्ये जाऊन बघायला मिळाले. तिथे असलेल्या अक्षरशः शेकड्यांनी असलेल्या विविध मापनयंत्रणा पाहून चक्रायला झाले...


काँकॉर्ड ०७ : विमानाचे कॉकपिट

कॉकपिटमधील मुख्य व सहाय्यक वैमानिकांच्या खुर्च्यांवर बसायची परवानगी नाही. पण तेथे असलेल्या फ्लाईट इंजिनियरच्या तिसर्‍या खुर्चीवर बसायला हरकत नाही असे मार्गदर्शकाने सांगितले. अर्थातच त्या खुर्चीवर बसून फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय !...


काँकॉर्ड ०८ : काँकॉर्डच्या फ्लाईट इंजिनियरच्या आसनावर बसण्याची संधी

फार पूर्वीपासून ऐकत आलेल्या आणि मनामध्ये खूप आकर्षण असलेल्या काँकॉर्डच्या आत फिरून आल्याने मन प्रफुल्लित झाले होते.

विमान पाहून खाली उतरल्यावर ध्यानात आले की विमानाच्या बाजूला एकदोन मिनी-रेस्तराँ होती आणि खाण्याचे पदार्थ व पेये मिळणार्‍या डिस्पेन्सर्सची रांगही होती. तेथून खाण्याचे पदार्थ व पेये घेऊन लोक विमानाच्या पोटाखाली आणि आजूबाजूला मांडलेल्या खुर्च्या-टेबलावर बसून त्यांचा आस्वाद घेत होते...


काँकॉर्ड ०९ : विमानाच्या बाजूचे टपरी रेस्तराँ आणि 'फूड अँड ड्रिंक डिस्पेन्सर्स'ची रांग


काँकॉर्ड १० : काँकॉर्डच्या पोटाखाली बसण्याची जागा ०१


काँकॉर्ड ११ : काँकॉर्डच्या पोटाखाली बसण्याची जागा ०२

ही जेवणासाठी बसण्याची व्यवस्था इतकी अनवट होती की आम्हीही इतर लोकांत सामील होऊन तेथेच पोटोबा करून घेतला...


काँकॉर्ड १२ : काँकॉर्डच्या पोटाखालचा पोटोबा

हा स्वनातीत विमानाच्या पोटाखाली त्याच्या सावलीत केलेला जगावेगळा पोटोबा निश्चितच मनोरंजक वाटला ! शरीरात इंधन भरून झाले आणि आरामही करून झाला. ताजेतवाने होऊन आम्ही एन्टरप्राइज अवकाशयानाच्या सहलीला निघालो.

एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise)

एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise किंवा Orbiter Vehicle Designation: OV-101) पुनर्वापर होऊ शकणार्‍या अवकाशयानांच्या साखळीतला पहिला दुवा आहे. या यानाच्या बांधणीची सुरुवात त्याला अवकाशात पाठवण्याच्या हेतूने सुरू झाली होती. त्याचा मूळ सांगाडा १९७६ साली तयार झाला. त्याचे इंजिन व तापमान कवच (हीट शील्ड) बसविण्याआधी, त्याला बोईंग७४७ विमानाच्या पाठीवरून उंचावर नेऊन तेथून पृथ्वीच्या वातावरणातील सोडून अवकाशयानांसाठीच्या चांचण्यांकरिता वापरले गेले. त्याच सुमारास त्याच्या पुढची अवकाशयानमालेतील कडी असलेल्या कोलंबिया अवकाशयानाच्या संरचनेचे नवीन तपशील (स्पेसिफिकेशन्स) नक्की केले गेले. ते तपशील चॅलेंजर या अवकाशायानसाखळीत त्यापुढे असलेल्या प्रायोगिक अवकाशयानात सुधारणा करून वापरणे जास्त सहज व कमी खर्चाचे आहे असे दिसले. त्यामुळे एन्टरप्राइज प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला गेला. कोलंबिया अवकाशयान दुर्घटनेत नष्ट झाल्यावर परत एकदा एन्टरप्राइज प्रकल्पाला पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न झाला होता. पण, काही कारणांनी तो प्रयत्न मागे पडून एन्टरप्राइजचे सुटे भाग वापरून एंडेव्हर हे नवीन अवकाशयान बांधण्यात आले. अश्या रितीने एन्टरप्राइज बाह्यरूपात पूर्ण अवकाशयान दिसत असले तरी ते इंजिन व तापमान कवच बसवून अवकाशप्रवासयोग्य बनवले गेले नाही.

एन्टरप्राइजने जरी एकदाही अवकाशप्रवास केला नसला तरीही अवकाशयुग वास्तविकतेत उतरण्यासाठी त्याने दिलेले प्रायोगिक योगदान नि:संशय उच्च प्रतीचे आहे, आणि त्यासाठीच ते नासाचे आणि एकूणच जागतिक अवकाशप्रवासप्रेमी लोकांचे लाडके अवकाशयान आहे.

२००३ साली एन्टरप्राइजची डागडुजी करून त्याचे स्मिथसोनियन इंस्टिट्यूटच्या वर्जिनिया येथील Udvar-Hazy Center मध्ये प्रदर्शन केले गेले. डिस्कव्हरी आकाशयान निवृत्त झाल्यावर त्याने एन्टरप्राइजची जागा घेतली व २०१२ मध्ये एन्टरप्राइजला इंट्रेपिड संग्रहालयात हलवले गेले. या अजस्त्र यानासाठी जागा मोकळी करण्यासाठी इंट्रेपिडवरची तीन विमाने शेनेक्टेडी (न्यू यॉर्क राज्य) येथील एरोस्पेस संग्रहालयात हलवावी लागली.

या यानाच्या सुरक्षेसाठी इंट्रेपिड नौकेच्या फ्लाईट डेकच्या एका टोकाला एक भले मोठे दालन बनवले आहे. या दालनात एन्टरप्राइजबरोबरच, नासाने बनवलेला प्रायोगिक अवकाशयानांपैकी एक नमुना (prototype), अवकाशसफरींमध्ये भाग घेतलेल्या यानांतील वस्तू, प्रकाशचित्रे, चलतचित्रे, ध्वनिफिती, इत्यादी गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना अवकाशसफरींच्या एका कालखंडाची सुंदर ओळख होते...


एन्टरप्राइज अवकाशयान दालन

या दालनात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वाराजवळच आपल्याला मिशन कंट्रोल आणि अवकाशवीरांमधील संभाषणाची खरीखुरी ध्वनिफीत ऐकू येऊ लागते. यानाच्या आजूबाजूला ठेवलेल्या प्रदर्शनिय वस्तूंमधून आपल्याला अवकाशयानाच्या जडणघडणीसंबंधी आणि अवकाशयान प्रकल्पाच्या इतिहासाची व भविष्यातल्या प्रकल्पांची तोंडओळख होते. स्टेशनलाईफ नावाच्या एका प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर चाललेल्या घटनांची तत्कालिक (लाइव्ह) माहिती, तत्कालिक बातम्या व आपल्या भेटीच्या वेळी अवकाश केंद्रावर असलेल्या अवकाशवीरांचे चालू असलेले तत्कालिक (लाइव्ह) ट्विटर संभाषण पहायला मिळते.


एन्टरप्राइज अवकाशयान ०१ : प्रथमदर्शन

दालनाच्या मध्यभागी मुख्य आकर्षण, "एन्टरप्राइज अवकाशयान", ठेवलेले आहे. उंचावरून त्याच्या भोवती फिरून नीट पाहता यावे यासाठी त्याच्या चहुबाजूला उंच प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. तरीही हे प्रचंड अवकाशयान एका फोटोच्या पकडीत आणण्यासाठी बरेच प्रयोग करावे लागतात !...


एन्टरप्राइज अवकाशयान ०२


एन्टरप्राइज अवकाशयान ०३

खास सहलीचे तिकीट काढले म्हणून तरी यानाच्या आतमध्ये एक चक्कर मारू देतील असे वाटले होते. पण त्या वाईट्ट वाईट्ट लोकांनी तेवढी मानसिक उदारी दाखवली नाही :(

अवकाशयानाचे तापमानविरोधक कवच हजारो डिग्री सेल्सियसचे तापमान रोखून धरू शकते, पण जराश्या जास्त वजनाने (उदा : माणसाने त्यावरून चालणे, हातोडीसारख्या हत्याराचा एखादा ठोका, इ) त्याला इजा होऊ शकते, हे दाखविण्यासाठी तशी इजा झालेले तापमानविरोधक कवचाचे तुकडे (टाइल्स) यानावर चिकटवलेले आहेत...


एन्टरप्राइज अवकाशयान ०४ : वजनाने इजा झालेले तापमानविरोधक कवच

गॅलिलिओ प्रायोगिक अवकाशयान


नासाने बनवलेल्या प्रायोगिक अवकाशयानांपैकी एक नमुना (prototype) : गॅलिलिओ

या दालनात फिरताना लोकप्रिय "स्टार ट्रेक एन्टरप्राइज"ची आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण एन्टरप्राइज प्रकल्पातील आणि एकंदर अमेरिकन अवकाशयान प्रकल्पांतील अनेक नावे स्टार ट्रेक या अत्यंत प्रसिद्ध झालेल्या टीव्ही व चलतचित्र मालिकांतूनच उचललेली आहेत !

सोयुझ टीएमए-६

याच दालनात सोयुझ टीएमए-६ (Soyuz TMA-6) ही अवकाशकुपी (space capsule) ठेवलेली आहे. सोयुझ एफजी या रशियन रॉकेटच्या साहाय्याने उडवलेल्या या छोट्याश्या अवकाशयानाने १७ एप्रिल २००५ ला सेर्गेई क्रिकालेव (फ्लाईट कमांडर, रॉकेट शास्त्रज्ञ, रशिया), जॉन फिलिप्स (फ्लाईट इंजिनियर, नासा, अमेरिका) आणि रॉबर्टो वित्तोरी (फ्लाईट इंजिनियर, इटॅलियन एअर फोर्स, इटली) या तीन अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर (International Space Station किंवा ISS) नेले होते व ११ ऑक्टोबर २००५ ला परत आणले होते.

७ फूट उंच आणि ७ फूट रुंद आकाराची ही अवकाशकुपी पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना हवेबरोबर झालेल्या घर्षणामुळे तिचे बाहेरचे आवरण चांगलेच भाजून निघाले आहे.


सोयुझ टीएमए-६ : जमिनीवर उतरलेल्या सोयुझ यानातून आवकाशवीरांना बाहेर काढताना (जालावरून साभार)

या अवकाशकुपीबाबतचा महत्त्वाचा तांत्रीक मुद्दा असा की ती पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरत असे. जगातला पहिला अवकाशप्रवासी युरी गागरीन सोयुझ कुपीतूनच अवकाशात गेला होता व परतताना पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरला होता. रशियाचे हे पॅराशूटच्या साहाय्याने अवकाशयान जमिनीवर उतरवण्याचे तंत्र अमेरिकन शास्त्रज्ञांना जमले नाही. जमिनीवर विमानाप्रमाणे उतरणारी पुनर्वापरयोग्य याने (शटल्स) तयार करेपर्यंत सर्व अमेरिकन अवकाशयाने समुद्रात डुबकी मारत असत.

रशियन संघराज्याचे (USSR) विभाजन झाल्यानंतर पैशाची चणचण निर्माण झाल्यामुळे रशियन अवकाशसंस्थेने ही कुपी वापरून सशुल्क खाजगी अवकाशसहली आयोजित केल्या होत्या. ही कुपी वापरून ग्रेग ओलसन याने अशीच एक सहल केली होती. ही कुपी निवृत्त केली गेल्यावर ग्रेगने तिला खरेदी केले. त्याच्या मालकीची ही कुपी त्याने इंट्रेपिड संग्रहालयाला केवळ प्रदर्शित करण्यासाठीच दिलेली आहे.

ही कुपी व एन्टरप्राइज यांच्या आकारमानातला प्रचंड फरक थक्क करणारा आहे...


सोयुझ टीएमए-६ : इंट्रेपिड संग्रहालयातील सोयुझ टीएमए-६ यानकुपी


सोयुझ टीएमए-६ : सोयुझ यानातल्या इतर सामानामध्ये दाटीवाटीने बसलेले अवकाशवीर (जालावरून साभार)

युरी गागारीनने १२ एप्रिल १९६१ ला अवकाशात भरारी मारल्याची बातमी वाचल्यापासून त्याचे आणि सोयुझचे नाव मनात कोरले गेले होते. मानवाचे अवकाशप्रवासाचेस्वप्न प्रथमतः प्रत्यक्षात आणणार्‍या त्या सोयुझकुपीला याची देही याची डोळा पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून आली होती !

USS ग्रोवलर अण्वस्त्रसज्ज पाणबुडी

अवकाशातून निघून आम्ही एकदम विरुद्ध दिशेची पुढची सफर करण्यासाठी, म्हणजे '२० लीग्ज अंदर द सी' किंबहुना त्यापेक्षा जास्त खोलवर पाण्यात बुडी मारू शकणार्‍या USS ग्रोवलर पाणबुडीच्या दिशेने चालू लागलो.

ही ग्रेबॅक क्लास (Grayback class) प्रकारची ९६.९ मीटर लांबीची व जास्तीत जास्त ८.२ मीटर रुंद असलेली पाणबुडी ९ अधिकारी व ७८ नौसैनिकांसह कार्यरत असे. अमेरिकन नौदलातील अण्वस्त्राने सज्ज असलेले क्रूझ मिसाइल वाहून नेणार्‍या (nuclear armament deployed cruise missile submarine) व डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या केवळ दोन पाणबुड्यांपैकी ही एक होती. १९५८ ते १९६४ या शीतयुद्धाच्या काळात या हिच्याकडे प्रशांत महासागरात रशियाविरुद्ध अण्वस्त्रनिरोधक क्षमता (nuclear deterrent capability) पुरविण्याची कामगिरी सोपवलेली होती.

अणुशक्तीवर चालणारे इंजिन असलेल्या अधिक परिणामकारक अण्वस्त्रधारी पाणबुड्या वापरात आल्यावर अर्थातच या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीची गरज कमी झाली. ०१ ऑगस्ट १९८० ला या पाणबुडीला निवृत्ती मिळाली व तिचा उपयोग टॉर्पेडोंच्या सरावासाठी निशाण म्हणून करायचे ठरले. मात्र नंतर हा निर्णय बदलून १९८८ मध्ये अमेरिकन काँग्रेसच्या एका ठरावाने तिला तिच्यावरील रेग्युलस नावाच्या अण्वस्त्राच्या बाह्यआवरणासह इंट्रेपिड संग्रहालयाला भेट देण्यात आले.

पाणबुडीत शिरण्याच्या अगोदरच रेग्युलस अण्वस्त्रधारी क्रूझ क्षेपणास्त्र आपले स्वागत करते...


USS ग्रोवलर ०१ : रेग्युलस अण्वस्त्रधारी क्रूझ क्षेपणास्त्र


USS ग्रोवलर ०२ : बाह्यदर्शन

पाणबुडीत शिरल्यावर लगेचच तिच्यातल्या नौसैनिकांना किती कमी जागेत आपले नेहमीचे व्यवहार आणि युद्धकाळाच्या कामगिर्‍या पार पाडाव्या लागत असत याची कल्पना येऊ लागते...

    
USS ग्रोवलर ०३ : अंतर्भाग

अमेरिकन क्रूझ मिसाइल वाहून नेणारी हीच एकुलती एक पाणबुडी लोकांना पाहण्यासाठी खुली केली गेली आहे. त्यामुळे, याच एका जागी अमेरिकन टॉप सीक्रेट असलेले क्षेपणास्त्र आदेश केंद्र (missile command center) जनतेला जवळून पाहायला मिळते. तीन आसने असलेल्या कंट्रोल रूम व अटॅक सेंटरमधील पेरिस्कोप वापरून पाण्याच्या वर काय चालले आहे याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पाणबुडीच्या मार्गक्रमणाची दिशा, वेग, किती खोलवरून जायचे इत्यादीसंबंधीचे निर्णय घेतले जात असत...


USS ग्रोवलर ०४ : कंट्रोल रूम व अटॅक सेंटर

या पाणबुडीत एकूण ४ रेग्युलस-एक (Regulus I) व २ रेग्युलस-दोन (Regulus II) अण्वस्त्रे सज्ज असत. याशिवाय स्वसंरक्षणासाठी एकूण ८ टॉर्पेडो असत. मिसाइल चेकआऊट व गायडन्स सेंटरमध्ये क्षेपणास्त्रांची युद्धसज्जता व क्षेपणास्त्र सोडल्यावर त्याला लक्षापर्यंत पोचेपर्यंत किंवा दुसर्‍या कोणत्या यंत्रणेच्या (उदाहरणार्थ उपग्रह) ताब्यात देईपर्यंत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी होती...


USS ग्रोवलर ०५ : मिसाइल चेकआऊट व गायडन्स सेंटर

एका चिंचोळ्या जागेतला चिमुकला मुदपाकखाना पाणबुडीत काम करणार्‍या सर्वांची (९ अधिकारी व ७८ नौसैनिक) खानपानाची व्यवस्था पाहत असे. त्याच्या शेजारच्या जागेत नौसैनिकांच्या व अधिकार्‍यांच्या जेवण्याच्या तसेच मनोरंजनासाठी खेळ खेळण्याची व चलतचित्रपट पाहण्याच्या जागा होत्या...


USS ग्रोवलर ०६ : मुदपाकखाना


USS ग्रोवलर ०७ : नौसैनिकांच्या जेवणाची व मनोरंजनाची जागा


USS ग्रोवलर ०८ : अधिकार्‍यांच्या जेवणाची व मनोरंजनाची जागा (बोर्डरूम)

थोडे पुढे अधिकार्‍यांच्या झोपण्याची जागा होती व तेथे त्यांना बसण्यासाठी एक समाईक खुर्ची होती. त्याच्या जवळच त्यांचे ऑफिस होते...

    
USS ग्रोवलर ०९ : अधिकार्‍यांच्या झोपण्याच्या जागा व ऑफिस

त्यामानाने या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या पाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरसाठी एका अंदाजे ७X४ फूट आकाराच्या स्वतंत्र जागेत झोपायला गादी, फोन व वॉशबेसिन अशी "राजेशाही" व्यवस्था दिसली !...


USS ग्रोवलर १० : पाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरची राहण्याची जागा

पुढे रेडिओ रूम होती. येथून पाणबुडी बाह्यजगाशी संपर्क राखत असे...


USS ग्रोवलर ११ : रेडिओ रूम

चिंचोळ्या जागेतून पुढे पुढे जात असताना अधून मधून जेथे जागा मिळेल तिथे नौसैनिकांची झोपायची व्यवस्था (बंकर्स) केलेली दिसत होती. एका ठिकाणी नौसैनिकांसाठी असलेले स्वच्छतागृह दिसले...

    
USS ग्रोवलर १२ : नौसैनिकांचे बंकर्स आणि स्वच्छतागृह

ग्रोवलरमध्ये पुढच्या (बो) आणि मागच्या (स्टर्न) टोकाला प्रत्येकी एक अश्या दोन टॉर्पेडो रूम आहेत. इथले पुढचे ६ व मागचे २ टॉरपेडो स्वसंरक्षणासाठी वापरण्यासाठी होते. प्रत्येक टॉरपेडो रूममध्ये नऊ नौसैनिकांच्या झोपण्याची व्यवस्था (बंकर्स) होती...


USS ग्रोवलर १३ : टोर्पेडोने सज्ज टोर्पेडो रूम

पाणबुडीतून बाहेर पडलो आणि तिचे परत एकदा डोळेभरून दर्शन घेतले...


USS ग्रोवलर १४ : निरोप घेतानाचे दर्शन

पियरवरून बाहेर येऊन रस्ता ओलांडल्यावर भव्य इंट्रेपिड विमानवाहक नौका आणि तिच्यावरच्या विमानांकडे मागे वळून नजर गेलीच...

विमानवाहू नौका, मोठ्या कालखंडातील अनेक लढाऊ विमाने, स्वनातीत हेरगिरी करणारे विमान, स्वनातीत व्यापारी वाहतूक करणारे विमान, पुनर्वापर होणार्‍या अवकाशयानशृंखलेतील पहिली कडी असणारे अवकाशयान आणि अण्वस्त्रसज्ज क्रूझ क्षेपणास्त्र घेऊन काम केलेली पाणबुडी अशी आजवर केवळ चित्रांत, टीव्ही किंवा चित्रपटगृहांत पाहिलेली आधुनिक जगातील सामर्थ्यवान आश्चर्ये पाहिली होती. आज घरी परतताना मनात एक खास समाधान होते.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

हर्षद खुस्पे's picture

13 Oct 2016 - 8:06 am | हर्षद खुस्पे

अतिशय सुंदर सफर घडवून आणली आहे तुम्ही.

प्रचेतस's picture

13 Oct 2016 - 8:35 am | प्रचेतस

हाही भाग जबरदस्त.
सोयुझ अवकाशकुपी पाहून ग्रॅव्हिटी चित्रपटातील शेवटच्या दृष्यांची आठवण झाली.

प्रसाद_१९८२'s picture

13 Oct 2016 - 12:00 pm | प्रसाद_१९८२

अतिशय माहितीपूर्ण लेख.
खुप आवडला.

इथे युरोपिय स्पेस एजन्सीने बनविलेला 'The Soyuz launch sequence explained' हा व्हिडीओ पहाण्यासारखा आहे.

.

अमृत's picture

17 Oct 2016 - 1:46 pm | अमृत

धागा दिल्याबद्दल धन्यवाद!

लोनली प्लॅनेट's picture

13 Oct 2016 - 12:30 pm | लोनली प्लॅनेट

अतिशय छान सफर घडवून आणली आहे तुम्ही...
enterprise space shuttle मध्ये जाता न आल्यामुळे तुमचा जितका भ्रमनिरास झाला तितकाच केवळ वाचताना माझा झाला. त्या कोंकॉर्ड विमानात शंभराहून अधिक मापन यंत्रणा होत्या तर space shuttle मध्ये किती असतील?

स्वाती दिनेश's picture

13 Oct 2016 - 2:15 pm | स्वाती दिनेश

अमेरिकासफर छान चालली आहे, वाचते आहे.
स्वाती

पद्मावति's picture

13 Oct 2016 - 3:38 pm | पद्मावति

+१

स्वीट टॉकर's picture

13 Oct 2016 - 10:51 pm | स्वीट टॉकर

लेख वाचायला मजा येतिये. स्वतःच्या इन्ट्रेपिड भेटीची आठवण झाली. तेव्हां कॉन्कोर्ड कार्यरत होती. होनोलुलुला एक दुसर्या महायुद्धातली पाणबुडी पर्यटकांना दाखवतात. त्यातले खलाशी जवळजवळ चेंगरूनच झोपायचे. त्यावेळच्या त्यांच्या खडतर आयुष्याची कल्पना येते.

उल्का's picture

14 Oct 2016 - 7:33 am | उल्का

खूप छान सविस्तर माहितीपूर्ण लिहिताय.
प्रत्येक भाग वाचताना मजा येते आहे.
धन्यवाद!

अजया's picture

14 Oct 2016 - 8:06 am | अजया

पुभाप्र

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 10:17 am | सुबोध खरे

सुन्दर

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2016 - 1:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांसाठी व वाचकांसाठी धन्यवाद !

अमृत's picture

17 Oct 2016 - 1:45 pm | अमृत

वाचतोय तुमचा प्रवास.

निओ's picture

28 Oct 2016 - 12:29 am | निओ

छान सफर घडवत आहेत न्यू यॉर्क ची.
पूर्वतयारी आणि प्रस्थान, शहराची तोंडओळख, जर्सी सिटीचा फेरफटका, वर्ल्ड ट्रेड सेंटर, टाईम्स स्क्वेअर, मॅडिसन स्क्वेअर, इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय.. हे भाग आवडले.