न्यू यॉर्क : १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
25 Oct 2016 - 1:25 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

राहत्या घराशेजारी असलेला हा पार्क म्हणजे न्यू यॉर्क शहराने आम्हाला अनपेक्षितपणे दिलेली भेट होती आणि आम्ही तिचा पुरेपूर उपभोग घेतला ! महानगराच्या भर वस्तीत असे काही अनुभवायला मिळणे केवळ अकल्पनिय होते !
ता क : फोर्ट ट्रायॉन पार्कच्या भूमीवर असल्या तरी "हिदर गार्डन" व "मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय" या दोन जागा आपल्या स्वतःच्या बळावर खास आकर्षणे आहेत. त्यामुळे आपण त्यांना पुढच्या दोन भागांत स्वतंत्रपणे पाहणार आहोत.

या संग्रहालयाचा फोर्ट ट्रायॉन पार्कच्या माहितीत उल्लेख आला आहेच. त्या पार्कची निर्मिती करत असताना १९२५ मध्ये रॉकंफेलरने जॉर्ज ग्रे बर्नार्ड या अमेरिकन शिल्पकार व संग्राहकाकडून युरोपातल्या मध्ययुगीन इमारतींच्या अवशेषांचा संग्रह विकत घेतला आणि तो 'मेट'ला (Metropolitan Museum of Art) दान केला.

क्लॉइस्टर म्हणजे मठ, चर्च अथवा तत्सम धार्मिक इमारत. मध्ययुगीन युरोपातल्या अश्या इमारतींचे अवशेष व त्या इमारतीतील कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश या संग्रहालयात आहे. म्हणून याला क्लॉइस्टर्स असे नाव दिले गेले. या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूसंग्रहाला साजेसे एक स्वतंत्र संग्रहालय बनवून ते १९३८ मध्ये जनतेला खुले केले गेले. यानंतरही या संग्रहालयाला रॉकंफेलर फाउंडेशन व इतर लोकांकडून नवनवीन वस्तू भेट मिळत आहेत. आतापर्यंत एकूण वस्तूंची संख्या २००० पेक्षा जास्त झाली आहे. हे संग्रहालय पाहताना सहजपणे पुण्यातल्या केळकर संग्रहालयाची आठवण आली !

या संग्रहालयाचे नाव खालील महत्त्वाच्या राष्ट्रीय याद्यांत समाविष्ट केले गेले आहे :
१. New York City landmark (१९७४ पासून)
२. Register of Historic Places (१९७८ पासून)

फोर्ट ट्रायॉन पार्कच्या उत्तर टोकाजवळच्या ४ एकर जमिनीवर चार्ल्स कोलन्स या प्रसिद्ध डिझायनरने या अनवट संग्रहाला प्रदर्शित करण्यासाठी त्याला साजेशी वैशिष्ट्यपूर्ण इमारत बांधलेली आहे.

एका सकाळी फोर्ट ट्रायॉन पार्कच्या हिरवाईतून रमत गमत फिरत असताना अचानक एक इमारत समोर आली. खास करून तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मनोर्‍याने लक्ष वेधून घेतले...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्रथमदर्शन

कोणतीही पाटी नसल्याने ही जुनाट बांधणीची दिसणारी इमारत बहुदा रिकामी किंवा फारतर पार्कच्या कार्यालयाची असावी असे बाहेरून वाटले वाटले. तरीही कुतूहलाने तिच्या भोवती फेरी मारली. इमारतीच्या आखीवरेखीव फुलझाडांनी शोभीत प्रवेशमार्गाने आणि पार्कमधिल खारूताई रुपी स्वागतिकेने खास स्वागत केल्यावर मात्र अजून पुढे शोध घ्यावासा वाटला...

  
  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : स्वागत

एका बाजूला सुंदर कमानी असलेल्या बर्‍याच खिडक्या आणि एक जुनाट दरवाजा दिसला. खिडक्यांतून इमारतीच्या आत काही लोकांची हालचाल चाललेली दिसली...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्रवेशद्वार


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : दर्शनी भाग

मग आम्हीही अधिक शोध करण्यासाठी आत गेलो. बरीच लांबलचक पडवी पार करून गेल्यावर एक नक्षीदार प्रवेशद्वार लागले...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : स्वागतकक्षाचे नक्षीदार प्रवेशद्वार

आत जाऊन चौकशी केल्यावर शोध लागला की हे मध्ययुगीन युरोपातल्या मठांच्या इमारतींच्या अवशेषांचे व मठातील वस्तूंचे संग्रहालय आहे. मग काय ! अचानक हाती लागलेल्या खजिन्याच्या आस्वाद घ्यायला तिथल्या अप्रेंटिस स्वागतिकाकडे चौकशी केली. त्याने सांगितले की, "इथे प्रवेश शुल्क नाही. तुम्हाला हवे असल्यास दान (डोनेशन) म्हणून कितीही छोटीमोठी रक्कम देऊन किंवा न देताही तुम्ही हे संग्रहालय पाहू शकता". आम्ही दोघांचे २० डॉलर्स भरून संग्रहालयासंबंधीची विनाशुल्क माहितीपत्रके उचलली आणि आत शिरलो.

विशेष माहिती : अमेरिकेतील सर्व सरकारी संग्रहालयातला प्रवेश विनामूल्य असतो. त्यांच्या जाहिरातींत, पत्रकांत व जालावर लिहिलेले प्रवेशमुल्य केवळ सूचीत (इंडिकेटेड) असते. पर्यटकांनी ते मूल्य आपल्या मर्जीने द्यावे, त्यापेक्षा कमीजास्त द्यावे अथवा अजिबात देऊ नये, असा कायदा आहे. फक्त सीमित कालासाठी (एक आठवडा, एक महिना, इ) आयोजित केलेल्या खास समयोचित संग्रहांच्या प्रदर्शन विभागांसाठी (सर्व संग्रहालयासाठी नव्हे) मूल्य घेणे कायदेशीर आहे. परंतू, असे लिखीत स्वरूपात कोणत्याही माहितीपत्रकात अथवा बोर्डवर लिहिलेले नसल्याने त्याबद्दल बहुसंख्य पर्यटकांना माहिती नसते. त्यामुळे, संग्रहालये एक प्रकारे पर्यटकांची फसवणूक करत आहेत असा दावा काही समाजोपयोगी संस्थांनी व सजग नागरिकांनी अमेरिकन कोर्टात लावला होता. आम्ही अमेरिकेत असताना या खटल्याचा निकाल लागल्याची बातमी टीव्हीवर पहायला मिळाली. कोर्टाने "नागरिकांचे म्हणणे खरे आहे; पण तरीही, ना-फायदा तत्त्वावर चालणार्‍या संग्रहालयांना रोजचे व्यवस्थापन व विकास यासाठी खर्च करण्यासाठी प्रवेशमुल्यातून मिळणारे धन आवश्यक असल्यामुळे सद्या चालू असलेली (फसवी ?) व्यवस्था तशीच चालू ठेवावी" असा निर्णय दिला ! तुमच्या भेटीच्या वेळेस, सरकारी संग्रहालयाचे प्रवेशमुल्य तुम्हाला जास्त वाटत असल्यास "माहितीपूर्ण चौकशी" करून ते कमी किंवा माफ करून घेण्याचा वैध प्रयत्न करता येईल ! :)

येथील मुख्य आकर्षण कुक्सा (Benedictine monastery of Saint-Michel-de-Cuxa; इ स ८७८ ते १७९१), बोन्फो (Bonnefort; ११३६ ते १८०७ ), त्री (Trie; १४८४ ते १४९०) आणि सान्त गिल्हेम (Saint-Guilhem; ८०४ ते १६६०) या चार प्राचीन फ्रेंच मठांच्या अवशेषांचे व त्यामधिल वस्तूंचे संग्रह आहेत. चला तर त्याना पहायला.

बागबगिचे

या मुख्य संग्रहांची मांडणी त्यांचा मूळ स्रोत असलेल्या मूळ मठांसारखी केली आहे. मूलभूत रचना मध्यभागी चौकोनी बाग व तिच्या चार बाजूला असलेल्या ओसर्‍यांनी बनलेल्या चौसोपी जागा अशी आहे. बागांच्या मध्यभागी असलेली वैशिष्ट्यपूर्ण कारंजी आणि त्यांच्या भोवती एकाद्या धार्मिक तत्वानुसार केलेल्या वनस्पतींच्या लागवडीमुळे प्रत्येक बाग आपले वैशिष्ट्य राखून आहे. धार्मिक महत्त्वाच्या वनस्पती; फुलझाडे; आकर्षक आकाराची व रंगांची पाने असलेली झुडुपे; मसाल्याचे पदार्थ; व इतर प्रकारच्या वनस्पती धरून या संग्रहालयातल्या सर्व बागांत एकूण २५० च्या वर प्राचीन वनस्पती आहेत.

कुक्सा या उत्तरपूर्व फ्रान्समधिल मठाचे (मोनास्टरी) अवशेष या संग्रहालयाचे मध्यवर्ती आकर्षण आहे. संग्रहालयाच्या इमारतीचा (प्रथमदर्शनाच्या व दर्शनी भागाच्या चित्रांत दिसणारा) मनोरा याच मठाचा आहे. संग्रहालयाच्या मध्यभागात या मठाच्या जवळ जवळ अर्ध्या इमारतीची मूळ स्वरूपात पुनर्रचना केलेली केलेली आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांतले वर्णन व शिल्पांतील चित्रांच्या आधारे वनस्पतींची लागवड करून या मठाच्या मध्यभागात असलेल्या बागेचे पुनर्निर्माण केलेले आहे. बागेच्या मध्यावर मूळ मठातून आणलेले अष्टकोनी कारंजे आहे...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कुक्सा बाग ०१

  
    
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कुक्सा बाग ०२


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयातली अजून एक बाग ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयातली अजून एक बाग ०२


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : एका बागेतले कॅंडल होल्डरचा आकार दिलेले ६० वर्षे वयाचे पेअरचे झाड

दगडी बांधकामे व कोरीवकामे

मठांच्या बागांभोवतीच्या चार पडव्यांचा उपयोग मठातले साधक (मंक) वास्तव्यासाठी करत असत. प्रत्येक मठाच्या काळानुसार त्यांच्या बागांच्या सभोवतालच्या खांबांची शैली व त्यांच्यावरची नक्षी यांच्यात फरक पडलेला दिसतो. भौमितिक आकार, पानेफुले, पाईनचे कोन, ख्रिस्त, संत, देवदूत, जलपर्‍या, दोन डोकी असलेले राक्षसी आकार, इत्यादी अनेक प्रकारच्या कोरीवकामाची विविधता या खांबावर दृष्टीस पडते...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब व छप्पर ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब ०२

  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब ०३ व ०४

काही ठिकाणी स्वतंत्रपणे उभे असलेले किंवा भिंतींना जोडून असलेले, कसबी कोरीवकामाने सजलेले, जुळे खांब (डबल कॅपिटल्स) आपले लक्ष वेधून घेतात...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव जुळे खांब ०५

मोडकळीला आलेल्या किंवा उत्खननात सापडलेल्या मठांचे खांब, कमानी, दरवाजे, इत्यादी अनेक भाग दगड बरहुकूम दगड लावून या संग्रहालयात मठांच्या अनेक भागांचे पुनर्निर्माण केलेले आहेत. हे अवशेष संग्रहालयाच्या इमारतीत ठिकठिकाणी इतके बेमालूमपणे वापरले आहेत की आपण पुरातन वस्तूंचे संग्रहालय बघत आहोत असे न वाटता मूळ पुरातन वास्तूत फिरत असल्याचा सतत भास होतो. संग्रहालयाच्या बांधणीतील या अनवट कल्पकतेबद्दल त्याच्या डिझायनरची जेवढी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे !


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०२

  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०३ व ०४

प्राचीन गालिचे

बायबलमधील व इतर धार्मिक कथांतील प्रसंगांची चित्रे असलेले प्राचीन गालिचे (tapestries) हे या संग्रहालयाचे एक खास वैशिष्ट्य आहे. अनेक मोठ्या आकाराचे जगप्रसिद्ध गालिचे येथील भिंतींवर टांगलेले आहेत...


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०२ : युनिकॉर्नची शिकार


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०३


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचे ०४

  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचे ०५ व ०६

कलाकुसरीच्या इतर वस्तू

याशिवाय इतर अनेक प्रकारच्या आकर्षक व कलाकुसरीच्या प्राचीन वस्तू तेथे आहेत. त्यातील काहींचे फोटो...



मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०२


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०३ आणि धातूच्या बश्या


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०१


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०२


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०३


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०४


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०५

  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०६ व ०७

  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०८ व ०९


मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्राचीन रंगीत सचित्र हस्तलिखित


  
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्राचीन रंगीत सचित्र हस्तलिखितांतील बारकाव्यांसह काढलेली कसबी चित्रे

पार्कमध्ये सकाळी फिरत असताना हा अचानक समोर आलेला अदभुत खजिना अनुभवता अनुभवता जेवणाची वेळ केव्हाच निघून गेली होती, पण पोटाला त्याची आठवण झाली नव्हती. मन भरल्याची ढेकर देत बाहेर संग्रहालयाच्या पडल्यावर घड्याळाकडे लक्ष गेले आणि पोटात जोरजोरात कावळे कोकलू लागले !

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Oct 2016 - 8:49 am | प्रचेतस

क्या बात है....!

अद्भूत खजिना आहे हा.

पद्मावति's picture

25 Oct 2016 - 3:47 pm | पद्मावति

+1
खरंच अद्भुत खजीना आहे.