न्यू यॉर्क : ०२ : शहराची तोंडओळख

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
29 Aug 2016 - 12:17 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

... आणि दहा एक मिनिटांत बेनेट अव्हेन्युवरच्या घरी पोहोचलो. पुढच्या तीन महिन्यांत न्यू यॉर्क शहर व परिसरांवर करायच्या चढायांसाठीची ही आमची मुख्य छावणी होती.

आता तीन महिने भटकंतीला आहेत म्हटल्यावर शहराची थोडीबहुत माहिती काढणे आवश्यक होते. या भागाचा जरा अभ्यास केल्याने आपले भटकणे जास्त सुलभ, सुखद आणि श्रेयस्कर होते.

न्यू यॉर्क शहर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील न्यू यॉर्क राज्यात आहे. त्यांच्या नावात गल्लत होऊ नये व तुम्हाला नक्की शहर म्हणायचे आहे की राज्य, यासाठी काही संकेत पाळले जातात. नुसते न्यू यॉर्क हे संबोधन सहसा राज्यासाठी वापरले जाते तर शहराला "न्यू यॉर्क सिटी" किंवा "एनवायसी" किंवा नुसतेच "शहर (सिटी)" म्हटले जाते. दुसरे म्हणजे न्यू यॉर्क हे दोन शब्द आहेत आणि ते तसेच दोन शब्द म्हणून उच्चारले जातात, न्यूयॉर्क असे नाही, न्युयॉर्क असे तर अजिबात नाही. ते दोन शब्द सलग उच्चारल्यास त्यांची न्यू जर्सीतल्या विमानतळ असलेल्या शहराच्या नावाबरोबर, न्यूअर्क (Newark) बरोबर, गल्लत होऊ शकते. अर्थात, धावपळत न्यू यॉर्क पाहायला आलेल्या आणि डॉलर्स खर्च करणार्‍या पर्यटकांना या बाबतीत १०० गुन्हे माफ असतात! :)

न्यू यॉर्क शहर इ स १७८५ ते १७९० या कालखंडात अमेरिकेची (United States) राजधानी होते. मात्र, आता हे शहर अमेरिकेची तर नाहीच पण, सर्वसामान्य गैरसमजाविरुद्ध, न्यू यॉर्क राज्याचीही राजधानी नाही. तो मान या शहराच्या २४० किमी उत्तरेला असलेल्या ऑल्बानी (Albany) या केवळ लाखभर लोकसंख्या असलेल्या शहराचा आहे! राज्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध शहर राजधानीचे शहर नसणे ही अमेरिकेची खासियत अनेकवार आपली विकेट काढून जाते!

सुमारे ८६ लाख वस्तीचे आणि ७९० चौ किमीवर पसरलेले हे अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. परिसरातील भूभागाच्या अर्थकारणावर त्याचा पडणारा प्रभाव जमेस धरला तर ही लोकसंख्या सहजपणे २ कोटीच्या वर जाते. अमेरिकेच्या अर्थकारणात या एकट्या शहराचा हिस्सा (gross metropolitan product किंवा GMP) सुमारे $१. ४ ट्रिलियन इतका मोठा आहे. जगभरच्या जेमतेम डझनभर देशांचे GDP चे आकडे यापेक्षा जास्त आहेत! इथले बंदर जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक बंदरांमध्ये गणले जाते. व्यापार, अर्थ, माध्यमे, कला, फॅशन, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, इत्यादी अनेक क्षेत्रातील अमेरिकेच्या पुढारीपणात या एकट्या शहराचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना या शहराला जगाची सांस्कृतिक व आर्थिक राजधानी समजले जाते, इतका मोठा त्याचा दबदबा आहे. संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय येथे आहे. अर्थातच, जागतिक राजकारणावर प्रभाव पाडणारे अनेक निर्णय येथे घेतले जातात. जवळ जवळ ८०० भाषा बोलल्या जाणारे हे शहर जगातील सर्वात जास्त भाषावैविध्य असलेली जागा आहे. येथे फिरताना इतक्या वंशाचे, रंगछटांचे, तोंडवळ्यांचे, शारीरिक चणींचे, भाषावैविध्याचे लोक केवळ एकमेकाशी मिसळत असतात असे नाही तर आपापल्या कामाच्या दिशांनी पळत असतानाही एकमेकाशी सौहार्दाने वागताना दिसतात की, या शहराला "जागतिक सामाजिक सहिष्णुतेचे केंद्र ( global node of social tolerance)" उगाचच म्हणत नाही याची खात्री पटते.

या शहराला "बिग अ‍ॅपल" असेही म्हटले जाते. हे नाव कसे पडले याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्याचा जास्त विश्वासू इतिहास असा आहे. १९२०च्या दशकात न्यू यॉर्क आणि परिसरात बरीच घोड्यांच्या शर्यतींची अनेक मैदाने होती. या शर्यतींतल्या बक्षिसांना "अ‍ॅपल" असे म्हटले जात असेल. धनिकांचा तुटवडा नसल्याने इथल्या शर्यतींतली बक्षिसे मोठ्या रकमांची असत म्हणून त्यांना "बिग अ‍ॅपल" असे संबोधले जाऊ लागले. New York Morning Telegraph च्या
John J. Fitz Gerald नावाच्या वार्ताहराने ३ मे १९२१ ला "बिग अ‍ॅपल" असा न्यू यॉर्कचा उल्लेख केला आणि ते लोकांना इतके आवडले की तेव्हापासून "बिग अ‍ॅपल" हा "न्यू यॉर्क सिटी" चा लाडका प्रतिशब्द बनला आहे.

आधुनिक न्यू यॉर्क शहराच्या जागेवर अनेक सहस्र वर्षांपूर्वीपासून अनेक अमेरिकन इंडियन लोकांच्या टोळ्या राहत होत्या. इ स १५२४ पासून या परिसरात युरोपियन दर्यावर्द्यांच्या फेर्‍या सुरू झाल्या. मॅनहॅटन बेटाच्या दक्षिण टोकावर व्यापारी केंद्र उघडून डच वसाहतवाद्यांनी १६२४ मध्ये या शहराची पायाभरणी केली व त्याला त्याला "न्यू अ‍ॅमस्टरडॅम" असे नाव दिले. हा भाग सद्या "लोअर मॅनहॅटन" असा ओळखला जातो. इ स १६२६ मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर जनरलने स्थानिक कॅनार्सी (Canarsie) जमातीकडून ६० गिल्डर्सना ($१०००) मॅनहॅटन बेट विकत घेतले.

न्यू यॉर्क च्या इतिहासातील एक प्रकरण फार रोचक आहे. १६६७ मध्ये ब्रिटन व नेदरलँड मध्ये झालेल्या करारानुसार (Treaty of Breda) इंग्रजांनी मॅनहॅटन आणि इंडोनेशियामधील रन/रुन (Run) या नावाच्या बेटांवरील हक्कांची अदलाबदल केली गेली. बांदा समुद्रात एकाकी असलेल्या रन/रुन या बेटाची लांबी ३ किमी व रुंदी १ किमीपेक्षाही कमी आहे.


रुन बेटाचे "स्थान". खुद्द बेटाचा ठिपका या नकाश्यात दिसू शकत नाही!
(जालवरून साभार)

या जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिमुकल्या बेटामध्ये डचांना रस होता आणि त्याच्या बदल्यात त्यांनी नवीन जगातले (न्यू वर्ल्ड, अमेरिका) एक महत्त्वाचे बंदर ब्रिटिशांना दिले, हे आज विचित्र वाटेल. पण, रुन बेट जायफळांच्या झाडांनी भरलेले होते आणि जायफळाच्या व्यापाराचे केंद्र होते. त्या काळी, उच्च प्रतीचा आणि दुर्मिळ मसाल्याचा पदार्थ असलेल्या जायफळाची किंमत सोन्याशी स्पर्धा करत होती! त्याविरुद्ध, मॅनहॅटन त्या काळी फारसे महत्त्वाचे बेट नव्हते. याशिवाय, ब्रिटिश अमेरिकन कॉलनीने घेरलेले मॅनहॅटन बेट डचांना आणि डच इंडोनेशियन कॉलनीने घेरलेले रुन बेट इंग्रजांना सांभाळणे कठीणच जात असणार. त्यामुळे, त्या काळी वरचढ असलेल्या डचांनी जगभरातल्या जायफळाच्या व्यापारावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी हा सौदा इंग्रजांवर लादला होता.

एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात युरोपातील भीषण दुष्काळ, राजकीय अस्थैर्य व जुलूम, "अमेरिकेतील स्वातंत्र्य व सधनतेच्या स्वप्नाचे (अमेरिकन ड्रीम)" आकर्षण, इत्यादी अनेक कारणांमुळे युरोपातील लोकांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेत स्थलांतर केले. या लोकांचे स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या (Statue of Liberty) रूपाने स्वागत करणारे हे शहर अमेरिकेच्या लोकशाहीचे आणि औदार्याचे प्रतीक बनले. त्याचबरोबर अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांतल्या कृष्णवर्णीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने न्यू यॉर्कमध्ये स्थलांतर केले आहे. आशिया आणि लॅटिन (दक्षिण) अमेरिकेतून आलेल्या लोकांची या सगळ्यांत भर पडली आहे. साहजिकच, अनेक वर्ण, वंश, धर्म, विचार, इत्यादींचे एक अजब रसायन या शहरात झाले आहे. अनेक शतकांचा चढउतार सहन करीत, वसाहतवादातून तावूनसुलाखून बाहेर पडत, गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्ड) सामना करत आणि ९/११ सारख्या भयानक आपत्तींना सामोरे जात, या शहराच्या उत्कर्षाची कमान आजतागायत सतत वर जात राहिली आहे. आजही हे शहर अमेरिकेच्या सर्जनशीलतेचे, उद्योजकतेचे, सामाजिक सहिष्णुतेचे आणि पर्यावरणवादाचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे.

येथे कोलंबिया विद्यापीठ, न्यू यॉर्क विद्यापीठ आणि रॉकफेलर विद्यापीठ यासारखी जागतिक यादीत वरच्या स्थानावर असलेल्या शिक्षणसंस्था आहेत. विविध विषयांचे उच्च शिक्षण देणारी १२० विद्यालये आणि विद्यापीठे असलेले हे शहर उच्च शिक्षणासाठी जगभरच्या विद्यार्थ्यांत प्रसिद्ध आहे.

संगणक व संचार क्षेत्रात झालेल्या आणि होत असलेल्या क्रांतीचे पडसाद या शहरावर पडले नसते तरच आश्चर्य. मॅनहॅटनमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांनी आता न्यू यॉर्कच्या सर्व बोरोंमध्ये आणि जवळच्या परिसरांत पाय पसरले आहेत. त्या सर्वांना मिळून सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर "सिलिकॉन अ‍ॅली" असे नाव पडले आहे. २०१५ मध्ये सिलिकॉन अ‍ॅलीमध्ये $७.३ बिलियन (साधारण रु ५०,००० कोटी) इतकी गुंतवणूक केली गेली आहे. काही सबवे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा आहे. ती सबवेच्या सर्व जाळ्यावर टाकण्याचे काम चालू आहे. सर्व शहरभर रस्त्यांवर १००MBPS क्षमतेची ब्रॉडबँड सेवा मोफत देण्याचा महानगरपालिकेचा प्रकल्प चालू आहे. त्यातले काही वायफाय हब्ज काम करू लागले आहेत. आपल्याला शहरात फिरताना ते दिसतात.

न्यू यॉर्क शहराचे खालील नकाश्यात दाखविल्याप्रमाणे पाच प्रशासकीय भाग किंवा बरो (boroughs) आहेत :


न्यू यॉर्क शहरामधील बरोज : १. मॅनहॅटन, २. ब्रूकलिन, ३. क्वीन्स, ४. ब्राँक्स, ५. स्टॅटन बेट
(जालवरून साभार)

यापैकी मॅनहॅटन आणि स्टॅटन ही स्वतंत्र मोठी बेटे आहेत. ब्रूकलिन आणि क्वीन्स लॉग आयलँड नावाच्या एका बर्‍याच मोठ्या बेटाच्या दक्षिण-पश्चिम भूभागावर आहेत. तर, ब्राँक्स अमेरिकेच्या मुख्य भूमीचा भाग आहे. याशिवाय परिसरात असलेली अनेक छोटी बेटे त्यांच्या जवळच्या बरोमध्ये समाविष्ट केली आहेत. मॅनहॅटनच्या पश्चिमेकडून वाहणारी हडसन नदी त्याला न्यू जर्सी राज्यापासून वेगळे करते तर पूर्वेकडील हार्लेम आणि ईस्ट नावाच्या नद्या त्याला ब्राँक्स, क्वीन्स आणि ब्रूकलिनपासून वेगळे करतात. इतका जुजुबी भूगोल आपल्याला न्यू यॉर्कमध्ये फिरायला पुरेसा आहे.

न्यू यॉर्क शहरातली सबवे (जमिनीखालची रेल्वे) आणि बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली आहे की आमच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यात शहरात फिरताना खाजगी चारचाकीची गरज भासली नाही. रस्त्यांवर दर चौकात असलेल्या (आणि चालक कटाक्षाने पाळत असलेल्या) सिग्नल्समुळे आणि रस्त्यावरच्या गर्दीमुळे, बस किंवा खाजगी वाहनापेक्षा सबवे जवळ जवळ निम्म्या वेळात व खात्रीने गंतव्यापर्यंत पोचवते असाच अनुभव आला! सबवे आणि बस या सेवा शहरभर एकच वाहतूक संस्था (New York City Transit Authority) चालवते. तिने दिलेले स्मार्टकार्ड सर्व शहरभर सबवे आणि बसला चालते. हे कार्ड सर्व सबवे स्टेशन्समध्ये आणि काही बसथांब्यांवर असलेल्या व्हेंडिंग मशिन्समध्ये मिळते. त्यातले पैसे संपले तर तीच मशिन्स वापरून त्यांतले पैसे वाढवता येतात. शहरात कोठूनही कोठे जायच्या एका प्रवासाला $२.७५ पडतात. सबवे स्टेशनम्ध्ये अथवा बसमध्ये जाताना कार्ड स्वाईप केले की तेवढे पैसे कार्डातून वजा होतात. सबवे/बसमधून बाहेर पडून दोन तासांच्या आत प्रवासाच्या दिशेने पुढे जाणारी बस/सबवे पकडली तर अर्थातच कार्ड स्वाईप करावे लागते पण त्या एका प्रवासाचे पैसे कापले जात नाहीत. थोडक्यात, वाहन बदलले तरी एका दिशेचा प्रवास $२.७५ मध्येच होतो. सबवे आणि बसमार्गांचे शहरभर पसरलेले जाळे पाहता ही प्रवासाची पद्धत फार सोईची आणि किफायतदार आहे.


न्यू यॉर्क सिटी सबवे नकाशा
(New York City Transit Authority च्या संस्थळावरून साभार)


मॅनहॅटनमधिल बसमार्गांचा नकाशा
(New York City Transit Authority च्या संस्थळावरून साभार)

मात्र, संपूर्ण अमेरिकेत, एकदा मोठ्या शहरांच्या बाहेर पडले की लहान शहरांत व गावांत सार्वजनिक वाहतूक सेवेचा बर्‍यापैकी ठणठणाट आहे. त्यामुळे खाजगी वाहन नसले तर एकतर मोठा खोळंबा होतो किंवा खिशाला चाट लावणारी टॅक्सी वापरावी लागते. तेथे खाजगी वाहन ही चैन नसून अत्यावश्यक व बचत करणारी सोय आहे. अमेरिकन किंवा आंतरराष्ट्रिय चारचाकी परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) जवळ असला तर भाड्याची गाडी (रेंटल कार) सहज मिळते. त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्भागात स्वतंत्रपणे फिरायचे असले तर असा परवाना असणे सहलिला आणि खिशाला सोईचे ठरते.

असो. इतक्या पूर्वतयारीनंतर आता आपण आपल्या भटकंतीकडे वळूया.

वरची सर्व पार्श्वभूमी पाहता या शहराचे जागतिक पर्यटनात अनन्य महत्त्व असले तर आश्चर्य ते काय! २०१५ मध्ये या शहराला ६ कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. अर्थातच, त्याला "The most photographed city in the world" हा किताबही मिळालेला आहे.

या शहरात असलेल्या पर्यटन आकर्षणांची यादी करायला लागल्यावर ती न संपणारी मारुतीची शेपटी आहे हे ध्यानात आले...

अर्थातच, भरपूर वेळ गाठीशी असला तरी, इतक्या सगळ्या जागांना भेट देणे नक्कीच थकवादायक, कंटाळवाणे आणि गैरजरूर ठरले असते. त्यामुळे, उगाच सगळे टिकमार्क्स पुरे करण्याच्या नादात न पडता त्यातल्या माझ्या दृष्टीने आकर्षक आणि आनंददायक असलेल्या जागांचा आरामात आणि मनसोक्त आनंद घेतला. त्या जागांची सफर आपण या मालिकेत करणार आहोत.

याशिवाय, बराच मोकळा वेळ असल्याने, माझा आवडता छंद म्हणजे "प्रसिद्ध, मुख्य ठिकाणांना सोडून जरा दोन चार गल्ल्या आतले शहर पाहणे" हे सुद्धा आपण करणार आहोत. असे केल्याने खर्‍या शहराची जवळून ओळख होते आणि कधीमधी अचानक, सुखद, आश्चर्यकारक अनुभव येतात... जे नेहमीच्या पर्यटनात सहसा शक्य नसते.

चला तर मग, पुढच्या भागापासून न्यू यॉर्क शहर आणि परिसराची भटकंती करायला तयार व्हा !

(क्रमश :)
===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

29 Aug 2016 - 12:29 am | खटपट्या

छान माहीती न्यू योर्क शहराबद्दल. पाथ आणि सबवे या दोन वेगवेगळ्या रेलवे कंपन्या/डीपार्टमेंट्स आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2016 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पाथ (PATH) उर्फ The Port Authority of NY & NJ ची सेवा ही न्यू यॉर्क शहर आणि न्यू जर्सी राज्य यांना जोडणारी सेवा आहे. ती न्यू यॉर्कच्या अंतर्गत वाहतूकीत भाग घेत नाही. त्यामुळे तिचा उल्लेख आला नाही. तिचे WTC स्टेशन मात्र पहाण्यासारखे आहे. न्यू जर्सीच्या फेरीत आपण त्याला भेट देऊ !

वाचतोय... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

चतुरंग's picture

29 Aug 2016 - 3:18 am | चतुरंग

अतिशय माहितीपूर्ण आहे लेख.
अजून एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट अ‍ॅडवतो - मॅनहटनची रस्त्यांची रचना ही अगदी नेटकी कॅडबरीच्या वड्या पाडल्यासारखी चौकोनी आहे. म्हणजे सगळे उत्तर-दक्षिण रस्ते हे अवेन्यूज या नावाने आणि पूर्व-पश्चिम रस्ते स्ट्रीट्स या नावाने ओळखले जातात. त्यामुळे पत्ता सांगताना थर्ड अवेन्यू, सेवेंटीफिफ्थ स्ट्रीट असं म्हंटलं की नेमकं कुठे ते चटकन समजू शकतं. यातले जवळपास सगळे स्ट्रीट्स हे एकाआड एक उलटसुलट एकदिशामार्गी आहेत त्यामुळे वाहतूक सुरळित रहायला मदत होते (अर्थात तिथे नो एंट्रीत लोक घुसत नाहीत हे देखील आहेच! ;) )

पिलीयन रायडर's picture

29 Aug 2016 - 6:05 am | पिलीयन रायडर

+११११

वा काका!! अगदी सुंदर ओळख!

सबवे म्हणजे न्यु यॉर्कच्या रक्तवाहिन्या! सिटी मध्ये असाल तर खाजगी वाहानाची अजिबात गरज पडत नाही. एकदा तिकिट काढलं की एक स्टेशन जा अथवा अगदी शेवटच्या स्टेशन पर्यंत.. तिकीट तेच!

सबवेच्या आतमध्ये स्टेशनमध्ये सुद्धा भरपुर अतरंगीपणा चालु असतो. लोक्स मस्तपैकी गिटार, ड्रम्स वाजवत असतात. स्टेशन्सच्या भिंतींवरचे म्युरल्स सुद्धा अगदी देखणे असतात. आणि खुद्द स्टेशन्स म्हणजे सुद्धा एक भुलभुलैया असावा इतकी मोठी आहेत. जसे की ४२-टाईम्स स्क्वेअर हे स्टेशन. आतल्या आत जवळपास २ ब्लॉक्स चालावं लागतं. त्यातही पुन्हा जमिनीखाली असुनही स्टेशन मध्ये पुन्हा मजले आहेत. तीन मजल्यांवर तीन (एन. क्यु, आर / ए, बी,सी आणि ७) अशा ट्रेन्स जातात. एकदा आत गेलं की तुम्ही आतल्या आत कुठेही फिरु शकता, पुन्हा स्वाईप करावे लागत नाही. एवढी गुंतागुंतीची सिस्टीम, ते ही इतकी जुनी आणि आजही इतकी भक्कम!

ग्रॅण्ड सेंट्रल हा कळस आहे ह्या सिस्टीम वर! काका लिहीतीलच.

सबवे / मेट्रो हे सर्वात मोठं कारण आहे ह्या शहराच्या प्रेमात पडण्याचं! ज्यांना कधी इकडे यायचं आहे त्यांनी टुर नाही घेतली आणि स्वतः सबवेने फिरुन न्यु यॉर्क पाहिलं तर फारच कमी पैशात अगदी जवळुन शहर पहाता येईल.

जयन्त बा शिम्पि's picture

29 Aug 2016 - 4:34 am | जयन्त बा शिम्पि

सध्या न्यूजर्सी मध्येच असल्याने , न्यूयॉर्क सिटी ची बहुमूल्यवान माहिती मिळत आहे हा मोठाच लाभ आहे. त्याबद्द्ल धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2016 - 6:42 am | कैलासवासी सोन्याबापु

वाह!! पुभाप्र!!

सुंदर ओळख आणि तपशीलवार माहिती.

संदीप डांगे's picture

29 Aug 2016 - 8:44 am | संदीप डांगे

तुम्ही आम्हाला अमेरिकेच्या प्रेमात पाडण्याचे पाप करत आहात! ;)

पुढचे भाग पटापटा टाकल्यास लौकर पापमुक्त व्हाल!! =))

वाचतेय.वाखुसा.
पुभाप्र

पगला गजोधर's picture

29 Aug 2016 - 8:52 am | पगला गजोधर

काश, हा लेख दहा वर्षां पूर्वी वाचायला मिळाला असता.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2016 - 9:27 am | प्रभाकर पेठकर

माझ्या शालेय खडतर जीवनात, इतिहास-भूगोलाचा तास संपून सांस्कृतीक कार्यक्रमाचा तास सुरु झाल्यावर जसा आनंद व्हायचा तस्साच आनंद झाला.
भूगोल आवडत नसला तरी डॉक्टर साहेबांचे तपशिलवार वर्णन मनाला नक्कीच भुरळ पाडते. २०११ साली न्यू यॉर्कला (बरोबर नं डॉक्टर साहेब) धावती भेट दिली होती. ४ जुलै असल्याकारणाने फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. रात्रभर मॅनहॅटनचे रस्ते पर्यटकांनी तुडुंब भरलेले होते. टाईमस्क्वेअरचा झगमगाट आपल्याकडच्या १-२ गावांची विजेची संपूर्ण गरज भागविण्यास पुरा पडेल असा होता.
पुढील भागांच्या वाचनासाठी सज्ज आणि उत्सुक आहे.

मानस्'s picture

29 Aug 2016 - 10:34 am | मानस्

न्यू यॉर्क शहराचा इतिहास आणि भूगोल इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.
पुभाप्र..

प्रसन्न३००१'s picture

29 Aug 2016 - 10:35 am | प्रसन्न३००१

>>सुंदर ओळख आणि तपशीलवार माहिती.<<

+ १

लोनली प्लॅनेट's picture

29 Aug 2016 - 10:55 am | लोनली प्लॅनेट

सुंदर माहिती दिलीत म्हात्रेकाका...
कॅलिफोर्निया ची राजधानी लॉस एन्जेलीस नसून sacramanto टेक्सास ची राजधानी housten नसून ऑस्टिन...महत्वाचे शहर हि त्या राज्याची राजधानी नसणे हि फार छान गोष्ट आहे...अमेरिकेचे वेगळेपण सर्वच गोष्टींमध्ये दिसते... तिथे अमेरिकेचा ध्वज सुद्धा यथा तथा सर्वत्र दिसतो

सुंदर व नेटकी ओळख. पुभाप्र.

चौकटराजा's picture

29 Aug 2016 - 1:05 pm | चौकटराजा

ओघवती शैली , माहितीपूर्णता व नेमकेपणाचे भान ही आपली खास बलस्थाने आहेत.त्यामुळे डो म्हात्रे हे मिपाला मिळालेले एक बिग अ‍ॅपल आहे असेच आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारली की चारचाकी घ्यावी लागत नाही हे पर्यटकांसाठी सोयीचे असतेच पण चारचाकी वा दुचाकी संस्कृतीचे दास झालेल्या भारतीय शहरांमधे जर सार्वनजिक वहातुक सुधारली तरी प्रश्न सुटतील का
याविषयी मला शंका आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2016 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

चारचाकी वा दुचाकी संस्कृतीचे दास झालेल्या भारतीय शहरांमधे जर सार्वनजिक वहातुक सुधारली तरी प्रश्न सुटतील का

याबाबत खालील वाक्य बोलके आहे...

कोणत्याही देशाच्या विकासाची खरी प्रत, "देशातल्या सधन नागरिकांकडे दरडोई/घरटी किती खाजगी गाड्या आहेत" याच्या प्रमाणावरून नाही तर "देशातले किती सधन नागरिक सार्वजनिक सेवा वापरून प्रवास करतात" याच्या प्रमाणावरून ठरते.

dipak_borole's picture

30 Aug 2016 - 8:11 am | dipak_borole

आवडेश....

पद्मावति's picture

30 Aug 2016 - 3:33 pm | पद्मावति

खूपच मस्तं! पु.भा.प्र.

सुहास बांदल's picture

30 Aug 2016 - 4:55 pm | सुहास बांदल

भाग १ आणि २ सलग वाचून काढले. न्यूयॉर्क कधी जायचा योग नाही आला पण जेव्हा येईल तेव्हा आपला लेख नक्की परत वाचणार.

माझे दोन पैसे
एक न्युयॉर्कचे टुरीझम वाढवण्यासाठीचा भाग म्हणुन एक भन्नाट लोगो बनवलेला होता.
I ❤ NY
यातली आय लव्ह न्युयॉर्क च्या ऐवजी मध्ये लाल बदाम घेणं यातील क्रिएटीव्हीटी प्रचंड आवडलेली होती.
या संदर्भातली या निर्मात्याला सुचलेल्या कल्पनेसंदर्भातील रोचक विवेचन फार नंतर इमॅजीन हाऊ क्रीएटीव्हीटी वर्क्स मध्ये वाचली तेव्हा फार मजा आलेली आठवतेय.
फिलहाल
I ❤ NY

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2016 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

❤ या सर्वव्यापी चिन्हाचा उगम कळला ! इतके कल्पक आणि सहजपणे अर्थ प्रकट करणारे दुसरे चिन्ह पाहण्यात नाही.

काय विवेचन वाचले होते तेही लिहा ना आठवत असेल तर..

जुइ's picture

1 Sep 2016 - 7:21 pm | जुइ

न्यू यॉर्क शहरा बद्दल बरीच माहिती प्रथमच कळली.

कप्तान हाम्रिका सिविल वॉर मध्ये कप्तान आपल्या इस्पायडरम्यानला इचारतो, "पोरा, कंच्या गावचा तू?", तेवा आपल्या इस्पायडया म्हणतो," Queens चा हाये मी दाजी ", तवा कप्तान म्हणतो, "म्या ब्रूकलीनचा !" म्हणजे काय ते आत्ता मला कळले.

राघवेंद्र's picture

2 Sep 2016 - 12:41 am | राघवेंद्र

माझ्या निरीक्षणातून :
ब्रूकलीन हे येथील कामगार वर्गाचा राहण्याचा आवडता भाग. त्यामुळे चित्रपटात ब्रूकलीनचा सारखा उल्लेख असतो.
जसे मुंबईत धारावी मध्ये हिरो राहतो तास न्यू यॉर्क मध्ये ब्रूकलीन मध्ये
( चूक भूल द्यावी. )

सुंदर ओळख! छान, अभ्यासपूर्ण लेख आणि तरीही जराही कंटाळवाणा नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2016 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद !

पैसा's picture

3 Sep 2016 - 9:57 pm | पैसा

न्युयॉर्कची मस्त ओळख!