न्यू यॉर्क : ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
10 Mar 2017 - 1:23 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

न्यू यॉर्क शहरात संग्रहालयांना तोटा नाही. एका संस्थळावरच्या यादीत २०० च्या वर संग्रहालयांची नावे आहेत ! ती सगळी बघायची म्हटली तर, फक्त संग्रहालये बघायचा मनसुबा करून, त्या शहरात सहा-आठ महिने ठाण मांडून बसायला लागेल ! थोड्या वेळात बरेच काही पहायचे असेल तर मग आपल्या आवडीनिवडीप्रमाणे बर्‍याच नावांवर काट मारून, एक गुणवत्ता यादी बनवून, तिच्यात वरच्या स्थानावरील काही नावेच निवडावी लागतात. अश्या प्रकारे बनवलेल्या माझ्या यादीत एक नाव होते, "न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम".

सन १९७६ साली स्थापन झालेल्या या संग्रहालयात, Metropolitan Transportation Authority (MTA) च्या अधिकारात न्यू यॉर्क शहरात चालवल्या जाणार्‍या सबवे प्रणाली, बस प्रणाली, जमिनीवरून जाणारी कम्म्युटर रेल्वे प्रणाली आणि एकंदर वाहतूक सुलभ करण्यासाठी बांधलेले पूल व नद्या-खाड्यांखालून जाणारे बोगदे, इत्यादींच्या संबंधित सन १९०७ पासूनच्या (शतकभरापेक्षा जास्त कालातले) इतिहासातील माहिती आणि वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. मुख्य म्हणजे, न्यू यॉर्कच्या विशाल सबवेची उभारणी करताना वापरलेले / झालेले मोठे तांत्रिक बदल तर इथले संग्रह दाखवतातच; पण, त्यापुढे जाऊन त्या कालखंडातील वाहतुकीतील बदलामुळे झालेल्या सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाची नोंदही येथे ठेवलेली दिसते. आणि त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी पण धोकादायक प्रकल्पात झालेल्या अनेक भयानक अपघातांची आणि त्यातील जीवहानीचीही नोंद इथे आहे. ११ नोव्हेंबर २००१ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा अतिरेकी हल्ला, २८-२९ ऑक्टोबर २०१२ ला आलेल्या हरिकेन सँडी, इत्यादींमुळे सबवेच्या प्रणालींचे झालेले नुकसान आणि त्यावेळी उडालेल्या गोंधळातून बाहेर येण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलचे संग्रहही येथे पहायला मिळतात.

रोचक गोष्ट अशी की, हे संग्रहालय १९३६ साली ब्रूकलीनमध्ये सुरू केलेल्या पण सद्या वापरात नसलेल्या "कोर्ट स्ट्रीट" नावाच्या एका सबवे थांब्यामध्ये आहे ! त्याचे क्षेत्रफळ शहराच्या एका ब्लॉकइतके विशाल आहे. थांब्याचे मेझॅनिन मजला व प्लॅटफॉर्म्ससकट सगळे बांधकाम अजूनही उत्तम अवस्थेत आहे आणि इथला रेल्वेमार्ग आजही सुस्थितीत असून चालू असलेल्या रेल्वेमार्गाला जोडलेला आहे.

या जागेवर अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांचे चित्रीकरण झाले आहे... Guilty Bystander, The FBI Story, The Taking of Pelham One Two Three (मूळ १९७४ सालचा चित्रपट आणि त्याचा २००९ सालचा नवीन अवतार), Life on Mars (The Simple Secret of the Note In Us All), इत्यादी.

या संग्रहालयाची एक छोटी शाखा मॅनहॅटनमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनलमध्ये आहे.

तर अश्या या अनवट संग्रहालयाला भेट देण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणेच सबवे पकडून ब्रूकलीनमध्ये पोहोचलो. इमारतींच्या भाऊगर्दीतून वाट काढत असताना गुगलमॅपने आम्ही संग्रहालयाजवळ पोहोचलो आहोत असे सांगितले. नेहमीच्या सवयीने डोळे एक भले मोठे आणि आकर्षक प्रवेशद्वार शोधायला लागले. पण तसे काहीच दिसेना. शेवटी एका इमारतीच्या कोपर्‍यावर, दोन मजल्याइतक्या उंच सडपातळ पाटीवर, सबवेच्या गणवेशातील कर्मचार्‍याच्या चित्रासह, संग्रहालयाचे नाव दिसले...


संग्रहालयाची पाटी आणि ती पाटी असलेल्या इमारतीचा, प्रवेशद्वाराविना असलेला, दर्शनी भाग

पण, त्या पाटीखाली प्रवेशद्वारच दिसत नव्हते. इकडे तिकडे सगळीकडे पाहूनही अपेक्षित असलेले भलेमोठे प्रवेशद्वार कोठेच दिसले नाही. त्या पाटीच्या जवळ गेल्यावर तिच्या खालच्या भागात, जमिनीच्या दिशेने निर्देश करणारा, एक छोटा बाण दिसला. पाटीच्या खाली उभे राहिल्यावर इमारतीच्या कोपर्‍यापलिकडच्या फूटपाथवर जमिनीखाली जाणारे सबवेचे एक सर्वसामान्य प्रवेशद्वार दिसले. त्याच्यावर थांब्याचा पाटीऐवजी संग्रहालयाचे नाव पाहिले आणि ध्यानात आले की, अरे हेच आहे ते संग्रहालयाचे प्रवेशद्वार !...


संग्रहालयाचे प्रवेशद्वार

या कल्पकतेने चकित व्हावे की असा साधा दर्शनी भाग असलेल्या संग्रहालयात काही रोचक बघायला मिळेल काय अश्या संभ्रमात पडावे, अशी द्विधा मन:स्थिती घेऊन जिन्याच्या पायर्‍या उतरलो. सबवेच्या तिकिटघरासारख्या स्वागतकक्षात संग्रहालयाचे तिकिट काढून आत गेलो आणि मनातल्या सगळ्या शंका विरून जाऊ लागल्या. शहराच्या एका अख्ख्या ब्लॉकइतके मोठे क्षेत्रफळ असलेल्या या संग्रहालयातल्या वस्तू अनेक विभागांत संग्रहित केलेल्या आहेत. त्या एक एक करत पाहण्यात केव्हा रमून गेलो ते कळलेच नाही.

पोलाद, पाषाण आणि कणा (Steel, Stone and Backbone)

या भागात, विसाव्या शतकात सबवे बांधताना वापरल्या गेलेल्या बांधकाम पद्धती आणि त्यामध्ये काम करणार्‍या कामगारांच्या जीवनाशी संबंधीत वस्तू, चलतचित्रपट्टीका, प्रकाशचित्रे, इत्यादींचे संग्रह आहेत.


सबवेचे काम चालू असतानाही त्याच्या वर असलेल्या जमिनीवरचे उद्योग निर्वेधपणे चालू होते हे अभिमानाने सांगणारे चित्र


बांधकामप्रणालीच्या विविध पायर्‍यांचा प्रकाशचित्ररूपाने जपलेला इतिहास


सबवे बांधकाम कर्मचार्‍यांचे वेतनदर आणि त्यांच्या नेहमीच्या गरजेच्या वस्तूंचे दर

  
सुरुवातीच्या काळातले लोहमार्ग व त्यांच्यावरच्या थांब्यांची प्रातिनिधिक प्रकाशचित्रे


नदी किंवा खाडीच्या पाण्याखालून जाणार्‍या रेल्वेबोगद्यांच्या बांधकामाची पद्धत दाखवणारे चित्र

शहराच्या पोटातून बोगदे खणत सबवे मार्ग पुढे पुढे नेणे अत्यंत धोकादायक काम होते. त्यासाठी त्या काळात आजच्यासारखा पूर्वानुभव गाठीला नव्हता किंवा उत्तमोत्तम आधुनिक मशीनरीही नव्हती. अर्थातच, ते काम अत्यंत धोकादायक होते, अनेक लहानमोठे अपघात त्या कामाच्या इतिहासात विखुरलेले आहेत आणि त्यात अनेक कामगारांच्या प्राणाची आहुती पडलेली आहे. त्यापैकी महत्त्वाच्या अपघातांची नोंद आपल्याला येथे पहायला मिळते...

  

सबवे उभारणीच्या कामात झालेल्या काही अपघातांची नोंद

सबवे कार्यप्रणाली (Operations)

सबवेचे तिकिट विकत घेण्यासाठी, ते तपासून प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यासाठी आणि गाड्यांची अव्याहत विनासमस्या येजा चालू ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कार्यप्रणालींचे अनेक संग्रह येथे आपल्याला जवळून पहायला मिळतात. या भागात फिरताना जणू तो इतिहासच आपण अनुभवत असतो...


काळाबरोबर बदलत गेलेल्या सबवे प्लॅटफॉर्मवरच्या प्रवेशप्रणाली


काळाबरोबर बदलत गेलेली सबवे थांब्यांवर प्रवेश करण्यासाठी वापरात असलेली धातूची नाणी (स्लग्ज / टोकन्स)

गंमत म्हणजे, गैरमार्गाने सबवे थांब्यावर जाण्यासाठी या नाण्यांच्याऐवजी वापर केली गेलेली नकली नाणी अथवा धातूचे तुकडेसुद्धा येथे संग्रहित करून ठेवलेले आहेत ! गेली पाच एक वर्षे त्या कामासाठी धातूचे नाणे न वापरता, सबवे आणि बस दोन्हींना सामायिक असलेले इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर चालणारे प्लास्टिकचे "मेट्रोकार्ड" वापरले जाते. त्या मेट्रोकार्डाचे आजतागायत बदलत गेलेले अनेक अवतारही येथे जतन करून ठेवलेले आहेत...


काळाबरोबर बदलत गेलेले मेट्रोकार्डाचे अवतार

  
  
सबवे प्रणाली सतत उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सबवेचे जुन्या काळचे नियंत्रणकक्ष आणि अवजारे

रस्त्यावरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा संग्रह (On the Streets Exhibit)

न्यू यॉर्क ट्रांझिट व्यवस्थेअंतर्गत रस्त्यावरून धावणार्‍या सार्वजनिक बसेसची व्यवस्थाही येते. किंबहुना एकच "मेट्रोकार्ड" सबवे व बस या दोन्ही व्यवस्थांना सामायिकपणे वापरता येते. सबवेतून बाहेर पडून, दोन तासांच्या आत त्याच, दिशेने पुढे जाणारी बस पकडल्यास मेट्रोकार्डातील पैसे कमी न करता "एक्स ग्रेशिया उर्फ फुकट" प्रवास करता येतो.

या विभागात १८००च्या शतकापासून तर आजतागायत बदलत गेलेल्या काही बसेसच्या भागांच्या पूर्णाकृती आहेत. त्यांच्यात बसून त्यांचा पूर्ण अनुभव घ्यायला परवानगी आहे. कोणत्याही प्रकारे, "इथे जाऊ नका, याला हात लावून नका", अशी बंधने अजिबात नाहीत आणि तसे दटावण्यासाठी कोणते संरक्षकही तेथे हजर नसतात. संग्रहालयाला भेट देणारे छोटे पाहुणे त्या सवलतींचा पुरेपूर उपयोग करून धमाल करताना दिसत होते...

  
बच्चेकंपनीची जुन्या बसमधील धमाल

या संग्रहालयाच्या "T.F Rahilly Trolley and Bus Study Center" या विभागात वेगवेगळ्या काळातील ट्रॉलीज, बसेस आणि दुरुस्ती व्हॅन्सच्या काटेकोर प्रमाणात बनवलेल्या ५० प्रतिकृती आहेत. ज्यांना अश्या मॉडेल्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे...

  
  
ट्रॉलीज व बसेसच्या काटेकोर प्रमाणात बनवलेल्या प्रतिकृती

सूचनांच्या जुन्या पाट्या (Vintage Signs)

जुन्या काळी वापरात असलेल्या प्रवाशांसाठी सूचना लिहिलेल्या पाट्यांचा एक वेगळा विभाग आहे...

  
  

वाहतूक व्यवस्थेतील सूचनांच्या जुन्या पाट्या

या पाट्यांतील "थुंकू नका", "धूम्रपान निषेध", "आपल्या कुत्र्यांची घाण आपणच साफ करा", इत्यादी पाट्या पाहून; आज सहजपणे सर्वत्र दिसणारी शिस्त आणि स्वच्छता जुन्या काळी न्यू यॉर्कमध्ये अस्तित्वात नव्हती हे समजते. आपण भारतात आज अनुभवत असलेल्या बेशिस्त, अस्वच्छता, इत्यादी समस्या न्यू यॉर्कलाही काही काळापूर्वी भेडसावत होत्या हे त्यांच्यावरून समजते. ते पाहून आपले बर्‍यापैकी मनोरंजन तर होतेच, पण उत्तम प्रशासन ही अनवस्था बदलू शकते याची जाणीव होऊन, दूरवर कुठेतरी आशेचा किरण मनात चमकून जातो.

पोस्टर्स

येथे वाहतुकीशी संबंधित विषयांवरची रोचक पोस्टर्स आहेत...

  
सामाजिक परिवर्तन दाखवणारी पोस्टर्स : वर्णभेद आणि स्त्री-सबलीकरण

  
    
न्यू यॉर्क शहरातील सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणारी पोस्टर्स

संग्रहालयात चलतचित्रपट्टीका दाखविणारे एक छोटेसे थिएटर आहे. सबवेच्या जुन्या मोटरव्हॅनचा कल्पक उपयोग करून त्याचे प्रवेशद्वार बनवलेले आहे...


सबवेच्या जुन्या मोटरव्हॅनच्या डब्याचा उपयोग करून बनवलेले संग्रहालयातील चलतचित्रपटगृहाचे प्रवेशद्वार

सबवेच्या बदलत्या डब्यांचा जिवंत इतिहास

मेझॅनिन मजल्यावरचे संग्रह पाहून झाल्यावर तेथून एक जिना उतरून सबवेच्या प्लॅटफॉर्मवर गेलो. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला अजूनही कार्यरत असलेल्या सबवे प्रणालीला जोडलेले रूळ आहेत. त्यांच्यावर गेल्या शतकभरात वापरलेल्या सबवेच्या डब्यांचे नमुने रांगेने उभे केलेले आहेत. त्या डब्यांच्या बदलत गेलेल्या आकाराचे आणि अंतर्गत रचनेचे केवळ बाहेरून निरीक्षण तर करता येतेच, पण डब्यांत मुक्तपणे फिरून व आसनांवर बसून त्यांचा पुरेपूर अनुभव घेता येतो...


प्लॅटफॉर्म

  
  
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले वेगवेगळ्या कालखंडातले सबवेचे डबे ०१

    
    
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले वेगवेगळ्या कालखंडातले सबवेचे डबे ०२


सद्यकाळातला सबवेचा डबा

सबवेच्या डब्यांतील जाहिराती

प्रत्येक डब्याच्या कालखंडात त्याच्या आत लावलेल्या जाहिराती उत्तम अवस्थेत राखून ठेवलेल्या आहेत. हा जुन्या काळातला रोचक अमूल्य खजिना आपले लक्ष वेधून घेतो. त्यातील काही...

  
  
  
सबवेच्या डब्यातील जाहिराती ०१

  
सबवेच्या डब्यातील जाहिराती ०२

सबवे थांब्यांचे जुने अवशेष

बंद झालेल्या व जीर्णोद्धार केलेल्या सबवे थांब्यांचे काही रोचक अवशेषांचा एक संग्रह प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेला आहे...

  
  
जुन्या सबवे थांब्यांचे अवशेष

एक अनवट संग्रहालय पाहून बाहेर पडलो आणि "आतापर्यंत माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहात" अशी जोरदार तक्रार पोटोबाने करायला सुरुवात केली. चिरंजीवाच्या अल्मामाटरच्या ब्रूकलीन ब्रिजजवळील डॉर्मशेजारच्या त्यांच्या खास पसंतीच्या रेस्तराँच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. वाटेत ब्रूकलीनचे झालेले हे चित्ताकर्षक दर्शन...

  
  
  
ब्रूकलीनचे मनोहारी दर्शन

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2017 - 7:21 pm | पिलीयन रायडर

ह्या म्युझीयम बद्दल माहितीच नव्हतं. तुम्ही म्हणताय ते खरंय, अमेरिकेत म्हणे स्टारबक्स पेक्षा जास्त म्युझीम्यम्स आहेत.

कधी तरी जाऊन येईन. तुमच्या मुळे इतकी ठिकाणे कळत आहेत. ही एक अप्रतिम मालिका आहे मिपावरची!

बाकी आजकालच्या काही काही सबवे इतक्या खडखडतात की त्या ही १०० एक वर्षांपासुन धावत आहेत का अशी शंका येते! पोहच्तोय की नाही असं वाटत रहातं. त्यातल्या अनाऊन्समेंट्स तर कधीच कळत नाहीत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Mar 2017 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

न्यू यॉर्क सबवेचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची खरेच गरज आहे. चकचकीत युरोपियन अंडरग्राउंड किंवा ट्युबशी तुलना केली की ते जरा जास्तच जाणवते.

मुळात खूप जुनी सेवा आणि त्यातच २०१२ च्या हरिकेन सँडीमध्ये तिचे बोगदे पूर्णपणे पाण्याने आणि रेतीने भरले होते. आजपर्यंत त्या नुकसानातून सावरण्यासाठी लागणार्‍या दुरुस्त्या चालू आहेत. यामुळेच, विकएंडला प्रवास केल्यास अनेक मार्गांवरचे काही भाग दुरुस्ती/बदलांसाठी बंद असलेले दिसतात. मात्र, त्या भागांसाठी मोफत बससेवा किंवा पर्यायी मार्गांवरून धावणार्‍या सबवे असल्याने काही मिनिटांच्या खोळंब्यापेक्षा जास्त त्रास होत नाही.

मात्र, सबवे इतके जलद, स्वस्त आणि सोईचे प्रवासाचे साधन अख्ख्या न्यू यॉर्कमध्ये नाही, हे पण तितकेच खरे !

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2017 - 8:05 pm | पिलीयन रायडर

अगदी..!!

मी सबवेच्या आकंठ प्रेमात आहे. चटाचट कुठेही जाता येतं. त्यांनी फक्त एखादा डेली पास सुरु करावा. थोड्याच काळासाठी आलेल्या पर्यटकांसाठी सोयीचा कोणताच पास नाही. त्यामानाने सॅन फ्रान्सिस्को आणि एल.ए फार चांगले.

राघवेंद्र's picture

13 Mar 2017 - 4:16 am | राघवेंद्र

खूप दिवसापासून जायचे आहे इथे . तुमच्या मुळे नीट माहिती मिळाली.

एकाच शहरात किती ही म्युजियम्स...!

हा भाग पण आवडला.

पद्मावति's picture

14 Mar 2017 - 11:40 pm | पद्मावति

खुप मस्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2017 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !