न्यू यॉर्क : २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
22 Jan 2017 - 10:49 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

उद्यानातून बाहेर पडून परतीची बस पकडली आणि हार्लेम नदीला ओलांडून आमच्या गल्लीत प्रवेश केला...

१८९५ साली Boone and Crockett Club च्या सभासदांनी इतर काही नागरिकांच्या सहकार्याने "प्राणिसंग्रहालये स्थापन करणे, प्राणिशास्त्रात संशोधन करणे आणि जंगली प्राण्यांचे संरक्षण करणे" हे हेतू मनात धरून New York Zoological Society ची स्थापना केली. या संस्थेचेच पुढे Wildlife Conservation Society या विश्वव्यापक संस्थेमध्ये रूपांतर झाले. आजच्या घडीला ही संस्था ६५ देशांतील ५१.८ लाख चौ किमी क्षेत्रफळावर ५०० वन्यप्राणी संवर्धन प्रकल्प चालवत आहे व तिच्या छत्राखाली २०० जण पीएचडी स्तराचे संशोधन करत आहेत. भारताचे क्षेत्रफळ ३२.९ लाख चौ किमी आहे यावरून या संस्थेच्या पसार्‍याचा अंदाज यावा ! ही संस्था एकट्या न्यू यॉर्क शहरात चार प्राणिसंग्रहालये आणि एक मत्स्यालय चालवते. या सर्वांना मिळून दरवर्षी ४० लाख लोक भेट देतात.

त्यापैकी, सन १८९९ मध्ये जनतेला खुल्या झालेले व २६५ एकर क्षेत्रफळ असलेले ब्राँक्स प्राणिसंग्रहालय हे अमेरिकेतील नागरी भागात असलेले सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. याच्या हद्दीतून वाहणार्‍या ब्राँक्स नदीचा प्राण्यांसाठी नैसर्गिक परिसर निर्माण करण्यासाठी तिचा खुबीने उपयोग करून घेतलेला आहे. सन १९१६ साली येथे प्राणिसंग्रहालयासाठी स्थापन केलेले जगातले पहिले प्राणिरुग्णालय अस्तित्वात आले. गेली काही वर्षे सतत घटत जाणार्‍या सरकारी मदतीमुळे, दुर्दैवाने, या प्राणिसंग्रहालयाचा सुवर्णकाल मागे पडला आहे आणि अनेक विभाग बंद पडले आहेत. तरीही, सद्या येथील २० पेक्षा जास्त विभागांत अंदाजे ६५० प्रजातींचे सुमारे ४००० प्राणी आहेत. या जागेला दरवर्षी २१ लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.

याच्या सगळ्या विभागांना भेट द्यायची तर त्याच्या आवारात चालत बरेच उलटे-सुलटे फेरे घालावे लागते. बागेत प्रवास करण्यासाठी शटल बसट्रेनची चकटफू सोय आहे. पण, तिच्या ठराविक मार्गामुळे आणि थांब्यांच्या संख्येमुळे, सगळ्या आकर्षणांना बघायचे असल्यास बरीच पायपीट करावीच लागते.


ब्राँक्स प्राणिसंग्रहालयाच्या आवाराचा नकाशा

असो. आता अधिक वेळ न घालवता चला फेरी मारायला या संग्रहालयात.

हे संग्रहालय ब्राँक्स मधील न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डनच्या जवळ असल्याने येथे कसे पोचायचे माहीत झालेले होते. बोटॅनिकल गार्डनप्रमाणेच बसथांब्यापासून, विरुद्ध दिशेने, एक-दीड किलोमीटरची फेरी मारून त्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो...


ब्राँक्स प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार

तिकीट काढून संग्रहालयाची शटल पकडून आम्ही आकर्षणांकडे निघालो...


झू शटल

संग्रहालयाचा बराचसा भाग पायी पाहिल्यामुळे एकमेकांना लागून असलेल्या भागांचा मागोवा ठेवणे कठीण होते. त्यामुळे भागांच्या नावांचा हिशेब सोडून प्राण्यांच्या मागोव्यावर राहिलो.

वाईल्ड एशिया

हा भाग अनेक उपभागांनी बनलेला मोठा परिसर आहे. इथे सुरुवातीलाच इजिप्शियन चित्रांत आणि चित्रलिपीत दिसणारा व सद्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला वॉल्डरॅप पक्षी दिसला...

  
वॉल्डरॅप


झाडावर राहणारा मॅत्शीज् कांगारू (Matschie's tree-kangaroo)

  
अनेकरंगी जावन लुतुंग माकडे


छोटी सोंड असलेले मलायन/एशियन तापीर


पर्यटकांच्या कोलाहलाला दाद न देता आरामात झोपलेले दोन काळे वाघ

वाईल्ड एशियाच्या दर्शनी भागात एका छोट्या कायमस्वरूपी उघड्या रंगमंचावर व्हॉलंटीयर्स लहान-मोठ्यांसाठी प्राणी-पक्षांची माहिती देण्याचा मनोरंजक कार्यक्रम सादर करत होते...

  

त्यांना थोडा वेळ न्याय दिला आणि जवळच असलेल्या मोनोरेल स्टेशनच्या दिशेने निघालो...

बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल


वाईल्ड एशिया विभागाच्या ४० एकरांमधील प्राण्यांचे आरामात बसून दर्शन देण्यासाठी सन १९७७ मध्ये ही २.६ किमी लांबीच्या मार्गावर धावणारी ९ डब्यांची मोनोरेल सेवा सुरू झाली आहे. या विभागातील बरेच प्राणी केवळ या रेल्वेप्रवासातच पाहता येतात. त्यामुळे ही सफर जेवढी मनोरंजक आहे तेवढीच इथले सर्व प्राणी पाहण्यासाठी आवश्यक आहे. व्हीलचेअर आणि मोटोराईझ्ड स्कूटर घेऊन फिरणारे पर्यटक या गाडीत आपल्या वाहनांसकट बसून मोनोरेल सफरीचा आनंद घेऊ शकतात. शारीरिक दृष्ट्या असमर्थ असणार्‍या (डिफरंटली / स्पेशली एबल्ड) लोकांसाठी सार्वजनिक व खाजगी ठिकाणांवर अशी खास सोय असणे ही अमेरिकेत नेहमीची गोष्ट आहे. आपली व्हीलचेअर घेऊन आत शिरण्याची सोय व तिच्यातच बसून प्रवास करण्यासाठी खास जागा प्रत्येक शहरी बसमध्येही असते. सहसा आपली जागा न सोडणारे बस चालक, व्हीलचेअरला तिच्या जागी बसविण्यासाठी विनाअपवाद अगत्याने मदत करताना दिसतात. इथे जागोजागी असलेल्या अश्या सोयी पाहताना, भारतातल्या एका राष्ट्रीय वाहिनीवर चाललेल्या चर्चेत, "अश्या सोयीची गरज असणारे भारतात ५% च लोक आहेत, त्यामुळे ती प्रायॉरिटी नाही" असे एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने तोडलेले तारे आठवले ! :(

इथल्या मोनोरेलमध्ये बसायची व्यवस्था अशी आहे की सगळे पर्यटक गाडीच्या एका बाजूकडे तोंड करून बसलेले असतात ! चित्रपटगृहात असते त्याप्रमाणे पुढच्यापेक्षा मागच्या आसनांच्या रांगांची उंची जास्त ठेवली आहे. जणू हे धावते प्रेक्षागृहच आहे. त्यामुळे, मान वाकडी करायला न लागता सगळ्यांना नाकासमोर दिसणारे प्राणी व निसर्गाचे देखावे पाहता येतात. संग्रहालयाच्या आवारातून वाहणार्‍या ब्रॉक्स नदीच्या प्रवाहाचा व दलदलींचा फायदा घेत प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात असण्याचा आभास निर्माण केला आहे. त्यामुळे ही मोनोरेल सफर प्राणीदर्शन आणि निसर्गदर्शन असा आनंद द्विगुणित करणारी होते...


बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०१


बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०२ : ब्राँक्स नदीच्या मनोहर प्रदेशातून प्रवास (जालावरून साभार)


बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०३ : ब्राँक्स नदीच्या मनोहर प्रदेशातून प्रवास

मध्य आशिया व मंगोलियातील नष्ट होऊ लागलेली रानटी घोड्यांची Przewalski's प्रजाती. यांना आजतागायत माणसाळवणे शक्य झालेले नाही...


रानटी घोड्यांची Przewalski's प्रजाती


जणू फोटोसाठी पोझ घेऊन बसला आहे असा अमुर (सायबेरियन) वाघ


आशियाई हत्ती


तांबडा पांडा

मोनोरेल सफर संपवून वाईल्ड एशियामधून बाहेर पडलो तेव्हा अ‍ॅस्ट्रर कोर्ट येथील पक्षांच्या एका खास कार्यक्रमाची वेळ होत आली होती. त्यामुळे, तो बघायला झू शटल पकडून निघालो. शटलमधून उतरून अ‍ॅस्ट्रर कोर्टाकडे जाताना वाटेत समुद्री सिंहाचा (सी लायन) तलाव होता. वाटेत भेटलेल्या या राजेमहाराजांना थोडा वेळ देऊन त्यांचा मान राखणे भाग होते.

एका मोठ्या तलावात अनेक समुद्री सिंह पर्यटकांचे मनोरंजन करत होते. त्यातला एक फारच धीट होता आणि पाण्यातून उसळ्या मारत पर्यटकांपासून हाताच्या अंतरावर तलावाच्या कडेवर रेलत जणू "है कोई ?" असे म्हणत आरामात उभा राहत होता...

कॅलिफोर्नियानं सी लायन ०१

तर दुसरा एका शीळेवर रॉयल पोझ घेऊन आरोळ्या ठोकत शो ऑफ करत होता...


कॅलिफोर्नियानं सी लायन ०२

अ‍ॅस्टर कोर्टावर "बर्ड्स इन फ्लाईट" या नावाचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्याची वेळ होत आल्यावर मोक्याच्या खुर्च्या पकडून बसलो. या कार्यक्रमात अनेक पक्षांच्या करामती पहायला मिळाल्या. पक्षीशास्त्रात संशोधन करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शास्त्रज्ञांनी बनलेला संच हा कार्यक्रम मनापासून आवडीने सादर होता, हे विशेष !

आपले पद, ज्ञान अथवा अनेक दशकांच्या अनुभवाच्या मानाने खूप खाली उतरून आपण सर्वसामान्य पर्यटकांसमोर कार्यक्रम सादर करत आहोत, असे त्यांच्या वागण्यातून किंचितही जाणवले नाही. पाश्चिमात्य देशांतून आलेल्या संशोधनाची कारणमीमांसा करताना, त्यांना उपलब्ध होणारा पैसा आणि साधने यांना आपण सहजपणे पुढे करतो. संशोधनासाठी उच्च प्रतीची संसाधने असलेली प्रयोगशाळा जेवढी आवश्यक असते त्यापेक्षा जास्त आपल्या संशोधनात समरस होऊन, झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे असते. हे जिथे दिसते तेथेच खरे संशोधन होऊ शकते, हे मात्र आपण सहजपणे (किंवा सोईस्करपणे) विसरून जातो.

"बर्ड्स इन फ्लाईट" कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...


बर्ड्स इन फ्लाईट ०१


बर्ड्स इन फ्लाईट ०२

  
बर्ड्स इन फ्लाईट ०३ व ०४


बर्ड्स इन फ्लाईट ०५

    
बर्ड्स इन फ्लाईट ०६, ०७ आणि ०८

इथून पुढे शटलच्या मार्गात नसलेले अनेक विभाग बघण्यासाठी पदयात्रेला पर्याय नव्हता. त्यामुळे, तेथून जवळच असलेल्या मादागास्कर दालनाकडे मोर्चा वळवला.

मादागास्कर


मादागास्कर भवन

ही इमारतीचे १९०३ साली "लायन हाउस" या नावाने उद्घाटन झाले होते. ते १९८० मध्ये बंद पडले. सन २००८ साली ती मादागास्कर दालनाच्या स्वरूपात परत वापरात आणली गेली. या दालनात आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावरील मादागास्कर बेटावरील अनेक प्राण्यांचा संग्रह केलेला आहे. यातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. Wildlife Conservation Society त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणारे अनेक प्रकल्प राबवित आहे.


रिंग टेल्ड लेमूर

  
मादागास्कर भवनातले काही प्राणी

तिथून जरा पलीकडे शिकारी पक्षांचा भाग सुरू झाला...

    
    
शिकारी पक्षी

त्यापुढे सागरी पक्षांचा भाग होता...

  
  
  
सागरी पक्षी ०१

  
सागरी पक्षी ०२ : पेंग्विन

गोलाकार पदयात्रा करत करत परत अ‍ॅस्टर कोर्ट जवळच्या कारंजे गोलात (फाऊंटन सर्कल) पोचलो होतो. या भागाला सुंदर टाइल्सच्या नक्षीने आणि कोरीवकामाने सजवलेले आहे. तिथे आरामात बसण्यासाठी एक जागा सापडली. बरोबर आणलेल्या खाण्याच्या सामुग्रीला बाहेर काढून कुरकुरणार्‍या पोटाला शांत केले...


फाऊंटन सर्कल ०१ : कारंजे

  
  
फाऊंटन सर्कल ०२ : सजावट

"वर्ल्ड ऑफ बर्ड्स" नावाच्या एका बंदिस्त पक्षीदालनातून फिरत असताना हे अनेक आकर्षक रंगांनी सजलेले चिमुकले जीव, आजूबाजूने फिरणार्‍या पर्यटकांची पत्रास न बाळगता, एका छोट्या खड्ड्यात साठवलेल्या पाण्यात भर दुपारी अंघोळी उरकून घेत होते...

  

"वर्ल्ड ऑफ बर्ड्स" मधले अजून काही आकर्षक पक्षी...

  
  
  
  
    
वर्ल्ड ऑफ बर्ड्स मधील काही पक्षी

तिथून पुढे निघालो आणि वाटेवर हे कुटुंब आमच्यासारखेच सहलीला निघालेले दिसले...


संग्रहालयाचे आवार म्हणजे एक सुंदर जंगलच आहे. पायवाटांच्या दोन्ही बाजूला असलेले प्राणी व पक्षी बघताना होणारी पायपीट सुकर व्हावी यासाठी मध्ये मध्ये पर्यटकांना बसायला सोयी केलेल्या आहे...


शेवटची मजल दरमजल करत निर्गमनद्वाराकडे वाटचाल चालू असताना हा एक आकर्षक पक्षी दिसला...


आणि दरवाजाच्या जवळ या अमेरिकन बायसनच्या जोडीने (म्हैस/रेडा) दर्शन दिले...


आम्ही जेथून बाहेर पडलो त्या लोखंडी फोर्डहॅम रोड गेटवरची नक्षी बघण्यासारखी होती...


फोर्डहॅम रोड गेट

बस घराच्या दिशेने पळू लागली आणि आम्ही दमलेल्या पायांना कुरवाळत आजूबाजूची वस्ती न्याहाळू लागलो.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Jan 2017 - 8:43 am | प्रचेतस

खुप सुंदर.

भरपूर वृक्षसंपदा असल्याने हे पशुपक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच ठेवल्यासारखे दिसताहेत.

मिहिर's picture

23 Jan 2017 - 8:51 am | मिहिर

छानच दिसतंय. जायला हवं नक्कीच एकदा.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 9:16 am | फेदरवेट साहेब

एक नंबर भाऊ साहेब, लैच आवडले, प्रवाही अन मस्त लिखाण. फोटो मेजवानी विशेष आवडली :)

सुधांशुनूलकर's picture

23 Jan 2017 - 11:07 am | सुधांशुनूलकर

प्राणी-पक्षिप्रेमी असल्यामुळे या भागाची वाटच पाहत होतो.

संशोधनासाठी उच्च प्रतीची संसाधने असलेली प्रयोगशाळा जेवढी आवश्यक असते, त्यापेक्षा जास्त आपल्या संशोधनात समरस होऊन, झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे असते. हे जिथे दिसते तेथेच खरे संशोधन होऊ शकते, हे मात्र आपण सहजपणे (किंवा सोईस्करपणे) विसरून जातो.

- टाळ्या, कचकून १०००% अनुमोदन. सलाम या वाक्याला.

मस्त लेख . मस्त फोटो . रम्बल इन द ब्राँक्स .

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2017 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांसाठी आणि वाचकांसाठी धन्यवाद !