रानभाजी फोडशी/कुलूची डाळ घालून भाजी

जागु's picture
जागु in पाककृती
25 Jun 2012 - 11:26 am

साहित्य :
फोडशी/कुलूच्या २ ते ३ जुड्या
२ कांदे चिरुन
पाव वाटी कोणतीही डाळ भिजवून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
२ मिरच्या चिरुन
ओल खोबर अर्धी मुठ
चवीनुसार मिठ
१ चमचा टोमॅटो सॉस नसल्यास साखर

कृती :

फोडशी/कुलू ची एक एक पाती वेगळी करून घ्या खाली जास्त पांढरा भाग असल्यास काढा. मध्ये जर कडक दांडी असेल तर काढा आणि स्वच्छ धुवून चिरुन घ्या.

भांड्यात तेल तापवून त्यावर लसुण पाकळ्या व मिरच्यांची फोडणी देउन कांदा घाला. त्यावर हिंग, हळद घाला व परतवून डाळ घालून परत परता.

ह्यावर टोमॅटो सॉस घालून परता.

आता ह्यावर चिरलेली फोडशी/कुलूची भाजी घाला. व झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परता. भाजी बसल्यामुळे व्यवस्थित परतता येते. भांड्याच्या बाहेर जात नाही.

ह्यावर मिठ घाला व डाळ शिजू द्या. डाळ शिजली की वरून खोबरे पेरून परता आणि गॅस बंद करा. झाली भाजी तय्यार. :स्मित:

अधिक टिपा:
हिच भाजी आधी उकडून घेण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे ती मऊ होते. पण डायरेक्ट केली तर माझ्यामते जास्त रुचकर व पौष्टीक होते.

हिच भाजी प्लेन माझ्या आधीच्या रानभाज्यांच्या मालिकेत आहे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Jun 2012 - 11:37 am | प्रचेतस

मस्तच झालीय भाजी.

मराठमोळा's picture

25 Jun 2012 - 11:44 am | मराठमोळा

मस्तच हो जागुतै,
कुठुन शोधुन आणता हो हे सगळं.. कधी खायला मिळेल की नाही माहित नाही पण माहिती मिळतेय तेच खुप आहे. :)

दिसायला गवतासारखी असली तरी चवीला चांगली असावी अशी दिस्तेय.. कांद्याच्या पातीसारखी.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 11:47 am | श्रीरंग_जोशी

खासच दिसत आहे रानभाजी. फार चविष्ट असणार नक्कीच.

माझ्या सगळ्या पालेभाज्या अशाच फोडणीत असतात. :) वैताग येतो कधीकधी. सारखं नविन काहीतरी करायला मी काय जागु आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2012 - 11:57 am | अत्रुप्त आत्मा

कोकणात येणार्‍या पावसाळी भाज्या खाल्या आहेत... ही पण त्यातलीच वाट्टे... छान आहे.

जाई.'s picture

25 Jun 2012 - 12:38 pm | जाई.

अहाहा मस्तच

वल्ली, मराठमोळा, श्रिरंग जोशी, शिल्पा, अतृप्त आत्मा धन्यवाद.

उदय के'सागर's picture

25 Jun 2012 - 12:43 pm | उदय के'सागर

व्वा व्वा... पावसाळ्यात असल्या भाज्या खाण्यात जाम मज्जा.... त्यात अपल्याला तर रानभाज्या जाम अवडतात ...पण कुठे मिळणार हि भाजी अता... मंडई धुंडाळणे आले :)

'कवाळी' म्हणुन एक भाजी मिळते ती हीच का ग?
दिसतेय तरी तशीच.

चला पावसाळी रान भाज्या आणि मास्यांची मेजवानी मिळणार तर आता. :)

उदय शोधा म्हणजे सापडेल.

गणपा वरील फोटो प्रमाणे दिसते का ? कवाळी नाव मी पहिलांदाच ऐकले.

उदय के'सागर's picture

25 Jun 2012 - 3:07 pm | उदय के'सागर

एक्झ्यॅकटली मी हि हिच लाईन लिहिली होती माझ्याच मागच्या प्रतिसादात पण खोडुन टाकली म्हंटल आपणच प्रश्न विचारा आणि आपणच काय उत्तर द्या ;) ... शिवाय म्हंटल मिळेलहि कदाचित उत्तर (पण विसरलो होतो तुम्हि पुण्याचे नाहित त्या त्यामुळे पुण्यात हि भाजी नेमकि कुठे मिळेल हे सांगता येणार नाहि तुम्हाला) असो :)

छान. आधीही वेगळ्या प्रकारे दिलेली आठवते आहे.

अर्धवटराव's picture

25 Jun 2012 - 11:19 pm | अर्धवटराव

आपला पत्ता द्या... आणि अश्या अनवट भाज्या हाणायला कधी येऊ ते सांगा :)

अर्धवटराव

रेवती हो आधी प्लेन म्हणजे डाळ न घालता केलेली भाजी दिली होती.

अर्धवटराव उरणला याव लागेल तुम्हाला.

अर्धवटराव's picture

25 Jun 2012 - 11:59 pm | अर्धवटराव

असं "अस्सल" खाय-प्यायला आम्हि कुठेही जाऊ शकतो :)

अर्धवटराव

सहज's picture

26 Jun 2012 - 7:04 am | सहज

चला आता उरणमधे जागा शोधणं आलं.

शिल्पा नाईक's picture

26 Jun 2012 - 12:58 pm | शिल्पा नाईक

मस्त ग जागु ताई,

हि भाजी माझ्या सा. बा. डाळ न टाकता करतात, ती पण मस्त लागते.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jun 2012 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर

रानभाज्या भारतिय शहरात मिळणे दुरापास्त तर इथे आखातात कुठून मिळणार? पण तशाही काही अनोळखी भाज्या इथे दिसतात. त्यात आता शोधून पाहिली पाहिजे.

तंतूमय असल्याकारणाने मधूमेहींसाठी औषधी आहे असे वाचले.

बाकी पाककृती सोपी आणि क्षुधावर्धक छायाचित्रांनी नटलेली आहे. अभिनंदन.