भूईछत्र्या ह्या रानात, डोंगरात साधारण ऑगस्ट च्या दरम्यात म्हणजे जरा उन पडायला लागल्यावर, ढग गडगडायला लागल्यावर यायला लागतात. भुसभुशित जागेत त्या उगवतात. भूईछत्र्या ह्या खाण्याच्या आहेत हे मात्र खात्रीकरुन घ्यावे. ह्यात विषारी प्रकारही असतात. जाणकारांकडूनच ह्या घ्याव्यात.
साहित्यः
भूईछत्री/मश्रुम्स
कांदे २
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर पेस्ट १ चमचा
टोमॅटो १ ते २
हिंग
हळद
मसाला १ ते २ चमचे
तेल
चविनुसार मिठ
अर्धा चमचा गरम मसाला
पाककृती
प्रथम भूईछत्र्या सोलुन घ्यायच्या. सोलून घ्यायच्या म्हणजे ह्या थराथरांच्या आवरणांच्या बनलेल्या असतात. सगळ्यात वरचे आवरण काळपट असते ते काढून टाकायचे.
नंतर त्याला हातानचे सुट्टे करत त्याचे बारीक भाग करायचे.
हया भूईछत्र्यांचे तुकडे आता धुवुन घ्यायचे. भांड्यात तेल गरम करुन कांदा शिजत लावायचा. शिजला की त्यात आल्-लसुण, मिरची,कोथींबीरची पेस्ट टाकुन थोड परवायच. त्यानंतर हिंग, हळद, मसाला टाकुन परतवून भूईछत्र्यांच्या फोडी टाकायच्या. व ढवळून शिजत ठेवायचे. भुईछत्र्यांना पाणी सुटते थोडे.
साधारण १०-१५ मिनीटे शिजल्यावर त्यात वरुन टोमॅटो, मिठ व गरम मसाला घालायचा. टोमॅटो शिजला, पाणी आटले की गॅस बंद करायचा.
ही आहे तयार भूईछत्री/मश्रुम्सची भाजी. अगदी मटणासारखी लागते चविला.
अधिक टिपा:
ह्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो म्हणून भाजीत आजीबात पाणी घालू नये.
साफ करण्यात थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे जास्त प्रमाणात करावयाची असल्यास चिकाटी बाळगावी.
प्रतिक्रिया
27 Sep 2011 - 11:29 pm | जाई.
वाह! मस्तच
एकदम जबरा व्हेज पाकृ
तोँपासु
खरोखर मटणासारखीच हिची चव लागते
27 Sep 2011 - 11:28 pm | यकु
हो. याला हिंदीत कुकुरमुत्ता म्हणतात.
याचा विषारी प्रकार खाल्ल्यानेच भ. बुद्धांचा मृत्यू झाल्याची कथा आहे.
28 Sep 2011 - 12:27 am | पाषाणभेद
इंदूर का? छान छान. चित्रगुप्तांना भेटा मग.
भाजीकृती तर मस्त दिसतेय.
28 Sep 2011 - 11:12 pm | प्रास
मी ऐकलेलं की भ. बुद्ध डुक्करकंद (राठ केसासारखे बाह्य आवरण असलेला कंद) खाल्ल्याने झालेल्या अजीर्णामुळे मृत्यू पावले.
बाकी जागुतैची पाकृ नेहमीप्रमाणेच मस्त.....
:-)
28 Sep 2011 - 2:54 am | पिंगू
मशरुम म्हणजे माझी आवडती भाजी. कुणी करुन देणार असेल, तर कधी नाही म्हणत नाही मी..
- पिंगू
28 Sep 2011 - 10:06 am | ऋषिकेश
तोंपासू
28 Sep 2011 - 10:48 am | गवि
विषारी आहे की नाही हे सांगणारे जाणकार कुठून मिळणार? आणि "काही" विषारी असतात आणि काही नसतात म्हणजे हाय रिस्कच की.
त्यापेक्षा बिग बझारमधे प्याक करुन ठेवलेली मश्रुमे आणावीत हे जास्त सेफ.
पाककृती मस्तच.
28 Sep 2011 - 1:07 pm | कच्ची कैरी
मस्त आहे पाकृ, !! ट्राय करुन बघेल नक्की .
28 Sep 2011 - 1:40 pm | मदनबाण
आहाहा... :)
माझी आवडती भाजी ! :) कधी हाटिलात गेलो तर मश्रुम मसाला भाजी आणि पराठा यावर ताव मारतो ! :)
वरीत फोटुत असलेलं मश्रुम जरा येगळं वाटतया ! बहुतेक वेळा बटण मश्रुम भाजीसाठी वापरतात वाट्ट.
मश्रुमचे सुप देखील मस्त लागते,नॉर वाल्यांचे मश्रुमच्या सुपाचे पाकीट मिळते, त्ये बी लयं झकास लागतं बघा.
बाकी फिरंगी लोक बहुधा नशिल्या किंवा विषारी मश्रुमचे देखील सेवन करतात... नशा किंवा बहुधा ट्रान्स मधे जाणे होत असेल असे वाटते मला.जालावर मश्रुम ट्रीप (mushroom trip) असा शोध घेतल्यावर अजुन माहिती मिळेल.
10 Oct 2011 - 6:41 pm | प्रभाकर पेठकर
प्रथिनांनी ओतप्रोत भरलेली भाजी म्हणजे मश्रूम. बटण मश्रूम जास्त प्रचलीत आहेत. इतरही अनेक जाती आहेत. पण आपल्याकडे बटण मश्रूम जास्त वापरले जातात.
मश्रूमात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे ते जास्त धूऊ नयेत. फडक्याने पुसुन घ्यावेत.
अजून एक मश्रूम पाककृती
http://www.misalpav.com/node/1384
28 Sep 2011 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार
शोधून शोधून हीच पाककृती सापडली होय तुला ? :(
ते थर्माकोल आणि ह्या कुत्र्याच्या छत्र्या... बघितले तरी संताप संताप होतो माझा !
परवा त्या सोत्रेने सूड उगवला आज तू.
28 Sep 2011 - 3:14 pm | जागु
पर्या तुच सांग्तलस की एखादी व्हेज पाकृ टाक आता ती टाकली तर हीच का टाकली ? जा आता परत नॉनव्हेजच रेसिपी टाकेन.
सगळ्यांचे धन्यवाद. हे मश्रुम्स डोंगरात, रानात मिळतात. कातकरी, ठाकर ही ह्या बाबत जाणकार लोक. तिच आमच्याइथे विकायला आणतात. म्हणुन मी कधी कुठे उगवलेली दिसली तरी काढत नाही. फक्त त्यांच्याकडून घेते.
30 Sep 2011 - 2:35 am | अमेरिकन त्रिशंकू
आपल्या जिभेला या ५ मूलभूत चवी कळतात: गोड, आंबट, तुरट, खारट आणि उमामी
यातल्या उमामीचे वर्णन साधारणपणे इंग्रजीमध्ये "सेव्हरी" ज्याला म्हणतात असे करता येते.
मश्रूम्स, चॉकलेट, सोय सॉस, अँचोव्हीज, मोनो सोडियम ग्लुटोमेट (अजिनो मोटो) या पदार्थांमध्ये उमामीचे प्रमाण खूप असते. त्यामुळे वरील गोष्टी घातलेले पदार्थ चविष्ट होतात.
30 Sep 2011 - 11:19 am | जागु
त्रिशंकु धन्स माहीती बद्दल.
4 Oct 2011 - 3:15 pm | विसोबा खेचर
जियो..!